अंधार क्षण भाग ३ - मसायो एनोमोटो (लेख १३)

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
24 Nov 2014 - 6:18 am

अंधार क्षण - मसायो एनोमोटो

इतिहासातलं एक प्रबळ साम्राज्य स्थापन करणा-या रोमन लोकांना एक चिंता अशी वाटायची की आर्थिक प्रगतीमुळे त्यांच्यातली विजिगिषु वृत्ती कमी होईल. लोकांचा स्वभाव मृदू होईल. त्यांच्यातला कठोरपणा निघून जाईल. मला त्याच्या बरोबर उलट चिंता वाटत असते की  मानवी अध:पाताच्या कथा वारंवार ऐकून माझ्या संवेदना बोथट होतील की काय. पण २००० साली टोकियोमध्ये मी मसायो एनोमोटोची मुलाखत घेतली आणि माझ्या लक्षात आलं की असं काहीही झालेलं नाही, कारण या कथेतल्या तपशिलाने मला अजूनही पछाडलेलं आहे.

मसायो एनोमोटो एका शेतक-याचा मुलगा होता आणि वयाच्या १७ व्या वर्षी तो सैन्यात भरती झाला. हाजिमे कोंडोप्रमाणे त्यालाही अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण करावं लागलं. ते पूर्ण झाल्यावर त्याला  उत्तर चीनमध्ये, चीन-जपान युद्धातल्या सर्वात भीषण आघाडीवर पाठवण्यात आलं. चिनी लोक हे जनावरांपेक्षा किंवा किडा-मुंगीपेक्षाही खालचे आणि क्षुल्लक आहेत हे त्याच्या प्रशिक्षणात त्याला शिकवलं होतंच. त्यामुळे चीनमध्ये आल्यावर तोही चिन्यांवरच्या अत्याचारांमध्ये अगदी उत्साहाने सामील झाला.

त्याच्या आयुष्याची दिशा बदलवून टाकणारा प्रसंग मे १९४५ मध्ये घडला. तो आणि त्याचे सहकारी बरेच महिने आपल्या सैन्यतळापासून दूर, शत्रूच्या प्रदेशात होते. ते प्रचंड थकले होते आणि त्यांना भूकही लागली होती. एनोमोटोला त्याच्या टेहळणी पथकाकडून समजलं की जवळच्या एका निर्मनुष्य खेड्यात एक चिनी स्त्री परत आलेली आहे. त्याचा छडा लावायला तो त्या खेड्यात गेला. गावात गेल्यागेल्याच त्याला ती दिसली.  " तिला आमची भाषा येत होती, " एनोमोटो म्हणाला, " आणि ती म्हणाली की तिच्या आईवडिलांनी तिला गाव सोडून त्यांच्याबरोबर येण्यासाठी खूप समजावलं पण तिने गावातच राहायचा निर्णय घेतला कारण तिच्या मते जपानी सैनिक इतके काही वाईट नव्हते. "

असं समजणं ही तिची घोडचूक होती. " तिला पाहिल्यावर पहिला विचार माझ्या मनात आला तो म्हणजे तिला भोगायचा. आणि मी तो ताबडतोब अंमलात आणला. " गावात दुसरं कोणीही नाही याची खात्री करुन घेतल्यावर एनोमोटोने तिच्यावर बलात्कार केला. " तिने विरोध करायचा बराच प्रयत्न केला. त्याने मला काही फरक पडला नाही. ती मला काहीतरी सांगायला बघत होती पण मी त्याकडे लक्षच दिलं नाही." बलात्कार झाल्यावर बलात्कारित स्त्रियांना जपानी सैनिक ठार मारत असत. एनोमोटोनेही तेच केलं. " मी तिला माझ्या तलवारीने ठार केलं. टीव्हीवर तुम्हाला अशा दृष्यांमध्ये रक्ताच्या चिळकांड्या उडताना दाखवतात. प्रत्यक्षात असं काहीही होत नाही. मी अनेक लोकांना तलवारीने मारलंय. तुम्ही जर एखाद्याच्या मानेवर तलवारीने आघात केलात तर थोडं रक्त येतं पण चित्रपटात दाखवतात तसं काही तुम्ही रक्ताने पूर्णपणे न्हाऊन वगैरे निघत नाही. "

