खिद्रापूरचा कोप्पेश्वर:

या दरवाजातून आत पाऊल टाका
आणि
हे बघा..........कोप्पेश्वरचे मंदीर.

शिलाहार राजे दोन गोष्टींसाठी बरेच प्रसिद्ध होते एक म्हणजे त्यांनी त्या काळात बरेच किल्ले बांधले. त्यातील काही समुद्री किल्लेही होते म्हणजेच समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. का महत्वाचे होते याचे कारण समजण्यासारखे आहे. त्यांचा व्यापार त्या मार्गाने चालत असणार व त्याबाजुनेही त्याआधी जमिनीवर आक्रमण झाले असणार. माझे हे मत अर्थातच तपासून बघावे लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बांधलेली देवळे. या राजांचा ओढा जैन धर्माकडे होता पण त्यांनी हिंदूधर्माची कास सोडली नव्हती. त्यांनी अनेक जैन देवळे बांधली त्याचप्रमाणे शंकराच्या देवळांचीही काळजी अत्यंत उत्तम प्रकारे वाहिली. महाराष्ट्रात त्या काळात जैन धर्म व हिंदू धर्म हे एकाच घरातील दोन भावंडे म्हणून नांदावीत तशी नांदत होते
आज आपण ज्या खिद्रापूरच्या देवळाचा थोडाफार अभ्यास करणार आहोत त्याविषयी मी पूर्वी एकदा येथे लिहिले आहे पण ते एका भटकंतीचे वर्णन म्हणून. आज आपण जरा त्याचा थोडा अभ्यासही करणार आहोत. तो करताना काहींना कंटाळा येण्याचा संभव नाकारता येत नाही पण मग त्यांच्यासाठी मी काढलेली छायचित्रे आहेत. ती बघून त्यांनी बाकीचे सोडून द्यावे.
हे देऊळ शिलाहार राजांनी बांधले म्हणून त्यांच्याबद्दल जर लिहिले नाही तर हा लेख अपूर्ण वाटेल. हे देऊळ त्याच वंशाच्या राजांनी बांधले आहे याचा भक्कम पुरावा असल्यामुळे त्यात संशय घेण्यास काही जागा उरत नाही. यांना काही ठिकाणी सिलार, शियलार व सेळार या नावानेही ओळखले जाते. (मराठी शेलार हे आडनाव व यांचा काय संबंध आहे हे एकदा अभ्यासले पाहिजे) या घराण्याच्या तीन शाखा होत्या व यांचा मूळपुरुष होता जीमूतवाहन. या घराण्याची वंशावळ एका ताम्रपटावर सापडली त्यात एका शूर योद्ध्याने परशूरामाच्या बाणांपासून पश्चिम समुद्राचे रक्षण केले तो शिलाहारांचा मूळपुरुष असा स्पष्ट उल्लेख सापडतो. महाराष्ट्रात शिलाहारांची राज्ये ठाणे, कुलाबा येथे एक शाखा, गोवा, रत्नागिरी इ. येथे दुसरी शाखा व तिसरी सांगली कोल्हापूर, सातारा, बेळगाव...इ. येथे राज्य करत होती. शिलाहारांची मुख्य राजधानी होती मराठवाड्यातील तगर (तेर) येथे. हे सर्व राजे मुख्यत: कन्नड भाषिक होते असे मानले जाते आणि ते बरोबरही असावे कारण त्यांचे बरेच शिलालेख या भाषेत आहेत व त्यांनी बांधलेल्या देवळांची छाप हंपीवरही आहे.
