विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग 1

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
20 Mar 2014 - 12:51 am

1

कोल्हापुरच्या धम्मालयाचा पॅगोडा

विपश्यना ध्यान शिबिर

“या धम्मालयाचे आकर्षण होते, सोनेरी कळसाचा पॅगोडा!पॅगोडा म्हणजे काय? त्याच्या आत काय असते? तेथे जायला आम्हाला परवानगी मिळणार का? असा सुरवातीला पडलेला पेच नंतर सुटला, कारण प्रत्येकाने तेथे जाऊन ध्यान करायला सांगितले गेले”...

गोएन्काजींचे नाव, त्यांच्या मधुर वाणीतील विपश्यनेचे काही विचार दूरदर्शनच्या मुलाखतीतून खूप वर्षांपासून ठाऊक होते. हळु हळू विविध कारणांनी ध्यानधारणा करायसाठी प्रयत्न सुरू झाले. पण बूड 10 मिनिटांपेक्षा स्थिर राहिना. नाडीग्रंथातून म्हटले गेलेले कथन की ‘जीवनात अशी एक वेळ येईल की त्यामुळे आवश्यक साधना न घडण्याने मनाला अस्वस्थता येईल. नाडीग्रंथांच्या संबंधीचे लेखन, चिंतन, वार्ता अनेकदा अशा लोकांच्या समोर जाईल की त्यामुळे नाहक बोल ऐकायला लागतील. त्यासाठी लक्षात ठेवावे की काही लोकांच्या जन्मजात स्वभावातच तो गुण असल्याने जे कर्म तुला प्रेमभाव, आदर, श्रद्धा भाव जागृत करते ते नेमके काहींना निंदा, तिरस्कार वा द्वेष करायला प्रवृत्त करते. तो मनुष्य स्वभाव आहे. प्रमुदितता व कृतज्ञता भाव असेल तर अशा लोकांत सद्भावना जागृत होईल. तेंव्हा मन शांत ठेवावे. अपराधी भावना करायची गरज नाही.’
अशा मनोधारणेत असताना एक दिवस चिरंजीवांनी मला खडसावले, ‘बाबा, बास झाले, लेखन-बिखन. आता साधना केलीत तरच काही अपेक्षित होण्याची शक्यता आहे, नाहीतर पात्रता असूनही संधी गमावल्याची हळहळ राहील. तेंव्हा विपश्यना केंद्रात जायची तयारी करा. शुभ कार्य शीघ्र’.
‘आत्ताच्या आत्ता’ असे पुटपुटत कपडे चढवले व पुण्याच्या विपश्यना केंद्रात दाखल झालो. माहिती घेतली व नेटवरून बुकिंग करून कोल्हापुरजवळच्या धम्मालय केंद्रात 20 जूनला दाखल झालो. हातकणंगले रेल्वे स्टेशनवर आणखी तीन जण भेटले व रिक्षा करून आम्ही 5 किमी लांब वेडीवाकडी वळणे घेत धम्मालयच्या गेटपाशी आलो. एकांनी आपण जरा आधी पोहोचला आहात. लोक दुपारपासून यायला लागतील, तोवर आराम करा म्हणून एक-दोन खोलीनंबर सांगून थांबायची सोय केली. दुपारचे जेवण झाले व जरा डुलकी लागली, तोवर गलका वाढला म्हणून पुन्हा गेटवर आलो. पाहतो तो ही गर्दी...
साधारण 50 - 60 जण पुरुष व 35-40 बायका, विविध वाहनांनी येत होते. रिक्षांची लगबग विशेष होती. अनेक गाड्यातून जीन्स कुडत्यातील तरुण मंडळी उतरत होती तर रिक्षाने पांढरा सदरा, विजार व डोक्याला गांधीटोपीवाले गावाकडचे लोक पण हजर होत होते. एक फॉरेनर पुरुष चकोट करून आला होता तर एक विदेशी बाई अजागळ कपड्यात वावरताना दिसत होती. होता होता आपापले रूम क्रमांक, पांघरायला रग, आंथरायला चादर व उशीचा अभ्रा असे काखोटीला मारून, मोबाईल, पैसे व अन्य किमती वस्तू जमाकरून आपापल्या रुमकडे जात होते. रात्री 8 नंतर मौनाला प्रारंभ होईल असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या सूचना मिळाल्या व ती रात्र सरली. पहाटे मोठया परातीवर ठोका पडून होतो तसा आवाज झाला. चार वाजल्याने डोळे किलकिले करून उठायची सुरवात झाली. आता हातात मोबाईल वा घड्याळ नसल्याने वेळ सूचक ठणठणाटाची सवय होणार होती. तोवर आरतीतील घंटी घेऊन इमारतीच्या रस्त्यांवरून, ‘उठा उठा हो सकळिक’ असा किणकिणाट सूचित करत होता. 4:30 झाले व आम्ही धम्मालयातील ध्यानकक्षात प्रवेशलो.

