काय 'ध्यान' आहे!

कवितानागेश's picture
कवितानागेश in जनातलं, मनातलं
22 Nov 2010 - 12:29 am

सध्या 'ध्यान' या विषयावर सर्वत्र गोंधळ ( महामायेचा!) घातलेला आहे!
त्यात माझी थोडी भर टाकतेय, आणी नेहमीचे आळशी पणा चे विचार झटकून एक गमतीदार अनुभव लिहायला घेतेय.
मला मजा आली म्हणून 'गमतीदार'! (इतर कुणाला काय वाटते, त्याची मी पर्वाच करत नाही!)
तर मी काय सांगत होते, गेल्याच महिन्यात मी 'विपश्यना' चा दहा दिवसांचा कोर्स केला.
खूप वर्षांपासून जायचे होते, पण एकदम १० दिवस काढणे कठीण जात होते. पण जाऊन आल्यानंतर मात्र मी स्वत: ला खूप शिव्या दिल्या, जेव्हा वाटले होते तेंव्हाच यायला हवे होते, इतकी वर्षे फुकट घालवलीस तू माउ!

तर 'विपश्यना'......,
या ध्यान प्रकारात जी मुख्य गोष्ट करायची ती म्हणजे, अंतर्मुख होणे.
( थोडक्यात घरातला साठवलेला कचरा उपसून बघणे, बघायला लागला कि तो आपोआप स्वच्छ होतो, ...मग 'दिवाळी' येतेच पाठोपाठ!)
"आत बघणे, शरीरातील घडामोडी बघणे,कारण जे पिंडी तेच ब्रम्हांडी, त्याच त्या पाच महाभूतांपासून संपूर्ण विश्व बनले आहे, आपण त्याचाच भाग आहोत, त्यांचे नियम सगळीकडे सारखे. ते 'केवळ' बघायचे! निसर्ग, आयुष्य, स्वत: , इतर,.... सगळेच 'नक्की काय चाललंय' ते समजून घेण्यासाठी हे अंतर्मुख होणे असते...."
हे सगळे वाचून झाले होते माझे पूर्वीच. प्रत्यक्ष अनुभव घेताना इतके कठीण जाईल हे माहित नव्हते!

...तर कोर्स सुरु झाला. नियम सांगितले, 'आर्य मौन' पाळायचे. खाणाखुणा सुध्धा करायच्या नाहीत. काही गरज पडली तर धम्मसेविका असते, तिला काय ते सांगा. सकाळी ४ ते रात्री ९ पर्यंतचे शेड्युल सांगितले. एकंदरीत १२ तास ध्यान करायचे. ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [१])

मला मौन पाळणे काही फार कठीण वाटले नाही. मला बाजूच्या अखंड पचर पचर करणार्‍या २ बायकांची मात्र काळजी वाटत होती. मला फक्त एकच मुख्य काळजी होती कि रात्री ना जेवताच, ९ वाजताच झोप कशी येणार? आणि पुन्हा ४ वाजता जाग कशी येणार? पण पहिल्या दिवशी तरी बिनघोर झोप लागली आणि महदाश्चर्य म्हणजे ४च्या आधीच ५ मिनिटे अपोआप जाग आली.

आता खरी परीक्षा सुरु.... डोळे मिटून, ना झोपता, मांडी घालून, चुळबुळ न करता आणि तेपण 'ध्यान' करत, दिवसातले १२ तास बसायचे कसे? ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [२])
तरीसुद्धा मन घट्ट करून, शरीर सैल सोडून, मधूनच ताठ, मधूनच कुबड काढत 'ध्यानाला' सुरुवात केली. चुळबुळ सुरूच होती पहिला पूर्ण दिवस.

गुरुजी ( सत्यनारायण गोएंका गुरुजी) सांगत होते, श्वासाकडे लक्ष द्या, फक्त श्वास आता येतो, बाहेर जातो, तिकडे लक्ष द्या, फक्त नाकातल्या भागाकडे लक्ष द्या.

