काय 'ध्यान' आहे! -समाप्त

कवितानागेश's picture
कवितानागेश in जनातलं, मनातलं
23 Nov 2010 - 4:22 pm

एकंदरीत अधिष्ठान आणी ध्यान बरे जमायला लागले होते. पण 'खरे ध्यान' काही सेकंदच. परत मनातून वेगवेगळे विचार उसळी मारायचे. अजूनही कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी उसळणे सुरूच होते. पण आता फरक म्हणजे, मी सिनेमा पहिल्यासारखी त्या बघत होते. आणी गम्मत म्हणजे ज्या आठवणींचा पूर्वी खूप त्रास व्हायचा, त्या 'सिनेमात' आता मात्र मीच 'व्हिलन' ठरत होते! मनात म्हटले, 'बरोबरच आहे, शेवटी व्हिलनच मार खातो! त्याला त्रास होणारच.' आता मात्र धडा घ्यायचा, 'जागे' राहायचे.
आता ध्यान फक्त हॉलमध्ये गादल्यावर बसून नव्हते, 'प्रतिक्षण विपश्यना' सुरु करा म्हणून सांगितले होते. मधून मधून 'अरेच्चा!' सुरूच होते. अचानक नवर्‍याची आठवण होऊन खूप गलबलून आले. बिच्चारा! येताना त्याला खूप चिडवून चिडवून आनंद घेतला होता, 'मी १० दिवस तुझा पसारा आवरण्यापासून सुटका करून घेतेय! तुझे तू बघ काय ते.' त्याचा गरीब झालेला चेहरा आठवून खूप वाईट वाटले. मनाशी ठरवले, की घर कितीही भयानक अवस्थेत आले तरी रागवायचे नाही. ३ दिवस लागले तरी चालतील. गपचूप आवरायचे. पसारा करून ठेवणे हा त्याचा धर्म, नीटनेटकेपणाची हौस हा माझा. त्यात भांडायचे काय? १० दिवसात निदान इतका तरी बदल करावा मी स्वत:मध्ये. 'परधर्म सहिष्णुता' बाळगायला घरापासून तरी सुरुवात होऊदे.
आता शेवटचा भाग, 'मंगल मैत्री'. गुरुजींनी समजावून सांगायला सुरुवात केली, 'मंगल मैत्री, म्हणजे कल्याणकारी भावना. या १० दिवसात तुम्ही जो काही आनंद मिळवलात, जे 'पुण्य' मिळवलात, ते आपण सर्वांनी वाटून घेऊयात. तुमची ओळख असो, नसो, सर्वाना तुमच्या या मंगल कामनेत सामील करून घ्या, सगळ्यांशी मैत्री करा'. इथपर्यंत सगळे ठीक होते, सोपे होते. अनोळखी असली, तरी आपल्याबरोबरची आपल्या सारखीच माणसे, मनानी लगेच मान्य केले. सर्वांना मनापासून, मनातल्या मनातच शुभेच्छा दिल्या गेल्या. गुरुजी पुढे म्हणाले, ' तुमच्या मित्र मैत्रीणीना अथवा, इतर जवळच्या लोकांना, ओळखीच्या लोकांना देखील, मनातून तुमच्या 'पुण्यात' सहभागी करून घ्या.' डन! पुढे म्हणाले, ' तुमच्या शत्रूंना सुद्धा तुमच्या आनंदात, तुमच्या 'पुण्यात' सहभागी करून घ्या. तुमच्या शुभ इच्छा त्यांच्यापर्यंत पोचूद्यात.'
आता आली का पंचाईत! कितीही प्रयत्न केला तरी हे काही मला जमत नव्हते. मला मुद्दाम त्रास देणाऱ्या लोकांना मी कशाला शुभेच्छा देऊ? एरवी तोंडदेखले 'हॅप्पी बर्थडे!' म्हणणे वेगळे. एकवेळ वस्तू देईन, पैसे फेकेन, पण 'पुण्य'??!! छे!
अचानक आश्चर्य वाटले, १० दिवस गौतम बुद्धांच्या शब्दांवर जगतेय, तरीही मनातला द्वेष हटत नाहीये.
परत जरा शहाण्यासारखं विचार केला, १० दिवस स्वत:ला वॉशिंग मशीनमधून खळबळून काढायचे आणी पुन्हा चिखलात लोळायचे का आता? इतरांच्या मनात राग असला तर असला, मी कशाला लागण करून घ्यायची? त्यांचे त्यांच्याजवळ. मला तरी निर्लेप राहता यायला हवे.
एकदम आपल्या लाडक्या (?) गोविंदाचे बनियनच्या जाहिरातीतले शब्द आठवले, 'उसने धक्का दिया तो दिया, तुने क्यो लिया?' आता गोविंदाकडूनदेखील आयुष्याचे तत्वद्यान शिकावे हे जरा कठीणच आहे. असो. .....ट्यूब तर पेटली.
