मोबियस भाग -२ : प्रकरणे १९-२०

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
24 Feb 2017 - 8:36 am

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सामान्यत: सामान्य स्त्रियांना असे वाटते की त्यांच्या सौंदर्यामुळेच पुरुषांना त्यांची किंमत कळू शकते. हा दुर्दैवी व भाबडा भास आहे. या भ्रामक समजुतीनेच त्या पुरुषाच्या अध्यात्मिक बलात्काराला बळी पडत असाव्यात.

मोबियस

१९

घोड्याला टाच मारुन त्याला पिटाळता येते पण काळाला टाच मारता येत नाही. पण तो अगदी हातगाडीसारखा हळूही पळत नाही. हळूहळू सकाळचे तापमान वाढू लागले आणि प्रकाश अधिक प्रखर झाला. त्यात त्याचे डोळे आणि मेंदू भणभणू लागले. उष्णता त्याच्या शरीरात भिनली व शरीर आतून जाळू लागली.
रात्रभर जी आर्द्रता वाळूने शोषून घेतली होती ती आता उष्णतेने बाहेर पडू लागली. तापत्या वाळूवर मृगजळ दिसू लागले. पण तिचे मूळ स्वरुप तेच होते. वाळू : १/८ मिमि चे कण....भाजलेल्या पिठापेक्षाही कोरडी...

थोड्याच वेळाने वाळू खिसकण्यास सुरुवात झाली. त्याच्या आवाजाची त्याला आता सवय झाली होती तरीपण त्याने तिच्याकडे अर्थपूर्ण नजर टाकली. समजा आज नाही वाळू काढली तर काय होईल ? नाही काढली तर त्याचे परिणाम फार काही भीषण होणार नाहीत हे त्याला माहीत होते. तरीपण त्याला काळजी वाटत होती. तिने मात्र शांतपणे आपली नजर दुसरीकडे वळवली. ‘काळजी करायची तर तू एकटाच कर’ असे जणू तिला सांगायचे असावे. तेवढ्यात वाळूची धार एकदम बारीक झाली आणि दुसर्‍याच क्षणी ती चांगली पट्ट्याएवढी जाड झाली. हे असेच चालले होते.

त्या वाळूकडे पाहताना त्याला परिस्थिती फार काळजी करण्याइतकी आहे असे वाटले नाही. त्याने एक सुस्कारा टाकला. तेवढ्यानेही त्याच्या चेहर्‍याची कातडी ताणली गेली आणि तेथे आग आग झाली. ज्या फालतू मद्याचा विचार त्याने आत्तापर्यंत टाळला होता त्याचा विचार आता त्याच्या डोक्यात घुसखोरी करु लागला. अंधारात एखाद्या ज्योतीवर लक्ष केंद्रीत व्हावे तसे त्याचे लक्ष सारखे त्या विचारावर जाऊ लागले. त्याला आता काहीही चालले असते. त्याला त्याचा घसा ओला करायचा होता बस्स.... पुढच्या संभाव्य धोक्याची त्याला जाणीव होती पण त्याने न राहवता त्या बाटलीचे बूच उघडले, ती तोंडाला लावली आणि एक घोट घेतला. या अचानक झालेल्या अतिक्रमणाने त्याची जीभ वळवळली. जळजळत आत उतरलेल्या त्या मद्याने त्याला ठसका लागला. पण त्याला अजून एका घोटाची तहान लागली... अजून एक... किती वाईट आहे हे मद्य...तो मनातल्या मनात पुटपुटला.

ती तेथेच होती त्यामुळे त्याने तिलाही थोडेसे मद्य देऊ केले. अर्थात तिने ते नाकारले असे नाकारले की जणू काही तो तिला विष देतोय.
त्याची भीती खरी ठरली. ते मद्य पोटात पोहोचताच एखाद्या चेंडूसारखे उसळी मारुन वर आले. एखादी मधमाशी कानाशी गुणगुणावी तसा त्याच्या कानात आवाज येऊ लागला. ते मद्य त्याच्या रक्तात भिनायला लागले. त्याला वाटले आता त्याच्या रक्ताचा मृत्यु जवळ आलाय.

