मोबियस भाग -२ : प्रकरणे- २५-२६

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 Mar 2017 - 7:52 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

....हंऽऽऽऽ रेडिओ आणि आरसा, आरसा आणि रेडिओ. जणूकाही सारे आयुष्याचे सार फक्त या दोन शब्दात सामावले आहे. या दोन्ही वस्तूत एक साम्य आहे बरं का. या दोन्ही वस्तू दोन माणसातील दुवा हो़ऊ शकतात. कदाचित आपल्या अस्तित्वाच्या गाभ्यात असलेली लालसा या वस्तू परावर्तित करत असतील किंवा प्रक्षेपित करत असतील. ठीक आहे! गेल्यावर मी एक रेडिओ विकत घेऊन तिला पाठवून देईन.’ सगळ्यात उत्तम रेडिओ..’ त्याने ठरविले.....

मोबियस

२५

वाळू गोळा करणारे कामाला लागण्याआधी त्याला गाव पार करणे आवश्यक होते. त्याच्याकडे अंदाजे एक तास होता. त्या टेकाडाची एक उतरण गावाला मिठीत घेण्यासाठी त्या दिशेला पसरत चालली होती. शेवटी तिचे एका रस्त्यात रुपांतर झाले होते. तेथे त्या टेकडीचे कडे एकदम अंतर्धान पावले होते व त्या वाळूचे ढीग सपाट होत होते. धुक्यात लुकलुकणारे दिवे जर त्याने उजव्या बाजूला ठेवून वाटचाल केली असती तर तो त्या ठिकाणी पोहोचला असता. साधारणत: एक मैल...त्यापलिकडे गावकुस...तेथे गावकुसाबाहेर त्याला कुठली घरे पाहिलेली आठवत नव्हती. गावातून जर त्याने मुसंडी मारली तर त्याला हमरस्त्याला पोहोचण्यास फार तर पंधरा मिनिटे लागली असती. तेथे पोहोचले तर लढाई जिंकल्यात जमा होती. हमरस्त्यावर बसेस, गाड्या धावत होत्या व माणसेही वेडी नसावीत.

त्याच्या हिशेबाने त्याच्याकडे गावातून पलिकडे जाण्यासाठी तीस मिनिटे होती. वाळूत चालणे म्हणजे शक्तीचा अपव्यय. वाळूत पाय रुततात म्हणून नाही, तर ती पायांना विरोध करत नाही म्हणून. पळणे म्हणजे पापच! काळजीपूर्वक लांब लांब ढांगा टाकणे हे उत्तम. पण हा तोटा वाळू दुसर्‍याप्रकारे भरुन काढत होती. वाळूत चालताना पावलांचा आवाज येत नव्हता. त्याची तरी काळजी नव्हती.

‘हंऽऽऽऽ जरा खाली नीट बघत चाल...’ धडपडल्याने तसा काही फार फरक पडणार नव्हता पण परत एखाद्या विवरात पडला तर मात्र... काळाकुट्ट अंधार पसरला होता आणि ती वाळू खालीवर होणार्‍या लाटांप्रमाणे क्षितिजापर्यंत अनिर्बंध पसरली होती. त्या लाटांमधे छोट्या टेकड्या, लाटा आणि विवरे लपलेली होती. गावातील ज्या दिव्यांचे त्याने लक्ष्य ठेवले होते ते मधेच त्या लाटांमुळे दिसेनासे होत होते. जेव्हा त्याला ते दिवे दिसत नसत तेव्हा तो अंदाजे चालत होता. पण दुर्दैवाने त्या दिव्याकडे पाहताना त्याची पावले त्याच्या नकळत उंचवट्यांकडे वळत होती.

अरेच्च्या ! परत चुकला तो! जरा जास्तच डावीकडे गेला होता तो. तो असाच चालत राहिला असता तर एव्हाना सरळ गावातच पोहोचला असता. त्याने वाळूच्या तीन टेकड्या पार केल्या तरी ते दिवे काही जवळ येत नव्हते. चकवा लागल्यासारखा तो त्याच त्याच ठिकाणी परत येत होता. त्याच्या डोळ्यात घाम उतरला. त्याने थांबून एक दीर्घ श्वास घेतला.

