ही वाळू अशीच वर्षभर इकडे तिकडे हलत असते. हा प्रवाहच तिचा प्राण असतो. ती कधीच थांबत नाही. कुठेच! पाण्यात असो किंवा हवेत, ती आपली वहातच असते. सामान्य जीव वाळूत तग धरु शकत नाही. आणि हे जंतूंनाही लागू आहे... कसे सांगू तुम्हाला....वाळू म्हणजे स्वच्छता, शुद्धता....कुजण्याचा प्रश्नच नाही.
मोबियस
४
सूर्य अस्ताला चालला होता व हवाही आता मंद वहात होती. तो त्या वाळूच्या टेकडीवरुन निर्हेतूक चालत होता. जेव्हा अंधारामुळे त्याला वाळूतील रेषा दिसेनाशा झाल्या तेव्हा त्याची चाल मंदावली. आत्तापर्यंत बिचार्याला एकही बिटल सापडला नव्हता ना एखादा किटक. ‘कदाचित उद्या नशीब बदलेल’ तो मनाशी म्हणाला. प्रचंड दमल्यामुळे त्याच्या बुबुळावर चमकणारे बिंदू आल्यावर मात्र तो थांबला. त्याने त्या वाळूवर लक्ष केंद्रीत केले पण त्याचा उपयोग झाला नाही. आता काहीही हलले तरी त्याला बिटल असल्याचा भास होऊ लागला.
सांगितल्याप्रमाणे तो म्हातारा मात्र गावातील सरकारी कार्यालयासमोर त्याची वाट पहात थांबला होता.
“माझ्यामुळे उगीचच तुम्हाला त्रास.... ! ” तो म्हणाला.
“मुळीच नाही. उलट मी केलेली सोय तुम्हाला आवडेल की नाही याचीच मला शंका वाटते आहे.”
कार्यालयात कसलीशी बैठक चालली होती बहुधा. चारपाच माणसे घोळका करुन बसली होती. मधूनच त्यांचे ओरडणे व हसण्याचा गोंधळ ऐकू येत होता. बाहेरच एका पाटीवर सुवाच्च अक्षरात रंगविले होते, ‘आपल्या घरावर प्रेम करा’ म्हातार्याने काहीतरी म्हटले आणि सगळे गप्प झाले. त्यांना सगळ्यांना घेऊन तो बाहेर आला. संधिप्रकाशात रस्त्यात गाडले गेलेले शंख शिंपले अधिकच चमकत होते.
ते त्याला त्या वाळूच्या टेकाडावरील एका विवराच्या काठावर घेऊन गेले.
एक अरुंद पायवाट उतारावरुन उजवीकडे जात होती. त्या वाटेवरुन थोड्यावेळ चालल्यावर ते थबकले. अंधारात डोकावून त्यांनी मोठ्या आवाजात हाक मारली,
“कोणी आहे का ? मावशे ए मावशेऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ”.
खाली खोलवर एका दिव्याची ज्योत फडफडली पण कोणी उत्तर दिले नाही.
“आले! आले! तेथे वाळूच्या पोत्यांवर शिडी आहे बघा!”
त्या शिडीशिवाय खाली उतरणे शक्यच नव्हते कारण त्याला एका कड्याला लोंबकळावे लागले असते. खाली दिसत असलेल्या छपरापासून तो खूपच उंचावर होता. शिडी असतानासुद्धा खाली उतरणे अवघड होते. दिवसा हा उतार त्याला त्या मानाने सोपा वाटला होता. आता तो जवळजवळ सरळसोट दिसत होता आणि शिडीतरी कसली ती ? दोरखंडाच्या गाठींनी बनवलेली. थोड्याशा चुकीनेही त्याचा गुंता होत होता.
“आता तुम्ही कसली काळजी करु नका ! निवांत उतरा आणि विश्रांती घ्या !” एवढे म्हणून त्या म्हातार्याने त्याला तेथेच सोडले आणि तो वर परतला.
