1

अंधार क्षण भाग ५ - सुरेन मिर्झोयान (लेख २६)

Primary tabs

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
19 Jan 2015 - 12:20 am

अंधार क्षण - सुरेन मिर्झोयान

ज्यांना दुस-या महायुद्धामध्ये अजिबात रस नाही त्यांनीसुद्धा स्टॅलिनग्राडच्या लढाईबद्दल ऐकलेलं असतं. या लढाईपासून जर्मनीच्या पराभवाची सुरूवात झाली. त्यानंतर कर्स्कच्या लढाईने जर्मनी युद्ध जिंकू शकत नाही हे सिद्ध झालं, त्यामुळे त्याचा फायदा उचलण्यासाठी रशियन सैन्याने ' आॅपरेशन बाग्रेत्सिओन ' ही प्रतिचढाई सुरु केली आणि शेवटी बर्लिनमध्ये जर्मनीने शरणागती पत्करली. हा सगळा घटनाक्रम सुरु करणा-या या लढाईला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकी संहारक, दाहक आणि हातघाईची लढाई याआधी आणि यानंतरही क्वचितच लढली गेली असेल. आॅगस्ट १९४२ ते फेब्रुवारी १९४३ हा या लढाईचा काळ होता आणि जर्मन सैन्याचं तोपर्यंत अजेय असलेलं विद्युद्वेगी युद्धतंत्र - ब्लिट्झक्रीग - इथे पूर्णपणे कुचकामी ठरलं. तोपर्यंत इतर देश - सोविएत रशियासकट - जर्मनांच्या नियमांनुसार लढत होते. स्टॅलिनग्राडमध्ये रशियन सैन्याने आपलं स्वतःचं असं तंत्र विकसित केलं आणि जर्मनांना नामोहरम केलं.

लष्करी दृष्टीने स्टॅलिनग्राडच्या लढाईचं महत्त्व आहेच पण या लढाईचा सर्वात मोठा परिणाम हा मानसिक होता. आपणही हरु शकतो हे जर्मन सैन्याला कळलं आणि आपण जिंकूही शकतो याची रशियन सैन्याला जाणीव झाली. युद्धाचा पुढचा इतिहास त्यामुळे पूर्णपणे बदलून गेला.

हे सगळं घडलं कसं ते मला या लढाईत प्रत्यक्ष लढलेल्या सुरेन मिर्झोयान या एका रशियन सैनिकाकडूनच ऐकायला मिळालं. त्याला १९९० च्या दशकाच्या शेवटी मी स्टॅलिनग्राडमध्येच (आता त्याचं नाव व्होल्गोग्राड आहे) भेटलो. आम्ही भेटलो तो दिवस अत्यंत उदासवाणा दिवस होता. हिवाळ्याची चाहूल लागली होती. राखाडी रंगाच्या ढगांनी आभाळ भरून आलं होतं. व्होल्गा नदीच्या किना-यावर जुन्या काळात बांधलेल्या आणि सरकारी बांधकाम आहे हे दुरूनच ओळखता येईल अशा दिसणा-या इमारतींपैकी एका इमारतीत तो राहात होता.

गहू हे रशिया आणि युक्रेनमधलं मुख्य पीक. अशा गव्हाच्या शेतजमिनी असणा-या विस्तीर्ण प्रदेशाला रशियन भाषेत ' स्टेप्स ' हा शब्द आहे. स्टॅलिनग्राडच्या पश्चिमेला या स्टेप्स पसरलेल्या आहेत. नजर जाईल तिथपर्यंत फक्त सपाट शेतजमीन. जर्मनांच्या रणगाड्यांना आणि चिलखती मोटारींना हा भूभाग फारच सोयीचा होता. स्टॅलिनग्राडवरच्या जर्मन आक्रमणाचं सांकेतिक नाव होतं ' आॅपरेशन ब्ल्यू .' जर्मनांचे हजारो पँझर आणि टायगर रणगाडे रोरावत या स्टेप्सवरुन स्टॅलिनग्राडच्या दिशेने झेपावले होते. हिटलरसाठी स्टॅलिनग्राडचं महत्त्व हे दुहेरी स्वरुपाचं होतं. स्टॅलिनचं नाव मिरवणारं शहर ताब्यात घेऊन मिळणारं मानसिक समाधान तर होतंच पण व्होल्गा नदीच्या किना-यावरुन पुढे कॅस्पियन समुद्रापर्यंत जाणं आणि बाकू, मैकाॅप आणि ग्राॅझ्नी इथले तेलसाठे ताब्यात घेणं हाही स्टॅलिनग्राडवरच्या हल्ल्याचा एक उद्देश होता.

