सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करत असताना अनुभवलेली ही घटना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला भाग पाडतेयं. वय वर्षे २० असलेली आदिवासी समाजातील मंजुळा फार दूर नाही, नाशिकपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावरल्या एका गावात राहणारी. दुस-या बाळंतपणा दरम्यान तिचा मृत्यू झाला. ना पेपरात बातमी छापून आली, ना कुठे त्यावर चर्चा झाली. पण या प्रातिनिधीक घटनेमागे बरचं काही घडलेलं आहे.
शेजारच्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर माहेर असलेल्या मंजुळाचं वयाच्या १४व्या वर्षी लग्न झालं. अक्षर ओळख नसण्याइतपत शिकलेली मंजुळा सासरी आल्यावर दोन वर्षात पहिल्यांदा गरोदर राहिली.