सगळीकडून डोक्यावर वाळू पडत होती. त्याला आता उत्सुकता वाटत होती की ती स्त्री कशी होती....तरुण का म्हातारी...मग तिला त्याने मावशी म्हणून का हाक मारली ? पण त्याचे स्वागत करण्यास आलेली व्यक्ती एक तरुण, लहान चणीची सुंदर अशी तिशीची स्त्री पाहून त्याला हायसे वाटले. बहुधा तिने पावडर लावलेली दिसत होती कारण समुद्र किनार्यावरील एखादी स्त्री एवढी गोरीपान असणे शक्यच नाही. असो. आपल्या उपकारकर्तीचे त्याने आभार मानले. तिलाही त्याला बघून आनंद झालेला दिसला.
तिने केलेल्यो आगतस्वागतामुळेे तो तेथे राहिला तरी. नाहीतर ते घर काही राहण्याच्या लायकीचे नव्हते. तिच्या स्वागताने तो भारावून गेला. नाहीतर त्याला त्या मंडळींनी त्याची चेष्टा केली असेच वाटले असते व तो त्वरित तेथून चालता झाला असता. भिंतीचे पोपडे पडत होते. दरवाजाच्या जागेवर जुन्या फाटक्या सतरंज्या लटकत होत्या. आधारासाठी लावलेले वासे तिरके झाले होते व सगळ्या खिडक्यांना फळ्या मारल्या होत्या. जमिनीवरील जाजम कुजत आले होते. त्यावर चालताना एखाद्या ओल्या स्पंजवर चालावे तसा चु..बु..क चुबुक असा आवाज येत होता. आणि सगळ्यात वाईट म्हणजे तापलेल्या वाळूचा करपलेला वास सर्व घरात भरुन राहिला होता.
चांगले वाईट, आवडनिवड ही एखाद्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते नाही का? आलिया भोगासी असावे सादर! शिवाय असेल नशिबात तर उद्या येथेही काही अनोखे किटक मिळतील. जागा तर किटकांसाठी अत्यंत योग्य अशीच होती.....
“मी खाण्यासाठी काहीतरी बनवते....फक्त थोडावेळ तुम्ही थांबलात तर...”असे म्हणून तिने त्याच्या पुढ्यातील कंदील उचलला.
“थोडावेळ तुम्ही अंधारात बसू शकाल का ?”
“तुमच्याकडे फक्त एकच कंदील आहे ?”
“हो एकच.”
तिने ओशाळवाणे हसत उत्तर दिले. ती हसल्याबरोबर तिच्या डाव्या गालावर एक खळी पडली. ‘तिचे डोळे सोडले तर तशी ती दिसायला सुंदरच आहे. तिच्या डोळ्यातील दु:ख कदाचित गत आयुष्यातील कुठल्याशा वेदनेने निर्माण केलेले असावे.’ तो मनाशी म्हणाला. कितीही प्रयत्न केला तरीही तिच्या डोळ्यांच्या लालसर कडा ती लपवू शकली नव्हती. ‘झोपण्याआधी आपण ही डोळ्यात औषध घालायला हवे.’ तो मनाशी म्हणाला.
“दिव्याचे एवढे काही विशेष नाही. पण मला अगोदर आंघोळ करायची आहे”
“आंघोळ ?”
“का तुमच्या येथे न्हाणीघर नाही का ?”
“क्षमा करा पण तुम्ही ती परवा केली नाहीत तर चालणार नाही का?”
“परवा? पण मी तर उद्या चाललो.” मनात नसतानाही तो मोठ्याने हसला.
“हंऽऽऽऽऽऽऽ” असे म्हणून तिने तोंड फिरवले. तो जाणार म्हणून तिची कदाचित निराशा झाली असेल असे त्याला वाटले. त्याने बेचैनपणे आपल्या सुकलेल्या ओठावरुन तीनचार वेळा आपली जिभ फिरवली.
