अंधार क्षण भाग २ - अलाॅयस फाॅलर (लेख ६)

Primary tabs

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
30 Oct 2014 - 9:10 am

अंधार क्षण - अलाॅयस फाॅलर

१९३३ मध्ये नाझींच्या हातात जर्मनीची सत्ता आल्यावर पहिली गोष्ट जर त्यांनी केली असेल तर ती म्हणजे सर्व विरोधी आवाज बंद करणं. हिटलरचा उजवा हात हर्मन गोअरिंग प्रशियाचा म्हणजे जर्मनीतल्या सर्वात मोठ्या राज्याचा गृहमंत्री होता. त्याने नाझी निमलष्करी संघटना आणि प्रशियन पोलिस यांचं एकीकरण घडवून आणलं. त्यामुळे नाझींच्या हातात पोलिसांचे अधिकार आले आणि ते त्यांनी विरोधकांच्या दडपशाहीसाठी सर्रास वापरले.   त्यांना विरोध करणं म्हणजे स्वत:चा मृत्यू ओढवून घेणं होतं. युद्धाला सुरुवात होण्याआधी नाझींनी एक लाखाहून जास्त राजकीय ' विरोधकांना ' तुरुंगात डांबलं होतं आणि युद्ध चालू झाल्यावर हजारो जणांना राजद्रोहाच्या आरोपावरुन मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. अशा खुनशी राजवटीला कुठल्याही प्रकारे विरोध करणं हे अतीव धाडसाचंच काम होतं. म्हणूनच अलाॅयस फाॅलर या माणसाने मला प्रभावित केलं. नाझींच्या हातात सत्ता नव्हती तेव्हापासून तो त्यांचा विरोधक होता आणि पुढे त्यांच्या हातात सत्ता आल्यावरही त्याने ते सोडलं नाही.

म्युनिकमध्ये एका साध्या, लहानशा घरात तो राहात होता. त्याला भेटण्याआधी मी ज्या लोकांना भेटलो त्यांच्या आणि त्याच्या घरात प्रचंड तफावत होती. आधीच्या लोकांची घरं संपन्नतेने भरलेली, सर्व अत्याधुनिक सुखसुविधांनी युक्त अशी होती. त्यामध्ये राहणारे लोक युद्धादरम्यान जरी नाझी पक्षात असले तरी आता ते युद्धोत्तर जर्मनीचे आधारस्तंभ होते. हे उघडच होतं की अलाॅयस फाॅलरला त्याच्या तत्वांमुळे आणि युद्धादरम्यान त्याने भोगलेल्या हालअपेष्टांमुळे कुठल्याही प्रकारच्या सुखसोयी तर नक्कीच मिळाल्या नव्हत्या.

जर्मनीच्या दक्षिणेला असलेल्या बव्हेरिया राज्यातल्या इंगोलस्टाड्ट नावाच्या खेड्यात १९१० मध्ये त्याचा जन्म झाला. त्याच्या वडलांचं एक छोटं शेत होतं आणि तो पाच भावंडांमधला एक होता. तो ३ वर्षांचा असताना त्याची आई वारली आणि त्याच्या वडलांनी दुसरं लग्न केलं. त्याची सावत्र आई तिच्या ४ वर्षांच्या लहान मुलीला घेऊन त्यांच्या घरी आली. या घटनेने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
" आता आमच्या घरात माझ्याएवढीच एक मुलगी - माझी सावत्र बहीण होती. आमच्यात स्पर्धा सुरु झाली. आता कोणतीही आई स्वत:च्या मुलाला झुकतं माप देणारच. मी कुणा दुसरीचा मुलगा होतो. "