“तू काही करु शकत नाहीस का? तुलाही याचा त्रास होतच असेल की! मी आता तुला बंधमुक्त केले आहे, म्हणून तरी काहीतरी कर !”

“ठीक आहे, पण मी पाणी नाही आणू शकले तर...”
“पण त्यांना तू येथे तर आणू शकतेस ना?”

“आणू शकते पण त्यासाठी आपल्याला काम चालू करावे लागेल.”

“काहीतरीच. हा कुठला न्याय आहे? कामाच्या बदल्यात पाणी? त्यांना हा अधिकार कोणी दिला हे सांग मला आधी.”

तिने तिची नजर खाली झुकविली आणि गप्प बसली. काय साली परिस्थिती आली आहे... दरवाजावर दिसणारे आकाश आता शिंपल्याच्या खालच्या बाजूसारखे पांढर्‍या रंगाचे झाले होते. जर उपकाराने समाजात स्थान प्राप्त होते असे म्हणतात तर त्याला त्यांच्या परवानगीची का आवश्यकता वाटावी? आयुष्य म्हणजे काही कागदाचे उधळलेले तुकडे नव्हेत. ते तर एक बांधणीची वही असते आणि तिचे पहिले पान एक पुस्तकच असते. पहिल्या पानावरुन दुसर्‍या पानावर जाण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडायलाच पाहिजे असा काही कोणी नियम केलेला नाही. कोणी उपासमारीने मरत असेल तर प्रत्येकवेळी त्या भानगडीत पडायलाच हवे असेही नाही. जाऊदेत मरु देत! त्याला कितीही पाण्याची आस लागली असली तरीही ज्यांचा काही संबंध नाही अशांच्या प्रेतयात्रांना तो जाऊ शकत नव्हताच...
तेवढ्यात परत वाळू घसरु लागली.

ती उठली आणि तिने भिंतीवरील खराटा हातात घेतला.

“तू ते करु शकत नाहीस....तू तसे कबूल केले आहेस...”

“मी सतरंजी साफ करण्यासाठी ती घेतली आहे.”

“सतरंजी?”

“थोडी झोप काढली नाही तर लवकरच आपण...”

“मला झोप आली तर माझे मी बघून घेईन.”

तेवढ्यात त्याच्या पायाखालची जमीन हादरली. त्याने तोल सावरण्यासाठी आपले पाय घट्ट रोवले. वाळू उधळली गेल्यामुळे क्षणभर काही दिसेनासे झाले. वरुन, छपरातूही डोक्यावर वाळू पडत होती. घराचे सगळे सांधे वेदनेने कुरकुरत असल्याचा त्याला भास झाला. पण ती आतील एका वाशावर एकटक पहात बसली होती. त्या वाळूचा तिच्यावर काही परिणाम झालेला दिसत नव्हता. वाळूचा दाब फक्त घराच्या अवतीभोवतीच असावा.

“नालायक कुठचे! त्यांना हे काय असेच चालू ठेवायचे आहे की काय?” तो किंचाळला.

त्याचे धडधडणारे काळीज शरीराच्या कुठल्याही अवयवातून बाहेर पडेल की काय अशी त्याची अवस्था झाली होती. त्याचा घसा दाटून आला. बहुतेक त्या घाणेरड्या मद्याचा तो प्रताप असावा. त्या मद्याचा असर कमी झाला की त्याची अवस्था परत बिकट होणार होती हे निश्चित.

“त्यांना आता अगदी आनंद होत असेल. मी मेल्यावर काय करतील ते?”

तिने बोलण्यासाठी मान वर केली पण लगेचच गप्प राहिलेले बरे असे उमजून ती गप्प राहिली. तिला बोलण्यातील फोलपण जाणवला असावा कदाचित.
जर असाच शेवट होणार असेल तर काहीतरी प्रयत्न करायला काय हरकत आहे?
त्याने बाटली तोंडाला लावून त्या मद्याचे अजून तीनचार घोट रिचवले व स्वत:ला सावरुन त्याने बाहेर धाव घेतली. त्याच्या पायाने उमटलेल्या ठशात वाळू वावटळीसारखी उडाली. तो जसा बाहेर आला तसा थबकला. ही तीच जागा होती जेथे त्याने तिच्यावर हल्ला चढवला होता. ते फावडे येथेच कुठेतरी असणार...वाळूखाली दबलेले. जरी वाळू पडायची थांबली होती तरी काठावर जमलेली वाळू पालापाचोळ्याप्रमाणे आत पडतच होती. हालचालींनी परत वाळू खाली घसरणार नाही याची काळजी घेत त्याने पायाला कुठे ते फावडे लागते आहे का ते चाचपण्यास सुरुवात केली.

