h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.img-left {float:left;width:20%;margin-right:20px;}
.mi-img {margin-top:8px;margin-bottom:16px; display: block; margin-left: auto; margin-right: auto;}
.mi-center {text-align:center;}
.mi-heading {font-family: 'Baloo 2', cursive; font-size:17px; font-weight:bold; text-decoration-line: underline;}
अष्टदिक्पाल
प्राचीन मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांवर, तसेच सभामंडपामध्ये, अंतराळात आपणास अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात - शिव, विष्णू, देवी आदी देवता, सुरसुंदरी, नर्तक, वादक ह्याशिवाय सर्वसाधारणपणे हटकून दिसतात त्या लोकपालांच्या अर्थात दिक्पालांच्या मूर्ती. हे दिक्पाल त्या त्या विशिष्ट दिशांचे आणि उपदिशांचे पालन करतात, असे मानले जाते. इंद्र, अग्नी, वायू, यम, कुबेर, वरुण, ईशान आणि निर्ऋती ह्या त्या दिशांच्या देवता. मुख्य दिशांच्या देवतांची नावे वेगळी, मात्र उपदिशा आणि त्यांच्या देवता यांची नावे एकमेकांना समांतर असलेलीच आढळून येतात. उदा. आग्नेयेचा दिक्पाल अग्नी, नैर्ऋत्येचा निर्ऋती, ईशान्येचा ईशान आणि वायव्येचा वायू. ही उपदिशांची नावे त्या त्या देवतेपासूनच पडलेली आहेत, हे उघड आहे. इंद्र, अग्नी, वायू, यम, वरुण आणि ईशान ह्या वैदिक देवता आहेत, कुबेर हा यक्षांचा अधिपती, तर निर्ऋती हा चक्क राक्षस आहे. अगदी क्वचित ह्या दिक्पालांच्या मूर्ती त्यांच्या शक्तीसहदेखील आढळतात. दिक्पाल मूर्ती ओळखणे तसे सोपे आहे. त्यांची वाहने आणि हातातील आयुधे यावरून ते सहज जाणून घेता येते. चला तर मग, आता एकेक दिक्पालाची विस्ताराने माहिती घेऊ.
इंद्र (पूर्व दिशेचा अधिपती)
हा देवतांचा राजा. ऐरावत हत्ती हे त्याचे वाहन. वेदांतील सर्वाधिक प्रसिद्ध देवता म्हणजे इंद्रच. इंद्राची पूजा पूर्वी इंद्रध्वजाच्या रूपाने जनमानसात प्रचलित असे. ह्या इंद्रध्वजाच्या पूजेचे वर्णन माझ्या 'गुढीपाडवा - शक्रोत्सवातील इंद्रध्वजपूजेचे प्राचीन साहित्यातील वर्णन' ह्या लेखात विस्ताराने दिलेले आहे. इंद्राची पत्नी शची. काही ठिकाणी इंद्र शचीसह दिसतो. इंद्राची मूर्ती ओळखणे अगदी सोपे. हत्तीवर स्वार किंवा पायाशी हत्ती अशा पद्धतीने इंद्र दाखवला जातो. हातातील आयुधे म्हणजे वज्र, अंकुश.
कायगाव टोके मंदिरात असलेली इंंद्राची मूर्ती - हातात अंकुश, गदा, अक्षमाला आणि कमंडलू आहेत, तर वाहन हत्ती हे पायाशी आहे.
वेरुळ येथील धुमार लेणीत शिल्पपटात असलेली इंद्राची मूर्ती
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातली हत्तीवर स्वार इंद्राची मूर्ती, हाती वज्र आणि अंकुश आहेत.
पेडगाव येथील लक्ष्मीनारायण मंदिरातील इंद्राची मूर्ती
अग्नी (आग्नेयेचा अधिपती)
वैदिक देवतांत इंद्रानंतर कोणाचे स्थान असेल तर ते अग्नीचे. यज्ञाच्या माध्यमातून देवांना हवी पोहोचवण्याचे काम करणारा तो अग्नी. अग्नीची मूर्ती ओळखायची सर्वात सोपी खूण म्हणजे त्याचे वाहन एडका. यज्ञात अजापुत्राला अर्थात बोकडाला यज्ञपशू म्हणून महत्त्वाचे स्थान असल्याने अग्नीचे ते वाहन असल्यास नवल नाही. अग्नीच्या इतर लक्षणांमध्ये त्याची आयुधे म्हणजे ध्वज, कमंडलू, अ़क्षमाला, शक्ती. आयुधात बर्याच वेळा पोथी, गदा, स्रुक, स्रुवा अशी भिन्नताही आढळते.
कायगाव टोके येथील अग्नीचे शिल्प
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरील बाह्य भिंतीवर असलेली एडक्यावर स्वार अग्नी मूर्ती
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्य भिंतीवरील अग्नी शिल्प
वेरुळच्या प्रवेशद्वारावर कोरलेली अग्नी मूर्ती
ह्याशिवाय पाटेश्वर येथील लेणीत अग्नीची एक वेगळीच प्रतिमा बघायला मिळते.
ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८व्या सूक्तातील तिसर्या श्लोकात अग्नीचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे -
चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||
अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.
चार शिंगे म्हणजे चार वेद, ३ पाय म्हणजे दक्षिण, गार्हपत्य आणि आहवनीय हे तीन प्रकारचे अग्नी, २ मस्तके म्हणजे एक मानवाचे (हवन करणार्या ऋषीचे) आणि दुसरे वृषभाचे (हे बांधलेल्या यज्ञपशूचे प्रतीक), ७ हस्त म्हणजे काली, कराली इत्यादी सात प्रकारच्या ज्वाला. असा हा अग्निवृष.
