लहानपणी माझी अशी समजूत होती की 'केतकी गुलाब जुहि' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही. अनेक वर्षांनंतर ते गाणं बसंत-बहार चित्रपटामधील असून त्यात तानसेन नाहीच हे कळल्यावर मी खजील झालो होतो.
आता ही वैयक्तिक गडबड सोडली तरी तानसेनाबद्दल उपलब्ध माहितीच्या बाबतीत एक सार्वजनिक गडबडच आहे. त्याच्या खर्या माहितीबरोबर अनेकविध आख्यायिका त्याच्या नावाशी इतक्या गुंफल्या गेल्या आहेत, की त्यातून सत्य शोधणं हे कोविड१९चा मूळ रोगी शोधण्याइतकं अवघड झालं आहे. ह्या गडबडींची सुरुवात अगदी तानसेनाच्या जन्मतारखेपासून, किंवा त्याहीपेक्षा विचित्र म्हणजे त्याच्या नावापासूनच आहे. तानसेनाच्या जन्मतारखेबद्दल केवळ दुमत नसून त्रिमत, चौमत वगैरे आहेत. काही उल्लेखांनुसार त्याचा जन्म इ.स. १४९२मध्ये झाला, काहींनुसार १५००मध्ये, तर काही जण १५२० ठरवून त्याला आणखीन तरूण करून टाकतात. काही जणांनी ह्या मतांच्या गलबल्यातून एक वेटेड अॅव्हरेज काढून इ.स. १५०० हे त्याचं जन्मवर्ष ठरवलं आहे. आता वर्षाबाबतच इतकी मत-मतांतरं, तर तारखेचा विचार न केलेलाच बरा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं नाव. हे सर्वमान्य आहे, की तानसेन जन्माने हिंदू होता. त्याचं आडनाव पांडे असल्याचं अनेकांना मान्य आहे (नशीब!). ग्वाल्हेरजवळ राहणार्या मुकुंद पांडे (की मकरंद पांडे, की मुकंद मिश्र, की मुकुंद राम) यांना हे पुत्ररत्न प्राप्त झालं. हे रत्न पुढे अकबराच्या दरबारात नवरत्नांमध्ये सामील होईल याची कल्पना आई-वडिलांना होती का नाही, याबाबत काही कल्पना नाही. त्या मुलाचं नाव रामतनु की तन्ना - यापैकी काहीतरी ठेवलं. काहींच्या मते आधी नाव रामतनु होतं आणि पुढे सर्वजण त्याला तन्ना म्हणू लागले (तनू-तन्ना ह्याच न्यायाने मुन्नाभाईचं लहानपणचं नाव राममनू असलं पाहिजे). काही ठिकाणी त्या नावाचा उल्लेख 'तन्ना मिश्र पांडे' असाही येतो, त्यावरून वडिलांचं नाव मुकुंद मिश्र असलं पाहिजे असं वाटतं. शिवाय ते बहुधा काही वर्षे काशीच्या मंदिरात भटजी (पंडित) होते, त्यामुळे त्यांना पांडे म्हणत असावेत. ह्या तन्नाचा 'तानसेन' अकबराने केला - ही देखिल एक चुकीची समजूत. तानसेन अकबराकडे अगदी म्हातारपणी गेला, ते सांगतो पुढे. त्याच्या नावाबद्दल आधी सांगायचं म्हणजे, तानसेन आपल्या आयुष्यातील खूप मोठा काळ 'रेवा' प्रांतातील बांधवगडच्या राजा रामचंद्रसिंह यांच्याकडे दरबार गायक होता. तत्पूर्वी तो ग्वाल्हेरच्या राजा मानसिंह तोमर (यांचा आणि पानसिंग तोमराचा काही संबंध आहे का, कल्पना नाही) यांच्याकडे असावा. मानसिंहांचा उत्तराधिकारी राजा विक्रमादित्य (की विक्रमसिंह की विक्रमजीत) याने तन्नाचं नाव 'तानसेन' असं ठेवलं.
