तेवढ्यात एक कावळा काव काव करत उडाला. डोळ्यासमोरचा रंग पिवळ्यातून निळा झाला आणि त्याच्या वेदना हळूवारपणे त्या आसमंतात विलीन झाल्या. चार कावळे खालून किनार्याला समांतर उडत होते. त्यांच्या उन्हात चमकणार्या कडा गडद हिरव्या भासत होत्या. त्याने त्याला त्याच्याकडे असलेल्या किटकबाटलीतील पोटॅशियम सायनाईडची आठवण झाली. विसरण्याआधी ते किटक त्याला दुसर्या बाटलीत काढून ठेवायचे होते...
मोबियस
२१
पुरुषांना येणार्या झटक्यांचे थर एकावर एक चढत जातात आणि त्याला अंतच नसतो. एक थर काढला की तुम्हाला आतला अगदी स्पष्ट दिसतो. जणू काही फॉसिलच. डायनासॉर आणि त्यांचे अणकुचिदार दातसुद्धा माणसाच्या या धुंद लैंगिक भावनांना व त्यातून तयार होणार्या प्रजोत्पादनाचे काम थांबवू शकले नाहीत. शेवटी त्या भावनांमधे त्याचे शरीर पिळवटून निघाले. त्यातून एक तप्त शलाका बाहेर पडली व अंधार भेदून अंतराळात विलीन झाली.
तप्त शलाकेची प्रकाशित शेपूट शेवटी दिसेनाशी झाली आणि त्याला उमगले की तिच्या त्याच्या पार्श्वभागावर फिरणार्या हाताचा आता त्याच्यावर काही परिणाम होत नव्हता. त्याच्या ज्या नसा तिच्यात गुंतल्या होत्या त्या आता थिजल्या. तिही एका ग्लानीत बाजूला पडली.
शेवटी या सगळ्यातून त्याने एकच अर्थ काढला की त्याची वासनापूर्ती ही त्याची नव्हती तर दुसर्याच कोणाची तरी होती. फक्त त्याचे शरीर वापरले गेले होते. तसेही मैथुन ही क्रिया ही त्या त्या प्रजातीवर अवलंबून असते असे म्हणतात. ती संपली की त्याच क्षणी पूर्वपदावर यावेच लागते. त्यातील काहीच जणांच्या नशिबी खरे सुख लिहिले असते. मरणोन्मुख अवस्थेतील परत त्यांच्या मृत्युशय्येवर जातात. या बनावाला प्रणय तरी कसा म्हणावा? त्याला बहुधा डुलकी लागली असावी. त्यातच तो एका कुशीवर कलंडला. त्यातच त्याला स्वप्न पडले एका तुंबलेल्या मुतारीचे, एका सज्जेचे, जी तिरपांगडी झाली होती. त्यातून एक माणूस अन्न घेऊन पळत असताना त्याने त्याला पाणी मगितले. त्याने त्याच्याकडे गुरकावून पाहिले. त्याचे तोंड एखाद्या नाकतोड्यासारखे होते...
त्याला जाग आली. त्याला आता भयंकर तहान लागली होती. त्याला पाणी पाहिजे होते. स्वच्छ, चमकणारे नितळ पाणी. एखाद्या निर्जन घरातील कोरड्या पडलेल्या पाण्याच्या नळासारखी त्याची अवस्था झाली होती. जणू काही त्या घरातील कोळ्यांच्या जाळ्यात सापडलेल्या एखादा माशीच....
तो कसाबसा उभा राहिला. त्याचे हात पाण्याने भरलेल्या रबरी पिशव्यांसारखे जड झाले होते. त्याने खाली पडलेली किटली उचलली व तिचे तोंड नरड्यात घातले. थोड्या वेळाने त्याच्यातून दोन तीन थेंब त्याच्या टीपकागदासारख्या जिभेवर पडले. पाण्याची आस लागलेल्या त्याच्या घशाची त्याने अजूनच तडफड झाली.
तहानेने व्याकुळ होत त्याने मोरीपाशी बरीच उलथापालथ केली. सगळ्या रसायनात पाणी हे किती सोप्पे रसायन आहे! कुठेतरी थोडेतरी पाणी सापडेलच... टेबलाच्या ड्रॉवरमधे नाही का नाणे सापडत? तेवढ्यात त्याला दमट वास आला. पाणीच आहे कुठेतरी. त्या रांजणामधील ओलसर वाळू त्याने हाताने खरवरडली आणि तोंडात कोंबली. त्या वासाने व चवीने त्याला भडभडून उलटी झाली. आतडी पिळवटली गेल्यामुळे बिचार्याच्या डोळ्यातून पाणी आले...