माझे कुठले लक्ष लागायला? आधीतर उगीच मोठ्ठा श्वास घेत होते आणि फुकटची थकून जात होते, नंतर आपोआप श्वासांनी माझ्या दंगामस्तीला कंटाळून त्याची 'नॉर्मल' लय सुरु केली. पाठ सारखी दुखत होती, पायाला मुंग्या येत होत्या, घामाच्या धारा गळत होत्या, अखंड चुळबुळ सुरु होती, कसले ध्यान अन कसले काय? ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [३])

मन सतत कुठेतरी भलतीकडे धावत होते, उगीच नाही मनाला माकडाची उपमा देत, असा विचार आला. त्या विचाराबरोब्बर उपमा आठवला आणि उगीच भूक लागली. सकाळी काय खाल्ले, आता जेवायला काय असल वगरे विचारांवर पुन्हा मनातले माकड उडया मारायला लागले. घरी चांगली मजेत बसले होते, कुठून बुद्धी झाली आणि इथे आले हट्टानी! ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! [जप])

हळूहळू पाठ भयंकर दुखायला लागली, सायटिका, स्पोंडीलायटिस वगरै सगळे प्रकार डोके वर काढायला लागले. मधूनच मी डोळे उघडून इथे तिथे बघायचे (चीटिंग! चीटिंग!). माझ्या बाजूच्याच रांगेत एक पोनीटेलवाला दादा आणे एक काका होते. नेमके ते चांगलेच मुरलेले रीपिटर्स होते. एकदम ताठ आणी स्थिर बसायचे. मला खूप लाज वाटायची त्यांच्याकडे बघून! अशा वेळेस मी गपकन डोळे मिटून पुन्हा 'लढाई' सुरु करायचे.

एकीकडे गुरुजी आपले सारखे कळकळीनी सांगत होते, श्वासाकडे लक्ष द्या, मन इकडे तिकडे जाईलच, त्यांनी त्रासून जाऊ नका, माकडाकडे बघता तसे 'फक्त' बघा..... सर्व गोष्टी 'द्रष्टा' भावनेनी बघा, कर्ता/ भोक्ता भावनेनी बघू नका. जे काही होत आहे ते निसर्ग नियामांनुसारच घडत रहाते. तुम्ही फक्त 'बघा'.

मग अचानक लक्षात आले, कधीतरी काही वेळ श्वासाकडे लक्ष देताना, उगीच घाम वगरे येत नाहीये, मुन्ग्यापण येत नाहीत. म्हणजे मन स्थिर झाले कि शरीर आपोआपच स्थिर होतेय, त्यासाठी वेगळे काही प्रयत्नांचे पराकाष्ठा वगरै करायची गरज नाही. उगीच मारामारी करतेय मी स्वतःशीच.
गुरुजी सांगत होते, फक्त नाकाच्या आतल्या त्वचेकडे लक्ष द्या, तिथे श्वासाचे जाणीव "बघा".
अचानक हे सगळे जमायला लागले... हुश्श केले मी. ( अर्थात काही 'सेकंद' जमत होते, पुन्हा माकडचाळे सुरु!)

श्वास कसा जातो कसा येतो हे नीट कळायला लागले, आता जाण्याचा वेग बाहेर येण्याचा वेग, हे सगळे 'जाणवायला' सुरुवात झाली. आपण केवढी तरी हवा आता घेत असतो ते कळायला लागले.मला माहितच नाहते आपण 'इत्तकी' हवा आत घेतो ते. हळूहळू तेवढ्या भागातल्या जाणीवा इतक्या तीव्र झाल्या, कि आपण वास नक्की कुठून घेतो, त्या ग्रंथी देखील जाणवायला लागल्या. शिवाय कुंपणापलिकडच्या गाईम्हशींचा वास स्पष्ट यायला लागला. याची मात्र मला खूप गंमत वाटायला लागली.
ध्यान करता करता ( आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट म्हणतात तशा) अनेक गोष्टी आठवत होत्या,
पहिले ३ दिवस काय काय कुठले कुठले, साफ विसरलेले, लहानपणचं, असे काहिही आठवून अचानक रडायला वगरै यायचे. खूपच त्रास होत होता त्या विचारांचा. घरी परत पळून जावेसे वाटायचे. परत गुरुजींचे शब्द यायचे, 'फक्त' बघा. शांतपणे बघा.
त्यांच्या आश्वासक शब्दावर विश्वास ठेउन जरा धीर धरला, आणि ४थ्या दिवशीच्या 'अ‍ॅक्चुअल विपश्यना' ची वाट बघत राहिले.

