सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


अंधार क्षण भाग ४ - ल्युसिल आयशेनग्रीन (लेख २३)

Primary tabs

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
29 Dec 2014 - 12:25 am

अंधार क्षण - ल्युसिल आयशेनग्रीन

पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आणि त्यामुळे होणारा शारीरिक आणि मानसिक हिंसाचार हा फक्त नाझीच करत होते असं अजिबात नाही. त्याचप्रमाणे अडचणीत सापडलेल्या लोकांचा गैरफायदा घेणं यावरही फक्त नाझींची मक्तेदारी नव्हती. ल्युसिल आयशेनग्रीनला या दोन्ही गोष्टींचा जो अनुभव आला त्यावरून मी म्हणेन की जे तिला सहन करावं लागलं तशी वेळ फार कमी लोकांवर आली असेल आणि सर्वात भयावह म्हणजे जेव्हा तिला हे सगळं पहावं लागलं तेव्हा ती फारच लहान होती - ती ८ वर्षांची असताना या गोष्टींची सुरूवात झाली आणि जेव्हा त्यांचा अंत झाला तेव्हा ती फक्त २० वर्षांची होती. एवढ्या लहान वयात जेव्हा असे अनुभव येतात तेव्हा माणसाचं व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलून जातं.

मी जेव्हा तिची मुलाखत घेतली तेव्हा ती सत्तरीच्या घरात होती पण काळाने आणि अनुभवांनी तिच्या सौंदर्याला अजिबात धक्का लावला नव्हता. माझ्या विनंतीला मान देऊन ती पोलंडमधल्या क्रॅको शहरात मुलाखतीसाठी आली. या छोट्या चणीच्या, देखण्या आणि इंग्लिशशिवाय इतर अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या स्त्रीच्या मुलाखतीनंतर मी अस्वस्थही झालो आणि भारावूनही गेलो.

" माझा जन्म १ फेब्रुवारी १९२५ या दिवशी हँबर्ग, जर्मनी इथे झाला. माझे वडील बेंजामिन लँडाउ यांचा वाईन्सच्या आयात-निर्यातीचा व्यवसाय होता आणि तो चांगला चालत होता. " हँबर्गच्या उच्च मध्यमवर्गीय भागात ल्युसिल तिच्या आईवडील आणि धाकट्या बहिणीबरोबर राहात होती. त्यांचं घर खूप मोठं होतं.

" १९३३ पर्यंत (नाझी सत्तेवर येईपर्यंत) आयुष्य अत्यंत मजेत, उत्साहात आणि निवांतपणे चाललं होतं. आम्ही भरपूर प्रवास करायचो. डेन्मार्क, फ्रान्स, पोलंड हे देश मी लहानपणीच पाहिले. मला टेनिस आणि घोडेस्वारी आवडायची. शिवाय इंग्लिश शिकवण्यासाठी घरी शिक्षक यायचे. "

ल्युसिलचे आईवडील दोघेही पोलिश ज्यू होते आणि घरात जरी सगळेजण एकमेकांशी अस्खलित जर्मन भाषेत बोलत असले तरी ल्युसिलला आपल्या पोलिश पार्श्वभूमीची माहिती होती. " मी स्वतःला पोलिश समजत असे कारण माझ्याकडे पोलिश पासपोर्ट होता. पण मला पोलिश भाषा समजत नसे. जेव्हा आईबाबांना एखादी गोष्ट आम्हाला समजू नये असं वाटत असे तेव्हा ते पोलिश किंवा फ्रेंचमध्ये बोलत असत. " आपल्या पोलिश पार्श्वभूमीबद्दल तिला त्या वेळी जरी काही वाटत नसलं तरी नंतरच्या काळात या गोष्टीला खूपच महत्त्व येणार होतं.