आता शत्रूंना देखील 'हॅप्पी बर्थडे!' केले.
गुरुजींचे संध्याकाळचे प्रवचन खूप छान होते, त्यानी 'धर्माला' खिरीची उपमा दिली. आई सांगतेय मुलाला, खीर खारे बाळा. मुलगा म्हणतोय, 'ही खीर माझ्या पात्रात नाही.' म्हणजे मला समजणाऱ्या, आवडणार्‍या शब्दात, व्याख्येत बांधलेली नाही. मग आई त्या पात्रात घालून देते. तो पुन्हा म्हणतो, 'मी खाणार नाही, त्यात काळे खडे आहेत.' म्हणजे इतर काही ना समजणाऱ्या गोष्टी आहेत, जसे शील म्हणजे नक्की काय? समाधी नक्की कशासाठी? प्रज्ञा कशी जागी होते ? मग आई समजावते, त्याचा स्वत:चा एक स्वाद आहे. तुला नको असेल तर तेवढे 'काळे खडे' बाजूला ठेव, पण खीर खा. ज्या दिवशी त्याचा स्वाद तुला कळेल त्या दिवशी ते पण खा. धर्मरूपी खिरीला अंतरु नकोस. 'सजग राहून, वर्तमानात राहून, अंतर्मुख होऊन, सत्य बघणे' हा धर्म मात्र पाळत राहा.
असे सांगून गुरुजी म्हणाले, 'आता गुरुदक्षिणेची वेळ आली, माझी गुरुदक्षिणा ही, की जेंव्हा जेंव्हा 'मंगल' मैत्री' साधना घरी जाऊन कराल, तेंव्हा माझीदेखील आठवण ठेवा. मलाही सामील करून घ्या'.
एकदम लक्षात आले, उद्या संपतंय की शिबीर. म्हणजे उद्यापासून गुरुजीपण समोर दिसणार नाहीत. माहेर सोडून निघाल्यासारखे, माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागले. एरवी माझ्या डोळ्यातून टिपूसही येत नाही. इथे येऊन काय चालले होते कुणास ठाऊक. आजुबाजूला पहिले, तर सगळेच स्त्री-पुरुष डोळे पुसत होते. इथे खरच मी इतकी मजेत राहिले, की बाहेर गेल्यावर कुणी विचारले, काय केले १० दिवस?, तर मी सांगेन 'धम्माल!'
तिकडच्या व्यवस्थापकांना बहुतेक कल्पना आहे, की गुरुजी खिरीचे वर्णन खूपच इफेक्टिव करतात, इच्छा निर्माण होते लगेच खीर खायची. शेवटच्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदाच, सक्काळी साडेसहाला खीर आणी बटाटेवडा असा नाश्ता करून निघाले.
निघण्या आधी पुस्तके काही पुस्तके विकत घेतली. (अजून वाचलीच नाहीत ती गोष्ट वेगळी!) काही लोक पैसे दान देखील देत होते. मी करायला जात होते, पण अचानक लक्षात आले, की मी 'दान' देत नाहीये, मी हिशोब करतेय, राहण्याचा, जेवण्याचा. मग थांबले, म्हटले, माझ्या कायम लक्षात राहायला हवे, की असे 'माहेरपण' मला मिळाले ते कुठल्यातरी अनोळखी लोकांच्या दानावर. त्यात स्वत: कमावलेले वगरै काही नाही. नाहीतरी आपण खरोखरच काय कमावलेले असते, हवा तर नक्की फुकटच असते. बाकीच्या गोष्टी 'मायनर' आहेत.
मात्र या सगळ्यातून मला कुठल्याही व्याख्येत ना बसवलेला एक 'सत्य धर्म' सापडला. इथे मला राहून राहून एका तिबेटन लामाचे उद्गार आठवत होते, 'जितके लामा, तितके धर्म'. प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाचा 'धर्म' वेगळा. जे जे करून माणसाला अधिक 'माणुसकी' सापडेल, करूणा निर्माण होईल, तो तो त्याचा धर्म. कुणाला जपजाप्य करून, कुणाला प्रार्थना करून, कुणाला समाजसेवा करून, कुणाला जगभर हिंडून, कुणाला ज्ञान मिळवून,.. जी गोष्ट करून मन शांततेनी, समाधानानी, आनंदानी भरून जाईल, तो तो त्याचा 'खरा धर्म'. आणी ज्या आनंदात 'कुणालाही' बिनबोभाट सामील करून घेता येईल, तो 'खरा आनंद'.
'भवतु सब्ब मंगल'.

