अंधार क्षण भाग ४ - काॅनी सली (लेख २२)

Primary tabs

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
25 Dec 2014 - 12:20 am

अंधार क्षण - काॅनी सली

काॅनी सलीला भेटण्याची मला खूप इच्छा होती, कारण तिच्यावर जपान्यांकडून झालेल्या अत्याचारांबद्दल ती बोलायला तयार झाली होती. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने पर्ल हार्बरवर बाँबफेक करुन अमेरिकेला युद्धात ओढलं. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि नेदरलँडस् ह्या प्रशांत महासागरातल्या दोन सागरी सत्ता होत्या. त्यांना नेस्तशब्दकरणं ही जपानची पुढची खेळी होती. त्यामुळे जपानने डच ईस्ट इंडीज म्हणजे आजचा इंडोनेशिया आणि हाँगकाँग यावर एकाच वेळी हल्ला चढवला आणि १९४१ च्या शेवटापर्यंत हे भाग आपल्या टाचेखाली आणले. त्यावेळी हाँगकाँगमधल्या जनतेवर त्यांनी अनन्वित अत्याचार केले. काॅनी सली याच अत्याचारांची एक साक्षीदार आणि बळीसुद्धा होती.

युद्धानंतर ती दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन शहराच्या एका उपनगरात राहात होती. मी तिची भेट आणि मुलाखत घेतली तेव्हा तिला तिथे येऊन ५० वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेला होता. ती जेव्हा तिथे आली तेव्हाचा वर्णद्वेष हे अधिकृत धोरण असलेला (या धोरणाला Apartheid असं नाव होतं) दक्षिण आफ्रिका देश आणि आत्ताचा दक्षिण आफ्रिका देश यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. वर्णद्वेषाला जरी मूठमाती दिलेली असली तरी दक्षिण आफ्रिकेत हिंसाचाराच्या घटना या जवळजवळ दररोज घडतात आणि लोकांना जीव मुठीत धरूनच राहावं लागतं असं माझ्या लक्षात आलं. मी तिथे येण्याच्या एक दिवस आधीच आमच्या हॉटेलमधल्या एकाचा जवळच्या समुद्रकिना-यावर खून झाला असं मला कळलं आणि जी भारतीय स्त्री मला कॉनीच्या घरी गाडीने घेऊन गेली तिने सांगितलं की एक महिन्यापूर्वी तिच्या पतीचाही असाच डर्बन शहराच्या अगदी गजबजलेल्या भागात दिवसाढवळ्या खून झाला.

कॉनी सली तिच्या आजारी पतीबरोबर एका टेकडीवर असलेल्या छोट्याशा बंगलीत राहात होती. फक्त गो-याच लोकांचा असा हा भाग होता. आता दक्षिण आफ्रिकेत असे खूपच कमी भाग राहिलेले आहेत असंही तिने सांगितलं. " माझ्यासमोर चार पर्याय होते - -होडेशिया (झिम्बाब्वेचं पूर्वीचं नाव), कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका. कदाचित मी झिम्बाब्वे निवडला असता. त्यापेक्षा इथे पुष्कळ बरी परिस्थिती आहे. "

घरातलं एकूण वातावरण उदासवाणं होतं. एक मुख्य कारण म्हणजे कॉनी आणि तिच्या पतीला काळ्या लोकांच्या हातात सत्ता आलेली सहन होत नव्हतं. दुसरं म्हणजे दोघांनाही आपला शेवट आपल्या जन्मभूमीपासून इतका दूर होणार आहे याचा विचार भेडसावत होता.

आम्ही जेव्हा मुलाखतीची तयारी करत होतो तेव्हा कॉनीने तिच्या पतीला ' कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी ' दुस-या खोलीत पाठवलं. तिला तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल आम्हाला सांगताना त्याची उपस्थिती तिथे नको होती हे आमच्या लक्षात आलं.

जपानी लोक येण्याआधीचं कॉनीचं आयुष्य अत्यंत निश्चिंत, शांत आणि चाकोरीबद्ध होतं. ती फक्त तीन वर्षांची असताना तिचे आईवडील इंग्लंडहून हाँगकाँगला आले त्यामुळे तिच्यासाठी हाँगकाँग हेच तिचं घर होतं. शिक्षण पूर्ण केल्यावर तिला सेक्रेटरी म्हणून हाँगकाँग अँड शांघाय बँकेत नोकरी मिळाली. सोमवार ते शुक्रवार काम आणि शनिवारी-रविवारी टेनिस, सहली, मित्रमंडळींबरोबर चित्रपट पाहणे असं तिचं आयुष्य चाललं होतं.जरी ती आशियामध्ये राहात होती तरी पक्की ब्रिटिश होती आणि तिला त्याचा अभिमानही होता.