अलाॅयसच्या एका भावाने स्थानिक कम्युनिस्ट चळवळीत रस घ्यायला सुरुवात केली आणि थोडा मोठा झाल्यावर अलाॅयसही कम्युनिस्ट पक्षाच्या बैठका आणि सभांना जाऊ लागला, " त्या बैठकांमध्ये कामगारांना युनियनमध्ये संघटित करण्यावर चर्चा होत असे." जेव्हा अलाॅयस एका स्थानिक रंगारी आणि कंत्राटदाराकडे  मदतनीस म्हणून काम करायला लागला तेव्हा त्याने या बैठकांमध्ये मिळालेलं ज्ञान व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न केला. आपला मालक आपल्याला फार कमी मोबदला देतो असं त्याला वाटलं म्हणून त्याने त्याच्यासारख्या इतर मदतनीसांना संघटित केलं आणि संप घडवून आणला. परिणामी, त्याची नोकरी गेली. मग नोकरी शोधण्यासाठी तो म्युनिकला गेला. तिथे त्याला पहिल्यापेक्षा दुप्पट पगाराची नोकरी मिळाली. त्या वेळचं वातावरण हे सोविएत रशिया आणि स्टॅलिनचं भांडवलशाहीविरुद्ध असलेलं योजनाबद्ध विकासाचं स्वप्न यांनी भारलेलं होतं. अलाॅयसच्या मनातही असेच विचार होते - ' आता समाजवाद येईल. बेकारी नष्ट होईल. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार काम आणि कष्टांनुसार मोबदला मिळेल.' हे विचार सत्यपरिस्थितीत उतरवण्यासाठी तो कम्युनिस्ट पक्षात भरती झाला ," आम्ही फक्त राजकारण आणि समाज यावर चर्चा करायचो नाही. बरेच करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित करायचो. आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन नाटकं आणि प्रहसनं सादर करुन कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करणं हेही मी केलेलं आहे."

ज्यावेळी अलाॅयस कम्युनिस्ट पक्षात भरती झाला, साधारण त्याच्या जवळपासच्या काळात नाझी पक्षाने तरूणांना मोठ्या प्रमाणावर आकृष्ट केलं होतं. हजारो तरुण नाझी पक्षात भरती होत होते. " मी नाझी पक्षात किंवा त्यांच्या निमलष्करी संघटनांमध्ये का भरती झालो नाही? मी जिथे राहात होतो तिथे एक बेकरी होती. तिच्या मालकाचे दोन्ही मुलगे एस्.ए. (Sturm Abteilung - एक नाझी निमलष्करी संघटना) मध्ये होते. ते तपकिरी रंगाचे गणवेष घालायचे. मी आणि माझे मित्र त्यांच्याशी बोललो. नंतर आम्ही आमच्या इतर मित्रांबरोबरही त्यावर चर्चा केली आणि त्यावेळी आमची खात्री पटली की नाझीवादात काही अर्थ नाही. त्यांचं कुठलंही उद्दिष्ट नाही. नाझी फक्त मोठ्या उद्योगधंद्यांना पाठिंबा देतात आणि कामगारांच्या शोषणाविषयी एक चकार शब्दही काढत नाहीत. हा शुद्ध खुळचटपणा आहे."

त्याला नाझींचे ज्यूविषयक विचारही मान्य नव्हते, " माझे अनेक ज्यू मित्र होते - कम्युनिस्ट पक्षात आणि बाहेरही. मला त्यांच्यात आणि माझ्यात काहीही फरक वाटत नव्हता. नाझींना ज्यू-मुक्त समाज हवा होता. माझा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. न्यायाची बाजू घेणं आणि अन्यायाचा विरोध करणं यावर माझा विश्वास होता आणि आहे. एखाद्या विशिष्ट वंशाच्या लोकांचा छळ करणं माझ्या तत्वात बसत नाही."