स्टेप्सवरुन स्टॅलिनग्राडपर्यंत जर्मनांना काहीच प्रतिकार झाला नाही. अवघ्या २ महिन्यांत ६५० किलोमीटर्स एवढं अंतर कापून जर्मन सैन्य व्होल्गा नदीच्या तीरावर पोहोचलं. स्टॅलिनग्राडमध्ये लढलेल्या अनेक जर्मन सैनिकांशी आणि
अधिका-यांशीही मी बोललो आहे. व्होल्गा नदी दिसल्यावर त्यांना उचंबळून आलं होतं. आपल्या साम्राज्याची एक नवीन सीमा आपण पार करत आहोत, इथपर्यंत जर्मन सैन्य पहिल्यांदाच पोचलंय, आपण एक इतिहास घडवत आहोत - अशा त्यांच्या मनातल्या भावना होत्या. आता फक्त रशियन सैन्याला व्होल्गा नदीच्या पश्चिम किना-यावरुन हुसकावून लावलं की हा सारा भाग आपलाच याविषयी कुणाच्याही मनात त्यावेळी शंका नव्हती.

आतापर्यंतच्या अनुभवामुळे हेही काम सोपं आहे असं जर्मनांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे शहरावर बाँबफेक सुरु केली. जर्मन हवाईदल ' लुफ्तवाफ ' ने सलग ६-७ तास बाँबफेकींचं सत्र आरंभलं. त्यांनी व्होल्गा नदीतली रशियन जहाजंही बुडवली आणि तिथून शहराला मदत मिळेल ही शक्यता नाहीशी केली. एवढं झाल्यावर जर्मन भूदल आणि तोफखाना यांनी शहरावर हल्ला चढवला. पण इथे त्यांना प्रखर प्रतिकाराचा सामना करावा लागला. स्टेप्समध्ये असा प्रतिकार कधीच झाला नव्हता. अव्याहत बाँबफेकीमुळे शहरातल्या ब-याचशा इमारतींची पडझड झाली होती. त्यात राहाणारे लोक निर्वासित झाले होते. या इमारतींच्या आधाराने रशियनांनी प्रतिकार करायला सुरूवात केली. अशा रणभूमीवर जर्मनांच्या युद्धतंत्राचा काहीही उपयोग नव्हता. मिर्झोयानसारख्या सैनिकांनी तर पाय रोवून उभं राहायचं असंच ठरवलं होतं, " आम्ही शत्रूला एकेका इंचासाठी भारी किंमत मोजायला लावायची असंच ठरवलं होतं. काय वाट्टेल ते झालं तरी शहर सोडायची आमची तयारी नव्हती. "

हळूहळू या रशियन सैनिकांचा आत्मविश्वास वाढत गेला. एका घटनेमुळे जर्मनांना इथे थोपवणं शक्य आहे याबद्दल त्यांची खात्री पटली. मिर्झोयान आणि त्याच्या सहका-यांना एखाद्या जर्मन सैनिकाला किंवा अधिका-याला पकडून आणण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती. त्याच्याकडून जर्मनांच्या पुढील योजनांबद्दल रशियनांना जाणून घ्यायचं होतं, " एक आडवाटेची गल्ली होती आणि तिच्या आसपास
ब-यापैकी झाडी होती. आम्ही जवळपास एक तासभर तिथे जर्मनांची वाट पाहात थांबलो. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. आम्ही एक बारीक तार घेतली आणि तिचं एक टोक एका झाडाला बांधलं आणि तिचं दुसरं टोक आम्ही लपलो होतो त्या झाडीमध्ये होतं. जर कोणी जर्मन सैनिक तिथून गेला तर त्याला धडपडवून नंतर उचलायचा आमचा विचार होता. "

