लंडनवारी - भाग १ - पूर्वतयारी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
29 Sep 2016 - 7:38 am

लंडनवारी: पूर्वतयारी

ब्लॉग दुवे: पूर्वतयारी

चला! तयारी होत आलेली आहे. अनेक वर्षांपासूनचा लांबणीवर पडलेला बेत आता प्रत्यक्षात येतोय. लंडनवारी उद्यावर येऊन ठेपलेली आहे...

झालं असं, की एप्रिल २०१६ मधे मुलाचा पहिला वाढदिवस होता. टिपिकल गोष्टींशी नेहमीच माझं वावडं असतं त्यामुळे मुलाचा वाढदिवस त्याला अपवाद नव्हताच. मग एक कल्पना मनात आली की वाढदिवसाची भेट म्हणून मुलाला एखादी गोष्ट देण्यापेक्षा एखादा स्प्लेंडिड 'एक्स्पिरियन्स' द्यावा. त्याला कुठेतरी घेऊन जावं असं वाटलं. तसे इथेतिथे बरेच भटकत असतो आम्ही त्याला घेऊन, आणि तोही पक्का भटक्या असल्यासारखा बाहेर जायचं म्हटलं रे म्हटलं की टुण्णकन हातातलं खेळणं टाकून उभा राहतो. तर मग कुठे जावं? हा प्रश्न होता. अभयारण्य, किल्ला, समुद्र, इत्यादींचा विचार करता करता 'लंडन!' असा ग्रँड विचार मनात आला आणि त्याने व्यापलंच मला जवळजवळ. इथवर मी एकटाच या विचाराचा मानकरी होतो.

पुढे मग अपेक्षेनुसार अनेक जर-तर-असंकसं-कसंकाय चे अडथळे पार करत हा विचार प्रत्यक्षात येणार असं ठरलं. अर्थात, अगदी वाढदिवशी नाही तरी थोडं नंतर ते होणार होतं. फिरायला जायचं म्हटलं की भानच उरत नाही मला. त्यामुळे मग दररोज ट्रॅव्हल साइट्स वर शोधाशोध व्हायला लागली. मुंबई लंडन. तीन वर्षापूर्वीपेक्षा नक्कीच वाढलेले असले तरी तिकिटांचे दर आकर्षक होते, त्यामुळे हुरूप वाढला. तसा वाढदिवसाच्या निमित्ताने हा विचार आला असला तरी या दौर्‍यामुळे अनेक गोष्टी जुळून येत होत्या. अनेक वर्षापासूनचा लांबणीवर पडलेला हा लंडन दौरा, तीन-एक वर्षापूर्वी अगदी ठरल्यात जमा झाला होता, परंतु मग बारगळला तेंव्हा फार हळहळ वाटली होती. आता ती वाटेनाशी होत होती.

मुलाचा पासपोर्ट काढण्याचा अनुभव अतिशय उत्तम होता. एक उन्हात रांगेत उभं राहणं सोडलं तर बाकी प्रक्रिया इतकी पटापट व पद्धतशीर झाली की काय सांगावं! टीसीएस ला हे काम दिल्यापासून नक्कीच ही यंत्रणा खूप सुधारली आहे असं आता स्वानुभवातून सांगता येईल. पुढची पायरी व्हीजा ची होती. तिथेही अतिशय छान व निर्विघ्न काम झालं. युएस व्हीजा ला मिळालेली भिकार्‍यासारखी वागणूक आठवणीत होती परंतु इथे फारच सौजन्य अनुभवायला मिळालं. अर्थात युके व्हीजा चं कार्यालय असलं तरी भारतीय कर्मचार्‍यांच्या वागण्यात मात्र काही बाबतीत भारतीयांचा कॉपीराइट असलेला अव्यवस्थितपणा दिसतोच. तरीही तो दुर्लक्षिण्याइतका कमी होता हे मात्र खरं.