कोल्हापूरच्या शिलाहार राजांचा मूळपुरुष पहिला जतिग हा गोमंथ किल्ल्याचा किल्लेदार ग्ंगनृपती पेर्मानडी याचा मामा होता. हा किल्ला शिमोगा जिल्ह्यात आहे यावरुन असे म्हणता येईल की हे राजे काही काळ कर्नाटकातही राज्य करत होते. शिलाहारांनी दक्षिण महाराष्ट्रावर जवळ जवळ २०० वर्षे राज्य केले. जतिग, नायिवर्मा व चंद्र हे पहिले तीन राजे शूर होते परंतू बहुदा राष्ट्रकुटांचे मांडलिक असावेत. यानंतरच्या मारसिंह राजाचा १०५८ साली मिरज येथे दिलेला एक ताम्रपट सापडतो. हे अर्थातच दानपत्र आहे. याची राजधानी किल्ले पन्हाळा येथे होती. मारसिंहानंतर आला गुवल व त्यानंतर आला बल्लाळ. बल्लाळनंतर आलेल्या राजामधे आपल्याला जास्त रस आहे कारण हा बऱ्यापैकी सार्वभौम होता व त्याचे नाव होते गंडरादित्य. या राजाचे १११० पासून ११३५ पर्यंत खोदलेले अनेक शिलालेख सापडले आहेत.
गंडरादित्य राजाचा ताम्रपटावरील शिक्का.

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची पायाभरणी यानेच केली. एका शिलालेखात त्याने स्वत:चा उल्लेख मिरिज देश, सात खोल्ल ( मला वाटते घरातील ‘खोली’ हा शब्द यातूनच निर्माण झाला असावा) व कोंकण देशाचे आधिपती आहोत असे जाहीर केले आहे. त्याच्या राणीचे नाव होते कर्णावती. या राजाराणीचा ओढा जैन धर्माकडे होता परंतु तो महालक्ष्मीला शिलाहारांची कुलदेवता मानत असे.
शिलाहारांची कुलदेवता:महालक्ष्मी.......

गंडरादितत्याचा मुलगा विजयादित्य हा ११४० साली गादीवर आला व त्यानंतर त्याचा मुलगा दुसरा भोज हा गादीवर आला. हा इतिहासात बराच प्रसिद्ध झाला व तो सार्वभौम राजा होता हे त्याच्या काही शिलालेखातून समजते. १२१२ मधे यादवांनी शिलाहारांवर स्वारी करुन शिलाहार भोजाचा पराभव केला व त्याला त्याच्या राजधानीतच म्हणजे पन्हाळ्यावर कैदेत टाकले. या राजाच्या मृत्युनंतर शिलाहार घराण्याचे राज्य खालसा झाले असे म्हणायला हरकत नाही. यादवांनी मात्र ज्या मंदीरांची बांधकामं शिलाहारांनी चालू केली होती ती बंद पडू न देता त्यांची चांगली व्यवस्था लावून दिली.
राजा भोज दुसरा याची राजधानी पन्हाळा:

गंडरादितत्याने अनेक शिवमंदिरे बांधली व जैन मंदिरेही बांधली. त्याने मिरजच्या आसपास एक तलावही बांधला व त्याला गंडसमुद्र असे नाव दिले होते. शिलाहारांच्या लेखात शिव, ब्रह्मा, महालक्ष्मी, जोगेश्वरी, भगवती अशा अनेक देवदेवतांचा उल्लेख होतो. ब्रह्माचे एक देऊळ कोल्हापूरात आहे तर दुसरे गोव्यात करमळी येथे आहे. शिलाहारांनी आदित्याची मंदिरेही बांधली. त्याने बांधलेली काही जैन देवळे म्हणजे आजुरिका यथे बांधलेले जिनालय त्रिभुवनतिलक, कोल्हापूरातील रुपनारायण व खिद्रापूरातही एक मंदीर आजही दिसते. नांदगिरी किल्ल्यावरही एक जैन स्थान आहे तेही याच काळातील असावे.