ती उठली असेल का? त्याच्या मनात आले. तो नाही हे कळल्यावर तिची प्रतिक्रिया काय झाली असेल? पण तिच्या लक्षात ते लगेचच येणार नाही. तिला तो मागेच कुठेतरी असेल असे वाटले असेल. आज ती फारच दमली असणार... एवढा वेळ झोप लागलेली बघून तिला आश्चर्य वाटेल कदाचित! मग दुखर्‍या मांड्यांमुळे तिला सकाळी काय झाले ते आठवेल. कंदील उचलताना ती लाजून स्वत:शीच हसेलही.

तिच्या त्या हास्याला तो जबाबदार आहे हे त्याला मुळीच मान्य नव्हते. जे काही झाले ते तिच्यामुळे, त्यामुळे अंतीम जबाबदारी तिचीच. शिवाय तो नाहिसा झाल्यामुळे तिच्या जीवनात असा काय मोठा फरक पडणार होता? एखादा रेडिओ किंवा आरसा त्याची जागा सहज भरुन काढू शकेल...त्याच्या मनात आले.

“तुमची खूपच मदत होते मला.” ती म्हणाली होती.

“मी एकटी होते त्यापेक्षा आता मला खूप उसंत मिळते. काम जवळजवळ दोन तास आधी संपते. मला वाटते या वेळात मी अजून काहीतरी काम करु शकेन. सांगेन मी त्यांना तसे. मी ते पैसे साठवेन व कदाचित एक दिवस मी रेडिओ किंवा आरसा घेऊ शकेन.”

हंऽऽऽऽ रेडिओ आणि आरसा, आरसा आणि रेडिओ. जणूकाही सारे आयुष्याचे सार फक्त या दोन शब्दात सामावले आहे. या दोन्ही वस्तूत एक साम्य आहे बरं का. या दोन्ही वस्तू दोन माणसातील दुवा हो़ऊ शकतात. कदाचित आपल्या अस्तित्वाच्या गाभ्यात असलेली लालसा या वस्तू परावर्तित करत असतील किंवा प्रक्षेपित करत असतील. ठीक आहे! गेल्यावर मी एक रेडिओ विकत घेऊन तिला पाठवून देईन.’ सगळ्यात उत्तम रेडिओ..’ त्याने ठरविले.

पण आरशाबद्दल ठरविताना त्याच्या मनाचा गोंधळ उडाला.. या वातावरणात आरसा खराब होणार. मागचा पारा उडणार सहा महिन्यातच! त्याचा पृष्ठभागही वाळूमुळे धुरकट होणार. तिच्याकडे आत्ता असलेल्या आरशाची हीच अवस्था झाली आहे. त्यात डोळा बघण्यास गेले तर नाक दिसत नाही आणि नाक बघण्यास गेले तर तोंड दिसत नाही... त्याने दिलेला आरसा किती काळ टिकेल याची त्याला पर्वा नव्हती.. आरसा आणि रेडिओमधे एक मुलभूत फरक होता. तिला आरशात पाहण्यासाठी तेथे दुसरे कोणीतरी हवे ना? नाहीतर दुवा कसा प्रस्थापित होणार?