'रिझल्ट ओरिएन्टेड ' माउ

धर्मअनुभव

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

23 Nov 2010 - 4:27 pm | कवितानागेश

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आणी वाच़कांचे मनापासून आभार.

खुप छान पद्धतीने तुम्ही तुमच्या मंगल मैत्री साधनेत आम्हाला सहभागी केल्याबद्दल धन्यवाद ..

प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाचा 'धर्म' वेगळा. जे जे करून माणसाला अधिक 'माणुसकी' सापडेल, करूणा निर्माण होईल, तो तो त्याचा धर्म. कुणाला जपजाप्य करून, कुणाला प्रार्थना करून, कुणाला समाजसेवा करून, कुणाला जगभर हिंडून, कुणाला ज्ञान मिळवून,.. जी गोष्ट करून मन शांततेनी, समाधानानी, आनंदानी भरून जाईल, तो तो त्याचा 'खरा धर्म'. आणी ज्या आनंदात 'कुणालाही' बिनबोभाट सामील करून घेता येईल, तो 'खरा आनंद'.

खरेच ख्युप उच्च विचार आहेत हे .. आवडले एक्दम

स्पा's picture

23 Nov 2010 - 4:30 pm | स्पा

झकासच .......................

हा भाग खूप सुरेख जमलाय. मस्त आणि धन्यवाद :)

अनामिक's picture

23 Nov 2010 - 6:48 pm | अनामिक

असेच म्हणतो.

विलासराव's picture

23 Nov 2010 - 4:41 pm | विलासराव

अनुभवकथन.

स्वानन्द's picture

23 Nov 2010 - 4:42 pm | स्वानन्द

धन्यवाद.

आता ध्यान फक्त हॉलमध्ये गादल्यावर बसून नव्हते, 'प्रतिक्षण विपश्यना' सुरु करा म्हणून सांगितले होते. मधून मधून 'अरेच्चा!' सुरूच होते. अचानक नवर्‍याची आठवण होऊन खूप गलबलून आले. बिच्चारा! येताना त्याला खूप चिडवून चिडवून आनंद घेतला होता, 'मी १० दिवस तुझा पसारा आवरण्यापासून सुटका करून घेतेय! तुझे तू बघ काय ते.' त्याचा गरीब झालेला चेहरा आठवून खूप वाईट वाटले. मनाशी ठरवले, की घर कितीही भयानक अवस्थेत आले तरी रागवायचे नाही. ३ दिवस लागले तरी चालतील. गपचूप आवरायचे. पसारा करून ठेवणे हा त्याचा धर्म, नीटनेटकेपणाची हौस हा माझा. त्यात भांडायचे काय? १० दिवसात निदान इतका तरी बदल करावा मी स्वत:मध्ये. 'परधर्म सहिष्णुता' बाळगायला घरापासून तरी सुरुवात होऊदे.

बापरे, एवढा फरक??????????????
बायकोला पाठवावे का तिकडे? ;-)
पण, पसार्‍याच्या बाबतीत आमच्याकडे उलटे आहे...म्हणजे मग मीच जावे का तिकडे? :-)

लेख सगळेच खूप छान लिहिलेत!

कवितानागेश's picture

23 Nov 2010 - 5:15 pm | कवितानागेश

दोघे जा की.
एकानीच जायची काट्कसर कशाला?

सुप्रिया's picture

23 Nov 2010 - 5:20 pm | सुप्रिया

धन्यवाद!
परत जाल तेव्हाचे अनुभव पण लिहा.
-सुप्रिया

प्राजक्ता पवार's picture

23 Nov 2010 - 5:25 pm | प्राजक्ता पवार

लेख आवडला :)

छोटा डॉन's picture

23 Nov 2010 - 5:44 pm | छोटा डॉन

आत्ताच सर्व भाग वाचुन काढले.
मला खरोखर विश्वास बसत नाही की एवढा फरक असु शकतो आणि 'ध्यान' केल्याने तो जाणवु शकतो.

