अंधार क्षण भाग ३ - हाजिमे कोंडो (लेख ११)

Primary tabs

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
17 Nov 2014 - 9:24 am

अंधार क्षण - हाजिमे कोंडो
" मी माणूस होतो पण मग मी सैतान बनलो. परिस्थितीने मला सैतान बनवलं." हाजिमे कोंडो मला म्हणाला.
टोकियोमधल्या एका हाॅटेलमध्ये मी त्याची मुलाखत घेत होतो. सैतान म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जी प्रतिमा येते तिच्याशी हा ८० वर्षांचा वृद्ध माणूस
पूर्णपणे विसंगत होता. पण नंतर त्याची सगळी हकीगत ऐकल्यावर मला त्याचं म्हणणं पटलं.

हाजिमेने ज्या संघर्षात भाग घेतला त्याविषयी दुर्दैवाने लोकांना फार माहीत नाही.

सर्वसामान्यांना दुसरं महायुद्ध म्हटलं की जर्मनीने १९३९ मध्ये पोलंडवर केलेलं आक्रमण हीच त्याची सुरूवात वाटते. पण अनेक इतिहासकार दोन वर्षे आधी म्हणजे १९३७ मध्ये सुरु झालेल्या चीन-जपान युद्धालाही दुस-या महायुद्धातच समाविष्ट करतात. जपानने अमेरिका, ब्रिटन आणि नेदरलँड यांच्याविरूद्ध १९४१ मध्ये युद्ध पुकारलं तेव्हा अमेरिका आणि ब्रिटन यांनी चीनला पाठिंबा दिला आणि त्यामुळे १९४१ च्या पुढचा सर्वच चीन-जपान संघर्ष आज दुस-या महायुद्धाचाच भाग समजला जातो. या युद्धाच्या सुरूवातीला जर्मनीने चीनला आर्थिक पाठिंबा दिला होता पण नंतर  इटली, जर्मनी आणि जपान यांचा ' पोलादी करार ' झाला आणि जपान-जर्मनी एकत्र आले. पहिल्या महायुद्धात इटली आणि जपान हे ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याबरोबर जर्मनीविरुद्ध लढले होते. जर्मनीच्या वसाहती बळकावणं हा त्यामागचा हेतू होता. पण दोघाही देशांच्या पदरी निराशा आली. विसाव्या शतकात जबरदस्त औद्योगिक प्रगती करणा-या आणि स्वतःला आशियाई अस्मितेचा मानबिंदू समजणा-या जपानला  प्रशांत महासागरातलं युरोपीय देशांचं वर्चस्व मान्य नव्हतं. ते कमी करण्यासाठी आणि चीन, जपान आणि प्रशांत महासागरातील बेटं यांचं जपानी साम्राज्य स्थापन करणं ही आपली जुनी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जुलै १९३७ मध्ये जपानच्या क्वान्टुंग आर्मीने चीनच्या मांचुरिया प्रांतावर हल्ला चढवला. डिसेंबर १९३७ मध्ये चीनची तेव्हाची राजधानी नानकिंग जपानच्या हातात पडली आणि नंतर जवळजवळ एक महिना जपान्यांनी नानकिंगमध्ये लूटमार, जाळपोळ आणि बलात्कार यांचं अभूतपूर्व थैमान घातलं. या हत्याकांडाला थोडीफार प्रसिद्धी मिळाली असेल पण चीन-जपान युद्धातल्या महत्वाच्या घटना लोकांपुढे आल्याच नाहीत. चिनी आणि जपानी सरकारांनीही बरीचशी माहिती दडपली आणि प्रसिद्ध होऊ दिली नाही.