आत्तापर्यंत तिला धक्का बसला असेल. तिने कान टवकारले असतील. अजून कसा नाही आला हा माणूस? बदमाष पळूनही जाऊ शकतो... ती आरडाओरडा करेल का? का खचून जाईल? का तिचे डोळे आसवांनी डबडबतील? काहीही झाले तरी ती त्याची जबाबदारी नव्हती. त्याने तर आरशाची आवश्यकता नाही हे तिला सांगितले होते.
आत्ताशी तो फक्त अर्धेच चढून आला होता. अंहंऽऽऽ काहीतरी चुकतंय...येथेतर सपाट जमीन लागली होती.. ते दिवे कुठे गेले? तो चुकलाय यावर विश्वास न बसून तो पुढे गेला. एका वाळूच्या टेकाडावर तो उभा असूनही त्याला ते दिवे का बरे दिसत नव्हते? रस्ता चुकल्याच्या कल्पनेनेच त्याच्या पायातील शक्ती गेली. त्याने विचार न करता त्या उतारावरुन घसरत खाली जाण्यास सुरुवात केली. त्याच्या डोक्यातून दिशेचा विचारच गेला... वाळूच्या लाटांचे अनेक पेड खालपर्यंत पसरले होते. त्याला कशाचाच अंदाज येईना.. जास्तीतजास्त तो अर्धा एक मैल भरकटला असेल पण मग ते दिवे त्याला का दिसत नव्हते? कदाचित गावात जाण्याच्या भीतीने तो उजवीकडे भरकटला असणार पण ‘थोड्या उंचीवर जाऊन सगळा प्रदेश एकदा नजरेखाली घातलेला बरा.’ त्याने विचार केला.

पण त्याला कळेना तिचे मन तेथे एवढे का अडकले होते. एखाद्याला घराचे प्रेम वाटते कारण घराचा त्याग केला तर काहीतरी हरवते. तसे तर येथे काहीच नव्हते. ते जगणे सोडल्यास तिचे असे कोणते नुकसान होणार होते? त्याला समजेना...
रेडिओ व आरसा...रेडिओ आणि आरसा...
अर्थात रेडिओ तर तो तिला पाठवणारच होता पण रेडिओने तिचे नुकसान थोडेच भरुन येणार होते? तिला त्याला आंघोळ घालायला आवडायची, त्याचे काय? ती नेहमी त्याच्यासाठी पाणी वाचवून ठेवायची. त्याच्या अंगावर पाणी उडविताना तिला खुदकन हसूही यायचे... ही सगळी मजा आता गेली.
खरेतर तिने नसत्या भ्रमात राहू नये हे उत्तम. त्या दोघांमधे कसलाही करार झाला नव्हता त्यामुळे करारभंगाचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्या सगळ्या प्रकरणाचा त्यालाही त्रास झालाच होता की. उदा. त्याला ती आठवड्यातून एकदा येणारी गावठी दारु प्यायला लागायची. कसला घाणेरडा वास येत असे त्या दारुला... शिवाय तिच्या घामाचा असह्य वास. तिच्या शरीरावर बसलेला तो वाळूचा थर अणि त्या तप्त वाळूचा करपट वास आणि तिच्या निर्लज्ज हास्याने सगळे वातावरणच असभ्य व्हायचे त्याचे काय! त्या सगळ्यांची बेरीज केली तर त्याला बरेच काही सहन करायला लागले होते. तो तिच्यात काही काळ गुंतला होता हेच विश्वास बसण्यासारखे नव्हते.

गावकर्‍यांनी त्याच्या बाबतीत जे काही केले त्याचा हिशेब केला तर त्याचे कितीतरी पट जास्त नुकसान झाले होते. तिचे आणि त्याचे संबंध एवढे महत्वाचे नव्हते पण वेळ आल्यावर तो त्यांचा सूड उगविणार होता. काय केले म्हणजे त्यांना जास्तीतजास्त शिक्षा हो़ईल याबद्दल त्याचे ठरत नव्हते. पहिल्यांदा त्याने त्या गावाला आग लावून द्यायचे ठरविले होते मग तो विचार बाजूला सारुन त्याने त्यांच्या पिण्याच्या पाण्यात विष कालवायचे ठरविले. त्यांच्यावर सूड उगविण्याच्या कल्पनेने तो येथपर्यंत आला. आता ते विचार प्रत्यक्षात उतरविण्याची त्याला संधी आली होती पण त्याला ते विचार आता पोरकट वाटू लागले. सरकारदरबारी तक्रार करणेच योग्य ठरेल...त्याने स्वत:ला बजावले. आणि तक्रार केली तरी त्याला कुठल्या भयानक अनुभवातून जावे लागले याची त्यांना कल्पना येणे तसे कठीणच होते म्हणा पण सध्यातरी एखाद्या पोलिसचौकित तक्रार नोंदवावी हे बरे!