एवढा सुंदर अनुभव शेअर केल्याबद्दल खरोखर धन्यवाद.
लिखाण सुम्दर आहेच, पण ज्या विषयाला तुम्ही स्पर्श केला आहे ते अप्रतिम आहे.
आभारी आहे ...

- छोटा डॉन

कवितानागेश's picture

23 Nov 2010 - 6:14 pm | कवितानागेश

इतक्या 'गंभीर' प्रतिक्रियेबद्दल आश्चर्ययुक्त आभार!
(नुसते अनुभव वाचून इतका फरक पडतो मानसात?!)

अवान्तरः 'हिंदू' वाचून झाल्यावर परीक्षण लिहा बरं का.

छोटा डॉन's picture

23 Nov 2010 - 6:25 pm | छोटा डॉन

>>इतक्या 'गंभीर' प्रतिक्रियेबद्दल आश्चर्ययुक्त आभार!

:)
सर्व श्रेय तुमच्या लिखाणाचे.
नाही तर आम्ही म्हणजे .... असो !

जोक्स अपार्ट, लेख मात्र खरोखर आवडला आणि ह्या 'ध्याना'बद्दल आकर्षण वाढले ( किंवा सुरु झाले ) हे खरे.

- छोटा डॉन

खूप सुंदर झाली आहे लेखमाला.

स्वाती२'s picture

23 Nov 2010 - 6:01 pm | स्वाती२

लेखमाला खूप आवडली. धन्यवाद!

तुमचा विपश्यनेचा अनुभव सुंदर मांडलात.
ते लोकही चांगलं वागतात, चांगली शिकवण देतात.

फक्त मुंबईला जाता-येता इगतपुरी स्टेशनवर दिसणारा
"धम्मगिरी के लिये यहां उतरिये" हा बोर्ड मात्र मला डोळ्यात सलतो.

नाशिकला हिंदूंचा ब्रह्मगिरी तर विपश्यना वाल्यांचा इगतपुरीला धम्मगिरी!
म्हणजे विपश्यनावाल्यांकडंही कशा ना कशाशी तरी स्पर्धा करण्याची खुमखुमी आहेच.
मग लोकांना फुकट अहिंसा, करूणेचे पाठ शिकवत सुटण्याच्या प्रकाराला मार्केटींगचा वास येतो.

ते केंद्रपण ईगतपुरीलाच का? तर थेट रेल्वेलाईन वर आहे - कमावत्या, मुंबई, पुण्याच्या धकाधकीला त्रासलेल्या, हिस्ल्टेशनला जाणार्या लोकांना काहीतरी प्युअर्ली सेन्शुअल गोष्टींच्या मार्केटींगखाली सहज धम्मगिरीवर डायव्हर्ट करता येते.
म्हणजे डिमांड आणि सप्लाय इथेही आहेच.

कसला धम्म न कसलं काय.

नवल कशाचं तर पैसे मागत नाहीत याचं - आपोआप लोकांच्या खिशातून पैसे काढण्याची कला हातात असताना मागणी वगैरे करण्याची गरज पडत नाही.

आता एक किस्सा:
कालपर्वा इगतपुरीच्याच स्टेशनवर नाष्टा वगैरेसाठी रेल्वे थांबली. तुडूंब गर्दी. डब्याच्या गॅंग वे मध्येही सुटकेस, पोती, सामान लावलेले. पाय ठेवायला जागा नाही. तेवढ्यात एक येडागबाळा, घाम-धूळ-मातीनं कपडे काळेकुट्ट झालेला एक काळाढुस्स पोरगा हातात खुरटा झाडू घेऊन त्या डब्यात शिरला. तो डबा झाडून घ्यायचा आणि डबा स्वच्छ झाल्यावर लोकांसमोर हात पसरायचा. पण त्या डब्यात झाडायला जागाच शिल्लक नव्हती. तो वेडा पोरगा पण असा खुद्दकन हसला डब्यातून बाहेर पडताना की मी पण पंधरा मिनीटे हसत होतो.

