सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श
सुम्या(सुमती) आणि गुरूनाथ ह्यांच्या इरसाल आंघोळींच्या आठवणी.
सुम्या आणि गुरूनाथ हे एकमेकाचे शेजारी.आळीच्या घरात रहायचे.त्यामुळे सामाईक भिंत होती.मागील परीसरात पण सामाईक गडगा होता.दोघांमधे बावही सामाईक होती.बाव घरापासून थोडी दूर होती.
टाककरांची सुम्या आणि केसकरांचा गुरूनाथ एकुलती एक मुलं.ल्हानपणी लपंडाव,लंगडी खोखो हे त्यांचे नेहमीचे खेळ असायचे.जवळपासच्या मित्रांना सामील करून खेळायचे. कधी कधी दोघंच असताना घरात बसून सोंगट्याचे (घुल्यांचे) खेळ खेळायचे.
दोघांच्याही परसात माडाची मोठी झाडं,कवाथे,फणसाची झाडं होती.गुरूनाथाकडे एक सोनचाफा होता.