एव्हाना तिकिटांचे भाव मात्र आकाशाकडे झेपावत होते. मग त्याबाबतीतही बरंच संशोधन केलं. काही मतं अशी होती की विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर तिकिटं ट्रॅव्हल कंपन्यांच्या संकेतस्थळांहून स्वस्त मिळतात. शिवाय विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर दिसणार्‍या विमानसेवा इतर संकेतस्थळांवर दिसत नाहीत, थोडक्यात तिथे एक्सक्लूजिव्ह फ्लाइट्स असतात. कुठल्या दिवशी, कुठल्या वेळी तिकिटं बुक करता त्यावरही उपलब्धता, व दर अवलंबून असतात असंही ऐकलं. तसेही प्रयत्न केले. रात्री तीन वाजता उठून किमती बघणं इत्यादी. या आगोदरच्या परदेश प्रवासात इतकी मेहनत घेतली नसल्याने हे माझ्यासाठीही नवीन होतं. थोडाफार फरक नक्कीच असतो तिकिट दरात व त्या किमतीत मिळणार्‍या सेवांच्या यादीत; पण काही विशेष नाही अशा निष्कर्षावर पोचलो. अपेक्षित नव्हतं, पण एक कार्यालयीन अडथळा यायचा होता. तेच ते; रजा न मिळणं. भरपूर आगोदर दिलेली सूचना, आजवरचा कामाच्या नियोजनाचा आलेख हे सगळं जमेस असूनही खुसपटं काढली जातात तेंव्हा डोकं फिरतं. पण असो. तर त्यामुळे बेत काही दिवस पुढे ढकलण्यात आला.

मग खरा रोचक भाग सुरू झाला. माहितीचं संकलन. काय बघावं, काय टाळावं, काय खावं, कुठे काय विकत घ्यावं हे सगळं वाचणं अनेकदा प्रत्यक्ष प्रवासापेक्षाही आनंददायी असतं. ते चालू होतंच, आणि त्यासोबत एक महत्वाची गोष्ट चालू होती; खरेदी! प्रवासाला जायच्या उत्साहाच्या भरात अनेकदा 'होऊदे खर्च!' तत्व अवलंबलं जातं. त्यामुळे होणारा 'वॉलेट लॅग' प्रवासानंतरही अनेक दिवस त्रास देतो. पण प्रवास म्हणजेच मुळी वीक पॉइंट असल्यामुळे तोही सह्य असतो. त्यामुळे उष्ण कपडे, 'कूल' कपडे, इत्यादी सर्व खरेदी झाली. बॅगा भरल्या. आता उड्डाण तेवढं बाकी आहे. 'मिमा.....' (म्हणजे बोबड्या बोलात 'विमान') असं आत्ता म्हणताना होणारा मुलाचा चेहरा आम्ही बघतोय आणि आता प्रत्यक्ष प्रवासात, आणि तिथे गेल्यावर त्याच्या चेहर्‍याची खुलणारी कळी कशी दिसेल ते बघायची उत्सुकता आहे.

सो, लंडन; हिअर वी कम...

1

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 8:57 am | टवाळ कार्टा

अरे वा, प्रवासाला शुभेच्छा

अजया's picture

29 Sep 2016 - 9:30 am | अजया

मस्त. पुभाप्र

आदूबाळ's picture

29 Sep 2016 - 11:08 am | आदूबाळ

हायला! ये बात!

नाखु's picture

29 Sep 2016 - 11:49 am | नाखु

तिकडची भवानी (तलवार फक्त) नक्की पाहून येणे.

प्र्वास वर्णन अपेक्षीत आहे,टक्याला फोटो सापडेनात का कुठ्ल्याही फोटोत नेमका टक्क्याच नाही म्हणून लिहिना तेच कळत नाहीये.
(टक्या हलके घे रे बाबा नाहीतर बाजार उठवायचास माझा)

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 12:03 pm | टवाळ कार्टा

मला नाही सापडली, ५ मुख्य म्युजियम्समध्ये ५ दिवस फिरलेलो त्यासाठी

पोराच्या पहिल्या बड्डेला मराठी माणूस तोहि आपल्यातला, चक्क लंडन ट्रीप अ‍ॅरेंज करतोय हे वाचल्यावर उर अभिमानाने भरुन आला.
बडे लोगा, बडी बाते.

सुहास बांदल's picture

29 Sep 2016 - 5:53 pm | सुहास बांदल

स्वागत !! काही पण मदत लागली तर बिनधास्त सांगा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2016 - 6:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरुवात ! पुभाप्र.

स्रुजा's picture

29 Sep 2016 - 6:26 pm | स्रुजा

क्या बात वेल्लाभट. पंचेस आवडले.. कुल कपडे, वॉलेट लॅग.. सहीच :) टका सारखं करु नकात. वर्णनं आणि फोटो नक्की टाका ;)

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 6:50 pm | टवाळ कार्टा

मी काय क्येलं?

