सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

काय 'ध्यान' आहे! -३

Primary tabs

कवितानागेश's picture
कवितानागेश in जनातलं, मनातलं
23 Nov 2010 - 12:56 am

ठाण ठाण ठाण ठाण ..... टोले पडले. ४ वाजले.
आजपासून 'द्रष्टा' भावनेची खरी परिक्षा सुरु!
आता मन सतत वरपासून खाल पर्यंत, पुन्हा खालपासून वरपर्यंत फिरवायची 'राईड' सुरु करायची होती. पण आधी सारखे 'कठीण' वगरै वाटत नव्हते. मन इकडेतिकडे धावायला लागले तरी त्याला पुन्हा श्वासावर चढवून बसवायचे, नाकावर आणायचे, आणि मग पुन्हा वर-खाली-वर-खाली...सुरु करायचे. (..... मन पाखडून काढले अगदी!)
गुरुजी आता गौतम बुद्धाबद्दल सांगत होते, की त्यानी असेच अंतर्मुख होऊन, विपश्यना करून, सर्व संस्कार -विकार शोधून काढले, आणी याच पद्धतीनी नष्ट केले.
अत्यंत खोल-सूक्ष्म जाणीव निर्माण झाल्यानंतर त्यांना दिसले, की सतत- आपली डोळ्याची पापणी लावते तितक्या काळात, शत कोटी सहस्त्र वेळात 'कण' निर्माण होऊन नष्ट होतात.
हाच निसर्गाचा मूळ नियम. ( मी थक्क झाले, आणी गौतम बुद्धाला शत कोटी सहस्त्र वेळा साष्टांग नमस्कार घातला!)
आपल्या शरीरात देखील असाच सतत बदल होत असतो. आपण जितके सजग राहू, तितका बदल 'योग्य' प्रकारे घडेल. 'विकार' निर्माण होणार नाही. त्यासाठीच अंतर्मुख व्हायचे. कारण जे काही आहे ते आपल्या शरीरातच आहे. आणि आपण आपल्या ६ इंद्रियांनी सगळे संस्कार निर्माण करत असतो, सतत सावध, सजग राहिले, कि 'संस्कार' निर्माण होणार नाहीत. निसर्ग त्याचे त्याचे 'उत्पत्ती-स्थिती-लय' हे चक्र अविरतपणे चालू ठेवेल. आपण आपली इंद्रिये 'मलीन' करून त्या गोष्टींचा 'ट्रेस' शिल्लक ठेवायचा नाही.
इथे सहावे इंद्रिय म्हणजे 'मन'!
मन वेगळे दिसत नाही ( म्हणजे अजून तरी आपल्या यंत्रांना दिसत नाही), पण ते शरीराबरोबरच असते, आणी त्यातल्या घडामोडी मात्र, आपला नैसर्गिक- अफाट कार्यशक्ती आलेला संगणक- मेंदू, त्याच्या असंख्य 'प्रोब्स'- नर्व वापरून, साठवत राहतो. शेवटी पाचही इंद्रियांच्या सगळ्या जाणीवा मनाकडेच जातात, आणी पाचही इंद्रिय शांत केली तरी, मन,'चालू' राहते, म्हणून 'मन' हे इंद्रिय. एकदा पूर्ण अंतर्मुख झाले, की ही गोष्ट अगदी सहज जाणवते.
तर असा अभ्यास सुरु होता. तरीही 'मन' सतत जुन्या आठवणीत किंवा कल्पनाविश्वात पुन्हा पुन्हा धावत सुटायचे. त्याला पुन्हा श्वासावर बसवून 'घरी' पकडून आणायचे हा खेळ सुरु होता.
एकीकडे 'अधिष्ठान' सुरु होते. सुरुवातीला जमणार नाही असेच वाटत होते. पण आश्चर्य म्हणजे अगदी सहज जमले. असे संपूर्णपणे वर्तमानात आणि संपूर्णपणे आपल्याच आतमध्ये बघताना, (आत म्हणजे शरीर आणि मन दोन्हीत , कारण दोन्ही एकमेकांबरोबरच असतात) नुसते मजेत खेळत असल्यासारखा आनंद मिळतो. आणि महत्त्वाचे म्हणजे या खेळात कुठलीही स्पर्धा नसते!