३० जानेवारी १९३३ या दिवशी, म्हणजे ल्युसिलच्या ८व्या वाढदिवसाच्या २ दिवस आधी, अॅडाॅल्फ हिटलरला जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष पाॅल हिंडेनबर्ग यांनी जर्मनीचा पंतप्रधान (चॅन्सेलर) म्हणून नियुक्त केलं. ल्युसिल आणि तिच्या बहिणीला त्याचा परिणाम लगेचच जाणवला. " आमच्या शेजारी राहणा-या मुलांनी आमच्याशी खेळणं किंवा बोलणं बंद केलं. त्यातले बरेच जण हिटलर युवा (जर्मन भाषेत Hitler Jugend किंवा HJ) संघटनेचे गणवेष घालून फिरायला लागले. आम्ही कुठेही जात असलो तर ही आणि इतर मुलं आम्हाला शिवीगाळ करायला लागली. काही जण तर आमच्यावर दगडदेखील मारत असत. मला आणि माझ्या बहिणीला हे समजत नव्हतं की आम्ही असं काय केलंय की सगळे आमच्याशी असं वागताहेत? आणि जेव्हा मी घरी हा प्रश्न विचारायचे तेव्हा त्यांचं एक ठराविक उत्तर असायचं - हेही दिवस जातील. शेवटी सगळं ठीक होईल. "

ल्युसिल आणि तिच्या बहिणीचं बालपण एका क्षणात उध्वस्त झालं. दोघींनाही त्यांच्या आईवडिलांनी अशी सक्त ताकीद दिली की लोकांचं लक्ष तुमच्याकडे वेधलं जाईल असं काहीही करू नका. बसने जाताना रांगेत शेवटी उभ्या राहा. मोठ्या आवाजात बोलू किंवा हसू नका.

त्यांच्या घरापासून शाळा जवळजवळ पाऊण तासाच्या अंतरावर होती. हा पाऊण तास म्हणजे एक कठीण सत्वपरीक्षा व्हायला लागली. इतर मुलं त्यांना दगड मारत, त्यांच्यावर थुंकत आणि प्रौढ लोक पाहून न पाहिल्यासारखं करत. " मला कोणाला साधे प्रश्न विचारायचीही भीती वाटायची. न जाणो त्यांनी काही विपरीत अर्थ काढला तर? कदाचित मला शिक्षाही होऊ शकली असती. मी माझ्या सभोवताली असलेल्या वातावरणाच्या बाबतीत एकदम सजग आणि सावध झाले आणि लहान मुलांसाठी ही फार विचित्र गोष्ट आहे. अशा त-हेची विचारसरणी ही अनुभवाने येते. कोणीही तसा जन्माला येत नाही. त्यामुळे माझं बालपण असं काही राहिलंच नाही. मी आणि माझी बहीण अकाली प्रौढ झालो. "

१९३३ मध्ये सत्ता हातात आल्यावर नाझींनी अत्यंत योजनाबद्ध रीतीने ज्यूंना सार्वजनिक जीवनातून हद्दपार करायला सुरूवात केली. ज्यू विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांचे दरवाजे बंद झाले आणि ज्यू मुलांनी इतर ' आर्यन ' मुलांबरोबर खेळण्यावर बंदी घालण्यात आली. जेव्हा नाझींनी जर्मनीत राहणा-या ज्यूंचं नागरिकत्व तपासायला सुरुवात केली तेव्हा ल्युसिल पोलिश आहे हे सत्य बाहेर आलं. आता तिला इतर ज्यू मुलांकडूनही त्रास व्हायला लागला , " ही मुलं म्हणायची की पोलिश ज्यू मूर्ख, घाणेरडे आणि गरीब असतात आणि त्यांनी जर्मनीत राहता कामा नये. जेव्हा तुम्ही असल्या गोष्टी वयाच्या १०-१२ व्या वर्षी ऐकता तेव्हा त्याचा मनावर खूप खोलवर परिणाम होतो. सगळेजण माझ्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करायचे आणि अशी कुत्सित शेरेबाजी करायचे. "

तिच्या कुटुंबाच्या पोलिश असण्याचा फटका तिच्या वडलांना फार वाईट प्रकारे बसला. जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं त्याच दिवशी त्यांना शत्रूराष्ट्राचा नागरिक म्हणून अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी म्युनिकजवळ असलेल्या डाखाऊ छळछावणीत करण्यात आली. त्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनी दोन गेस्टापो सैनिक ल्युसिलच्या घरी आले, " त्यांनी एक सिगार बाॅक्स टेबलावर फेकली. ती फुटून आतमधली राख बाहेर पसरली. ' हा घ्या बेंजामिन लँडाउ ! ' ते म्हणाले आणि हसतहसत आल्या पावली निघून गेले. आता ती खरंच माझ्या बाबांची राख होती की शवदाहिनीमध्ये प्रेतं जाळल्यावर जमा झालेली राख होती - आम्हाला कधीच कळणार नव्हतं. बाबांच्या मृत्यूने आमच्यावर प्रचंड आघात झाला. विशेषतः माझ्या आई आणि बहिणीवर. दोघीही अत्यंत अबोल झाल्या. आई कुठेतरी शून्यात नजर लावून बसलेली असे. शेजारी बहीणही तशीच बसलेली असे. तासंतास दोघीही अशाच न बोलता बसत. बाबा आता परत आम्हाला कधीच दिसणार नाहीत हे मान्य करणं खरंच खूप कठीण होतं. "

