श्रीगणेश लेखमाला - इतिहास एका इतिहाससंशोधनाचा..

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in लेखमाला
15 Sep 2016 - 8:22 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

इतर कुठल्याही मराठी माणसाप्रमाणे मलाही इतिहासाची ओळख शिवाजी महाराजांपासूनच झाली. यत्ता चौथीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित केले गेलेले (आणि गेली पन्नास वर्षे सिलॅबस न बदलता जवळपास आहे तस्से राहिलेले) 'शिवछत्रपती' हे मी वाचलेले इतिहासाचे पहिले पुस्तक. त्याआधीही दिवाळीतले किल्ले, शिवजयंती, इ. माध्यमांतून ओळख होतच होती. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत अनेक विषय शिकवले जातात, पण किमान महाराष्ट्रात तरी इतिहास हा एक विषय असा आहे की ज्याची किमान काही पैलूंपुरती तरी कायम ओळख होतच राहते. त्यामुळेच इतिहास हा बहुतेकांच्या आवडीचा विषय असावा असे वाटते - किमान माझ्या बाबतीत तरी ते खरे होते. घरी-दारी या विषयाची चर्चा कायम थोडीतरी होत असे (शिवाजी महाराज मिरजेला आले असताना त्यांचा तळ आमच्या घराच्या आवारात होता, असे तेव्हा बाबा मजेने सांगत.) शिवाय घरी यावरची अनेकविध पुस्तके असल्याने त्यांचे वाचन होतच असे. त्यातूनच उत्सुकता वाढत गेली, आणि इतिहासाचे बीज पेरले गेले. पुढे मग स्वातंत्र्यचळवळ, मध्ययुगीन व प्राचीन भारत, वैदिक संस्कृती, हडप्पा संस्कृती, युरोपातील रेनेसाँ, पहिले व दुसरे महायुद्ध, हिटलर, स्टॅलिन, नेपोलियन, इ.इ. विषयांवर जमेल तसे वाचन केले, कारण यात जितके वाचू तितके नवलच वाटत असे. कायम काहीतरी नवीन सापडत असल्यामुळे आणि नवीन सापडण्याकरिता विशेष मेहनतीची आवश्यकताही नसल्यामुळे आय वॉज हूक्ड. त्या भरातच घरी सापडतील ती पुस्तके वाचून काढली. राजा शिवछत्रपती-स्वामी-ययाती-पावनखिंड-पानिपत इ. नेहमीच्या कादंबर्‍यांसकट काही बखरी, शेजवलकरांसारख्या तज्ज्ञ इतिहासकारांचा समग्र लेखसंग्रह... असे एकुणात वाचन बरे चालले होते.

तोवर इंजीनिअरिंगकरिता आमची बदली झाली पुण्याला. मिरजवियोगाच्या दु:खातून लगेच बाहेर यायला मदत झाली ती अनेक मित्रांची आणि लायब्रर्‍यांची. फुटपाथवर पुस्तके धुंडाळण्याचा जो छंद तेव्हापासून लागला, तो अजूनही कायम आहे. त्यातच इंजीनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षात असताना एका संध्याकाळी सदाशिव पेठेतल्या गल्लीबोळांमध्ये निरुद्देश भटकत असताना एका गल्लीत शिरताक्षणी एका जुनाट इमारतीने लक्ष वेधून घेतले. बाजूला भरत नाट्य मंदिर, समोर डेअरी आणि अपार्टमेंट अशा नॉर्मल परिसरात ही दुमजली इमारत अंमळ विजोडच दिसत होती. थांबून त्या इमारतीवरचा बोर्ड पाहिला - 'भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे' आणि लगेच ट्यूब पेटली. गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेतला तो उल्लेख आठवला. (ते आणि बाबासाहेब दोघेही तरुण असताना तिथे येत, मोडी वाचताना 'ते समयीं बाजीरावसाहेबांसमवेत दोनशे लोक होते" ऐवजी "दोनशे केक होते' असे वाचून केकचा शोध भारतातच लागला, कारण युद्धातही स्वतः बाजीरावसाहेब दोनदोनशे केक जवळ बाळगीत, वगैरे दिव्य शोध लावीत.) आणि 'स्वप्नी जे देखिले रात्री | ते ते तैसेचि होतसे |' ही समर्थोक्ती जणू अनुभवल्याच्या आनंदातच त्या इमारतीत पहिले पाऊल ठेवले. त्यालाही आता जवळपास ९-१० वर्षे होत आली.

