आमार कोलकाता - भाग २

Primary tabs

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
24 Sep 2019 - 11:42 am

लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :-
http://www.misalpav.com/node/45320

आमार कोलकाता - भाग २

झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई. ‘व्यापारी’ म्हणून आलेल्या इंग्रजांनी भारतात 'शासक' म्हणून पाय रोवायला कारणीभूत ठरलेली ही लढाई. ह्या लढाईचा कोलकात्याशी महत्वाचा संबंध असल्यामुळे त्याबद्दल थोडे :-

जुनी शहरं म्हणजे एखादा किल्ला, लष्करी छावण्या आणि त्यालगत व्यापारी-निवासी पेठा. जगातील सर्व जुन्या शहरांचे स्वरूप साधारणतः असेच आहे. वर्ष १६९६ ते १७०० ह्या कालावधीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकात्यात फोर्ट विल्यम हा किल्ला आणि व्यापारी वखार बांधली. कंपनीकडे स्वसुरक्षेसाठी असलेले सैन्यदल ह्या भागात राहायला आले. त्याच सुमारास हुगळीच्या दुसऱ्या काठावर 'अर्मेनिया' ह्या देशातून आलेल्या व्यापाऱ्यांनी वस्ती केली. अर्मेनियन व्यापाऱ्यांना भारत नवा नव्हता, ते मोगल बादशाह अकबराच्या काळापासून भारतात व्यापार करत होते. कोलकात्याला येण्याआधी आग्रा, दिल्ली, सुरत अशा शहरात अर्मेनियन व्यापाऱ्यांचा बऱ्यापैकी जम बसलेला होता.फोर्ट विल्यम आणि त्यालगतच्या वखारींचे एक चित्र

त्यावेळी बंगाल प्रांताची राजधानी होते मुर्शिदाबाद (आणि त्याहीआधी जहांगीरनगर /ढाका). मोगल काळापासून बंगाल प्रांत श्रीमंत गणला जाई. तत्कालीन बंगालचा आकारही अवाढव्य होता - आजचा बंगाल, बांगलादेश, बिहार, आसाम आणि ओरिसाचा काही भाग मिळून 'बंगाल सुभा' आणि सुमारे ७ लाख लोकवस्तीचे मुर्शिदाबाद शहर सुभ्याची राजधानी अशी रचना. मोगलांचा प्रतिनिधी बंगालचा नवाब मुर्शिदाबाद शहरातून राज्यकारभार हाकत असे. मोठे शहर असल्यामुळे डच, अर्मेनियन, फ्रेंच आणि मारवाडी व्यापारी तिथे आधीच होते. त्यात इंग्रजांची भर पडली.

अन्य व्यापाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाकांक्षी असलेल्या इंग्रजांनी बंगाल आणि एकूणच भारतीय पूर्वकिनाऱ्यावर व्यापारविस्तारासाठी एका नावाजलेल्या अर्मेनियन व्यक्तीची मदत घेतली. त्याचे नाव खोजा इझ्राएल सरहद. एक श्रीमंत व्यापारी आणि दानशूर व्यक्ती म्हणून तो प्रसिद्ध होता. मोगलांच्या विलासी राहणीला अनुकूल असे जिन्नस खास आयात करून ते मोगल दरबारी विकणे हा त्याच्या कामाचा भाग होता. ह्यामुळे मोगल दरबारातील अमीर-उमराव आणि मोगल शहजाद्यांशी त्याची जवळीक निर्माण झाली. त्याचे मोगलांशी संबंध इतके प्रगाढ होते की बंगाल प्रांतात व्यापारवृद्धीची इच्छा धरून असलेल्या ब्रिटिशांनी खोजा सरहदलाच आपला दूत म्हणून मोगल दरबारात रदबदली करण्याची गळ घातली. १६९८ च्या सुरवातीला ब्रिटिशांचा विशेष दूत म्हणून सरहद तत्कालीन मोगल बादशहा अझीम-ऊस-शानला (औरंगझेबाचा नातू) भेटला आणि ब्रिटिशांना हुगळी येथे वखार स्थापन करून भारतात व्यापार करण्याची मुभा देणारे शाही फर्मान त्याने मिळवले. मदतीची परतफेड म्हणून ब्रिटिशांनी नवीन वसवलेल्या कोलकाता शहरात सरहदला व्यापार वाढवण्यासाठी पूर्ण मोकळीक आणि सहकार्य देऊ केले. ब्रिटिश व्यापाऱ्यांना मिळालेल्या 'फर्माना'नुसार त्यांना बंगाल सुभ्यात जकातमुक्त व्यापार करता येणार होता. पुढची पन्नास वर्षे जकातमुक्त व्यापारामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांनी भरपूर पैसा कमावला. बंगालच्या वैभवाला अक्षरश: ओरबाडले.