२००० साली मला चिनी सरकारने नानकिंग हत्याकांडातून वाचलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची परवानगी दिली. पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष मांचुरियामध्ये चित्रीकरण करण्याची परवानगी मागितली तेव्हा ती मिळाली नाही. चीन आणि जपान यांचे आजचे संबंध हे गुंतागुंतीचे आहेत. एकीकडे चिनी सरकार आणि प्रसारमाध्यमे जपानवर दुस-या महायुद्धातल्या अत्याचारांबद्दल टीका करतात पण त्याच वेळी जपानी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक हेही त्यांना हवं आहे. जपानमध्ये तर अगदी विद्यापिठांमधले विद्वानही जपानी सैनिकांनी चिन्यांवर केलेल्या अत्याचारांबाबत मौन तरी पाळतात किंवा तो मुद्दाच झटकून टाकतात. एखाद्या जर्मन प्राध्यापकाने आॅशविट्झबद्दल असं वागायचा प्रयत्न केला तर पाश्चिमात्य देशांत ते सहनच केलं जाणार नाही.

या सगळ्या अनास्थेचा परिणाम म्हणजे इतिहासाचा हा भाग अजूनही दुर्लक्षित आहे. जपान्यांनी किती चिनी लोकांचे बळी घेतले हेच कुणाला माहीत नाही. दीड ते दोन कोटी असा एक अंदाज आहे. आणि आता हे युद्ध अनुभवलेले खूपच कमी लोक हयात आहेत - चीनमध्येही आणि जपानमध्येही.

मला भेटलेला हाजिमे कोंडो हा एक अपवाद - आपले अनुभव सांगायला तयार असलेला जपानी सैनिक.

एका गरीब शेतक-याच्या घरी जन्माला आलेला  हाजिमे १९४० मध्ये सैन्यात भरती झाला. पहिल्या दिवसापासून त्याच्या वरिष्ठांनी योजनाबद्ध रीतीने त्याला आणि त्याच्याबरोबर भरती झालेल्या इतर सैनिकांना छळायला सुरूवात केली. कधीकधी ही छळवणूक अत्यंत पाशवी पातळीवर जात असे.        " आमचं सैनिकी प्रशिक्षण हे खूप कठोर होतं. त्यापेक्षा मरणं परवडलं. कोणतीही चूक, मग ती कितीही क्षुल्लक असो, आमचे वरिष्ठ लाथाबुक्क्यांनी बडवून काढायचे. "
जगभरात नवीन सैनिकांचं ' रॅगिंग ' होतं, पण हे ते नव्हतं. ही जपानी सैन्याची सैनिकांना मानसिक दृष्ट्या तयार करण्याची पद्धत होती. मी जपानी सैन्यातल्या इतर सैनिकांकडूनही अशीच वर्णनं ऐकली आहेत. कधी सैनिकांनाच एकमेकांना मारून ' शिक्षा ' करायला सांगण्यात येत असे. गटातल्या एकाने काही चूक किंवा गुन्हा केला तर सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागत. " सैन्यात जबाबदारी ही वैयक्तिक नसते तर सामूहिक असते, " तो मला म्हणाला,  " त्यामुळे कधी कधी तुम्हाला तुमची काहीही चूक नसतानाही शिक्षा भोगायला लागते. "

अशा प्रशिक्षणाचा परिणाम म्हणजे सैनिक नियम अगदी कसोशीने पाळायचे आणि तेही कुठलाही प्रतिप्रश्न न विचारता. असे आज्ञाधारक आणि स्वतःची बुद्धी न चालवणारे सैनिक तयार करणं हाच तर जपानी सैन्याचा हेतू होता.