असेच धम्मगिरीवाले. आपल्या आतली झाडपूस करून "देने वाले का भी भला, ना देने वाले का भी भला" म्हणणारे.

पण एक वेगळा अनुभव असतो. बरा असतो चेंज म्हणून.

कवितानागेश's picture

23 Nov 2010 - 6:35 pm | कवितानागेश

अभिप्रायाबद्दल आभार.
मला वाटते, अगदी नवीन लोकांसाठी स्टेशनातच बोर्ड लावणे आवश्यक आहे.
मला वाटते, या खटकणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले.
विपश्यना करणारी असोत वा नसोत, सगळीच 'शिकणारी' माणसे अहेत, कुठेतरी कुणीतरी चुकणारच.
त्यासाठी आपण संपूर्ण प्रयोगाकडे पाठ कशाला फिरवायची? आपल्याला हवे ते शिकून घ्यायचे.

लेखमाला आवडली.
आपल्या अनुभवात आम्हालाही सामिल करून घेतलेत्......गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे!
मी एकदा उल्लेख केल्याप्रमाणे केलेल्या शिबिरात सगळ्यांना आपले म्हणण्याचा कार्यक्रम होता.
त्यात सगळ्या अनोळखी पार्टीसिपंटसकडे जाउन 'मी आपली आहे आपण माझे आहात' असे डोळ्यात पाहून म्हणावयाचे होते. सगळ्यांनाच भयंकर अवघडलेपण होते.

धमाल मुलगा's picture

23 Nov 2010 - 6:54 pm | धमाल मुलगा

श्री श्री श्री रविशंकर का?
आमच्या कॉलेजातल्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीमध्ये त्यांचा एक कोर्स (बहुतेक आर्ट ऑफ लिव्हिंग असावा) होता. तो झाल्यावर असेच सगळेजण म्हणायचे एकमेकांना. ते आठवले.

होय, असेलही. आता आठवत नाही. पण माझ्या आईबाबांनी रवीशंकरांचा हा कोर्स केला होता.
ते सांगताना आई भयंकर चिडली होती कारण बाबा दुसर्‍या बायकांना 'मी आपला आहे.....' वगैरे म्हणत होते.;)

Pain's picture

25 Nov 2010 - 12:13 pm | Pain

हाहाहा :D

धमाल मुलगा's picture

23 Nov 2010 - 7:04 pm | धमाल मुलगा

माऊ,
सर्वप्रथम इतकी छान लेखमाला उतरवल्याबद्दल अभिनंदन. :)
खुपच सुरेख लिहिलं आहे. कोठेही ज्ञानदानाचा वगैरे अभिनिवेश न आणता. शिवाय, ह्या आणि अश्या विषयांमधली क्लिष्टताही अगदी सोपी सहज करुन मांडली आहेस, ते तर प्रचंड आवडलं. अगदी 'हसत खेळत शिका' प्रकारचं अनुभवकथन जमलंय हे. फार आवडलं.

बाकी, विपश्यनेबद्दल बर्‍याच लोकांकडून ऐकून होतो आजवर. पण च्यायला, ते अज्जिबात बोलायचं म्हणून नाही हा पहिलाच नियम पाहिला की आमचा उत्साह बारगळलाच. पण असे छान अनुभव येणार असतील तर एकदा का होईना प्रयत्न करायला हवाच असं मात्र नक्की वाटतंय.

अवांतरः ह्याच लेखमालेत कुठेतरी ज्योती-त्राटकाचा उल्लेख आलेला आहे. माझं सांगण आहे, बाबांनो, नका करु तो प्रकार. च्यायला, आपला आपल्यावर नसतो ताबा! कुठेतरी वाचून ऐकून तो प्रकार केला काही महिने आणि मग 'आपली नजर लय ड्येंजार झालीए आता' असं काहीतरी लै भारी वाटायला लागलं. मग चाळे सुरु होतात..समोर दिसेल त्याच्याकडं डोळ्यात रोखूनच काय पहायचं, मित्रांसोबत नेत्रयुध्दंच काय खेळत बसायचं...त्या रोखून पाहण्याच्या भानगडीत चार-सहा इंटरव्ह्यूमध्ये आम्ही इंटर्व्ह्यू घेणार्‍याला इतकं अस्वस्थ करुन टाकलं, की त्यानं बिचार्‍यानं इमानेइतबारे आम्हाला 'रिजेक्ट' शिक्का मारुन हाकललं. :)

धमालराव,
तुम्ही त्राटक दृष्टीनं पाहुनही इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट?
असं होणं नाही.
अहो मी चारच दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो - त्राटक दृष्टीनं पाहिलं त्या इंटरव्ह्यूवाल्याकडं !
त्यानं इंटरव्ह्यू क्यान्सल केला नी मला थेट जॉईन व्हायला सांगितलं. ;-)
ऑफर लेटरवर लिहीलेला पगार पाहिला (त्राटक दृष्टीनं).
तो मला पटला नाही.
नोकरी क्यान्सल!