१७१७ पासून बंगालच्या नवाबांनी दिल्लीश्वर शासकांना महत्व देणे बंद करून स्वतंत्रपणे शासन करणे सुरु केले होते. ब्रिटिशांचे वाढते वैभव, त्यांच्या पगारी फौजांची सतत वाढती संख्या आणि अरेरावीचा व्यवहार बंगालच्या नवाबाला रुचत नव्हते. जकातमुक्त व्यवहाराचे फर्मान अहस्तांतरणीय होते पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अधिक लाभासाठी स्थानीय व्यापाऱ्यांनासुद्धा 'दस्तक' (परवाना) भाड्याने द्यायला सुरुवात केली. त्याने नवाबच्या महसुलाचे मोठे नुकसान होऊ लागले. नवाबाने ईस्ट इंडिया कंपनीला बंगालात सैन्य आणायला बंदी केली, ती पाळण्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सपशेल नकार दिला. लवकरच ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यांच्यात वरचेवर खटके उडू लागले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कोलकात्यात किल्ला आणि फौज असणे सुद्धा नवाब सिराजउद्दौला याला धोक्याचे वाटत होते. त्याने जून १७५७ मध्ये कोलकात्याच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि फोर्ट विल्यम ताब्यात घेतला. ह्या कृतीमुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी निर्णायक लढाई लढली - प्लासीची लढाई. रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वात ब्रिटिश सैन्याने नवाब सिराजउद्दौलाचा सपशेल पराभव केला. नवाबाचा फितूर सहकारी ‘मीर जाफर’ याला कळसूत्री नवाब म्हणून मुर्शिदाबादच्या गादीवर बसवून बंगाल सुभ्याच्या सत्तेची पूर्ण सूत्रे ब्रिटिशांनी स्वतःच्या हाती घेतली.

प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांना कोलकात्याजवळ एका मजबूत सैनिक ठाण्याची गरज जाणवली. नवीन फोर्ट विल्यमचा विस्तार आणि आजच्या 'बराक' भागाचे बांधकाम ह्याचवेळी अस्तित्वात आले. लॉर्ड क्लाइव्हने लढाई संपल्याबरोबर ह्या बांधकामासाठी कॅप्टन जॉन ब्रॉहीअर ह्या वास्तुविशारदाला कामाला लावले. ब्रॉहीअरने नवीन अष्टकोनी फोर्ट विल्यमच्या आरेखनाचे आणि बजेट तयार करण्याचे काम केले. पण प्रत्यक्ष काम सुरु होण्यापूर्वी त्याच्यावर पैशाच्या अफ़रातफरीचे आरोप झाले आणि तो भारत सोडून निघून गेला. बांधकाम करून विस्तारित ठाणे स्थापन करायला १३ वर्षे लागलीत आणि सुमारे २० लाख ब्रिटिश पौंड एवढा खर्च आला.

विस्तारित 'नवीन' फोर्ट विल्यमचे एक चित्र

ह्या नवीन फोर्ट विल्यमने ब्रिटिश कोलकात्याचा चेहेरामोहरा बदलला. पंधरा हजार ब्रिटिश सैन्य आणि सुमारे १०० ब्रिटिश अधिकारी ह्या भागात राहायला आले, त्यामुळे सभोवतालच्या भागाला ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले. कोलकात्याच्या हृदयस्थळी असलेल्या ह्या भागाचे अनोखे वैशिट्य म्हणजे हिरवेकंच 'मैदान' ! एकूण क्षेत्रफळ १२०० एकर ! नगरनियोजन हे शास्त्र आहे त्यापेक्षा जास्त एक कला आहे. ब्रिटिश कोलकात्याच्या शहर नियोजनात हा कला आणि शास्त्राचा संगम सुरेख जुळून आलेला दिसतो. 'मैदान' भागाच्या भव्यतेचे मूळ फोर्ट विल्यमच्या विचारपूर्वक केलेल्या आरेखनामध्ये आहे. किल्ला प्रमुख ब्रिटिश सैनिक ठाणे म्हणून स्थापन झाला की मग त्याचे संरक्षण करण्यासाठी तोफा-बंदुका आल्या. तोफा झाडताना चुकून जीवितहानी होऊ नये म्हणून किल्ल्यासमोरचा मोठा भाग मोकळा करून तेथे मैदान योजण्यात आले आणि मैदानाच्या परिघाबाहेर अन्य वस्ती अस्तित्वात आली. ते पुढच्या सर्व राज्यकर्त्यांनी तसेच कायम ठेवले. आता त्यातील बऱ्याच भागाचे वेगवेगळ्या कामांसाठी लचके तोडल्यानंतर आजही हे मैदान भव्यच दिसते त्यात आश्चर्य ते काय ?

