मोबियस प्रकरणे भाग -२ : प्रकरणे १७-१८

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Feb 2017 - 7:30 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

दरवाजाची चौकट एकदम अस्पष्ट झाली व तरंगत कुठेशी नाहीशी झाली. चंद्र...चंद्राचा रोगट प्रकाश... त्याचे डोळे त्या प्रकाशाला सरावताच त्या विवराचा तळ एखाद्या चमकदार पाण्यासारखा चमकू लागला. जणू काही त्या पाण्याला नवी पालवीच फुटली आहे.

मोबियस

१७

तेवढ्यात विवराच्या कडेला पंख फडकताना जसा आवाज येतो तसा आवाज झाला. त्याने हातात कंदील घेऊन तेथे धाव घेतली. सतरंजी गुंडाळलेले एक पुडके तेथे वाळूवर पडले होते. आजूबजूला कसलाच आवाज येत नव्हता. तो मोठ्याने ओरडला. पण त्याला काहीच प्रत्युत्तर आले नाही. त्याने परत एकदा आवाज दिला पण हुं नाही की चू नाही. मोठ्या उत्सुकतेने त्याने त्या गाठोड्याची दोरी सोडली. त्यात वर जाण्याची काही आयुधे असतील अशी त्याला खात्री वाटत होती. ‘त्यांना तोंड दाखवायला जागा नव्हती म्हणूनच त्यांनी तोंड चुकवत हे गाठोडे टाकून पळ काढला असणार.’ त्याने स्वत:ची समजूत काढली.

पण त्यात फक्त लाकडाचे बूच लावलेली एक बाटली व वर्तमानपत्रात गुंडाळलेले कसलेतरी पुडके होतं. त्या पुडक्यात सिगरेटची तीन पाकिटे होती. बस्स.... त्याने ती सतरंजी उचलली आणि जोरात झटकली. पण त्यातून वाळूशिवाय काहीच पडले नाही. काहीतरी चिठ्ठीचपाटी तरी असेल अशी त्याला आशा वाटत होती पण छे! बाटलीत हातभट्टीची दारु होती ज्याला आंबूस वास येत होता.

काय अर्थ होता याचा? त्यांनी तहाचा हात तर पुढे केला नव्हता? त्याने ऐकले होते की काही जमातीत मैत्रीसाठी सिगरेटची पाकिटे देण्यात येतात आणि पाहुण्याचे स्वागत मद्याने करण्याची जगभर जुनी परंपरा आहेच. त्यांना परिणामांची कल्पना आल्यावर त्यांनी मैत्रीचा हात पुढे केलेला दिसतोय!! गावाकडील लोकांना भावना उघडपणे दाखविणे अवघड वाटते त्यामुळे त्यांनी सुरुवात अशी केलेली दिसते...

त्याने काही तक्रार न करता त्या वस्तू स्वीकारल्या. सिगारेटस् तर आत्ता महत्वाच्या होत्याच. मागचा आठवडा सिगरेटशिवाय त्याने कसा काढला होता त्याचे त्यालाच माहीत. सवयीने त्याने त्या सिगरेटच्या पाकिटावरची लाल रेष सर्रकन खाली ओढली. पाकिट हातावर मारत त्याने एक सिगारेट बाहेर काढली. ज्या बोटात त्याने ती धरली होती ती बोटे थरथर कापत होती. कंदीलाच्या ज्योतीवर त्याने ती सिगरेट शिलगावली. त्या सिगरेटचा मंद स्वाद त्याच्या रक्तात भिनला व सर्वदूर पसरला. त्याच्या ओठाची संवेदना नष्ट झाल्यासारख्या त्याला वाटले व त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. कोणीतरी गळा आवळत असल्यासारखे त्याचा श्वास कोंडला, त्याच्या शरीरावर काटा आला.....

मद्याची बाटली छातीपाशी घट्ट धरुन तो त्राण गेलेल्या पायावर पळत पळत घरात आला. त्याचे डोके अजून भिरभिरत होते. त्याने तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला पण कितीही प्रयत्न केला तरी त्याला सरळ बघताच येत नव्हते. त्याने मान तिरकी केल्यावर त्याला डोळ्याच्या कोपर्‍यातून तिचा छोटा चेहरा दिसला.

“भेट आली आहे. हे बघ...” त्याने बाटली हलवत म्हटले.

“शहाणे आहेत. त्यांनी आपल्याला आपली सुटका साजरी करण्यासाठी आधीच दिलेली दिसते. मी म्हटले नव्हते तुला. जे झाले ते झाले. माझ्या बरोबर घेणार का ?”

