सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


अंधार क्षण भाग ४ - एस्टेरा फ्रँकेल (लेख १९)

Primary tabs

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
15 Dec 2014 - 12:20 am

अंधार क्षण - एस्टेरा फ्रँकेल

आपल्या आयुष्यात जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो, पण त्यांच्या दरम्यान जे आयुष्य आपण जगतो, ते बहुतांशी आपण काळाच्या ओघात घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आणि परिपाक असतं. हे निर्णय कधी सोपे तर कधी कठोर आणि कधी तर अशक्यप्राय असू शकतात.

दुस-या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत लोकांसमोर अनेक वेळा असे निर्णय घेण्याची परिस्थिती आली. मी जेव्हा एस्टेरा फ्रँकेलची मुलाखत घेतली तेव्हा मला जाणवलं की तिच्यासमोर निर्णय घेण्यासाठी जे पर्याय होते आणि त्यामुळे तिला ज्या पेचप्रसंगाला सामोरं जावं लागलं, तशी परिस्थिती फार थोड्या लोकांवर त्यांच्या पूर्ण आयुष्यात आली असेल. किती जणांनी जगणार कोण आणि मरणार कोण याचा फैसला केला असेल? आणि तोही पोलंडमधल्या ज्यूंच्या बाबतीत?

पोलंड हा नाझींच्या आक्रमणाची शिकार झालेला दुर्दैवी देश. हिटलरचा पोलंडवर तीन कारणांमुळे राग होता - पहिल्या महायुद्धानंतर  व्हर्सायच्या तहाने जर्मनीचा लचका तोडून पोलंडची निर्मिती झाली होती, पोलंडमुळे पूर्व प्रशिया हा जर्मन भाग उर्वरित जर्मनीपासून तोडला गेला होता आणि तिसरं कारण म्हणजे ज्यू. पोलंड हा ज्यू संस्कृतीचं केंद्र म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळे पोलिश ज्यूंना इतर कोणत्याही जनसमूहापेक्षा जास्त अत्याचार सहन करावे लागले. पोलंडवरच्या आक्रमणाच्या वेळी नाझी जर्मनी आणि सोविएत रशिया हे मित्र होते आणि त्यांनी पोलंडची आपसात वाटणी केली होती. नाझींच्या आधिपत्याखालील पोलंडमध्ये प्रत्येक शहरात ज्यूंची मालमत्ता, घरं, जमिनी नाझींनी सरकारजमा केल्या आणि ज्यूंना आपली घरं सोडून घेट्टोमध्ये राहायला जावं लागलं. लोड्झ शहरातल्या अशाच एका घेट्टोमध्ये जवळजवळ १,६०,००० इतर ज्यूंबरोबर एस्टेरा फ्रँकेल आणि तिचं कुटुंब राहात होतं.

१९४० मध्ये फ्रान्सच्या पाडावानंतर युद्ध संपेल असा हिटलरचा कयास होता. जर्मन सामर्थ्याचा नेत्रदीपक  आविष्कार पाहून ब्रिटन शांतता प्रस्थापित करायला तयार होईल आणि मग आपल्याला रशियाकडे बघता येईल असे त्याचे मनसुबे होते. त्यावेळी जिंकलेल्या प्रत्येक देशातल्या ज्यूंना नाझी घेट्टोमध्ये डांबून ठेवत होते. या सर्व ज्यूंना आफ्रिकेच्या किना-याजवळ असलेल्या मादागास्कर बेटावर हलवण्याची एक महत्वाकांक्षी योजना त्यावेळी त्यांनी आखली होती. त्या योजनेनुसार ज्यूंना मादागास्करमध्ये नेल्यावर तिथे त्यांची कायमची ' विल्हेवाट ' लावण्यात येणार होती.