त्यांच्या हातात जर्मन तोफखान्याचा एक मेजर लागला, " त्याने आम्हाला सांगितलं की पहिल्या महायुद्धात त्याचे वडील आमच्याविरुद्ध लढले होते. एखाद्या अस्वलासारखा धिप्पाड होता तो. पण आमच्यापुढे त्याला सोडून द्यावं म्हणून गयावया करत होता. त्याला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी त्याने आम्हाला सांगितल्या. त्यामुळे त्याचे सहकारी सैनिक गोत्यात येणार होते पण त्याला काहीही फिकीर नव्हती. उलट तो आम्हाला जर्मनांच्या पुढच्या योजना सांगण्यासाठी आतुर होता. " सुरेन मिर्झोयान यावेळी १९-२० वर्षांचा असेल - " सैन्यात येण्याआधी मी जर्मनांबद्दल बरंच ऐकलं होतं पण या जर्मन मेजरला बघितल्यावर मला जर्मन काय आहेत आणि किती शूर आहेत ते बरोबर समजलं. त्यांना आपण जिंकू असं वाटतच नव्हतं. "

स्टॅलिनग्राडमधलं जर्मन सैन्य जनरल फ्रेडरिक फाॅन पाॅलसच्या नेतृत्वाखाली होतं तर रशियन सैन्याचा मुख्य अधिकारी होता जनरल वासिली च्युइकाॅव्ह. अत्यंत कडक शिस्त आणि कठोरपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या च्युइकाॅव्हबद्दल अशी आख्यायिका होती की एकदा त्याच्या हाताखालच्या अधिका-याने त्याचं ऐकलं नाही म्हणून त्याने त्या अधिका-याला चाबकाने फोडून काढलं होतं. पण एक युद्धनेता म्हणूनही तो उत्कृष्ट होता. जर्मन सैन्याचा एक कच्चा दुवा त्याच्या लक्षात आला. जर्मनांची हातघाईच्या लढाईसाठी काहीच तयारी नव्हती. ते त्यांच्या रणगाड्यांमध्ये, चिलखती मोटारींमध्ये आणि विमानांमध्ये बसून हल्ला करत आणि शत्रूसैनिकांचा वेध घेत. पण स्टॅलिनग्राडची लढाई पूर्णपणे वेगळी होती. इथे परिस्थिती रशियन सैन्याला जास्त अनुकूल होती.

एकदा हे समजल्यावर च्युइकाॅव्हने आपल्या सैनिकांना जर्मनांच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याची सूचना केली. काही ठिकाणी रशियन रेड आर्मीची प्रतिकाररेषा आणि जर्मन सैन्याची आक्रमणरेषा यांच्यात ५० मीटर्सपेक्षाही कमी अंतर होतं. यामुळे जर्मन हवाईदलाची पंचाईत झाली. आकाशात जरी जर्मन वरचढ होते तरी अशा परिस्थितीत त्यांना काहीच करता येत नव्हतं कारण त्यांच्या बाँबफेकीने जर्मन सैनिकही मरू शकत होते. " वेळप्रसंगी शत्रूच्या एवढे जवळ जा की शत्रूला तुम्हाला मिठी मारता आली पाहिजे " असे च्युइकाॅव्हचे आदेश होते. ही मिठी पुढे जर्मन सैन्यासाठी मगरमिठी ठरणार होती.

