आमचें गोंय - समारोप - आजचा गोवा

टीम गोवा's picture
टीम गोवा in जनातलं, मनातलं
26 Feb 2013 - 4:13 am


***

आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा

***

आजचा गोवा

६ डिसेंबर १९९२ ला आम्ही आमचं सामान घेऊन गोव्यात आलो. तो दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिलाय, कारण त्याच दिवशी अयोध्येत रामजन्मभूमीचा वाद विकोपाला जाऊन मोठाच गोंधळ झाला होता. वाटेत जागजागी पोलीस बंदोबस्त होताच. पण टीव्ही नसल्यामुळे नेमकं काय चाललंय काही कळायला मार्ग नव्हता. पण गोव्यात आल्यावर फार काही टेन्शन वगैरे जाणवलं नाही.

त्यापूर्वी आमची बदली होणार हे निश्चित झाल्यावर अधिकार्‍यांनी २ पर्याय दिले होते, एक तर मुंबई किंवा गोवा. मुंबईचं आयुष्य आणि गर्दी, लोकलचा प्रवास हे सगळं आपल्याला न झेपणारं, म्हणून आम्ही गोव्यात यायचा निर्णय घेतला, आणि आजपर्यंत कधीच त्याचा पश्चात्ताप झाला नाही. बदली झाल्यावर माझा नवरा आधी बॆंकेची शाखा नक्की कुठे आहे हे पाहण्यासाठी एकटाच पुढे आला होता. रत्नागिरी- पणजी बसने येताना वाटेत म्हापश्याला त्याने बॆंकेचा बोर्ड पाहिला. माझी म्हापश्याला बदली झाली होती , त्यामुळे तिथल्या लोकांनाही भेटून यावं म्हणून तो सहजच बॆंकेत शिरला.

ओळख झाल्यावर रहायची सोय काय म्हणून प्रश्न कोणीतरी विचारला. आता जागा शोधायची आहे म्हणताच एका स्टाफने लगेच म्हटलं. “अरे, परवा तो अमका अमका जागा भाड्याने द्यायची म्हणत होता!” लगेच माझ्या नवर्‍याला स्कूटरवर घेऊन तो जागा बघायला रवाना झाला आणि म्हापश्याला बसमधून उतरल्यापासून अर्ध्या तासाच्या आत घराची किल्ली त्याच्या हातात होती! तो खरंच बॆंकेचा स्टाफ आहे का, सांगतोय तोच आहे की दुसरा कोणी आहे, काही न विचारता मालकाने जागा भाड्याने दिली! गोंयकार कोणावरही पटकन विश्वास टाकतो. अगदी आपुलकीने बोलायला लागतो. पण याच सवयीने गोव्याचा हळूहळू घात झाला. अगदी काश्मिरी, नेपाळी गुन्हेगार, रशियन आणि इतर काही ड्रग्ज विकणारे आणि इतर परदेशी लोकही किनार्‍यांवर भाड्याने जागा घेऊन बस्तान बसवून राहिले. आता परदेशी नागरिक इथे राहून हॉटेल्स चालवायचे धंदे कसे करतात, हळूहळू जागा विकतही कशा घेतात, मला माहिती नाही पण हे सगळीकडे सर्रास ऐकू येतं. ड्रग्स विकणारे आणि रेल्वेतून आलेले गुन्हेगार यानी गोव्याला फास लावलाय.

शाळा कॉलेजांमधे ड्रग्स विकणारे आणि विकत घेणारे असतात हे मुलंही सांगतात. काही पर्यटकांचे संशयास्पद मृत्यू, वाढलेली गुन्हेगारी, पर्यटकांचे वाढते अपघात गोव्याच्या बाह्य जगात असलेल्या आकर्षक चित्राला कमीपणा आणतात हे नक्कीच! विशेषत: किनार्‍यांवर हे सगळं मोठ्या प्रमाणावर चालतं असं ऐकिवात आहे. वर वर शांत दिसणार्‍या, गोव्यात आतपर्यंत खूप खळबळ चालू आहे. मुंबईहून आलेल्या आमच्या काही कलिग्जना एका किनार्‍यावर काही हिंदी बोलणार्‍यांनी “इथे बसलात तर कापून काढू” अशी हिंदीतून धमकी दिलेली मला माहिती आहे. आज अशी परिस्थिती आहे, की आमच्यासारखे सामान्य घाबरट लोक फक्त पणजीच्या मिरामार किनार्‍यावर जातात आणि जास्त उशीर न करता परत येतात.