हाजिमेला चीनमध्ये पाठवण्यात आलं आणि त्याने आपलं प्रशिक्षण तिथे चिनी युद्धकैद्यांवर  ' प्रात्यक्षिक ' करुन पूर्ण केलं.
" एक दिवस माझा प्रशिक्षक मला म्हणाला की आज आपण संगीन कशी वापरायची ते शिकू या. आमच्या समोर झाडांना चिनी युद्धकैद्यांना बांधून ठेवलं होतं. प्रशिक्षकाने  आम्हा प्रत्येकाच्या हातात एक संगीन लावलेली रायफल दिली आणि सांगितलं की जोरात धावत या आणि या बांधून ठेवलेल्या कैद्याच्या पोटात ही संगीन खुपसा. माझे हातपाय थरथरत होते. मला मी ते कसं केलं ते आठवत नाही पण मी धावत आलो आणि त्या कैद्याच्या पोटात संगीन खुपसली. तो मेला. तोपर्यंत मला भीती वाटत होती पण त्यानंतर काहीच वाटलं नाही. मला आत्मविश्वास वाटू लागला की प्रत्यक्ष युद्धातही मी हे करू शकेन. माणसाला मारणं खरंच किती सोपं आहे! "
मी मुलाखत घेतलेल्या इतर जपानी सैनिकांनीही साधारण अशाच कथा मला ऐकवल्या. कुणालाही चिनी युद्धकैद्यांचे प्राण घेतल्याचा जराही पश्चात्ताप झाला नव्हता. त्याचं एक कारण म्हणजे त्यांचं प्रशिक्षण. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की त्यांना असं सुरूवातीपासून सांगितलं गेलं होतं की चिनी लोकांचा दर्जा हा तुमच्यापेक्षा खालचा आहे.

" आमच्या शाळेत, अगदी बालवर्गापासून आम्हाला हेच सांगितलं जायचं की चिनी लोक गरीब आहेत, हलक्या जातीचे आहेत. त्याउलट जपानी लोक देवाचे लाडके आहेत. त्यांचा वंश हा जगातला सर्वोत्तम आहे पण चिनी लोक डुकरापेक्षाही खालच्या दर्जाची जनावरं आहेत. अगदी लहानपणापासून आमची हीच मनोवृत्ती होती. "

जर्मनी आणि जपान ह्या दोन्ही देशांमध्ये औद्योगिक क्रांती ब्रिटन आणि फ्रान्सच्या मानाने उशिरा झाली. त्यामुळे त्यांना आपली जगभर पसरलेली वसाहतींची साम्राज्यं स्थापन करता आली नाहीत. पण ही साम्राज्यकांक्षा दोन्हीही देशांमध्ये होती. " आम्हाला असं सांगितलं जायचं की मांचुरियामधून आम्हाला धान्य मिळेल आणि उत्तर चीनमधून कोळसा आणि कापड. अशा प्रकारे जपान अधिकाधिक श्रीमंत आणि बलवान होईल. "

आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी जपानी सैन्याने नानकिंगवरुन पुढे अजून उत्तरेला आगेकूच केली आणि एकामागोमाग एक चिनी शहरं आपल्या अंमलाखाली आणायला सुरूवात केली. १९४० मध्ये हाजिमे कोंडो प्रशिक्षण पूर्ण करुन युद्धआघाडीवर दाखल झाला. त्यावेळी चीनचा उत्तरेकडचा एक मोठा हिस्सा जपानने बळकावला होता. हाजिमेची नेमणूक शांक्सी प्रांतातल्या एका युनिटमध्ये झाली.

" तिथे तुम्हाला काहीही करायची मोकळीक होती, " तो मला म्हणाला, " आम्हाला कोणीही असं स्पष्टपणे सांगितलं नव्हतं पण आमच्या वरिष्ठांना तसं करताना बघून मग आम्हीही त्यांचं अनुकरण करायला सुरूवात केली. आम्ही जे केलं ते एक गट म्हणून केलं. त्यामुळे आम्हा कोणावरही वैयक्तिक जबाबदारी नव्हती. सर्वजण सगळ्या गोष्टींना समान जबाबदार होते. आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की कम्युनिस्ट हे सम्राटाचे शत्रू आहेत, त्यांना मारायलाच पाहिजे.  जर एखाद्या चिन्याला तुम्ही मारलंत तर ते सम्राटाची सेवा केल्यासारखंच आहे. जेवढे जास्त चिनी तुम्ही माराल, तेवढी जास्त सेवा! "