बराच वेळ प्रयत्न केला तरी त्याच्या पायाला काही लागेना. उन्हाची तिरीप आता त्याला असह्य होऊ लागली. त्याची बुब्बुळे आता एका बिंदूत आकुंचन पावली व त्याची छाती धडधड उडू लागली. त्याच्या मस्तकातून एक जिवघेणी कळ उठली. बहुतेक त्याच्या शरीरातील पाणी वेगाने कमी होत असेल... घाम येऊन चालणार नाही...तो मनाशीे म्हणाला. ते फावडे शोधून तो काय करणार होता त्यालाच माहीत. त्याने ते बाहेर काढले होते एक हत्यार म्हणून. येथेच कुठेतरी ते असणार हे निश्चित. तेवढ्यात त्याला त्या फावड्याच्या आकाराची वाळू दिसली.

तो वाळूत थुंकला. उगीचच. त्याने खरे तर शरीरातील पाणी जपले पाहिजे. त्याने दाताने वाळू मिश्रित थुंकी गाळली व बोटांनी ती वाळू काढली.
ती एका कोपर्‍यात दुसरीकडे तोंड करुन तिच्या नाडीशी झटापट करीत होती. कदाचित ती कपड्यावरची वाळूही साफ करीत असेल. त्याने ते फावडे मध्यावर धरले आणि खांद्यापर्यंत उचलले व दरवाजाजवळच्या मोडकळीस आलेल्या भिंतीवर मारण्यासाठी उचलले...
ते बघून ती किंचाळली. त्याने ते सर्वशक्तीनिशी त्या भिंतीवर हाणले. ते त्या भिंतीच्या आरपार गेले. वरुन जरी ती लाकडाची भिंत चांगली दिसत असली तरी वाळूमुळे ती आतून पोकळ होण्यास सुरुवात झाली असावी.

“काय करताय तुम्ही ?”

“मला या लाकडाची शिडी करायची आहे म्हणून मी हे लाकूड काढतोय.”

त्याने दुसर्‍या जागेवर प्रयत्न केला. तेथेही त्याचे फावडे आरपार गेले. तिने वाळूमुळे लाकूड कुजते असे सांगितले होते ते बहुधा बरोबर होते. सूर्यप्रकाशात असलेल्या लाकडाची ही अवस्था, तर घरातील लाकडाची काय अवस्था असेल याची त्याला कल्पना आली. हे असले घर उभे होते हेच खूप होते. ते ठिकठिकाणी अर्धांगवायू झालेल्या माणसाप्रमाणे वाकले होते. या असल्या लाकडाची घरे बांधणे त्या काळात शक्य असावे कारण आजकाल तर ते कागदाची आणि प्लास्टिकचीही घरे बांधताना दिसतात.

जर या भिंतीतून लाकूड मिळत नसेल तर वरचे वासे काढावे लागतील....तो मनात म्हणाला.

“नको! थांबा थांबा” ती किंचाळली.

“शेवटी आपल्याला वाळू चिणणारच आहे... आता काय फरक पडणार आहे?”

तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने परत एकदा ते फावडे उचलले पण तेवढ्यात ती किंचाळत त्याच्याकडे धावली. तो एका बाजूला वळला आणि तिला थांबविण्यासाठी त्याने आपले कोपर पुढे केले. पण तोल जाऊन तो स्वत:च घसरला. त्याने तिला ढकलण्याचा प्रयत्न केला पण ती त्या फावड्याच्या दांड्याला जणू काही बांधली गेली होती. त्याला समजेना. एका स्त्रीकडून त्याच्यावर ही वेळ यावी? ते त्या स्थितीत तीन चार वेळा गडगडत त्या जमिनीवर पडले. क्षणभर त्याला वाटले की त्याने तिला जमिनीवर जखडले आहे. पण तेवढ्यात तिने त्या दांड्याचा आधार घेत त्याला खाली घेतले. काहीतरी झाले होते त्याला. बहुतेक त्या चढलेल्या मद्याचा परिणाम असावा. त्याचा संताप अनावर झाला. ती स्त्री आहे हे विसरुन त्याने त्याचा गुडघा तिच्या पोटात मारला.