तानसेनाचे गुरू नक्की कोण - याबाबतीतही दुमत आहे. जुने हिंदू व मुस्लिम संदर्भ वेगवेगळी नावं देतात. त्यानुसार काही जण त्यावेळचे वृंदावनमधील संत हरिदास हे तानसेनाचे गुरू मानतात तर काही जण सूफी संत मुर्शिद महम्मद घौस (ग्वालियरी) यांना त्याचे गुरू मानतात. पण संत हरिदासांना गुरू असल्याचं मानणार्यांचं पारडं जड आहे. त्यामुळे पुढे कुणीतरी अशीही एक आख्यायिका जोडून दिलेली दिसते की 'तानसेन लहानपणी मुका होता. एकदा ग्वाल्हेरला गेलेला असता तो महम्मद घौस यांना भेटला. तिथेच सोबत संत हरिदासही बसले होते. महम्मद घौस यांनी तन्नाच्या मुखात फुंकर मारली आणि तो बोलू लागला. लगेचच त्यांनी स्वामी हरिदास यांना तन्नाला संगीत शिकवायला सांगितलं'. परंतु ह्या कथेत फारसं तथ्य नसावं. शिवाय तन्नाचे वडिल एक कवी व संगीतकार होते, त्यामुळे तन्नाचं प्राथमिक संगीत शिक्षण वडिलांकडेच झालं असणार. त्यानंतर ध्रुपद गायकी करणारे स्वामी हरिदास हे तानसेनाचे गुरू झाले असावेत. जाता जाता सांगायची गोष्ट, स्वामी हरिदासांची भेट दक्षिणेतील संत पुरंदरदासांशी (तेच ते, ज्यांना कर्नाटकी शास्त्रीय संगीताचे आद्य प्रवर्तक मानलं जातं, त्यांची रचना 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' सर्वश्रुत आहे) झाली होती. त्यांच्या संगीताचा प्रभाव हरिदासांच्या ध्रुपद गायकीवरही पडला होता. त्याशिवाय तानसेनाच्या गायकीवर महम्मद घौस यांच्या सूफी संगीताचा प्रभावसुद्धा होता.
तानसेनाच्या गायकीबद्दलही बर्याचदा चुकीची समजूत असते. इथे गडबड उपलब्ध माहितीमध्ये नसून केवळ समजुतीमध्ये आहे. सध्या जे भारतीय शास्त्रीय संगीताचं रूप आहे, तेच वर्षानुवर्षे असावं अशी अनेकांची समजूत असते. म्हणजे सध्या ज्या प्रकारे आलापी-बोलताना-सरगम, (विलंबित) बडा ख्याल, (द्रुत) छोटा ख्याल, वगैरे गायले जातात हे स्वरूप त्या मानाने बरंच नवीन आहे. अगदी बैजू बावरा सिनेमात ती जुगलबंदी 'आज गावत मन मेरो झूमके' छोट्या ख्यालमध्ये आहे. परंतु तानसेन त्यावेळी हा प्रकार गात नव्हता. त्याच्या गायकीचा प्रकार सध्या लोप पावत चाललेला 'ध्रुपद' हा होता. वर सांगितल्याप्रमाणे तानसेन आणि बैजू बावरा या दोघांचे गुरू असलेले स्वामी हरिदास हे ध्रुपद गायक होते. त्या उलट ख्याल गायकी प्रसिद्धीस आली ती खूप नंतर, १८व्या शतकात, सदारंग (नियामत खान) आणि अदारंग (फ़िरोज़ खान) यांच्यामुळे. त्यामुळे ज्यांना तानसेनाची गाण्याची पद्धत कोणती होती हे ऐकायचं असेल तर डागर किंवा गुंदेचा बंधूंचा ध्रुपद ऐकावा. आता हा ध्रुपद देखिल अनेक स्थित्यंतरांमधून गेला असणार नक्कीच, पण निदान त्यातल्या त्यात कल्पना येईल. तानसेन गात असलेल्या रचना बहुधा देव-देवतांच्या स्तुतीपर होत्या. क्वचित त्याकाळी ध्रुपदात राजाची स्तुती देखिल होत असे.
