द स्केअरक्रो - भाग ‍१९

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
22 Aug 2015 - 1:08 am

द स्केेअरक्रो भाग १८

द स्केअरक्रो भाग १९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)

सोमवारी सकाळी मी एकदम फ्रेश होतो. रॅशेलचा फोन कधीही येऊ शकला असता. मला त्याच्यासाठी तयार राहायचं होतं. त्यामुळे सकाळी सहा वाजताच मी टाइम्सच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. मला फाईल्सवर काम करायचं होतं.

आमची न्यूजरूम पूर्णपणे रिकामी होती. अगदी एखादं चिटपाखरूही नव्हतं. एकही रिपोर्टर किंवा एडिटर नव्हता. भविष्यकाळाच्या कल्पनेने माझ्या मनात चरकलं. एकेकाळी हीच न्यूजरूम म्हणजे जगातली सर्वोत्तम जागा होती काम करण्यासाठी. मैत्री, स्पर्धा, हजरजबाबीपणा, गॉसिप, विनोदबुद्धी या सगळ्यांचा इथे वावर असायचा. अनेक स्टोरीज माझ्या डोळ्यांसमोर लिहिल्या गेल्या. लॉस एंजेलिससारख्या जिवंत आणि जगभरातल्या अठरापगड माणसांनी भरलेल्या शहरातल्या लोकांचं मत आणि कल ठरवणाऱ्या अनेक स्टोरीज मी स्वतः लिहिल्या, इतरांना लिहिताना पाहिलं. पण आर्थिक प्रश्नांमुळे टाइम्सच्या अनेक पानांवर कात्री चालवली जात होती आणि आमचा पेपरही या न्यूजरूमसारखाच रिकामा आणि भकास दिसायला लागला होता. एक प्रकारे मला मी इथून चाललो होतो ते बरंच वाटत होतं, कारण जेव्हा टाइम्सवर शेवटचे घाव पडले असते, तेव्हा माझ्याच्याने बघवलं नसतं.

मी माझ्या क्युबिकलपाशी आलो, बसलो आणि माझा इमेल अकाउंट बघितला. तीन दिवसांपूर्वी, शुक्रवारीच आमच्या आय.टी.डिपार्टमेंटने मला माझा नवीन पासवर्ड दिला होता. मला जवळजवळ चाळीस मेल्स आलेली होत आणि त्यातली कितीतरी अनोळखी लोकांकडून आलेली होती. मी ती न वाचताच मिटवून टाकली. दोन मेल्स जरा विशेष होती. दोन्हीही स्वतःला सीरियल किलर्स म्हणवणाऱ्या माणसांकडून आलेली होती आणि त्यांनी मला मी त्यांचं पुढचं लक्ष्य असल्याचं सांगितलं होतं. ही दोन्हीही मेल्स मला रॅशेलला दाखवायची होती. पण ती तशी निरुपद्रवी असावीत कारण दोन्हीमध्ये स्पेलिंगच्या इतक्या चुका होत्या की आमच्या अनसबने ती पाठवलेली असण्याची शक्यता फारच कमी वाटत होती.

सोनी लेस्टरचा एक मेल होता. त्यात त्याने माझ्यावर त्याचा विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार मी त्याला वचन दिलं होतं. मीही त्याला उत्तर म्हणून एक मेल पाठवला की जर मी कुठलीही स्टोरी स्वतः लिहिलेलीच नाही, तर मी त्याला फोटोग्राफी करायला कुठून सांगणार? त्यातूनही त्याची जर काही तक्रार असेल तर ती त्याने सरळ डोरोथीकडे न्यावी, असंही मी त्या मेलमध्ये लिहिलं.

एवढं सगळं झाल्यावर मी माझ्या बॅगमधून माझा लॅपटॉप आणि फाईल्स बाहेर काढल्या आणि कामाला सुरुवात केली. आदल्या रात्री मी बरीच माहिती नजरेखालून घातली होती. डेनिस बॅबिटच्या खुनासंदर्भात असलेले सगळे रेकॉर्डस् मी वाचून संपवले होते आणि अशा गोष्टींची यादी बनवली होती ज्या तिच्या खुन्याला तिचा खून एवढ्या बिनबोभाटपणे करण्यासाठी माहित असणं आवश्यक होतं. तीच पद्धत वापरून मी शेरॉन ओग्लेव्हीबद्दलही अशीच यादी बनवायला सुरुवात केली.