उत्तर देण्याऐवजी तिने आपले ओठ अजूनच आवळून घेतले व डोळे मिटले. तिला एवढे फुगायला काय झालंय? बहुधा त्याने तिचे हातपाय अजून सोडले नव्हते म्हणून ती चिडली असावी. मूर्ख बाई....जर तिने त्याच्या एकातरी प्रश्नाचे धड उत्तर दिले असते तर त्याच वेळी त्याने तिची सुटका केली असती. कदाचित हातचे सावज निसटून चालले आहे हे पाहून ती अस्वस्थही झाली असेल. शक्य आहे. शेवटी ती स्त्री आहे आणि तीही तरुण, शिवाय विधवा...

“तुला सिगारेट ओढायची असेल तर तुझ्यासाठी मी ती पेटवू शकतो.” तो चेष्टेने म्हणाला.

“पाणी देऊ का ?”

“नको ! मी ठीक आहे.”

“घाबरु नकोस. तुला माहीत आहे की मी काही तुझा शत्रू नाही किंवा मी तुझा तिरस्कार करतो म्हणून तुझ्यावर ही वेळ आलेली नाही. हे तुला समजतंय....समजतंय ना? मला हे करणे भाग पडले त्यांच्यामुळे. तुझ्या या परिस्थितीने त्यांना थोडेसे का होईना वठणीवर आणलेले दिसते.”

“ते सिगरेट आणि मद्य जेथे पुरुष काम करतात तेथे दर आठवड्याला टाकतातच. त्यात एवढे काही विशेष नाही.”

“ दर आठवड्याला टाकतात म्हणजे?” एखादी मुस्किना जातीची माशी काचेवर आपटता आपटता जशी दिशा बदलते तशी त्याची अवस्था झाली. या माशा जवळजवळ आंधळ्या असतात...चेहर्‍यावरील आश्चर्य लपविण्याचा प्रयत्न न करता तो कर्कश्य आवाजात ओरडला,

“हे सगळे आपल्यासाठी करण्याची त्यांना बिलकुल गरज नाही. त्यापेक्षा त्यांनी आपल्याला येथून बाहेर काढले तर त्या वस्तू आपण स्वत:च विकत घेऊ शकू.”

“पण काम कष्टप्रद आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. शिवाय आपण गावासाठी काम करतोय आणि आपल्या खर्चाची जबाबदारी त्यांनीच घेतली पाहिजे.”

"म्हणजे हे सगळे येथे टाकून ते त्याने प्रतिकार करु नये असे तर सुचवत नाहीत ना ? नाही ! हे त्याच्यापेक्षा भयंकर आहे.’ तो मनाशी पुटपुटला. त्यांनी त्यांच्या रोजच्या कामाच्या हजेरीपटावर त्याची एक कामगार म्हणून आधीच नोंद केलेली दिसते.

माझ्या समाधानासाठी मी तुला एक प्रश्न विचारतो. “हा अनुभव घेणारा मी पहिलाच आहे का?”

“नाही. आमच्याकडे मदत पोहोचतच नाही. जे काम करु शकतात ते एकामागे एक गाव सोडून गेले.. साहजिकच आहे....येथे अठराविश्वे दारिद्य्र आहे. येथे वाळूशिवाय आहे काय?”

“काय होणार आहे या गावाचे? तो पडलेल्या आवाजात म्हणाला. तुम्ही माझ्याशिवाय अजून कोणाला पकडून ठेवले आहे का?”

“हो! बहुतेक मागच्या वर्षीच. भेटकार्डे विकणारा होता तो...”“भेटकार्डे विकणारा?”

“पर्यटकांसाठी वस्तू करणार्‍या कुठल्यातरी एका कंपनीचा विक्रेता येथील कामगार संघटनेच्या पुढार्‍याला भेटायला आला होता. तो म्हणत होता की जर येथील निसर्गाची पुरेशी जहिरात केली तर...”

“आणि तुम्ही त्याला पकडलेत?”

“माझ्या शेजारीच असलेल्या घरात त्या काळात कोणीच मदतीला नव्हते.”

“मग काय झाले?”

“असं म्हणतात तो नंतर लगेचच वारला. बहुधा तो धट्टाकट्टा नसावा आणि शिवाय दिवस वादळाचे होते आणि काम नेहमीच्या मानाने जास्तच होते.”

“त्याने त्याच वेळी सुटका करुन घ्यायला हवी होती. का नाही त्याने प्रयत्न केला?”

तिने यावर काही उत्तर दिले नाही. कारण स्पष्ट होते. प्रश्न निरर्थक होता. त्याने सुटका करुन घेतली नाही कारण तो सुटका करुन घेऊ शकला नाही. यात प्रश्नोत्तराची काही गरजच नव्हती....