ती जोरात किंचाळली आणि निपचित पडली. त्याने तिला खाली घेतले व जमिनीवर दाबून धरले. या गडबडीत तिचे उरोज उघडे पडले होते व त्याचे हात तिच्या घामेजल्या शरीरावरुन घसरत होते.

त्याच क्षणी प्रोजेक्टरची फिल्म तुटावी तसे ते त्याच स्थितीत स्तब्ध झाले. तो थिजलेला क्षण कधीच संपणार नाही असे वाटत असतानाच त्याच्या पोटाला तिच्या उरोजाचा स्पर्ष जाणवत होता. त्याचा ताबा नसल्यासारखा त्याच्या मांड्यांमधे हालचाल झाली. त्याने श्वास रोखला. तो जर थोडा जरी हालला असता तर त्या फावड्यासाठी चाललेल्या झटापटीचे दुसर्‍या कशात तरी रुपांतर झाले असते.

तिने आवंढा गिळल्यावर तिच्या गळ्याची मोहक हालचाल झाली. त्याच्या मांड्यांमधे हालचाल वाढल्याचा त्याला भास झाला. तेवढ्यात तिने त्या शांततेचा भंग केला.

“शहरातील बायका फार सुंदर असतात. नाही का ?”

शहरातील स्त्रिया? त्याला स्वत:चीच शरम वाटली. त्याच्या उद्दीपित भावना एकदम विझल्या. संकट टळले असे त्याला वाटले पण त्याला याची कल्पना नव्हती की वाळवंटातही सुरवंटाची फुलपाखरेच होतात.

सामान्यत: सामान्य स्त्रियांना असे वाटते की त्यांच्या सौंदर्यामुळेच पुरुषांना त्यांची किंमत कळू शकते. हा दुर्दैवी व भाबडा भास आहे. या भ्रामक समजुतीनेच त्या पुरुषाच्या अध्यात्मिक बलात्काराला बळी पडत असाव्यात.

त्याच्या दुसर्‍या स्त्रीबरोबर तो नेहमीच कंडोम वापरायचा कारण त्याला एकदा गुप्तरोग झाला होता आणि तो पूर्ण बरा झाला आहे याची त्याला खात्री नव्हती. जरी डॉक्टरांनी त्याच्या सगळ्या तपासण्या करुन आता ठीक आहेत असे सांगितले तरीही त्याला टेस्टट्युबमधे कधी कधी पांढरे काहीतरी दिसायचेच. कधीकधी त्याला लघवी करताना त्रासही व्हायचा. त्याला जुने आठवू लागले...

“हांऽऽऽऽ आपल्याला कंडोम उपयोगी पडेल नाही का?”

ती इतकी गोरी होती की तिच्या ओठातून रक्त दिसत होते. ती म्हणाली,

“आपल्यातील हे म्हणजे एखाद्या दुकानात जाऊन विकत घेण्यासारखे झाले आहे नाही? नाही आवडले केव्हाही परत करा! प्लास्टिकमधे गुंडाळलेली ती वस्तू कशी आहे हे माहीत नसताना आपण मनाची समजूत काढून ती घेतो. पुढे काय होणार आहे हे माहीत नसताना. ती घेतल्याबद्दल पश्चत्ताप होणार आहे किंवा नाही हेही माहीत नसताना...”

पण मालाच्या नमुन्यासारखे नाते तिला ह्रदयापासून नको असावे. पँटची बटने लावताना त्याला कुंटणखान्यातील स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार्‍या फिनाईलचा वास आल्याचा भास झाला. ती तेथेच मांड्यांमधे टॉवेल धरुन पडली होती आणि त्याला मात्र बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता.