पाटेश्वर येथील अग्निवृष
अग्निवृष
वरुण (पश्चिम दिशेचा अधिपती)
वरुण ही जलदेवता. पश्चिमेकडील बाजूस समुद्र असल्याने साहजिकच हा पश्चिमेचा अधिपती झाला. पाश हे वरुणाचे प्रमुख आयुध आणि जलदेवता असल्याने मकर हे त्याचे वाहन झाले. जलदेवता असल्याने काही वेळा एका हातात तर काही वेळा दोन्ही हातात कमळे आढळतात. समुद्रच नव्हे, तर सरोवरे, नद्या जिथे जिथे जल असेल त्यांचा स्वामी वरुण बनला.
कायगाव टोके येथील वरुणाची मूर्ती
पेडगाव येथील वरुणाची मूर्ती, मकर हे वाहन पायापाशी दिसेल.
वेरुळ येथील कैलास लेणीतील वरुणाची मूर्ती
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील मकरारूढ वरुण
वायू (वायव्येचा अधिपती)
वैदिक ग्रंथांत वायूस महत्त्वाचे स्थान नाही, मात्र महाभारत, रामायण हा महाकाव्यांत अनुक्रमे भीम आणि हनुमान यांचा जनक म्हणून मानाचे स्थान आहे, तर वायूच्या आराधनेसाठी वायुपुराणही निर्मिले गेले. वायूच्या मूर्तीच्या निर्मितीत त्याच्या अंगभूत लक्षणांचा पुरेपूर वापर केला गेल्याचे आपणास दिसते. वायूच्या दोन्ही हातात फडफडत्या पताका/ध्वज दिसतात, वायूचे वस्त्रदेखील फडफडताना दिसते, वायुमूर्ती ओळखण्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्याचे वाहन हरीण. वेगाने धावत असल्याने हरीण हेच वायूचे वाहन बनल्यास त्यात काहीच नवल नाही.
कायगाव टोके येथील दोन्ही हातांत फडफडत्या पताका, कमंडलू, अक्षमाला आणि वाहन हरीण यांनी युक्त अशी वायुमूर्ती
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील बाह्य भिंतीवरील वायुमूर्ती
वेरुळ लेण्यातील वायुमूर्ती
यम (दक्षिण दिशेचा अधिपती)
यम ही वैदिक देवता. सूर्याचा पुत्र. मृतांना स्वर्गास अथवा नरकास पोहोचवणारा हा देव. मृतांना नेण्यास हा आपल्या दूतांना पाठवतो. दक्षिण दिशा मृतांची मानली गेली आहे, साहजिकच यमाकडे दक्षिणेचे आधिपत्य आले किंवा यमाकडे दक्षिण दिशेचे आधिपत्य आहे, म्हणूनही दक्षिण दिशेस मृतांची दिशा मानले गेले असावे. ऋग्वेदातील १० मंडलातील यम-यमी संवाद हे संवादसूक्त अतिशय प्रसिद्ध आहे. तर महाभारतात पतिव्रतोपाख्यानात सत्यवान-सावित्री आणि यम यांची कथा विस्ताराने आली आहे. मार्कंडेयास नेण्यास आलेल्या यमाचे पारिपत्य करणार्या शिवाची कथा तर प्रसिद्धच आहे. कालारी शिव अर्थात मार्कंडेयानुग्रह मूर्तीत शिव आणि यमाचे शिल्पांकन केलेले आढळते. यम हा काळाचे/मृत्यूचे प्रतीक, साहजिकच त्याचे वाहन रेडा हेच आहे. इतर लक्षणांत पाश, दंड, खड्ग, अक्षमाला/कमंडलू ही आयुधे अंतर्भूत आहेत.
कायगाव टोके येथील यमाची प्रतिमा - हाती दंड, यमपाश, अक्षमाला आणि पापपुण्याची नोंदवही आहे.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपातील यमाचे शिल्प
कैलास लेणे, वेरुळ येथील यमाचे शिल्प
कुबेर (उत्तर दिशेचा अधिपती)
कुबेर हा विश्रव्याचा पुत्र असल्याने याला वैश्रवण असेही म्हणतात. हा यक्षांचा अधिपती. साहजिकच यक्षांप्रमाणेच ह्याचे शरीरही स्थूल दाखवले जाते. 'कुसित बेरं शरीरं यस्य सः' - अर्थात ज्याचे शरीर कुरूप, बेढब असा तो कुबेर. अर्थात कुबेराच्या सर्वच मूर्ती स्थूल आहेत असेही नाही. त्याच्या मूर्ती सडपातळही आहेत. कुबेर हा जैन आणि बौद्धांमध्येही आढळतो. बौद्धांमध्ये तो जंभाल होतो. त्याची पत्नी भद्रा ही बौद्धांमध्ये हरिती होते.
कुबेराची मूर्ती ओळखणे तसे अवघड, कारण कुबेराची लक्षणे एकसारखी नाहीत. त्याचे प्रमुख वाहन नर. स्थूल असल्याने पालखीद्वारे हा उचलला जात असल्याने कुबेराला नरवाहन म्हणतात. काही वेळा कुबेराचे वाहन हत्ती किंवा घोडा हेसुद्धा दाखवल्याचे दिसते. मात्र कुबेर ओळखण्याचे एक हमखास लक्षण म्हणजे त्याच्या हाती असलेली धनाची पिशवी आणि मुंगूस. कुबेर हा देवांचा धनाध्यक्ष. साहजिकच त्याच्या हाती धनाची पिशवी असते, तर मुंगूस हेसुद्धा धनाचे प्रतीक. मुंगूस दिसल्यावर धनलाभ होतो असे आजही मानतात. मात्र मुंगूस हे कुबेराचे वाहन नव्हे.