त्याची ठणकणारी वेदना त्याच्या डोक्यातून डोळ्यात उतरली. थोडक्यात काय, अनियंत्रित भावना तुम्हाला खड्ड्यात घेऊन जातात हेच खरे. अचानक तो उठला आणि रांगत जमीन खोदू लागला. कोपराभर खणल्यावर त्याच्या हाताला दमट वाळू लागली. त्याने आपले ठणकणारे कपाळ त्या ओलसरपणात खुपसले व एक दीर्घ श्वास घेतला..... काय सांगावे हायड्रोजन व प्राणवायू कदाचित एक होतीलही...
मुठी वळून तो पुटपुटला, ‘हात कसले बरबटले आहेत.’
“सालेऽऽ काय करणार आहेस तू? मला पाणी पाहिजे. येथे कुठेच नाही का? ” तो किंचाळला.
तिने मागे वळून पाहिले व उघड्या मांड्या नीट झाकल्या. “नाही! इथे कुठेही पाणी नाही.”
“नाही? तुला ही गंमत वाटली की काय? जिवन मरणाचा प्रश्न आहे हा. काहीतरी करऽऽ कर काहीतरी. कृपा कर...बघ मी तुला विनंतीही करतोय...”
“हंऽऽऽऽ जर आपण कामाला लागलो तर..ते काहीच क्षणात आपल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतील.”
“ठीक आहे. मान्य आहे. मी तरी काय करु शकतो? ”
आत्तापर्यंत त्याच्या मनाला पराभव शिवला नव्हता पण असे वाळून मरण्याची कल्पना त्याला तितकीशी चांगली वाटली नाही. तो काय सुकट बोंबील नव्हता.
मी परिस्थितीला शरण जातोय...पण शरीरात त्राण नसताना आपण कामाला कसे जाणार हा एक प्रश्नच आहे. आणि नेहमीच्या वेळेला पाणी आले तर आपल्याला त्याचा उपयोग नाही. कदाचित आपण तोपर्यंत वर गेलेलो असू. मला वाटते तू त्यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना द्यावीस हेच ठीक होईल. कृपा कर तुला तहान लागली नाही का?
“आपण कामाला सुरवात केली की त्याच क्षणी त्यांना कळेल. त्या मनोर्यावर कोणीतरी दुर्बिणीने सारखे टेहळणी करीत असते.”
“मनोरा? कसला मनोरा?”
कुठल्याही तुरुंगात मजबूत भिंती, कुलपे, लोखंडी अभेद्य दरवाजांपेक्षा कैद्याला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत असेल तर त्याच्या कोठडीत गुपचुप बघता येणार्या एखाद्या भोकाची.
त्याला वाळूचे क्षितीज व आकाश आठवले. त्यात तर कुठल्याही मिनारासाठी जागा नव्हती आणि त्या बिळातील दोन माणसांना इतक्या लांबून कोणी पाहू शकेल यावर त्याचा विश्वास बसणे कठीण होते.
“जर मागे काठावर नीट पाहिले तर कळेल तुम्हाला.”
त्याने शांतपणे खाली पडलेले फावडे उचलले. जे काही झाले होते त्यानंतर आत्मसन्मान सांभाळणे म्हणजे घाणीने लडबडलेल्या शर्टाला इस्त्री करण्यासारखे होते. हाकलून दिल्यासारखा तो बाहेर पडला.
एखादे रिकामे पातेले शेगडीवर तापत असल्यासारखी वाळू तापत होती. त्या उन्हाने त्याला भोवळ आली पण त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर तो पाण्याच्या जवळ चालला होता. समुद्राच्या बाजूला त्याने त्या भिंतीच्या टोकावर नजर टाकली. त्यावर त्या मिनाराचे टोक त्याच्या बोटाच्या पेरासारखे उभे असलेले त्याला दिसले. टेहळणीसाठीच उभा केलेला असणार तो! त्यांनी त्याला पाहिले असेल का? ते याच क्षणाची वाट पहात असणार...
त्या टेहळणी करणार्या माणसाकडे पहात त्याने आपले फावडे जोरजोरात फडकविले. त्याने ते फावडे असे धरले की त्यावरुन प्रकाश त्याच्या डोळ्यात परावर्तित होईल. त्याच्या डोळ्यासमोर त्या प्रकाशामुळे अंधारी आली. ती काय करतेय? काही का करत असेना पण तिने आत्ता मदत केली पाहिजे....