७ डिसेंबर १९४१ या दिवशी तिच्या आयुष्यातल्या या शांततेला कायमचा तडा गेला. पर्ल हार्बरनंतर अवघ्या ५ तासांच्या आत जपानी विमानं हाँगकाँगवर घोंघावू लागली.

काॅनीने जरी रुग्णसेवेचं औपचारिक प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं तरी ती स्वयंसेविका म्हणून हाँगकाँग बेटावरच्या हॅपी व्हॅली इस्पितळात काम करत होती. एकदा ती या इस्पितळाच्या छतावर असताना जपान्यांनी विमानहल्ला केला. " प्रचंड वेगाने विमानं आमच्यावर चालून येत होती. आधी मला वाटलं की ही अमेरिकन विमानं आहेत. पण नंतर मी त्यांच्यावर असलेली सूर्य आणि किरणांची आकृती पाहिली आणि माझ्या लक्षात आलं. त्यांच्या पंखांमधून धुंवाधार गोळीबार होत होता. " तिला जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे त्यांच्या इस्पितळाच्या छतावर रेड क्राॅसचा जगद्विख्यात ध्वज फडकत होता. पण जपान्यांना अशा कुठल्याही संकेतांची पर्वा नव्हती.

पीटर लीप्रमाणेच काॅनीही जपान्यांना पाहून शांत राहिली. तिने कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. " आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की भीती वाटली तरी दाखवू नका."

हाँगकाँगचा पाडाव निश्चित होता कारण ब्रिटिशांनी त्याच्या संरक्षणासाठी काहीच व्यवस्था केलेली नव्हती. काही जुनाट राॅयल एअर फोर्सची विमानं होती आणि ब्रिटिशांनी ती एकाच ठिकाणी ठेवण्याची घोडचूक केली होती. पहिल्याच दिवशी जपानी विमानांनी हाँगकाँगचा लष्करी विमानतळ आणि तिथे असलेली सगळी विमानं नष्ट केली. कौलून आणि खुद्द चीनमधून जपानी सैन्य हाँगकाँगमध्ये घुसल्यावर तर बचावाची उरलीसुरली शक्यताही मावळली.

१९४१ च्या नाताळच्या दिवशी सकाळी ७ वाजता जवळजवळ ५० जपानी सैनिक काॅनीच्या इस्पितळात आले. त्यांच्यापैकी काही जणांना जखमा झाल्या होत्या.
" त्यांनी त्या वेळी आम्हाला आमचं काम करायला सांगितलं. आम्ही घाबरलो होतो पण तरी आम्ही त्यांच्या जखमा स्वच्छ करणं, निर्जंतूक करणं, बँडेज बांधणं वगैरे कामं सुरु केली. तेव्हा एक जपानी सैनिक अचानक रिव्हॉल्व्हर घेऊन पुढे आला. बहुतेक प्यायलेला होता. मी भीतीने थिजून तशीच उभी राहिले. पण त्याने कुणाला काही केलं नाही. त्याला एका दुस-या नर्सच्या डोक्यावरचं टिनचं शिरस्त्राण आवडलं नव्हतं म्हणून त्याने तिला ते काढायला सांगितलं. तिने तसं केल्यावर मग तो शांत झाला. "

या घटनेनंतर जपानी सैनिकांनी दिवसा कधी इस्पितळात घुसून या नर्सेसना त्रास वगैरे दिला नाही. पण एका रात्री चार जपानी सैनिक इस्पितळात घुसले आणि सरळ त्यांच्या झोपायच्या खोलीत आले आणि चार मुलींना घेऊन गेले - तीन चिनी आणि एक गोरी ब्रिटिश - काॅनी.