धमाल मुलगा's picture

23 Nov 2010 - 7:27 pm | धमाल मुलगा

च्यायला, आपला आपल्यावर नसतो ताबा! कुठेतरी वाचून ऐकून तो प्रकार केला काही महिने आणि मग 'आपली नजर लय ड्येंजार झालीए आता' असं काहीतरी लै भारी वाटायला लागलं. मग चाळे सुरु होतात.

दादानुं, हे वाचायला इसरलात जनु?

माऊंनी खुप छान लेखमाला लिहिलीये. त्यावर मलातरी खुसपटं काढण्यात मजा नाही वाटत द्येवा.. खरडवही आहेच की आपली..या गफ्फा हाणू..कसं?

हांग्गा आस्स!
दम खा जरा.

प्रभो's picture

23 Nov 2010 - 8:29 pm | प्रभो

शाळेत असताना दहावीत विपश्यनाच्या हैद्राबाद केंद्राला नेलेलं २ आठवड्यासाठी.... त्याची आठ्वण झाली..थोडा फार झाला फायदा त्याचा दहावीत...पण आम्ही जन्मजात आळशी या क्याट्यागरीतले असल्याने फॉलोअप केला नाही.. :)

शाहरुख's picture

23 Nov 2010 - 9:07 pm | शाहरुख

सगळे भाग वाचले..प्रिच (preach - योग्य मराठी शब्द ?) न केल्याने वाचायला मजा आली !

कोणताही विचार मनात येऊ न देता तसंच बसणे आम्हाला स्वतःसाठी धोकादायक वाटते. त्यामुळे अशा गोष्टींपासून जरा लांब आहे !

पैसा's picture

23 Nov 2010 - 10:06 pm | पैसा

विपश्यना ची अतिशय खुसखुशीत भाषेत छान ओळख करून दिलीस माऊ. विपश्यना असो किंवा महर्षी महेश योगी आणि ऋषि प्रभाकर तसंच श्री श्री रवीशंकर सगळ्यांच्या ध्यान पद्धतीत थोडा थोडा फरक आहे, पण सगळ्यांचं मूळ आणि परिणाम एकच आहे.
लेख मालिका खूप आवडली. श्रीमति किरण बेदी यानी तिहार तुरुंगातील कैद्याना विपश्यना चं प्रशिक्षण दिलं होतं आणि त्याचे चांगले परिणाम दिसून आले होते असं वाचलंय.

अर्धवटराव's picture

23 Nov 2010 - 10:08 pm | अर्धवटराव

मी आता पर्यंत जे काहि वाचलं/ऐकलं विपश्यनेबद्दल, त्यापेक्षा तुमचे अनुभव खुपच वेगळे आहेत. मला वाटायचं कि विपश्यनेनी मनुष्य एक पाषाणाची ध्यानमूर्ती बनतो... पण तुम्ही तर आनंद सोहळा लिहीलात. एकदा अनुभव घ्यायलाच हवा आता.
धन्यवाद.

अर्धवटराव

पुष्करिणी's picture

23 Nov 2010 - 11:07 pm | पुष्करिणी

लेखमाला आवडली.

हा कोर्स करून आल्यानंतर तुम्ही रोजही काही ध्यान धारणा करता का प्रॅक्टीस म्हणून?

राजेश घासकडवी's picture

23 Nov 2010 - 11:09 pm | राजेश घासकडवी

धमाल मुलगा ने म्हटल्याप्रमाणे 'कोठेही ज्ञानदानाचा वगैरे अभिनिवेश न आणता. शिवाय, ह्या आणि अश्या विषयांमधली क्लिष्टताही अगदी सोपी सहज करुन मांडली आहेस, ते तर प्रचंड आवडलं. अगदी 'हसत खेळत शिका' प्रकारचं अनुभवकथन जमलंय हे. फार आवडलं.'