कायगाव टोके येथील कुबेर प्रतिमा. येथे वाहन हे हत्ती असून हाती धनाची पिशवी घेतलेली आहे.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील घोड्यावर बसलेल्या कुबेराची प्रतिमा
पेडगाव येथील मुंगूस आणि धनाची पिशवी हाती घेतलेला कुबेर
वेरुळ येथील क्र. २०च्या लेणीतील तुंदिलतनू असलेला कुबेर
वेरुळ येथील बौद्ध लेणीतील जंभाल आणि हरितीची प्रतिमा
निर्ऋती (नैर्ऋत्येचा अधिपती)
निर्ऋतीचे नाव ऋग्वेदात आढळते, मात्र त्याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. वेदात हा राक्षस म्हणूनच ह्याचा उल्लेख येतो. काही पुराणे निर्ऋतीला स्त्रीरूपी मानतात आणि अलक्ष्मी म्हणूनही निर्ऋतीचे नाव येते. वेदोक्त देवतांच्या रूपांमध्ये विविध कथापुराणांद्वारे हळूहळू बदल होत जाताना निर्ऋतीला दिशाधिपतीचे काम आले असावे, असे म्हणता येते. निर्ऋतीच्या मूर्तीही तुलनेने मोजक्याच आढळतात, ज्या मंदिरांमध्ये दिक्पाल मूर्ती आहेत, तिथेही काही वेळा निर्ऋतीची मूर्ती नसते. मात्र निर्ऋतीची मूर्ती जिथे असेल तिथे ती ओळखणे मात्र सोपे आहे. निर्ऋती हा प्रेतवाहन किंवा नरवाहन. हाती खड्ग, खेटक, नरमुंड ही सर्वसाधारण लक्षणे आणि चेहरा उग्र, दाढा विचकलेल्या असे रूप.
कायगाव टोके येथील निर्ऋतीची मूर्ती. हाती खड्ग, खेटक (ढाल), नरमुंड आणि एक हात अभयमुद्रेत आहे.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील नरवाहन निर्ऋतीची मूर्ती
खिद्रापूरच्याच कोपेश्वर मंदिरातील प्रेतवाहन निर्ऋतीची मूर्ती
ईशान (ईशान्येचा अधिपती)
ईशान हे शिवाचेच एक रूप आहे, त्यामुळे ह्याच्या मूर्तीची लक्षणे जवळपास सर्वच शिव आणि भैरवासारखीच आहेत. हाती डमरू, कमंडलू, त्रिशूळ, नाग. याचे वाहन बैल. भैरवमूर्ती आणि ईशान यांच्यामधील फरक म्हणजे भैरव रौद्र आणि काही वेळा नग्न असतो आणि भूतगण, नरमुंडही बाजूला असतो, तर ईशान मूर्ती सौम्य असते.
कायगाव टोके येथील ईशान मूर्ती
पेडगाव येथील ईशान मूर्ती
पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ईशान मूर्ती
मातृका
ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ||
ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, इंद्र आदी देवतांच्या अंशापासून मातृका उत्पन्न झाल्या, असे विविध पुराणांमध्ये उल्लेख आहेत, तर अंधकासुरवध कथेत शिवाने मारलेल्या अंधकासुराच्या रक्तापासून नवीन असुर उत्पन्न होऊ नयेत म्हणून त्यांचे रक्त पिण्यासाठी योगेश्वरी आणि इतर मातृका उत्पन्न केल्या, असा उल्लेख आहे. वर श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा ह्या सप्तमातृकांसह कधीकधी आठवी मातृका नारसिंहीसुद्धा दिसते. मातृका ह्या शाक्त अथवा तंत्र पंथामधील समजल्या जातात. ह्या मातृकांचे शिल्पांकन सर्वसाधारणपणे वेगवेगळे आढळत नाही, त्या पट स्वरूपातच आपल्याला दिसतात. सप्तमातृकापटात नेहमी मातृकांच्या एका बाजूला वीरभद्र आणि दुसर्या बाजूला गणेश आढळतो. ह्या दोघांच्या मध्ये सात मातृका आपल्या बाळांसह दिसतात. तर प्रत्येक मातृकेच्या खालील बाजूस त्यांची वाहने कोरलेली असतात. क्वचित प्रसंगी मातृकांची वेगवेगळी शिल्पेदेखील दिसतात. चामुंडा मात्र जवळपास सर्वत्रच स्वतंत्र कोरलेली आढळते.
मातॄकांची वाहने पुढीलप्रमाणे
ब्राह्मी - हंस
माहेश्वरी - बैल
कौमारी - मोर
वैष्णवी - गरुड
वाराही- वराह, घुबड, महिष
इंद्राणी - हत्ती
चामुंडा- प्रेत
आता काही सप्तमातृकापट पाहू या.
वेरुळ येथील कैलास लेणीतील सप्तमातृकापट
कैलास लेणीतील यज्ञशाळेतील समोरील बाजूस कोरलेला आहे हा प्रचंड सप्तमातृकापट. या सप्तमातृकांची पूजा नेहमी यज्ञाच्या वेळी केली जायची. वाराही, ऐंद्री, वामनी (ब्राह्मणी), नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या अनार्य अंश असलेल्या सप्तमातृका. यातील प्रत्येक मातेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. ह्या देवता म्हणजे जननशक्तीचे जणू एक प्रतीकच. अतिशय देखण्या आणि सालंकृत असलेल्या ह्या मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. मूर्तिभंजकांनी मातृकांची मस्तके जरी नष्ट केली असली, तरी प्रत्येक मूर्तीच्या खाली तिचे वाहन कोरलेले आहे, त्यावरून ह्या मातृका सहज ओळखू येतात. येथील एक वाहनांतील बदल म्हणजे वाराहीचे वाहन महिष असून चामुंडेचे शृगाल आहे.
