कपाळावरून घाम निथळत होता, मिटल्या डोळ्यांची गरगर वाढली होती. श्वासाची लय बिघडली होती. धडपडून मीना जागी झाली. कालपासून तिचे मन तसे सैरभैर होतेच पण उशाशी कोणीतरी बसून डोक्यावरुन हात फिरवत, "चल, बाळ घरी ये, सगळे जमलेत बघ" असे म्हणत आहे. आवाज ओळखीचा वाटतोय पण डोळे चिकटले आहेत व नीट काही बघताही येत नाही असा, भास व सत्याच्या मधला अनुभव तिला अतिशय संभ्रमित करुन गेला.
आता झोपणं शक्यच नव्हतं म्हणून ती ऊठली आणि खोलीच्या बाहेर आली.
हॉल मधे मालक-मालकीण टिव्ही बघत बसलेले होते. मालकीण बाईंनी घड्याळाकडे पहात विचारले, "काय ग? बरे नाही वाटत का, की अजून झोप येत नाहीये?