अचानक त्याच्यावर गार सावली पसरली. त्याने चमकून वर पाहिले तर एक ढग उडणार्या पाचोळ्यासारखा त्याच्यावरुन चालला होता. एक शेलकी शिवी हासडून तो मनाशी म्हणाला, पाऊस पडला तर त्याला हे सगळे करावे लागले नसते.’ त्याने ओंजळ पसरुन त्यात पाणी गोळा करुन गटागटा पिले असते....काचेच्या तावदानावरुन थेंबाचे ओघळ झाले असते....पागोळ्या भरुन वाहू लागल्या असत्या, डांबरी रस्त्यावर मग पाण्याचा शिडकावा झाला असता.
तो दिवास्वप्न पहात होता का त्याचे विचार प्रत्यक्षात येत होते हे त्याला कळत नव्हते पण आजूबाजूला होणार्या हालचालींची त्याला जाणीव झाली. वाळूची वावटळ सुरु झाली होती. त्याने गुपचूप वळचणीखाली आसरा घेतला व घराच्या भिंतीला टेकला. अति शिजलेल्या माशासारखी त्याची हाडे त्याला विरघळल्यासारखी वाटत होती. त्याची तहान त्याच्या कपाळावर फुटत होती. ठणकणार्या वेदनांनी त्याच्या मेंदूच्या ठिकर्या उडवून त्याचे कण त्याच्या जाणिवेच्या पटलावर विखरुन टाकले. त्याने त्याचे दात कराकरा खाल्ले व हात पोटावर दाबून धरले. त्याने त्याच्या उलटीची भावना जरा कमी झाली.
तेवढ्यात त्याला तिचा आवाज ऐकू आला. ती त्या टेकडीला टेकून कोणालातरी हाका मारीत होती. त्याने जड झालेल्या पापण्यामधून वर पाहिले. ज्या म्हातार्या माणसाने त्याला येथे आणले होते, तो खाली दोराला लटकलेली बादली सोडत होता. पाणी... आले एकदाचे शेवटी. खाली येताना ती घासत घासत खाली आली. त्यातून हिंदकाळणार्या पाण्याचा आवाज येत होत.
पाणीच होते ते! खरेखुरे पाणी...त्याने बादलीकडे उडी मारली.
जवळ येताच त्याने तिला बाजूला ढकलले व त्या बादलीचा ताबा घेतला. घाईघाईने त्याने दोर न सोडवताच त्यात तोंड बुडवले. त्याचे पोट एखाद्या पंपासारखे खालीवर होत होते. त्याने मान वर करुन एक दीर्घ श्वास घेतला व परत पाण्यात तोंड खुपसले. तिसर्यावेळी जेव्हा त्याने तोंड वर काढले तेव्हा त्याच्या नाकातोंडातून पाण्याचा फवारा उडाला. त्याने तो गुदमरला. आता तिची पाळी होती. तिने शांतपणे त्यातील निम्मे पाणी संपविले.
मग तिने ती बादली सोडून दिली आणि जमिनीवर पडली. त्या म्हातार्या माणसाने ती बादली वर ओढण्यास सुरुवात केली. अचानक त्याने उडी मारुन ती बादली पकडली व किंचाळला,
“थांबा! एकच मिनिट! माझे जरा ऐका. फक्त ऐकाऽऽऽ”
त्या माणसाला बहुतेक त्याची कीव आली असावी. त्याने तो दोर ओढायचे थांबविले व निर्विकार चेहर्याने त्याच्या मिचमिच्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागला.
“तुम्ही मला पाणी दिल्यामुळे मी आता तुम्हाला जे पाहिजे तेच करणार आहे. शंकाच नाही. पण माझे जरा ऐका. या सगळ्या प्रकरणात मला वाटते तुम्ही मोठी चुक करता आहात. मी एका शाळेत मास्तर आहे. माझे मित्र आहेत आणि आमची शिक्षकांची संघटनाही आहे. ते सगळे माझी वाट पहात असणार. शिवाय स्कूलबोर्डही आहेच. तुम्हाला काय वाटते ते सगळे माझी गैरहजेरीची चौकशी करणार नाहीत? निश्चितच करतील. ते मग शांत बसणार नाहीत.”
त्या म्हातार्याने त्याची जीभ खालच्या ओठावरुन फिरवली व तो अनिच्छेने हसला. असे त्याला वाटले असेल पण खरे तर त्याने फक्त डोळ्यात वाळू जाऊ नये म्हणून आपले डोळे बारीक केले होते. त्यामुळे पडणार्या सुरकुत्यामुळे त्याला कदाचित तो हसला असे वाटले असावे.
“का? हसायला काय झाले? तुमच्या हातून एक गुन्हा घडणार आहे याची तुम्हाला कल्पना नाही का?”