अकबराच्या दरबारात तानसेन म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर मुघले आज़म मधला पृथ्वीराज कपूरसारखा दिसणारा वयोवृद्ध अकबर आणि समोर तानपुरा घेऊन बसलेला तरणाबांड तानसेन - असं चित्र उभं राहतं. परंतु गम्मत म्हणजे वयांच्या बाबतीत खरी परिस्थिती नेमकी उलटी होती. सांगतो कसं ते. तानसेन हा राजा रामचंद्रसिंहाकडून दिल्लीला अकबराकडे आला ते १५६२मध्ये. म्हणजे त्याचं जन्मवर्ष १५०० मानलं तर तानसेनाची वयाची साठी उलटून गेली होती आणि सम्राट अकबर तेव्हा केवळ २० वर्षांचा कोवळा पोरगा होता! अकबराला गादीवर येऊन अवघी ६ वर्षं झाली होती. रामचंद्रसिंह आणि अकबर साधारण एकाच वयाचे. असं म्हणतात की ते लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. तानसेनाची कीर्ती ऐकून अकबराने रामचंद्रसिंहाकडे तानसेनाला दिल्ली दरबारात पाठवण्याबद्दल मागणी केली. त्यावेळी तानसेन, म्हणे काहीश्या नाखुशीने, दिल्लीस जाण्यास तयार झाला. राजाने तानसेनासोबत अनेक कीमती नजराणे देखिल दिल्लीस पाठवले. 'आईने अकबरी'मध्ये असा उल्लेख आहे (हा ग्रंथ अकबराच्या आईने लिहिलेला नसून अबुल फज्ल् याचा आहे) की तानसेनाच्या पहिल्याच मैफिलीवर खूश होऊन अकबराने त्याला २ लाख रुप्ये दिले! त्यावेळी एका रुपयात साधारण ९० किलो गहू येत असत (पहा: अकबर दि ग्रेट मुघल, व्हिन्सेंट आर्थर स्मिथ). यावरून तानसेनाच्या झालेल्या या सन्मानाची, किंबहुना त्या किमतीच्या अतिप्रचंडतेची कल्पना यावी!
अकबराने तानसेनाचा समावेश त्याच्या नवरत्नांमध्ये केला. शिवाय त्याला 'मियाँ' हा किताब दिला, ज्याचा अर्थ 'प्राज्ञ' असा ढोबळमानाने करता येईल. तानसेनाने निर्मिलेले अनेक राग त्यामुळे 'मियाँ की - ' अश्या नावांनी ओळखले जातात, उदा. मियाँ की तोडी, मियाँ की सारंग, मियाँ मल्हार. या शिवाय दरबारी कानडा या रागाचा जन्मदाता देखिल तानसेनालाच मानले जाते. तो राग अकबराकडे येण्यापूर्वीचा आहे काय? काही कळायला मार्ग नाही. वयाचा केवळ उत्तरार्ध अकबराकडे घालवला असला तरी तीच तानसेनाची इतिहासात ओळख बनली. अकबर आणि तानसेनाच्या अनेक आख्यायिका निर्माण झाल्या. एका आख्यायिकेनुसार दिल्लीत अनेक गायक रात्रंदिवस गळा काढून तानसेनाला त्रास देत असत. त्यामुळे तानसेनाचं रियाजात लक्ष लागे ना. त्यावर चिडून अकबराने एक वटहुकूम काढला आणि दिल्लीत तानसेन सोडून बाकीच्यांना सराव-बंदी केली. पुढे बैजू बावराने तानसेनाला दरबारात आव्हान देऊन हरवलं आणि अकबराला ती बंदी उठवायला भाग पाडलं. एका आख्यायिकेनुसार अकबरला स्वामी हरिदासांचं गाणं ऐकण्याची इच्छा झाली, पण ते दरबारात गात नसल्यामुळे तानसेन अकबराला वेश बदलून घेऊन वृंदावनला त्यांच्या आश्रमात गेला. तिथे त्यांचं गाणं ऐकल्यावर अकबराला तानसेनाचं गाणं तेवढं गोड वाटेना. त्याचं कारण त्याने विचारलं असता तानसेन म्हणाला की मी तुम्हाला खूश करण्याकरिता गातो, तर ते केवळ स्वानंदासाठी (काही गोष्टींनुसार - ईश्वरासाठी) गातात. तानसेनाने दीप राग आळवून दिवे चेतवले, किंवा मेघ मल्हार गाऊन पाऊस पाडला - या सर्व कथा ह्याच काळाबद्दल आहेत.