“न्हाणीघर नाही तर नाही. एखादी बादली आहे का पाण्याची. डोक्यावरुन ओतली तरी बरे वाटेल. माझे सगळे अंग वाळूने माखले आहे.”
“नाही! इथे बादलीभर पाणीही नाही व विहीर येथून खूपच दूर आहे.”
तिच्या चेहर्यावरची खंत त्याला स्पष्ट दिसल्यावर त्याने तो विषय सोडून दिला. तसेच त्याला काही वेळानंतर आंघोळीचा फोलपणा लक्षात येणारच होता. त्या स्त्रीने त्याचे जेवण आणले. एका वाटीत कसलेसे माशाचे सार होते. अगदी समुद्री प्रदेशाचे जेवण. तो जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात तिने एक कागदी मोठी छत्री उघडली व त्याच्या डोक्यावर धरली.
“ही छत्री कशाला?” त्याला वाटले त्या भागातील ती एक पद्धत असेल.
“ही छत्री नाही धरली तर तुमच्या ताटात वाळू पडेल.”
“हे कसे काय बुवा?” त्याने वर छप्पराकडे बघत म्हटले. छपरात तर कसल्याही प्रकारची भोके, भेगा नव्हत्या.
तिने तो जेथे पहात होता त्या तिथे नजर टाकली.
“वाळू गळतेच. मी जर साफ केली नाही तर जवळजवळ एक इंच जाडीचा थर साठतो घरात” ती हताशपणे म्हणाली.
“त्या छपरात काही गडबड आहे का ?”
“ते जुने झाले आहे खरे, पण मी सांगते, ते अगदी नवेकोरे असते तरी वाळू आत यायची काही थांबली नसती. ही वाळू फार भयंकर आहे. लाकडाला भोके पाडणारे किडे परवडले.”
“लाकडाला भोके पाडणारे किडे?”
“हो ! लाकडाला भोके पाडणारे किडे.”
“तुम्हाला वाळवी म्हणायचे आहे का ?”
“नाही! नाही! हे किडे आकाराने एवढे मोठे असतात व त्यांची पाठ कठीण असते.”
“हंऽऽऽऽऽ सोंडेचा भुंगेरा......”
“भुंगेरा ?”
“लांब मिशा आणि लालसर रंगाचा असतो तो. बरोबर ?”
“नाही! त्याचा रंग तांब्यासारखा असतो आणि एखाद्या तांदुळाच्या दाण्याएढा असतो तो!”
“हंऽऽऽऽऽमग तो तांबेरा असेल”
“वेळीच काळजी घेतली नाही तर वासे पोकळ होतात.”
“किड्यांमुळे ना ?”
“नाही. वाळूमुळे.”
“ती सगळीकडूनच आत घुसते. ज्यादिवशी वार्याची दिशा या बाजूला असते त्यादिवशी तर या छताखाली जमा होते. मी जर ती वेळेवर साफ केली नाही तर छपराला त्या वाळूचे वजन झेपेल की नाही याची शंकाच आहे.”
“हंऽऽऽऽऽ ते मात्र बरोबर आहे पण वाळूमुळे वासे झिजतात, कुजतात हे मात्र पटत नाही.”
“नाही ते खरेच कुजतात.”
“पण वाळू तर कोरडी असते. हो ना?”
“पण वाळूने लाकूड कुजते हे निश्चित. जर तुम्ही नव्याकोर्या ओंडक्यावर वाळू ठेवली तर अर्ध्या महिन्यात त्या लाकडाचे तुकडे झालेले तुम्हाला दिसतील. काही जण म्हणतात वाळूत लाकूड विरघळते.”
“या मागचे कारण मला समजत नाही.”