सप्टेंबर १९४२ पासून स्टॅलिनग्राडची लढाई अक्षरशः एकेका रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये, घरांमध्ये, एवढंच काय तर घरांच्या खोल्यांमध्ये सुरु झाली. काही इमारतींमध्ये पहिला मजला जर्मनांच्या तर दुसरा रशियनांच्या ताब्यात होता. रस्त्याची अर्धी बाजू जर्मन तर दुसरी बाजू रशियनांकडे होती. सुरेन मिर्झोयानकडे काही बाँबफेकीमुळे उध्वस्त झालेल्या इमारती लढवण्याची जबाबदारी होती. तेव्हा त्याने काही जबरदस्त अटीतटीच्या आणि समोरासमोरच्या चकमकींमध्ये भाग घेतला, " मी आणि माझा एक सहकारी मित्र - आम्ही दोघे एका इमारतीच्या खोलीत शिरलो आणि त्याचवेळी एका जर्मन सैनिकाने माझ्या मित्रावर झेप घेतली. पण तो सावध होता. त्याने आपला गुडघा त्या जर्मनाच्या छातीत मारला. त्याचवेळी दुस-या जर्मन सैनिकाने त्याच्यावर उडी मारली. मीही मग माझ्या धारदार चाकूने त्या दोघांनाही खलास केलं. एखाद्या पिकलेल्या लालबुंद टोमॅटोमधून जसा लाल रस बाहेर येतो तसं त्यांच्या गळ्यातून रक्त येत होतं. हे सगळं करत असताना माझ्या मनात एकच विचार होता - या दोघाही हरामखोरांना मारायलाच पाहिजे. मी माझ्या चाकूला लागलेलं रक्त साफ करतच होतो तेव्हा तिस-या जर्मन सैनिकाने आमच्यावर उडी घेतली. मी त्याच चाकूने त्यालाही खलास केलं. जर आम्ही सावध नसतो तर याच जर्मनांनी आम्हाला ठार केलं असतं. त्यावेळेला स्टॅलिनग्राडमधल्या प्रत्येक रस्त्यावर आणि इमारतीत मृत्यू घिरट्या घालत होता. आम्ही तर मृत्यूला खिशात टाकूनच फिरत होतो. "

जर्मनांनी आपल्या ब्लिट्झक्रीगने पोलंड, बेल्जियम, हाॅलंड आणि फ्रान्स यांना नमवलं होतं. रशियामध्येही बाल्टिक देश, बेलारुस आणि युक्रेन काबीज करताना याच तंत्राचा त्यांनी वापर केला होता. पण स्टॅलिनग्राडची लढाई ही जणू दुस-या ध्रुवावरची लढाई होती. मशीनगनसारख्या शस्त्रांचा या लढाईत तसा उपयोग नव्हता, " मशीनगन हे वेळखाऊ काम आहे. तुम्हाला ती लोड करावी लागते. त्याऐवजी मी चाकू आणि अत्यंत धारदार फावडं वापरायचो. तुम्ही खंदक खणण्यासाठी त्याचा वापर करू शकता आणि हत्यार म्हणूनही. "

अशा विधिनिषेधशून्य लढाईत दोन्ही बाजूच्या सैनिकांना फार भयानक परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, " मृतदेह कुजल्यामुळे येणा-या वासाची तुम्हाला कल्पना नाही. वेड लागतं त्या वासामुळे. बरेच दिवस पडून राहिलेली प्रेतं फुगायची आणि मग त्यांच्यातून वायू बाहेर पडायचा. तेव्हा ' प्स्ससस ' असा विचित्र आवाज यायचा. मी बरेचदा तो आवाज ऐकलेला आहे. लहान मुलं, स्त्रिया आणि माणसांची बाँबहल्ल्यामुळे अर्धवट जळलेली आणि अर्धवट कुजलेली प्रेतंही मी पाहिली आहेत. मेलेली गुरं पाहिली आहेत. त्या वासामुळे मन एकाग्र करुन लढणं अशक्य व्हायचं. आजही मला कधी तो वास आठवला तरी भडभडून येतं. जेव्हा एखाद्या माणसाला तुम्ही ठार मारता तेव्हा पुढचे कितीतरी दिवस तुम्हाला ती गोष्ट भेडसावत राहते. इथे आम्ही आणि आमचा शत्रू एकाच पातळीवर उतरलो होतो. पण या युद्धाची पूर्ण जबाबदारी हिटलर आणि त्याचा नाझीवाद यांचीच होती. आम्ही त्यांचं काहीही घोडं मारलं नसताना त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि स्वतःच्या देशाची आणि आमच्या देशाची एक पिढी पूर्णपणे उध्वस्त केली. मला मृत्यूमुखी पडलेल्या अनेक जर्मन तरुण सैनिकांचे चेहरे आठवतात आणि वाईट वाटतं. आपल्या घरापासून एवढं दूर येऊन त्यांना मरावं लागलं. मला माझ्या मित्रांचेही चेहरे आठवतात. एक मिनिटापूर्वी ते जिवंत होते पण कुठूनतरी गोळ्या आल्या आणि ते मरण पावले. असं जेव्हा घडतं तेव्हा तुमच्या मनात हाच विचार येतो की या जगात युद्ध ही सर्वात भीषण आणि वाईट गोष्ट आहे. "