खिद्रापूर हे गाव कृष्णेच्या किनारी वसलेले आहे. हे ठिकाण त्याकाळी अत्यंत निसर्गरम्य असणार याबद्दल आमच्या मनात कसलीही शंका नाही. या ठिकाणी कृष्णानदी आपली वाहण्याची दिशा बदलते. पूर्वेकडे वाहणारी कृष्णा येथे पश्चिम दिशेला वाहू लागते. गंडरादित्याने चालू केलेले हे मंदीर उभारणीचे काम त्याच्या काळात पूर्ण होणे शक्यच नव्हते. ते पूर्ण झाले त्याचा नातू दुसरा भोज याच्या काळात. अर्थात हे मंदीर त्याला फारसे लाभलेले दिसत नाही. सिंघण यादवाने त्याला कैदेत टाकले तरीही त्याने सुरु केलेल्या सर्व बांधकामांची चांगली व्यवस्था लावून दिली हे आपण बघितलेच आहे. त्या काळात हे राजे एकाच धर्माचे असल्यामुळे ते एकमेकांची राज्ये जिंकत, शत्रूची संपत्ती बळकावत पण परमेश्वराच्या निवासस्थानास ते बोट लावत नसत. बहुतेक वेळा एखादे राज्य जिंकल्यावर त्या राज्यातील देवळांना या नवीन राजांकडून चांगल्या देणग्याही मिळत. या प्रकाराने ही देवळे चांगली श्रीमंत असत व स्वत:चा कारभार हाकण्यास समर्थ असत. आजही या कोपेश्वर देवस्थानाची २००/३०० एकर जमीन आहे असे म्हणतात. अर्थात हे सगळे बदलले मुसलमानांची आक्रमणे झाल्यावर. या देवळाचीही मुसलमानांनी अशीच वाट लावली. आता जी काही कल्पना करायची ती त्या भग्न अवशेषांवरुनच.
कृष्णेच्या या तिरावर आहे शिरोळ तालुका व त्या तिरावर आहे कर्नाटकातील अथणी तालूका. अर्थात त्या काळात तसे काही नव्हते. त्यामुळे हे देऊळ कृष्णेकाठी होते असे म्हटले तरी चालेल. आज जर आपण तेथे गेलात तर आपल्याला आढळलेल की कृष्णा त्या काळी अशी बंदीस्त वहात नसणार व तिचे पाणी देवळाच्या पायऱ्यांना स्पर्ष करत असणार. काही वर्षापर्यंत पावसाळ्यात या भागाचे बेट होत होते व उर्वरीत जगाशी त्यांचा संबंध तुटत असे. आता एका पूलामुळे ती भीती राहिली नाही.
कोपेश्वरच्या दक्षिण दरवाजाच्या उजवीकडे जो अभिलेख कोरलेला आहे तो यादवांचा राजा सिंघणदेव, ज्याने शिलाहारांना संपविले त्याने या देवळाची काय सोय लाऊन दिली हे सांगतो. या शिलालेखाची लिपी देवनागरी आहे तर भाषा संकृत.
या शिलालेखाबरोबर देवळाच्या अनेक शिल्पांच्या खाली अनेक शिलालेख आढळतात. ते आजही आपल्याला दिसतील. या देवळातील अनेक शिलालेखात शिलाहार विजयादित्यचा दंडनायक ‘बोपण्णा‘ याच्या पराक्रमाचे पोवाडे गाईले आहेत. ११३८ साली विजयादित्य गादीवर बसला. त्याने चालूक्यांच्या विरुद्ध बरीच कटकारस्थाने केली. बिज्जलाला या राजामुळेच स्वातंत्र्य मिळाले. बिज्जलाने विजयादित्यला त्याच्या दरबारात बोलविले असता विजयादित्याने त्या आमंत्रणाकडे दुर्लक्ष केले. ते सहन न हो़ऊन त्याने विजयादत्यावर आक्रमण केले. (अर्थात हे तात्कालिक कारण असणार. खरे कारण कमकुवत झालेल्या राजाचा प्रदेश लुबाडणे हाच असावा) हे युद्ध कोपेश्वरच्या प्रदेशात झाले ज्यात बिज्जलाचा दारुण पराभव झाला. बोपण्णा हा मला वाटते एक महत्वाचा सेनाधिकारी हो़ऊन गेला असावा. हे देऊळ मंदीर शास्त्राप्रमाणे चार भागात बांधले गेले आहे. गर्भगृह, अंतराळ, गुढमंडप ( बंद असलेला सभामंडप म्हणून त्याला म्हणत गुढमंडप) व रंगमंडप. या रंगमंडपातच
बोपण्णाबद्दल अनेक लेख कोरलेले आहेत.