वेरुळ येथील लेणी क्रमांक १४ येथील सप्तमातृकापट (येथे चामुंडेचे वाहन घुबड हे आहे)
वेरुळ येथील कैलास लेणीच्या डावीकडील लहानशा लेणीतील उभ्या स्थितीत असलेल्या सप्तमातृकांचा पट
टाकळी ढोकेश्वर येथील सप्तमातृकापट
लेणीतील प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडे एक भव्य सप्तमातृकापट आहे. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (स्त्री), माहेश्वरी (नंदी), कौमारी (मोर), वैष्णवी (गरुड), वाराही (वराह), ऐंद्राणी (हत्ती), चामुंडा (कुत्रा) आणि शेवटी मोदकपात्रासह गणेश असा हा शिल्पपट.
ब्राह्मणीचे वाहन नेहमी हंस असते, इथे मात्र ते स्त्रीरूपात दाखवलेले आहे. प्रत्येक मातृकेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. वाराही ही वराहमुखी दाखवली असून चामुंडा तिच्या नेहमीच्या भयप्रद रूपात आहे.
ह्याशिवाय खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातदेखील दोन सप्तमातृकापट आहेत.
आता मातृकांची काही एकल रूपातील शिल्पे पाहू या. (सर्व शिल्पे कायगाव टोके मंदिरातील)
माहेश्वरी - डमरू, खड्ग, नाग, वाहन- बैल
कौमारी -कमंडलू, पुस्तक, बीजापूरक आणि पंखा, वाहन - मोर
वैष्णवी - शंख, चक्र, कमळ, वाहन - गरुड
ऐंद्राणी - पाश, अंकुश, वाहन - हत्ती
वराहमुखी वाराही - वाहन - महिष
याशिवाय चामुंडेची स्वतंत्र शिल्पे तर पुष्कळ दिसतात, चामुंडा ओळखणे तर अगदी सोपे. मातृकापटांतील चामुंडेचे वाहन प्रेत, शृगाल, घुबड अशा भिन्न रूपांत दाखवलेले असले, तरी एकल चामुंडा मूर्तीत प्रेत हे वाहन असते. चामुंडेच्या पोटात विंचू असतो, जो तिच्या भुकेचे प्रतीक आहे. हातपायांचा अस्थिपंजर असून स्तन लोंबते असतात. रूप कराल असून दाढा विचकलेल्या असतात. भयप्रद स्वरूपाची चामुंडा बर्याच वेळा शीळ घालण्यार्या मुद्रेत असलेल्या दिसून येते.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील चामुंडा
पिंपरी दुमाला येथील चामुंडा मूर्ती
सर्वात शेवटी भुलेश्वर येथील सर्वांगसुंदर चामुंडा पाहू.
अष्टदिक्पाल आणि मातृका आपण वरील लेखात विस्ताराने पाहिले. आणखीही माहिती देता आली असती, मात्र ती तांत्रिक आणि किचकट झाली असती - उदा., पुराणांत वर्णन केल्याप्रमाणे असलेले त्यांचे रंग, त्यांच्या वाहनांचे विस्तारपूर्वक वर्णन, शिल्पशास्त्रात असलेली त्यांची संस्कृत वर्णने. येथे मी त्यांची सर्वसाधारण माहिती येथील मंदिरांच्या अनुषंगाने आणि ह्या मूर्ती सहजी ओळखता येईल अशा प्रकारे मांडली. काही शिल्पे भग्न झाल्यामुळे त्यात कदाचित काही त्रुटी असण्याचा संभव आहे - उदाहरणार्थ, खिद्रापूर मंदिरातील निर्ऋती आणि कुबेर यांच्या मूर्तीत गल्लत झाली असण्याचा संभव आहे. घोडा असलेली मूर्ती कदाचित कल्कीची असू शकते आणि नरवाहन असलेला निर्ऋती हा कदाचित कुबेर असू शकतो. मूर्ती उंचावर असल्याने आणि छायाचित्रातील लक्षणे पुरेशी स्पष्ट दिसत नसल्याने ही चूक होऊ शकते. इतर स्रोतातून अधिक माहिती मिळाल्यास स्वागतच आहे.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
6 Sep 2022 - 12:00 pm | गवि
लेख उत्तम आहे. रोचकही.
असे लक्षात येते की एकूण मूर्तीचा चेहरा कोणताही असू शकतो, अगदी वेगवेगळा किंवा सर्वांचा एका साच्यातलाही सर्वसाधारण देखणा गोमटा असू शकतो.
फरक चेहरेपट्टीत नसून मुख्यत: अस्त्रे, शस्त्रे, प्रतीके, वाहन अशा खुणा याच मुख्य आयडेण्टीटी मार्क्स असतात असं दिसतं.
6 Sep 2022 - 7:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख, मांडणी रोचक आहे, नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेखन आहे. धन्स. वल्ली. बाकी, आदरणीय गविसरांशी सहमत. जी शिल्पे आपण पाहात असतो तेव्हा, ती शिल्पे सगळीच एकसारखी वाटत असतात पण त्यांची शस्त्रे आणि ज्यावर आरुढ आहे त्यावरुन हे शिल्प याचे याचे ते अमुक अमुक आहे. पण, यासाठी अभ्यास असावा लागतो. आणि असा अभ्यास प्रचेतस यांचा आहे. अनेकदा कुठे आपणास कुठली शिल्पे दिसली की आवर्जून प्रचेतस यांना पाठवली की ते आपणास माहिती सांगतात. मोठा माणूस त्यांनी आपल्या लेखनाचं पुस्तक करावे, असे अनेकदा त्यांना सांगितले पण, आपले म्हणने गांभीर्याने घेतील ते प्रचेतस उर्फ वल्ली कसले.
लिहिते राहा सर.
-दिलीप बिरुटे
6 Sep 2022 - 9:51 pm | प्रचेतस
धन्यवाद गविशेठ.