“नाही! आता दहा दिवस झालेत तरी पोलिसांकडून आमच्याकडे कसलीही चौकशी झालेली नाही”. प्रत्येक शब्दावर जोर देत बोलण्याची त्याची लकब त्याने लक्षात ठेवली. यानंतरही कसली चौकशी झाली नाही तर मग ?”
“अजून दहा दिवस झालेले नाहीत फक्त सात झालेत.” तो चिडून म्हणाला.
यावर तो म्हातारा गप्प बसला. त्याचे बोलणे वाया गेले होते बहुधा.
“चौकशी वगैरे फार किरकोळ गोष्टी आहेत. तुम्ही खाली येता का? म्हणजे आपल्याला जरा निवांत बोलता येईल. मी वेडेवाकडे काही करणार नाही याची मी खात्री देतो. आणि समजा माझ्या मनात तसे काही असले तरी या अशा अवस्थेत तसे काही माझ्या हातून घडेल असे वाटत नाही”
म्हातारा आपला गप्प बसला होता. ही संधी हातची जातेय की काय या भयाने त्याचा श्वासोच्छ्वास वेगाने हो़ऊ लागला..
“ही वाळू उपसण्या इतके कुठलेच महत्वाचे काम या गावात नाही हे मला समजले आहे. शेवटी तुमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे तो. मला खरेच पटले आहे ते आता. माझ्यावर जर बळजबरी झाली नसती तर कदाचित मी स्वत:हून तुम्हाला मदत केली असती. माणुसकीला धरुन कोणीही तेच केले असते. या कामाला जुंपणे हा एकमेव मार्ग आहे का? यापेक्षा काहीतरी चांगला मार्ग असेल ना! योग्य माणसाला योग्य काम दिले पाहिजे. तसे न केल्यास तुमची मदत करण्याची इच्छा मरते. काय बरोबर आहे ना मी म्हणतो ते? एवढा धोका पत्करण्यापेक्षा माझा अधिक चांगला उपयोग तुम्हाला करता आला असता.”
त्याने हे सगळे ऐकले की नाही कोणास ठाऊक. त्याने निरर्थकपणे आपली मान हलवली आणि अंगावरुन मांजराचे पिल्लू झटकण्याचा अविर्भाव केला. त्यांनी त्या मिनारावरुन त्या दोघांना बोलताना पाहिले की काय?
“तुम्हाला पटतंय ना हे! ती वाळू उपसणे महत्वाचे आहे पण ते गावाला वाचविण्याचे साधन आहे. साध्य नाही. तुमचे ध्येय या वाळूपासून जीव वाचविणे हे आहे. बरोबर ना? नशिबाने मी वाळूवर बरेच संशोधन केले आहे. मला त्यात खूपच रस आहे म्हणूनच मी इथे आलो ना! आजकाल शहरी जनतेला वाळूचे फारच आकर्षण असते. याचा तुम्ही फायदा उठवू शकता. उदा. या टेकड्या तुम्ही पर्यटनकेंद्र म्हणून विकसित करु शकता. वाळूविरुद्ध युद्ध पुकारुन काही होणार नाही. तिच्या कलाने घेतलेत तर जिंकण्याची आशा आहे. या सगळ्या प्रकरणाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलावयास पाहिजे. बाकी काही नाही.”
त्या माणसाने आपले डोळे किलकिले केले.
“कुठल्याही पर्यटनाच्या जागी पाण्याचे झरे लागतात बाबा! आणि मुख्य म्हणजे त्यातून शेवटी फायदा उपर्या व्यापार्यांचाच होतो. हे एक उघड गुपित आहे.”
तो म्हातारा त्याच्याकडे छद्मीपणे बघत हसतोय असा त्याला भास झाला. त्याचवेळी त्याला तिने सांगितलेल्या त्या पोस्टकार्ड विक्रेत्याची गोष्ट आठवली. त्याचाही अंत येथेच झाला होता. वाट पाहून पाहून तो आजारी पडला होता व त्यातच त्याचा अंत.
“हे एक उदाहरण झाले. वाळूच्या गुणधर्माचा फायदा उठवून वाढणार्या पिकांचाही विचार हो़ऊ शकतो. थोडक्यात परंपरांना उराशी कवटाळूनच जगले पाहिजे असा नियम कुठेही नाही.”
“पण आम्ही या सगळ्याचा अभ्यास केलाय. आम्ही शेंगदाण्याचे व इतर पिके घेऊन बघितली आहेत. येथे पिकवलेली काही फुले मी दाखवेन तुला.”
“वाळूपासून वाचण्यासाठी बंधार्यांची कल्पना कशी काय वाटते? माझा एक मित्र एका वर्तमानपत्रात कामाला आहे. त्याच्या मदतीने आपण यासाठी चळवळ उभी करु शकू.”