मिर्झोयानचा याच एका गोष्टीवर विश्वास होता की स्टॅलिनग्राडमध्ये त्याच्यासमोर दोनच पर्याय आहेत - लढ किंवा मर. कम्युनिस्ट विचारसरणी किंवा स्टॅलिनच्या भाषणांपेक्षा या दोन पर्यायांचा पगडा त्याच्यावर जास्त होता.

व्होल्गा नदीच्या तीरावर पोचलेल्या जर्मनांसाठी स्टॅलिनग्राड म्हणजे एक जबरदस्त चपराक होती. अशा लढाईला आपल्याला तोंड द्यावं लागेल ह्याचा त्यांनी विचारच केला नव्हता. " तोपर्यंत आम्ही फक्त सैरावैरा पळणारे, आम्हाला शरण येणारे किंवा मग मरण पावलेले रशियन सैनिक पाहिले होते. पण त्या सगळ्या आता भूतकाळातल्या गोष्टी होत्या. " असं मला एका जर्मन तोफखानादलाच्या अधिका-याने सांगितलं होतं.

एकीकडे मिर्झोयान आणि इतर रशियन सैनिक जर्मनांबरोबर अशी आदिम पातळीवरची लढाई लढत होते आणि दुसरीकडे रशियन युद्धमंडळ ' स्टाव्हका ' ची प्रतिहल्ल्याची तयारी चालू होती. या योजनेचं सांकेतिक नाव होतं ' आॅपरेशन युरेनस. ' याची तर जर्मनांनी कल्पनाही केलेली नव्हती. आॅक्टोबर उजाडल्यावर रशियाचा सुप्रसिद्ध हिवाळा सुरु झाला. नोव्हेंबर चालू होईपर्यंत व्होल्गा नदीचं पात्र गोठलं होतं. १९ नोव्हेंबर १९४२ या दिवशी रशियन सैन्याच्या दोन तुकड्यांनी स्टॅलिनग्राडच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून व्होल्गा नदी ओलांडली आणि स्टॅलिनग्राडमधल्या जर्मन सैन्याला रसद पुरवठा करणा-या मार्गांवर हल्ला केला. या दोन्ही मार्गांचं संरक्षण रुमानियन, हंगेरियन आणि इटालियन सैन्याकडे होतं. त्यांना रशियन हिवाळ्याचा काहीही अनुभव नव्हता. त्यांना सहज गुंडाळून या दोन्ही रशियन सैन्यदलांनी जर्मनांच्या २,५०,००० एवढ्या मुख्य सैन्याला स्टॅलिनग्राडमध्ये कोंडीत पकडलं. जनरल पाॅलस आणि त्याची सगळी ' सिक्स्थ आर्मी ' रशियन सैन्याच्या वेढ्यात अडकली. ब्लिट्झक्रीग तंत्रात जर्मन सैन्य शत्रूला असं दोन्ही बाजूंनी कोंडीत पकडत असे. आता त्यांच्यावर तीच वेळ आली होती. मार्शल झुकाॅव्ह आणि मार्शल व्हासिलियेव्हस्की यांनी रशियन सैन्याच्या आधीच्या पराभवांतून योग्य तो धडा घेऊन आॅपरेशन युरेनसची आखणी केली होती आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले.