आपले वडील नाझींच्या छळछावणीत मरण पावले हे जेव्हा ल्युसिलला कळलं तेव्हा ती १६ वर्षांची होती.
" माझ्या मनात त्यावेळी प्रचंड तिरस्कार दाटून आला. कुठलाही गुन्हा न केलेल्या माझ्या बाबांना त्यांनी ज्या थंडपणे मारलं त्याच्याबद्दलचा संताप माझ्या मनात अजूनही आहे. मी बायबल वाचलं होतं आणि त्यातली ' तुम्ही कोणाचीही हत्या करणार नाही (Thou shalt not kill)' ही आज्ञा माझ्या लक्षात होती. त्यामुळे नाझींनी माझ्या वडिलांना मारणं मी समजू शकले नाही. मी जे वाचलं होतं त्यावर विश्वास ठेवण्याएवढी भोळी नक्कीच होते. आयुष्य ही पुस्तकात लिहिलंय त्यापेक्षा फार वेगळी गोष्ट आहे याची मला तेव्हा जाणीव नव्हती. "

यानंतर जवळजवळ ८ महिन्यांनी नाझींनी ल्युसिल, तिची आई आणि बहीण यांना इतर हजारो ज्यूंबरोबर पोलंडमधल्या लोड्झ शहरातल्या घेट्टोमध्ये ' स्थलांतरित ' केलं. यावेळी नाझी जर्मनीला ' ज्यू मुक्त ' करण्याचा प्रयत्न करत होते. मृत्युछावण्यांमध्ये औद्योगिक स्तरावर ज्यूंना मारणं अजून सुरु व्हायचं होतं.

नाझी सैनिक हँबर्गमधल्या ज्यूंना जेव्हा हँबर्ग रेल्वे स्थानकाकडे घेऊन चालले होते तेव्हा ल्युसिलने ही ' मिरवणूक ' पहायला उभ्या असलेल्या इतर लोकांच्या चेह-यावरचे भाव पाहिले, " निर्विकार! काहीही भावना नव्हत्या त्यांच्या चेह-यांवर! काही लोकांनी शिव्या हासडल्या पण बहुतेक लोकांनी आमच्याशी नजर न मिळवणं पसंत केलं. मला कुणाच्याही चेह-यावर आमच्याविषयी कीव किंवा दयेचे भाव दिसले नाहीत. " ल्युसिल अजूनही हे विसरलेली नव्हती, " तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला - तुमचीही वेळ येईल कधीतरी! "

हँबर्गमधून निघालेल्या गाडीला पोलंडमधील लोड्झ शहरात पोचायला बरेच दिवस लागले. मध्ये जिथे जिथे गाडी थांबली, तिथे गाडीत नवीन लोक चढवले गेले. शेवटी जेव्हा गाडी लोड्झला पोचली तेव्हा त्यांच्यातले काहीजण गुदमरून मरण पावले होते.
जे जिवंत होते त्या सगळ्यांना नाझींनी लोड्झ घेट्टोमध्ये पाठवलं.

" जेव्हा आम्ही घेट्टोमध्ये शिरलो तेव्हा आम्हाला धक्काच बसला. तिथले लोक अस्वच्छ, थकलेले आणि निरूत्साही दिसत होते. त्यांनी आमच्याकडे लक्षही दिलं नाही. रस्ते ठिकठिकाणी उखडलेले होते आणि त्यांच्यावर केरकचरा पसरलेला होता. गटारांमधून सांडपाणी वाहात होतं. तिथल्या इमारती जुन्या, मोडकळीला आलेल्या वाटत होत्या. याआधी आमच्यापैकी कोणीही हँबर्गमधली झोपडपट्टी पाहिली नव्हती पण ती अशीच असणार असं मला घेट्टोकडे बघून वाटलं. तिथे राहणारे हे लोक असे का दिसताहेत तेही मला कळत नव्हतं. इथे राहायचं या विचारानेच अंगावर शहारा आला. "