कोलकात्याचे सुप्रसिद्ध 'मैदान'

आजचे कोलकाता बकाल शहर नाही असे कोणी म्हणणार नाही. पण जे मूळचे कोलकाता ब्रिटिशांनी वसवले त्याचा बराच भाग अनेक दशकांच्या पडझडी आणि आबाळ-अनास्थेला तोंड देऊनही नगरनियोजनाच्या तत्त्वांनुसार आजही नियोजनबद्ध आहे, सुंदर, सौष्ठवपूर्ण आहे.

* * *

प्लासी युद्धानंतर मुर्शिदाबादचे महत्व संपुष्टात येऊन सत्तेचे केंद्र कोलकात्याला सरकू लागले. तोवर ब्रिटिश ताब्यातल्या 'बंगाल प्रेसिडेंसी'चा आकार बराच वाढला होता. काही दशकाचा काळ संरक्षण आणि व्यापारावर भर दिल्यानंतर सत्तेत स्थिरावतांना स्थानिक कारभारात आणि महसुली अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी ब्रिटिशांना स्थानिक भाषा आणि कायदे समजून घेण्याची गरज भासू लागली. तत्कालीन बंगाल सुभ्यात बहुतांश प्रदेशात शासकीय कायदे, महसूल आणि मालकीहक्क दर्शवणारी कागदपत्रे उर्दू, अरेबिक, पर्शिअन भाषेत असत. बरेचसे कायदे मौखिक असत, धर्मानुसार वेगवेगळे असत. स्थानिक पंडीत आणि मौलवी परंपरागत कायदे, धार्मिक नियम आणि सामाजिक व्यवस्था समजून घेण्यात ब्रिटिशांना मदत करत.

ब्रिटिश ताब्यातला 'बंगाल प्रेसिडेंसी'चा नकाशा

मौलवी आणि काझी यांच्याकडून स्थानिक मुस्लिम तरुणांना आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना भाषा आणि परंपरागत कायद्याचे शिक्षण देण्यासाठी लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स याच्या पुढाकाराने कोलकात्यात ब्रिटिशांनी पहिले शिक्षण केंद्र सुरु केले १७८०-८१ साली - त्याचे मूळचे जुने नाव 'मदरसा-ए- आलिया' पण ब्रिटिश सरकारी कागदपत्रात इस्लामिक कॉलेज किंवा 'कलकत्ता मदरसा' असाच उल्लेख सापडतो. १७९२ साली काशीला बनारस संस्कृत विद्यालय सुरु करण्यात आले. विद्यार्थ्यांना 'काझी' / न्यायाधीश म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देणे हा कलकत्ता मदरसाचा मुख्य उद्देश आणि उर्दू,, अरेबिक, पर्शियन या भाषांचा आणि शरिया कायद्यांचा अभ्यास असा अभ्यासक्रम. उत्तम इमारत बांधण्यात, योग्य प्रशिक्षक आणि शिक्षक नेमण्यात लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्सने पुढाकार घेतला. त्याचा परिपाक म्हणून अनेक विद्वान आणि तज्ञ प्रशासक ह्या संस्थेतून तयार झाले. पुढे दोनदा स्थलांतर झाले आणि आज ते आलिया युनिव्हर्सिटी म्हणून ओळखले जाते.

आलिया विद्यापीठ - जुनी इमारत

कलकत्ता मदरसा नंतर कोलकात्यात इंग्रजी पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या उभारणीची मालिकाच सुरु झाली. १८०० साली ब्रिटिश अधिकाऱ्यांना बंगाली भाषा शिकवण्यासाठी फोर्ट विल्यम ‘कॉलेज ऑफ कलकत्ता’ सुरु झाले. बंगाली भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा महाविद्यालयं आलीत. यथावकाश वैद्यकीय महविद्यालय, मुलकी प्रशिक्षण संस्था, कायदा शिक्षण आणि भाषांतरकरांच्या प्रशिक्षणासाठी संस्था अशी मोठी मजल कोलकात्यानं गाठली. व्यापारी आणि स्थानिक कारभार चालवण्यासाठी बंगाली भाषेची गरज ओळखून जे इंग्रजी-बंगाली शब्दकोश छापण्यात आले. १८०० ते १८५० ह्या कालावधीत अनेक प्रसिद्ध शिक्षण संस्था शहरात स्थापन झाल्या. सेरामपूर कॉलेज नुकतेच २०० वर्षाचे झाले आहे. शहरातील प्रसिद्ध स्कॉटिश चर्च कॉलेजिएट स्कूल, सेंट जोसेफ, सेंट ऍंथोनी, कलकत्ता बॉईज स्कूल, कलकत्ता गर्ल्स स्कूल, राधाकांत देब यांचे हिंदू स्कूल, लॉरेटो स्कूल, सेंट जेम्स, सेंट थॉमस अशा कितीतरी शिक्षणसंस्था शंभर ते दीडशे वर्ष जुन्या आहेत. त्यांच्या भव्य मजबूत देखण्या इमारती, तेथे शिकवणारे शिक्षक आणि शिक्षण घेतलेले कर्तृत्ववान विद्यार्थी कोलकात्याचे भूषण आहेत.