दिक्पाल आणि मातृकांच्या बाबतीत वाहन हेच सर्वात प्रमुख लक्षण, शस्त्रे, आयुधे नंतर येतात. एकदा ती वाहने आपल्याला नीट ओळखता आली की पुढचे सर्व सोपे होते.
6 Sep 2022 - 12:02 pm | टर्मीनेटर
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि प्रेक्षणीय लेख 👍
हया वर्षीच्या एप्रिल महिन्यात काढलेला टाकळी ढोकेश्वर इथल्या सप्तमातृकापटचा फोटो (हा सप्तमातृकापट आहे हे तुमचाच त्यावरील एक लेख वाचून समजले होते हा भाग निराळा 😀)
6 Sep 2022 - 12:13 pm | Bhakti
सुंदर!
तुमच्या लेखांमुळे सप्तमातृका ओळखायला शिकले ,आता अष्टदिक्पालही समजले.
मागे एका ठिकाणी साती आसरा, जलदेवता यांची चर्चा होती.तिथे मी टाकळीढोकेश्वरचा फोटो दिला तर त्यांचं म्हणणं की सप्तमातृका ह्या जलदेवता साती आसरा नव्हे.असो पण मातृकाच जलदेवता आणि साती आसरामध्ये रुपांतरीत झाल्या असाव्यात.
6 Sep 2022 - 12:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
पहिले झरझर नजर फिरवली आणि मग परत सावकाश वाचुन काढला. वल्लीदांचा लेख असल्याने अभ्यासपुर्ण आहेच, परंतु प्रचि आणि वर्णन एकाखाली एक असल्याने समजुन घ्यायला सोपे जात आहे.
रच्याकने-आजच्या लोकसत्तामध्ये वैनायकी ह्या विनायकाच्या शक्तीरुपाचे वर्णन अंधकासुराच्या कथेसंदर्भात आले आहे. तेही एक मातृकाच म्हणता येइल का?
6 Sep 2022 - 9:57 pm | प्रचेतस
गाणपत्य संप्रदाय जेव्हा फोफावला तेव्हा गणेशाचीही शक्ती असणे ही जरुर बनली आणि वैनायकीचा जन्म झाला. पण ही मातृकांमध्ये गणली जात नाही. अंधकासुरवधाचे म्हणाल तर वैनायकी त्यात नंतर घुसडली गेली असावी, शिवपुराणात अंधकासुर वधाच्या वेळी त्याच्या रक्तापासून निर्माण होणारे राक्षस गिळून टाकण्यासाठी शिव योगेश्वरी अर्थात चामुण्डेची निर्मिती करतो असा उल्लेख आहे. वेरुळ, घारापुरीत अंधकासुर, गजासुरवधशिल्पांत चामुण्डेच्याही भयप्रद मूर्ती आहेत.
वैनायकीची मूर्ती पाटेश्वर आणि भुलेश्वर येथे आहे.
6 Sep 2022 - 1:08 pm | अनिंद्य
शीर्षकावरून लेखक प्रचेतस असतील हा अंदाज बरोबर ठरला :-) रोचक माहितीने ओतप्रोत लेखन !
'अग्निवृष' हे विचित्र रूप कधीच पूर्वी वाचनात / बघण्यात आले नाही, त्यासाठी तुमच्यासारखी रत्नपारखी दृष्टी हवी.
जियो !
6 Sep 2022 - 1:13 pm | गणपा
या विषयातला तुझा अभ्यास अचंभित करणारा आहे. अलीकडेच खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर पाहताना तुझीच आठवण येत होती.
तुज सोबत असे एखादे स्थळ फिरण्याची मनापासुन इच्छा आहे
6 Sep 2022 - 5:07 pm | विजुभाऊ
गणपा भाऊ , वेरूळ अजिंठा दौरा करायचा का?
बकेट लिस्ट आयटम आहे
6 Sep 2022 - 5:07 pm | मुक्त विहारि
त्या बाबतीत मी भाग्यशाली आहे ...
घारापुरी लेणी, वल्लीं बरोबरच बघण्यात अर्थ आहे ...
6 Sep 2022 - 9:58 pm | प्रचेतस
वेरुळ बघायला लवकरच जाऊयात :)
6 Sep 2022 - 10:59 pm | सतिश गावडे
तुमच्या वेरुळला होणार्या खेपा पाहता तुम्ही आता वेरुळच्या आसपास एखादा वन बिएचके घेऊनच टाका ;)
बाकी लेख नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण असणार यात शंका नाही.
6 Sep 2022 - 1:48 pm | नि३सोलपुरकर
अप्रतिम ले़ख, बरीच माहिती मिळाली
निशब्द आहे तुमच्या व्यासंगापुढे ... प्रचेतस भो ,__/\__
6 Sep 2022 - 2:14 pm | कंजूस
वाराहीचे वाहन महिष का आहे?
उल्लेख केलेली शिल्पे असलेली मंदिरे - कायगाव टोके, टाकळी ढोकेश्वर, पेडगावचे लक्ष्मीनारायण, वेरूळ लेणी, पिंपरीदुमाला, यांपैकी वेरूळ आणि भुलेश्वर थोडे उडत उडत पाहिले आहे. बाकीची बघायची बाकी आहेत.
कर्नाटकातली हळेबिड,बेलूर पाहिली आहेत.
लेख छान झाला आहे. वाहन काय णते आणि हातात कोणत्या वस्तू धरल्या आहेत इकडे मूर्ती पाहताना लक्ष ठेवायला हवे.