गोव्याला भेडसावणारा दुसरा मोठा प्रश्न म्हणजे खाणींचा. गोव्यात जंगल प्रदेशात लोह खनिजाचे मोठे साठे भूगर्भात आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी खाणमालक आणि राजकारणी यांनी अंदाधुंद खाणी सुरू केल्या आणि त्यामुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम घडून आले. काही ठिकाणी जलस्रोतांवर परिणाम झाले, तर बहुसंख्य भागात लोक खाणीतून काढलेल्या खनिजांच्या धुळीमुळे विविध आजारांनी ग्रस्त आहेत. रस्ते, घरे सगळ्यांवर धुळीचे थर, एवढंच काय जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी वस्त्यांमधे येताहेत आणि विनाकारण मरण पावताहेत. काही दिवसांपूर्वी वाळपईजवळ एका ढाण्या वाघाला मारल्याचे फोटो आले त्यानंतर गोव्यात पट्टेरी वाघ आहेत का यावर चर्चा सुरू झाल्या. जुने लोक सांगतात की गोव्याच्या कर्नाटक हद्दीवरील जंगलांत ढाण्या वाघाचं अस्तित्व आहे, पण जंगलं वाघांसाठी संरक्षित करावी लागतील या भीतीने काही लोक ते होऊ द्यायला तयार नाहीत.

गोव्यातली गाड्यांची वाढती संख्या, लहान आणि वळणावळणांचे रस्ते, यामुळे अपघातांचं प्रमाणही लक्षणीय आहे. पण देशात सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असल्याची ही गोव्याला चुकवावी लागणारी किंमत आहे. शेजारच्या महाराष्ट्र् आणि कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल स्वस्त आहे आणि गाड्याही स्वस्त आहेत. तशीच दारूही स्वस्त आहे, वाढत्या अपघातांना या सगळ्याच गोष्टी कारणीभूत ठरत आहेत.

गोव्यातल्या संधीसाधू राजकारणावर सगळेच ताशेरे ओढतात, पण त्याचे इतर काही दुष्परिणाम आहेत, त्यावर कोणीच कायमस्वरूपी इलाज शोधत नाही. कारण तशी इच्छाशक्ती कोणत्याच पक्षाकडे नाही. सत्ता चालवण्यासाठी कोणत्याही मुख्यमंत्र्याला किंगमेकर आमदारांचा आधार घ्यावा लागतो, हे आमदार लहान मतदारसंघांमुळे सगळ्याच मतदारांच्या ओळखीचे असतात. मग कोणाचीही कसली मागणी पुरी करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नसतं. यात काही काही विचित्र निर्णय घेतले जातात, त्यात भलतेच कोणी भरडून निघतात.

२ वर्षांपूर्वीएक विचित्र कायदा करण्यात आला. जुन्या पुरातन वास्तू संवर्धनासाठी खाजगी व्यक्तींकडे हस्तांतरित करण्याचा. एवढंच नाही तर या खाजगी व्यक्तींना संवर्धनासाठी या पुरातन वास्तू पाडून परत बांधण्याचा परवानाही या कायद्यात आहे. शिवाय कोणीही या कायद्याला न्यायालयात आव्हान देऊ शकणार नाही अशीही तरतूद या कायद्यात आहे! या कायद्याचे परिणाम काय होऊ शकतात हे अगदी कोणाच्याही लक्षात सहज यैइल. उद्या कोणीतरी हॉटेलवाला एखादी पुरातन वास्तू ताब्यात घेऊन तिथे हॉटेल चालू करील आणि आपण त्या जागेचं संरक्षण करतोय असं सांगेल. किंवा मन मानेल तसं त्या वास्तूचं नूतनीकरण करील. खांडेपार इथल्या सप्तकोटेश्वर देवळाची अशीच पुनर्बांधणी करण्यात आली आणि ती मूळ देवळासारखी नाही हे फोटो पाहताच चटकन लक्षात येतं. पण या कायद्याला फारच थोडे लोक विरोध करतायत. पणजीच्या धेंपे कॉलेजातील इतिहासतज्ञ प्रा. प्रज्वल साखरदांडे हे हाताच्या बोटावर मोजता येतील अशा या लोकांपैकी एक.

