पापा की परी

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
5 Aug 2022 - 2:03 pm

पापा कि परी
गोष्ट अगदी अलीकडली. अगदी ८१ सालातली असेल. कोकणातील गुहागर तालुक्यातील एक छोटंसं खेडं .गुहागर हुन ४/५ किमी आरे गावचा फाटा आणि त्याही पुढे दीड एक किलोमीटर खोतांच घर. अगदी आजही जिथे दिवसातून एखादीच एस टी जाते. एक घर या इथे तर दुसरं घर कमीत कमी अर्धा किमी मागे/पुढे. आसपास काय ती नारळी पोफळीची वाडी. आजही पाटाचं पाणी इथे वाहतं. वीज केव्हा असते केव्हा नाही. मोबाईल च्या रेंजची तीच कथा. रिंग गेली तरी कॉल पूर्ण होईल याची शाश्वती नाही. इथल्या खोतांच्या घरी जन्माला आल्या दोन पऱ्या. मोठी प्राजक्ता तर दुसरी मुग्धा. आई बाबांच्या लाडक्या. तेव्हा सुद्धा दोन्ही मुलीचं का ? म्हणून लोकांनी विचारलं. पण खोतांच दोन्ही मुलींवर जीवापाड प्रेम होत. आरे गावातल्याच मराठी शाळेत दोघी शिकत होत्या. पुढे हायस्कुलसाठी गुहागर तालुक्यात एस टी ने ये जा करीत. तेव्हासुद्धा घरातून मुख्य रस्त्यावर चालत येत तेव्हा कुठे एस टी मिळे. घरात सगळं भरभरून असलं तरी खोतीचा माज कधीच नव्हता. उलट गावात अडल्या नडल्याला मदत करायला खोत कायम तयार असत. त्यामुळे भरपूर माणसं जोडून ठेवली होती. मुलींना घरात न बसवता शहरात पाठवून चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं.

यथावकाश मुलींची लग्न झाली. त्यांना मुलं झाली. दोघे आईवडील आता एकटे पडले. पण तरीही रोजची शेतीची, बागेची काम होतीच. गडीमाणस अवतीभोवती होती. माहेरपणाला मुंबईहून येणाऱ्या मुली चांगल्या महिनाभर राहायच्या. आई बाबांना आणि नाळ जोडलेल्या गावाला मनसोक्त भेटायच्या. शहरात शहरी तर गावात गावकरी बनून राहायच्या.आई बाबांच्या आजारपणात तर यायच्याच धावून.

अचानक खोतांच्या छातीत दुखायला लागल्याचं निमित्त झालं. शहरातल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. मुली - जावई तातडीने धावून आले. दोन दिवसांचं आजारपण आणि खोत जग सोडून गेले. जवळचे सगळे नातेवाईक आसपास होते. मुलींना आणि त्यांच्या आईला धीर देत होते. घरी कळवल्यावर घरच्या गड्याने आणि शेजाऱ्यांनी पुढची तयारी करायला घेतली. हॉस्पिटल मधून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून खोतांना घरी आणलं. पुढचे विधी करण्याची चर्चा सुरु झाल्यावर मोठी प्राजक्ता पुढे झाली. "बाबांचे अंत्यसंस्कार मी करणार " ठामपणे म्हणाली. कोकणातल्या एका छोट्याश्या खेड्यात एखादी मुलगी ठामपणे आपले म्हणणे मांडते हीच मोठी गोष्ट होती. गुरुजींनी होकार दिल्यावर पुढचे विधी सुरु झाले. तिथे उपस्थितांमध्ये चर्चा सुरु झाली. पण मुली किंवा आई कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. इतर पुरुषांबरोबर ती एकटी कशी जाणार म्हणून मी आणि एक वहिनी बरोबर गेलो. स्मशानात जाण्याची नि ते विधी बघण्याची पहिलीच वेळ. आजकाल सगळ्याच सिनेमात आणि सिरीयल मध्ये सर्रास सगळं दाखवतात. पण हीच वेळ जेव्हा आपल्या प्रियजनावर येते तेव्हा खरंच कठीण असत. माझ्यापेक्षा थोडीशी मोठी माझी बहीण हे सगळं करताना पाहून अंगावर काटा येत होता. चितेवर त्या माणसाला ठेवणं, त्याभोवती प्रदक्षिणा घालणं आणि सगळंच खूपच शहारे आणणारं होत. डोळ्यातून अश्रू न गाळता ती हे सगळं करीत होती. सुदैवाने पाऊस अजिबात नव्हता. काकांना त्यांच्याच जागेत अग्नी दिला जावा हि इच्छा त्यांनी बऱ्याच आधी बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे गड्याने आयत्यावेळी जागा साफसूफ केली होती. तरीही खाली काटेकुटे, काही झाडांची बारीक खोडं, मुंगळे असं काही ना होतंच. चितेला प्रदक्षिणा घालताना तिच्या पायाला ते सगळं टोचतंय याची जाणीव सारखी मनाला होत होती. चितेला अग्नी दिला मात्र एवढा वेळ आवरून धरलेला धीर सुटून ती मनसोक्त रडली. तिला जवळ घेऊन आम्ही देखील रडलो. सगळं दृश्य बघताना वारंवार मन भरून येत होत. डोळे पाझरत होते. स्मशातला हा पहिला अनुभव विदारक असाच होता.