मंडळाचा (भारत इतिहास संशोधन मंडळाला सगळे चाहते 'मंडळ' असेच संबोधतात) शोध लागण्याअगोदर मिरजेतच उन्हाळी सुट्टीत श्री. मानसिंगराव कुमठेकर यांच्याकडून मोडीचे पहिले धडे गिरवले. मोडी शिकून प्रथमच अस्सल कागदपत्रे वाचताना जो आनंद झाला, तो शब्दांत सांगणे निव्वळ अशक्य आहे. घरी-दारी काही प्रसिद्ध पत्रे वाचून दाखवताना फार भारी वाटत असे. शिवाय अगोदर केवळ नाव ऐकलेली अनेक पुस्तके मंडळात प्रत्यक्ष पाहून हर्षवायू व्हायचाच बाकी होता. कवी भूषणापासून जदुनाथ सरकारांपर्यंत, होमरपासून हिटलरपर्यंत सर्व विषयांवरची पुस्तके मंडळात आहेत. हळूहळू त्यातली अनेक पुस्तके वाचून काढली. सोबतच अधूनमधून होणार्‍या व्याख्यानांनाही हजेरी लावणे सुरू केले. मंडळात काही लोक आपसात ऐतिहासिक चर्चा करतात, हेही तेव्हा पाहिलेले होते. जमेल तशी श्रवणभक्तीही करीत असे. पण त्यांपैकी कुणाशी ओळख नव्हती. पण त्याचीही चिंता एके दिवशी आपसूक मिटली. मंडळात एकदा काही लोक चर्चा करीत असताना मी तिथे एका गृहस्थांना विचारून फक्त ऐकत बसलो आणि मध्ये एक शंका तेवढी विचारली. दुसर्‍या एका गृहस्थांनी तिचे अगदी व्यवस्थित निरसन केले. ते दुसरे गृहस्थ खूप वेळेस मंडळात दिसत. त्यांना या अगोदरच्या भांडवलावर अधूनमधून काहीतरी विचारत असे, आणि ते अगदी तपशीलवार, न कंटाळता पूर्ण समाधान होईतोवर उत्तर देत. त्यांच्याबद्दलचा आदर हळूहळू वाढीस लागला, पण त्यांचे नाव काही माहीत नव्हते. एकदा मी सहज त्यांना नाव विचारल्यावर "मे-हें-द-ळे" असे नाव त्यांनी सांगितले. आमच्या एका मित्रवर्यांना हे सगळे सांगितल्यावर तो उडालाच. तोवर मला इतिहाससंशोधनात अलीकडे काय चाललेय याची वट्ट कल्पना नव्हती. बाबासाहेब पुरंदरे, वासुदेवशास्त्री खरे, इतिहासाचार्य राजवाडे, त्र्यं.शं. शेजवलकर, सेतुमाधवराव पगडी वगैरे संशोधकांची परंपरा नंतर जणू अस्तंगतच झाली अशा अतिशय मोठ्या गैरसमजुतीत मी वावरत होतो. मित्राने त्या भ्रमाचा फुगा लग्गेच फोडला आणि हे मेहेंदळे कोण आणि त्यांनी कुठले पुस्तक लिहिले इ. सांगितले. आता चकित होण्याची पाळी माझी होती. लगेच मंडळात गेलो आणि गजानन मेहेंदळे यांचे 'श्री राजा शिवछत्रपती' वाचायला सुरुवात केली.
1
                                                          बाबासाहेब पुरंदर्‍यांसोबत फोटो.

त्यानंतर मेहेंदळेंविषयीचा आदर झपाट्याने वृद्धिंगत होत गेला. त्यांचे पुस्तक म्हणजे माहितीचा अफाट खजिना आहे. निव्वळ माहितीच नव्हे, तर पानापानागणिक दिसणारी तर्कशुद्धता आणि चिकित्सक वृत्ती पाहून या माणसाने शिवचरित्राचा अभ्यास किती खोलवर केलाय हे सरळ दिसतच होते. इतके असूनही अन्य अज्ञ जनांसोबत वावरताना त्यांना कसलाही संकोच नाही. अगदी शांतचित्ताने सर्व प्रश्नांची उत्तरे देत (अजूनही देतात). त्यामुळे इतिहासातल्या अनेक गोष्टींचा नीरक्षीरविवेक कसा करावा, याचे थोडेतरी भान आले.