नाझी सैनिकांनी या सर्व ज्यूंना घेट्टोमध्ये सोडलं आणि ते निघून गेले. या लोकांना मिळेल तिथे आसरा घ्यावा लागला. तिथल्या एका बंद पडलेल्या शाळेच्या खोलीत ल्युसिल आणि तिच्या कुटुंबाने राहायला सुरुवात केली. नंतर ते एका थोड्या मोठ्या खोलीत राहायला गेले पण तिथे त्याआधीच दोन कुटुंबं राहात होती. अन्नाची कमतरता हा तर एक मोठा प्रश्न होता, " नाझींनी ज्यूंना पूर्णपणे हतबल करायचंच ठरवलं होतं. त्यामुळे आम्हाला मिळणारं अन्न हे कधीही पुरेसं नसायचं. दूध, मांस, फळं या गोष्टी तर कधीच मिळाल्या नाहीत. "

ल्युसिलला जर्मनीमध्ये पोलिश पासपोर्ट असल्यामुळे अडचणी आल्या होत्या. इथे पोलंडमध्येही तिला पोलिश ज्यूंनी आपल्यात सामावून घेतलं नाही. " एकतर मला पोलिश भाषा नीट येत नव्हती. दुसरं म्हणजे मी जर्मनीहून आले होते. जर्मन ज्यूंसाठी मी पोलिश होते आणि पोलिश ज्यूंसाठी जर्मन. "

जर्मनीहून आलेल्या या ज्यूंचं तिथल्या पोलिश ज्यूंनी स्वागत वगैरे केलं नाही कारण दोघांच्याही मनात एकमेकांविषयी अनेक पूर्वग्रह होते. " जर्मन ज्यूंनी आल्याआल्या पोलंड आणि लोड्झ घेट्टो यांच्यावर टीका केली आणि पोलिश ज्यूंना गोष्टी कशा ' सुधरवता ' येतील हे शिकवण्याचा प्रयत्न केला, जे त्यांना साहजिकच आवडलं नाही. कुणाला आवडेल? तुम्ही दुस-यांच्या घरात जाऊन त्यांची शिस्त बदलण्याचा प्रयत्न केला तर खटके उडणारच!"

लोड्झ घेट्टोमधून मृत्युछावणीत ' स्थलांतरित ' होणा-या ज्यूंची पहिली यादी लोड्झ घेट्टोमधल्या नियामक मंडळाने (जर्मन भाषेत Judenrat) बनवली होती. या यादीत प्रामुख्याने जर्मन ज्यूंचा समावेश होता. ल्युसिल, तिची बहीण आणि आई या तिघींचीही नावं त्यात होती. हे कळल्यावर ल्युसिलचं धाबं दणाणलं. तिने घेट्टोमधल्या सगळ्या कार्यालयांमध्ये तिघींचे पासपोर्ट घेऊन असंख्य फे-या मारल्या आणि आपली नावं त्या यादीमधून काढून टाकावीत म्हणून अनेक जणांचे पाय धरले. ' स्थलांतर ' चा नाझी अर्थ मृत्युछावणी आणि गॅस चेंबर आहे हे तिला त्यावेळी माहित नव्हतं. एव्हाना १९४२ हे वर्ष चालू झालं होतं आणि एस्.एस्. ला हिटलरकडून ' ज्यूविषयक प्रश्नांचं अंतिम उत्तर ' मिळालं होतं. ज्यूंच्या हत्याकांडासाठी नाझींनी हेच शब्द (जर्मन भाषेत Endlosung der Judenfrage किंवा The Final Solution of the Jewish Problem) वापरले होते. ल्युसिलला जरी स्थलांतराचा अर्थ माहीत नसला तरी आपण घेट्टोमध्ये जास्त सुरक्षित आहोत असं तिला वाटत होतं. कशीतरी तिने घेट्टोतल्या नियामक मंडळाची आपण पोलिश असल्याबद्दल खात्री पटवली आणि घेट्टोमध्ये राहण्याची परवानगी मिळवली.