‘हंऽऽऽ आणि एक... थांब जरा कसला आवाज येतोय?’ तो आवाज नाहिसा झाला. कदाचित भास झाला असेल. पण त्या गावातील दिवे गेले कुठे? प्रदेश खालीवर असला तरी कुठूनतरी ते दिसायलाच हवेत. विचित्रच... बहुतेक तो डावीकडे फारच भरकटलेला दिसतोय. ‘काही हरकत नाही! उजव्या बाजूला जाऊ.’ तो मनात म्हणाला.
‘हांऽऽ आणि तिने त्याच्या अजून एका प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते....’ ते दोन तीन दिवस सतत पाऊस पडत होता. वाळू ढासळण्याचे प्रमाण खूपच वाढले होते. पण उडणारी वाळू मात्र नव्हती. पावसाच्या पहिल्या दिवशी बरेच श्रम केल्यावर दुसर्‍या दिवशी त्यांनी जरा आराम केला होता. त्या संधीचा फायदा घेऊन त्याने ती त्या विवरात का राहते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला बराच संयम पाळायला लागला होता. ते शोधून काढण्याच्या कामातील स्वत:ची चिकाटी बघून त्यालाच आश्चर्य वाटले होते. प्रथम तिने मोठ्या आनंदाने पाऊस अंगावर घेत त्याला प्रतिसाद दिला होता पण एक क्षण असा आला की तिच्या डोळ्यात पाणी आले. शेवटी तिने सांगितले की त्या वाळूत तिचा नवरा आणि मुलगा गाडले गेले होते व त्यांना तेथे सोडून जाण्याची कल्पनाही ती करु शकत नाही. ते तो समजू शकत होता. तिने आत्तापर्यंत त्याबद्दल अवाक्षरही काढले नव्हते तेही तो समजू शकत होता. पण दुसर्‍या दिवशी त्या अवशेषांचा शोध घेण्याचे त्याने ठरविले होते.

तो सतत दोन दिवस त्या अवशेषांसाठी तिने दाखविलेल्या जागेवर वाळू खोदत होता पण त्याला काही मिळाले नव्हते. मग तिने दुसरी जागा दाखविली. तेथेही काही सापडत नाही म्हटल्यावर तिने अजून एक जागा दाखविली...तो नऊ दिवस ती जागा शोधत होता पण त्याच्या हाती काही लागले नाही. शेवटी तर तिने कदाचित सरकत्या वाळूमुळे ते विवरच सरकले असण्याची शक्यता बोलून दाखविली होती. त्याला शेवटी कळून चुकले की ती एक लंगडी सबब होती. खरे कारण तिला सांगायचेच नव्हते. त्याच्या अंगात तिच्यावर चिडण्याइतकीही ताकद उरली नव्हती. अखेरीस त्याने कोण कोणाच्या मिंध्यात आहे याचा विचार करणेच सोडून दिले. तिला हे समजले असणार. पण...

काय आहे ते? त्याने स्वत:ला वाळूत झोकून दिले... अचानक त्याच्यासमोर ते गाव आले. बहुतेक तो विचारांच्या तंद्रीत चालत होता. सावरण्याआधीच त्याला कुत्र्याचे गुरगुरणे ऐकू आले. मग अनेक कुत्र्यांचे. त्या अंधारात त्यांचे जबडे चमकत होते. त्याने ती कात्री हातात घेतली आणि धाव घेतली. दुसरा मार्गच नव्हता.
तो सरळ त्या गावाच्या वेशीकडे धावत सुटला....

२६

तो जिवाच्या आकांताने धावू लागला...

त्या अंधुक प्रकाशात तरंगणारी घरे त्याच्यासमोर अडथळे म्हणून मधेमधे दिसत होती. वाहणार्‍या वार्‍याची गरम चव त्याच्या नरड्यात जाणवत होती. तुटत आलेल्या काचेच्या तावदानावर कसरत करण्यासारखेच होते ते. वाळू गोळा करणार्‍या टोळीने त्यांची घरे सोडली असणार पण समुद्रकिनार्‍यापाशी येण्यास त्यांना थोडा वेळ असावा. त्यांच्या त्या टमटमचा आवाजही त्याला ऐकल्याचे आठवत नव्हते. प्रसंग गंभीर होता.