2

साधारण 200 लोक आरामात दाटीवाटीने न करता बसतील असा मोठा प्रशस्त हॉल होता. समोरच्या आसनावर उपधर्माचार्यपांढऱ्याशुभ्र वेषात आसनस्थ झाले. त्यांच्या उजव्या हाताला टेप रेकॉर्डर, लॅपटॉप, रिमोट अन् प्रकाश योजना कमी जास्त करायची बटण लीलया हाती येतील अशा तऱ्हेने ठेवलेली होती.त्यांच्या मागे आणखी एक आसन तयार होते. त्याच बरोबर एक फोल्डिंगस्क्रीन पुज्य कै. गोएन्काजींच्या प्रवचनाच्या व्हीडिओ टेप दाखवायसाठी सज्ज होता. स्त्रिया व पुरुषांच्या बैठकांमधे एक हिरव्या रंगाचे कार्पेट होते. प्रत्येकाला 2’बाय 2’चे गादीवजा बस्कूर, त्यावर एक उशी त्याला एका निळ्या चादरीचे आच्छादन, अशी आसने प्रत्येकाच्या नावासह तयार होती, खोकले, खाकरे, जांभया, चुटक्या वा आळस दर्शक बोटांचे कडा-कडा आवाज निषिद्ध होते. मौनाशिवाय हालचाली हळुवार व इतरांच्या साधनेत खंड पडू न देण्याच्या दक्षतेची वागणूक अपेक्षित होती.
सुरवातीला नाकातून आत व बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायची कला अवगत करायसाठी प्रयत्न करायला सुचना झाली. काहींनी श्वास आला – गेला असा ताल धरला तर काहींनी मनात आवडता जप करायच्या नादावर आपला श्वास नियमित करायला सुरवात केली. पण ते या साधनापथात अपेक्षित नाही. श्वासाचे फक्त आवागमन होत आहे याचा अनुभव घ्यायला अपेक्षित आहे असे सांगितल्यावर आपली साधना फुकट गेली की काय असा भाव मनात आला. त्यावर सांगण्यात आले, असे अनेकदा होईल कारण मनाला अजून वळण नाही. प्रयत्नशील रहा.
असे करता करता सकाळचे साडेसहा झाल्याचे सूचक टोले झाले. उपधर्माचार्यांनी आता नाश्ता करा. नंतर आठला हजर व्हावे अशी सूचना केली. आम्ही जवळ असलेल्या जेवणखाणाच्या हॉलकडे निघालो. तिकडे स्त्रियांसाठी वेगळी सोय होती. प्रत्येकाने आपापली ताट-वाटी-पेला-चमचा आपापल्या क्रमांकाच्या जाळीदार खाने असलेल्या स्टँड मधून काढून रांग लाऊन, आपापले वाढून घेऊन डायनिंग टेबलावर जाऊन, प्लास्टिक खुर्चीत बसून आरामात नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा होता. सुरवातीला जरा जास्त वाढून घ्यायला वाटे. नंतर नंतर वाटले तर धम्मसेवक आपल्याला हवा तो पदार्थ वाढतील असा शिरस्ता होता. दूध वा चहा असा पर्याय होता. काहींना दोन्हीचा आस्वाद घ्यावासा वाटल्याने दोन वाट्यातून दोन्ही द्रव पदार्थाची त्यांनी चव घेतली! फिरता मेनू होता. कधी उप्पिट वजा सांजा तर कधी विवाहासाठी स्थळ पहायला करतात ते पोहे, कधी गव्हाचेपॉरिज तर कधी इडली-सांभार चटणी, कधी ढोकळा-इमली चटणी असा विविध व चवदार फराळ होता.
आठ ते अकरापर्यंत मांडी घालून ध्यानाला बसायला लागे. रग लागली, कळा यायला लागल्या तर तो ध्यानातील प्रगतीचा भाग असल्याने, शरीराला काय कटकट असा त्रागा करायला जागा नव्हती. शरीराने असे अंगावरील संवेदनांचे जाणणे अनुभवायला तर आलोय असे मनात म्हणून खमाटून बसणे गरजेचे होते. काहींना सवय नव्हती त्यांनी खुर्चीवजा आसनाचा पर्याय निवडला तर कांहींनी पाठीला भिंतीचा आधार शोधला. असो.
पुढे चालू ...भाग 2

राहणीविरंगुळा

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

20 Mar 2014 - 12:57 am | शशिकांत ओक

वरील शीर्षकाचा एक मजेशीर घटनेवर आधारित लेख पुर्वी दिवाळी अंक २०१२ मधे सोडला होता. त्यावेळी आलेल्या अन्य अनुभवांचा आढावा.