असाच एक एका मूर्तीखाली कोरलेला शिलालेख:

हे मंदीर १२३६ साली पूर्ण झाले हे आपल्याला सिंहण यादवाच्या शिलालेखातून कळते. म्हणजे जेव्हा या मंदीराचे बांधकाम चालू झाले तेव्हा मुसलमान व ख्रिश्चन या धर्मांमधे जेरुसलेमच्या ताब्यासाठी धर्मयुद्धे चालू झाली होती. व ते पूर्ण झाले तेव्हा १०/१२ वर्षापूर्वीच चंगेज़ खानाचा मृत्यु झाला होता. (१००० साली मुसलमानांची आक्रमण झाले ते पानिपतच्या युद्धापर्यंत अंदाजे १००० लाख हिंदूंचे शिरकाण करण्यात आले.- प्रो. के एस लाल. मला वाटते जगातील हा सगळ्यात मोठा वंशसंहार असेल. ज्यूंचा होलोकास्ट यापुढे काहीच नाही ). असो हे थोडे विषयांतर झाले खरे पण प्रत्येक भंगलेली मूर्ती बघताना या विषयावरचे विचार मनात गर्दी करतात हेही खरे आहे.
मंदीर पूर्वाभिमुख असून लांबीला अंदाजे १०३ फूट, रुंदीला ६५ फूट व उंचीला ५२ फूट आहे. बहुतेकवेळा देवळांचे अंतराळ हे आकाराने छोटे असते मात्र या देवळाचे अंतराळ आकाराने इतर भागापेक्षा मोठे आहे. गाभाऱ्यात शिराण्याआधी आपल्याला द्वारपाल जय-विजय भेटतात. पण त्यातील जय गायब आहे. पुढे जाण्याआधी हे चार भाग काय
आहेत ते बघून घेऊयात –
गर्भगृह: यात ज्या देवतेचे देऊळ आहे त्याची मुर्ती असते. अर्थातच ही जागा सगळ्यात छोटी व अत्यंत शांत व कमी उजेड असणारी असते. हे असे का ? तर ध्यान करताना त्या देवतेशी एकात्म पावण्यासाठी हे वातावरण उपयूक्त ठरत असावे. या ठिकाणी निवडक माणसांना प्रवेश असावा. म्हणजे ही जागा त्या देवतेची खास जागा असते.
अंतराळ: दोन मंडपांना जोडणाऱ्या भागाला अंतराळ म्हणतात. म्हणजे एका जगातून दुसऱ्या जगात जायची जागा.
गुढमंडप : हा विभाग बंद करता येतो. म्हणजे याला बाहेर जाण्यासाठी तीन बाजूला दरवाजे असतात व ते बंद केल्यावर त्याचे एक बंदीस्त छोटे सभागृह करता येत असे. या देवळाच्या गुढमंडपात खांबाच्या दोन रांगा चौकोनी आकारात उभ्या आहेत. बाहेरच्या रांगेत २० खांब आहेत तर आतल्या चौकोनात १२. हे खांब अत्यंत सुंदर आहेत. हे खांब खाली चौकोनी असून त्यानंतर त्याचा आकार अष्टकोनी होतो व शेवटी तो गोलाकार तून छत पेलतो. या खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. गुढमंडपानंतर बहुतेक ठिकाणी द्वारमंडप असतो पण या ठिकाणी मोढेराच्या सूर्यमंदीराप्रमाणे अजून एक अष्टकोनी मंडप जोडलेला आहे. हाच तो स्वर्गमंडप.
रंग मंडप : यात कार्यक्रम चालत असावेत. या देवळाचा हा मंडप इतका सुंदर आहे की त्याला स्वर्गमंडप असेही म्हणतात. या मंडपाला कठडा आहे व तो गुढमंडपाप्रमाणे खांबांवर उभा आहेत मात्र याच्या ओळी चौकोनात नसून वर्तूळाकारात आहेत. अशी दोन वर्तूळे आहेत. बाहेरच्या वर्तूळात ३६ खांब आहेत तर आतल्या वर्तूळात १२ खांब आहेत. या मंडपाचे बांधकाम अर्धवट राहिल्यामुळे याच्यावर छ्त नाही. पण एखाद्या कर्कटकनी रेखावा असे वर्तूळ त्यामुळे रिकामे पडले आहे ज्यातून आकाशाचा गोल तुकडा आपल्या नजरेस पडतो. खरोखरच असे वाटते, स्वर्गारोहणासाठी तर हे वर्तूळ मोकळे सोडले नसेल ना ? पण त्याखाली सगळे नक्षिकाम नजरेस पडल्यावर हाच स्वर्ग आहे याची खात्री पटते. स्वर्ग खाली आणि आकाश वर असा प्रसंग बहुदा येथेच नजरेस पडावा.