कॉलेजमध्ये असताना खर्‍या अर्थाने गेमचेंजर ठरलेली गोष्ट म्हणजे सीओईपी हिस्टरी क्लब. काही मित्रांसोबत क्लबची स्थापना केली. सुरुवातीला कॉलेजपातळीवरच विविध विषयांवर विद्यार्थीच लेक्चर देत असत - ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. सुरुवात झाली ती ट्रोजन युद्धाने. पुढे चेंगीझ खान, सोन्याचा इतिहास, नाईट्स टेम्पलार, पानिपत, इ.इ. अनेक विषय अनेक मित्रांनी सादर केले. क्लबद्वारे ऑर्गनाईझ केलेला पहिला इव्हेंट म्हणजे क्रांतिकारकांच्या फोटोंचे प्रदर्शन. काही मित्रांच्या ओळखीने पेपरमध्येही त्याची बातमी दिली. त्यामुळे पुण्यातून बरेच लोक येऊन ते सर्व फोटो वगैरे पाहून गेले. परिणामी आउटरीच बर्‍यापैकी वाढला. त्यातच एका मित्रवर्यांनी 'हिस्टरी वीक' नामक भन्नाट आयडिया काढली - आठवडाभराची व्याख्यानमाला. प्रथम वर्षी विद्यार्थ्यांनीच लेक्चर्स दिली, आणि एक गेस्ट लेक्चर घेतले पुणे विद्यापीठातल्या प्रा.डॉ. राधिका शेषन यांचे टेक्स्टाइल हिस्टरीवर. प्रथम वर्षाची पुण्याई द्वितीय वर्षी (म्हणजे आमच्या इंजीनिअरिंग लास्ट वर्षी) खूप कामाला आली. तेव्हा सगळ्या क्लबकर्‍यांनी तुफान जोराने कामे केली. तेव्हाचा हिस्टरी वीक म्हणजे अजूनही आठवण आली तरी भारी वाटते. अगोदर बैठक होऊन निनाद बेडेकर, शशिकांत पित्रे, आनंद हर्डीकर, वि.ग. कानेटकर इ. दिग्गज वक्ते ठरवले, त्यांचे त्यांचे विषय नक्की करून त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांचा होकार मिळवल्यावर आख्खे पुणे प्रचारार्थ पिंजून काढले. शाळा, कॉलेज, क्लास, लायब्ररी, होस्टेल्स... काही काही म्हणून शिल्लक ठेवले नाही. परिणामी ऑडिटोरियममध्ये तुफान गर्दी झाली. भाषणे तर हाउसफुल्ल झालीच, शिवाय बाहेर एक छोटेखानी पुस्तक प्रदर्शनही भरवले होते. तेव्हा आमच्या मित्रांच्या डोक्यात अशा काही भन्नाट आयडिया येत असत आणि ते ज्या पद्धतीने त्या राबवीत त्याला तोड नाही. म्यानेजमेंट-डिसलेक्सिक असलेला मी ते बह्वंशी अवाक होऊन पाहत असे.
p>2
                                                     निनाद बेडेकरांसोबत सीओईपी हिस्टरी क्लब सदस्य.

२००९ सालचा हिस्टरी वीक तुफान जबरदस्त हिट झाला. त्याच वर्षी कॉलेजच्या इतिहासावरही थोडे संशोधन केले, केसरी पेपरच्या पुराभिलेखागारात चाफेकर बंधूंचे सहकारी महादेव रानडे यांच्याशी निगडित बातम्या हुडकल्या (ते सीओईपीचे विद्यार्थी होते). वर्ष आणि कॉलेज संपता संपताच निनाद बेडेकरांसोबत क्लबची दोनदिवसीय रायगड ट्रिपही केली. तेव्हा आम्हाला भूषणाचा किडा एकदम बिगटाईम चावला. येताजाता सगळे जण 'इंद्र जिमि जंभ पर', 'साजि चतुरंग भरि' वगैरे कवने गाऊन समोरच्याला एका श्लोकात गार करायचा प्रयत्न करीत असू. शब्दयोजना घिसीपिटी वाटेल, पण खर्‍या अर्थाने मंतरलेले दिवस होते ते. अजूनही त्या दिवसांची आठवण आली की स्फुरण चढते. सगळे एकाचढ एक नर्ड लोक्स आणि तितकेच उत्साही. कोणीच 'नॉर्मल' नाही. असा क्राउड आख्ख्या कॉलेजात तेव्हा दुसरा नसेल. माझ्या होस्टेल रूमवर कॉन्स्टंट अड्डा भरत असे. कोट्या, जोक्स, टवाळी यांना ऊत येणे ही नॉर्मल सिच्वेशन. फार फार फारच भारी दिवस. कधी जमल्यास सीओईपी हिस्टरी क्लबचा डीटेल इतिहास लिहावा म्हणतो. सुदैवाने त्याची बरीच साधनसामग्री उपलब्ध आहे.
 3
                                              हिस्टरी वीकमध्ये वि.ग. कानेटकरांसोबत क्लब सदस्य.

सीओईपीनंतर कोलकात्यात आगमन झाल्यावर हा इतिहासाचा किडा खूपच ष्ट्राँग होता. त्यातच ग्रीक भाषा शिकवणार्‍या एका क्लबबद्दल माहिती कळताक्षणी त्यांना जाऊन भेटलो आणि जोमाने ग्रीकाध्ययन सुरू झाले. कोलकात्यातल्या कॉलेजाची लायब्ररी अतिसुसज्ज असल्यामुळे तिथे इतिहासाचीही अनेक पुस्तके होती. त्यांचे वाचनही सुरूच होते. थोडक्यात, नव्या जोमाने गटणीकरण सुरू होते. त्या दोनेक वर्षांत खूप नवीन पुस्तके वाचली. ग्रीक क्लबमध्ये सुरुवातीला ग्रीक शिकलो खरे, पण काही महिन्यांनी ग्रीकऐवजी बंगाल-महाराष्ट्र सांस्कृतिक देवाणघेवाण यावरच भर आला. परिणामतः बंगालच्या इतिहासाची आणखी डीटेलमध्ये ओळख झाली.