जर्मन हवाईदल प्रमुख हर्मन गोअरिंगने हिटलरपुढे अशी दर्पोक्ती केली होती की लुफ्तवाफचा वापर करून तो स्टॅलिनग्राडमध्ये अडकलेल्या जर्मन सैन्याला रसदपुरवठा करेल पण ते अशक्य होतं. फील्ड मार्शल एरिख फाॅन मानस्टेनच्या सैन्याने स्टॅलिनग्राडच्या बाहेरून रशियन सैन्यावर हल्ला करुन आतमध्ये अडकलेल्या जर्मन सैन्याला बाहेर काढण्याचा एक निकराचा प्रयत्न करुन पाहिला पण तेही शक्य झालं नाही.

आतमधल्या जर्मन सैन्याला आता बाहेरून वेढा घालणारं रशियन सैन्य, खुद्द स्टॅलिनग्राडमधलं रशियन सैन्य, रशियन हिवाळा आणि उपासमार या सगळ्याला तोंड द्यावं लागत होतं. हे सगळं अशक्य झाल्यावर ३१ जानेवारी १९४३ या दिवशी आपल्या सर्व सैनिकांबरोबर फाॅन पाॅलसने शरणागती पत्करली. हिटलरने त्याच्या थोडंच आधी पाॅलसला फील्ड मार्शल पदावर बढती दिली होती. तोपर्यंत एकाही जर्मन फील्ड मार्शलने शरणागती पत्करली नव्हती. पाॅलससाठी हा इशारा होता - शत्रूच्या हातात जिवंत न सापडण्याचा - पण तो झुगारून त्याने शरणागती पत्करली.

हिटलरची यावरची प्रतिक्रिया उद्वेगाची होती, " मला व्यक्तिगतरीत्या दुखावणारी गोष्ट ही आहे की एका माणसाच्या दुबळेपणामुळे इतक्या सगळ्या सैनिकांचं कर्तृत्व वाया गेलं. शेवटी आयुष्य म्हणजे काय? जन्माला आलेला प्रत्येकजण कधीतरी मरतोच पण देश हा नेहमीच जिवंत असतो. अशा वेळी एखादा माणूस देशासाठी आपले प्राण देण्याऐवजी शरणागती पत्करून युध्दकैदी कसा होऊ शकतो? "

सुरेन मिर्झोयानवर स्टॅलिनग्राडच्या लढाईचा परिणाम अर्थातच पूर्णपणे वेगळा होता. जर्मन सैनिक म्हणजे कुणी विशेष नाहीत आणि त्यांना जिंकण्याची अजिबात खात्री नाही हा त्याचा विश्वास या विजयामुळे अजूनच दृढ झाला. त्याने आमची मुलाखत संपवताना केलेलं विधान म्हणजे पूर्ण रशियन सैन्यदलाच्याच मनातले विचार होते - " आम्ही व्होडकाचे ग्लास उंचावून स्टॅलिनग्राडचा विजय साजरा केला आणि नंतर आम्हाला कशाचीच भीती वाटेनाशी झाली! "

क्रमशः

इतिहासभाषांतर

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

19 Jan 2015 - 1:06 am | मधुरा देशपांडे

वाचतेय. लेखन आवडले.

अर्धवटराव's picture

19 Jan 2015 - 3:05 am | अर्धवटराव

आणि किती वेदनाकारक. :(

असं जेव्हा घडतं तेव्हा तुमच्या मनात हाच विचार येतो की या जगात युद्ध ही सर्वात भीषण आणि वाईट गोष्ट आहे.

हे सत्य माणसाला पचतच नाहि... स्मशान वैराग्यासारखं.