पण हा सगळा ताण सहन करणं तिच्या आईच्या ताकदीबाहेर होतं, " आईचा आयुष्यातला रस संपला होता. ती काहीच काम करू शकत नव्हती. अन्नाच्या अभावी तिचं सगळं शरीर सुजलं होतं आणि शरीरात पाण्याचा संचय झाला होता. तिला नीट चालताही येत नव्हतं. शेवटी १३ जुलै १९४२ या दिवशी ती मरण पावली. आमच्या घेट्टोमध्ये एक काळी घोडागाडी शववाहिनी म्हणून वापरत असत. दररोज सकाळी ही गाडी संपूर्ण घेट्टोमध्ये प्रेतं गोळा करत फिरत असे. त्या दिवशी ती माझ्या आईला घेऊन गेली. नंतर एक आठवडा झाला पण दफनविधी झाला नाही. ज्यूंमध्ये मृत्यूच्या दुस-याच दिवशी दफनविधी करावा लागतो. शेवटी मी आणि माझ्या बहिणीने एक रिकामी जागा शोधली, खड्डा खणला आणि दफनविधीची तयारी केली. आम्हाला शवपेटी मिळाली नाही. शेवटी दफनभूमीच्या जवळ असलेल्या एका उजाड घरातून आम्हाला दोन मोठे लाकडाचे तुकडे आणि दोरखंड मिळाले. त्या दोन तुकड्यांच्या मध्ये आम्ही तिला बांधलं.
हे सगळं आम्ही अत्यंत यांत्रिकपणे करत होतो. कसं केलं ते आता आठवत नाही. आमच्या डोळ्यांमधून अश्रू वाहात नव्हते एवढं आठवतं. आम्ही दोघीही बधिर झालो होतो. तिला पुरल्यावर आम्ही प्रार्थना वगैरे न म्हणता तिच्यावर माती लोटली आणि आमच्या खोलीमध्ये परत आलो.
माझ्या बहिणीवर या सगळ्याचा खूप खोलवर परिणाम झाला. मुख्य म्हणजे तिचं बोलणं बंद झालं. ती दिसायला सुंदर होती, हुशार होती पण आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. मी आईला तिची काळजी घेईन असं वचन दिलं होतं पण मी काहीच करू शकले नाही. "

ल्युसिलपेक्षा तिची बहीण ५ वर्षांनी लहान होती. तिला काही कामात गुंतवून नैराश्यातून बाहेर काढावं म्हणून ल्युसिलने घेट्टोमध्ये बरीच शोधाशोध केली.
" कुठलीही नोकरी मिळवण्यासाठी ओळखीची, वशिल्याची गरज होती. घेट्टोमध्ये एक सैनिकी टोप्या बनवण्याचा कारखाना होता. तिथे तिला काम मिळावं म्हणून मी प्रयत्न केले. मला तिथल्या लोकांकडून उत्तर मिळण्याऐवजी ' आम्हाला त्याबद्दल काय मिळणार?' असे प्रश्नच ऐकायला मिळाले. घेट्टोमध्ये कुठलीही गोष्ट फुकट नव्हती. पण मी तिथल्या लोकांना दोष देणार नाही कारण घेट्टोमध्ये राहूनच ते असे झाले होते. घेट्टोमध्ये येण्यापूर्वी ते असेच असतील असं मला वाटत नाही."

पण ल्युसिलने आशा सोडली नाही आणि बरीच सव्यापसव्यं करुन तिने स्वतःसाठी ज्यूंच्या नियामक मंडळाच्या कार्यालयात आणि तिच्या बहिणीसाठी त्या टोप्यांच्या कारखान्यात नोकरी मिळवली. पण दोन्हीही ठिकाणचं वातावरण फार विचित्र होतं, " कुणावरही विश्वास ठेवायची सोय नव्हती. मी माझ्या सहकारी मुलीला काही सांगितलं किंवा बोलले, तर ती त्याचा काय अर्थ काढेल आणि माझ्याविरूद्ध त्या माहितीचा कसा उपयोग करेल त्याचा काही नेम नव्हता. लोक जिवंत राहण्यासाठी एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसायलाही तयार होते."