“लाकूड कुजते आणि त्याच्याबरोबर असलेली वाळूही कुजते. मी तर असे ऐकले आहे की एका वाळूत गाडल्या गेलेल्या छपरातून काकड्या पिकतील अशी माती बाहेर पडली होती”
“अशक्य !” तो वैतागून म्हणाला. त्याला वाटले की अशा गोष्टींना होकार भरणे म्हणजे आपल्या शिक्षणाचा अपमानच.
“हे बघा मला वाळूबद्दल बर्यापैकी माहिती आहे. ही वाळू अशीच वर्षभर इकडे तिकडे हलत असते. हा प्रवाहच तिचा प्राण असतो. ती कधीच थांबत नाही. कुठेच! पाण्यात असो किंवा हवेत, ती आपली वहातच असते. सामान्य जीव वाळूत तग धरु शकत नाही. आणि हे जंतूंनाही लागू आहे... कसे सांगू तुम्हाला....वाळू म्हणजे स्वच्छता, शुद्धता....कुजण्याचा प्रश्नच नाही. शास्त्रात बर्यापैकी मान असलेले ते एक खनिज आहे.”
ते ऐकताच ती गप्प झाली. त्या छत्रीखाली एकही शब्द पुढे न बोलता त्याने आपले खाणे भराभरा संपविले. छत्रीवर वाळूचा एक थर साचला होता. त्याला वाटले तो त्या धुळीत बोटाने सहज लिहू शकला असता. आर्द्रता त्याला सहन होत नव्हती. अर्थात ती वाळूत नव्हती तर त्याच्या शरीरात होती. छतावर वारा घोंघावत होता. त्याने सिगरेट काढण्यासाठी खिशात हात घातला तर त्याच्या खिशात वाळू भरली होती. सवयीने सिगारेट न पेटवताच त्याच्या जिभेवर त्याची चव रेंगाळू लागली.
त्याने पोटॅशियम सायनाईडच्या बाटलीतून एक किटक बाहेर काढला. तो कडक होण्याआधी त्याला पिनांनी जखडणे आवश्यक होते म्हणजे त्याचे पाय नीट पसरता आले असते. बाहेरुन भांडी विसळण्याचा आवाज येत होता. इथे अजून कोणी रहात नाही का? त्याला आश्चर्य वाटले.
तिने परत आल्यावर त्या खोलीच्या एका कोपर्यात त्याचे अंथरुण घालण्यास सुरुवात केली. त्याचे अंथरुण जर ती इथे घालणार होती तर ती कुठे झोपणार होती? कदाचित त्या पडद्याआड असलेल्या मागच्या खोलीत? पण त्याला एकंदरीत ती बाई जरा विचित्रच वाटली. पाहुण्याला दरवाजाजवळ झोपायला सांगणे व स्वत: आतल्या खोलीत. कदाचित आत कोणीतरी चालता न येणारी व्यक्ती झोपली असेल म्हणून तिने त्याची सोय बाहेर केली असेल, सांगता येत नाही. तो मनात पुटपुटला... आणि एखाद्या वाटसरुची किती काळजी एका बाईने घ्यायची यालाही काही मर्यादा होतीच की.
“अजून कोणी आहे का इथे?”
“अजून कोणी म्हणजे?”
“तुमच्या घरचे किंवा...”
“नाही मी येथे एकटीच रहाते.” त्याच्या मनातील विचार ओळखून ती खळाळून हसली. हंऽऽ.”
“येथे वाळूमुळे सगळे दमट होते. अंथरुणेसुद्धा..”
“तुमचा नवरा कुठे असतो?”
“मागच्या वर्षी वादळात...” तिने सतरंजीचे काठ उगाचच ताणता ताणता उत्तर दिले.
“इथली वादळे भयंकर असतात. एखाद्या पाण्याच्या धबधब्यासारखी वाळू घसरत खाली येते व एका रात्रीत १५/२० फूट उंचीचे वाळूचे टेकाड तयार होते आणि तुम्ही काहीही करु शकत नाही.”
“वीस फूट ?”