त्यानंतर मग विशेष काही सांगण्यासारखे नाही. तीच ती जुनी रेकॉर्ड - अनेक पुस्तके वाचली. नेटचा पुरेपूर वापर/दुर्वापर झाला. अनेक संशोधकांशी विविध प्रकारे संपर्क साधला. एशियाटिक सोसायटी, नॅशनल लायब्ररी, इ. मोठ्या नामवंत संस्थांच्या पुराभिलेखागारात थोडा शिरकाव झाला, त्यांच्या लायब्रर्‍या बघितल्या. पण इतिहासात नक्की कशावर संशोधन करावे हे काही कळत नव्हते. असेच चाचपडण्यात आणखी तीन-चार वर्षे गेली आणि अखेरीस गेल्या दोनेक वर्षांत दिशा मिळाली....
त्यामुळे शिवाजीमहाराज मिरजेला आल्याचे मूळ डच पत्र शोधता आले. (ते अगोदर पब्लिश्ड होते, फक्त मूळ हस्तलिखिताचा फोटो काढला, इतकेच.) शिवाय आणखी काही अप्रकाशित डच साधनेही शोधता आली, त्यांचे विश्लेषणही करता आले.

हा झाला वाचक ते अमॅच्युअर संशोधक इथवर झालेला प्रवास. संशोधनही जसे जमेल तसे करतो, फुलटाईम युनिव्हर्सिटीवाल्यांच्या तोडीचे दर वेळेस होते असे आजिबात नाही. पण घाई कुणाला आहे?

या सगळ्याचा मला काय फायदा झाला? आर्थिकदृष्ट्या पाहता काहीच नाही. पण यानिमित्ताने जगभर इतक्या वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आला, इतक्या लोकांच्या विचारपद्धतींशी परिचय झाला, त्याचे मोजमाप पैशात करणे निव्वळ अशक्य आहे. मग मेहेंदळे सरांशी शिवचरित्राबद्दलची चर्चा असो किंवा विजापूरकर श्री. अब्दुल अझीझ यांच्याशी टेम्पल आर्किटेक्चरबद्दलची चर्चा किंवा मिरजेबद्दल कुमठेकर यांच्याशी.... या आणि अशा अनेक लोकांनी इतिहासाचे आत्मभान जागृत केले, जाणिवांना व्यवस्थित पैलूही त्यांच्यामुळे पडले. त्यांचे ऋण कायमच राहील.

सरतेशेवटी 'इतिहाससंशोधनामागील प्रेरणा काय आहे?' असा प्रश्न कुणी विचारल्यास "जुनी रेकॉर्डे खोदत बसायला मजा येते" हेच उत्तर देईन. इतिहाससंशोधनातून समाजसुधारणा किंवा ओपीनियन फॉर्मेशन वगैरे बाकी सर्व गोष्टी सेकंडरी आहेत. या सर्व गोष्टींत - जुनी रेकॉर्डे खोदणे, त्यांच्या आधारे भूतकाळातील गोष्टी 'नक्की कशा घडल्या असतील?' याचे तर्कशुद्ध विश्लेषण करणे, इ.मध्ये एक स्वयंसिद्ध मजा आहे. त्यांचा काहीतरी कुठेतरी उपयोग होतो हे खरेच, आणि प्रत्येकाने 'कलेसाठी कला' छाप अ‍ॅटिट्यूडच दाखवावा असे आजिबात नाही. कुणाला निव्वळ उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून इतिहास आवडेल, कुणाला आणखी कशामुळे, कुणाला कदाचित वट्ट आवडणारही नाही. पण माझ्यापुरते विचारल्यास मी तरी हेच उत्तर देईन!
                  4
                                              बाबासाहेबांची सही व शुभेच्छा.

प्रतिक्रिया

बाळ सप्रे's picture

19 Sep 2016 - 3:44 pm | बाळ सप्रे

"बॅटमॅन यांचे नाव काय आहे हे कळेल काय ?"

इतिहास संशोधन कठीण गोष्ट असली तरी आंतरजालाच्या युगात ही गोष्ट फार कठीण नाही. ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2016 - 5:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट मनोगत ! बॅट्याकडून याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा नव्हतीच !

"जुनी रेकॉर्डे खोदत बसायला मजा येते"

हेच असीम कुतुहल आणि हीच मजा महत्वाची, मग छंदाचा विषय कोणता का असेना !

सुखीमाणूस's picture

15 Sep 2016 - 5:25 pm | सुखीमाणूस

अभियांत्रिकी और इतिहास• तुम्हाला सलाम

निनाद's picture

15 Sep 2016 - 5:30 pm | निनाद

खूप छान. आप्पा म्हणतात तसे आहे खरे :)

ह्या ब्याट्याला अब्दुल अझीझ राजपूत ह्यांच्यासोबत त्रिशुंड गणेश मंदिरात फ़ारसी शिलालेख वाचताना बघितलं तेव्हाही फारस आश्चर्य वाटलं नव्हतं. भाषा शिकणं हे त्याच्या रक्तातच आहे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

15 Sep 2016 - 6:03 pm | भ ट क्या खे ड वा ला

मान लिया दोस्त .
लवकरच एखादं संशोधन प्रसिद्ध होउदे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

15 Sep 2016 - 6:04 pm | भ ट क्या खे ड वा ला

मान लिया दोस्त .
लवकरच एखादं संशोधन प्रसिद्ध होउदे.