गोव्यातले बरेच तरूण परदेशी स्थायिक होतात. तिथून आपल्या कुटुंबाला पैसे पाठवतात. शिवाय पूर्वीपासून गोव्यात बरेच लोक बर्‍यापैकी पैसे बाळगून आहेत. त्यामुळे कष्टाची कामे करायला मनुष्यबळ नाही. प्लंबर वगैरे कुशल कामगार बहुधा परदेशीच जातात. त्यामुळे इथे जी उणीव भासते ती पुरी करण्यासाठी शेजारच्या कर्नाटकातले, केरळातले आणि अर्थातच उत्तर भारतीय लोक गोव्यात स्थायिक होतात. आजघडीला फळं आणि भाजीपाल्याचा व्यापार बहुतांश हुबळीच्या मुस्लिम लोकांच्या हातात आहे तर मासे व्यापार भय्यांच्या हातात. आणि इतर पाव वगैरे बेकरी प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणात केरळी लोक तयार करून विकतात. एकुणात महाराष्ट्राचं जे दुखणं आहे, तेच गोव्याचंही आहे. पण गोंयकार जात्याच सोशीक आणि दुसर्‍याला आपलंसं करून घेणारा त्यामुळे त्याने बिनधास्त आपला व्यापार परप्रांतीयांच्या हातात जाऊ दिला. गोवा हे इतकं इटुकलं राज्य आहे की हे बाहेरून आलेले लोंढे लोकसंख्येच्या वाढीत मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे सगळ्याच सार्वजनिक सुविधांवर अतोनात ताण पडायला लागलाय.

गोंयकार २०२० सालापर्यंत गोव्यात अल्पसंख्य होतील अशी साधार भीती व्यक्त करण्यात येते, याला गोंयकारांकडे काही उपाय आहे का माहिती नाही. पण लवकर काही उपाय केले नाहीत तर इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती लवकरच नाहीशी होईल अणि एक बिनचेहर्‍याचं शहरीकरण झालेलं कलेवर इथं राहील याचं दु:ख आणि भय वाटतं.

आजपर्यंतच्या गोवेकरांच्या प्रेमाची, विश्वासाची परतफेड करता येणार नाही, पण इतकी वर्षं गोव्यात राहिल्यानंतर गोव्याबद्दल काही लिहायची संधी मिळालं हे मी माझं नशीब समजते, यातून गोव्याचं माझ्यावरचं ऋण थोडंतरी फेडलं असं मी म्हणू शकते. ही मालिका पुरी करण्यासाठी अनेक पूर्वसूरींना वाट पुसत आम्ही लिहिलं. त्यातील काही म्हणजे, बा.द. सातोसकर, यांचं ‘गोवा - प्रकृती आणि संस्कृती’, त्यांचेच गोमंतक ग्रंथाचे खंड, रियासतकार सरदेसाईंची रियासत, वामन राधाकृष्ण यांचं ‘मुक्तीनंतरचा गोवा’, बाळशास्त्री हरदास, मनोहरराय सरदेसाय, माधव गडकरी, अ.का.प्रियोळकर यांची पुस्तकं, उल्हास प्रभुदेसाई यांचं ‘गंगावळ्ळी, नेत्रावळी, शंखावळ्ळी’ आणि त्यांची इतर काही पुस्तकं, टिओटिनिओ डिसूझा यांची काही पुस्तकं, सरकारी गॆझेट्स आणखी इतरही खूप काही. सगळ्यांचाच उल्लेख करणं शक्य नाही पण या सार्यांपचंच ऋण आमच्यावर आहे. तसेच या लेखमालिकेच्या निमित्ताने आम्हाला गोव्याचा इतिहास आणि समाजजीवनाचे ताणेबाणे यांचा अभ्यास करायला मिळाला याबद्दल ही मालिका लिहायची कल्पना करणार्‍या आणि आम्हाला लिहायला लावणार्‍या श्री. बिपिन कार्यकर्ते यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. ही मालिका ‘मिसळपाव’ या संस्थळावर आणि त्यासोबत ‘मायबोली’ आणि ‘मीमराठी’ या संस्थळांवर एकाच वेळी प्रसिद्ध होत होती. त्यासाठी या सर्व संस्थळांचे चालक, व्यवस्थापक आणि वाचक यांच्या आम्ही अतिशय ऋणी आहोत.