तुमच्या लेखनावरून विपश्यना व ध्यान म्हणजे एकंदरीत मनातला विचारांचा पसारा आवरण्याचं ट्रेनिंग वाटलं. दैनंदिन जीवनातल्या रुटिनांप्रमाणे कोंदट विचारांची रुटिनं होतात. ती मोडून काढून, वाईट फेकून देऊन पुन्हा नव्याने स्वच्छ सुरूवात करण्याची पद्धत वाटली. तशी मोकळी अवस्था तुम्ही अनुभवलेली दिसते. या शिक्षणाचा प्रभाव किती दिवस टिकतो, की संपूर्ण क्रांती होऊन कायमस्वरूपी बदल होतो, तो सामान्य जीवनात कसा जाणवतो याविषयी जरूर लिहा.

गुंडोपंत's picture

24 Nov 2010 - 8:46 am | गुंडोपंत

राजेशराव, तुम्ही एखाद्या गोष्टीचा लेखाचा गोषवारा नेमक्या शब्दात फार छान मांडता हो. लेखा इतकीच तुमची प्रतिक्रियाही छान आहे.

इंटरनेटस्नेही's picture

24 Nov 2010 - 1:31 am | इंटरनेटस्नेही

लेखमाला आवडली असुन आम्ही आमचा नोंदणी अर्ज सदर संस्थेकडे पाठविल्या आहे.

(ध्यानस्थ)श्री. श्री. इंटेश.

स्वाती दिनेश's picture

24 Nov 2010 - 1:51 am | स्वाती दिनेश

वेगळ्या अनुभवावरची वेगळी लेखमाला...
अर्थातच खूप भावली.
स्वाती

स्पंदना's picture

24 Nov 2010 - 8:15 am | स्पंदना

माउ हे बर केलस सांगितलस ते. हा म्हणजे अतिशय उच्च कोटीचा फरक वाटतो मला.

सुन्दर अनुभव. विचार करत बसली असतीस की कस ज्ञानामृत पाजाव तर नसत जमल बघ पण हसत खेळत असे मस्त घोट दिले आहेस की बस्स.

बाकी घरची कथा पन आवडली असती वाचायला. म्हणजे याच लकबीत आणखी एक लेख होउन गेला असता. काय ? काय म्हणते?

मस्त लिहिले आहेस माऊ.
सगळेच भाग आवडले. हे वाचून मलाही अशाप्रकारचे शिबिर अनुभवावे असे वाटू लागले आहे.
माहिती नाही कधी वेळ येईल ती.
लेखमाला मस्त जमली आहे. :)

गुंडोपंत's picture

24 Nov 2010 - 8:43 am | गुंडोपंत

सुंदर अनुभव मांडला आहे. मांडणी आणि स्वगत आवडले. ध्यान म्हणजे खरे तर एक स्वगतच असते. फक्त जमायला हवे. मला तासभर ध्यानात एखादा क्षण मिळतो तोच मन पळते.
आपला पुढचा प्रवासही वाचायला आवडेल.

कवितानागेश's picture

24 Nov 2010 - 1:21 pm | कवितानागेश

" width="144" height="108" alt="" />

मृत्युन्जय's picture

25 Nov 2010 - 8:21 pm | मृत्युन्जय

सगळे भाग वाचले. खुप आवडले. सरळ सोपी भाषा आणि ओघवती शैली. मस्तच. विपश्यना करायला मला पण आवडेल पण त्यासाठी मास्तर १० दिवस सुट्टी देणार नाही

विलासराव's picture

25 Nov 2010 - 9:43 pm | विलासराव

वेळ काढा. मी जानेवारीचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन करुनही टाकलं आहे.
जुनमधेही केलं होतं तेव्हा मी बुट्टी मारली.
पण आता कोर्स करणार.

कवितानागेश's picture

25 Nov 2010 - 8:28 pm | कवितानागेश

१० दिवस सुट्टी देणार नाही

मग बुट्टी मारायची!
गावी कुणालातरी आजारी पाडायचे.

नाहीतर त्यांना सांगा, की 'तिहारमधल्या कैद्यांसाठी त्यांना सुधारायला एक शिबीर घेतात, मलापण आवर्जून जायला सांगितलय आमच्या डॉक्टरनी'.