6 Sep 2022 - 10:05 pm | प्रचेतस
विष्णूधर्मोत्तरपुराणात वाराहीचे वर्णन पुढिलप्रकारे आलेय
कृष्णवर्णातु वाराही सूकरास्या महोदरी ।
वरदा दण्डिनी खडगं विभ्रती दक्षिणे सदा ॥
कृष्णवर्णाची, वराहासारखे महोदर असलेली दण्ड, खड्ग धारण करणारी वरदायिनी वाराही दक्षिणेकडे सतत पाहात असते. अर्थात यात वाहनाचा उल्लेख नाही मात्र १४ व्या शतकातल्या राणा कुंभाच्या पदरी असलेल्या मंडण कवीच्या रुपमंडन नावाच्या ग्रंथात वाराहीचे वाहन महिष असल्याचा उल्लेख आहे.
वाराहीं तु प्रवक्ष्यामि महिषोपरि संस्थिता । वराहसदृशी देवी घण्टाचामरधारिणी ॥
तसेच देवीपुराणातही वाराहीचे वाहन महिष असल्याचा उल्लेख आहे. मात्र हे वाहन महिष का हे सांगता येणार नाही.
6 Sep 2022 - 2:22 pm | सस्नेह
उत्तम लेख आणि रोचक माहिती.
एक भुलेश्वर सोडता इतर सर्व शिल्पे सुस्थितीत असल्याने मूर्तीच्या सौष्ठवाची पूर्ण कल्पना येते.
धन्यवाद
6 Sep 2022 - 2:36 pm | चावटमेला
नेहमीप्रमाणेच छान लेख. टोके कायगावची शिल्पे बरीच सुस्थितीत आहेत
6 Sep 2022 - 10:07 pm | प्रचेतस
कायगाव टोके येथील मंदिर पेशवेकालीन आहे, गद्रे यांनी बांधलेले आहे त्यामुळे ते खूपच सुस्स्थितीत आणि उत्तम मूर्तीलक्षणांनी युक्त आहे.
6 Sep 2022 - 2:46 pm | कर्नलतपस्वी
आतापर्यंत वेरुळच्या कितीक चकरा झाल्या, खजुराहो,झाशी येथील चौसष्ट योगिनी मंदिर,रामेश्वर मंदिरातील मोठी मोठी शिल्प बघीतले पण अभ्यास नाही त्यामुळेच या शिल्पांचे महत्त्व कधीच कळले नाही. मिपावर आपले लेख वाचताना या शिल्पांकडे कसे बघितले पाहिजे याची हळूहळू कल्पना येवू लागली आहे.
छायाचित्रातील लक्षणे पुरेशी स्पष्ट दिसत नसल्याने ही चूक होऊ शकते. इतर स्रोतातून अधिक माहिती मिळाल्यास स्वागतच आहे.
या समारोपाच्या वाक्यात आपले हम्बल व्यक्तीमत्व साफ दिसून येते. म्हणूनच मी आपल्या ला सर म्हणून संबोधित करतो.
धन्यवाद प्रचेतस सर.
7 Sep 2022 - 9:45 am | तुषार काळभोर
सहमत!!
6 Sep 2022 - 2:50 pm | सौंदाळा
उत्तम संग्रही ठेवण्यासारखा लेख.
सोप्या शब्दात आणि सुंदर फोटोंची उदाहरणे देऊन समजवले आहे.
6 Sep 2022 - 4:33 pm | MipaPremiYogesh
अप्रतिम , वाह वल्ली शेठ..मानलं तुमच्या अभ्यासाला
6 Sep 2022 - 4:46 pm | MipaPremiYogesh
कायगाव टोके कुठे आहे. मस्त मुर्त्या दिसत आहेत. आखीव रेखीव एकदम
6 Sep 2022 - 5:05 pm | मुक्त विहारि
वाखूसा...
6 Sep 2022 - 5:09 pm | विजुभाऊ
पाटेश्वर ला देखील सप्तमात्रुका आहेत.
माझ्या अज्ञानामुळे त्यांना दशावतारांची स्त्री रूपे असे समजलो होतो.
पाटेश्वरला दशावताराचे एक पॅनल आहे त्यात एकूण बारा मूर्ती आहेत. ( बलराम आणि महावीर यांना त्यात स्थान आहे )
6 Sep 2022 - 10:21 pm | प्रचेतस
पाटेश्वरला दशावतारांचे पॅनल नेमके कुठे आहे? मला हे पाहिल्याचे आठवत नाही. तिथे मातृकांचे तीन पट आहेत आणि एक नवग्रह पट आहे.
पाटेश्वर मातृकापट १- ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी
पाटेश्वर मातृकापट २ - माहेश्वरी, वैष्णवी, ब्राह्मी
पाटेश्वर अष्टमातृकापट
पाटेश्वर नवग्रह पट १- पहिला कमळे घेतलेला सूर्य, चौथा धनुष्य हाती घेतलेला शनी
पाटेश्वर नवग्रह पट २ - तिसरी मूर्ती अर्धे शरीर असलेल्या राहूची तर शेवटची सर्पमय शेपटी असलेली मूर्ती केतूची
6 Sep 2022 - 9:22 pm | बोका
नेहमीप्रमाणेच छान लेख. तुम्ही मला मुर्ती व मंदीरे पहायची नवी दॄष्टी दिलीत.
नुकतेच इंदोरचे म्युझियम पाहिले. काही फोटो देत आहे. बहुतेक सर्व शिल्पे मंदसोर जिल्ह्यातील हिंगलाजगड येथील आहेत.
कुबेर - ईशान
.
अग्नी-इंन्द्र
.
यम - निर्ऋती
.
चामुंडा
6 Sep 2022 - 9:49 pm | Bhakti
+१११
6 Sep 2022 - 10:23 pm | प्रचेतस
खूपच सुरेख आणि सुस्पष्ट लक्षणांनी युक्त मूर्ती आहेत या.
6 Sep 2022 - 9:32 pm | ब़जरबट्टू
आतापर्यन्त या सर्वाकडे फक्त शिल्प म्हणुन बघत होतो.. आता प्रचेतस यान्च्या लेखामु़ळे बरेच बारकावे बघता येतील..
