लष्कराच्या भाकरी थापणे जितके सोपे तितके भाकरीचे निर्माण नाही. ज्वारी, बाजरी, नाचणी ही एकदल धान्ये आता औषधापुरतीच जगतमान्य झाली आहेत. अन् अशांची भाकरी भाजणे ही एक चैन समजावी अशी परिस्थिती दिसते. मुळात भाकरी थापणे, भाजणे या फार मोठ्या कौशल्याच्या गोष्टी आहेत. गावाकडची एखादी जुनी जाणती कौशल्याबाईच ते करु जाणे.
तर 'भाकरी निर्माण' ही बऱ्यापैकी अवघड कला. त्यासाठी धान्य निवडण्यापासून सुरुवात करावी लागेल. दळण्या अगोदर धान्यातली कच, खडे, तुसे बाहेर टाकली नाहीत तर भाकरी खमंग होऊनही चावतांना वादंग उठण्याचीच शक्यता जास्त. तेव्हा डोळ्यांत तेल घालून धान्याची निवडणूक झाली की चांगलं पीठ दळून घ्यावं लागतं.