मृत्युन्जय's picture

26 Nov 2010 - 11:05 am | मृत्युन्जय

'तिहारमधल्या कैद्यांसाठी त्यांना सुधारायला एक शिबीर घेतात, मलापण आवर्जून जायला सांगितलय आमच्या डॉक्टरनी'.

हॅ हॅ हॅ. आमची अवस्था कैद्यांसारखीच आहे. फक्त आम्ही सरळमार्गी कैदी आहोत. :)

असंही मास्तरला अधुनमधुन संशय येतच असणार आहे की मला मानसिक शांतीसाठी वैद्यकीय उपचारांची गरज आहे ;). वर्थ अ ट्राय. :)

सुत्रधार's picture

26 Nov 2010 - 3:11 pm | सुत्रधार

आजपर्यंत शब्द माहित होता. आता अर्थ कळाला असे वाटते.

शिल्पा ब's picture

29 Nov 2010 - 3:42 am | शिल्पा ब

छान लेखमाला.

पुन्हा वाचताना तेवढीच मजा आली :)
धन्यवाद

इनिगोय's picture

8 Jan 2013 - 12:05 pm | इनिगोय

माऊ गं माऊ.. मस्त लिहिलंयस. माझ्याच आठवणी वाचल्यासारखं वाटलं अगदी :) पुनःप्रत्यय की कायसेसे म्हणतात ते.
प्रतिक्षण विपश्यनेच्या सरावाने पुष्कळसे बदल झालेले मी अनुभवलेत. आणि तुला जाणवलं तसं विपश्यनेमुळे इतर साधनामार्गांचंही स्थान, महत्त्व पटून गेलं. अमूक एक मार्गच योग्य, बाकी सगळं चूक असा आग्रह धरणारं कोणी दिसलं की त्यातला फोलपणा जाणवू लागला.

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ते कसे हे शिकवणारी ही विपश्यना जरूर करावी..

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jan 2013 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतकी कठीण गोष्ट इतक्या खुसखुशीत शैलीत सागीतलीत !

'जितके लामा, तितके धर्म'. प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाचा 'धर्म' वेगळा. जे जे करून माणसाला अधिक 'माणुसकी' सापडेल, करूणा निर्माण होईल, तो तो त्याचा धर्म. कुणाला जपजाप्य करून, कुणाला प्रार्थना करून, कुणाला समाजसेवा करून, कुणाला जगभर हिंडून, कुणाला ज्ञान मिळवून,.. जी गोष्ट करून मन शांततेनी, समाधानानी, आनंदानी भरून जाईल, तो तो त्याचा 'खरा धर्म'. आणी ज्या आनंदात 'कुणालाही' बिनबोभाट सामील करून घेता येईल, तो 'खरा आनंद'.
'भवतु सब्ब मंगल'.
हे सत्य जर सगळ्यांना समजले तर पृथ्वीवर स्वर्गच उतरेल.

भटक्य आणि उनाड's picture

8 Jan 2013 - 1:56 pm | भटक्य आणि उनाड

झकास एक्दम !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2015 - 7:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त...!

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

30 Mar 2015 - 3:31 pm | कवितानागेश

मिपा बंद असताना? ;-)
अवांतर: मीपण वाचेन म्हणते एकदा! :-ड

रुपी's picture

19 May 2015 - 5:35 am | रुपी

विशेष म्हणजे तुम्ही हे अनुभव प्रामाणिकपणे मांडलेत. धन्यवाद!

आता लेखमाला लिहून पाचेक वर्षं झालीत, तुम्हाला अजूनही याची मदत होते का?

अवांतर : हे असंच मनात येणार्‍या विचारांकडे सिनेमासारखं बघणं मी अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकात वाचलं होतं. त्यांनी विपश्यना शिबीर केलं होतं की नाही हे वाचल्याचं आठवत नाही, पण ते पुस्तकदेखील मला खूप आवडलं होतं आणि प्रामुख्याने बर्याच गोष्टी प्रामाणिकपणे लिहिल्या म्हणून जास्तच..

कविता१९७८'s picture

19 May 2015 - 10:47 am | कविता१९७८

मस्तच , पुर्ण लेखमालाच छान झालीये

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jun 2018 - 11:09 am | ज्ञानोबाचे पैजार

एका मित्राशी बोलताना माउताईची ही लेखमाला आठवली.
परत एकदा चारही भाग वाचून काढले.
मजा आली...
पैजारबुवा,