पण चर्चिलने युद्ध थांबवून जर्मन वर्चस्व मान्य करायला स्पष्ट नकार दिल्यामुळे नाझींपुढे आता हा नवीन प्रश्न निर्माण झाला - या ज्यूंचं करायचं काय?
ब-याच चर्चेनंतर शेवटी त्यांनी या ज्यूंना कामगार म्हणून राबवायचं ठरवलं. त्यांना पैसे अर्थातच मिळणार नव्हते आणि अन्नसुद्धा जेमतेम जिवंत राहाता येईल आणि काम करता येईल एवढंच मिळणार होतं. हान्स बिबाउ हा नाझी अधिकारी या योजनेचा प्रणेता होता. यामागे त्याचा काही उदात्त वगैरे हेतू अजिबात नव्हता. जर्मन कंपन्यांना आणि सैन्यालाही युद्धप्रयत्नांसाठी कामगारांची गरज होती आणि बिबाउला त्यात पैसे कमावण्याची संधी होती.

इतर घेट्टोंप्रमाणे लोड्झमध्येही दैनंदिन प्रशासन वगैरे तापदायक जबाबदा-या नाझींना नको होत्या त्यामुळे तिथे ज्येष्ठ व्यक्तींचं मंडळ ( जर्मन भाषेत Judenrat) बनवण्यात आलं होतं आणि त्यांच्या हातात सगळं प्रशासन दिलं गेलं होतं. घेट्टोमध्ये ज्यू पोलिसही होते आणि इतर लोक नाझींनी घालून दिलेले नियम पाळतात की नाही हे बघणं त्यांचं काम होतं. घेट्टोंच्या बाहेर टेहळणी मनोरे होते. त्यामध्ये नाझी सैनिक अहोरात्र बसलेले असत. ते घेट्टोमध्ये क्वचितच येत असत. त्यामुळे या मंडळाच्या हातात घेट्टोमधली सत्ता केंद्रित झाली होती. मोर्डेकाय चाईम रुमकोव्हस्की हा या मंडळाचा प्रमुख होता आणि त्याचं कुटुंब आणि निकटवर्तीय यांचा घेट्टोमध्ये ब-यापैकी दरारा होता. त्यांचं राहणीमानही इतरांपेक्षा बरं होतं.

किशोरवयीन एस्टेरा फ्रँकेल या ' नशीबवान ' लोकांपैकी एक होती कारण ती त्याच्या कार्यालयात सचिव म्हणून काम करत होती. तिचा बाॅस रुमकोव्हस्की आपल्या स्थानाचा आणि पदाचा पुरेपूर फायदा आणि गैरफायदा घेत असे. त्याला बायकांचा नाद आहे हे जगजाहीर होतं पण त्याने एस्टेराचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न कधीही केला नाही.

पण रुमकोव्हस्की जरी एस्टेराशी व्यवस्थित आणि सभ्यपणे वागत असला तरी नाझी अधिकारी हान्स बिबाउ तिच्या मागे होता. त्याची सर्वांनाच भीती वाटत असे; एस्टेराला जास्तच, कारण तिच्या एका सहकारी मैत्रिणीवर त्याने बळजबरी करायचा प्रयत्न केला होता, " तिने त्याला काॅफी दिली तेव्हा त्याने तिचा हात पकडला. तिने त्याचा हात झटकायचा प्रयत्न केला. ती जेमतेम १६-१७ वर्षांची होती आणि तिला त्याच्या स्पर्शातनंच त्याला काय हवंय ते जाणवलं. ती निघून जाऊ लागली तेव्हा त्याने तिचे कपडे फाडायचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला. शेवटी ती बधत नाही हे पाहिल्यावर त्याने तिला खूपच मारहाण केली. "

१९४२ साली नाझींनी घेट्टोमधल्या ज्यूंना मृत्युछावण्यांध्ये पाठवायला सुरूवात केली होती पण घेट्टोमधल्या लोकांना हे माहीत नव्हतं. ' स्थलांतर ' या नावाखाली नाझी घेट्टोमधून काही हजार लोकांना घेऊन जात असत. या लोकांचं पुढे काय होतंय ते एस्टेराला एक दिवस योगायोगानं कळलं.