(हल्लीची फ्याशन म्हणून) क्रमशः

धर्मजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Nov 2010 - 1:05 am | लॉरी टांगटूंगकर

आमच्या ओळखीतल एक खडूस म्हातार हा प्रकार करून बराच शांत झालय

शुचि's picture

22 Nov 2010 - 4:34 am | शुचि

सॉलीड ग माऊ ..... कसं जमलं तुला हे?

हा भाग चुळबुळ करत वाचला.
आता पुढे काय होणार याची भलतीच उत्सुकता लागून राहिलिये.
१० व्या दिवशी नक्की काय काय जाणवले हेही वाचायचे आहे.
मी साधारण १० वर्षापूर्वी अश्याच प्रकारचा चारपाच दिवसांचा कोर्स केला होता.
राहण्याची सोय नसल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी रोज पहाटे निघावे लागे.
मला मात्र रोज न चुकता जाग यायची (हेच मोठ्ठं आश्चर्य!)
पहिल्या माझ्या दिवशी चेहेर्‍यावर अनेक शंका कुशंका, आठया असं दिसत होतं म्हणे!
ध्यानानंतर अनेक धडे गिरवावे लागले. जसे, सगळे विचार मनाच्या आतपर्यंत सरळ जाऊ न देता आवश्यक तेच विचार्......वगैरे. याने आपली बरीचशी एनर्जी योग्य कामाकडे वळवली जाते इत्यादी. मला जवळजवळ सगळेच विचार निरुपयोगी वाटल्याने बरीच एनर्जी बाकि असायची आणि माकड उड्या मारत घरातली कामे उरकून आता पुढे काय असा प्रश्न उभा राहू लागला. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2010 - 12:52 pm | परिकथेतील राजकुमार

१० व्या दिवशी नक्की काय काय जाणवले हेही वाचायचे आहे.

रेवती काकुंशी सहमत आहे.

१० वा आणि १२ वा हे आमचे विशेष आवडीचे दिवस.

पराचा कावळा

विलासराव's picture

22 Nov 2010 - 8:53 am | विलासराव

मीही खुप वर्षांपासुन विपश्यना करण्याचा विचार करत होतो. ७-८ वर्षांपुर्वी ईगतपुरीला जाउन माहिती घेउनही आलो, पण परत काही गेलो नाही. अचानक ६ महिण्यांपुर्वी ऑनलाईन फॉर्म भरला गोराई येथील केंद्रात जाण्यासाठी आनी नंबरही लागला. एका मित्राला घेउन अगोदरच गोराईला जाउन आलो.
तेथे आता मोठा पॅगोडा बांधला आहे तो जवळ जवळ पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. आनी जेव्हा वेळ आली तेंव्हा परत दांडी मारली. परंतु आता परत एकदा फॉर्म भरतो आनी आता कोर्स पुर्णच करतो. विशेष म्हणजे मला वेळेचा काहीच प्रश्न नाही.
पण तुमच्याकडुन प्रेरणा घेउन आता लवकरच कोर्स पुर्ण करणार.

मितभाषी's picture

22 Nov 2010 - 10:33 am | मितभाषी

विलासराव जरुर कोर्स करा.
मलाही १९९८ मध्ये प्रवासात एका म्हातारीने विपश्यनेची पुस्तके दिली होती आणि हा कोर्स करण्याबाबत आग्रहाने सांगितले होते. विशेष म्हणजे मी त्यावेळेस इगतपुरीलाच नोकरी करत होतो. पण तिकडे कधी फिरकलो देखील नाही. आता ह्या ऑगष्ट मधे मी १० दिवसांचा कोर्स केला. मला तरी फायदा झाला आहे.

@माऊ, छान लिहीला आहे पहिला भाग. पुढील भागाची वाट पहात आहे.

भावश्या.

विलासराव's picture

23 Nov 2010 - 3:35 pm | विलासराव

धन्यवाद.
नक्कीच. जानेवारी किंवा फेब्रुवारीमधे करतो कोर्स.

कवितानागेश's picture

23 Nov 2010 - 5:12 pm | कवितानागेश

नक्की करा. चुकवू नका.
मी तर फार वर्षे विपश्यनेला हुलकावण्या देत काढली!