इंग्रजांनी पुढाकार घेऊन त्यांच्या पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन दिले त्यामुळे त्यांचा अपेक्षित फायदा झालाच पण हे इंग्रजी शिक्षण कोलकात्याच्या स्थानिक भद्रलोकांना फार मानवले. कोलकात्यात शिकून उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. बंगालीबरोबरच इंग्रजी भाषा आणि ब्रिटिश संस्कृती स्थानिकांनी आपलीशी केली. त्याचा फार मोठा प्रभाव कोलकाता शहरावर पडला, त्याबद्दल पुढील भागात.

(क्रमश:)

(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथालेख

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

24 Sep 2019 - 11:52 am | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

लेखमालेचा हा दुसरा भाग आज प्रकाशित केला आहे.
'अनुक्रमणिका' करण्याचे तंत्र माहित नाही, ते कृपया करावे.

अग्रीम आभार.

कंजूस's picture

25 Sep 2019 - 7:28 pm | कंजूस

अनुक्रमणिका
करण्यास सोपे जावे म्हणून सुचवतो की पुढचा तिसरा भाग 'जनातलं मनातलं' या सदरात न लिहिता 'भटकंती' सदरात लिहा. तिथे त्या सदरात लेखास संपादन बटण मिळेल. लेखमालिकेतील भाग येतील तशा त्याच्या लिंकस तुम्हालाच टाकून अनुक्रमणिका करता येईल.

संपादक / सा सं नी अनुक्रमणिका करून देऊ असे कळवले आहे, आता चिंता नाही.

कुमार१'s picture

24 Sep 2019 - 1:07 pm | कुमार१

देखील सुंदर व नीटनेटका झाला आहे.
छान माहिती व फोटो.
पु भा प्र

जव्हेरगंज's picture

25 Sep 2019 - 2:46 pm | जव्हेरगंज

तुमच्या व्हिडीओवरून एक कल्पना सुचली आहे, मालिका संपल्यावर तुम्हाला थोडा त्रास देणार आहे.

जव्हेरगंज's picture

26 Sep 2019 - 6:22 pm | जव्हेरगंज

जरूर!!!

लोहा गरम है, मार दो हतोडा ;)

जॉनविक्क's picture

24 Sep 2019 - 2:19 pm | जॉनविक्क

पुभाप्र

जालिम लोशन's picture

24 Sep 2019 - 3:34 pm | जालिम लोशन

ऊत्तम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2019 - 7:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर भाग ! बंगालच्या इतिहासामधील अनेक बारकावे कळत आहेत. पुभाप्र.

उपेक्षित's picture

24 Sep 2019 - 8:29 pm | उपेक्षित

वाचतोय.

सुधीर कांदळकर's picture

25 Sep 2019 - 7:45 am | सुधीर कांदळकर

तपशील भरपूर असले तरी रंजक लिखाण आणि आकर्षक मांडणी. आवडले. पुभाप्र., धन्यवाद.

प्रचेतस's picture

25 Sep 2019 - 8:31 am | प्रचेतस

हा भागही खूप आवडला.

प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल आणि आसाम गिळंकृत केला ह्या घटनेचे प्रतिकात्मक शिल्प पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेले आहे.
आसामचे प्रतिक असलेल्या एकशिंगी गेंड्याला इंग्लिश सोजिरांनी साखळदंडाने बांधलेले आहे.

a

नि३सोलपुरकर's picture

25 Sep 2019 - 10:51 am | नि३सोलपुरकर

धन्यवाद प्रचेतस .
_/\_.