मुक्त विहारि's picture

19 Jan 2015 - 3:15 am | मुक्त विहारि

वाचत आहे.

मार्गी's picture

19 Jan 2015 - 11:13 am | मार्गी

आपण अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत दर्जेदार ज्ञान इथे देत आहात! त्याबद्दल आपल्याला चाळीस लक्ष धन्यवाद!!!!!!!!!

पैसा's picture

19 Jan 2015 - 11:47 am | पैसा

युद्धाचं भीषण वर्णन! वाचून कसं तरी होतंय. तिथे राहून जिवंत परत आलेल्यांना काय भयानक आठवणी असतील!

विशाखा पाटील's picture

19 Jan 2015 - 12:01 pm | विशाखा पाटील

अनुवाद खूपच छान!

अनुवाद वाचतोय असे वाटतच नाही, इतके ओघावते झाले आहे.

रशियावर जर्मनांनी आक्रमण केले तेव्हा सुरूवातीचे अठ्ठेचाळीस तास स्तालिन त्याच्या कार्यालयाच्या बाहेर आला नव्हता इतका त्याला धक्का बसला होता. पण नंतर हे चित्र बदलले. मॉस्को न सोडण्याचा आणि जर्मनांचा प्रतिकार करण्याचा निर्णय त्याने का घेतला, देशभक्ती की नाईलाज, हे सांगणे कठीण आहे. पण मॉस्को रिकामे करून जाण्याची तयारी करणार्‍या रशियन नागरिकांना जेव्हा 'कॉम्रेड स्तालिन मॉस्कोतच आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत कुठेही जाणार नाही' ही घोषणा ऐकायला मिळाली तेव्हा संपूर्ण रशियाचे मनोबल कैक पटींने वाढले. स्तालिनने त्याच्या सैन्याला एकच आज्ञा दिली. इंचभरदेखील माघार घ्यायची नाही.

स्तालिनग्राडची लढाई म्हणजे दोन क्रूरकर्मा हुकूमशहांच्या कठोर इच्छाशक्तींची लढाई होती. वाटेतील हे एक शहर सोडून पुढे जाणे हे नाझींना सहज शक्य होते. ते जिंकण्यात वेळ, साधनसामग्री आणि मनुष्यबळ घालवत बसणे चुकीचेच होते हे नाझी सैन्याधिकार्‍यांना कळत होतेच. पण स्तालिनचे नाव लाभलेल्या ह्या शहराचा पाडाव रशियनांची किती नाचक्की करेल ह्याची पूर्ण खात्री हिटलरला होती. म्हणून हिटलरही स्तालिनग्राड घ्यायचेच ह्या विचाराने पछाडला गेला.

हिटलरच्या ह्याच मानसिकतेला स्तालिनही पुरेपूर ओळखून होता. त्यानेही स्तालिनग्राड लढवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. दोन्ही बाजू अमर्याद रसद, सैन्य ओतत राहिल्या. स्तालिनग्राडची अशी अवस्था झाली होती की एकही इमारत धडपणे उभी नव्हती. तिन्ही बाजूंनी जर्मनांचा वेढा, रसदपूर्तीचा एकमेव मार्ग म्हणजे वोल्गा नदी. त्यावरही अखंड बॉम्बवर्षाव. हिवाळ्यात नदी गोठल्यावर तोही मार्ग बंद झाला. अशा परिस्थितीतही स्तालिनग्राडमधले कारखाने अव्याहतपणे चालू होते. बाहेर रस्त्यावर हातघाईची लढाई सुरू आहे आणि आतमध्ये कामगार आपल्या कामात व्यग्र आहेत, प्रसंगी शस्त्र उचलून बाहेर येऊन लढताहेत इतक्या प्रखरतेने रशियनांनी नाझी बुलडोझरचा प्रतिकार केला. नाझींनी अर्थातच असे काही होईल याचा स्वप्नातही विचार केला नसावा.