मला यात आणि जर्मन सैनिकांच्या वर्तणुकीत प्रचंड साम्य आढळलं. जर्मन सैनिकांनीही ' फ्युहरर ' च्या नावाने अशीच हजारो रशियनांची कत्तल केली. अजून एक साम्य म्हणजे रशियामध्ये जरा जरी प्रतिकार झाला तरी जर्मन सैनिक लगेच ' सूड ' या नावाखाली गावंच्या गावं उध्वस्त करत असत. इथे चीनमध्ये जपानी सैनिकांनीही तेच केलं.

ह्या सगळ्या गोष्टी - चिनी लोक वांशिकदृष्ट्या हीन आहेत हा ठाम विश्वास, राक्षसी साम्राज्यकांक्षा, सम्राटाच्या नावाने कुठलेही अत्याचार करायला तयार असलेलं सैन्य आणि सैनिकांच्या मनात सतत जागृत असलेली सूडाची भावना - हे एक भयंकर जहरी आणि विखारी मिश्रण होतं आणि चिनी नागरिकांना दुर्दैवाने त्याचे परिणाम भोगावे लागले.

हाजिमे कोंडोच्या हकिगतीवरून जपानी सैन्याने अत्याचार हे उत्तर चीनचा ग्रामीण भाग ताब्यात घेण्यासाठी  लष्करी डावपेच म्हणून वापरले हे आपल्या लक्षात येतं. सर्वप्रथम त्याची तुकडी गावातल्या काही लोकांना पकडून त्यांच्याकडून गावाबद्दल माहिती मिळवत असे. या खेडुतांवर स्वाभाविकपणे अत्याचार होत असत. माहिती मिळाल्यावर सैनिक त्यांना मारून टाकत. " पण आम्ही कधीही आमच्या गोळ्या किंवा तलवारी त्यांना मारायला वापरत नसू. डोक्यात एक दगड घालून मारण्याचीच या चांकोरोंची लायकी होती. "
(चिनी लोकांसाठी जपानी सैनिक ' चांकोरो ' हा  शब्द वापरत. ही खरंतर शिवी आहे, जिचा अर्थ आहे डुक्कर. )
मिळालेल्या माहितीच्या आधारे हे सैनिक मग गावात घुसत. " गावात शिरल्यावर आम्ही लोकांच्या घरात जायचो आणि पैसे, धान्य वगैरे मिळेल ते लुटायचो. मग नंबर यायचा बायकांचा. जवळजवळ दहा ते तीस सैनिक - एका बाईबरोबर! "

नाझी जर्मनीने सोविएत रशियावर केलेल्या आक्रमणात स्त्रियांवर बलात्कार झाले नाहीत असं नाही, पण त्यांचं प्रमाण नगण्य होतं. चीन-जपान युद्धात मात्र सगळीकडे बलात्कार झाले. जर्मन सैनिकांनी रशियन स्त्रियांवर बलात्कार न करण्याचं कारण होतं त्यांचा वंश. नाझी विचारसरणीनुसार ज्यू किंवा स्लाव्ह स्त्रीबरोबर आर्यन पुरुषाचा शारीरिक संबंध म्हणजे महाभयंकर पाप. जपानी सैनिकांनी मात्र चिनी लोक वांशिक दृष्ट्या हीन असल्याचा बरोबर उलटा अर्थ लावला होता.