" इस्पितळाच्या इमारतीच्या गच्चीच्या खालीच एक भलीमोठी खोली होती. तिथे आधी बरंच सामान होतं पण आता ती खोली पूर्ण रिकामी होती. जपानी सैनिक आम्हाला या खोलीत घेऊन आले. आम्ही चौघीही एकत्र होतो पण प्रतिकाराची शक्यताही नव्हती आणि उपयोगही नव्हता. त्यांच्याकडे शस्त्रं होती, आमच्याकडे नव्हती. ते आमच्याशी एक शब्दही बोलले नाहीत. आणि मग त्यांनी आम्हाला विवस्त्र केलं आणि आम्हा चौघींवरही बलात्कार केला.
माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली होती. आजूबाजूचं सगळं अंधुक दिसत होतं. डोळ्यांमधून अश्रू वाहात होते. माझ्यावर किती जणांनी बलात्कार केला, मला आठवत नाही कारण मी बधिर होऊन गेले होते. पण जराही विरोध केला असता तर त्यांनी कदाचित गोळ्या घातल्या असत्या आणि मला मरायचं नव्हतं. त्यामुळे मी परिस्थितीला मुकाट्याने शरण गेले.
त्यांचं काम झाल्यावर त्यांनी आमच्या अंगावर कपडे फेकले. आम्ही कसेबसे कपडे घातल्यावर त्यांनी आम्हाला चालवत खाली आणलं आणि बंदुकीच्या दस्त्याने आमच्या खोलीत ढकललं. ते कोण होते, कसे दिसत होते, मला आज काहीही आठवत नाही. "

हा सगळा प्रकार जेव्हा घडला तेव्हा काॅनी कुमारिका होती. त्या काळच्या ब्रिटिश समाजाच्या नैतिकतेच्या कल्पना बघता ते अपेक्षितच होतं. तिच्यासाठी हा बलात्कार हाच पहिला लैंगिक अनुभव होता. " घृणास्पद अनुभव होता तो. आम्हाला असं फेकून दिलेल्या कच-यासारखं वाटावं हाच जपान्यांचा हेतू असावा. पण स्वतःला तसं न वाटू देता आपलं काम करत राहणं हे महत्वाचं होतं. हा प्रकार घडल्यानंतर काही दिवस मी जपानी सैनिकांकडे बघूही शकत नव्हते. पण नंतर मला सवय झाली. जेव्हा तुम्हाला ' आपल्या शत्रूवर प्रेम करा ' असं सांगतात, तेव्हा तो खुळचटपणा आहे हे लक्षात ठेवा! "

तिला असंही वाटत होतं की जपानी सैनिक बलात्कारांकडे मनोरंजन किंवा विरंगुळा म्हणून पाहात होते, " त्यांच्याकडे रेडिओ किंवा टीव्ही किंवा पुस्तकं असं काहीच नव्हतं. ब्रिटिश सैनिक वाचत असत किंवा संगीत ऐकत असत असं मी ऐकलं होतं. पण जपान्यांना तसं करताना कधीच पाहिलं नाही. "

जपानी सैनिकांनी बलात्कार केल्याच्या दुस-या दिवशी काॅनी आणि तिच्याबरोबर असलेल्या तिघीजणी कामावर ठरलेल्या वेळेवर हजर झाल्या. " कुठलीही अप्रिय घटना विसरण्यासाठी आमचं काम हे सर्वात उत्तम असं साधन होतं. कैद्यांच्या छावणीत नुसते बसून राहणारे मरण पावले. तिथे बसून आपण काय गमावलं याचा पाढा वाचणा-या लोकांनाही मृत्यूने गाठलं. नुसते बसून राहिलात तर असंच होणार. म्हणून तुम्ही काम करायला पाहिजे. "

पण स्वतःला कितीही कामात व्यग्र ठेवलं तरी जे अत्याचार तिला सहन करावे लागले होते ते विसरणं शक्य नव्हतं. अशा वेळी एका मैत्रिणीने तिला मदत केली. तीसुद्धा नर्सच होती आणि काॅनीपेक्षा वयानेही मोठी होती. " मी रात्र रात्र तिच्याशी फक्त बोलायचे. त्यापेक्षा जास्त काही करणं शक्यच नव्हतं. "