जर्मनीतलं वातावरण त्यावेळी प्रचंड घालमेलीचं होतं. जागतिक मंदीचा फटका युरोपातल्या इतर देशांना जेवढा बसला होता त्यापेक्षा थोडा जास्तच जर्मनीला बसला होता कारण पहिल्या महायुद्धातल्या पराभवाचा परिणाम म्हणून जर्मनीवर भरपूर खंडणी लादण्यात आली होती. नाझींसाठी असं अस्थिर वातावरण म्हणजे सुवर्णसंधी होती. ते अजून अस्थिर करण्यासाठी नाझींनी कम्युनिस्ट हा नवा बागुलबुवा उभा केला आणि जर्मन शहरांच्या रस्त्यांवर नाझी - कम्युनिस्ट संघर्ष सुरू झाला. अलाॅयस फाॅलरने त्यात सक्रीय सहभाग घेतला. बव्हेरियन पोलिस नाझींचे पक्षपाती आहेत हे त्याला तेव्हाच कळलं. पण त्यामुळे अलाॅयस आणि त्याचे मित्र मागे हटले नाहीत. त्यांनी नाझी गुंडांबरोबर अनेक मारामा-या केल्या.

पण जानेवारी १९३३ मध्ये हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर बनल्यावर अलाॅयसला कळून चुकलं की आता कम्युनिस्टांना सरकारी दडपशाहीला तोंड द्यावं लागणार. अटक टाळण्यासाठी तो माॅस्कोला पळून गेला. पण त्याचा भाऊ जर्मनीतच राहिला. " ती त्याची चूक झाली. नाझींनी त्याला अटक करुन डाखाऊ छळछावणीमध्ये पाठवलं. तिथून जवळजवळ ८ वर्षांनी त्याची सुटका झाली. पण त्यांनी त्याचे एवढे हाल केले होते की त्याची सगळी ताकद निघून गेली होती. काही वर्षांतच तो मरण पावला. "

माॅस्कोमध्ये अलाॅयस सुरक्षित असला तरी आनंदी अजिबात नव्हता. कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या धरपकडीच्या बातम्या त्याला दररोज कळत होत्या पण त्यामुळे स्वत:ला नशीबवान समजण्याऐवजी त्याला अपराधी वाटत होतं. " कारण मी तिथे राहून नाझींशी दोन हात केले नाहीत. मी तेव्हाच जर्मनीत परत जाण्याचा निर्णय घेतला. "

अलाॅयसच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकणारा हा निर्णय होता. ह्या निर्णयावर त्याने फार विचारही केला नाही, कारण त्याची खात्री होती की हेच बरोबर आहे. १९३४ मध्ये तो जर्मनीत बनावट पारपत्र आणि वेगळं नाव घेऊन  परत आला. फ्रँकफर्ट आणि आॅफेनबाख इथे जाऊन त्याने तिथल्या अजून तुरुंगाबाहेर असलेल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना गोळा करुन चळवळ उभारण्याचा प्रयत्नही केला पण तो यशस्वी झाला नाही. गेस्टापोंचा, म्हणजे नाझी गुप्त पोलिसांचा ससेमिरा कम्युनिस्टांच्या मागे सतत होता त्यामुळे अलाॅयसला मदत मिळणं कठीण होतं. तसा धोका पत्करायला खूप कमी लोक तयार होते.