आठ वाजेपर्यंत कोणीही माझ्या कामात व्यत्यय आणला नाही. हळूहळू एडिटर्स आणि रिपोर्टर्स यायला लागले. अजून एक आठवडा सुरु झालेला होता आणि दररोजचा पेपर काढणं हेही आवश्यक होतं. साधारण सव्वाआठ वाजता मी नाश्ता करण्यासाठी उठलो आणि कॅफेटेरियात गेलो. मागच्या वेळी इथेच मी अँजेलाला भेटलो होतो. तीच आमची शेवटची भेट.

तिचे विचार आणि तिच्या थिजलेल्या निष्प्राण डोळ्यांना महत्प्रयासाने बाजूला सारून मी न्यूजरूममध्ये परत आलो आणि पार्कर सेंटरला फोन केले. काहीही नवीन घडलेलं नव्हतं. त्यामुळे मी परत माझ्या कामाला लागलो. साधारण सव्वानऊच्या सुमारास मला एक इमेल आला. अगदी थोडक्यात होता, पण उत्सुकता वाढवणारा. आमचा जल्लाद रिचर्ड क्रेमरने पाठवला होता. मला जेव्हा वेळ असेल तेव्हा त्याला येऊन भेटायला त्याने सांगितलं होतं. मी विचारात पडलो. नक्कीच अँजेलाच्या जागी जो कोण किंवा जी कोण येणार असेल, त्याला किंवा तिला ट्रेनिंग देण्याबद्दल असणार. निदान पार्कर सेंटरमध्ये नेऊन सगळ्यांची ओळख करून द्यायचं अपमानास्पद काम असणार.

मला हा व्यत्यय नको होता म्हणून मी जे काही असेल ते आत्ता लगेचच संपवायचं ठरवलं, आणि त्याच्या केबिनमध्ये गेलो. क्रेमर बसला होता आणि बहुतेक एखाद्या दुर्दैवी माणसाला इमेल करून त्याची नोकरी संपुष्टात आल्याची बातमी देत होता. केबिनचा दरवाजा उघडाच होता, पण तरीदेखील मी शिष्टाचार पाळून दरवाज्यावर टकटक केलं. त्याने माझं अगदी तोंड भरून स्वागत केलं.

“ये ये जॅक, वेलकम! काय चाललंय?”

“वेल् , तुझं माहित नाही पण मी ठीक आहे.”

क्रेमरने मान डोलावली, “बरोबर. तू याच्याआधी या खुर्चीत माझ्यासमोर बसला होतास त्यानंतरचे दहा दिवस खूपच धावपळीत गेले आपले.”

मी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

“माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे,” तो म्हणाला, आणि हे बोलताबोलता त्याने दोन-तीन कागद एका फाईलमधून बाहेर काढले.

“आम्हाला असं वाटतंय जॅक, की ही जी केस तू शोधून काढलेली आहेस, गाडीच्या ट्रंकमध्ये मृतदेह सापडल्याची, ती एकदम मजबूत, दणदणीत केस आहे. एफ.बी.आय.ने या माणसाला आज पकडू दे किंवा उद्या, आपण ही स्टोरी पकडून ठेवणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला तुझी गरज आहे. स्पष्टपणे सांगायचं तर तू इथून जाऊ नयेस, अशी आमची इच्छा आहे.”

मी त्याच्याकडे निर्विकारपणे पाहिलं.

“म्हणजे माझी हकालपट्टी होत नाहीये?”

माझं बोलणं न ऐकताच क्रेमरने त्याचं घोडं पुढे दामटवलं, “तुला आम्ही जी ऑफर देतोय, त्यात तुला सहा महिन्यांची मुदतवाढ देतोय आम्ही. तू या पेपरवर सही केलीस की त्यापासून पुढचे सहा महिने.”

“अच्छा. म्हणजे माझी हकालपट्टी होणार आहे, पण सहा महिन्यांनी.”

क्रेमरने ते कागद माझ्या पुढ्यात सरकवले, “सहा महिने हा आपला ठरलेला मुदतवाढीचा काळ आहे. इथल्या प्रत्येक अॅग्रीमेंटसाठी आम्ही तो वापरतोय.”

“पण माझ्याकडे कुठलंही अॅग्रीमेंटच जर नाहीये, तर त्याच्या मुदतवाढीचा प्रश्न येतो कुठे?”

“ तू अजूनही इथे काम करतो आहेस, त्यामुळे तुझा कंपनीशी अध्याहृत करार तर आहेच. ही मुदतवाढ ही त्याच संदर्भात आहे. तू का या कायद्याच्या भानगडींमध्ये पडतो आहेस?”

मी ते अॅग्रीमेंट वाचता वाचता एका जागी अडखळलो.

“यानुसार मला सहा महिन्यांसाठी तीस हजार डॉलर्स मिळणार आहेत,” मी म्हणालो.