“अजून कोणी?”

“वर्षाच्या सुरवातीला एक दारोदारी हिंडून पुस्तके का काहीतरी विकणारा विद्यार्थी आला होता.”

“विक्रेता? गांजा का ?”

“अहं मला चांगले आठवते आहे तो त्या पुस्तिका दोन रुपयाला विकत होता. कशाच्यातरी विरोधी लिहिले होते त्यात....”

“हंऽऽऽ आले लक्षात प्रस्थापितांविरुद्ध मोहिम असणार ती.”

“तुम्ही त्यालादेखील पकडले की काय?”

“तो अजूनही आपल्या शेजार्‍याकडे असेल....तीन घरे सोडून.”

“आणि त्यांनी त्याचीही शिडी काढून घेतली असणार. बरोबर ना ?”

“तरुण मुले येथे टिकत नाहीत मग काय करणार? शहरांमधे पगार चांगला मिळतो, शिवाय चित्रपट, खाण्याची चंगळ आणि सदा उघडी असलेली बाजारपेठ हीही कारणे आहेतच !”

“पण आत्तापर्यंत एकानेही येथून सुटका करुन घेतली नाही ?”

“एक होता धटिंगण. त्याच्याकडे एक मोठा सुरासुद्धा होता. त्याच्याबद्दल वर्तमानपत्रातही आले होते ना! त्याची शिक्षा संपल्यावर त्याला त्यांनी परत आणले. आता तो त्याच्या कुटुंबियांबरोबर शांतपणे राहतोय असे कानावर आले आहे”

“मी त्यांच्याबद्दल बोलत नाहीए ग बाई!. जे येथून पळून गेले आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय मी !”

“फार पूर्वी एक कुटुंबच्या कुटुंब येथून रात्री पळून गेले होते. मला आठवते आहे. ते घर बरेच दिवस रिकामे पडले होते. शेवटी ते मोडकळीस आले. येथे या वाळूच्या टेकड्यात असे एखादे घर मोडकळीस येणे हे फार घातक समजतात. एखादा भोक पडलेला बंधारा...”

“त्यानंतर कोणीच नाही ?”

“नाही एकही नाही. माझ्या माहितीनुसार तरी नाही.”

“विचित्रच आहे”. ते ऐकताच त्याची कानशिले तापली व घसा दाटला.

ते बघताच ती खडबडून जागी झाली.

“काय होतंय? तुम्हाला बरे वाटत नाही का ?”

“हंऽऽऽऽऽ असल्या गोष्टींनी वेदना होतात.”
त्याने तिचा पांढुरका पडलेला हात कुरवाळला. त्याने बांधलेल्या दोरीत बोटे सरकवली आणि तिची नाडी तपासली.

“तुलाही जाणवत आहेत ना ते ठोके? सगळे व्यवस्थित आहे. माफ कर मला पण तुला तुझ्या तक्रारी त्यांना सांगाव्या लागतील. तुझ्या या अवस्थेला तेच जबाबदार आहेत.”

“माफ करा! पण माझ्या कानामागे जरा खाजवता का?”

ती विनंती ऐकून तो एकदम दचकलाच. त्याला नकार द्यायचेही भान उरले नाही. तिच्या कानामागे वाळू आणि घामाच्या मिश्रणाने लोण्यासारखा एक थर जमा झाला होता. एखाद्या फळावरील सालात नख खुपसताना जसे वाटावे तसे त्याला वाटू लागले.

“खरं सांगते, आजवर येथून कोणीही सुटलेला नाही.”

दरवाजाची चौकट एकदम अस्पष्ट झाली व तरंगत कुठेशी नाहीशी झाली. चंद्र...चंद्राचा रोगट प्रकाश... त्याचे डोळे त्या प्रकाशाला सरावताच त्या विवराचा तळ एखाद्या चमकदार पाण्यासारखा चमकू लागला. जणू काही त्या पाण्याला नवी पालवीच फुटली आहे.

“ठीक आहे....मग मीच तो पहिला माणूस असेन...”

१८

सुटकेची वाट पाहणे अत्यंत अवघड होते. सुटकेच्या मार्गावर काळाच्या अनेक दाट घड्या पडल्या होत्या. प्रत्येक घडीपाशी थांबल्याशिवाय त्याला पुढे जाता येत नव्हते. प्रत्येक घडीत संशयाच्या सुया दडवून ठेवल्या गेल्या होत्या. या संशयाचे निराकरण किंवा त्यांना टाळून जाणे हे एक मोठे दिव्यच होते.
रात्र वाट पाहण्यात गेल्यावर पहाट उजाडली. घराच्या एकुलत्या एक तावदानावर, गोगलगाय जशी भिंतीवर चिकटते तसे चिकटून सकाळ त्याच्याकडे दात विचकत हसत होती.