आपल्या अभ्यासाला व व्यासन्गाला सलाम !
6 Sep 2022 - 10:26 pm | मदनबाण
उत्तम प्रकारचे अत्यंत माहितीपूर्ण लिखाण !
मी आधी एका प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे मला कुबेरा बद्धल तुझ्याकडे अधिक माहिती असल्यास हवी आहे. विशेषतः त्याला प्रसन्न करण्यासाठी पुराणात काय उपाय इं सांगितले आहेत का ? :)
यक्षराज असल्याने त्याचे वेगळे असे काही गुणधर्म आहेत का ? [ त्याच्या आधीच्या जन्माची कथा रोचक आहे. ] देवांचा ट्रेझरर असलेल्या आणि लग्नासाठी तिरुपतीच्या बालाजीला देखील कर्ज देणारा [ बालाजी अजुनही त्याचे कर्ज फेडत आहे असे म्हंटले जाते.] या धनधान्याधीपतीला जो मुळात सुवर्णलंकापती आणि पुष्पक विमानाचा मालक होता त्याला विशेष काय प्रिय आहे ? [ फळ,फुल,आहार, आवडता पदार्थ, जसे गणपतीला मोदक विशेष प्रिय. ] हे जाणुन घ्यायला आवडेल.
काही कुबेर मूर्तीं मध्ये एका हातात धनाची पिशवी तर दुसर्या हातात लाडू / वाटी ? सदृष्य वस्तू असते ती काय असते? वरती दिलेल्या एका फोटोत एका हातात माळ आहे, ती कशाची आहे ? बौद्धांमध्ये तो जंभाल होतो [ यात मुंगुसाच्या मुखातुन रत्न /धन बाहेर पडताना दिसते ] तर मग हातात झेंडा असलेला आणि सिंहावर बसलेला वैश्रवणा नक्की कोण ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nila Athu Vaanathumele... :- Nayakan (1987)
7 Sep 2022 - 10:05 am | प्रचेतस
हे मी खरेच नाही सांगू शकणार. मी फक्त मूर्तीशास्त्राच्या दृष्टीकोनातून कुबेराकडे पाहिले आहे.
शिल्परत्नात कुबेराचे वर्णन असे आहे.
नरयुक्तविमानस्थं गदापाणि वरप्रदम |
महोदरं महाबाहुं गौरवर्णं मनोहरम् ||
तर रूपमंडनात पुढिलप्रकारे वर्णन आहे.
गदानिधीबीजपूरकमण्डलुधरः करै|
गजारुढ: प्रकर्तव्य: सौम्ययो: नरवाहनः ||
त्याला ब्रह्माने यक्षांचा अधिपती केलं अशी एक कथा आहे. यक्षांचे गुणधर्म म्हणजे स्थूल शरीर, पुढे आलेले पोट ही प्रमुख लक्षणे आहेत. एका ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे कुबेराचा रंग सोनेरी पिवळा तर दुसर्या एका ग्रंथातील वर्णनानुसार तांबडा आहे.
कुबेराच्या हाती बर्याच वेळा बीजापूरक दिसते. मूर्तीशास्त्राप्रमाणे त्याला डाळिंब प्रिय आहे. हातात कमळ देखील असतात.
रत्नपात्र आणि बीजापूरक असते.
त्याला अक्षमाला किंवा जपमाला असेच म्हणतात. नेहमीच्या जपमालेसारखीच ही माळ
रामायणातील कथेनुसार पुलत्स्य ऋषींचा पुत्र विश्रवा, ह्या विश्रव्याला जो मुलगा झाला तो कुबेर. विश्रव्यापासून जन्म झाला म्हणूनच त्याला वैश्रवण म्हणतात.
7 Sep 2022 - 6:57 pm | मदनबाण
वल्ली माहिती दिल्या बद्धल धन्यावाद !
मूर्तीशास्त्राप्रमाणे त्याला डाळिंब प्रिय आहे.
रोचक माहिती. :)
पुलत्स्य ऋषींचा पुत्र विश्रवा, ह्या विश्रव्याला जो मुलगा झाला तो कुबेर. विश्रव्यापासून जन्म झाला म्हणूनच त्याला वैश्रवण म्हणतात.
ह्म्म्म, जंभाल आणि वैश्रवण यांची तिबेटीयन / बौद्ध चित्रे पाहिल्यावर माझा गोंधळ उडाला होता / आहे, कारण दिसायला जवळपास दोघेही सारखेच दिसतात फक्त हातातला झेंडा आणि सिंह वाहन याचाच फरक आहे. अजुन एक फरक माझ्या लक्षात आला तो म्हणजे बसण्याची मुद्रा [ बसलेल्या वैश्रवण चा डावा पाया थोडासा पुढे ठेवुन असतो, पण जंभाल मात्र त्याचा उजवा पाय पुढे करुन बसतो. ] तिबेटीयन / बौद्ध परंपरेत बहुतेक हे दोघे वेगळे असावेत... यावर अधिक शोध घ्यायला हवा मला.