“वादळात वाहणार्या वाळूच्या वेगाशी तुम्ही तुमच्या फावड्याने स्पर्धा करु शकत नाही. त्या वादळात तो माझ्या मुलीबरोबर, ती तेव्हा तिसरी चौथीत असेल, कोंबड्यांचे खुराडे वाचविण्यासाठी धावला. मी घरातच कामे उरकत होते. सकाळी उजाडल्यावर वादळ मंदावले. मी ताबडतोब बाहेर काय झालंय ते पाहण्यासाठी बाहेर गेले. तेथे ना खुराड्याचा मागमुस होता ना त्या दोघांचा.”
“ते वाळूत गाडले गेले का ?”
“हो ना! पूर्णपणे”.
“भयंकर! ही वाळू भीतीदायकच आहे.”
तेवढ्यात त्या कंदिलाची ज्योत फडफडू लागली.
“वाळू! ” ती म्हणाली.
खाली बसून तिने वात चिमटीत पकडून जरा दाबल्यावर ती वात परत चांगली जळू लागली. तिने त्याच अवस्थेत त्या ज्योतीवर एकटक नजर लावली व हसली. अगदीच अनैसर्गिक. त्याला खात्री पटली की तिच्या गालावर पडणार्या खळीच्या ताकदीची पूर्ण कल्पना असल्यामुळे ती मुद्दाम हसते आहे. हा विचार आल्यावर तो दचकला. विशेषत: तिच्या वर गेलेल्या नवर्याबाबतीत बोलत असतानाचे हे सौंदर्याचे प्रदर्शन त्याला योग्य वाटले नाही.
५
तेवढ्यात त्याला वर कसलीतरी कुजबूज ऐकू आली आणि तो त्या संभाषणाच्या तणावातून बाहेर आला.
“ऐकताय का? आम्ही त्याच्यासाठी एक फावडे आणि डबडी आणली आहेत.”
आवाज स्पष्ट ऐकू येत होता. बहुधा एवढ्या दुरुन ते भोंग्यातून बोलत असावेत. त्यानंतर एकमेकांवर भांडी आपटल्यावर येतो तसा आवाज आला. ते ऐकल्यावर त्या बाईने उत्तर दिले. इथे काहीतरी गडबड आहे अशी त्याला खात्री वाटू लागली होती.
“ क़ोण आहे ? इथे दुसरे कोणीतरी आहे हे स्पष्ट आहे”.
“हंऽऽऽऽऽऽ” तिने तिच्या शरीराला बाक देत उत्तर दिले. त्याला क्षणभर वाटले की ती लाजली की काय!
“ते तुमच्याबद्दल बोलताएत.”
“मी आणि फावडे ? काय संबंध आहे? ” त्याने विचारले.
“जाऊ देत! तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांना लोकांच्या भानगडीत नाक खुपसायची सवयच आहे नाहीतरी !”
“त्यांनी बोलण्यात काही चूक केली का?”
तिने मात्र या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. वळून तिने जमिनीवर पाऊल ठेवले.
“तुम्हाला हा कंदील अजून हवा आहे का?”
“माझे अजून काम झाले नाही पण तुम्हाला हवा आहे का तो?” त्याने विचारले.
“नाही ठीक आहे. मला सवय आहे या कामाची”. तिने डोक्यावर पदर घेतला व अंधारात नाहीशी झाली. एका बाजूला डोके झुकवून त्याने त्याची सिगारेट पेटविली. काहीतरी रहस्यमय आहे हे निश्चित. त्याने त्या लटकलेल्या चादरीमागे काय आहे ते पाहण्याचे ठरविले. तो पडदा बाजूला केल्यावर तेथे एक छोटीशी खोली होती पण त्यात चारपाई नव्हती ना बिछाना. त्याऐवजी वाळूचा एक प्रवाह एक छान वळण घेऊन त्या खोलीमागे अदृष्य झालेला त्याला दिसला. ते बघताच त्याच्या अंगावर शहारा आला व तो थबकला. ते घर अर्धमेले झाले होते. त्याचा अंतर्भाग वाहणार्या वाळूच्या जिभल्यांनी खाऊन टाकला होता. वाळू, जिला स्वत:चा आकारही नव्हता. वाळूचा एक कण, काय त्याची ताकद असणार? पण त्या विध्वंसक वाळूसमोर कुठलीही वस्तू टिकाव धरत नव्हती. तिला कुठलाही आकार नव्हता हीच बहुधा तिची ताकद असावी.