याच काळात तो लीप्झिगला गेला आणि तिथे त्याने नाझीविरोधी पत्रकं छापायला सुरुवात केली. त्याच संदर्भात तो एका कम्युनिस्ट कार्यकर्तीला भेटला. ती त्याला म्युनिकपासून ओळखत होती. तिने त्याला काही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना भेटवण्याचं वचन दिलं. पण तिच्यावर विश्वास ठेवणं ही अलाॅयसची चूक होती कारण ती आता गेस्टापोसाठी हेर म्हणून काम करत होती. तिने जरी अलाॅयसला दगा दिला तरी तो मुलाखतीत  तिच्याबद्दल वाईट बोलला नाही - ' तिने तसं केलं कारण नसतं केलं तर तिचा जीव धोक्यात आला असता आणि ती स्त्री होती म्हटल्यावर नाझींनी तिच्यावर अजून काय अत्याचार केले असते याची कल्पनाही मला करवत नाही. ' जेव्हा तो तिने सांगितलेल्या भेटीच्या ठिकाणी पोचला तेव्हा - ' अचानक काही अनोळखी लोक तिथे आले आणि त्यांनी माझ्याकडे माझं ओळखपत्र मागितलं. मी उलटा त्यांच्यावर आवाज चढवून बोललो, " हे काय चाललंय? नाझी पक्षाच्या राजवटीत जर्मनीने एवढी प्रगती केलीय हे ऐकून मी इथे कामाच्या शोधात आलो आणि तुम्ही मला, एका जर्मन नागरिकाला असा त्रास देता? शोभत नाही तुम्हाला हे! " त्यांच्या चेह-यावरचे भाव बदलले. मी माझं नाटक चालूच ठेवलं. थोड्या वेळाने माझ्या मागे उभा असलेला एकजण दुस-याला म्हणाला, " हा तो माणूस वाटत नाही. आपली चूक झाली बहुतेक! "

पण अलाॅयसच्या दुर्दैवाने काही नाझीविरोधी पत्रकं अजूनही त्याच्या कोटाच्या खिशात होती. ती फेकून द्यायचं त्याने ठरवलं आणि नदीकिना-याजवळ त्याने ती पत्रकं फेकली. पण गेस्टापो त्याच्या पाळतीवर होतेच. त्यांनी त्याला पत्रकं फेकताना पाहिलं आणि घेरलं. ती फेकलेली पत्रकं पण त्यांनी शोधून काढली आणि ते त्याला जवळच्या पोलिस स्टेशनवर घेऊन गेले. तिकडे अलाॅयसचं खास नाझी पद्धतीने ' स्वागत ' करण्यात आलं. पोलिस स्टेशनमध्ये गेल्या गेल्या पोलिसांनी त्याला मारहाण करायला सुरूवात केली. सर्वात पहिले दोघा पोलिसांनी त्याच्या तोंडावर बुक्के मारले आणि त्याच्या नाकाचं हाड मोडलं. नंतर त्याला बोलायचीही संधी न देता बेदम मारहाण सुरु झाली.

थोड्या वेळाने मारहाण थांबवून त्यांनी त्याला पत्रकांबद्दल विचारलं. जेव्हा त्याने काहीही सांगायला नकार दिला, तेव्हा मारहाण परत सुरु झाली. आता त्यांनी त्याला जाड पितळी बक्कल असलेल्या एका तितक्याच जाड चामडी पट्ट्याने मारायला सुरूवात केली.

दरम्यान त्याची त्यांनी झडती घेतली. त्यात त्यांना एक डायरी आणि त्या डायरीत सांकेतिक भाषेत लिहिलेला मजकूर सापडला. मग तर काय, त्यांच्या मारहाणीला ऊत आला. " मग मला वाटतं मी बेशुद्ध पडलो. पण त्यांनी माझ्या अंगावर थंड पाणी ओतून मला शुद्धीवर आणलं. परत मारलं. मी जेवढे वेळा बेशुद्ध पडलो, त्यांनी मला शुद्धीवर आणलं आणि मारहाण चालू ठेवली.  नंतर कधीतरी ते थांबले, कारण मी त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. पण ही मारहाण एवढी वाईट नव्हती. त्यांनी जेव्हा मला
चेह-यावर मारायला सुरूवात केली तेव्हा मात्र कठीण परिस्थिती झाली. तीन तास वेगवेगळ्या लोकांनी येऊन माझ्या चेह-यावर बुक्के मारले.  मधे कधीतरी माझ्या कानाचा पडदा फाटला. माझ्या कानात आवाज घुमायला सुरूवात झाली. समुद्रकिना-यावर ऐन भरतीच्या वेळी जसा आवाज येतो तसा आवाज मला यायला लागला. मला काहीच समजेनासं झालं. मग मी ठरवलं की जर आता मरणारच आहोत तर कमीतकमी एका पोलिसाला मारून तरी मरू. पण मी तसं काही करण्याआधी मला रक्ताची उलटी झाली. मग कुठे ते मारायचे थांबले. त्यांनी मला एक पाण्याची बादली आणि फडकं दिलं. मलाच ते सगळं साफ करायला लागलं आणि मग एक दुसरा अधिकारी मला माझ्या कोठडीत घेऊन गेला. "