“त्या कोरड्या सहानुभूतीला घेऊन काय करायचे? काही देणग्या मिळाल्या तरच फायदा.”
“पण त्या मिळविण्यासाठी एक चळवळ उभी करावी लागेलच ना!
“ते ठीक आहे पण सरकारी नियमानुसार उडणार्या वाळूमुळे होणार्या नुकसानीची नुकसानभरपाई मिळत नाही.”
“मग तो नियम बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
“या भिकारड्या दारिद्य्र असणार्या या विभागातून कसले डोंबलाचे प्रयत्न करणार आम्ही? सध्या चालले आहे ते सगळ्यात स्वस्त आहे. आम्ही सरकारला मोकळीक दिली तर त्यांची गणिते व योजना होईपर्यंत आम्ही या वाळूत गाडलेले असू.”
“ पण मला माझाही विचार करायला हवा ना !” तो तारस्वरात किंचाळला. “तुम्हालाही मुले बाळे असतीलच, तुम्हीही कोणाचे तरी पालक असाल...शिवाय एका शिक्षकाची कर्तव्येही तुम्हाला माहीत असतीलच.”
त्याच क्षणी त्या म्हातार्याने तो दोर वर ओढून घेतला. त्याने नकळत तो दोर सोडून दिला. काय हा उद्धटपणा! तो त्याचे ऐकण्याचे नाटक करत होता की काय? फक्त दोर वर ओढण्याची संधी येण्याची वाट पहात... त्याचे उंचावलेले हात हताशपणे हवेत फिरत राहिले.
“तुम्हाला वेड लागले आहे. तुमचा तुमच्यावरच ताबा राहिलेला नाही. हे काम एखादे माकडही करु शकेल. मी यापेक्षा जास्त काहीतरी करु शकेन. माणसाने नेहमी त्याच्या अकलेचा वापर केला पाहिजे.”
“हंऽऽऽऽ शक्य आहे. तू तुला काय करायचे आहे ते कर आम्ही आम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी मदत तुला करु.”
“ओ! थांबा थांबा! ही काय विनोद करण्याची वेळ नाही. थांबा थांबा...याचा तुम्हाला पश्चात्ताप होईल. तुम्हाला समजत नाहीए तुम्ही काय करत आहात ते. जरा थांबाल तर मी तुम्हाला सांगतो. कृपा करा!”
पण त्या म्हातार्याने परत मागे वळून पाहिले नाही. मणामणाचे ओझे खांद्यावर असल्यासारखे तो उठला आणि चालू लागला. तीन पावलांनंतर त्याचे खांदे दिसेनासे झाले. त्याने हताशपणे वाळूत आपले डोके व हात खुपसले व तो शांतपणे पडून राहिला. काही वाळू त्याच्या शर्टात गेली व पोटावर अडकली. अचानक त्याला घाम येऊ लागला. कपाळावर, छातीवर, मानेवर व पायांवर. त्याने मगाशी प्यायलेले पाणीच असणार दुसरे काय.. त्या घामाचा व त्यात भिजलेल्या वाळूचा एक थर निर्माण झाला. रबरी आवरणासारखा.
तिने आधीच काम सुरु केले होते. त्याच्या मनात अचानक संशय उत्त्पन्न झाला. हिने सगळे पाणी संपविले तर नाही ना? तो घाईघाईने घरात आला. उरलेले सगळे पाणी जागेवर होते. त्याने परत एकदा ते घटाघटा प्यायले. त्याची लोखंडी चव बघून तो परत एकदा आश्चर्यचकित झाला. त्याची अस्वस्थता लपत नव्हती. ते पाणी त्याने संपविले असते तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला पाणी उरले नसते. त्यांनी पाण्याचा आणि वेळेचा व्यवस्थित हिशेब केला होता. त्याच्या मनात एकदा तहानेची भीती बसली की तो त्यांच्या ताब्यात जाणार होता.
त्याने त्याची टोपी डोळ्यावर ओढली व तो घाईघाईने बाहेर आला. तहानेच्या नुसत्या आठवणीने त्याची विचारशक्ती बधीर झाली. पाण्याच्या दहा पंधरा बादल्या असत्या तर ठीक होते. एक बादली म्हणजे हत्तीची पराणी. त्याला ताब्यात ठेवण्यासाठी वापरतात तसली.
“दुसरे फावडे कुठे आहे ?”
ती केविलवाणे हसली. तिने कपाळावरचा घाम पुसत वळचणीखाली बोट दाखविले. एवढे सगळे रामायण झाले पण तिला हत्यारांची जागा व्यवस्थित आठवत होती म्हणजे कमाल आहे. वाळूत राहणार्या लोकांमधे बहुधा हे उपजतच असावे.