हाजिमे कोंडो स्वतः अशा एका सामूहिक बलात्कारात सहभागी होता. त्याच्या हकिगतीवरून आपल्याला कळतं की निव्वळ लैंगिक वासनातृप्ती हा या बलात्कारांचा हेतू नव्हता. त्याच्याशिवाय अजून काही कारणं होती.
त्याने सांगितलं की बलात्कार करणारे सैनिक हे युनिटमधले ज्येष्ठ , अनुभवी असे लोक असत. ' नवख्या ' सैनिकांना ही संधी मिळत नसे. जपानी समाजाप्रमाणेच सैन्यातही अत्यंत कडक अशी श्रेणीबद्ध रचना होती आणि ज्येष्ठ सैनिक आपल्या कनिष्ठ सैनिकांना नोकराप्रमाणे वागवत असत. " ते आमच्याशी इतक्या तुसडेपणाने वागत असत की त्यांची बरोबरी करण्याचा विचारही मी कधी केला नव्हता. "

पण ही सगळी परिस्थिती एक दिवस बदलली. हाजिमेने एव्हाना चीनमध्ये तीन वर्षे पूर्ण केली होती. एका गावावर त्याच्या तुकडीने धाड टाकली आणि त्यात त्यांच्या तावडीत एक तरूण स्त्री सापडली. आळीपाळीने तिच्यावर त्यांनी बलात्कार केला. त्यावेळी एका चार वर्षे पूर्ण केलेल्या (आणि म्हणून हाजिमेला ज्येष्ठ असलेल्या) सैनिकाने  त्याला बोलावलं, " ये इकडे आणि घे हिला! "

हे ' आमंत्रण ' ऐकल्यावर हाजिमेच्या मनातला पहिला विचार होता - ' हे आपण नाकारू शकत नाही! ' एक प्रकारे हे आमंत्रण म्हणजे ज्येष्ठ सैनिकांनी त्याला आपल्यातला मानल्याची पावती होती. कदाचित यामुळे पुढे त्याला फायदा होऊ शकला असता. या बलात्कारात लैंगिक भाग फारच कमी होता. हाजिमेसाठी ही एक प्रकारची निवडचाचणी होती. जवळजवळ २० सैनिकांनी त्या स्त्रीवर बलात्कार केला, पण हाजिमेला तिचं नंतर काय झालं हे आज आठवत नव्हतं. तसंही जपानी सैनिक आपलं काम पूर्ण झाल्यावर अशा स्त्रियांना ताबडतोब मारून टाकत.

एक प्रसंग मात्र त्याला आठवत होता. त्यावेळी एक अपवादात्मक गोष्ट घडली होती. बलात्कार झाल्यावर ठार मारण्याऐवजी जपानी सैनिक त्या स्त्रीला चालवत दुस-या गावाकडे घेऊन जात होते. पायातल्या बुटांशिवाय तिच्या अंगावर काहीही कपडे नव्हते आणि तिने आपलं तान्हं मूल उराशी घट्ट धरलं होतं. रस्ता ब-यापैकी डोंगराळ आणि चढ-उताराचा होता त्यामुळे ती थकली होती. तिला चालवत नव्हतं. तिची कशी ' विल्हेवाट ' लावावी याबद्दल सगळे सैनिक बोलत होते. " अचानक आमच्यातला एकजण उठला, त्याने तिच्याकडून तिचं मूल हिसकावलं आणि खाली दरीत फेकून दिलं. दरी जवळजवळ ३०-४० मीटर तरी खोल असेल. मुलाला फेकून दिल्यावर तिने ताबडतोब त्याच दरीत स्वतःला झोकून दिलं. हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडलं. माझ्या मनात त्यावेळी हे सगळं किती भयानक आहे असा विचार आला आणि त्या स्त्रीसाठी वाईटही वाटलं पण मी तो विचार बाजूला सारला. "

जेव्हा त्या जपानी सैनिकाने त्या मुलाला दरीत फेकलं तेव्हा त्याच्या मनात नक्की काय विचार असतील? नसती ब्याद बरोबर घेण्याऐवजी तिची विल्हेवाट लावण्याची इच्छा? स्वतःच्या ताकदीचं प्रदर्शन? चिन्यांविषयी वाटणारा तिरस्कार? का पेट्रास झोलिओंकाला वाटली होती तशी उत्सुकता?  मला वाटतं कदाचित या सगळ्या गोष्टी! 