“बरोबर. आपला ठरलेला रेट आहे हा. मुदतवाढीसाठी.”

“अच्छा. म्हणजे आत्ता मला जेवढे मिळताहेत त्यापेक्षा तब्बल अठरा हजार डॉलर्स कमी. म्हणजे तुला या स्टोरीला पकडून राहायचंय, म्हणून मी अठरा हजार डॉलर्स कमी पगार घ्यावा असं तुझं म्हणणं आहे. शिवाय,” मी पुढे वाचायला सुरुवात केली, “यानुसार मला मिळणारे सगळे वैद्यकीय आणि इतर लाभ, उदाहरणार्थ पेन्शन वगैरे – मिळणार नाहीयेत. बरोबर बोलतोय ना मी?”

असं कुठेही त्याच्यात लिहिलेलं नव्हतं पण असंच असणार याबद्दल माझी खात्री होती.

“जॅक,” क्रेमर अगदी शांतपणे म्हणाला, “मी फायनान्सवाल्यांशी थोडीफार हुज्जत घालून या बाबतीत काही करता येतंय का ते बघतो पण तुला आता हे लाभ स्वतःच्या पैशांतून घ्यावे लागतील. आता आपण तसंच करतोय सगळीकडे. हीच सर्वमान्य पध्दत आहे, जर तू भविष्यकाळाचा विचार केलास तर!”

मी ते अॅग्रीमेंट परत घडी घालून त्याच्यासमोर ठेवलं आणि उभा राहिलो, “तुझी वेळ येईपर्यंत थांब.”

“म्हणजे?”

“तुला काय वाटतं, हे आमच्यावरच थांबेल?रिपोर्टर्स आणि कॉपी एडिटर्स?तुला असं वाटतंय की जर तू एखाद्या सैनिकासारखं प्रश्न न विचारता मॅनेजमेंट सांगतंय तितक्या लोकांना घालवून देशील तर शेवटी तुला कोणी हात लावू शकणार नाही? तू सुरक्षित राहशील?”

“जॅक, माझ्या परिस्थितीचा प्रश्न येतो कुठे याच्यात?”

“आणि तो येत असला, तरी मला पर्वा नाही. मी याच्यावर सही करणार नाहीये. त्यापेक्षा मी इथून बाहेर जाईन. पण एक लक्षात ठेव. एके दिवशी तुलाही कोणीतरी असाच मेल पाठवेल आणि अशा अॅग्रीमेंटवर सही करायला लावेल. मग तुला प्रश्न पडेल की तुझ्या मुलांच्या शिक्षणाचा आणि इतर गोष्टींचा खर्च करायचा कसा? आणि तेव्हाही ती सर्वमान्य पद्धत असेल, भविष्यकाळाचा विचार केला तर.”

“जॅक, तुला मुलं वगैरे काहीच पाश नाहीयेत, आणि मला धमकी देण्याचा...”

“मी तुला धमकी देत नाहीये, क्रॅमर! माझा मुद्दा हा आहे की...”

मी त्याच्याकडे रोखून पाहिलं. तोही माझ्याकडे मी काय बोलतोय याचा विचार करत पाहात होता.

“जाऊ दे!”

मी त्याच तिरीमिरीत त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडलो आणि माझ्या क्युबिकलपाशी आलो. येता येता माझा फोन काढून बघितलं. कोणाचाही फोन आलेला नव्हता. आता इथे दहा वाजले होते, म्हणजे तिथे वॉशिंग्टन डी.सी. मध्ये दुपारचा एक. पण अजूनही रॅशेलचा फोन आलेला नव्हता. मी माझा डेस्क फोन चेक केला आणि माझा इमेल पाहिला. दोन्हीकडे काहीही मेसेज नव्हते.

शेवटी वैतागून मी तिच्या मोबाईलवर फोन केला. तो सरळ व्हॉईसमेलवर गेला. लवकरात लवकर मला फोन करायचा मेसेज त्याच्यावर ठेवून मी फोन बंद केला. नंतर मी हॉटेल मोनॅकोचा नंबर शोधून काढला आणि तिथे फोन केला, पण त्यांनी मला तिने सकाळीच तिची खोली सोडल्याचं सांगितलं.

मी हा कॉल संपवत नाही तोच माझा डेस्क फोन वाजला. मी उचलला. पलीकडे लॅरी बर्नार्ड होता.

“काय म्हणत होता क्रेमर? तुला परत ये म्हणून तर सांगत नव्हता?”

“हो.”

“काय?खरंच?”