स्वानन्द's picture

22 Nov 2010 - 10:01 am | स्वानन्द

तुमचा अनुभव आम्हा सर्वांना सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुमचे पुढचे अनुभव वाचण्यास उत्सूक आहे.

स्वाती दिनेश's picture

22 Nov 2010 - 12:10 pm | स्वाती दिनेश

सुरुवातीच्या भागात लिहिलेल्या सगळ्या शंका माझ्याच डोक्यातल्या आहेत असे वाटले.. त्या शंकांमुळेच कधी ह्या वाटेला जाण्याचा विचारही केला नाही पण आता हे वाचून उत्सुकता ताणली गेली आहे, पुढचा विपश्यना प्रवास लवकर लिही ग माउ..
स्वाती

स्पंदना's picture

22 Nov 2010 - 12:47 pm | स्पंदना

इतक व्यवस्थित पण रोचक मांडल आहेस की बस्स!!

माझ्या कडुन तुझी पाठ थोपटुन घे.( अरे देवा कुठे येउन पडले मी!! खल्लास)

माझ्या आई जाउन करुन आल्या.
अर्थात त्यांना विषेश फरक नाही पडला पण त्यांच्या सर्व संवेदना जाग्या झाल्या होत्या. तु उल्लेखलेल्या गुरुंकडेच केला कोर्स त्यांनी पण. त्या गुरुंच्या आवाजाने म्हणे धडकी भरल्या सारख व्हायच असा आवाज आहे त्यांचा.

लवकर लिहा. (ही वाचायची घाई, म्हणजे माकडचाळे आहेत का मनाचे?)

ईतरः हा कोर्स कुठे करता येतो (ठिकाण) ते सांगेल का कुणी?

मितभाषी's picture

23 Nov 2010 - 4:26 pm | मितभाषी

http://www.dhamma.org/
ह्या वेबसाइटवर सर्व माहीती मिळेल.

यशोधरा's picture

23 Nov 2010 - 4:33 pm | यशोधरा

मस्त लिहिलं आहे. क्रमशः कशाला?

ह भ प's picture

7 Jan 2013 - 6:20 pm | ह भ प

आमचे मित्र चालले आहेत या ९-१९ जाने. ला.. मार्गदर्शक लेख त्यांना चांगलाच उपयोगी पडेल..

आनन्दिता's picture

8 Jan 2013 - 1:28 am | आनन्दिता

माउताई तुझ्या उपम्या वरुन मला माझ्या विपश्यना शिबिरातील एक गोष्ट आठवली...

दोन वर्षापूर्वी आम्ही ७-८ दोस्त मंड्ळी विपश्यना शिबिरा ला गेलो होतो.. पहिल्याच दिवशी अगदी रामप्रहरी उपाशीपोटी आम्ही ध्यानाला बसलो होतो... आधीच एकाग्रता साधणे, श्वासाची लय ऐकणे यासाठी तारेवर ची कसरत सुरु होती. तितक्यात माझ्या मनःचक्षुं पुढे विनाकारणच बेकरीतील पाव उभे राहीले.. अन् हाय रे दैवा क्षणार्धात पावाशी सख्य असले ली वडापाव, मिसळपाव, पावभाजी, दाबेली ही मंड्ळी माझ्याभोवती फेर धरुन तुफान नाचु लागली.. एरवी खाण्याच्या बाबतीत बोंब असणार् या मला तेव्हा मात्र सडकून भुक लागली. इतकी की जीव कासविस होउन गेला अन मला रडूच कोसळलं.. बक्क्ळ पैसा भरून 'ध्यानरुपी पावा' वाजवण्याची कला शिकण्याची माझी स्वप्नं त्या दिडदमडी च्या पावानं उधळून लावलीन..
हळूच डोळे उघडून चिटींग करणारया माझ्या दोस्तांनी, माझं ते मिटले डोळे पाझरणारं ' ध्यान',पाहीलं.. विपश्यनेनं सगळे दुविचार,दुखः, वेदना 'वाहुन' जातील हे आम्ही सगळेच वाचुन आलो होतो.. पण पाहिल्या काही तासातच मला त्या पातळीला पोहचलेलं पाहुन त्यांच्या मनात माझ्याविषयी आदर दाटुन आला..
अन् काय सांगू महाराजा त्या दिवशी त्या सगळ्यांनी मला काय मानाने वागवलं.. एवढच नाही तर स्वतःच्या विपश्यने बाबतितही ते सिरीयस झाले. अन त्यामुळे पुढच्या दिवसात आमचं तिथं जाणं सुफळ झालं.