आपण स्वतः एकाच बलात्कारात सहभागी होतो असं हाजिमे कोंडो मला म्हणाला आणि हे खरं असण्याची शक्यता आहे कारण यानंतर लगेचच त्याच्या तुकडीला ओकिनावा बेटावर पाठवण्यात आलं. तिथे तो अमेरिकन सैनिकांच्या हातात पडला आणि युध्दकैदी झाला. युद्ध संपल्यावर काही काळ जपानवर अमेरिकन सैन्याचं नियंत्रण होतं. जेव्हा हे नियंत्रण संपुष्टात आलं आणि जपान परत जपानी सरकारच्या नियंत्रणाखाली आला तेव्हा त्याची सुटका झाली.

कैदेत असताना आणि त्यानंतरही हाजिमे कोंडोने त्याने जे पाहिलं, अनुभवलं आणि केलं त्यावर भरपूर विचार केला होता. त्याचे निष्कर्ष त्याने मला आमच्या मुलाखतीच्या शेवटी सांगितले - ' जर तुम्ही रणांगणात एक वर्ष काढलंत तर अशा गोष्टी सहन करु शकता पण आम्ही तीन वर्षे तिथे काढली. अशावेळी तुम्हाला वेड लागल्यासारखंच होतं. चांगल्या-वाईटाचे विचार तुमच्या मनात येईनासे होतात. शांततेच्या काळात तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही अशा गोष्टी आणि कृत्यं तुम्ही युद्धात अगदी सहजपणे करता कारण तिथलं वातावरण वेगळं असतं. प्रत्येकजण तिथे पशू बनतो. जर तुम्ही सुशिक्षित असाल तर कदाचित तुमचं सैतानात रुपांतर होणार नाही पण मी सुशिक्षित नव्हतो. प्रत्येक माणसाने आपली विचार करण्याची शक्ती कायम ठेवायला हवी. नाहीतर माझ्यासारखीच तुमची गत होईल. '

क्रमशः

भाषांतरइतिहास

प्रतिक्रिया

एस's picture

17 Nov 2014 - 12:16 pm | एस

नानकिंग रेप्स बद्दल कधी ना कधी इथे लिहून येणार हे माहीत होतं, पण त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही इतके क्रौर्य आहे...

ज्यांना हैवानीपणाची परिसीमा म्हणजे काय हे पहायचे असेल आणि तितके कठोर काळीज असेल तर जरूर आंतरजालावर धांडोळा घ्यावा. (छायाचित्रे पाहण्याचे मात्र टाळावे!)

हरकाम्या's picture

17 Nov 2014 - 12:35 pm | हरकाम्या

अतिशय भयंकर, छायाचित्रे बघवत नाहीत.

हे वाचणं मला अशक्य होतंय...आणि आपण मात्र हे सगळे लिहित आहात!

(आपण घेत असलेल्या मेहेनतीची - शारिरीक आणि मानसिक- जाणीव आहे, एवढेच म्हणायचे आहे.)

मुक्त विहारि's picture

17 Nov 2014 - 10:04 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

प्रचेतस's picture

17 Nov 2014 - 10:42 pm | प्रचेतस

भयानक आहे हे सगळं.

मधुरा देशपांडे's picture

17 Nov 2014 - 11:23 pm | मधुरा देशपांडे

सुन्न :(

माणसातला सैतान जागृत झाला की तो कितीही खालच्या पातळीवर जाऊ शकतो.वाचुन त्या स्त्रियांसाठी रडायलाच अालं.भयानक,भयानक आहे हे वाचायलाच,ज्यांनी मूकपणे अनुभवलं त्यांचा विचारही करवत नाही.

प्यारे१'s picture

18 Nov 2014 - 4:35 pm | प्यारे१

भयानक आहे हे. माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत हे लोक.