“कमी पगारावर. मी म्हणालो ठेव तुझी नोकरी तुझ्याकडेच!”

“वेडा आहेस का तू?काय करणार आहेस आता?”

“माझ्यावर एवढीपण वाईट वेळ आलेली नाही की मी कमी पगारावर आणि माझे सगळे लाभ गमावून काम करीन. मी त्यालाही तेच सांगितलं. चल, मी आता निघतो. जरा बाहेर जातोय.”

“अरे हो. मी तुझी सी.एन.एन. वर झालेली मुलाखत पाहिली. रविवारी सकाळी. चांगली झाली. पण तो पोरगा, अलोन्झो, तोही असणार होता ना तुझ्याबरोबर?”

“हो.”

“मी त्याच्याचसाठी टी.व्ही. लावून बसलो होतो. त्यांनी त्याची मुलाखत म्हणून खूप जाहिरातबाजी केली होती, पण ऐनवेळी त्यांनी ती रद्द का केली?”

“तो आला होता स्टुडीओमध्ये. त्याच्या आजीबरोबर. त्याला त्यांनी माईकपण दिला होता.”

“काय सांगतोस? मग?”

“त्यांनी आयत्या वेळी त्याला डच्चू दिला, कारण दर दोन शब्दांनंतर तो ‘xxxxx’ म्हणून शिवी हासडत होता.”

“फक्त याच्यावरून?”

“आणि तो माझ्याशी बोलताना हेही म्हणाला, की त्याला एक लाख डॉलर्स पाहिजेत. ही मुलाखत द्यायला. त्याने मला विचारलं सुद्धा, की मला सी.एन.एन.ने किती पैसे दिलेत? जर ते त्याची मुलाखत दाखवून पैसे मिळवणार आहेत, तर त्याला थोडे दिले त्याने काय बिघडलं असा त्याचा आणि त्याच्या आजीचा युक्तिवाद होता.”

“मग बरोबर. शुक्रवारी जेव्हा मी त्याच्याशी बोललो, तेव्हा माझ्याही लक्षात आलं होतं. तो जरी निरपराध असला, तरी त्याचं डोकं काही सरळ चालत नाही.”

“तेच. ते कुणाच्याही लक्षात आलंच असतं. बरं, मी निघतो.”

“अरे पण चालला कुठे आहेस तू आत्ता?”

“शिकारीवर!” मी फोन खाली ठेवून दिला आणि बाहेर पडलो.

क्रमशः

(अनुवाद मूळ लेखकाच्या पूर्वपरवानगीने अव्यावसायिक वापरासाठी.)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

रातराणी's picture

22 Aug 2015 - 3:35 am | रातराणी

मस्त झाला आहे हा ही भाग. इतर भागांच्या तुलनेत या भागातील घडामोडी उत्कंठावर्धक नसल्याने शेवट जवळ असल्याचं जाणवलं.

सामान्य वाचक's picture

22 Aug 2015 - 7:33 am | सामान्य वाचक

पुढचा भाग आला

अजया's picture

22 Aug 2015 - 9:11 am | अजया

वाचतेय.

अद्द्या's picture

22 Aug 2015 - 10:02 am | अद्द्या

वाचतोय

मोहन's picture

22 Aug 2015 - 11:05 am | मोहन

भाग २० प्लीज !

भाग २०, २१, २२... अंतिमपर्यंत सर्वच प्लीज! :-)

santosh mahajan's picture

22 Aug 2015 - 1:51 pm | santosh mahajan

मस्त झाला आहे हा ही भाग.

नमकिन's picture

22 Aug 2015 - 5:40 pm | नमकिन

कमी पगारावर आणि माझे सगळे लाभ गमावून काम करीन>>- नेमकी हिच "सर्वमान्य" पद्धति आमच्या येथे आहे पण निवृत्त पश्चात सेवेस; बाकी भागात छायाचित्रकाराची आठवण ठेवली म्हणायची.

अभ्या..'s picture

22 Aug 2015 - 6:35 pm | अभ्या..

बोकेश,
आज सवडीने सगळे पूर्वीचे भाग वाचून काढले बघा.
मस्त, अप्रतिम, जमलीय.
येऊद्या लवकर लवकर क्लयमॅक्स.

मास्टरमाईन्ड's picture

22 Aug 2015 - 10:15 pm | मास्टरमाईन्ड

या भागात त्या मानानं फारशी हालचाल जाणवत नाहीये.
कदाचित पुढचा जास्ती मसालेदार असेल. ;)
पुढचा भाग आज/ उद्या की डायरेक्ट २९ ला?

शाम भागवत's picture

28 Dec 2015 - 6:49 pm | शाम भागवत