बाकी एरवी त्या सगळ्यांच्या फक्त टपल्याच खाणार्या मला ध्यानदेवता या वेगळ्या अर्थाने 'पावली'!!

अगोचर's picture

8 Jan 2013 - 2:32 am | अगोचर

दहावा दिवस फार लांब. मला सहाव्या सातव्या आठव्या दिवसांबद्दल जास्ती उत्सुकता आहे. तेच दिवस माझ्यासाठी जास्ती महत्वाचे होते. नंतर जास्त सवय झाली असे वाटले.

५० फक्त's picture

8 Jan 2013 - 8:43 am | ५० फक्त

चला एकुणच कुणीतरी अनुभवी लिहितंय हे बरं, फुकटच्या वावड्या उडवण्यापेक्षा..

रुमानी's picture

8 Jan 2013 - 10:29 am | रुमानी

मला हि विपश्यनेचा कोर्स करायचा आहे बरयाच दिवसांपासुन,
तुमच्या अनुभवावरुन बरेच अवघड दिसतय.
पु.भाग लवकर येउदेत.

कवितानागेश's picture

8 Jan 2013 - 1:27 pm | कवितानागेश

नक्की करा.
अवघड वाटेल सुरुवातीला. पण कोर्स पूर्ण झाल्यानंतर जे समाधान मिळेल ते अनमोल असेल. :)

विलासराव's picture

9 Jan 2013 - 1:11 pm | विलासराव

http://courses.dhamma.org/en/schedules/schvipula
नविन सेंटर चालु झाले आहे बेलापुरजवळ.

मंडळी, हे दोन वर्षांपूर्वीचं आहे.
पुढले भाग इथे आहेत -
http://www.misalpav.com/node/15525
http://www.misalpav.com/node/15538
http://www.misalpav.com/node/15558

बांवरे's picture

10 Jan 2013 - 6:16 am | बांवरे

इनिगोय धन्यवाद.
लिमाउजेट. फुडचे पण वाचतो.
चांगले लिहीले आहे.

पैसा's picture

8 Jan 2013 - 1:52 pm | पैसा

आता ही माऊ परत आळशी झालीय काय!

पिलीयन रायडर's picture

8 Jan 2013 - 2:23 pm | पिलीयन रायडर

आता मला खुप गिल्टी वाटतय.. एवढे १०-१२ द्वस तिथे गेले , पण परत पळुन कसं यायच ह्यातच वेळ घातला.. पण विपश्यनेच हे एक बरय.. काही असं शिकवलम नाहीये की तुम्ही ते विसराल.. शांत बसुन श्वासाकडे लक्ष द्यायचं.. म्हणलं तर आज अत्ता सुरु करता येईल..!!

कवितानागेश's picture

8 Jan 2013 - 3:46 pm | कवितानागेश

सगळ्यांनाच पहिल्या दिवशी पळून जावंसं वाटते की. त्यात गिल्टी वगरै वाटून घ्यायचे नाही. :)
पण तशी परवानगी नसतेच. शिवाय घरचे लोक आपल्याला 'हसतील' या भितीनीच खरं तर सगळे गप बसून ध्यानाच्या कामाला लागतात! :D
पण एकदा लिंक लागली की दहाव्या दिवशी तिथून पाय निघत नाही.

jaypal's picture

8 Jan 2013 - 6:25 pm | jaypal

ईगतपुरीला प्रथम १० दिवसांचे शिबीर केले होते. त्या वेळी दोन्ही वेळेस जेवण उपलब्ध होते. जेवणाची अथवा न्याहारीची कोणतीही अबाळ जाणवली नाही. फळं, दुध,चहा, कॉफी सर्व काही मिळत होत आणि हव तेवढ .रात्रीच्या वेळेस शक्यतो उपवास करा. जेऊ नका किंवा.....केवळ कुरमु-याचा चिवडा, फळं / दुध ई. हालका आहार घ्यावा अश्या सुचना असत. आग्रह नसे.
माउ लेख सुंदरच झालाय. म्या$$$$$$$$$$$$$व