अशा सगळ्या खेळात , विचारात असताना, एकीकडे दर तासाला बाहेर पडून पाणी ढोसणे सुरूच होते. अगदी खेळून दमून आल्यासारखे पाणी पीत होते. नंतर एका जाणकार ताईनी सांगितले, की कुठलेही 'ध्यान' करताना, शरीरात खूप वेगानी बदल होतात, तेंव्हा तहान लागो, ना लागो, पाणी भरपूर पीत राहायचे. नाही प्यायले तर त्रास होतो.
सहज बाहेर फिरताना एकदम लक्षात आले, 'अरेच्चा, इथे पिंपळाचे झाड आहे, कित्ती सुंदर आहे! इथे निदान १७-१८ प्रकारची फुलपाखरे आहेत, तितक्याच प्रकारची रानफुले पण आहेत. मी काय बघत होते ५ दिवस?' खरोखरच आपली फक्त नजर फिरते, आपण 'पहिले' काहीच नसते.
मग मी अजून जरा बाहेर रेंगाळले, ४ मिलीमीटर लांबीच्या निळ्या निळ्या कळ्या दिसल्या, २ मिलीमीटर व्यासाची लालचुटुक रानफुले दिसली. पांढरीशुभ्र फुलपाखरे पहिली. प्रत्येक पावलाला 'अरेच्चा' सुरु झाले. खरोखरच सगळ्या जाणीवा तीव्र झाल्याच्या जाणवत होत्या. प्रत्येक पावलाला, आजूबाजूच्या रानातल्या पानांचे वेगळे वेगळे वास जाणवत होते.
अचानक नवीन पृथ्वीवर आल्यासारखे वाटत होते. पूर्वी मधमाशी, गांधीलमाशी, भुंगे वगरै भोवती असले की मी जाम घाबरायचे.आता अचानक माशीची गुणगुण ऐकू आली, आणि मी त्यातले 'स्वर' शोधायला लागले. 'मरे मरे,.. म्हणतेय का बरे?' असा विचार आला, आणी एकदम आठवले, 'च्यायला, मी कित्ती घाबरायचे हिला आत्तापर्यंत!' हा बदल मात्र कसा काय झाला नक्की माहित नाही. पण गुरुजी सांगत होते ते आठवले, की 'ध्यानानी 'करूणा' जागी होईल, द्वेष संपेल.' भीती हेसुद्धा द्वेषाचेच प्रकटीकरण(एक्स्प्रेशनला मराठी शब्द ?). कदाचित सगळ्याच भित्या आणी राग कमी व्हायला लागतील. आणी एकदम जाणवायला लागले, अर्धे दिवस संपले इथले, अर्धेच आहेत, आता तरी सिन्सिअर्ली काम करूयात, नुसतीच टंगळ मंगळ नको. आहे अनायसे वेळ काढलेला तर कारणी लावूयात. काहीतरी सुधारणा नक्कीच होईल माझ्यात.
थोडी गंभीर झाले. आणी अजून नीट 'ध्यान' सुरु केले. रोज संध्याकाळच्या प्रवचनात गुरुजी आठवण करून द्यायचे, किती दिवस झाले, किती राहिले. आता तरी जागे व्हा.
आता तर 'प्रतिक्षण सजग' हाच मंत्र सतत होता. शिवाय आम्हाला पूर्ण हिंसेचे पालन करायला सांगितले होते, चुकूनसुद्धा एखाद्या किड्यावर पाय पडता कामा नये यासाठी सगळेच चालताना सावध असायचे. अगदी डास देखील मारायचा नाही ( ओडोमास फासा!), फुले तोडायची नाहीत. पडलेलीसुद्धा उचलायची नाहीत, तुमचा त्यावर अधिकार नाही, ..असे सगळे नियम होते. त्यामुळे सावधानता वाढतच होती. पुढच्या दिवशी असाच पुन्हा 'अरेच्चा' चा एपिसोड सुरु झाला. सगळे अजूनच नवीन वाटायला लागले. आत आणी बाहेरदेखील. चादर नवीन, blanket नवीन, तोच जुना पंचा नवीन... सगळेच नवीन, वेगळे! इतकी गम्मत मला पूर्वी कधीही कशाचीही वाटली नव्हती.