या लेखात जो नकाशा दिला आहे तो बघितल्यावर या विविध भागाच्या उपयुक्ततेची कल्पना यावी.
देवळाच्या प्रांगणात एक विरगळ पडला आहे तो शिलाहार दुसरा भोजाचा सेनापती बाणेशा याच्या स्मृतीप्रित्यर्थ उभा केलेला असावा. हा सेनापती सिंहण यादवाविरुद्ध लढताना धारातिर्थी पडला असा उल्लेख एका शिलालेखात आहे. या विरगळावर सगळ्यात खाली लढाई नंतर मधे बाणेशाला अप्सरा स्वर्गात घेऊन चालल्या आहेत व शेवटी शंकराची पूजा दाखविली आहे.
आपण जेव्हा शहर सोडून गावी जातो तेव्हा आपल्याला असे वीरगळ प्रत्येक गावाच्या वेशीवर नेहमी आढळतील. हे त्या गावाच्या रक्षणासाठी हौताम्य पत्करलेल्या वीरांचे स्मृतीस्तंभच आहेत म्हणाना. शक्य झाल्यास मातीतून/कचऱ्यातून काढून त्याची पुनर्स्थापना करावी. काही वीरगळांवर लेखही लिहिलेले असतात. ( काही गळ शाप देण्यासाठीही असतात त्याच्या आणि याच्यात फरक आहे हे लक्षात ठेवायला लागेल) हे वीरगळ फार जूने असतात.
याच सिंघण यादवाच्या शिलालेखाची शिळा गुढमंडपाच्या दक्षिण द्वाराबाहेर लावलेली आहे. या शिलालेखाचे भाषांतर श्री. मिराशी यांनी केलेले आहे ते ही पटकन बघून टाकू –
श्री—नमस्तुगशिरश्चुबिचंद्रचमरचारवे—त्रैलोक्य-
नगरारभमूलस्तभाय शभवे ।..धर्म सुस्थिरतामु-
पैतु जगतामानददायी सदा वृद्धि चाभिनवातरेण
भजता कोप्पेश्वरस्याभित । स्थानस्वोचितमूर्जित च
वहुना कालेन लब्ध्वाधुना श्रीमद्धीमदुदारसारचतुरायुष्मन्म -
हापूरुषान् ।। भूदेवाशीरमृतात्मवृष्टयाप्यायितोयमनवरत (तम्)।
अकुरतात्पल्लवतात्कुसुमतु फलतात्सुधर्मकल्पतरु ३।।
स्वस्ति—श्रीशकवर्षे ११३६ श्रीमुखसवत्सरे सूर्यपर्वणि सोमदिने
श्रीमद्देवगिरावधिष्ठित समस्तभुवनाश्रय श्रीपृथ्वीवल्लभ महाराजाधिराज
परमेश्वर द्वारवतीपुरवराधिश्वर विष्णुवशोद्भव
यादवकुलकलिकाविकासभास्कर समस्तअ रि-
रायतगजप इत्येवमादिसमस्तराजावलीसमलकृत श्रीम-
त्प्रतापचक्रवर्तिश्रीमहाराजश्रीसिघणदेव शासनपत्र प्रयच्छति ।
यथा । कूडलकृष्णवेणीभेणसी नद्यो सगमे मिरिजिदेशमध्ये
च तिष्ठमान कूडलदामवाडग्राम सवृक्षमालाकुल क्षेत्रस्थ
लवाटसहित नवनिधानसयुक्त चतुराघाटोपेत स्वसीमापर्यंत
श्रीमत्कृष्णवेणीकुवेणीनदीसगमात् श्रीमदाद्दस्वयभुवे
श्रीकोप्पेश्वरदेवाय मकलागभोगरगभोगपरिमलरिपु-
रणार्थ अष्टविधार्चननिमित्त शासनोदकेन प्रदत्तवान् ।। अस्य
ग्रामस्योत्पन द्रवेण सकलागस्थानपतिभि श्रीमद्देवकायं
सर्वमपि अगभोगपूजादिप्रभृतिक करणीयम् ।