तानसेनाचा विवाह अकबराची मुलगी मेहरुन्निसा हिच्यासोबत झाला. जहांगीरनाम्यात म्हटलं आहे की अकबराने तानसेनास तत्पूर्वी धर्म बदलण्यास भाग पाडलं. त्या आधी त्यास बहुधा एक हिंदू पत्नी होती. तानसेनाची सर्व मुले व मुलगी (सरस्वती देवी) संगीतकार झाले. संगीतसार, रागमाला आणि श्रीगणेशस्तोत्र हे ग्रंथ तानसेनाने निर्मिल्याचं मानलं जातं. तानसेनाचा मृत्यू १५८६मध्ये झाला. असं म्हणतात की त्या दु:खामध्ये त्याचा मुलगा बिलासखान जे गायला, तो राग पुढे बिलासखानी तोडी म्हणून ओळखला गेला. तानसेनाचा दुसरा मुलगा हमीरसेन याच्या नावाने राग हमीर देखिल प्रसिद्ध आहे (मधुबन में राधिका नाचे रे - हे त्या रागावर आधारित आहे). तानसेनाची अंतिम क्रियाकर्मे कोणत्या पद्धतीने झाली याबाबतीतही दुमत आहे. अनेकांच्या मते ती मुस्लिम पद्धतीने झाली तर काहींच्या मते हिंदू पद्धतीने. तानसेनाची समाधी ग्वाल्हेरला महम्मद घौस यांच्या समाधीजवळच बांधण्यात आली. तिथे दर वर्षी 'तानसेन समारोह' भरवला जातो.
जन्मापासून मृत्यूपर्यंत, शिवाय त्या नंतरही अनेक आख्यायिकांच्या गदारोळातून तानसेनाचं खरं आयुष्य यापैकी नक्की काय हे शोधून काढणं खरंच कठीण आहे. पण तानसेन हे नाव आज सर्वतोमुखी आदरानं घेतलं जातं, त्याने तयार केलेल्या प्रचंड ताकदीच्या पायावर आज शास्त्रीय संगीताचा डोलारा उभा आहे, हे तितकंच सत्य आहे. स्वतःचं खरं नाव गायब असूनही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या टोपणनावाचा ठसा इतिहासावर उमटवणार्या ह्या व्यक्तीची स्मृती ४-५ शतकांनंतर अजूनही कायम आहे, ह्याला कुठल्या पुराव्याची गरज नाही.
- शंतनु
तळटीपा:
- सर्व चित्रे विकीपिडियाच्या सौजन्याने
- लेख इतरत्र प्रकाशित
प्रतिक्रिया
1 Jun 2020 - 8:30 am | कंजूस
मजेदार.
त्याच्यासाठी बांधलेला महाल फतेपूर शिकरीमध्ये दाखवतात म्हणजे तानसेन हे मोठे प्रस्थ होतं.
2 Jun 2020 - 4:19 am | पुष्कर
तानसेन हे मोठं प्रस्थ होतं ह्यात शंकाच नाही. आभार!
1 Jun 2020 - 1:46 pm | अनिंद्य
ऐसो रसिक भयो न भूमंडल आकाश .... हरिदासांबद्दल असले तरी तानसेनला तेव्हढेच लागू आहे.
छान लेखन ! ध्रुपद गायकीचा संदर्भ योग्य आणि विशेष.
2 Jun 2020 - 4:17 am | पुष्कर
बरोबर. कथांप्रमाणे असं वाटतं की हरिदास हे कुठल्याही दरबारात गायले नसल्यामुळे राजाश्रया-अभावी त्यांची कीर्ती तानसेनाएवढी पसरली नसावी.
प्रतिसादाबद्दल आभार!
1 Jun 2020 - 2:10 pm | कानडाऊ योगेशु
आणि
काही मेळ लागत नाही. अकबराचा तानसेनाला भेटल्यावर लगोलग विवाह झाला असे जरी समजले तरीही त्याच्या मुलीचा विवाह साधारण त्या काळातल्या प्रथेप्रमाणे मुलीच्या दहाव्या वर्षी झाला असावा म्हणजे तानसेन तव्हा सत्तरीत असेल. आणि जरठ-बाल विवाह ही प्रथा हिंदुंची. मुस्लीमांत पण होत होते का असे विवाह?
ह्यापेक्षा तानसेनाच्या मुलीचा अकबराशी विवाह झाला असे झाले असेल तर तर पटण्यास योग्य आहे.
तरीही मला वाटते संभाजी राजांना धर्मपरिवर्तनासाठी जसे औरंगजेबाने स्वतःच्या मुलीशी विवाह करण्याची लालूच दाखवली होती तसा प्रकार तर इथे नसावा?