अचानक अंधारातून एका काळ्या आकृतीने त्याच्यावर उडी मारली. त्याच्या गुरगुरण्यावरुन तो एक मोठा कुत्रा आहे हे त्याला उमगले. त्या कुत्र्याने त्याच्या पोटरीचा लचका तोडला. त्याने हातातील दोरीला बांधलेली कात्री त्या कुत्र्यावर चालविली. ते केकाटत अंधारात अदृष्य झाले. नशिबाने विजारीखाली त्याचे दात घुसले नव्हते म्हणून बरे. तेवढ्यात त्याचा पाय घसरला व एक कोलांटीउडी मारुन तो वाळूत पडला. पुढच्याच क्षणी तो उठून परत धावायला लागला. तेथे बहुतेक चार पाच कुत्रे असावेत. त्यांनी त्याला घेरले. बहुतेक त्या झोपडीतील लाल कुत्रा त्यांना अंधारातून काय करायचे ते सांगत असावा... त्याने एका शिंपल्यांच्या ढिगावरुन उडी मारली व तो कुंपणांमधून वाळत टाकलेले गवत तुडवत पळू लागला. शेवटी एका मोठ्या रस्त्याला लागला एकदाचा.

रस्त्याच्या पलिकडेच एक छोटा खड्डा होता. त्यात दोन मुले खेळत होती. ती मुले होती हे त्याच्या फार उशीरा लक्षात आले. त्याने फेकलेला दोर बाजूला घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते तिघेही गडगडत खाली गेले. ती मुले तारस्वरात किंचाळू लागली. त्यांना एवढ्या जोरात किंचाळण्याची काय आवश्यकता आहे? त्यांना बाजूला ढकलून तो धडपडत त्या खड्ड्याबाहेर आला आणि त्याच्या समोर तीन दिवे त्याचा रस्ता अडवून रांगेत उभे असलेले त्याला दिसले.

त्याच वेळी ती घंटा वाजू लागली. ती मुले रडत होती, कुत्री भुंकत होती. घंटेच्या प्रत्येक ठोक्याला त्याचे ह्रदय धडधडत होते. ‘सरळ समोरुन हल्ला करावा का... काय करायचे ते याच क्षणी करावे लागेल. ही शेवटची संधी आहे नंतर पश्चात्तापाची वेळ येईल...’ असा विचार करत असताना त्या दिव्यांचे झोत त्याच्या अवतीभोवती फिरत होते व जवळ जवळ येत होते. त्यांच्या शेजारी जो विचित्र आकार त्याला दिसला होता ती त्यांची गाडी होती. जरी त्याने मुसंडी मारली असती तरी तो मागच्या बाजूने पकडला गेला असताच. त्याच्या मागच्या बाजूस त्या धावणार्‍या मुलांच्या पायाचा आवाज येत होता. त्या मुलांना ओलीस ठेवले तर ते थांबतील या आशेने त्याने त्या दिशेने पाहिले तर तेथेही त्याला प्रकाशाचे झोत दिसले. तोही रस्ता बंद झाला होता.

त्याने त्याचे शरीर आक्रसले व ज्या दिशेने तो आला होता त्या दिशेने धूम ठोकली. त्या परिस्थितीत ती त्याची प्रक्षिप्त क्रिया होती. आरडाओरडा करीत ते गावकरी त्याचा पाठलाग करीत होते. त्याच्या पायातील शक्ती गेल्याचा त्याला भास झाला. पण त्यांच्यातील अंतर कायम ठेवण्यात सध्यातरी त्याला यश आले होते. किती अंतर त्याने कापले होते कोणास ठाऊक. वाळूची बरीच टेकाडे त्याने पार केली असणार. त्याच्या घशाला भयंकर कोरड पडली होती. बोटांनी घसा खरडावा अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली.