“पण काही वेळा एखादी वस्तू गळ्यात मारली तर चालते.”

“नाही ! बळजबरी...”

“पण आता तू बरा झाला आहेस ना?”

“हे तुला मान्य असेल तर त्याची काय गरज वाटते तुला? सांग ना!”

“हे म्हणजे जबाबदारीतून पळ काढणे झाले.”

“मी तुला सांगितले नव्हते? मला गळ्यात वस्तू मारलेल्या आवडत नाही.”

“कठीण आहे. मला तुझ्या त्या रोगाबद्दल काहीही घेणेदेणे नाहीए...”

“कदाचित असेलही !”

“काहीतरी मूर्खासारखे बोलू नकोस !”

“जाऊ देत ...”

“ही तुझी टोपी तुला कधीच काढाविशी वाटली नाही का?”

“मला तुमचा हा विरोध कशासाठी आहे तेच कळत नाही. आपण एकत्र झोपणे हे नैसर्गिक नाही का? त्यामुळे कदाचित तुला माझ्याबद्दल ओढ वाटू लागेल...”

“हंऽऽऽऽऽ म्हणजे तुम्हाला खरे तर मानसिक रोग झालाय. जाऊ देत झालं. मला उद्या कामाला लागलं पाहिजे.”

‘हंऽऽऽऽऽ मानसिक गुप्तरोग !’ त्याने जांभई देत विचार केला. हुषार आहे बाई. पण त्याने त्याला किती वाईट वाटले असेल याची तिला कधीच कल्पना यायची नाही.

पहिली बाब म्हणजे गुप्तरोग हा सौंदर्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे. गुप्तरोग असणे हे सौंदर्य नसल्याचे लक्षण असावे काय? गुप्तरोग....कोलंबसने त्याच्या जहाजामधून जगभराच्या लहानमोठ्या बंदरातून पसरवलेला एक रोग. सर्व पुरुष मृत्यु आणि गुप्तरोगासमोर समान आहेत. पण तिला हे मान्य नाही. तिने स्वत:ला तिच्या अद्भूत जगात कोंडून घेतले आहे आणि त्याला बाहेर ठेवले आहे. त्याच्या मानसिक गुप्तरोगाचा भोग भोगण्यास... त्याला तो नपुंसक असल्याची जाणीव झाली. तिच्या स्त्रित्वाने त्याचे तिच्या शत्रूत रुपांतर झाले होते.

त्याच्या पहिल्या बाईची ही हकिकत आठवून तो गप्प झाला...

२०

त्याचा चेहरा ताणला गेला. छाती धडधडत होती. त्याच्या जिभेवर गुळचट चव जमा झाली होती. त्याला अंगात शक्ती नसल्यासारखे वाटत होते. या सगळ्या प्रकारात शरीरातील एक ग्लासभर तरी पाणी वाया गेले असणार. ती खाली मान घालून कशीतरी उठून उभी राहिली. वाळूने माखलेला तिचा चेहरा त्याच्या बरोबर डोळ्यासमोर आला. अचानक तिने नाक शिंकरले व बोटे वाळूला पुसली. तिचे वस्त्र तिच्या कमरेवरुन खाली अस्ताव्यस्तपणे घसरत होते.

त्या सगळ्याचा त्याला मनस्वी तिटकरा येऊन त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली. मगाशी मांड्यांमधे अवतरलेला ताठरपणा तिच्या या घाणेरडेपणामुळे अदृष्य झाला. तेथे आता फक्त थोडेसे उबदार वाटत होते त्याला. तो मंदबुद्धी निश्चितच नव्हता पण बलात्कार त्याला मान्य नव्हता. ते म्हणजे साखर न घातलेली खीर खाण्यासारखे होते. हं अध्यात्मिक पातळीवरच्या बलात्काराची गोष्ट वेगळी होती. त्यासाठी प्रथम त्याला स्वत:ला त्याचा अनुभव घ्यावा लागेल मग तिच्यावर.... आणि मानसिक गुप्तरोगाची लागण होण्याचे काय कारण होते? ते म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले की. स्त्रियांची कातडीखालची रंध्रे इतकी नाजूक असतात की काय की पुरुषाच्या नुसत्या नजरेने त्यातून रक्त धावू लागते...