त्या स्त्रीच्या मृतदेहाकडे बघत असताना अजून एक विचार त्याच्या मनात आला. तो आणि त्याचे सहकारी भुकेलेले होते. व्यवस्थित जेवण असं त्यांना गेल्या कित्येक महिन्यांमध्ये मिळालं नव्हतं. एनोमोटोने तिचा मृतदेह झाडीत नेला आणि आपल्या तलवारीने तिच्या शरीराचे तुकडे करायला सुरूवात केली. तिचे पाय, हात आणि धड इथलं मांस त्याने कापून काढलं. " जास्तीत जास्त मांस मिळेल अशा अवयवांवरुन मी ते काढलं. " नंतर हे मांसाचे तुकडे घेऊन तो आपल्या सहका-यांकडे गेला. त्यांनी ते शिजवलं आणि खाल्लं. जे सामान्य सैनिक होते त्यांनी कुठलाही प्रश्न विचारला नाही आणि एनोमोटोनेही त्यांना काही सांगितलं नाही. त्याने त्याच्या कमांडिंग आॅफिसरला मात्र सांगितलं. त्यानेही यावर काही प्रतिक्रिया दिली नाही.

एनोमोटोनेही ते मांस खाल्लं, " चांगली होती त्याची चव. पोर्कपेक्षा चांगली. निदान त्यावेळी तरी मला असंच वाटलं. " आणि त्याला जराही अपराधी वाटलं नाही, " तिला भोगणं, मारणं, खाणं - मला त्याबद्दल तेव्हा काहीही वाटलं नाही. आणि  चीनमध्ये मी जे काही केलं त्या सर्वच गोष्टींबद्दल मला असंच वाटत होतं. नंतर, काही काळाने मला त्याबद्दल पश्चात्ताप झाला."
 
जपानी सैन्याच्या नियमांनुसार बलात्कार हा गुन्हा होता, निदान कागदावर तरी,  पण जेव्हा मी त्याला विचारलं की अधिका-यांनी अशा घटना कशा खपवून घेतल्या, तेव्हा एनोमोटो शांतपणे म्हणाला , " कारण तेही असल्याच गोष्टी करत होते. आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की हे सम्राटाचं युद्ध आहे आणि आम्ही जे काही करत आहोत ते सगळं त्याच्यासाठीच आहे. त्यामुळे आम्ही काहीही केलं - लूटमार, हत्या, बलात्कार - तरी त्यात वावगं असं काहीच नाही. या गोष्टी चुकीच्या आहेत हे मला मान्य आहे पण सैनिकांना काहीतरी विरंगुळा पाहिजे ना! हा आमचा ' विरंगुळा ' होता. "

ज्या स्त्रीला त्याने खाल्लं तिच्याशिवाय अजून ७ बायकांवर आपण बलात्कार केले असं एनोमोटोने मला सांगितलं, " त्यावेळी मी तरूण होतो त्यामुळे बलात्कारासारख्या कृत्याचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. शिवाय एक सैनिक म्हणून आम्हाला जे सांगितलं जायचं त्याचं पालन करणं हे आमचं कर्तव्य होतं. " 

आमची मुलाखत सुरु होऊन एक तास उलटून गेला होता. संधिप्रकाश धूसर होऊन हळूहळू रात्र पडायला लागली होती. आम्ही ही मुलाखत एका पारंपारिक जपानी सराईत चित्रित करत होतो. त्या खोलीतल्या मिणमिणत्या कंदिलामुळे सराईच्या कागदी भितींवर सावल्या नाचत होत्या. एनोमोटोने आत्तापर्यंत वर्णन केलेल्या सर्व घटनांमुळे वातावरण दूषित झाल्यासारखं वाटत होतं. मी आजवर जेवढ्या मुलाखती घेतल्या आहेत, त्यात अनेक मुलाखती अशा लोकांच्या आहेत जे युद्धातल्या अत्याचारांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होते. पण असा अनुभव मला कधीच आला नव्हता. माझा भुतेखेते किंवा तत्सम गोष्टींवर अजिबात विश्वास नाही पण तरी त्या खोलीतलं वातावरण हे अशुभ होतं हे नक्की. कुठल्यातरी पाशवी शक्तीचं सावट पडल्यासारखं वाटत होतं. एखादी जागा किंवा एखादा माणूस यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी आपल्याला अस्वस्थ व्हायला, घुसमटायला होतं. माझी तीच मन:स्थिती होती.