जुलै १९४२ मध्ये रुमकोव्हस्कीसाठी बिबाउकडून एक पत्र आलं. त्याचा सगळा पत्रव्यवहार एस्टेराच संभाळत असल्यामुळे तिने ते वाचलं. बिबाउने त्यात लिहिलं होतं, ' तुझ्या पहाण्यात जर एखादं हाडांचा चुरा करु शकणारं यंत्र असेल तर मला सांग. विजेवर चालणारं असलं तर उत्तम. कुल्महाॅफ (चेल्मनोचं जर्मन नाव) छावणीत त्याची नितांत गरज आहे. '

" माझ्या हृदयाचा एक ठोका चुकला. मनात विचार यायला लागले - का हवंय हे यंत्र? कशासाठी? "
आणि त्यांचं उत्तरही तिला लगेच मिळालं - " ज्या लोकांना ' स्थलांतरित ' केलेलं आहे ते आता जिवंत नाहीत आणि त्यांचं काय झालंय हे जगाला कळावं अशी नाझींची इच्छा नाही. " आता घेट्टोमधल्या ज्या काही थोड्या लोकांना तिथून स्थलांतरित झालेल्या ज्यूंबद्दलचं सत्य माहीत होतं त्यांच्यापैकी ती एक होती.

सप्टेंबर १९४२ मध्ये नाझींनी घेट्टोमधले जे कोणी काम करु शकत नसतील अशा सगळ्यांना - लहान मुलं, आजारी लोक, वृद्ध, अपंग - स्थलांतरित करण्याचा फतवा काढला. रुमकोव्हस्कीने घेट्टोमधल्या सगळ्या लोकांची सभा घेतली आणि त्यांना परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला,  " आपल्यावर आज ही आपत्ती आलेली आहे. आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तींची त्यांनी मागणी केलेली आहे. मला कधीच असं वाटलं नव्हतं की तुम्ही असा त्याग करावा अशी विनंती करण्याची वेळ माझ्यावर येईल. पण आज ती वेळ आलेली आहे. माझ्या बंधुभगिनींनो, तुमची मुलं मला द्या. मी तुमच्यापुढं भीक मागतोय. "

" नाझी लहान मुलांना घेऊन गेले, " एस्टेरा म्हणाली,  " त्यांच्या रडण्याचे आणि किंकाळ्यांचे आवाज अजूनही माझ्या कानांत घुमताहेत. कितीतरी बायका आपल्या मुलांसोबत गेल्या, काय होणार आहे ह्याची पूर्ण जाणीव असतानाही! "

नाझीप्रणित ज्यू वंशसंहाराच्या इतिहासात हा एक विवादास्पद क्षण मानला जातो. रुमकोव्हस्कीचे पाठीराखे म्हणतात की हा ' त्याग ' आवश्यक होता कारण नाहीतर नाझींनी सगळ्याच लोकांना मृत्युछावणीत पाठवलं असतं. त्याचे विरोधक त्याने नाझींना वेळोवेळी केलेल्या सहकार्याचा मुद्दा मांडतात आणि रुमकोव्हस्की आणि त्याच्या निकटवर्तीयांना इतर ज्यूंच्या तुलनेत ज्या सुविधा मिळत होत्या त्यांच्याकडेही बोट दाखवतात.

रुमकोव्हस्की आणि त्याच्या निकटवर्तीयांना निव्वळ या सुविधाच मिळाल्या नाहीत तर आपल्या मुलांना आणि इतर नातेवाईकांना वाचवण्याचीही संधी मिळाली.

" बिबाउ आमच्या कार्यालयात आला, " एस्टेरा म्हणाली, " आणि त्याने मला दहा फाॅर्म्स दिले. ' यावर तुला हव्या त्या मुलांची आणि माणसांची नावं लिही आणि लवकरात लवकर माझ्याकडे पाठव ' तो मला म्हणाला. फक्त मलाच नाही तर माझ्या इतर सहका-यांनाही त्याने असेच दहा फाॅर्म्स दिले. "

एस्टेराच्या हातात त्या क्षणी कोण जगणार आणि कोण मरणार ते ठरवण्याची सत्ता होती. दहा जणांचं आयुष्य ती वाचवू शकत होती. कोणाची निवड तिने करायला हवी होती? अशी निवड केल्याने तिला किती त्रास होणार होता?