बापरे.... मला खरच असे कोर्स करणार्‍यांच्या पायाच पडायला पाहिजे... मला तर काहि हे ह्या जन्मात जमणार नाही. आहो साधे योगा करताना ते पहिले ३ ओम्कार म्हणायचे असतात, त्यात पण माझी चुळबुळ चालु असते. आणि शवासन करताना, त्या श्वासांकडे लक्ष देताना, कधी झोपुन जायचे तेच कळायच नाही. सगळे लोक शवासुन करुन उठुन बसायचे तरी मला समजायचे नाही. आमचे सर येउन मला उठवायचे." उठा... शवासन झाले" ;) :D :D

दादा कोंडके's picture

8 Jan 2013 - 7:45 pm | दादा कोंडके

मला तर शांततेचीच भिती वाटते. कसल्या कसल्या मागच्या आठवणी येउन फिस्सकन हसू येतं. घशात खाजवू लागतं आणि पोट भरून "खाँय" करून खोकून घ्यावसं वाटतं, इतर वेळी दगड खाउन दगड पचवणारं पोट नेमकं त्यावेळी दगा देउन 'टिउ-रीउ-रीउ-रीउ-रीउ-रीउ' असा आवाज करतं. :(

अगदि खरे.. त्यामुळे इथे घर बघताना पण अगदि मेन रोडला लागुनच बघितले... लोकांना शांततेत झोप येते.. मला शांतता असली कि झोप येत नाही.

:D
दादा, अहो, हे सगळं सगळ्यांनाच होतं. तिथे गेलं की हे सगळं होणं आणि त्यापुढची पायरी म्हणजे आपण त्याच्याकडे नुसतं निरखून पाहत राहणं हेच तर करायचं असतं. या सगळ्याला आपण दाद देत नाहीसे झालो, की शरीर-मनाच्या या खोड्या आपोआप कमी होत जातात.

दादा कोंडके's picture

10 Jan 2013 - 7:54 pm | दादा कोंडके

हे करून वेडा न होता घरी परत येण्याचा आत्मविश्वास आला की करेन.
पण मुळात मला अध्यात्म या विषयातलं शष्प कळत नसल्यामुळे आणि अंमळ यावर रागच असल्यामुळे कसं जमणार हा प्रश्न आहेच. मी काय म्हणतो, मानसिक स्वास्थासाठी विपश्यना काय किंवा शारिरीक स्वास्थासाठी आयुर्वेद काय. ज्यासाठीते आहेत ते खणखणीतपणे सिद्ध करा ना. त्यासाठी उगाच अध्यात्माचा आसरा का? :)

कवितानागेश's picture

11 Jan 2013 - 12:53 am | कवितानागेश

अध्यात्म म्हणून वेगळे काही डीफाईन करता येते का हे मला माहित नाही. कधी कळलं तर नक्की लिहेन. ;)
पण थोडक्यात सांगायचे तर विपश्यनेनी मनाचे 'फाईन ट्युनिंग' होते.

फारच छान लिहिले आहे! १२ तास काय, ५ मिनिटे ध्यान केलं तरी माझी अशीच गत होते.. पण एक वेळ ध्यान जमेल पण असं लिहायला काही मला जमणार नाही.

मनाला माकडाचीसुद्धा उपमा देतात हे मी पहिल्यांदाच वाचलं.. आम्हाला आपलं पाखरुच माहित!

आता पुढचे भाग वाचायला पळते. दुवे सापडले आहेत आणि इनिगोयने पण दिले आहेत. तरी सगळेचजण सगळे प्रतिसाद वाचत असतील की नाही माहित नाही. संमं हे दुवे लेखात (आणि सर्व भागांत) देऊ शकेल काय?

कविता१९७८'s picture

19 May 2015 - 10:42 am | कविता१९७८

छान लिहीलयस

आर्या१२३'s picture

1 Dec 2016 - 5:49 pm | आर्या१२३

अनेक दिवसापासून इच्छा आहे विपश्यनेला एका हजेरी लावायची. पुन्हा पुन्हा वाचतेय.
विपश्यनेत नक्की काय असत याची फार उत्सुकता होती।
.