आत्मशून्य's picture

20 Mar 2014 - 1:09 am | आत्मशून्य

काय लोच्या आहे कळत नाही हे नुसते वाचुनही ७व्या आकाशात पोचल्यासारखे वाटते.

शरीराला गरजेपुरतं अन्न आणि विश्रांती द्यायची .साधनं(जपमाळ वगैरे)पण नको .समोर मूर्ती नाही .कोणतेही पुस्तक नाही .देव ,कर्म यांचे विचार चर्चा नाही .

उरले मन .

विपश्यना .

अर्धवटराव's picture

20 Mar 2014 - 7:48 am | अर्धवटराव

पु.भा.प्र.

अवांतरः मै कब जाउंगा ?? :(

यशोधरा's picture

20 Mar 2014 - 7:54 am | यशोधरा

एकदा विपश्यनेचा अनुभव घ्यायचा आहे.

चित्रगुप्त's picture

20 Mar 2014 - 8:37 am | चित्रगुप्त

छान छान छान.
विपश्यनेचा प्रयोग केलात आणि विशेष म्हणजे तो सर्वांपर्यंत लेखातून पोहोचवत आहात उत्तमच.
शिबिरात जी प्रवचने ऐकवतात, त्यांचा समग्र वृत्तांत अवश्य लिहावा.
शुभेच्छा. पु.भा.आ.प्र.

शशिकांत ओक's picture

22 Mar 2014 - 4:49 pm | शशिकांत ओक

गोएंन्काजींची एक अट आहे की अशा शिबिरात येऊनच ते ध्यान धारणा करणाऱ्यांनी ती ऐकावीत. सर्व शिबिर मोफत असले तरी त्यातील ज्ञानकण वेचायला साधनेचे मोल द्यावे. इतकी माफक त्यांची अपेक्षा सुयोग्य वाटते.

चित्रगुप्त's picture

22 Mar 2014 - 6:11 pm | चित्रगुप्त

तो कोणतातरी खेळ असतो, त्यात एकाने दुसर्‍याला सांगितलेले बदलत बदलत शेवटी भलतेच काहीतरी होते, तसे होऊ नये, म्हणून ज्याने त्याने प्रत्यक्ष मूळ प्रवचने ऐकावीत हे चांगले.

मी अनेक वर्षांपूरी विपश्यनेचे शिबीरात सहभागी झालो होतो, तो अनुभव अविस्मरणीय आहे.

मात्र 'आर्ट ऑफ लिव्हिंग' वाले भक्कम फी घेऊनच 'सुदर्शन क्रिया' नावाचा प्राणायामाचा एक प्रकार शिकवतात, शपथ घ्यायला लावतात, वगैरे अति वाटते. रामदेव बाबा टीव्हीवरून मोफत प्राणायाम वर्षानुवर्षे शिकवत आहेत, त्या संदर्भात तर 'आर्ट' वाल्यांचे जास्तच खटकते. मी दोनदा 'आर्ट' च्या शिबिरात सहभागी झालो, पण एकदाही माझे तिथे पटले नाही, माझे प्रश्न त्यांना गैरसोयीचे वाटायचे, आणि उत्तर देणे टाळायचे. दोन्ही वेळी शिबीर पूर्ण केले नाही.

खरेतर अशी शिबिरे वगैरे करण्यापेक्षा आपल्याला कॉमन सेन्सने ठाऊक असलेल्या फक्त चार-पाच सामान्य गोष्टी जरी आपण निश्चयपूर्वक करत राहिलो, तरी खूप होते, हेच सत्य हाती लागले.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Mar 2014 - 6:59 pm | अत्रुप्त आत्मा

@खरेतर अशी शिबिरे वगैरे करण्यापेक्षा आपल्याला कॉमन सेन्सने ठाऊक असलेल्या फक्त चार-पाच सामान्य गोष्टी जरी आपण निश्चयपूर्वक करत राहिलो, तरी खूप होते, हेच सत्य हाती लागले.>>> इतनाही सच है..बाकि सब..http://www.sherv.net/cm/emoticons/object/bubbles-smiley-emoticon-emoji.gif

शशिकांत ओक's picture

23 Mar 2014 - 11:41 pm | शशिकांत ओक

चित्रगुप्त , ही
काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतात. गोएन्काजी आपल्या प्रवचनात यावर भर देतात की ही साघना पद्धति न बदल वापरली जावी