काही वेळाने कॅमे-यातली कॅसेट संपली म्हणून नवीन कॅसेट घालण्यासाठी आम्ही चित्रीकरण थांबवलं. आतमध्ये जरा मोकळी हवा येऊ देण्यासाठी मी खोलीचा दरवाजा उघडला. अचानक खोलीतलं सगळं वातावरण बदलून गेलं. मघाच्या घुसमटवून टाकणा-या वातावरणाचा तिथे मागमूसही उरला नाही. यानंतर कधीही मला असा अनुभव आलेला नाही. 

युद्ध जेव्हा संपलं तेव्हा एनोमोटो चिन्यांचा कैदी होता. उत्तर चीनमधील बुजान या ठिकाणी तो आणि जवळजवळ १००० जपानी कैदी स्थानबद्ध होते. कोणीही चिन्यांकडून सुडाचीच अपेक्षा केली असती, कारण या जपानी कैद्यांचे गुन्हेही तेवढेच भयंकर होते. प्रत्यक्षात मात्र  काही वेगळंच घडलं: " तिथले चिनी रक्षक दिवसातून दोन वेळा जेवत असत. आम्हा कैद्यांना मात्र ३ वेळा व्यवस्थित जेवण मिळत असे. अन्नाचा दर्जाही खूप चांगला होता. आम्हाला जपानमध्ये कधीच असं जेवण मिळालं नव्हतं. आणि जेवढे दिवस मी कैदी होतो ते सगळे दिवस असं जेवण मिळालं. "

चिनी लोकांकडून अशी वागणूक मिळाल्यामुळे एनोमोटोने आपली दुष्कृत्यं परत एकदा तपासून पाहायला सुरूवात केली, " जर मी माझ्याच दृष्टिकोनातून विचार केला असता तर मला कदाचित पश्चात्ताप झाला नसता. पण मी त्यांच्या दृष्टीने विचार केला आणि मला माझ्या कृत्यांची शरम वाटायला लागली. मी त्यांच्या देशबांधवांवर इतके अत्याचार केले पण एकदाही त्यांनी माझ्यासमोर त्याचा उल्लेख केला नाही किंवा माझ्या अंगाला हातही लावला नाही."

आपल्या वरिष्ठांनी आपल्याला जशी वागणूक दिली त्यापेक्षा आपण जनावरं समजत असलेल्या चिनी लोकांनी आपल्याला दिलेली वागणूक चांगली आहे हे जेव्हा एनोमोटोला पटलं तेव्हा त्याने स्वतःहून आपल्या गुन्ह्यांची कबुली देण्याचा निर्णय घेतला, " चिन्यांनी मला काहीही करायला सांगितलं नाही. हा निर्णय माझा स्वतःचा होता कारण आपण भयंकर गुन्हे केले आहेत याची मला जाणीव झाली. मी त्यांच्याकडे कागद आणि पेन्सिल मागितले आणि त्यावर माझ्या सगळ्या गुन्ह्यांबद्दल तपशीलवार लिहून काढलं. त्याच्या आधारे चिनी सरकारचे लोक त्या त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी माझ्या माहितीची सत्यता पडताळून पाहिली. हे करायला त्यांना जवळजवळ एक महिना लागला. मी लिहिलेली सगळी माहिती बरोबरच होती. त्यामुळे मी खरं बोलतोय हे त्यांना समजलं. "

चीन हा काही अमेरिका आणि इंग्लंडप्रमाणे लोकशाही देश नव्हता. १९४९ नंतर तिथे माओच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट हुकूमशाही स्थापन झाली आणि त्या आधी तिथे जनरल चँग कै शेकच्या राष्ट्रवादी  ' क्युओमिन्टांग ' पक्षाची हुकूमशाही होती. इतर अनेक हुकूमशाही देशांमध्ये (उदाहरणार्थ पूर्व युरोपातले सोविएत रशियाचे पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पूर्व जर्मनी, रूमानिया यासारखे अंकित देश) युद्धगुन्हेगार या नावाखाली असंख्य निरपराध पण कम्युनिस्ट-विरोधी लोकांचे बळी घेतले गेले. या लोकांवर खटले भरण्याचीही गरज या देशांच्या सरकारांना वाटली नाही.  आणि म्हणूनच चीनमध्ये  मसायो एनोमोटो आणि त्यासारख्या इतर अनेक लोकांनी दिलेल्या कबुलीजबाबांची सत्यता पडताळून पाहिली गेली हे विशेष आहे. 
 