इतका मार खाल्ल्यावरही त्याने त्याच्या साथीदारांची नावं सांगितली नाहीत. " माझ्यासाठी हा निष्ठेचा प्रश्न होता. मी मार खाल्ला असता, मेलो असतो, पण त्यांची नावं सांगितली नसती." आणि त्यासाठी त्याने कुठलाही विचार वगैरे केला नाही. नावं सांगायची नाहीत म्हणजे नाहीत. खाल्लेल्या माराने त्याचा हा निर्धार धारदार केला.

गेस्टापो जेव्हा अलाॅयसकडून कुठलीही माहिती काढू शकले नाहीत तेव्हा त्याची रवानगी सॅक्सेनबर्ग छळछावणीत करण्यात आली. " मला तिथे जास्त सुरक्षित वाटलं. एक तर मी राजकीय कैदी होतो. दुसरं म्हणजे जर्मन होतो. त्यामुळे छळछावणीत असलो तरी मला एवढा त्रास झाला नाही. "

एस्.एस्. ने अनेक राजकीय कैद्यांना, विशेषतः कम्युनिस्ट कैद्यांना, ठार मारलं. जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यावर तर जवळजवळ ९०% कम्युनिस्ट कैदी गॅस चेंबर्समध्ये पाठवले गेले. श्रमछावण्या आणि छळछावण्यांमध्येही एस्.एस्. ने जाणीवपूर्वक असं वातावरण आणि प्रशासन निर्माण केलं होतं की लोकांचं मानसिक खच्चीकरण व्हावं. पण या सगळ्या गोष्टी १९४० नंतर सुरू झाल्या. १९३४ मध्ये, जेव्हा अलाॅयसला अटक झाली, तेव्हा राजकीय कैद्यांना ६ ते १८ महिने तुरुंगात ठेवून मग त्यांची सुटका करत असत. पण अलाॅयसची सुटका १८ महिन्यांनी नाही किंवा त्याच्या भावासारखी ८ वर्षांनंतरही नाही, तर तब्बल ११ वर्षांनी, म्हणजे १९४५ मध्ये झाली. तीसुद्धा नाझींनी केली नाही. जर्मनीचा पराभव झाल्यावर जो गोंधळ माजला होता त्याचा फायदा घेऊन तो तुरूंगातून पळाला. इतकी वर्षं शिक्षा भोगण्याचं कारण म्हणजे नाझींसाठी तो फार धोकादायक माणूस होता.

अन्यायाबद्दल त्याला वाटणारी चीड मी त्याला भेटलो तेव्हाही तितकीच प्रखर होती. आणि आता त्याचं कारण होतं युद्धानंतर त्याच्यासारख्या लोकांवर झालेला अन्याय. युद्धानंतर जर्मनीची फाळणी झाली. पश्चिम जर्मनी अमेरिकेच्या गटात असल्यामुळे आणि सोविएत रशियाबरोबर अमेरिकेचं शीतयुद्ध सुरू झाल्यामुळे तिथे कम्युनिस्टांना वाळीत टाकलं गेलं आणि अलाॅयसच्याही वाट्याला तेच नशीब आलं.
" जे एस्.एस्. मध्ये होते, त्यांना पेन्शन मिळतं, अगदी ते पूर्वीचे नाझी असले तरीही, पण कम्युनिस्टांना मिळत नाही. प्रश्न पैशांचा नाही, तत्वाचा आहे. या अन्यायाचा मला राग येतो. मला कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन होत नाही. जर तुम्ही तुमच्याविरुद्ध होत असलेल्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवला नाही तर मग तुमचं काही खरं नाही!"