अन्यच्च जुगुलसिरिगुप्पग्रामेद्धये यत्पूर्वेण विद्दते तदेव जीर्णो-
द्वारीकृत्य श्री सिंघणदेव श्रीकोप्पेश्वरदेवाय प्रदत्तवान् ।।
आनंदामृतसागरस्य भरणेय पूर्णचंद्रायते य कार्पण्यमस्ततेश्च
हरणे मार्तंडता ढौकते । यश्चाय ह्रदये निवेशितहरि
क्षीराब्धिना स्पर्धते तस्य श्रीभुजवल्लरी विजयते सिंहा-
ह्रपृथीपते ४।। रिपुभूमिपालभालस्थलनिहित क्षालयन्रेणेषु चकास्ति ।
गल्लगलितमदाबुप्रवाहतोसौ जगयी सिंहनृप ।। मंगलम ।।
यातील काही (४ ते ५) शब्द श्री मिराशींनी दुरुस्त केले आहेत. ते केल्यावर या शिलालेखाचा अर्थ खालीलप्रमाणे. भाषांतर अर्थातच श्री मिराशींनी केलेले आहे इंग्रजीमधे. ते मी मराठीत केले आहे. मी एकंदरीत अर्थावर जास्त भर दिला आहे.
‘‘हे त्रैलोक्य ज्याने निर्माण केले व जो त्याचा पाया आहे अशा शंकराला वंदन असो. ज्याच्या मस्तकावर खुद्द चंद्र चौऱ्या ढाळतो आहे व ज्यामुळे ज्याचा शिरोभाग चमकत आहे अशा शंकराला नमन असो.
नवीन राजाधिप्त्याखाली श्री कोप्पेश्वराच्या प्रदेशात धर्माचे अधिष्ठान असो, ज्याने त्रैलोक्याला सदासर्वदा आनंद मिळो कारण आता कोप्पेश्वराला यादवांसारख्या शूर, बुद्धिमान, वैभवशाली, शक्तिशाली व दिर्घायुष्य लाभलेल्या राजाचे राज्य वसतिस्थान म्हणून मिळाले आहे.
ज्याला ब्राह्मणांचा आशिर्वाद लाभलेला आहे असा हा धर्माचा कल्पतरु असाच फोफावणार आहे व त्याला इच्छापूर्तीची फळेही लागोत.
नमन असो ! शके ११३६ श्रीमुख वर्षाच्या चैत्रात सूर्यग्रहणाच्या पवित्र मुहुर्तावर सोमवारी प्रतापचक्रवर्ति, महाराज सिंघणदेव ज्याला महाराजाधिराज, परमेश्वर असे ओळखले जाते, जो द्वारावती सारख्या सुंदर शहराचा मालक आहे, जो प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे, ज्याच्या कुळाची काळजी खुद्द सूर्य वाहतो, जो त्याच्या शत्रूवर नेहमी विजय मिळवतो व जो देवगिरीला वसतो, आज खालील दान करत आहे –
त्याने उदक सोडून मिरिंजिदेशातील कुडलदामवाड जे कुडलकृष्णावेणी व भेणसी याच्या संगमावर वसले आहे ही गावे त्यांच्या हद्दीतील झाडांसकट, शेतीसकट, सर्व ठिकाणे, बागा व नऊ खजिनने व चतु:सिमांसह श्री कोप्पेश्वर देवस्थानाला, जे कृष्णावेणी व कुवेणी नद्द्यांच्या संगमावर वसलेले आहे त्या देवस्थानाला दान दिले आहे. हे दान देवाची अष्टपूजा बांधण्यासाथी करण्यात आलेले आहे. या दान दिलेल्या गावाच्या उत्पन्नातून गावाच्या अधिकाऱ्यांने प्रसाद, करमणूक व सुगंधी उटण्याचा खर्च भागवावा.