बुजानमध्ये असलेल्या जपानी स्थानबध्दांमध्ये बलात्काराची कबुली देणारा एनोमोटो पहिलाच होता. त्याने कबुलीजबाब देईपर्यंत तिथल्या इतर कैद्यांनी लूटमार, चोरी अशा गुन्ह्यांची कबुली दिली होती पण बलात्कारांबद्दल कोणीही बोललं नव्हतं. पण एनोमोटोनंतर अनेकांनी आपले गुन्हे कबूल केले. 

१९५६ मध्ये चिनी सरकारने या सर्व युद्धकैद्यांनी कबूल केलेले जवळजवळ सर्व गुन्हे पडताळून पाहिले होते. त्यानंतरचा चिनी सरकारचा निर्णय हा सर्वात मोठा धक्का होता. त्यांनी एनोमोटोसह सगळ्या कैद्यांना मुक्त केलं आणि त्यांना जपानला, आपल्या घरी जायची परवानगी दिली. चीनचा राजकीय धूर्तपणा म्हणा किंवा पराकोटीची क्षमाशीलता म्हणा, पण  या निर्णयाचे जपानमध्ये वेगवेगळे पडसाद उमटले. 

जपान आणि जर्मनी या दोघांनीही दुस-या महायुद्धाच्या शेवटी शरणागती पत्करली असली तरी दोन्हीकडे  युद्धोत्तर स्थिती वेगळी होती. जर्मनीची फाळणी झाली आणि अमेरिकन, ब्रिटिश आणि फ्रेंच आधिपत्याखालील जर्मन भाग हा पश्चिम जर्मनी नावाचं राष्ट्र बनला तर सोविएत आधिपत्याखालील जर्मन भाग हा पूर्व जर्मनी नावाचं राष्ट्र बनला. पश्चिम जर्मन सरकारने स्वतःला नाझी राजवटीचे वारस म्हणून घोषित केलं आणि नाझींनी केलेल्या सर्व अत्याचारांची जबाबदारी घेतली. राज्यघटनेपासून सगळं नव्याने तयार केलं गेलं. दोस्त राष्ट्रांनी आणि पुढे पश्चिम जर्मन सरकारनेही नाझी युद्धगुन्हेगारांवर खटले भरले आणि नाझी कालखंडाच्या सर्व दृश्य खुणा पुसून टाकायचे प्रयत्न केले गेले. 

जपानमध्ये मात्र असं झालं नाही. जपानचा सम्राट हा सगळ्या सैन्यदलांचा प्रमुख होता आणि पर्ल हार्बरपासून सगळ्या निर्णयांवर त्याची मोहर होती. पण अमेरिकेने सम्राटाला हातही लावला नाही. परिणामी जपानमध्ये जपानी सैनिकांनी केलेल्या अत्याचारांवर कोणी बोललंही नाही किंवा हे अत्याचार 
करणा-या अधिका-यांवरही कोणी खटले भरले नाहीत. युद्धकाळात जपानचा पंतप्रधान असलेला हिडेकी टोजो आणि इतर जपानी नेत्यांना फाशी देण्यात आलं असलं तरी ज्या प्रमाणात जर्मनीमध्ये नाझी अत्याचारांची दखल घेतली गेली तसं जपानमध्ये झालं नाही. 

त्यामुळे चीनने जेव्हा या जपानी युद्धकैद्यांना सोडलं तेव्हा जपानमध्ये खळबळ उडाली. जपानी सरकारने युद्धातले गुन्हे मान्य केलेले नव्हते त्यामुळे एकही जपानी युद्धकैदी चीनमधून जपानला आला नसता, तर जपानसाठी ते चांगलंच होतं. पण इथे जवळजवळ १००० जपानी सैनिक परत आले होते आणि स्पष्टपणे आपल्या भयानक गुन्ह्यांची कबुली देत होते. असं काही घडलं हे नाकारणा-या जपानी सरकारची त्यामुळे मोठीच पंचाईत झाली. अर्थात काही जपानी नेत्यांनी हे चीनमधून परत आलेले युध्दकैदी कम्युनिस्ट बुद्धिभेदाचे (brainwashing) बळी असल्याचा कांगावा केला पण खुद्द जपानमध्येही तोपर्यंत अनेक जपानी अधिका-यांनी युद्धातल्या अत्याचारांबद्दल आवाज उठवला होता. त्यांनी सांगितलेल्या कथा आणि या परत आलेल्या युद्धकैद्यांच्या कथा यात खूपच साम्य होतं. त्यामुळे जपानी सरकारला आता या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणं अशक्य होतं. 