अलाॅयस फाॅलरची मुलाखत संपवत असताना माझ्या मनात एक प्रश्न अजूनही होता - धोक्यांची जाणीव असतानाही त्याने नाझींच्या विरोधात जेव्हा  काम करायला सुरूवात केली, तेव्हा त्यामागची प्रेरणा काय होती? आणि त्यानेही त्या प्रश्नाचं उत्तर दिलं -    ' लहानपणी माझ्या सावत्र आईने माझ्या बहिणीकडे जास्त लक्ष दिलं आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मला ते सहन झालं नाही. तेव्हापासून कोणत्याही प्रकारच्या अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे असं माझं मत बनलं. मला वाटतं म्हणूनच मी नाझींना विरोध करू शकलो आणि त्यांच्या तुरुंगात ११ वर्षे काढू शकलो. '

क्रमश:

भाषांतरइतिहास

प्रतिक्रिया

दडपशाहीविरुद्ध प्राणांचीही पर्वा न करणार्‍या अशा सर्वच अलॉयस फॉलरना सलाम! नाझींनी जितक्या क्रूरपणे दडपशाही राबवली त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने नंतर स्तालिनच्या कारकीर्दीत सोवियेत युनियन मध्ये आणि पूर्व युरोपात राजकीय विरोधकांवर केली गेली. हे सर्व वाचायला भयानक आहेच. भारतातही अशा स्वरूपाची दडपशाही कुठेनाकुठे चालू असते.

असे म्हणतात की पॉवर करप्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅब्सॉल्यूट पॉवर करप्ट्स अ‍ॅब्सॉल्यूटली.

तुम्ही नंतर ट्रॉट्स्कीबद्दलही जरूर लिहावे अशी विनंती.

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2014 - 12:35 pm | बोका-ए-आझम

या मालिकेतल्या पुढच्या भागांमध्ये स्टॅलिनच्या दहशतीचा संदर्भ आहे. त्याबद्दलचे एक जबरदस्त पुस्तक म्हणजे अलेक्झांडर सोल्झेनित्सिन यांनी लिहिलेलं ' द गुलाग आर्किपेलागो. ' जरुर वाचा. अप्रतिम आहे.
ट्राॅट्स्कीबद्दल जरुर विचार करेन. स्टॅलिनऐवजी जर तो सोविएत युनियनचा प्रमुख झाला असता तर इतिहास काही वेगळाच झाला असता.

एस's picture

30 Oct 2014 - 2:46 pm | एस

सोल्झेनित्सिनचे पुस्तक नक्कीच वाचेन. बरेच दिवस वेटिंगवर आहे. ट्रॉट्स्कीबाबत सहमत.

मानलं या माणसाला. किती खंबीर!

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Oct 2014 - 12:57 am | डॉ सुहास म्हात्रे

एका फारश्या खोलात माहित नसलेल्या कालखंडाबद्दल आणि माणसांबद्दल माहिती समजते आहे ! बरं वाईट, पण रोचक नक्की आहे. पुभाप्र.

अजया's picture

31 Oct 2014 - 3:52 pm | अजया

वाचते आहे.पुभाप्र

मुक्त विहारि's picture

3 Nov 2014 - 3:52 pm | मुक्त विहारि

आवडला....

मनाने खंबीर असलेलीच माणसे अतर्क्य गोष्टी प्रत्यक्षांत आणतात....

युद्ध काळातल्या कथा वाचायला नेहमीच मजा येते. तुमही छान लिहिले आहे. पुभाप्र.

प्रचेतस's picture

4 Nov 2014 - 9:04 am | प्रचेतस

खूप छान लिहित आहात.
प्रत्येक भाग आवर्जून वाचत आहे.

बोका-ए-आझम's picture

4 Nov 2014 - 12:37 pm | बोका-ए-आझम

मनःपूर्वक आभार!