2 Jun 2020 - 4:14 am | पुष्कर
तुमचं बरोबर आहे. हा घोळ आहे खरा. तानसेनचा सासरा त्याच्यापेक्षा ४० वर्षांनी लहान असेल तर बायको साधारण ६० वर्षांनी लहान असावी आणि त्यामुळे विवाह झालाच असेल तर तो तानसेनच्या आयुष्याच्या शेवटच्या १० वर्षात कधीतरी झाला असेल, हा तुमचा हिशेब बरोबर आहे. त्या काळी राजकीय फायद्यासाठी काही विवाह होत असत. परंतु ह्यात अकबराचा फायदा काय हे ही समजत नाही. त्यामुळे त्या विवाहाच्या उल्लेखात कितपत तथ्य आहे, ह्या शंकेला वाव आहे.
2 Jun 2020 - 2:20 am | वीणा३
मजेशीर पण माहितीपुर्ण लेख, आत्तापर्यंत फक्त तानसेन हे नावच ऐकलं होतं, लेखामुळे बरीच जास्त माहिती मिळाली.
2 Jun 2020 - 4:18 am | पुष्कर
धन्यवाद वीणा३
2 Jun 2020 - 8:31 am | शेखरमोघे
छान लेख - तानसेन बद्दल इतकी माहिती अजूनही अनिश्चित आहे ही कल्पना नव्हती.
5 Jun 2020 - 11:39 am | पुष्कर
धन्यवाद
3 Jun 2020 - 12:06 pm | चौकटराजा
उत्तर भारतीय शास्त्रीय सगीताची गोडी लागून आता ५० वर्षे झाली तरी तानसेन यान्च्याबद्द्ल ही अशी व्यक्तीगत माहिती मिळाली नव्हती . माहिती रन्जक आहे ! धन्यवाद !
5 Jun 2020 - 11:40 am | पुष्कर
तुमच्या शा सं गोडीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त शुभेच्छा! :)
आणि आभार.
3 Jun 2020 - 12:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तम माहितीपूर्ण लेखन आवडले.
-दिलीप बिरुटे
3 Jun 2020 - 12:44 pm | मूकवाचक
+१
5 Jun 2020 - 11:40 am | पुष्कर
बिरुटे आणि मूकवाचक, आपले आभार
3 Jun 2020 - 8:16 pm | तुषार काळभोर
या निमित्ताने पहिल्यांदा पंडित भीमसेन जोशी यांचं भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ऐकलं. सुंदर गाणं आहे.
शास्त्रीय संगीतातले काही कळत नसले तरी काही वेळा ऐकायला छान वाटतं.
5 Jun 2020 - 11:42 am | पुष्कर
संगीताची पद्धत/भाषा यापलिकडे जाते ती कला आणि त्यातल्या तांत्रिक बाबींशिवाय आस्वाद घेऊ शकतो तो रसिक.
5 Jun 2020 - 11:58 am | कानडाऊ योगेशु
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा मध्ये नंतर येणार्या ध्रुपदात सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा असे येते. हा बदल स्वतः भीमसेन जोशींनी केला आहे असे वाचले होते बहुदा.
11 Jun 2020 - 10:30 am | पुष्कर
बरोबर. हे माहित नव्हतं.
1 Feb 2025 - 11:59 am | पुष्कर
आमचे निम्मे नातेवाईक कन्नडिगा आहेत आणि माझ्या बर्याच काकवा आणि आत्या ह्या गाण्याची पारंपरिक चाल गातात. माझ्य लग्नात बायको घरी येताना (लक्ष्मीपूजन) तिचं स्वागत सगळ्या जणींनी ती पारंपरिक चाल म्हणून केलं होतं आणि त्यात "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, नम्मम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा" अश्याच ओळी होत्या. पुढे मी चित्रा, सुब्बलक्ष्मी इत्यादींनी गायलेलं हे ऐकलं आणि त्यातही हेच शब्द आहेत.
1 Feb 2025 - 3:37 pm | कर्नलतपस्वी
अप्रतिम गायिका आर्या आंबेकर हिने सुद्धा खुपच अप्रतिम गायले आहे. दुसऱ्या ओळीत ती सौभाग्यदा गाते.
11 Jun 2020 - 11:06 am | रातराणी
छान माहितीपूर्ण लेख. आवडला.
14 Jun 2020 - 9:16 am | पुष्कर
आभार, रातराणी!
14 Jun 2020 - 2:10 pm | दादा कोंडके
माहिती रंजक.
28 Oct 2020 - 1:36 pm | पुष्कर
आभारी आहे, दादा कोंडके.