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 6:59 pm | संदीप डांगे

तू काही केलं नाहीस म्हणून तर लोक तुला बोलत्यात..

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 7:17 pm | टवाळ कार्टा

एक म्हणते काहीतरी केलं....तुम्ही म्हणताय काही नाही केले...चायला

तू फक्त झायिरात केलीस जायची, फोटो कुठायेत? वर्णन तर तू नाही करणार ( ते टिंब धाग्याव्रुन आलंय लक्षात :प)

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 8:04 pm | टवाळ कार्टा

खिक्क...वर्क इन प्रोग्रेस्स

रेवती's picture

29 Sep 2016 - 6:30 pm | रेवती

सुरुवात आवडली.

पद्मावति's picture

29 Sep 2016 - 6:33 pm | पद्मावति

सुंदर सुरुवात.

पिलीयन रायडर's picture

29 Sep 2016 - 7:53 pm | पिलीयन रायडर

भारी आयडीया! मी पण नवर्‍याला म्हणलं होतं की उगाच मुंज वगैरे निरर्थक गोष्टीवर लाखो खर्च करण्यापेक्षा एखाद्या नव्या देशात नेऊन आणु मुलाला.

झक्कासच!

अभिदेश's picture

29 Sep 2016 - 8:22 pm | अभिदेश

मस्त. फक्त लंडन कि यु.के. मध्ये अजून कुठे फिरणार आहात , म्हणजे इंग्लंड सोडून. वेळ असल्यास स्कॉटलंड ला जाऊन या. वेल्श हि सुंदर. अगदी इंग्लंड मध्येसुद्धा लेक डिस्ट्रिक्ट बघण्यासारखे. भरपूर फिरा आणि महत्वाचे म्हणजे अनुभव कथन/लिखाण करा.

शुभेच्छा, वेल्लाभट! आता रियल टाईम फोटो/व्हिडिओ ब्लॉग लिहा कुठे कुठे फिरताय आणि काय अनुभवताय त्याचा.

सिरुसेरि's picture

30 Sep 2016 - 2:18 pm | सिरुसेरि

शुभेच्छा . छान लेख . ओ हेन्रिची आपल्या मुलाच्या वाढदिवसाला ट्रॅफिकजाम बुक करणा-या वडिलांची कथा आठवली .

बाळापेक्षा बाळाचे आई बाबाच लंडन सहलीत अधिक मज्जाच करणार, हे नक्की =)) बाळ आपला नेतील तिथे जाणार, सभोवताली टूकूटुकू बघणार, भूक लागली की खाणार आणि इतर वेळात झोप वगैरे कार्यक्रम उरकणार. बाळाचे आपले नाव उगीच!! =))

मज्जार करावा आणि वृ अधिक फोटो येउद्यात!

किसन शिंदे's picture

1 Oct 2016 - 10:17 am | किसन शिंदे

+१

विशाखा राऊत's picture

1 Oct 2016 - 2:45 am | विशाखा राऊत

जोरदार सुरवात :) वेलकम

फारएन्ड's picture

1 Oct 2016 - 6:01 am | फारएन्ड

शुभेच्छा! अजून लिही जमेल तसे.

माझे रेकोज - लॉर्ड्स, वेस्टमिन्स्टर ब्रिज, ओव्हल (शनिवारी टूर असते, नाहीतर मॅच असेल तर तिकीट काढून जाण्याचा ऑप्शन असतोच), ब्रिटिश म्युझियम, लंडन आय, चेंज ऑफ गार्ड्स, ट्राफलगार स्क्वे., टॉवर ऑफ लंडन्/क्राउन ज्युवेल्स, वेस्टमिन्स्टर समोरची पुतळे असलेली बाग. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उन असेल तर वेस्टमिन्स्टर, व्हाइटहॉल, ट्राफलगार वगैरे भागातून चालत फिरणे. तसेच अंडरग्राउण्ड घेउन लहानपणापासून नुसती ऐकलेली चेरिंग क्रॉस, बेकर स्ट्रीट, पिकॅडीली, लंडन ब्रिज वगैरे स्टेशने बघून येणे.

तू फुटबॉल वालाही असलास तर त्याचे प्लॅनिंग केले असशीलच.

रुपी's picture

1 Oct 2016 - 6:11 am | रुपी

छान सुरुवात!