त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले....
त्याने अंदाज केला की शारीरिक सुखाचेही दोन प्रकार असावेत. मोबियसच्या, त्याच्या मित्राच्या, तत्वानुसार जर पाहिले तर एखाद्या मुलीच्या मागे लागल्यावर तुम्ही प्रथम खाण्यापिण्यावर गप्पा मारता आणि मग चवीवर. मग जोपर्यंत भूक लागलेली नसते तोपर्यंत तो एक नुसता भास असतो. चव इत्यादीचा तेथे प्रश्नही येत नाही. पण एकदा का पोट भरले की मग अन्नातील फरक व चवीतील फरक कळू लागतो. शारीरिक भुकेचेही तसेच असावे का? प्रथम शरीराची ओढ लागते आणि नंतर त्यातील विविध प्रकाराची. आणि तसेही त्यावर चर्चा करण्यात अर्थ नसतो. कधी तुम्ही औषधाच्या गोळ्या खाता तर कधी पुलाव. हे तर्कशास्त्र बोलायला ठीक आहे. त्याच्या आत्तापर्यंतच्या एकाही मैत्रिणीने तशी इच्छा प्रदर्शित केली नव्हती. तेही नैसर्गिक होते म्हणा. कुठल्याही स्त्रीला असे सैद्धांतिक नियमानुसार पटवता येत नाहीच नाहीतरी. त्याला हे माहीत नव्हते असे नाही. त्याला हे चांगलेच माहीत होते तरीसुद्धा तो मोबियसच्या सिद्धांतानुसार एका रिकाम्या घराची कडी ठोठावत बसला होता. कारण फक्त, एकच. त्याला अध्यात्मिक अत्याचार करायचा नव्हता.

तो स्वत: इतका काही कामातूर नव्हताच. ते तुम्ही समोर मृत्यु दिसत असतानाही करु शकता. त्याला बांबूची आठवण झाली. तो नाही का मरण्याआधी बिजांना जन्म देतो. नशिबाने माणसाला सारखे मृत्युला सामोरे जावे लागत नाही. त्याला थंडीलाही घाबरायचे खरे तर काही कारण नाही कारण माणसाने या भावनांवर ताबा मिळविण्यात बर्‍यापैकी यश मिळवले आहे. तोच तर माणसांमधला आणि जनावरांमधील फरक आहे. संभोग आणि रेल्वेच्या टिकिटात काय फरक आहे? दरवेळी त्या तिकिटाला भोक पाडून घ्यावे लागते. अर्थात ते तिकीट बनावट तर नाहीना याची खात्री करुन घ्यावी लागतेच म्हणा. पण ही तपासणी फार कटकटची असते. त्यासाठी हजारो कागदपत्रे सादर करावी लागतात.

या तपासणीच्या कागदपत्राखाली तुमची कामेच्छा अगदी दबून गेलेली असते, तळाशी असलेल्या एखाद्या किड्यासारखी... त्यातून आनंद मिळत असेल तर तेही ठीक आहे, पण त्याने या कागदपत्रांचा ससेमिरा संपणार आहे का? ते झाल्यावर अजून काही सादर करायला विसरलो तर नाही आपण...स्त्री पुरुषांना कायमच एकमेकांबद्द्ल असुया वाटत आलेली आहे...दुसर्‍या बाजुचे काहीतरी राहिले आहे असे त्यांना वाटत असते....मग प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्रे सादर करणे आले. हे सगळे कधी संपणार कोणास ठाऊक..... याचा शेवटचा अभ्यास केला गेला तेव्हा प्रमाणपत्रांचे आयुष्य माणसाच्या आयुष्यापेक्षा जास्त असेल असे भाकित केले गेले होते.
ती मला भांडखोर म्हणते पण मी तसा नाही. मी फक्त सत्य कथन करतो.....
पण ती प्रेमाची परतफेड नाही का?
मुळीच नाही. एकएक बंधने काढून टाकल्यावर जे काही उरते, ते आहे ते. तुम्हाला आत्मविश्वास नसला तर तुम्हाला ते मिळेल की नाही याची शंकाच आहे.
खरं तर या प्रकरणात इतक्या खोलात जायची आवश्यकताच नव्हती.... आणि रसहीन भेटवस्तूसारखे ते लैंगिक सुख. दररोज सकाळी प्रणयात आपणही इस्त्रीच्या कपड्यासारखे चुरचुरीत असायला हवे. शारीरिक सुखाचा कोट एकदा घातला की त्यावर चुण्या पडल्याच समजा. त्यावर इस्त्री फिरवली की तो परत नव्या सारखा चमकू लागतो. एकदा का तो नव्यासारखा भासायला लागला की लगेचच जुना होतो. हे असले फालतू काहीतरी ऐकण्याची खरंच काही गरज आहे का ?