“जरा पाणी मिळेल का?”

त्याला बहुधा डुलकी लागली असावी. त्याचा शर्ट व विजार घामेजली होती. त्या घामाला वाळू चिकटून त्याचा एक थर त्यावर बसला होता. पंचा तोंडावर घ्यायला विसरल्यामुळे त्याचा चेहरा, नाक व घसा कोरडा पडला होता.

“पाणी मिळेल का....?”

तिचे सर्व शरीर कडक झालेल्या वाळूच्या थरात झाकले गेले होते. तिचा आवाजही तापात फणफणल्यासारखा खोल गेला होता. तिच्या वेदना जणू त्याच्याशी कुठल्यातरी माध्यमाने जोडल्या गेल्या होत्या. त्याने किटलीवरचे प्लास्टिक काढले, पाणी स्वत:च्या घशात ओतले. त्याने चूळ भरण्याचा प्रयत्न केला पण एवढ्याशा पाण्यात ते अशक्य होते. त्या थोड्या पाण्यामुळे त्याच्या तोंडात वाळू मात्र जमा झाली. त्याने निष्काळजीपणे ती वाळू त्या पाण्याबरोबर गिळली....
जे थोडेफार पाणी त्याने गिळले ते लगेचच घामाच्या रुपाने शरीराबाहेर टाकले गेले. पाठीवर, छातीवर व पोटाच्या आसपासची कातडी सोलून काढल्यासारख्या त्याला वेदना होत होत्या. अपराधीपणाच्या भावनेने त्याने त्या किटलीचे तोंड तिच्या तोंडात खुपसले. तिने ते दातात धरुन कबुतरासारखा आवाज करत त्या उरलेल्या पाण्याचा एक घोट घेतला. एका घोटातच ती किटली रिकामी झाली. तिच्या जड झालेल्या पापण्यांआड पहिल्यांदाच थोडा राग उमटला.

तो वाळू झटकत जमिनीवर उभा राहिला. एखाद्या ओल्या पंचाने तिचे तोंड पुसावे का? त्याने विचार केला. घामाने ती पूर्ण ओली होण्यापेक्षा ते ठीक झाले असते. असे म्हणतात एखाद्या संस्कृतीची पातळी ही तुमचे शरीर किती स्वच्छ आहे यावरुन सहज समजते. आत्मा आहे हे गृहीत धरले तर तो कातडीच्या खालीच असणार असे मानायला जागा आहे. विचार करता करता त्याच्या मनात आले. आत्म्याला कातड्याच्या फडक्यात गुंडाळले आहे असेही म्हणता येईल. जर आता तो एक क्षणभरही थांबला तर त्याची कातडी सोलवटून खाली पडेल असे त्याला वाटू लागले.

त्याने पाण्याच्या रांजणात पाहिले आणि तो चित्कारला, “अरेच्चा हा तर रिकामा आहे. पूर्णपणे रिकामा. कळलं का? पूर्ण रिकामा.”
त्याने त्या रांजणात हात घातला आणि पाणी ढवळतात तसा ढवळला. खाली चिकटलेली वाळू त्याच्या बोटांना जेमतेम लागली. कातडीखाली अनेक आळ्या वळवळताएत असा त्याला भास होऊ लागला.

“हलकट ! पाणी देण्यास विसरले बहुतेक. आता ते आणतील की नाही याचीच मला शंका आहे.”

हे तो स्वत:ची समजूत काढण्यासाठी म्हणत होता हे त्याला चांगलेच माहीत होते. ती तीन चाकी गाडी काम संपवून नेहमी पहाटेच्या थोडी अगोदर परत जात असे. त्या हलकटांचा विचार काय होता हे आता त्याच्या लक्षात आले. त्यांनी त्याचे पाणी तोडले होते. ती भिंत खालून खणण्यातील धोका माहीत असूनसुद्धा ते त्याला ते करण्यास भाग पाडणार होते. त्यांना अजिबात माणुसकी नव्हती. हे सगळे माहीत झाल्यावर ते त्याला जिवंत सोडणे शक्यच नव्हते.

दरवाजात उभे राहून त्याने आकाशाकडे नजर टाकली. आकाशात पहाटेची लाल छटा दिसल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला. पिंजल्यासारख्या ढगांमुळे पाऊस पडेल असे वाटत होते. त्याने बाहेर टाकलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर त्याच्या शरीरातील बाष्प बाहेर टाकले जात होते.