ती धोक्याची घंटा अजून वाजतच होती पण त्याचा आवाज पूर्वीइतका खणखणीत येत नव्हता. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाजही अस्पष्ट झाला. ते दिवेही त्याच अंतरावर खालीवर होत होते. त्याच्यासारखे बहुधा तेही दमले असावेत. आता कोण किती सहन करु शकतो यावर सगळे अवलंबून असणार. पण तो जास्त विचार करु शकला नाही. त्या ताणाखाली त्याची बुद्धी लुळी पडली होती. हे असे होणे फार धोकादायक.

त्याचे जोडे वाळूने भरले होते. त्याने सगळीकडे नजर फिरवली. त्याचा पाठलाग करणारे थोडे उजव्या बाजूला गेल्यासारखे त्याला वाटले. का बरे ते उजवीकडे गेले असतील? कदाचित त्यांना हा तीव्र उतार टाळायचा असेल.कदाचित तेही दमले असतील... असे म्हणतात पाठलाग करणारे ज्याचा पाठलाग ते करतात त्याच्यापेक्षा लवकर दमतात. त्याने पटकन त्याचे जोडे काढले व पट्ट्यात खोचले आणि अनवाणी पायाने तो धावू लागला. थोडासा सावरल्यावर त्याने काही ढांगातच तो चढ पार केला. नशिबाने साथ दिली तर तो अजूनही निसटू शकत होता.

चंद्रोदय झाला नसला तरी त्या अंधूक प्रकाशात त्याला टेकड्यांच्या रेषा स्पष्टपणे ओळखू येत होत्या. असाच चालत राहिला तर बहुतेक तो त्या टेकडीच्या शेवटी पोहोचेल असा त्याला अंदाज आला पण त्याला परत डावीकडे जाण्याचा मोह आवरला नाही. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की त्याने जर दिशा बदलली तर तो आयताच त्यांच्या तावडीत सापडण्याची शक्यता होती. त्याला अचानक त्यांचा डाव लक्षात आला.

त्यांनी विचारपूर्वक त्याचा पाठलाग केला होता. ते त्याला समुद्राच्या दिशेला ढकलण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या हातातील दिवे त्याला दिसावेत अशीच त्यांची योजना होती. त्यांनी ठराविक अंतर ठेवले होते त्यामागेही काहीतरी डाव असणार.

पण अजुनही त्याला आशा वाटत होती.. चालता चालता त्याचे पाय एकदम जड झाले. नुसते जड झाले नव्हते तर ते खोल खोल जात होते. काही क्षणातच त्याचे पाय पोटरीपर्यंत वाळूत रुतले. त्याने एक पाय पूर्ण उचलला, तोपर्यंत दुसरा गुडघ्यापर्यंत रुतला. काय होत होते? त्याला उमजेना. माणसे वाळूत गाडली गेलेली त्याने ऐकले होते. त्याने बाहेर येण्याची धडपड केली पण तो जेवढी जास्त धडपड करत होता तेवढा तो जास्त रुतत चालला होता. आता तो मांडीपर्यंत रुतला होता.
‘त्यांचा डाव हा होता तर... त्यांना त्याला समुद्राकिनारी हाकलायचे नव्हते तर येथे आणायचे होते. त्याच्यावर एकही शस्त्र न चालवता त्यांना त्याचा काटा काढायचा होता तर! त्यांना त्याच्याकडे पाहण्याची किंवा जवळ येण्याची गरजच नव्हती. एक चुकलेला वाटसरु या पुळणीत फसून मेला... बस्स! कसलेही किटाळ न घेता त्यांनी त्याचा काटा काढला होता.’

थोड्याच क्षणात तो कमरेइतका वाळूत रुतणार होता. काय करु शकत होता तो? तो वाळूवर पसरला असता तर कदाचित अधिक रुतला नसता पण त्या प्रयोगाला आता उशीर झाला होता. शक्यच नव्हते ते आता. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही एवढा अंधार पसरला होता. जगाने त्याचे डोळे आणि कान बंद केले होते. एक अनामिक भीती त्याच्या नरड्यात जमा झाली. त्याला आता शेवटचे आचके देतानाही कोणी बघणार नव्हते. त्याचा जबडा उघडला आणि त्याने एक आर्त किंकाळी फोडली. एखाद्या जनावरासारखी....