दुसर्‍या महायुद्धातील या लढाईत सर्वात जबरदस्त कामगिरी बजावली ती 'कोमिसार' म्हणजे सैन्यातील राजकीय प्रचारकांनी. स्तालिनग्राडच्या या लढाईत सर्वस्व पणाला लावून लढण्यास सोवियेत सैन्याला प्रवृत्त करण्यात कोमिसारांच्या नेटाच्या प्रचाराचा फार मोठा हात होता.

आपल्या लेखातील खाली उद्धृत केलेला परिच्छेद या महान लढाईचा सारांश सांगतो -

लष्करी दृष्टीने स्टॅलिनग्राडच्या लढाईचं महत्त्व आहेच पण या लढाईचा सर्वात मोठा परिणाम हा मानसिक होता. आपणही हरु शकतो हे जर्मन सैन्याला कळलं आणि आपण जिंकूही शकतो याची रशियन सैन्याला जाणीव झाली. युद्धाचा पुढचा इतिहास त्यामुळे पूर्णपणे बदलून गेला.

अमित खोजे's picture

21 Jan 2015 - 2:58 am | अमित खोजे

"एनीमी अ‍ॅट द गेट" मध्ये पत्रके छापुन वाटणारे हेच का ते कोमिसार? त्यांनीच पत्रके वाटून सैनिकांची मनोबले उंचावलीत ना?

एस's picture

21 Jan 2015 - 11:53 am | एस

होय, तेच ते.

बोका-ए-आझम's picture

21 Jan 2015 - 2:12 pm | बोका-ए-आझम

स्वॅप्स यांनी सांगितल्यावर मी थोडी माहिती धुंडाळली. स्टॅलिनग्राडचा कमिस्सार निकिता क्रुश्चेव्ह होता आणि जर्मन फील्ड मार्शल फाॅन पाॅलसने त्याच्यासमोरच शरणागती स्वीकारली.

एस's picture

21 Jan 2015 - 10:37 pm | एस

स्तालिनग्राडच्या या लढाईचा क्रुश्चेववर खूपच परिणाम झाला. एक म्हणजे त्यातील भयानक रक्तपात पाहून पुढे क्रुश्चेव युद्धविरोधी बनला (याचे उदाहरण म्हणजे क्यूबन मिसाईल क्रायसिस मधून रशियाने घेतलेली पडती बाजू. तेव्हा अणुयुद्धाचा निर्वाणीचा, पण उथळ इशारा देणार्‍या केनेडींच्या पुढे क्रुश्चेवची प्रतिमा भ्याड अशी रंगवली गेली, पण जगाला त्याचे शहाणपण तेव्हा कळले नाही!)

दुसरा परिणाम म्हणजे पोथीनिष्ठ साम्यवाद आणि त्यातही स्तालिनवाद यामागचा पोकळ असा फोलपणा, त्याची काळी बाजू त्याला दिसली. स्तालिनच्या नंतर क्रुश्चेव हा बेरियाचा काटा काढूनच सोवियेत अध्यक्ष होऊ शकला. पण त्यानंतर क्रुश्चेवने स्तालिनची सर्व कृष्णकृत्ये उघडकीस आणली.

स्तालिनग्राडच्या लढाईचा जागतिक इतिहासावर दूरगामी परिणाम झाला तो असाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2015 - 3:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा लेख फारच छान झाला आहे.

आपणही हरु शकतो हे जर्मन सैन्याला कळलं आणि आपण जिंकूही शकतो याची रशियन सैन्याला जाणीव झाली. प्रत्येक युद्ध नेहमीच प्रथम मनात आणि नंतर जमिनीवर जिंकले / हारले जाते !

रामपुरी's picture

20 Jan 2015 - 3:18 am | रामपुरी

प्रत्येक वेळी प्रतिसाद द्यायला जमत नाही पण मालिकेतला प्रत्येक नविन लेख वाचला जातोच...

बोकोबा,अप्रतिम झालाय हा भाग _/\_

प्रचेतस's picture

21 Jan 2015 - 12:59 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.