चित्रगुप्त's picture

25 Mar 2014 - 9:47 am | चित्रगुप्त

@शशिकांत ओक

काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतात

खरे आहे. पतंजलींनी सांगितलेल्या यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी या सर्व अवस्था अत्यंत प्रयत्नाने साध्य कराव्या लागतात. काही व्यक्ती जन्मतःच यासाठी पात्र असतात. विपश्यना हा प्रकार यापैकी धारणा आणि ध्यान यांच्या मधली पायरी, असा माझा अनुभव आहे. सर्व प्रकारचे ध्यान-प्रचारक आमची ध्यान पद्धती ही 'डायरेक्ट' करता येते, (अर्थात त्यापूर्वी यमनियम, प्राणायामादि साध्य करण्याची आवश्यकता नाही), असा प्रचार करत असतात. वस्तुतः ते योग्य नाही. सात-दहा दिवसांच्या शिबिरात फक्त अमूक एका ध्यानपद्धतीची ओळख होते, थोडेसे जमूही लागते, परंतु तिचा अपेक्षित परिणाम हा दीर्घकाल नियमितपणे केलेल्या साधनेतूनच साध्य होत असतो. त्यामुळे शिबिर संपल्यावर जर नियमित साधना केली नाही, तर आपल्या माहितीत आणखी एक भर पडली, एवढाच काय तो उपयोग त्या शिबिराचा झाला, असे होते. याचे कारण माझ्यामते आपण ध्यान ही योगाची सातवी पायरी एकदम गाठण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याआधीच्या पायर्‍या चढल्याशिवाय त्यात यश मिळत नाही.
मुळात यम-नियम-आसन-प्राणायाम या प्रारंभिक पायर्‍यांबद्दल यथोचित माहिती मिळणे, हेच कठीण होऊन बसले आहे. विविध विद्वानांनी पतंजलींच्या सूत्रांचा आपापल्या समजुतींप्रमाणे अर्थ लावलेला असल्याने खरे काय, हेच कळेनासे झालेले आहे. त्यातून हल्ली विविध आर्ट वाल्यांच्या दुकानदारीची चलती असल्याने गोंधळ आणखीनच वाढला आहे.
या सर्व पार्श्वभूमिवर मी लिहिले, की या सर्व उपद्व्यापातून हाती काहीच न लागण्यापेक्षा आपल्याला ठाऊक असलेल्या दोन - चार गोष्टी (ज्या लहानपणापासून माहित असूनही वर्षानुवर्षे आपण करण्याचे टाळत असतो, परिणामी त्यातून अचानकपणे गंभीर संकटांना सामोरे जात असतो), त्या जरी नेटाने प्रत्यक्ष करत राहिलो, तरी खूप.

मी विपश्यनेचे शिबिर दहा- बारा वर्षांपूर्वी उत्तम प्रकारे केले, तात्कालिन फायदाही झाला, परंतु त्यानंतर घरी आल्यावर आजतागायत एकदाही विपश्यना केली नाही. याचे कारण एकदम सातवी पायरी चढण्याचा प्रयत्नच मुळात योग्य नाही, असे मला वाटते.

शशिकांत ओक's picture

25 Mar 2014 - 8:12 pm | शशिकांत ओक

चित्रगुप्त,
पातंजलींच्या साधनापथाची ती उतरंड आज अनेक विचारधारांचे प्रातिनिधिकत्व करत आली आहे. थोड्याफार फरकाने तीच विपस्यनेतही आहे. गोएंकांच्या प्रवचनातून ते स्पष्ट होते. पण ते त्यांच्या तोंडून ऐकणे योग्य. सातवीतील अभ्यासक्रम पहिलीतील मुलांना सांगावा करायला, तसे काहीसे असावे.. मग सातव्या पायरीवर एकदम कसे चढावे... असा युक्तीवाद तार्किक म्हणून बरोबर वाटतो. पण ज्यांना पहिल्या पायरीवरच पोहोचायचे नाही, फक्त काय प्रकार आहे असा कानोसा घ्यायला जायचेय असे व जे जात्याच ओढ लागली म्हणून साधनेला लागले अशांचा प्रवाह तयार व्हायला ही शिबिराची साधना प्राधान्य देते. मी स्वतः विपस्यना केली पण 'रात गई बात गई' असे झालेला आहे. पण लोक यावेत, येतात, त्यातूनच पुढील मार्ग सापडायला सुरवात होते. शिवाय पातंजलीयोग साधना शऱीरावर अनित्यचा प्रभाव पहायची प्रत्यक्ष पुरावा दाखवून देणारी पद्धती नसल्याने, 'मला मानसिक पातळीवर जे होतेय त्याचा पडताळा न आल्याने' संदिग्धता येते, ती विपस्यनेत नाही असा यात ठळक फरक वाटतो. मग पायरीची समस्या समस्या न राहता फक्त वाटेवरची वळणे राहतील. पण काहींच्या बाबत (भले ते अगदी कमी संख्येने असतील) ज्यांना विपस्यनेच्या 'सरळ' वाटेवर ती वळणे कदाचित लागणारही नाहीत...