मिहिर's picture

15 Sep 2016 - 7:55 pm | मिहिर

झकास लेख. पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा! अभ्याचा प्रतिसादही छान आहे. सहमत आहे.

पिलीयन रायडर's picture

15 Sep 2016 - 7:58 pm | पिलीयन रायडर

किती छान लिहीलय! तुझा व्यासंग तर तुझ्या प्रतिसादांमधुन नेहमीच जाणवतो. मध्यंतरी तू महाराज मिरजेत येऊन गेले होते असे सिद्ध करणारे पत्र आणलेस असे कळाले. तेव्हाही छानच वाटलं होतं. अभिनंदन!!

लेखमाला अगदी पर्फेक्ट लेखावर येऊन संपली. ह्या निमित्ताने बॅटमॅनने अजुन लिहत रहावे हे ही सांगुन पहाते.

चित्रगुप्त's picture

15 Sep 2016 - 9:04 pm | चित्रगुप्त

लई लई लई भारी वाटले बघा हे वाचून. आमचा त्रिवार कुर्निसात बात्मन पंत.

'मिरजवियोगाच्या दु:खातून'...'अंमळ विजोड इमारत'...'हर्षवायू होणे' ...'नीरक्षीरविवेक'...'ग्रीकाध्ययन '...'गटणीकरण'...'इतिहासाचे आत्मभान'...'जाणिवांना व्यवस्थित पैलू पडणे' ... असले चपखल, भारी भारी शब्दप्रयोग आणि शेवट तर अगदी खासचः

जुनी रेकॉर्डे खोदणे, त्यांच्या आधारे भूतकाळातील गोष्टी 'नक्की कशा घडल्या असतील?' याचे तर्कशुद्ध विश्लेषण करणे, इ.मध्ये एक स्वयंसिद्ध मजा आहे

बात्मन पन्तांबद्दल अभ्याने आणि इतरांनी जे लिहीले आहे, त्याचेशी अगदी सहमत. एक आधुनिक, तरूण इंजनेर संस्कृतात छंदोबद्ध काव्यरचना लीलया करू शकतो याहून थोर, कवतिकास्पद आश्चर्य ते काय असू शकते ?

शेवटी एक दोन विनंत्या:
बात्मन पंतांना प्रत्यक्ष भेटलेलो असूनही (पुण्यात आलेलो आहे हे कळल्यावर वेळात वेळ काढून, लांबून येऊन त्यांनी भेटणे हे माझे अहोभाग्य) इथे दिलेल्या जुन्या फोटोतून ओळख पटली नाही... तरी "बसलेल्यांपैकी डावीकडून तिसरा, स्वेटरमधे" टाईपची ओळख पटवून द्यावी.

दुसरी विनंती: "सतराव्या वर्षापर्यंत आजोबा होते, त्यांनी सस्कृतची गोडी लावली आणि शिकवले" असे सांगितल्याचे स्मरते. तरी आजोबांच्या, आणि त्यांच्याकडून संस्कृत शिकतानाच्या आठवणी याबद्दल लेख अवश्य लिहावा.
पुढील संशोधन, लेखन आणि अन्य सर्व उपद्व्यापांसाठी अनेक शुभेच्छा.

अभिजीत अवलिया's picture

15 Sep 2016 - 9:05 pm | अभिजीत अवलिया

आवडला लेख

याला भरपूर काम द्या रे.नुस्ती स्तुती करू नका.

हायला, बॅटमॅन म्हणजे बेल्ल्या?
Interesting.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 10:17 pm | संदीप डांगे

ये आदमी जितना उपर है उससे कई गुना जमीनके निचे है...

वरचा लेख म्हणजे बॅटमॅनरुपी वटवृक्षाची चार दोन निसटलेली पाने!

बाकी, नाराजी सोडा (असलीच तर) आणि पहिल्यासारखे लिहायला लागा, तुमचे प्रतिसाद म्हणजे शिलालेख असतात मिपावर!

सुमीत भातखंडे's picture

15 Sep 2016 - 10:28 pm | सुमीत भातखंडे

जबर्या हो बॅट्या भाऊ!!

खटपट्या's picture

15 Sep 2016 - 10:45 pm | खटपट्या

कैच्या कै प्रकरण आहे बॅटमन म्हणजे. मला इतिहासाची आवड आहे पण आळसामुळे वाचायचा कंटाळा. माझा संबंध जुन्या गोथीक फाँटपुरताच. मोडीसुध्दा तीच्या वळणदार सुंदरतेमुळे शिकावीशी वाटते, इतिहासप्रेमाखातर नाहीच.

असे मिपाकर असल्यामुळेच मिपावर यावसं वाटतं

सुधीर's picture

15 Sep 2016 - 10:47 pm | सुधीर

झकास! पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा!!