क्रमशः

धर्मअनुभव

प्रतिक्रिया

वेगळाच अनुभव.
फक्त तो अनुभव घ्यायला आपण तयार आहोत का हे ज्याचे त्यानी ठरवायचे.

कवितानागेश's picture

23 Nov 2010 - 1:20 am | कवितानागेश

माझी देखिल तयारी नव्हती कितीतरी वर्षे, म्हणून तर 'इतर' सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या.
आता परत जायचा विचार करतेय.... ( क्लास इम्प्रूव्ह्मेंटसाठी!)

यकु's picture

23 Nov 2010 - 2:21 am | यकु
स्पंदना's picture

23 Nov 2010 - 8:13 am | स्पंदना

ओह रे ? मी कोहरे ताल म्हणते.

रेवती's picture

23 Nov 2010 - 3:24 am | रेवती

वाचतिये.
छान वाटतय.

स्पंदना's picture

23 Nov 2010 - 8:12 am | स्पंदना

माउ. इतकी क्लिष्ट गोष्ट अशी हसत खेळत भरवते आहेस की पोट भरलेल कळणार सुद्धा नाही.
मी पण जाव म्हणतेय. बघु हं! काढते वे़ळ.

निवांत पोपट's picture

23 Nov 2010 - 8:27 am | निवांत पोपट

शिवाय आम्हाला पूर्ण हिंसेचे पालन करायला सांगितले होते,

हिंसा शब्द बदलून अहिंसा अशी दुरूस्ती करा.

कवितानागेश's picture

23 Nov 2010 - 9:16 am | कवितानागेश

हा हा हा ( दात विचकून विकट हसणारी स्मायली)
हाच 'तो' पाशवीपणा बरे का!
रात्री १२ वाजता लिहित असल्याने तो स्पष्ट दिसून आला!

स्वानन्द's picture

23 Nov 2010 - 10:10 am | स्वानन्द

>>आणी एकदम आठवले, 'च्यायला, मी कित्ती घाबरायचे हिला आत्तापर्यंत!' हा बदल मात्र कसा काय झाला नक्की माहित नाही. पण गुरुजी सांगत होते ते आठवले, की 'ध्यानानी 'करूणा' जागी होईल, द्वेष संपेल.'

यावरून माझा स्वतःचा अनुभव सांगावासा वाटतो.
कामानिमित्त मी मुंबैला होतो. तेव्हा आमच्या गेस्ट हाऊस्च्या आसपास खूप कुत्री होती. म्हणजे साधारण १० नंतर मुख्य रस्ता सोडुन डाव्या गल्लीत जिथे आमची गेस्ट हाऊस ची बिल्डीग होती, तिथे जायला वळलो तर रस्त्यात अगदी १५ -२० कुत्री संपूर्ण रस्ताभर पसरलेली असायची. एक दिवस कामावरून परतत असताना जवळ्पास १० -१२ कुत्री मागे लागली होती. जीव वाचवून कसाबसा सुटलो होतो. पण तेव्हापासून कुत्र्यांची फार भिती मनात बसली होती. कुत्रे दिसले की लांबूनच पळायचो.