काही वर्षांपूर्वी मी एक योगाचा कोर्स केला होता, तेव्हा एका कार्यक्रमासाठी आम्ही काही जण म्हापश्याहून पणजीला सकाळी ६.00 च्या दरम्यान पोचलो. तेव्हा आताच्यासारख्या गाड्या नव्हत्या. त्यामुळे ५/६ स्कूटर्स/मोटारसायकलींवर आम्ही १०/१२ जण गेलो होतो. पणजीत पोचलो आणि एकाच्या व्हेस्पाचा टायर पंक्चर झाला. स्कूटरचं किट नेमकं कुणाकडेच नव्हतं. आता मिरामारपर्यंत कसं पोचायचं याचा विचार सुरू होता, तेवढ्यात एकजण व्हेस्पावरून येताना मला दिसला. काही विचार न करता मी त्याला हात करून थांबवलं. किट आहे का विचारलं. नेमकं त्याच्याकडे होतं. तो म्हणाला, “तुम्ही पंक्चर काढा, मी तोपर्यंत दूध आणि पेपर घेऊन येतो.” बर्‍याच जणांची मदत असल्याने पटकन पंक्चर झालेला टायर बदलून झाला.

थोड्या वेळात तो परत आला. “देव बरें करूं” म्हणत त्याचं किट परत देऊन आम्ही निघालो. माझा सहप्रवासी मला विचारायला लागला, तो व्हेस्पावाला तुझ्या ओळखीचा आहे का? मला हसू आलं, कारण पणजीला यायची वेळ सुद्धा फार क्वचित यायची. मी म्हटलं, “थेट नाही, पण तशी एकुणातच मी गोंयकारांना ओळखते आणि त्यांच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे.” हा विश्वास आजही कायम आहे. म्हणूनच गोव्याच्या पद्धतीने तुम्हालाही म्हणते, “देव बरें करूं!”

- ज्योति कामत

- इति लेखनसीमा -

*****

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.
- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )

इतिहाससमाजजीवनमानप्रकटनआस्वादलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

26 Feb 2013 - 4:55 am | स्पंदना

देव बरे करु!

अतिशय सुरेख लेखमाला अन समारोपाचे लिखाण तर ह्रद्य म्हणाव लागेल. एकुण गोवा बकाल होत चाललाय, अन आपण काहीही न करता हताशपणे पहाण्याशिवाय काहीही करु शकत नाही ही भावना अतिशय दु:खी करणारी. एकुणच सगळ्या भारतात हेच दृष्य आहे. काय बोलणार?
देव बरे करु!

मस्त झाली लेखमालिका ज्योताई. हल्ली गोव्यामध्ये जे काही चाललं आहे ते ऐकून खूप वाईट वाटतं...
बा भं चा गोवा फक्त कवितेत न राहता प्रत्यक्षातही रहावा हीच मनापासून इच्छा!

नगरीनिरंजन's picture

26 Feb 2013 - 8:30 am | नगरीनिरंजन

अत्यंत सुंदर लेखमाला! तिन्ही लेखनकर्त्यांचे आभार आणि अभिनंदन.
शेवटचा भाग अपेक्षेप्रमाणे काळजात कालवाकालव करणारा. गोव्याची जुनी संस्कृती, जंगले वगैरे नष्ट होताहेत हे खरे असेलही; पण जोपर्यंत प्रगती होतेय तोपर्यंत असे किरकोळ त्याग करणे भाग आहे.

बॅटमॅन's picture

26 Feb 2013 - 11:29 am | बॅटमॅन

+१.

एकूणच ननिंशी सहमत. अतिशय उच्च लेखमाला.

प्रचेतस's picture

26 Feb 2013 - 12:11 pm | प्रचेतस

अप्रतिम लेखमाला.
अगदी प्राचीन इतिहासापासून आजच्या काळापर्यंत घेतलेला गोव्याचा वेध आवडला.

नितांतसुंदर अशी ही लेखमाला सादर केल्याबद्दल पैसाताई, प्रिमो आणि बिपीनदाचे आभार.

मन१'s picture

26 Feb 2013 - 12:22 pm | मन१

मस्तच. संपूर्ण मालिकाच उत्तम.
ननिंच्या प्रत्येक वाक्याशी सहमत.
फुरसतीत मालिकाअधिक टंकतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2013 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

सगळी लेखमाला अगदी नीट वाचली. गोव्याची नवीन आणि सविस्तर ओळख झाली. वाचनखूण साठवली आहे... परत एकदा सवडीने सगळे भाग एकत्र वाण्यासाठी.