“अरे देवा ! त्यांचा विचार तरी काय आहे? मला ठार मारायचे आहे का त्यांना?”

ते ऐकल्यावर ती थरथर कापू लागली. बहुतेक काय चालले आहे याची तिला कल्पना आली असणार. शेवटी तीही या कटात सामील होती. तिला हीच शिक्षा योग्य आहे. पण तिचे काय हाल चालले आहेत हे जर त्यांना कळले नाही तर या सगळ्याचा उपयोग होणार नाही आणि त्यांना कळले तरी ते गरज पडली तर तिचाही बळी देतील याची त्याला खात्री होती. बहुतेक तिलाही त्याची खात्री असल्यामुळेच ती घाबरली असणार. एखाद्या प्राण्याला कुंपणातील फट दिसताच त्याने सुटकेचा नि:श्वास टाकावा आणि नंतर त्याला कळावे की ती फट त्याला पिंजर्‍यात घेऊन जाणार आहे त्यावेळेस त्याची जी अवस्था होईल तशी त्याची अवस्था झाली. सलग दुसर्‍या वेळेस तो पराभूत झाला होता आणि पुढची खेळी त्यांच्या हातात होती...

पण त्याला घाबरुन चालणार नव्हते. जेव्हा एखादा बुडणारा माणूस भुकेने किंवा तहानेने कोसळतो तेव्हा तो त्याला त्याच्या शारीरिक गरजा भागत नाहीत याची भिती वाटते म्हणून. त्याचवेळी त्याच्या पराभवास सुरुवात झालेली असते. त्याला घाम फुटला व एक थेंब त्याच्या नाकाच्या शेंड्यावरुन खाली ओघळला. जर तो घामाच्या रुपाने बाहेर फेकल्या जाणार्‍या पाण्याचा हिशेब करु लागला असेल तर त्यांचा उद्देश सफल झाला असेअ म्हणावे लागेल. गोंधळ घालून त्याचा काही फयदा होणार नव्हता.

“दोर जरा सैल करु का मी?” त्याने विचारले.

तिने तिचा श्वास रोखला.

“तुला नको असेल तर राहू देत. जर तुला पाहिजे असेल तर मी ते सैल करेन पण एका अटीवर. तू ते फावडे मला विचारल्याशिवाय हातात घ्यायचे नाही. कबूल ?”

“कृपा करा माझ्यावर!” जशी वार्‍याने छत्री अचानक उलटी होती तशी आत्तापर्यंत अलिप्त असलेल्या त्या बाईने गयावया करण्यास सुरुवात केली. मला सगळे कबूल आहे, पण मला यातून सोडवा. कृपा करा.”

त्या दोरामुळे तिची मनगटे काळीनिळी पडली होती व त्याच्यावर वाळूचा एक पातळ थर जमला होता. ती होती तशी उताणी पडून आपले घोटे कुरवाळीत होती. तिने मग त्या दोराच्या गाठी हळुवारपणे सोडविण्याचा प्रयत्न केला. रडू फुटू नये म्हणून तिने तिचे दात गच्च आवळून घेतले होते. तिच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले. ती धडपडत कशीबशी उभी राहिली व मोठ्या कष्टाने तिने तिची मान सरळ केली. एकदम उभे राहिल्यामुळे ती त्याच अवस्थेत थोडा वेळ झुलत उभी राहिली.

तो तेथेच शांतपणे बसून राहिला. दोनतीन वेळा तो त्या वाळूत तिरस्काराने थुंकला. त्याला झोप येत नव्हती पण त्याची इंद्रिये ओल्या टीपकागदासारखी जड झाली होती. समोर वाळू होती, ती होती व एक पाण्याचा रिकामा रांजण होता, डोक्यावर सूर्य होता. त्याला हेही माहीत होते की कुठेतरी वादळाचा केंद्रबिंदू होता ज्याने समोरचे चित्र भंगले होते. हे गणित कसे सोडवावे या बाबतीत त्याच्या डोक्यात गोंधळ उडाला.

ती उठली अणि दरवाजाकडे गेली.

“कुठे चालली आहेस तू ?”

ती काहीतरी पुटपुटली जे त्याला ऐकू आले नाही. ती अडखळत त्या कशाबशा झाकलेल्या दुसर्‍या खोलीत गेली.....

सगळे निरर्थक आहे. तो अचानक उदास झाला....

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

एस's picture

22 Feb 2017 - 7:47 pm | एस

वाचतोय.