अनिंद्य's picture

26 Sep 2019 - 10:48 am | अनिंद्य

@ प्रचेतस,

तत्कालीन पुण्यात बंगाल-आसामातील घटनेचे असे पडसाद ! भारीच.
'सोजिरांनी' शब्द फक्त जुन्या मराठी पुस्तकात वाचला याआधी.

तुमच्या खजिन्यातून सुयोग्य शिल्पचित्र टाकल्याबद्दल आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2019 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतिहासाचा वर्ग संपला. आजचाही भाग माहितीपूर्ण.
वाचतोय.

-दिलीप बिरुटे

अनिंद्य's picture

26 Sep 2019 - 10:43 am | अनिंद्य

बिरुटे सर,
३२५ वर्षाच्या शहराबद्दल सांगायचे आहे, त्यातून इतिहास आवडीचा विषय.
गाडी जास्त रेंगाळते इथे :-)

हा भाग सुद्धा भारी.. लेखमाला खूप छान असणार..

यशोधरा's picture

25 Sep 2019 - 3:06 pm | यशोधरा

छान लिहिताय. वाचते आहे..

कोमल's picture

25 Sep 2019 - 6:34 pm | कोमल

हा पण भाग छान.

पुभाप्र

कोलकाता जावंसं वाटू लागलं आहे. फोटो सुरेख .

राजे १०७'s picture

25 Sep 2019 - 8:01 pm | राजे १०७

लेख आवडला. छोटा वाटला. मोठे भाग येऊ द्या.

अनिंद्य's picture

26 Sep 2019 - 10:39 am | अनिंद्य

@ राजे १०७

आभार.

एका संपादक मित्रानी सांगितल्याबरहुकूम मालिकेतील प्रत्येक लेख साधारण १२०० ते १३०० शब्द आणि जास्तीतजास्त ७ फोटो एवढा ठेवला आहे. त्यापेक्षा मोठे भाग कोणी वाचत नाही असे या मित्राचे मत आहे.

अनिंद्य's picture

26 Sep 2019 - 4:03 pm | अनिंद्य

@ कुमार१
@ जॉनविक्क
@ जालिम लोशन
@ डॉ सुहास म्हात्रे
@ उपेक्षित
@ सुधीर कांदळकर
@ पिंगू
@ यशोधरा
@ कोमल
@ कंजूस

तुम्हां सर्वांनी लेखन आवडल्याची पावती दिलीत, आभारी आहे.
तुमच्या प्रतिसादांमुळे पुढे लिहीत राहण्याचा उत्साह वाटतो. _/\_

सुंदर लेख, कोलकताबद्दल कायमच एक आकर्षण वाटत राहिलं आहे. कारण माहीत नाही.. पुभाप्र...

अनिंद्य's picture

28 Sep 2019 - 4:45 pm | अनिंद्य

@ सान्वी,
थँकयू !

बबन ताम्बे's picture

28 Sep 2019 - 7:15 am | बबन ताम्बे

नकाशावरून दिसते की बराच मोठा भाग ब्रिटिश अमलाखाली आला.
ब्रिटिशांनी ज्या काही सुधारणा केल्या त्यात प्रकर्षाने दिसणारी गोष्ट म्हणजे नगर नियोजन. आजही मुंबईच्या फोर्ट भागात फिरताना ते जाणवते. सी एस टी, मुंबई मनपा, जिपीओ , म्युझियम अशा सुंदर सुंदर इमारती पहातच रहावाशा वाटतात .
सुंदर लेखमाला चालली आहे.

@ बबन ताम्बे

नगर नियोजन हा विषय आपण भारतीयांनी कधीचाच 'ऑपशन'ला टाकलेला आहे.

मोहन जो दरोनंतर थेट जयपूर, चंदीगड आणि इतक्यात पिटुकले गांधीनगर आणि नया रायपूर असे मोजकेच थांबे घेत भारतीय 'नगरनियोजनाची' गाडी आपल्या सामूहिक अकर्मण्यतेच्या चिखलात अडकून पडली आहे. :-(

मुंबई फोर्ट बद्दल सहमती, त्या भागात तासनतास पायी भटकायला आवडते - विशेषतः रविवारी सकाळी, गर्दी नसतांना.

प्रतिक्रियेबद्दल आभार.

मालिकेचा पुढील भाग येथे आहे :-
http://www.misalpav.com/node/45433#comment-1048854

वीणा३'s picture

3 Oct 2019 - 9:26 pm | वीणा३

मस्त लेखमाला !!!

अनिंद्य's picture

4 Oct 2019 - 4:28 pm | अनिंद्य

@ वीणा@,
आभार !

अनिंद्य's picture

4 Oct 2019 - 4:28 pm | अनिंद्य

@ वीणा@,
आभार !