आत्मशून्य's picture

25 Mar 2014 - 12:55 pm | आत्मशून्य

काही गोष्टी फक्त कॉमनसेंस मधे तोलायच्या नसतात.

ओक साहेब.. एखी मारा पर क्या सॉलीड मार्‍या...! __/\__

@चित्रगुप्त

याचे कारण एकदम सातवी पायरी चढण्याचा प्रयत्नच मुळात योग्य नाही, असे मला वाटते.

जर आपण विपष्यना सांगितल्या प्रमाणे तंतोतंत केली असेल तर यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी या सर्वच पायर्‍या विपष्यनेच्या काळात निश्चीतपणे चढल्या असल्याचेच लक्षात येइल. हा परत आल्यावर काही पायर्‍या कोणाकडुन उतरल्या जात असतील तर तो विपष्यनेचा भाग नाही...

तिन तेरा's picture

1 Apr 2014 - 10:43 am | तिन तेरा

तिन तेरा's picture

1 Apr 2014 - 10:45 am | तिन तेरा

चित्रगुप्त बरोबर.

मुक्त विहारि's picture

20 Mar 2014 - 8:39 am | मुक्त विहारि

मिपाच्या खाणीतील अजून एक उत्तम लेखमाला....

शशिकांत ओक's picture

21 Mar 2014 - 8:22 pm | शशिकांत ओक

उत्तेजना बद्दल...

पिवळा डांबिस's picture

22 Mar 2014 - 1:42 am | पिवळा डांबिस

जरूर करत रहा.
वैयक्तिक अनुभव चांगला आहे...

कवितानागेश's picture

26 Mar 2014 - 12:02 am | कवितानागेश

छान लेख. विपश्यना शिबिर हा खरोखरच अविस्मरणीय अनुभव असतो.
थोडे योगाबद्दल;
माझ्या माहितीप्रमाणे "यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी" ही आठ अंग आहेत, पायर्‍या नव्हेत. ही आठही अंग कार्यरत असावी लागतात. एकदा का प्राणायाम चांगला आला की यम नियम सोडून दिलेले चालतात असं योगात करता येत नाही. कारण ही सगळीच अंग महत्त्वाची आहेत.

शशिकांत ओक's picture

1 Apr 2014 - 2:08 am | शशिकांत ओक

केल्याचे नुकतेच कळले. धाग्याची लिंक मिळाली तर वाचायला आवडेल.

कवितानागेश's picture

1 Apr 2014 - 11:37 pm | कवितानागेश
शशिकांत ओक's picture

2 Apr 2014 - 12:13 am | शशिकांत ओक

अनुभूति न घेता विचार व्यक्त करायची घाई काहींना असते. अपेक्षा की आपल्या लेखातील विचारधनावर वाचक कृती करतील.

पैसा's picture

28 Mar 2014 - 9:45 pm | पैसा

माहितीपूर्ण लेखमाला. वाचत आहे.

कंजूस's picture

29 Mar 2014 - 5:30 am | कंजूस

शशिकांत ओक तुम्ही या लेखमालेतून विपश्यना केंद्र आणि आचार विचारांचे डावे उजवे दोन्ही पैलू सभोर आणलेत .गोएन्कांनी एक चांगली व्यवस्था करून ठेवली आहे .त्यांचा जन्म बालपण म्यानमार(ब्रह्मदेश) मधला .त्यामुळे बुध्द धर्माचरण त्यांनी जवळून अवलोकिले आहे .जसे आहे तसे त्यांनी ते इथे आणले आहे .

शशिकांत ओक's picture

30 Mar 2014 - 8:08 am | शशिकांत ओक

पुढील भाग ५ वेगळेपणाने सजला आहे. पहा आवडतोय का!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2014 - 4:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

1 Apr 2014 - 2:01 am | शशिकांत ओक

सादर झाले.
बिरुटे सर, आपल्या प्रतिसादाबद्दल प्रतीक्षेत. पबिसादर झाले. आपल्या प्रतिसादाबद्दल प्रतीक्षेत.