सप्टेंबर १९४२ मध्ये ल्युसिलने घेट्टोचा प्रमुख मोर्डेकाय चाईम रुमकोव्हस्कीचं भाषण ऐकलं. एका नाझी फतव्यानुसार घेट्टोमधल्या सर्व ' बेकार ' लोकांचं - ज्यांच्यात वृद्ध, अपंग आणि लहान मुलांचा समावेश होता - स्थलांतर केलं जाणार होतं. त्याच्या बदल्यात घेट्टोमधल्या काम करू शकणा-या लोकांना जिवंत ठेवलं जाणार होतं. रुमकोव्हस्कीने या भाषणात सर्व मुलांच्या आईवडिलांकडे त्यांच्या मुलांची मागणी केली होती.
" त्या वेळी मी १७ वर्षांची होते. कोणी आईवडिलांकडे त्यांच्या मुलांची मागणी कशी करु शकतो असा प्रश्न मला तेव्हा पडला होता. अजूनही मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही. "

रुमकोव्हस्की जरी घेट्टोचा प्रमुख असला तरी त्याच्या बोलण्याला मान देऊन ज्यू आपल्या मुलांचं स्थलांतर होऊ देतील यावर नाझींचा विश्वास नव्हता.
" एस्.एस्. चे सैनिक एकदम मोठ्या संख्येने घेट्टोमध्ये आले. त्यांच्याकडे बंदुका होत्याच पण भलेमोठे शिकारी कुत्रेदेखील होते. त्याशिवाय १०-१२ ट्रक्स आणि घोडागाड्याही होत्या. त्यांनी अगदी घराघरांत जाऊन प्रत्येक माणसाला बाहेर काढलं आणि घेट्टोच्या मधल्या मैदानात उभं केलं. आणि मग लोकांना ' निवडायला ' सुरूवात केली. जो कुणी त्यांच्या नजरेत काम करण्यायोग्य नसेल त्याला ते उचलत होते.
मी जिथे राहात होते तिथल्या एका बाईकडे थोडं मेक-अपचं सामान होतं. ते वापरून मी माझ्या बहिणीला तयार केलं - ती तिच्या वयापेक्षा मोठी वाटावी म्हणून. पण त्यांनी नेमकी तिला उचलली. खरंतर ते ११ वर्षांखालच्या मुलांना घेऊन जात होते आणि माझी बहीण १२ वर्षांची होती. मीही तिच्याबरोबर ट्रकमध्ये चढायचा प्रयत्न केला पण एका सैनिकाने त्याच्या रायफलच्या दस्त्याने मला हातांवर जोरात फटका मारला. माझा हात सटकून मी खाली पडले आणि ट्रक वेगाने निघून गेला. पहातापहाता दिसेनासाही झाला."

ल्युसिलने त्यानंतर तिच्या बहिणीला परत कधीच पाहिलं नाही. कदाचित ती चेल्मनो मृत्युछावणीतल्या गॅस चेंबरमध्ये मरण पावली.

आता ल्युसिल पूर्णपणे एकटी पडली. तिचं संपूर्ण कुटुंब तिच्या डोळ्यांसमोर विरून गेलं. ती बोलू शकेल, तिचं सांत्वन करु शकेल असं कुणीही आता नव्हतं आणि अशा वेळी साठीच्या घरातल्या रुमकोव्हस्कीच्या नजरेत ती भरली. घेट्टोमध्ये एक उपाहारगृह आणि अन्नछत्र होतं. त्याने ल्युसिलला तिथे नोकरी देऊ केली. प्रत्येक जेवणासाठी लागणा-या साधनसामग्रीचा हिशोब ठेवणं हे तिचं काम होतं.

रुमकोव्हस्की दररोज काही ना काही कारण काढून तिला भेटायला येत असे, " त्याचा एक पाय किंचित अधू होता आणि तो पाय ओढत चालण्याची त्याला सवय होती. त्याच्या पायाचा तसा आवाज मला ऐकू आला की मी बसल्याजागी थिजून जायचे - पुढच्या प्रसंगाच्या कल्पनेने. मी आॅफिसमध्ये एकटी असेन अशी वेळ साधूनच तो यायचा. आल्यावर एक खुर्ची ओढून त्यावर बसायचा आणि गप्पा मारायचा. असं करताना एक दिवस त्याने माझा विनयभंग केला. माझा हात त्याने आपल्या शिस्नावर ठेवला आणि तो म्हणाला, ' बघ, तुला काही करता येतंय का ते! ' मला त्याचा अर्थच कळला नाही. जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा रागाने पुटपुटत तो तिथून निघून गेला. नंतर मला योगायोगानं कळलं की तो नपुंसक होता त्यामुळे तो मला काहीही करु शकला नसता. पण त्या वेळी मला आपण गरोदर राहू असं वाटलं. माझ्या एका सहकारी मुलीने मला समजावलं की असं काही घडलेलं नाही. मला राग आला आणि त्याने माझा गैरफायदा घेतला आणि वापर केला असंही वाटलं. तेव्हा मला गैरफायदा म्हणजे काय तेही नीट माहीत नव्हतं. नंतर तर त्याने कहरच केला. त्याने मला सांगितलं की त्याने घेट्टोच्या बाहेर एक जागा माझ्यासाठी बघितलेली आहे आणि फक्त तोच तिकडे मला भेटायला येऊ शकेल. मी तेव्हा रडायला लागले कारण मला घेट्टो सोडून जायची इच्छा नव्हती. "