खरं सांगायचं तर मलाही मसायो एनोमोटोची कथा ही अतिरंजित वाटली होती, विशेषतः नरमांस भक्षणाचा प्रसंग. त्यामुळे त्याची सत्यता एखाद्या स्वतंत्र अशा स्त्रोताद्वारे तपासून पाहायची माझी इच्छा होती. जपानी इतिहासकार प्रा. युकी तनाका यांनी या विषयावर अत्यंत विस्तृत आणि विश्वसनीय संशोधन केलेलं आहे. त्यांच्यानुसार जपानी सैन्याने नरमांसभक्षण करण्याचे प्रसंग हे नक्कीच घडलेले आहेत आणि त्यातले बरेच प्रसंग हे उघडकीस आले नाहीत कारण सैन्यातले ज्येष्ठ अधिकारीही त्यात सहभागी होते. तनाकांचं संशोधन जरी पापुआ न्यूगिनीवरच्या जपानी सैन्याच्या कृत्यांवर आधारित असलं तरी चीनमधले जपानी सैनिक त्यापेक्षा काही वेगळे वागले असतील असं समजण्याची गरज नाही. शिवाय जेव्हा चिनी अधिका-यांनी त्याच्या कथेची सत्यता पडताळून पाहिली होती तेव्हा त्यांनाही ती विश्वसनीयच वाटली होती. 

पण माझ्या मनावर सर्वात मोठा प्रभाव चिनी लोकांनी आपल्या जपानी कैद्यांना कसं वागवलं ते पाहून पडला नाही, तर एनोमोटोने सांगितलेल्या एका प्रसंगामुळे पडला. या मुलाखतीतला मला लख्ख आठवणारा आणि अजूनही अस्वस्थ करणारा भाग हाच आहे. तो म्हणाला - " चिन्यांनी माझी प्रशंसा केली आणि ते म्हणाले की मी सर्वात मोठा आणि सर्वात अचूक कबुलीजबाब लिहिला आहे! " हे उद्गार वैशिष्ट्यपूर्ण होते कारण याआधी एनोमोटोने आपण आपल्या युनिटमधले सर्वात उत्साही सदस्य असल्याचं सांगितलं होतं. जेव्हा चिनी कैद्यांना संगिनीने मारण्याची वेळ यायची किंवा खेड्यांमधे लूटमार करायची वेळ यायची, तेव्हा तोच सर्वात पुढे असायचा. हे सगळं त्याने त्याच्या वरिष्ठांना खूष करण्यासाठी केलं आणि नंतर चिन्यांच्या कैदेत असतानाही त्यांना खूष करणं हाच त्याचा मुख्य हेतू होता. कुठल्याही प्रकारची मानसिक घालमेल न  अनुभवता त्याच्या मूल्यव्यवस्थेने १८० अंशांची गिरकी घेतली होती,कारण ही वरिष्ठांना खूष करण्यातली तत्परता हा त्याचा सहजस्वभाव झाला होता आणि त्यामुळे तो समोरच्या परिस्थितीत जसा वापरता येईल तसा त्याने तो वापरला. 

मुलाखत संपवून मी जेव्हा टोकियोच्या झगमगत्या रस्त्यांवरून माझ्या हाॅटेलकडे परत चाललो होतो तेव्हा या जाणिवेने मी जास्त अस्वस्थ झालो, त्याच्या नरमांसभक्षणाबद्दल ऐकलं तेव्हा जेवढा अस्वस्थ झालो होतो, त्यापेक्षाही जास्त!

क्रमशः

इतिहासभाषांतर

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

24 Nov 2014 - 6:31 am | मुक्त विहारि

पुभाप्र

मार्गी's picture

24 Nov 2014 - 10:25 am | मार्गी

अत्यंत जोरदार लेखमाला सुरू आहे! अस्वस्थ करणारं वर्णन. धन्यवाद. :)

अजया's picture

24 Nov 2014 - 10:29 am | अजया

जपानला हिरोशिमाच्या निमित्ताने जी सहानुभूती मिळाली,त्या खाली ही त्यांच्याच सैनिकांनी शांतपणे केलेल्या निर्घृण अत्याचाराची भूतं गाडली गेली का?
पुढे चिनने तिबेटमध्ये हेच केलं अाणि.
वाचुन सतत त्या निष्पाप लोकांबद्दल वाईट वाटत राहातं जे फक्त बळी गेले,हिंसेचे अत्याचाराचे.कोणाचं मांस पण खाल्लं गेलं.फक्त राज्यकर्त्यांच्या युध्दपिपासेचे बळी....