त्याने हातात ते फावडे घेतले आणि तो घडीच्या खुर्चीची एकदम घडी व्हावी तसा कोसळला. त्याचे सगळे स्नायू शिणले होते. काल रात्रीपासून त्याचा एकदाही डोळा लागला नव्हता. तिच्याबरोबर चर्चा करुन कमीतकमी काम कसे करता येईल ते बघायला हवे...तो मनात म्हणाला. पण तो इतका अशक्त झाला होता की त्याच्या अंगात तेवढे बोलण्याचीही शक्ती उरली नव्हती. त्याच्या गळ्याच्या चिंधड्या उडाल्यासारख्या त्याला वाटत होते. बहुधा तो त्या म्हातार्याशी घसा ताणून बोलला असावा. त्याने यांत्रिकपणे ते फावडे हातात घेतले आणि तिच्या शेजारी जाऊन तो वाळू उपसू लागला.
तीन पायाच्या शर्यतीत बांधल्याप्रमाणे ते दोघे वाळू उपसू लागले. त्या घराची त्या बाजूची भिंत अजून पूर्णपणे वाळली नव्हती. शेवटी त्यांनी त्या वळूचा एक ढीग केला. ती त्या डब्यातून भरली व ते डबे जागेवर नेले. त्यानंतर आराम न करता ते दोघे परत वाळू उपसू लागले.
तो सुन्न होऊन यांत्रिकपणे वाळू उपसत होता. त्याला कशाचेच भान राहिले नव्हते. तिचा आवाज ऐकून तो एकदम दचकला.
“तुम्ही जर तुमचा डावा हात अजून थोडा खाली धरला तर तुम्हाला जरा सोपे जाईल. हऽऽऽअसं... डावा हात हलावायचा नाही फक्त उजवा वरचा हालवायचा म्हणजे तुम्ही एवढे दमणार नाही.”
तेवढ्यात एक कावळा काव काव करत उडाला. डोळ्यासमोरचा रंग पिवळ्यातून निळा झाला आणि त्याच्या वेदना हळूवारपणे त्या आसमंतात विलीन झाल्या. चार कावळे खालून किनार्याला समांतर उडत होते. त्यांच्या उन्हात चमकणार्या कडा गडद हिरव्या भासत होत्या. त्याने त्याला त्याच्याकडे असलेल्या किटकबाटलीतील पोटॅशियम सायनाईडची आठवण झाली. विसरण्याआधी ते किटक त्याला दुसर्या बाटलीत काढून ठेवायचे होते...
“थांबूया का आता आपण ?”
तिने त्या वाळूच्या भिंतीवर नजर टाकली. त्याच्या लक्षात आले, तिचाही चेहरा कोरडा पडला होता. वाळूच्या थराखाली तिचा वर्ण फिका पडला होता. अचानक त्याच्या भोवती अंध:कार पसरला. डोळ्याभोवती रंग बदलणारी वर्तुळे नाचू लागली व त्याचा रक्तप्रवाह अडखळतोय अशी जाणीव त्याला हो़ऊ लागली.
त्या अंधार्या बोगद्यातून चाचपडत तो त्याच्या घाणेरड्या अंथरुणावर कसाबसा येऊन पडला. ती त्याच्या मागोमाग केव्हा आली हे त्याला कळलेच नाही....
२२
जर त्याच्या स्नायुंमधे कोणी प्लॅस्टर ओतले असते तर जसे वाटले असते तसे त्याला आता वाटत होते. त्याचे डोळे सताड उघडे होते पण एवढा अंधार का वाटतोय बरं... त्याला आश्चर्य वाटले. कुठेतरी उंदीर खुडबुड करत होता. त्याच्या घशाची आगआग होत होती जणूकाही कोणी तो सुरीने खरवडतोय. त्याच्या आतड्यातून त्याला ढेकरा येऊ लागल्या. त्याला सिगारेटची तल्लफ आली. नाही त्याच्या अगोदर त्याला एक घोटभर पाणी प्यायचे होते. पाण्याची आठवण येताच तो धाडकन वस्तुस्थितीवर आदळला. अच्छा तो उंदराचा आवाज नव्हता तर...तिने कामाला सुरुवात केलेली दिसतेय. अरे बापरे! किती वेळ झोपला होता तो कोणास ठाऊक. त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण जड झालेल्या शरीराने त्याला जणू सतरंजीला बांधून घातले होते. लक्षात येऊन त्याने त्याच्या चेहर्यावरील पंचा ओढून काढला. दरवाजाच्या चौकटीतून निळसर शीतल चंद्रप्रकाश झिरपत होता.अचानक रात्र झाली.