हंऽऽऽऽ पण या सगळ्या नियमावल्या जर आयुष्याला काही स्थैर्य देणार असल्या तर तडजोड करण्यास अजूनही काही जागा होती. पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे? वरुन मृत्युची टांगती तलवार सतत आपल्या डोक्यावर असते आणि थोडीही हालचाल करुन देत नाही. शारीरिक सुखातही काहीतरी अशुभ घडणार आहे अशी सारखी भिती वाटत राहते. एखादे बनावट प्रतिज्ञापत्रक मोठ्या आशेने आपण बाळगत असतो तसे. मग आपण प्रवासाच्या तिकीटावर संशय घेऊ लागतो...

ती त्याच्या भावनांना वाचत होती. तिच्या लेंग्याची नाडी बांधताना ती मधेच थांबली. ती नाडी तिच्या हातातून खाली लोंबत होती. तिने मान वर करुन त्याच्याकडे सशाच्या नजरेने पाहिले. तिच्या पारदर्शक पापण्यांमुळे तिचे डोळे सशाच्या डोळ्यासारखे लालबुंद दिसत होते. तिच्या प्रश्नार्थक नजरेकडे पाहताना त्याने तिला त्याच्या नजरेनेच उत्तर दिले. फक्त एकच फरक होता, त्याच्या डोळ्यात काळ थांबला होता.

हातातील नाडी सावरत ती तशीच तिच्या खोलीकडे पळाली व तिचे कपडे काढू लागली. तिच्या सगळ्या हालचाली इतक्या नैसर्गिक होत्या की जणू काही कालच्या राहिलेल्या हालचालीच ती पूर्ण करीत होती. त्याने मनातल्या मनात अपेक्षेने आपले हात एकमेकांवर चोळले. हंऽऽऽ बाई असावी तर अशी. तेवढ्यात त्याने स्वत:ची निर्भत्सना केली. मूर्खासारखे वागल्यास त्याच्या योजनेची वाट लागण्याची शक्यता होती. हे सगळे काल घडले असते तर तिच्या या हालचाली तिच्या गालावरील खळ्यांसारख्या स्त्रीसुलभ आहेत असे त्याने एकवेळ मानले असते. पण आता नाही. कदाचित तसेही असू शकेल पण त्याला तसे असावे असा विचार करायचा नव्हता. तिच्या शरीराचा सुटकेसाठी वापर करायची वेळ आता टळून गेली होती. आता सगळा खेळ ताकदीचा होता. आता प्रस्थापित नाती परस्परांना मान्य असावीत आणि परवानगीसाठी चर्चा करण्याची काहीही आवश्यकता नाही असे मानण्यास जागा होती.