दुसर्याच क्षणी तो भानावर आला. जर या खोलीत झोपण्याची जागा नव्हती तर ती कुठे झोपणार होती? ती आत बाहेर करीत होती हे त्याला समजत होते. त्याने मनगटावरील घड्याळात पाहिले. रात्रीचे आठ वाजून गेले होते. एवढ्या रात्री कसले काम असावे बरे?
त्याने पाणी शोधायचे ठरविले. जमिनीत पुरलेल्या एका रांजणात त्याला तळाला गेलेले पाणी दिसले. त्यावर कसलातरी लाल तवंग आला होता. पण तोंडातील वाळूपेक्षा त्याने चुळा भरलेल्या बर्या असे म्हणून त्याने त्याच पाण्याने तोंड धुतले व मानेवरुन ओला रुमाल फिरवला. तेवढ्यानेही त्याला बरे वाटले.
जमिनीलगत जरा गार वार्याचा झोत आल्यावर त्याला अजून बरे वाटले. बाहेर बहुधा हवा ठीक असावी. त्याने सरकता दरवाजा (तो आता वाळूमुळे सरकायचा थांबला होता), ढकलला व बाहेर आला. वरुन खाली घुसणारा वारा खरोखरीच जरा थंड झाला होता. त्या वार्याच्या झुळकीबरोबर त्याच्या कानावर टमटमचा आवाज पडला. थोडे कान देऊन ऐकल्यावर तर त्याला लोकांचे बोलणेही ऐकू आले. बरीच माणसे बोलत असावीत का भास होता तो? का लाटांची कुजबूज? त्याने आकाशाकडे नजर टाकली. ते तर चांदण्यांनी ओथंबले होते.
त्याने मागे चाहूल लागल्यावर मागे वळून पाहिले. हातातील फावड्याने ती जमा केलेली वाळू कौशल्याने केरोसीनच्या अर्ध्या कापलेल्या रिकाम्या डब्यात भरत होती. तिच्या मागे त्यांच्याच अंगावर कललेली वाळूची काळसर भिंत उभी होती. ते डबे भरल्यावर तिने ते दोन हातात उचलले व तो जेथे उभा होता तेथे आली. जाताना तिने त्याच्याकडे सुचक कटाक्ष टाकला व म्हणाली,
“वाळू !”
तिने जेथे तो त्या शिडीवरुन खाली उतरला होता तेथे ती वाळू ओतली. तिने मग चेहर्यावर आलेला घाम पंच्याने पुसला. त्याने पाहिले तर तिने ओतलेल्या वाळूचा तेथे ढीगच झाला होता.
“मी वाळू काढते आहे” ती म्हणाली.
“हे काम कधीच संपणार नाही. तुम्ही कितीही वेळ काम करा.”
तिच्या पुढच्या फेरीवेळी तिने रिकाम्या हाताच्या बोटाने त्याला बरगड्यात ढोसलेे. त्याला कळेना, हातातील दिवा खाली ठेऊन तिच्या या कृतीचे उत्तर द्यावे की तसेच दिवा घेऊन उभे रहावे! पहिल्या पर्यायाने तो स्वत:शीच दचकला. पण त्याने तो दिवाच हातात ठेवण्याचे ठरविले व चेहर्यावर बावळट हसू आणून तो तिच्याकडे गेला. त्याच्या त्या हास्याचा अर्थ त्यालाच माहीत नव्हता. तिने तोपर्यंत परत वाळू उपसण्यास सुरुवात केली होती. जसा तो तिच्याजवळ आला तशी त्याच्या अवाढव्य सावलीने तिच्या मागची भिंत व्यापली.