त्यानंतर १-२ महिन्यानी मी प्राणायाम, बिंदू त्राटक आणि ध्यानाचा सराव करू लागलोहोतो.साधारण २-३ आठवडे न चुकता सराव होत होता. कामाचा ताण नसल्याने वेळ्ही चुकत नव्हती. याच दर्म्यान अगदी प्रकर्षाने जाणवलेल्या बदलांमधला एक बदल म्हणजे ही कुत्र्यांबद्दलची भिती अचानक पणे गायब झाली होती. ती देखील त्यासाठी मी विषेश काहीही प्रयत्न न करता! म्हणजे एवढी की मी अनोळक्या ठिकाणी गेलो आणी तिथे एखादे कुत्रे भटकताना दिसत असेल तर अगदी त्याच्या जवळ जाऊन बसताना देखील भितीचा लवशेश नसे. उलट त्याच्याशी कनेक्ट ( मराठी प्रतीशब्द? ) होता येत असे. मला माहीत आहे, की बर्‍याच जणाना वाटेल की हे तर मी 'तसंही' करू शकतो. पण आधीची भिती आणि मग अचानक झालेला हा बदल, तोही विनासायास हे माझ्या बाबतीत तरी 'तसंही' शक्य झालं नसतं एवढं मात्र नक्की.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Nov 2010 - 3:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरं सांगू स्वानंद भाऊ, मला एकदाच माझ्या वडलांनी सांगितलं, सांगितलं काय, ऑलमोस्ट दरडावलं, "खबरदार घाबरलीस कुत्र्यांना तर!" आणि कुत्र्यांची भीती गेली, मी वडलांना घाबरून घालवली. अर्थात त्यांनी अशा गोष्टी थोड्या प्रेमळपणे सांगितल्या असत्या तर आयुष्यातली पहिली तेरा वर्ष वडलांचीही भीती वाटली नसती ही गोष्ट वेगळी.

आजूबाजूचा निसर्ग पहायला मला माझ्या पीएचडी सुपरवायझरने शिकवलं. याला कुठला नवीन पक्षी-प्राणी दिसला की मी काम करत असतानादेखील तिथून उठवून ते प्राणी-पक्षी दाखवायचा. फिरायला गेलो की नवी जागा, तिथली माती, झाडं यांच्याबद्दल गप्पा मारायचा.

किडे उगाचच मारू नयेत वगैरे घरातूनच शिकवलं होतं, पण सायबाच्या देशातल्या डासांमुळे काही वर्ष डास मारायचीही गरज नव्हती. ओडोमॉस सगळ्यांनीच लावलं तर शहरी डासांना त्यांची अंडी उबवण्यासाठी रक्त कुठून मिळणार? आणि तसं झालं नाही तर आपण डासार्भकांची हत्या करू. हे चालतं का?

या अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकायला दहा दिवस विजनवासात का रहायचं हे अजून मला तरी समजलेलं नाही. तुझी लिहीण्याची स्टाईलमात्र आवडली हां!

वाटलं तर अवांतर: तुम्ही (विपश्यना करणारे) कोणी 'पाडस' ही कादंबरी वाचली आहेत का? त्यात जोडीचा बाप साप चावल्यावर समोर आलेली हरिणी मारतो, विष उतरवण्यासाठी. तिथे त्याची करूणा जागी झाली असती तर? 'करूणा' असण्याला विरोध नाही, पण प्रत्येक वेळेस करूणामय दृष्टीकोनच असावा का; करूणेचा अतिरेकही त्रासदायक होतो का?

कवितानागेश's picture

23 Nov 2010 - 4:21 pm | कवितानागेश

तो विजनवास नसतो. ते 'स्वतःसोबत' रहाणे असते. संपूर्णपणे स्वतःबरोबर राहील्याशिवाय आपण स्वतःला कसे काय ओळखणार?
साधनेचा उद्द्येश फक्त किडे-पक्षी बघणे हा नाहीये. तो तर फक्त 'साईड इफेक्ट' आहे.
मन संवेदनशील होणे हा उद्द्येश आहे.
अवांतर: पाडस वाचली अहे.
अतिरेक कशाचाही वाइटच. ( कध्धी करु नकोस बरे का!)

सुप्रिया's picture

23 Nov 2010 - 11:20 am | सुप्रिया

सुंदर रसाळ वर्णन् ! पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे.

-सुप्रिया

यशोधरा's picture

23 Nov 2010 - 4:43 pm | यशोधरा

सुरेख.

रुपी's picture

19 May 2015 - 5:13 am | रुपी

फारच छान!

खरोखरच आपली फक्त नजर फिरते, आपण 'पहिले' काहीच नसते.>> हेही खूप आवडलं! एकंदरीतच या साधनेबरोबर आलेला हा नवीन दृष्टीकोन आवडला..

कविता१९७८'s picture

19 May 2015 - 10:45 am | कविता१९७८

मस्तच , साधनेचा अनुभवच वेगळा ग