याच बरोबर सिंघणदेवाने जी जुगुल व सिरिगुप्प नावाची गावे कोप्पेश्वराला दान मिळालेली होती तीही मंदीराच्या दुरुस्तीसाठी पुनर्दान केली आहेत.
या पृथ्वीचा स्वामी सिंघण, ज्याच्या कर्तृत्वाने आनंदसमुद्रालाही पोर्णिमेच्या चंद्रामुळे येते तशी भरती येते, ज्याच्या तेजाने सूर्याप्रमाणे अज्ञानाचा अंध:कार नष्ट होतो, त्याचा विजय असो !
युद्धात ज्या सिंघणाच्या हत्तीच्या मस्तकातून वाहणाऱ्या मदामधे भल्या भल्या राजांच्या ललाटी लिहिले गेलेले भविष्य पुसले जाते त्या सिंघणाचा विजय असो !
या पृथ्वीवर सगळीकडे आनंद नांदो...........’’
आता जरा देवळाकडे वळूयात..........
क्रमश:............
जयंत कुलकर्णी










प्रतिक्रिया
19 Apr 2013 - 7:45 pm | कपिलमुनी
खुप छान आणि माहितीपूर्ण लेख लिहिलात ..
कित्तीतरी वेळा खिद्रापूरला जाउन आलोय..
पण इतकी तपशीलवार महिती प्रथमच मिळाली आहे.
पुलेशु...पुभाप्र
19 Apr 2013 - 8:39 pm | तर्री
लेख खूप अभ्यस पूर्ण आणि अप्रतिम !
पुढील वाक्य मात्र मन फाडून गेले.
(१००० साली मुसलमानांची आक्रमण झाले ते पानिपतच्या युद्धापर्यंत अंदाजे १००० लाख हिंदूंचे शिरकाण करण्यात आले. मला वाटते जगातील हा सगळ्यात मोठा वंशसंहार असेल. ज्यूंचा होलोकास्ट यापुढे काहीच नाही).19 Apr 2013 - 9:09 pm | मुक्त विहारि
वाचूनच अंगावर काटा आला..
बरे झाले मी, हिंदी सिनेमे नघत नाही ते.
19 Apr 2013 - 11:24 pm | प्यारे१
इ.स. १००० ते साधारण १७७० पर्यंत : १००० लाख म्हणजे १० कोटी.
७७० वर्षात १० कोटी.
हम्म्म्म्म.
दिल चीर दिया!
19 Apr 2013 - 10:15 pm | मुक्त विहारि
अतिशय माहिती पुर्ण लेख..
19 Apr 2013 - 11:25 pm | प्यारे१
सुंदर डिटेलिंग, सुंदर सादरीकरण, अभ्यासपूर्ण लेख.
19 Apr 2013 - 11:50 pm | कपिलमुनी
बिज्ज्वल म्हणजे कोण ?
आणि द्वारावती नगरी म्हणजे सध्याची कोणती ? देवगिरी का? नसेल तर ही नगरी कोठे होती ..याची जास्त माहिती मिळाली तर आनंद होइल
20 Apr 2013 - 1:10 pm | जयंत कुलकर्णी
द्वारावती म्हणजे देवगिरी. देवगिरीचा किल्ला आपण पाहिलेला असेलच.
22 Apr 2013 - 5:56 pm | प्रचेतस
द्वारावती म्हणजे द्वारकाच असावी. सिंघणाने गुजरातच्या परमारांचा पराभव करून आपले साम्राज्य नर्मदेपर्यंत विस्तारले होते. कदाचित द्वारका नगरी त्याच्या ताब्यात आली असावी. तर देवगिरीला यादव सुरगिरी असेही म्हणत. पाचवा भिल्लम त्याच्या एका ताम्रपटात 'सुरगिरिं स्वदुर्गं व्यधात' असे म्हणवतो,
22 Apr 2013 - 7:27 pm | जयंत कुलकर्णी
सिंघणाच्या ताब्यात द्वारका आली असण्याची शक्यता फार कमी आहे. नाहीतर त्याचा उदोउदो कित्येक ताम्रपटात झाला असता. कदाचित दुसरे एखादे शहर असू शकते. किंवा असेलही. माझ्या दृष्टीने मला ते एवढे महत्वाचे वाटत नाही.