आपल्या लेखनाच बाज फार आवडला. योग्य तेथे सहजतापूर्ण भावनीक जिव्हाळा व्यक्त करण्याची लकब खूप भावली. शेवट तर शिखर गाठून गेला.

या सगळ्याबद्दल अनेक घन्यवाद !

योगप्रभू's picture

26 Feb 2013 - 12:35 pm | योगप्रभू

संदर्भमूल्य, लेखन सौन्दर्य आणि लोभस भाषा यामुळे ही मालिका मिपाच्या ठेवणीतील खास चीज बनली आहे.
पैसा, प्रीत-मोहोर, बिपीन कार्यकर्ते आणि नीलकांत यांचे कौतुक करावे तेवढे थोडे. अजून भाग वाचायला आवडले असते.

सुमीत भातखंडे's picture

26 Feb 2013 - 1:33 pm | सुमीत भातखंडे

सुंदर लेखमाला होती.
शेवटचा भाग मात्र त्रास देऊन गेला

असो...इतक्या अप्रतिम लेखमालेबद्दल अनंत धन्यवाद!

चावटमेला's picture

26 Feb 2013 - 1:48 pm | चावटमेला

अतिशय सुंदर लेखमाला. सगळेच भाग एका पेक्षा एक. शेवटच्या भागात सांगितलेलं वास्तव थोडी चुटपुट लावून गेलं,पण असो, चालायचंच, आपण गुलाबाचं सौंदर्य पाहायचं, काट्यांकडं दुर्लक्ष करत.

सध्याचे वास्तव वैग्रे असाईड, गोवा नामक टुमदार प्रदेशाचा समृद्ध अन कुण्णाला फारसा माहीत नसलेला इतिहास परिश्रमपूर्वक मिपाकरांसमोर ठेवल्याबद्दल टीम गोवाचे लै धन्यवाद!!!

अग्निकोल्हा's picture

26 Feb 2013 - 3:23 pm | अग्निकोल्हा

शेवट काहिसा खंतदायक असल्याने उगाचच एक चुटपुट मनातमधे राहिली. अतिशय माहितीपुर्ण लेखमालेबद्दल टिम गोवाचे मनःपुर्वक अभिनंदन.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2013 - 4:10 pm | अत्रुप्त आत्मा

टीम गोवा... जिंदादिल गोवा...!!! :-)

ऋषिकेश's picture

26 Feb 2013 - 5:22 pm | ऋषिकेश

या संग्रहणीय लेखमालेचा हृद्य शेवट..
लेखमाला अतिशय आवडली!

माहिती संकलीत करून नेटकेपणाने आणि नेटाने आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल टिम गोवाचे आभार!

विकास's picture

28 Feb 2013 - 1:07 am | विकास

या संग्रहणीय लेखमालेचा हृद्य शेवट..लेखमाला अतिशय आवडली! ... माहिती संकलीत करून नेटकेपणाने आणि नेटाने आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल टिम गोवाचे आभार!

“देव बरें करूं!”

कवितानागेश's picture

2 Mar 2013 - 11:47 pm | कवितानागेश

+१
खूप आवडली लेखमाला.

स्पा's picture

26 Feb 2013 - 5:27 pm | स्पा

सर्व भाग सुरेखच झाले
गोव्या बद्दलच्या अनेक नवीन गोष्टी समजल्या, आता गोव्याला जेंव्हा येईन तेंव्हा बरीच माहिती आधीच मिळाल्याने एका वेगळ्या दृष्टीने गोव्याचा आनंद घेता येईल

टीम गोवा यांचे मन: पूर्वक अभिनंदन

त्रिवेणी's picture

26 Feb 2013 - 6:57 pm | त्रिवेणी

आज पाहिलंद्याच हा शेवटचा भाग वाचला, आता सवडीने पहिल्या भागापासून वाचेन.

स्मिता.'s picture

26 Feb 2013 - 7:37 pm | स्मिता.

टीम गोवा ने एक सुरेख लेखमाला लिहिली आहे. आज शेवटचा भाग हे बघून थोडीशी निराशाच झापण, पण चालायचंच. खूप छान आणि नवीन माहिती दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार आणि अभिनंदन!