“अं हंअऽऽऽऽ नको....”
ती कुजबुजली. तिची पाठ अजूनही त्याच्याकडे होती.
“मला अजून सहा डबे भरायचे आहेत. ती वाळू वाहून नेणारी गाडी येईलच इतक्यात.”
त्याचा चेहरा थोडा कठोर झाला. जो विचार इतकावेळ टाळण्याचा प्रयत्न करीत होता तोच उसळी मारुन वर आलेला पाहून त्याला स्वत:चीच शरम वाटली. ती अंगाला चिकटलेली वाळू त्याच्या विरोधास न जुमानता त्याच्या नसानसातून वाहते आहे असा त्याला भास झाला.
“मी करु का तुम्हाला मदत?” त्याने विचारले.
“नको! नको! पहिल्याच दिवशी कशाला तुम्हाला कामाला लावायचे” परत एकदा गालाला खळी.
“पहिला दिवस? त्याची काळजी नको. मी फक्त आजची रात्रच इथे असणार आहे.”
“असं म्हणताय? बरं!
“मला कामाची सवय आहे! ते दुसरे फावडे द्या मला!”
“तुमचे फावडे तेथे पलिकडे आहे !”
त्याने पाहिले तर काय, तेथे फावडे, तसले डबे रांगेत लावून ठेवलेले त्याला दिसले. ‘म्हणजे त्यांनी मगाशी हे टाकले होते तर खाली!’. सगळी जय्यत तयारी झाली होती. त्याला एकच वाईट वाटले की ते त्याला एक साधा कामगार समजले होते. त्या फावड्याचे दांडके ओबडधोबड होते व वापरुन वापरुन त्याच्यावर पुटे चढली होती. त्याचा आता तिला मदत करण्यातील रस निघून गेला होता.
“गाडी आली आहे शेजारी” ती म्हणाली.
तो काम टाळतोय हे लक्षात न आल्यामुळे ती हातवारे करुन बोलत होती. तिच्या आवाजात उत्साह होता व पहिल्यापेक्षा त्या आवाजात त्याला जरा आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटला. मगाशी अस्पष्ट ऐकू येणारे माणसांचे आवाज एकदम मोठ्याने ऐकू येऊ लागले. बोलण्याचे, हाका मारण्याचे व हास्यविनोदांचे आवाज एकदमच ऐकू येऊ लागले. तिच्या कामातील लयीने त्याला क्षणभर विचार करण्यास भाग पाडले. ‘एवढ्या छोट्या खेड्यात एका रात्रीसाठी आलेल्या पाहुण्याला कामाला लावण्यात त्यांना एवढे काही विचित्र वाटत नसावे.’ नुसते बसून तरी काय करणार, असे म्हणून त्याने टाचेनेच त्या वाळूत एक खड्ड्डा केला व त्यात दिवा ठेवला.
“कुठूनही सुरुवात केली तरी चालेल ना?” त्याने विचारले.
“नाही, कुठेही नाही.”
“इथे ?”
“हो चालेल पण त्या भिंतीच्या कडेने सरळ खणा म्हणजे झाले.” ती म्हणाली.
“गावात सगळे याचवेळी वाळू साफ करतात का?” त्याने विचारले.
“हो! रात्री वाळूत आर्द्रता जरा जास्त असल्यामुळे खणायला जरा सोपे जाते. मोठी मोठी ढेकळे निघू शकतात! कोरडी वाळू केव्हा खाली येईल सांगता येत नाही” ती म्हणाली.
त्याने वर पाहिले. तेथे खरोखरच एक वाळूचे मोठे ढेकुळ विवराच्या किनार्यावरुन बाहेर आले होते.
“हे धोकादायक नाही?”