याचं उत्तर तिनेच दिलं - तिला अजिबात कुठलाही त्रास झाला नाही. " माझं कुटुंब होतंच, शिवाय माझे एक काका होते, एक चुलत भाऊदेखील होता. माझ्यासाठी माझं कुटुंब हे कधीही सर्वात महत्वाचं होतं आणि मी फक्त १० लोकांचंच नाव देऊ शकत होते.  ज्या लोकांचं नाव मी देऊ शकले नाही त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू जरुर आले पण मी तरी किती लोकांसाठी रडणार? "

आपल्या कुटुंबाची काळजी घेतल्यावर तिने जवळच्या मित्रांची नावं लिहिली, " आमच्या शेजा-यांना मी दोन फाॅर्म्स दिले. त्यांची मुलं लहान होती. ती नेहमी आमच्या घरी येत असत. जरी ती माझ्या कुटुंबातील नसली तरी मी त्यांना ओळखत होते.  अशा वेळी फार कठीण परिस्थिती होते. "

आपण जे केलं ते परोपकाराच्या भावनेने केलं किंवा आपल्या कुटुंबियांना वाचवणं याखेरीज आपला काही दुसरा उदात्त हेतू होता असा आव तिने अजिबात आणला नाही. ज्यांच्या मुलांना नाझी घेऊन गेले त्यांचा विलाप ऐकून तिच्या सद्सद्विवेकबुद्धीला थोडी टोचणी जरुर लागली. असेही विचार तिच्या मनात आले की हान्स बिबाउला जे तिच्याकडून हवं होतं ते देऊन जास्त लोकांचे जीव वाचवायचा प्रयत्न करायला हवा होता पण हे विचार फार काळ तिच्या मनात टिकले नाहीत. आपण जे केलं ते बरोबरच आहे ह्या विश्वासापासून ती कधीही ढळली नाही. जेव्हा अशी एखादी आपत्ती येते तेव्हा प्रत्येकजण स्वतःचा आणि कुटुंबियांचाच विचार करतो यावर तिचा दृढ विश्वास होता. " ज्या ज्यू घेट्टो पोलिसांनी इतर जणांच्या मुलांना जबरदस्तीने ' स्थलांतरित ' करायला नाझींना मदत केली, त्यांनाही त्यांच्या स्वतःच्या मुलांना स्थलांतरापासून वाचवण्याची संधी मिळालीच की! " ती रागाने मला म्हणाली. पुढचे शब्द तर तिने बोलण्याऐवजी माझ्या अंगावर थुंकल्यासारखं मला वाटलं,  " आता समजलं तुम्हाला? "

लोड्झ घेट्टोमध्ये एक वर्तमानपत्रदेखील प्रसिद्ध होत असे. या वर्तमानपत्रात असा स्पष्ट उल्लेख आहे की - ' ज्यू पोलिस आणि अग्निशमन दलाच्या सदस्यांचं सहकार्य मिळावं म्हणून त्यांच्या नातेवाईकांना हात न लावण्याचं आश्वासन दिलं गेलं आहे. जवळजवळ १५०० नशिबवान लोकांना स्थलांतरित केलेलं नाही. हे लोक काही समाजोपयोगी काम करत आहेत किंवा कुठल्याही प्रकारे घेट्टोमधल्या उत्पादकतेशी संबंधित आहेत असं अजिबात नाही पण त्यांचे मित्र योग्य जागी असल्यामुळे त्यांच्यावर ही कृपा झालेली आहे.'

ही ' सुटका ' अर्थातच तात्पुरती होती कारण नंतर प्रत्येकाला घेट्टोमधून स्थलांतरित होऊन मृत्युछावणीत जावंच लागलं. नाझींनी कोणालाही दयामाया दाखवली नाही. १९४४ मध्ये लोड्झ घेट्टोमधल्या प्रत्येकाला नाझींनी आॅशविट्झला पाठवलं. रुमकोव्हस्की आणि त्याचं पूर्ण कुटुंब तिथे गॅस चेंबरमध्ये मारलं गेलं. एस्टेरा आणि इतर काही स्त्रियांना रॅव्हेन्सब्रुक या स्त्रियांसाठी असलेल्या खास छळछावणीत पाठवण्यात आलं.