त्याच्या उशाशी ती मद्याची बाटली, किटली आणि कंदील या वस्तू अजून तशाच होत्या. त्याने उठून त्या शेकोटीत पाण्याने चूळ भरली. पाण्याची चव घेत त्याने त्याचा घसा त्या पाण्याने ओला केला. त्याने त्या कंदीलासाठी हात पुढे केला आणि त्याच्या हाताला एक पिशवी आणि सिगरेटचे पाकिट लागले. त्याने कंदील लावला आणि सिगारेट पेटवून त्या मद्याचा एक घोट घेतला. त्याची विस्कटलेली गात्रे जरा ठिकाणावर आली.
त्या पिशवीत त्यांचे जेवण आले होते. त्यात भाताच्या तीन मुदी, काही सुके बोंबील, गाजराचे लोणचे व काही शिजवलेल्या भाज्या होत्या ज्याची चव कडसर होती. बहुधा ती मुळ्याचीच वाळलेली पाने होती.
तो उठून उभा राहिला. उभे राहताना त्याच्या सांध्यांमधून कसलासा आवाज झाला. त्याने निराश होत पाण्याच्या रांजणात डोकावले. त्यात काठोकाठ पाणी भरलेले... त्याने त्यात पंचा भिजवला व चेहरा पुसला. पाण्याच्या त्या स्पर्षाने त्याच्या शरीरावर एक शिरशिरी उठली. त्याने मान खसाखसा पुसली व बोटांमधे साठलेली वाळू खरवडून काढली. पाण्याच्या स्पर्षाने होणार्या सुखापुढे त्याला बाकीच्या गोष्टींची आता तमा वाटत नव्हती....
“तुम्हाला चहा ठेऊ का ?” तिने दरवाजातून प्रश्न केला.
“नको ! मला मळमळतंय...”
“झोप लागली ना तुम्हाला ?”
“तू उठल्यावर मलाही उठवायचे ना !”
ती हसत म्हणाली, “मी रात्री तिनदा उठले आणि तुमच्या डोक्यावरचा पंचा नीट केला...”
एखाद्या निरागस बालिकेने नुकतेच मादक हास्य करण्यास शिकावे तशी ती हसली. तिला तिच्या भावना चांगल्याप्रकारे प्रकट करता येत नव्हत्या हे स्पष्ट होते. त्याने उदास होत तोंड फिरवले.
“मी तुला खणण्यासाठी मदत करु? का वाळू वाहून नेऊ ?”
“नको. आत्ता वाळूची गाडी यायची वेळ झालीए..”
कामाला लागल्यावर मात्र त्याचा त्या कामाला विरोध होता हे तो विसरला. हा फरक कशामुळे पडला असावा? त्या तहानेच्या भीतीमुळे तर नाही ना? का तिच्या उपकाराखाली दबून जाऊन त्याचे विचार बदलले? काळावर मात करण्यासाठी बहुधा माणसाला कामाची अत्यंत आवश्यकता भासत असावी.
एकदा मोबियसने एका भाषणाला नेले होते. केव्हा बरे? भाषणाच्या जागेला गंजलेल्या तारांचे कुंपण घातलेले होते. कुंपणात जवळजवळ उकिरडाच माजला होता. त्याच्या खाली जमीनही दिसत नव्हती. या असल्या जागेला कुंपण घालायचे कोणाला सुचले असेल कोणास ठाऊक ! तेवढ्यात त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळावे तसा एक चुरगाळलेले कपडे घातलेला माणूस तेथे अवतरला. छतावर कॉफीच्या रंगाचा एक मोठा ढब्बा पडलेला दिसत होता. या सगळ्यामधे एक माणूस भाषण देत होता, ‘कामावर मात करण्यास आपल्याला कामच करावे लागते. त्या कामाची किंमत कदाचित शून्यही असेल. कामाची खरी किंमत ही स्वत:ला नाकारण्याच्या शक्तीत आहे...’
तेवढ्यात त्याला एक कर्कश्य शिट्टी ऐकू आली. बर्याच कोलाहलात ते वाळू घेण्यास आले होते. जवळ आल्यावर ते नेहमीप्रमाणे शांत झाले. बादल्या, डबे शांतपणे खाली सोडण्यात आल्या. कोणीतरी त्याच्यावर पाळत ठेवते आहे असे सारखे त्याला जाणवत होते पण आता आरडाओरडा करण्यात तसा अर्थ नव्हता. वाळू वर गेल्यावर वातावरणात जरा मोकळेपणा आला. कोणी काही बोलत नव्हते पण त्यांचे काहीतरी ठरलेले दिसत होते....