अश्याच लेखमाला महाराष्ट्राच्या खान्देश, विदर्भ, मराठवाडा, कोकण, इ. भागांबद्दल याव्या अशी इच्छा वाटयला लागलीये आता.

आदूबाळ's picture

28 Feb 2013 - 12:45 am | आदूबाळ

असेच म्हणतो!

अश्याच लेखमाला महाराष्ट्राच्या खान्देश, विदर्भ, मराठवाडा, कोकण, इ. भागांबद्दल याव्या अशी इच्छा वाटयला लागलीये आता.

याला तर +१११

या लेखमालेनं भरपूर माहिती दिली. चिकाटीने दिलेल्या लढ्याबद्दल समजले. नाहीतर दोन तीन वेळा फक्त एक टूरिस्ट म्हणूनच गोव्यात फिरले गेले.
या मालिकेसाठी कष्ट घेणार्‍या टीम गोवाचे आभार.
आजकालच्या गोव्याबाबत एका इथे स्थायीक झालेल्या गोवेकर कुटुंबाकडून ऐकण्यात आलं. या कुटुंबाचा अनेक वर्षांपासून रेस्टॉरंट व हॉटेल चालवण्याचा व्यवसाय हा तिथे स्थायीक झालेल्या व बेकायदेशीर उद्योग करणार्‍यांमुळे कसा अवघड बनलाय हे साधारण समजले. गुंडांनी या कुटुंबाला धमक्या देऊनही अजूनतरी ते त्याच व्यवसायात तग धरून आहेत पण किती काळ हे चालू ठेवता येईल सांगता येत नाही. त्यांच्या घरच्या अठरा वीस वर्षाच्या मुलांना अमली पदार्थ घेण्याचा आग्रह करण्यात आला. त्यांस दाद न दिल्याने बाकीचे प्रकारही झाले. अशावेळी त्यांना हा व्यवसाय बंद करावासा वाटतो. आपल्या मुलामुलींना काही झाले तर ही भीती असते. सध्या ती फ्यामिली गोवा भेटीला गेलीये. येतील तेंव्हा काय झाले हे कळेल.

सानिकास्वप्निल's picture

26 Feb 2013 - 9:21 pm | सानिकास्वप्निल

सुंदर लेखमाला
आज सगळे भाग एकदम वाचून काढले.
गोव्याची सविस्तर व माहितीपूर्ण लेखमालेसाठी टीम गोव्याचे अनेकानेक धन्यवाद
समारोपाचा भाग मनाला टोचून गेला :(

पिवळा डांबिस's picture

27 Feb 2013 - 3:30 am | पिवळा डांबिस

एक चांगली लेखमाला.
टीम गोवा चे अभिनंदन...

अभ्या..'s picture

27 Feb 2013 - 8:25 pm | अभ्या..

गोव्याच्या रुढ असलेल्या चित्रापेक्षा खूप वेगळे असे चित्र सादर केल्याबद्दल टीम गोवाचे खूप खूप धन्यवाद
इतिहास, खाद्यसंस्कृती, भाषावैभव आणि परंपरा याचे एक रसपूर्ण वर्णन वाचताना शेवटी मात्र खंत दाटून आली.
अशा जागरुक मनांची संख्या वाढून तरी तेथील निसर्गावरचा घाला टळो हीच सदिच्छा.
खूप खूप धन्यवाद टीम गोवा.

राघवेंद्र's picture

28 Feb 2013 - 12:03 am | राघवेंद्र

गोव्यबद्दल खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !!!

सूड's picture

28 Feb 2013 - 12:47 am | सूड

उत्तम अशा लेखमालेबद्दल टीम गोवाचे मनापासून आभार !!

मोदक's picture

28 Feb 2013 - 12:54 am | मोदक

सुंदर लेखमाला...

धन्यवाद.

धनंजय's picture

28 Feb 2013 - 9:42 am | धनंजय

लेखमाला चिकाटीने आणि उत्तमरीत्या पूर्ण केली. धन्यवाद आणि अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2013 - 4:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असंच म्हणतो. सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार.

-दिलीप बिरुटे

रघुनाथ.केरकर's picture

1 Sep 2013 - 4:30 pm | रघुनाथ.केरकर

खरच खुप खुप धन्यवाद ह्या सगळ्या महिति बद्दल.

ररघुनाथ केरकर