अमितदादा's picture

15 Sep 2016 - 10:57 pm | अमितदादा

उत्तम लेख. पुढील वाटचालीस शुभेच्छा

बॅटमॅन's picture

16 Sep 2016 - 12:17 am | बॅटमॅन

आत्ताच लॉगिन होऊन पाहिले तर लोकांनी खूप भरभरून लिहिलेय. सगळ्यांचे किती आभार मानावे तेवढे थोडेच. लोकांनी ज्या आत्मीयतेने लिहिलेय ते पाहता "बस्कर पग्ले अब रुलायेगा क्या" असे म्हणावेसे वाटते.

अभ्या- उगा म्हणायचे म्हणून नाही परंतु याच्याइतका प्रत्युत्पन्नमती आणि तितकाच जिंदादिल कलाकार आजवर पाहण्यात आला नाही. त्याच्या व्यवसायातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत खडान्खडा प्रत्येक गोष्टीची माहिती तर आहेच, शिवाय लोकमानसाची इतकी चपखल जाण त्याला आहे की तो एका छोट्याशा प्यारेग्राफमध्ये अख्खं सोलापूर उभं करू शकतो. खरा कसबी अन तितकाच उमदा माणूस. त्यात परत मिरजेतील वास्तव्य आणि शिवप्रेम हा त्याने म्हटल्याप्रमाणेच आमच्या मैत्रीतील खूप मोठा समान धागा आहे. त्याच्या स्वयंभूपणाकडे पाहता अवाक व्हायला होते.

बोका-ए-आझमः हेल्लो मिष्टर समानधर्मी! इकॉनॉमिक्स क्लबबद्दल कधी वेळात वेळ काढून अवश्य लिहावे ही विनंती. कॉलेजात काढलेल्या अशा क्लबांच्या आठवणी खरेच खूपच रम्य असतात याबद्दल नो डौट.

डॉक खरे सर & डॉक म्हात्रे सर & आतिवासताई - अगदी खरे बघा. एक निखळ आनंदी क्षेत्र असावे की बास...कुतूहल ही सबकुछ है..

चित्रगुप्तकाका- आता अजून लाजवू नका. चित्रगुप्त ही किती मोठी हस्ती आहे याचा थोडासाच अंदाज आहे. अशा व्यक्तीला भेटणे हे खरे तर माझे सद्भाग्य आहे.

मारवा & गजोधरभैया- अनेक धन्यवाद जी. तुमची मते कैकदा फुकट अभिनिवेशाने खोडू पाहिलीत त्याबद्दल सॉरी, दरवेळेस विवेक राहतोच असे नाही.

बाकी समस्त मिपाकरांनाही अनेकोत्तम धन्यवाद!!!!

आमचे अगत्य असो द्यावे हीच इणंती. (लै फॉर्मल झाला का कडू आं?)

आपलाच,

बट्टमण्ण.

रुपी's picture

16 Sep 2016 - 2:03 am | रुपी

मस्तच लेख!
खरेच, बर्‍याच वेळा तुमचे प्रतिसाद वाचून तुम्ही लेखही लिहायला पाहिजेत असे वाटते.

संस्कृतची आवड आणि त्यावर इतकी पकड कशी मिळवलीत त्याबद्दलही लिहा एकदा.

चाणक्य's picture

16 Sep 2016 - 5:21 am | चाणक्य

बॅट्याची ईतिहासावरील प्रभुत्व त्याच्या प्रतिसादांतून दिसतेच. हा लेख वाचून त्याचा ईथपर्यंतचा प्रवासही समजला.

अगम्य's picture

16 Sep 2016 - 6:34 am | अगम्य

मिसळपावाची नवीनच ओळख झाली असताना एका स्वाक्षरीने लक्ष वेधून घेतले :
"दुष्टारि हा पुरता भारी अवतरला गॉथम शहरी ।
वाल्गुदेय हा निर्धारी बा विदूषका जाण पां ।।"
आणि त्यानंतर अनेक लेख व प्रतिक्रियांतून हे कळून चुकले की हे पाणी काही और आहे. हल्ली वटवाघूळ मिसळपावावर फारसे लिहीत नाही हीच खंत आहे. ह्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा बॅटमॅन ह्यांचे लेख व प्रतिक्रिया मिसळपावावर वाचायला मिळोत हीच गणरायाचरणी प्रार्थना.