युद्धकैदी आणि तीही जपान्यांच्या ताब्यातली म्हणून जो त्रास तिला सहन करायला लागला त्याच्याव्यतिरिक्त अजून तिला दुसरा कोणताही ' प्रसंग ' सहन करायला लागला नाही. युद्ध संपल्यावर परत आपलं नियमित आयुष्य जगायचा तिने प्रयत्न केला पण बलात्काराचे व्रण तिच्या मनावरुन पुसले गेले नाहीत. त्याचं एक कारण हेही होतं की जपानी लोकांविषयी तिच्या मनात आत्यंतिक तिरस्कार आणि घृणा होती. " जेव्हा मी परत काम करायला सुरूवात केली तेव्हा काही जपानी पाहुणे माझ्या कंपनीमध्ये आले होते. त्यांना माझ्या बाॅसकडे घेऊन जात असताना प्रत्येक जपान्याच्या कमरेत एक सणसणीत लाथ घालण्याची इच्छा मला झाली होती पण महत्प्रयासाने मी
माझ्या रागावर ताबा मिळवला. त्यांना अभिवादन करणंही माझ्या जिवावर आलं होतं. सुदैवाने त्याच्यानंतर अशी वेळ माझ्यावर आली नाही. "

यानंतर काही काळाने, म्हणजे १९५० च्या आसपास काॅनीने दक्षिण आफ्रिकेला प्रयाण केलं. तिथेच वयाच्या ४५व्या वर्षी तिने लग्न केलं. पण बलात्काराच्या आठवणी तिच्या मनात अजूनही होत्या, " माझ्या आयुष्याचा भाग आहेत त्या आठवणी. मी जेव्हा टीव्हीवर बातम्यांमध्ये एखाद्या जपानी माणसाला पाहते किंवा एखादा जपानी कलाकार असलेला चित्रपट पाहते किंवा दुस-या महायुद्धाशी संबंधित काहीही पाहते तेव्हा मला काहीतरी होतं. माझ्या नव-याला माझी पार्श्वभूमी माहीत आहे त्यामुळे अशा वेळी तो अस्वस्थ होतो. माझा हा स्वतःशीच झगडा चालू आहे. मी विसरण्याचा प्रयत्न करते पण विसरू शकत नाही. "

जपान सरकारने युद्धातल्या अत्याचारांची जबाबदारी स्वीकारायला नकार देणं हे काॅनीच्या जपान्यांवरच्या रागाचं अजून एक कारण होतं, " जपान्यांनी एवढ्या मुलींची आयुष्यं उध्वस्त केली. पण जबाबदारी मात्र कशाचीही घेतली नाही. त्यांनी कितीतरी वेळा काहीही कारण नसताना निव्वळ आपल्या आसुरी आनंदासाठी लोकांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. मला आठवतं, जेव्हा जपानी सैनिक आमच्या घरात घुसले तेव्हा त्यांनी आपल्या संगिनींनी कपाटातले सगळे कपडे फाडून टाकले. माझ्या वडिलांचं त्यांच्या पहिल्या महायुद्धातल्या गणवेषातलं एक छायाचित्र आमच्या घरात भिंतीवर लावलेलं होतं. त्यांनी ते काढलं, त्यावरची काच फोडली आणि त्यात संगिनी खुपसून ते फाडून टाकलं. "

आमच्या या मुलाखतीनंतर काही महिन्यांनी काॅनीच्या पतीचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर थोड्याच काळात काॅनी स्वतःदेखील मरण पावली. मुलाखतीदरम्यान तिने कधीही आपण मुलाखत का देत आहोत ते मला सांगितलं नाही. पण मला वाटतं की तिला आपल्या मृत्यूच्या आधी जपान्यांनी तिच्या शरीरावर आणि मनावर केलेल्या अत्याचारांची कहाणी जगाला सांगायची होती आणि आपण अजून त्यांचा किती तिरस्कार करतो हेही जगाला दाखवून द्यायचं होतं.

क्रमशः

इतिहासभाषांतर

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

25 Dec 2014 - 12:30 am | मुक्त विहारि

"जेव्हा तुम्हाला 'आपल्या शत्रूवर प्रेम करा' असं सांगतात, तेव्हा तो खुळचटपणा आहे हे लक्षात ठेवा!"

हेच वाक्य लक्षांत राहिले.

अत्रन्गि पाउस's picture

25 Dec 2014 - 9:50 am | अत्रन्गि पाउस

हेच आणि हेच लक्षात राहिलंय ...

अजया's picture

25 Dec 2014 - 3:43 pm | अजया

माझ्याही :(

मधुरा देशपांडे's picture

25 Dec 2014 - 11:50 pm | मधुरा देशपांडे

काय प्रतिसाद द्यावा हे सुचत नाही. वरील सर्वांशी सहमत. लेखन छानच.