“नाही. हे सगळ्यात सुरक्षित आहे!” ती हसत म्हणाली.
“ते बघा धुके आत येण्यास सुरुवात झाली.”
“धुके ?”
ती बोलत असतानाच आकाशात मगाशी स्पष्ट दिसणार्या चांदण्या अस्पष्ट झाल्या व पिंजलेला ढग त्या विवराच्या तोंडाशी घिरट्या घालू लागला.
“वाळूत खूप सारे दव शोषले जाते. वाळूतील मीठ त्यामुळे कठीण होते. एखाद्या दगडाप्रमाणे”
“विश्वास बसायला कठीण आहे”
“विश्वास ठेऊ नका किंवा ठेवा. जे खरे आहे ते खरे आहे. ओहोटीनंतर वाळलेल्या वाळूवरुन मोठ्या गाड्या जातात. अगदी सहजच !”
“आश्चर्यकारकच म्हणायला हवे !”
“हे खरे आहे. ते वरती दिसते ते ढेकूळ रोज रात्री मोठे होत जाते. जेव्हा वारे त्या दिशेने वाहते तेव्हा वाळू आज छत्रीवर पडत होती तशी पडते. दुपारी जेव्हा कोरडी होते तेव्हा ती वाळू एकदम खाली येते. ती जर एखाद्या कुजलेल्या खांबांवर पडली तर कपाळमोक्षच !”
तिच्या गप्पा अनुभवाच्या होत्या. तिच्या अनुभवाबद्दल बोलताना ती अगदी भारावून बोलत होती. तिच्या बोलण्यामधे एक प्रकारचा आपलेपणा त्याला जाणवू लागला होता. ती काय म्हणत होती त्यात त्याला विशेष रस नव्हता पण त्याला आता तिच्या जाड्याभरड्या कपड्यात झाकलेल्या शरीराचे सूप्त आकर्षण वाटू लागले होते.
मनात तो विचार आल्याबरोबर त्याने सर्व शक्तीने आपल्या हातातील फावडे त्या वाळूत खुपसले......
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
8 Feb 2017 - 8:30 pm | एस
अरे वा! ह्या कथेवर बहुधा एक चित्रपटही निघाला आहे ना?
9 Feb 2017 - 11:04 am | आबा पाटील
Woman in the dunes:
https://en.wikipedia.org/wiki/Woman_in_the_डून्स
http://www.imdb.com/title/tt0058625/
8 Feb 2017 - 8:32 pm | एस
अरे वा! ह्या कथेवर बहुधा एक चित्रपटही निघाला आहे ना?
8 Feb 2017 - 9:16 pm | जव्हेरगंज
हेच हवे होते. अतिशय वेगळे विश्व....!
भालो..!!!
9 Feb 2017 - 12:08 am | अॅस्ट्रोनाट विनय
सुंदर कथानक, सफाईदार भाषांतर. तुमची मेहनत जाणवत आहे. पु भा ल टा
एवढ्या दर्जेदार कलाकृतीसाठी एवढे कमी प्रतिसाद!!
9 Feb 2017 - 9:22 am | प्रचेतस
अप्रतिम
9 Feb 2017 - 11:30 am | राजाभाउ
+१ असेच म्हणतो.
9 Feb 2017 - 11:05 am | आबा पाटील
खूप छान .... वाचायाला मजा येत आहे.
9 Feb 2017 - 12:07 pm | गणामास्तर
आता कथा काय वळण घेईल याची जाम उत्सुकता लागून राहिली आहे.
9 Feb 2017 - 4:21 pm | बापू नारू
छान आहे कथा ,पुढचे भाग येउद्या पटापट
9 Feb 2017 - 7:34 pm | उगा काहितरीच
वा छान अनुवाद अन् कथा पण आता पकड घेतेय . अंदाजे किती भागाची आहे पूर्ण कादंबरी ?
12 Feb 2017 - 9:27 pm | पैसा
खूपच इंटरेस्टिंग!