त्याच्या विजारीवर जमलेली वाळू त्याच्या मांड्यांमधे घसरली व तशीच खाली गेली. एखाद्या पाण्याची नळी पाणी सोडल्यावर जशी जीवंत होउन वळवळ करु लागते तशी त्याच्या मांड्यांमधे वळवळ होऊ लागली. त्या वळवळीचा रोख लक्षात घेऊन तो तिच्या नग्न शरीरामागे वितळून गेला.
पण त्यात सुख मिळेल ना? अर्थात सगळे कसे जुळून आले होते एखाद्या आलेखाच्या कागदावर चपखल बसते तसे. वेळ, इच्छा, खोली, ती, सगळेच. मोबियस म्हणतो ती सर्वसाधारण लैंगिक इच्छा हीच असावी. असेलही पण हिचे नितंब कसे टंच आहेत...रस्त्यावर मिळणार्‍या रिकाम्या कातडी पिशव्यांपेक्षा खूपच भारी.
एक गुडघा जमिनीवर टेकून तिने पंच्याच्या बोळ्याने आपल्या मानेवरची वाळू खरडण्यास सुरुवात केली होती. तेवढ्यात वाळूच्या वादळाचा गडगडाट झाला. आख्खे घर हादरले व चिरकले. अडथळा! ती उडणार्‍या पांढ़र्‍या रंगाच्या वाळूत दिसेनाशी झाली. ती दोघे एकमेकांचे हात हातात घेऊन ती वावटळ जाण्याची वाट पाहू लागली.
त्यांच्या घामाच्या धारा खाली वाळूत मिसळत होत्या आणि त्यावर अजून वाळू बसत होती. तिचे हात थरथरत होते. त्याचे शरीर तापले. त्याला कळेना त्याला तिच्या मांड्यांचे एवढे आकर्षण का वाटते आहे ते. शरीरातील तापलेली एकेक नस बाहेर काढून तिच्या मांड्यांवर गुंडाळून गार कराव्यात असे त्याला वाटले. एखाद्या जंगली जनावराची भूक अशीच असावी बहुतेक...तो एखाद्या स्प्रिंगसारखा त्याच्या विचारांशी मुकाबला करु लागला. असा अनुभव त्याला दुसर्‍या स्त्रीबरोबर आला नव्हता. गेली लाखो वर्षे अगदी अमिबापासून ते माणसापर्यंत लैंगिक इच्छा नशिबाने अजून मेलेली नाही हे एक बरे आहे. पण आता त्याला लैंगिक उर्जेची नितांत गरज वाटत होती.
वाळूचे वादळ थांबले आणि ते थांबण्याची वाट पहात असल्यासारखे तो तिला तिच्या शरीरावरील वाळू झटकण्यासाठी मदत करु लागला. त्याचे हात तिच्या शरीराच्या काही भागावर रेंगाळू लागल्यावर तिला हसू फुटले. तिची नखे त्याच्या खांद्यात रुतली आणि काही वेळात तिच्या ओठातून चित्कार बाहेर पडू लागले.

तिच्या शरीरावरील वाळू साफ झाल्यावर आता तिची पाळी होती. तो डोळे बंद करुन तिच्या हाताची आतूरतेने वाट पाहू लागला. त्याचे हात तिच्या केसांमधून फिरताना ते किती कडक झाले आहेत त्याची त्याला जाणीव झाली.

अचानक त्याचे शरीर ताठरले. परत तेच...त्याला परत परत तीच स्वप्ने पडू लागली.

तो खात पीत होता, चालत होता, झोपत होता, खेळत होता, प्रणयात मग्न होता...

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

वाचतोय. कादंबरी अजून बरीच बाकी आहे म्हणा. त्यामुळे जास्त भाष्य करण्यात अर्थ नाही. पण यात जे नायिकेचे पात्र मूळ लेखकाने रंगवले आहे त्याच्या गूढ म्हणता येईल अशा थोड्याश्या नकारात्मकतेचं मला आश्चर्य वाटत आलेलं आहे. ती एक पॅसिव्ह पात्र आहे आणि तिच्या मनात नक्की काय चाललेलं आहे हे शेवटपर्यंत पुरेसं उलगडत नाही. संपूर्ण कादंबरी ही नायकाच्या दृष्टिकोनातून लिहिली गेली आहे. असं का हे समजत नाही. मग यात एकूणच स्त्रीत्वाचं चित्रण काहीसं नकारात्मक आणि वासनामय असं आलं आहे का असा प्रश्न पडतो.

असो. अंतिम भागात याविषयी अधिक मत मांडणे योग्य ठरेल. तेव्हा थांबतो.

पैसा's picture

25 Feb 2017 - 10:40 pm | पैसा

या नायिकेला तिचे लोकही एखाद्या वस्तूपेक्षा जास्त किंमत देत आहेतसं वाटत नाही.