मन१'s picture

16 Sep 2016 - 8:47 am | मन१

मस्त रे. कीप इट अप
.
.
******************

बॅट्या बॅट्या प्लीझ ना. मलापण क्रेडिट दे ना. जालावर आमच्यासारखे वाचक आहेत म्हणून तुझा उत्साह वाढतो की नै ? किंवा माझ्यासारखा माणूस तुझ्याशी तपशीलात बोलत बसतो म्हणून शोधाशोध करायचं मोमेण्टम कायम राहतं की नै ? आयायटीत टॉपर आलेल्या मिडलक्लास घरातल्या मुलाचे मिडलक्लास शेजारी कसे लगेच त्याच्या लौकिकात वाटा शोधत येतात; तसच होतय माझं.
म्हण्जे "अहो इतका साधाय ना हा. अहो आमच्याच अंगा-खांद्यावर खेळून मोठा झालाय. आता झाला असेल मोठा एण्ट्रन्सचा टॉपर वगैरे. पण शाळेत त्याच्या गणिताच्या कन्सेप्ट्स मीच पक्क्या करुन दिल्यात हां." असं शेजारचे काका म्हणतात. )जमल्यास जवळिक दाकह्वायला 'लब्बॉड ' म्हणत गालच्गुचाही घेतात. ) तेवढ्यात कधी नव्हे ते काकूही त्यांना दुजोरा देत स्वतःचं कौतुक पुढे दामटतात. "हो हो. इकडेच तर असायचा तो अभ्यासाला. रात्र रात्र जागू अभ्यास करायचा. मीच चहा करुन द्यायचे त्याला अभ्यासाला. इथला चहा पिउनच तर अभ्यास करायचा हा. आमच्या मुलापेक्षा का वेगळाय तो आम्हाला ?" . सगळा हा गळेपडूपणा इत॑क्या प्रेमळपणानं केलेला असतो की त्या टॉपरलाही हाड हूड करत हे झिडकारणं नको वाटतं. तो आपला विनयानं "हो. हो." करत ऐकून घेतो. तर माझं त्या शेजारच्या काका काकूंसारखं होतय.
.
.
"शर्मा जी का बेटा" ह्या क्यारेक्टर जितका सुप्त असूयायुक्त राग येतो ना सगळ्यांना; तितकाच मला तुझा राग येतो असतो. तुला कै कौतुक आहे की नै चीअर अप करणर्‍यांचं. अरे बालगंधर्व असू देत नैतर तेंडुलकर त्यांनाही "रसिक श्रोते/मायबाप", "क्रिकेटप्रेमी चाहते" वगैरेंना थ्यांक्स द्यावच लागतं. तुमचं सचिनत्व , बालगंधर्वत्व टिकवायचं तर आमची कवतिकं करा. नैतर सुभाष गुप्त्यां ना इग्नोर मारलं तसं इग्नोर मारु साल्याहो. नुसतं चांगलं खेळून कै उपयोग नै.
***********************

मुक्त विहारि's picture

16 Sep 2016 - 9:35 am | मुक्त विहारि

मस्त हो...

अभियांत्रिकी आणि इतिहास या दोन संपूर्ण वेगळ्या गोष्टी तितक्याच अगत्याने आत्मसात करणाऱ्या बॅटमॅनला सलाम !

आनन्दिता's picture

16 Sep 2016 - 10:24 am | आनन्दिता

बॅट्याभौ तुम्ही खुप छान लिहीता. तुमच्यात हे इतिहासाचं खुळ आणि मेमरीत इतका डेटा कसाकाय याचं खुप कुतुहल होतं. या लेखाने सगळी उत्तर मिळाली.
लेख अतिप्रचंड आवडला. इतिहास मला ही भयंकर आवडतो, लहानपणी अभ्यास म्हणजे माझ्यालेखी इतिहासाचे धडे पुन्हा पुन्हा वाचणे ... १० वी त घसघशीत ७५/७५ मार्क्स पाडले होते. पण पुढे मनासारखं त्यात काही करता आलं नाही , मोडी पण शिकायची होती पण राहुन गेलीय. तुमचा लेख वाचुन मात्र खुप काही मिस झाल्याची बेक्कार रुखरुख लागलीय. च्यायला त्या आवडीला खतपाणी घालुन वेड बनवायचं राहुन गेलं.

आता संधी मिळालीच आहे तर .. शिवचरित्रावरची वाचलीच पाहिजेत अशा पुस्तकांची नावे मिळतील का?

गामा पैलवान's picture

16 Sep 2016 - 7:15 pm | गामा पैलवान

ब्याटम्यान मास्तरांच्या व्यासंगास साष्टांग प्रणिपात. साहेबांप्रमाणे मीही मेक्यानिकल विंजीनेर आहे असं सांगीत आता मिशीला तूप लावून हिंडेन.
-गा.पै.

रमेश आठवले's picture

16 Sep 2016 - 8:55 pm | रमेश आठवले

अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेत असताना इतिहास या विषयासाठी इतका वेळ देणारे दुर्मिळ . मी शाळेत जाताना,घरा शेजारी असलेल्या भा. इ, स मध्ये जाऊन संग्रहालयातील वस्तु न्याहाळत असे. श्री ग. ह. खरे तेथे नेहमी दिसायचे.

आयला ग ह खर्‍यांना पाहिलंय तुम्ही? सहीच!

आनंदयात्री's picture

16 Sep 2016 - 9:22 pm | आनंदयात्री

शिक्षण नोकरी या सगळ्या बाबी सांभाळून, लहान वयात हा पल्ला गाठल्याबद्दल तुमचे अभिनंदन. पुढल्या आयुष्यात जसे अजून स्थिरस्थावर होताल तसे तसे तुम्हाला तुमच्या या छंदाला अजून वेळ देता येईल. या स्वगतातून तुमच्या संशोधकी वृत्तीबरोबर तुमच्या अभ्यासू वृत्तीचाही प्रत्यय येतो.
अभिनंदन आणि शुभेच्छा!