तिचेही वागणे बदललेले दिसले.
“सुट्टी घेऊया आता. मी चहा आणते.”
तिचा स्वर व हालचालीही आनंदी दिसत होत्या. अत्यंत उत्साहाने ती सगळे फटाफट उरकत होती. ते बघून तो तृप्त झाला. तिने त्याच्या अंगावरुन जाताना केलेल्या मोहक हालचालींना त्याने तिच्या नितंबावर हलक्याशा चापट्या मारुन प्रत्युत्तर दिले. जर विद्युत दाब जास्त असेल तर बल्ब उडतो. त्याला तिला असे निश्चितच फसवायचे नव्हते. तिला कधितरी कल्पनेतील किल्ल्याच्या रक्षकाची गोष्ट सांगितली पाहिजे....तो मनात म्हणाला.
एक किल्ला होता. म्हणजे तो किल्लाच असायला पाहिजे असे काही नाही. ती कदाचित एक गढी असू शकते किंवा एखादा कारखाना, एखादी बँक, एखादा जुगाराचा अड्डा, काहीही.... त्यामुळे रक्षण करणारा एक शरीररक्षक आहे का एखादा पहारेकरी हे तुम्ही काय गृहीत धरता त्यावर अवलंबून आहे. हा रक्षक नेहमीच आक्रमकांचा बंदोबस्त करण्यासाठी तयार राहतो. त्यात त्याने एकही चूक केलेली नसते. बराच काळ वाट पाहिल्यावर त्या शत्रूने हल्ला चढविला एकदाचा. याच क्षणाची वाट बघणार्या त्याने, धोक्याची घंटा बडवली पण इतर सैन्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अर्थातच शत्रूने त्याची उचलबांगडी केली आणि तो निर्विरोध वावटळीसारखा दरवाजातून आत शिरला. पण तो किल्लाच वावटळीसारखा उडून गेला होता. तेथे काहीच नव्हते. जंगलातील एखाद्या निष्पर्ण म्हातार्या वृक्षासारखा तो पहारेकरी त्याला झालेल्या भासाचे जिवापाड रक्षण करत उभा होता....
तो शांतपणे फावड्यावर बसला व त्याने सिगारेट पेटविण्याचा प्रयत्न केला. तिसर्या काडीला त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. टीपकागदावर पसरणार्या शाईच्या ठिपक्याप्रमाणे त्याचा कंटाळा त्याच्या शरीरात पसरु लागला. त्या ठिपक्याने अनेक रुपे धारण केली. कधी जेली फिश तर कधी एखादी पिशवी तर कधी अणूस्फोटाच्या ढगासारखा. दूरवर कुठलातरी पक्षी त्याच्या साथीदाराला साद घालत उडाला. कुठेतरी कुत्र्याने रडण्यास सुरुवात केली. वर वाळूला घासत वाहणार्या वार्यांचा भीषण आवाज घुमत होता तर खाली तोच वारा वाळूच्या भिंतीला तासत होता. त्याने त्याचा घाम पुसला, नाक शिंकरले व केसातील वाळू झटकली. त्याच्या पायाखालच्या वाळूचे तरंग अचानक गोठल्यासारखे झाले.
जर हे तरंग आवाजाचे असते तर त्यांनी कुठल्याप्रकारचे गाणे ऐकू आले असते? त्याने आश्चर्यचकित होत विचार केला. माणसाला ते गाणे गाता येणे शक्य आहे का? त्याने विचार केला.....शक्य आहे... जर त्याच्या घशात कोणी काही खुपसले किंवा त्याचे दात हातोडीने तोडले असते किंवा त्याच्या मुत्रपिंडात सळया खुपसल्या असत्या तर तेच सूर उमटले असते. त्याने अचानक त्याचे डोळे एखाद्या पक्षासारखे फिरवले. वरुन तो स्वत:कडे पाहतोय असा भास झाला त्याला...
जगातील सगळ्यात विक्षिप्त माणूस. विचित्र गोष्टींचा आनंद घेणारा.....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
25 Feb 2017 - 8:22 pm | शब्दबम्बाळ
सगळे भाग वाचतोय पण काही थांग लागेना... सगळंच अमूर्त अस्पष्ट वाटतंय, अजूनही मला नक्की ते घर आणि तो खड्डा कसा आहे कळलेलं नाही...
पुलेशु
26 Feb 2017 - 4:59 pm | Jabberwocky
तुम्ही हा चित्रपट पहा the woman in the sand dunes, जो या कथेवर आधारित आहे.
26 Feb 2017 - 7:02 pm | पैसा
वाचते आहे.