“वाचवा ऽऽऽऽऽऽ !”

“वाचवा ! मी तुम्ही म्हणाल ते ऐकेन... पण मला वाचवा..” असे म्हणत तो ओक्साबोक्षी रडू लागला. नंतर त्याचा आवाज भेसूर झाला...

त्याच्या भीतीने आता सगळे संपले ही भावना त्याच्या मनात प्रबळ झाली. त्याला तेथे बघण्यासाठीही कोणी नव्हते. पण त्याने काय फरक पडला असता ... एखाद्या गुन्हेगारालाही फासावर चढवताना त्याची नोंद ठेवली जाते. येथे तो कितीही ओरडला तरी वाळू शिवाय त्याला कोणाचीच सोबत नव्हती. अगदी मरताना सुद्धा... तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी हाक मारल्यावर तो दचकला. त्याच्या मनात खाली बसलेली जगायची आशा उफाळून वर आली आणि मृत्युच्या विचारांची जागा पराभवाच्या शरमेने घेतली.

“घे ! हे पकड !”

एक लाकडाची फळी त्याच्या शेजारी घसरत आली आणि त्याच्या बरगड्यावर आदळली. प्रकाशाचे एक वर्तुळ अंधार भेदून त्या फळीवर स्थिर झाले. त्याने वर असलेले शरीर वळवले व म्हणाला, “या दोराने मला वर काढा!”

“एखादे मूळ उपटून काढावे तसे आम्ही तुला बाहेर खेचू शकत नाही.” कोणीतरी खिदळत उत्तर दिले. बहुतेक चारपाच जण असावेत.

“जरा कळ काढ आम्ही फावडी आणायला माणसे पाठवली आहेत. इतक्यात येतीलच ती. तू फक्त तुझी कोपरं त्या फळीवर टेकव.”

त्याने त्याची कोपरं त्या फळीवर टेकविली आणि डोके तळहातात खुपसले. त्याच्या मनात विशेष विचार आले नाहीत फक्त या कुचंबणेतून कधी बाहेर पडतोय असे झाले होते त्याला.

“नशीब तुझे आम्ही तुझ्या मागे येत होतो. ही पुळण फार धोकादायक आहे. कित्येक माणसे यात नाहिशी झाली आहेत. कुत्रेही येथे फिरकत नाहीत. गंमत आहे की नाही? येथे खणले तर तुला कित्येक मौल्यवान वस्तू सापडतील. ही जागा जवळजवळ तीनशे वर्षं जुनी आहे.”

अखेरीस ती फावडे आली. बुटांना फळ्या बांधून त्यांनी मग त्याच्याभोवती खणण्यास सुरुवात केली. त्यांनी एकामागून एक वाळूचे थर काढले.. प्रत्येक थराबरोबर त्याची स्वप्ने, वैफल्य, शरम इ. भावना त्या वाळूत गाडली गेली. जेव्हा त्यांचे हात त्याच्या खांद्याला लागले तेव्हा तो पूर्णपणे निर्विकार झाला होता. आकाश पांढुरके झाले होते आणि चंद्र कुठल्याही क्षणी आकाशात येईल असे वाटत होते

ती त्याचे स्वागत कसे करेल? त्याच्या मनात विचार आला.व त्याने निर्विकारपणे सगळ्या बाजूने लाथा खाण्याची मानसिक तयारी केली....

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

शलभ's picture

1 Mar 2017 - 9:43 pm | शलभ

अरेरे..आला परत..

संजय क्षीरसागर's picture

3 Mar 2017 - 1:34 am | संजय क्षीरसागर
देशपांडेमामा's picture

2 Mar 2017 - 10:21 am | देशपांडेमामा

पुरता फसलेला दिसतोय बिचारा !

पुभाप्र

देश