वैश्रवण
जंभाल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou
7 Sep 2022 - 7:00 pm | मदनबाण
[ बसलेल्या वैश्रवण चा डावा पाया थोडासा पुढे ठेवुन असतो, पण जंभाल मात्र त्याचा उजवा पाय पुढे करुन बसतो. ]
हे बसलेल्या जंभाल त्याचा उजवा पाय पुढे करुन बसतो. तर वैश्रवण चा उजवा पाया थोडासा पुढे ठेवुन असतो. असे वाचावे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou
7 Sep 2022 - 7:04 pm | मदनबाण
च्यामारी माझ्या लिहण्यात किती गडबड ! :)))
बसलेला वैश्रवण त्याचा डावा आणि जंभाल त्याचा उजवा पाय पुढे करुन बसलेल्या मुद्रेत दिसतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou
7 Sep 2022 - 7:03 pm | प्रचेतस
बौद्ध मूर्तीशास्त्रात कुबेराच्या मूर्तीत थोडा फरक , बाकी इतर लक्षणे बरीचशी सारखीच आहेत. अर्थात कुबेर आधी हिंदू परंपरेत आला आणि नंतर बौद्धांनी पण त्याला आपलेसे केले. कुबेरास यक्षांचा अधिपती मानत असल्याने कुबेराचे मूळही परकीय असावे असा एक तर्क आहे पण त्याला काहीही आधार नाही. धनद अर्थात धन देणारा हेही कुबेराचे अजून एक नाव आहे हे मी वर लेखात लिहायचे विसरलो.
7 Sep 2022 - 7:09 pm | मदनबाण
ओक्के.
इथे प्रतिसाद देत असताना दुसरीकडे युट्युवर शोध घेत होतो तेव्हा जी माहिती उपयुक्त दिसली ती देऊन ठेवतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou
7 Sep 2022 - 7:05 pm | प्रचेतस
वरील चित्रांपैकी पहिल्या चित्रात मुंगूस दिसतोय तर त्याखालील चित्रात हातात बीजापूरक आहे.
7 Sep 2022 - 7:11 pm | मदनबाण
होय... बीजापूरक काय असते ? [ मी उगाच सोललेल डाळिंब असेल काय ? असा विचार करत होतो ! :))) ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou
7 Sep 2022 - 7:17 pm | प्रचेतस
बीजापूरक म्हणजे म्हाळुंग्यासदृश एक फळ, असंख्य लहान लहान बियांपासून बनलेले, बेरीसारखे. सीताफळ, डाळिंबे ही एक प्रकारची बीजापूरकेच म्हणता यावीत.
मातृकांपैकी कौमारीच्या हातात बीजापूरक असते जे प्रजनन शक्तीचे प्रतीक असते ते कुबेराच्या हातातील बीजापूरक वर्धिष्णू होत असलेल्या संपत्तीचे प्रतीक असते.
7 Sep 2022 - 7:29 pm | मदनबाण
_/\_
तुला इतके प्रश्न विचारुन कष्ट दिले, कारण मला माहित आहे की तुच समर्पक माहिती देऊ शकतोस.आता अधिक काही विचारना करण्या सारखे उरले नाही. :)
म्हाळुंग फळ हे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या उजव्या हातात वरील बाजूस असते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou
6 Sep 2022 - 10:52 pm | पुंबा
काय लेखन! काय फोटोज! काय शैली! ओक्केमध्ये हायी एकदम.
7 Sep 2022 - 9:56 am | ज्ञानोबाचे पैजार
वाखुसा,
वल्लीदांचे लेख हे पुन्हापुन्हा वाचावे असेच असतात,
पैजारबुवा,
7 Sep 2022 - 1:33 pm | नचिकेत जवखेडकर
उत्तम अभ्यासपूर्ण लेख. अर्थात तुम्हाला असे म्हणणे अगदीच बाळबोधपणाचे दिसेल पण तरीही :)
7 Sep 2022 - 8:49 pm | सुक्या
आधी अशा मंदीरांना भेट देताना त्याचा लांबुन फोटो घेउन त्याच्या भव्यतेने अचंबीत होत होतो. आता तुमचे लेख वाचायला लागल्यापासुन जवळुन निरखु लागलो आहे. आधी भव्यतेने अचंबीत होत होतो आता त्या कोरीव कामातल्या बारीक बारीक तपशीलाने अचंबीत होतो.
लेखा बद्दल खुप धन्यवाद. एखादे पुस्तक लिहायचे मनावर घ्या.
21 Sep 2022 - 5:35 pm | श्वेता व्यास
शिल्पे कशी पहावीत याबद्दल बरीच नवीन माहिती मिळाली. लेखाबद्दल धन्यवाद.
22 Sep 2022 - 11:42 am | श्वेता२४
समजावलेत. बऱ्याच नव्या गोष्टी कळल्या. आता यापुढे शिल्पे पाहत असताना याचा उपयोग होईल.
22 Sep 2022 - 12:26 pm | नागनिका
वैदिक कालखंडानंतर इंद्र वरुणादि देवतांचा प्रभाव नेमका कधी आणि का कमी झाला असेल ?
22 Sep 2022 - 1:05 pm | प्रचेतस
जैन, बौद्ध धर्माच्या उदयाच्या आसपासच भागवत धर्माचा उदयही झाला आणि वैदिक देवतांचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला. बौद्धांचा यज्ञसंस्थेला विरोध होता, साहजिकच ह्या वैदिक यज्ञीय देवतांचे महत्व कमी होऊ लागले.. नाणेघाटातील इसपू २०० च्या आसपासच्या प्रतिमालेखात इंद्र, यम, कुबेर, वरुणादिकांना वंदन आहे, यातच वासुदेव आणि संकर्षणालाही वंदन केलेले आहे. या लेखातच वैदिक देवतांचा र्हास आणि भागवत धर्माचा उदय स्पष्ट दिसतो. सूर्याचे महत्व कमी होऊन त्याची जागा दुय्यम असलेल्या विष्णूने घेतली. महाभारतात इंद्रपूजेला विरोध करणार्या गोवर्धन गिरिधारी कृष्णाचे रूप तर प्रसिद्धच आहे. इसवी सनानंतर तर ह्या इंद्र, ब्रह्मा वगैरे देवतांची पूजा जवळपास संपल्यातच जमा झाकी. तर वरुण, कुबेरादी लोकपाल फक्त दिक्पालांच्या रूपातच अवशिष्ट राहिलेले दिसून येतात.