रुमकोव्हस्कीची ' खास ' मैत्रीण म्हणून राहायला जरी ल्युसिलने नकार दिला असला तरी तिच्या आॅफिसमध्ये येऊन तो तिच्याबरोबर करत असलेले चाळे ती थांबवू शकली नाही, " मी जर तिथून पळून जायचा किंवा निघून जायचा प्रयत्न केला असता तर त्याने माझंही ' स्थलांतर ' करवलं असतं. खरंतर त्याला घेट्टोमध्ये खूप मान होता. लोकांचा त्याच्यावर विश्वासही होता. त्याच्यासारख्या माणसाला असल्या गोष्टी करायची काय गरज होती?"

एक दिवस हे उपाहारगृह आणि अन्नछत्र अचानकपणे बंद झालं आणि तिथे काम करणा-या सगळ्यांना घेट्टोमधल्याच एका चामड्याच्या वस्तू बनवणा-या कारखान्यात पाठवण्यात आलं. ल्युसिलला रुमकोव्हस्की नंतर कधीच भेटला नाही.

१९४४ मध्ये एस्.एस्. ने लोड्झ घेट्टो ' विसर्जित ' केला. तिथल्या उरलेल्या सगळ्या ज्यूंना आॅशविट्झला पाठवण्यात आलं. रुमकोव्हस्की आणि त्याचं संपूर्ण कुटुंब गॅस चेंबरमध्ये मरण पावलं. ल्युसिलला मात्र श्रमछावणीत काम करण्यासाठी निवडण्यात आलं. युद्ध संपेपर्यंत ती तिथेच राहिली.
युद्धानंतर पोलंडमध्ये किंवा जर्मनीत राहायची तिची इच्छा नव्हती. ती अमेरिकेत स्थायिक झाली.

मुलाखतीच्या शेवटी या इतकं सगळं भोगूनही आपला स्वर अजिबात कडवट न होऊ देणा-या स्त्रीने तिच्या युद्धपूर्व आणि घेट्टोमधल्या अनुभवाचं सार सांगितलं, " जर तुम्हाला आलेल्या एखाद्या वाईट अनुभवाने तुम्ही उध्वस्त झालात, तर तुम्हाला सावरायला कोणीही येणार नाही. तुम्हालाच तुमचा आत्मविश्वास परत मिळवावा लागेल आणि उभं राहावं लागेल कारण जगात कुणीही कुणाचं नाही! "

क्रमशः

भाषांतरइतिहास

प्रतिक्रिया

एस's picture

29 Dec 2014 - 3:03 am | एस

ह्या लेखमालेच्या मूळ पुस्तकाचे शीर्षक 'देअर डार्केस्ट अवर्स' असे असले तरी वाचताना अखिल मानवजातीच्या झाडून सर्वच्या सर्व काळ्याकुट्ट बाजू वाचकांच्या मनःचक्षूंसमोर उघड्या पडताहेत.

अत्रन्गि पाउस's picture

29 Dec 2014 - 6:12 am | अत्रन्गि पाउस

मन उगीचच धडपडत राहतंय .... स्वत:लाच सावरण्यासाठी ...

मुक्त विहारि's picture

29 Dec 2014 - 6:40 am | मुक्त विहारि

मुलाखतीच्या शेवटी या इतकं सगळं भोगूनही आपला स्वर अजिबात कडवट न होऊ देणा-या स्त्रीने तिच्या युद्धपूर्व आणि घेट्टोमधल्या अनुभवाचं सार सांगितलं,

"जर तुम्हाला आलेल्या एखाद्या वाईट अनुभवाने तुम्ही उध्वस्त झालात, तर तुम्हाला सावरायला कोणीही येणार नाही. तुम्हालाच तुमचा आत्मविश्वास परत मिळवावा लागेल आणि उभं राहावं लागेल कारण जगात कुणीही कुणाचं नाही!"