चतुरंग's picture

17 Sep 2016 - 2:04 am | चतुरंग

एकंदर स्वतःला आवडते म्हणून एखादी गोष्ट छांदिष्टपणाने करणे यात एक वेगळाच आनंद असतो.

बाबासाहेब पुरंदर्‍यांची पायधूळ नगरच्या आमच्या घरी लागलेली आहे. तब्बल तासभर घरी होते. मनमुराद गप्पा झाल्या. प्रचंड उत्साही, कमालीचे मिस्किल आणि अतिशय करारी व्यक्तिमत्त्व आहे.
ते व्याख्यानमालेसाठी आलेले होते आणि वडिलांनी त्यांना विनंती केली की थोडावेळ घरी येऊ शकाल का?
आधी जमेल असे वाटत नाही म्हणाले मग वडिलांनी बोलताबोल्ता सांगितले की आमच्या जागेत काहीकाळ न्यायमूर्ती रानड्यांचे वास्तव्य होते. असे म्हणताच तत्क्षणि बाबासाहेब यायला तयार झाले! :)

सौंदाळा's picture

17 Sep 2016 - 11:31 am | सौंदाळा

थक्क करणारा अभ्यास, चिकाटी
त्रिवार मुजरा.

पिंगू's picture

17 Sep 2016 - 12:50 pm | पिंगू

मस्त रे बॅट्या..

मिपावरील काही अभ्यासू आयडींबद्दल नेहमीच कुतूहल असायचे, त्यात बॅटमॅन यांचा अर्थातच समावेश होता,
या लेखानिमित्ताने आयडीमागील माणूस जाणून घेता आला ही एक पर्वणीच.
असा ध्यासवेडेपणाच माणसाकडून जगावेगळ्या गोष्टी करवून घेतो, कुठल्याही गोष्टीबाबत पॅशन असली की
असाध्य गोष्टीही सहज साध्य होतात हे यातून दिसून येते.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि संशोधनासाठी अनेक शुभेच्छा..

राजेश घासकडवी's picture

18 Sep 2016 - 5:37 am | राजेश घासकडवी

लेख आवडला. बॅटमॅनला त्याच्या पुढच्या प्रवासाबद्दल शुभेच्छा.

बॅटमॅन साहेब, मुजरा स्वीकारा आमचा

तुमच्या व्यासंगाला सलाम!

बाळ सप्रे's picture

19 Sep 2016 - 3:53 pm | बाळ सप्रे

'इतिहाससंशोधनामागील प्रेरणा काय आहे?'

अशा प्रश्नांना 'passion आहे' याखेरीज उत्तर नाही हेच खरं..

४थी तले 'ते' इतिहासाचे पुस्तक आवडणारे सगळेच एवढा व्यासंग करु शकत नाहीत..

असंच आपल्या भाषांवरील व्यासंगाविषयीही वाचायला आवडेल ..

शिव कन्या's picture

19 Sep 2016 - 6:59 pm | शिव कन्या

वा! चांगला ध्यास!

हिस्ट्री क्लबचा इतिहास लिहाच.

मी-सौरभ's picture

19 Sep 2016 - 7:17 pm | मी-सौरभ

आधिक काय लिहीणे.

वरील बर्‍याच प्रतिसादांशी बा.डी.स.

रातराणी's picture

20 Sep 2016 - 10:43 am | रातराणी

सहमत!! _/\_

नाखु's picture

20 Sep 2016 - 10:56 am | नाखु

अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

प्रतिसादाला उशीर झाला (कारण तुझ्या हाफीसातली धोरणे आमच्या हाफीसात लावली गेली आहेत)

बॅट्टमण मित्रमंडळ सदस्य

नंदन's picture

20 Sep 2016 - 11:43 am | नंदन

लेख!

इतिहाससंशोधनातून समाजसुधारणा किंवा ओपीनियन फॉर्मेशन वगैरे बाकी सर्व गोष्टी सेकंडरी आहेत. या सर्व गोष्टींत - जुनी रेकॉर्डे खोदणे, त्यांच्या आधारे भूतकाळातील गोष्टी 'नक्की कशा घडल्या असतील?' याचे तर्कशुद्ध विश्लेषण करणे, इ.मध्ये एक स्वयंसिद्ध मजा आहे.

तंतोतंत. 'Because it's there' ह्या प्रसिद्ध उद्गारांची आठवण झाली.

पिशी अबोली's picture

21 Sep 2016 - 2:00 am | पिशी अबोली

हा लेख पहिल्या दिवशीच वाचला होता, पण परत नीट वाचायचाच होता.
बॅटमॅनच्या इतिहासाच्या ध्यासाबद्दल नेहमीच आदर वाटत आलेला आहे, त्यामुळे लेखमालेत हा लेख बघून फारच आनंद झाला. शैलीही खास बॅटमॅन शैली असल्याने नेहमीप्रमाणेच मजा आली.
संस्कृतानुरागविषयेsपि कदाचित् लेखनं भवेदिति आशंसे|