20 Apr 2013 - 2:04 pm | नि३सोलपुरकर
काका धन्यवाद,
अतिशय माहिती पुर्ण लेखा बद्दल.
लेख आणी तुमची सही पण आवडली....एकदम सही.
20 Apr 2013 - 3:12 pm | पैसा
सुरेख माहिती आणि उत्तम फोटो.
20 Apr 2013 - 7:48 pm | प्रचेतस
अप्रतिम.
सविस्तर प्रतिसाद नंतर देइनच. तोवर ही पोच.
20 Apr 2013 - 11:09 pm | कंजूस
कोल्हापूरचे देवीचे देऊळ शिलाहार राजांच्या काळातले का ?
21 Apr 2013 - 6:27 am | जयंत कुलकर्णी
त्यात दोन तीन मतप्रवाह आहेत. पण मला वाटते जर महालक्ष्मी शिलाहारांची कुलदेवता असेल तर ते देऊळ त्यांच्याही अगोदरचे असले पाहिजे कारण एखादी देवता कुलदेवया होण्यास परंपरा निर्माण व्हावी लागते. अर्थात हे माझे मत आहे.
20 Apr 2013 - 11:13 pm | सुहास झेले
नेहमीप्रमाणे सुंदर फोटो आणि त्यामागील इतिहासाची भरभरून माहिती.... पुढच्या भागाची वाट बघतोय :) :)
21 Apr 2013 - 1:31 pm | स्पंदना
इतिहासाची भरभरुन माहीती.
खरच!
21 Apr 2013 - 3:31 pm | किसन शिंदे
कोपेश्वराचे मंदिर खरोखरच जबरदस्त आहे. तुमचा पहिला भागही खुप वाचनीय झालाय. मंदिरात आणि मंदिराबाहेर असणार्या अगणित शिल्पांवर तुमच्याकडून येणार्या पुढच्या भागासाठी उत्सुक!
21 Apr 2013 - 5:08 pm | सस्नेह
माहितीपूर्ण + मनोरंजक !
भारताच्या संपन्न कालखंडाची सफर आवडली.
21 Apr 2013 - 8:16 pm | अन्या दातार
कोपेश्वर मंदिरात जवळ जवळ प्रत्येक मूर्तीमागे एक शिलालेख दिसतो. मोजायचा फुटकळ प्रयत्न केला. कंटाळून मोजणेच सोडून दिले :(
जयंत कुलकर्णीसाहेब, नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती. पुभाप्र
21 Apr 2013 - 9:35 pm | अत्रुप्त आत्मा
22 Apr 2013 - 3:18 am | निनाद मुक्काम प...
ह्या अत्यंत माहितीपूर्ण लेखाबद्दल

22 Apr 2013 - 3:50 pm | चावटमेला
अप्रतिम माहिती.
22 Apr 2013 - 4:50 pm | मन१
चांगली माहिती.
वल्लीच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
द्वारावती = द्वारका असे यादवकालीन कवी नरींद्र ह्यांच्या लिखाणासंदर्भात वाचले होते.
29 May 2013 - 12:55 pm | विसुनाना
कोल्हापुरचे महालक्ष्मीचे देऊळ हे शिलाहार काळातच बांधले गेले असावे. किंबहुना कोपेश्वर मंदिराचे दगड महालक्ष्मीचे मंदिर बनवतानाच कोल्हापुरात घडवून तेथून खिद्रापुरास आणून कोपेश्वर मंदिर बांधले असावे असे वाटते. कारण त्याचे व खिद्रापुरच्या कोपेश्वर देवळाचे शिल्पसौंदर्य(आणि विशेषतः छपराची रचना) हे अगदीच सारखे आहे हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे.
31 May 2013 - 4:11 pm | मनराव
वाचतो आहे.......