" नरक होता तो! " एस्टेरा म्हणाली, " घेट्टोमध्येही त्रास होत असे पण रॅव्हेन्सब्रुक म्हणजे मूर्तिमंत नरक. घेट्टोमध्ये लोकांमध्ये अन्नावरुन मारामा-या व्हायच्या, लोक स्थलांतरित होणं टाळण्यासाठी लांड्यालबाड्या करायचे पण रॅव्हेन्सब्रुकमध्ये जिवंत राहणं हाच एक मोठा संघर्ष होता. "

बळी तो कान पिळी हाच या जगाचा एकमेव नियम असल्याचं एस्टेराचं मत रॅव्हेन्सब्रुकमध्ये पक्कं झालं. " तिथे तुमची कुठलीही गोष्ट चोरीला जाऊ शकत असे. तिथल्या थंडीत पायात बूट, मग ते फाटके का असेनात, पण घातले तर पाय गरम राहात, नाहीतर दुस-या दिवशी उभं राहाणं अशक्य होत असे. बायका रात्री झोपताना बूट उशाशी ठेवून झोपत कारण नाहीतर ते चोरीला जात. कधीकधी तर तुमच्या डोक्याखालनं बूट चोरीला जात असत. "

तिच्या सुदैवाने रॅव्हेन्सब्रुकमध्ये तिला काही आठवडेच काढावे लागले. तिची रवानगी नंतर एका श्रमछावणीत करण्यात आली, जिथे ती युद्ध संपेपर्यंत राहिली आणि युद्धानंतर ३ वर्षांतच इझराईलमध्ये स्थायिक झाली. १९९६ मध्ये माझं आमंत्रण स्वीकारून ती लोड्झला चित्रीकरणासाठी म्हणून परत आली. तिची मुलाखत मी लोड्झ घेट्टोच्या अवशेषांच्या पार्श्वभूमीवरच घेतलेली आहे. तिथल्या दफनभूमीच्या भिंतीजवळ ती उभी असताना मी तिला म्हणालो की ती आजवर मला भेटलेल्या सर्वात कणखर आणि करारी व्यक्तींपैकी एक आहे.
तिने प्रत्युत्तर दिलं, " जर मी कणखर आणि करारी नसते तर आज इथे उभी नसते, आत असते! "

क्रमशः

भाषांतरइतिहास

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Dec 2014 - 1:02 am | डॉ सुहास म्हात्रे

निशब्द !

मानवी क्रौर्य आणि अगतिकता या दोन्ही गोष्टींची परिसिमा पाहण्यासाठी प्राचिन किंवा मध्ययुगीन युध्दांपर्यंत जायची अजिबात गरज नाही... अर्वाचिन युद्धेही त्याबाबतित कांकणभरही कमी नाहीत हेच खरे !

मुक्त विहारि's picture

15 Dec 2014 - 3:51 am | मुक्त विहारि

सध्या तरी इतपतच लिहू शकतो.

दर वेळी प्रतिसाद देऊ शकत नाही इतकी ही लेखमाला अस्वस्थ करते!

अत्रन्गि पाउस's picture

15 Dec 2014 - 8:50 am | अत्रन्गि पाउस

करणारी मालिका

अत्रन्गि पाउस's picture

15 Dec 2014 - 8:54 am | अत्रन्गि पाउस

बाबींवर चर्चा करतांना जर्मनीत एका मुस्लीम विद्यार्थ्याने गैर मुस्लीम जगाने केलेले अनन्वित अत्याचार हिंसा ह्यांचा पाढा वाचला होता...
हे वरचे सगळे त्यात होते कि नाही आता आठवत नाही ....पण असावे बहुधा ...
....माणसा माणसा कधी व्हशील माणूस ....

अजया's picture

16 Dec 2014 - 9:18 am | अजया

वाचतेय.पुभाप्र.