येस्स्स....

सहमत...

वाचतेय.काय लिहु कळत नाही.किती काय काय पाहिलं या बाईने आयुष्यात.

मधुरा देशपांडे's picture

29 Dec 2014 - 6:29 pm | मधुरा देशपांडे

वाचतेय. इतक्या लहान वयात किती भयावह घटना.
हे सगळे लेख वाचताना अजुन एका गोष्टीचा त्रास होतो तो म्हणजे स्त्रीया या कैदी किंवा शत्रु आहेत यापेक्षाही एक स्त्री म्हणुन त्यांना अजुनच अत्याचार सहन करावे लागले. आणि या अत्याचारींमध्ये सगळे आले. जपानी, जर्मन्स किंवा अजुनही कोणी हे सगळे सारखेच. सुन्न होतं हे सगळं वाचुन.

स्पार्टाकस's picture

29 Dec 2014 - 10:52 pm | स्पार्टाकस

आवडलं बोकोबा!

होलोकस्ट मध्ये ज्यूंच्या झालेल्या शिरकाणाचा जगभर जेवढा निषेध झाला आणि आजही होतो, त्यावरुन नाझींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करुन फासावरही लटकवण्यात आलं. मात्रं याचबरोबर नाझींनी स्लाववंशीयांच्या केलेल्या हत्यांना त्यामानाने कमी प्रसिद्धी मिळाली असं वाटतं. त्याचबरोबर खुद्द जर्मनीतील अनेक अपंग, वेडे आणि काही ठिकाणी वृद्ध नाझींच्या अत्याचाराला बळी पडले. हे सर्व जर्मन राजकीय विरोधकही नव्हते. केवळ त्यांचा काही उपयोग नाही म्हणून त्यांना संपवण्यात आलं. उघडपणे विरोधात आवाज उठवणार्‍या व्हाईट रोजसारख्या संघटनांचं तर पद्धतशीर शिरकाण केलं गेलं.

जे मेले ते जास्त नशीबवान होते असं म्हणावं काय :(

आतिवास's picture

30 Dec 2014 - 2:14 pm | आतिवास

मानवी समाज किती क्रूर होऊ शकतो ते असं वेळोवेळी दिसतं. आपली लढाई आपल्याशीच आहे!

असंका's picture

1 Jan 2015 - 10:50 am | असंका

अगदी नेमकं..... हे लेख वाचताना पार्श्वभूमीवर एक अस्वस्थता का जाणवत रहाते हे अगदी नेमक्या शब्दात सांगितलंत...

सिरुसेरि's picture

2 Jan 2015 - 8:07 pm | सिरुसेरि

छान लेख .. पुर्वी लोकप्रभा साप्ताहिकात "अ‍ॅडोल्फ आइकमन चा शोध " हा अनुवादीत लेख वाचला आहे ..त्याची आठवण झाली . अ‍ॅडोल्फ आइकमन हा ज्यू नागरिकांची धरपकड ,छळ , स्थलांतर,हत्याकांड ,मृत्युछावणी आणि गॅस चेंबर या सर्व कारवायांमध्ये हिटलरचा उजवा हात होता . दुसरे महायुदध संपल्यावर तो इतर देशात ओळख बदलून राहत होता . इस्त्राइलच्या मोसादच्या लोकांनी त्याचा ठावठिकाणा काढून ,त्याला गुप्तपणे पकडून इस्त्राइलमध्ये आणले व कोर्ट कारवाई करून फाशी दिले .
एक प्रश्न बोका साहेबांना - हि लेखमाला अनुवादित आहे का ते प्रत्यक्ष या सर्व दुर्देवी लोकांना भेटले आहेत .

बोका-ए-आझम's picture

3 Jan 2015 - 3:38 pm | बोका-ए-आझम

अनुवादित लेख. मूळ लेखन आणि संशोधन लाॅरेन्स रीज. त्याच्या ' देअर डार्केस्ट अवर ' या पुस्तकाचा स्वैर अनुवाद.