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2014 - 11:02 am | डॉ सुहास म्हात्रे

मानवी इतिहासाचा एक भयानक कालखंड ! :(

वाचतोय. पुभाप्र.

प्रचेतस's picture

24 Nov 2014 - 5:49 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.

बोका-ए-आझम's picture

24 Nov 2014 - 3:19 pm | बोका-ए-आझम

कविवर्य कुसुमाग्रजांची ही कविता चीन-जपानमधून युद्धावरच आहे. पण कोणत्याही युद्धाची भीषणता आणि संहारकता त्यातून
व्यक्त होते -

जा जरा पूर्वेकडे
वाळवंटी कोरता का एक श्वानाचे मढे?
जा गिधाडांनो पुढे
जेथ युद्धाची धुमाळी गंज प्रेतांचा पडे
जा जरा पूर्वेकडे

आणि रक्ताच्या नद्या हो वाहती धारोष्णशा
भागवा तेथे तृषा
ढीग साराया शवांचा तेथ लागे फावडे
जा जरा पूर्वेकडे!

गात गीते जाऊ द्या हो थोर तांडा आपुला,
देव आहे तोषला
वर्षता त्याचा दयाब्धी राहता का कोरडे
जा जरा पूर्वेकडे!

तेथ देखा आग वेगाने विमाने वर्षती
थोर शास्त्रांची गती
धूळ आणि अग्नी यांच्या दौलती चोहीकडे
जा जरा पूर्वेकडे!

खड्ग लावूनी उराला बायकांना वेढती
आणि दारी ओढती
भोगती बाजारहाटी मांस आणि कातडे
जा जरा पूर्वेकडे!

आर्त धावा आईचा ऐकूनी धावे अर्भक
ना जुमानी बंदूक
आणि लोंबे संगिनीला छान छोटे आतडे
जा जरा पूर्वेकडे!

हा दयेने ईश्वराच्या काळ आहे चालता
व्यर्थ येथे राबता
व्यर्थ तेथे शोणिताचे वाहुनी जाती सडे
जा जरा पूर्वेकडे!

आणि येताना पवाडे संस्कृतीचे गा जरा
डोलू द्या सारी धरा
मेघमालेतून आम्हा शांततेचे द्या धडे
जा जरा पूर्वेकडे!

अजया's picture

24 Nov 2014 - 7:58 pm | अजया

_/\_

बबन ताम्बे's picture

24 Nov 2014 - 5:41 pm | बबन ताम्बे

म्हणजे मध्ययुगीन लढायांमधेच निष्पापांवर असे क्रुर अत्याचार होत नव्ह्ते तर ! नाझींचे ज्युंवरील अत्याच्रार वाचले होते. जपान्यांचेही अत्याचार "लोप्संग रांपा" या तिबेटी धर्मगुरूच्या चरित्रात वाचले होते. पण हे म्हणजे भयानकच आहे. जपानी इतके क्रुर?

सस्नेह's picture

24 Nov 2014 - 9:12 pm | सस्नेह

वाचून हे खरं वाटलं, 'परमेश्वरा त्यांना क्षमा कर, ते काय करताहेत त्यांना समजत नाही'

बोका-ए-आझम's picture

25 Nov 2014 - 5:40 pm | बोका-ए-आझम

चीन-जपान युद्धात चीनला ब्रिटिशांनी वैद्यकीय मदत पुरवली होती. डाॅक्टर द्वारकानाथ कोटणीस हे याच पथकातून चीनला गेले आणि त्यांनी तिथे निरलसपणे जखमी आणि आजारी सैनिकांची सेवा केली. त्यांची पत्नी चिनी होती. त्यांना त्या वेळच्या चिनी सरकारने प्रशस्तीपत्र दिलं होतं. आजही भारताच्या दौ-यावर आलेला कोणताही चिनी राष्ट्राध्यक्ष कोटणिसांच्या कुटुंबाला भेटतोच.