दहा मिनिटे थांबून तिला घेऊन आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर इतर बायकांनी तिला थोडं पाणी पाजलं, थोडं शांत केलं. थोड्याच वेळात ती सावरली. धाकटी सुद्धा सावरली. परत निघालेल्या लोकांना निरोप देत होत्या. आता आईला सावरायची मोठी जबाबदारी अंगावर होती. ज्या धीराने दोघी या प्रसंगाला सामोऱ्या गेल्या त्याच धीराने त्या आईला सावरतील याची खात्री आहे. आम्हीही आहोतच जवळ. तरीही कौतुकाच्या, लाडाच्या मुली अगदी पापा कि परी असलेली मुलगी जेव्हा धीराने असं काही करते तेव्हा इतरांना हि बळ मिळतं.

कदाचित काहींना वाटेल त्यात काय मोठं ? आजकाल बऱ्याच मुली करतात. पण शहरात हे मुलीने वडिलांना अग्नी देणं आणि एका छोट्याश्या खेड्यात हि घटना घडणं हि खूप मोठी गोष्ट आहे. गावातल्या कितीतरी लोकांना हे पसंत पडणं कठीण आहे. अगदी आमच्याच नातेवाईकांमध्ये "काय गरज आहे ?" म्हणणारे होते. यांच्याकडे चाललं, आमच्याकडे हे नाही चालायचं असंही कुणी म्हटलं. अश्या वेळी ठामपणे आपल्याला पाहिजे ते करणं आणि बाकीच्यांकडून करून घेणं सोपं नक्कीच नाही. कारण जर भटजींनी नकार दिला असता तर ? इतर लोकांनी मदत करायला नकार दिला असता तर ? पण त्याही लोकांना समजावणं आणि त्याप्रमाणे करून घेणं, एकीकडे स्वतःला आणि आईला सांभाळणं हे खरंच आव्हानात्मक आहे. आणि या बाबांच्या लाडक्या लेकीने ते करून दाखवलं. अभिमान आहे अश्या बहिणीचा. पापा की परी म्हणून बऱ्याच वेळा मुलींना हिणवलं जात पण त्याच मुली आपल्या बापासाठी काहीही करू शकतात हे प्राजक्ताने आज दाखवून दिलं.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

ठाम रहाणे कधीही महत्वाचे.

व ते संस्कारांवर खूप अवलंबून असते.

कानडाऊ योगेशु's picture

5 Aug 2022 - 6:31 pm | कानडाऊ योगेशु

ह्रद्य अनुभव आहे. प्राजक्ता ताईंच्या हिमतीस सलाम.

प्रसाद गोडबोले's picture

6 Aug 2022 - 12:35 am | प्रसाद गोडबोले

उगाचच ओढुन ताणुन आव आणुन लिहिलंय असं वाटतं .

समाजाने धर्माने काहीतरी घालुन दिलेले नियम असतात , ते तोडले की आपण खुप काही मोठ्ठं केले असे वाटण्याचे एक विशिष्ठ वय असतं. आम्हालाही घरी नॉनव्हेज मधला न उच्चारायची सोय नव्हती , पहिल्यांदा जेंव्हा चायनीजच्या गाड्यावर मित्राने जबरदस्तीने चिकन लॉलिपॉप खायला घातले अन नंतर स्वतःहुन चवीने खायला शिकवले तेव्हा अगदी खुप काही ग्रेट केल्याचा फील आम्हालाही आला होता. =))))
पण आता काही खास वाटतं नाही, रादर , काहीकाही नियम तोडण्यातुन मिळालेला क्षणभंगुर आनंद हा क्षणभंगुर असतो. हे कळुन चुकले आहे. नियम पाळण्यात जास्त समाधान असते.

आणि पापा की परी असे केवळ त्याच मुलींना हिणावले जाते ज्यांचे स्वकर्तृत्व शुन्य असते अन लग्नाआधी बापाच्या जीवावर (अन लग्नानंतर नवर्‍याच्या) सुखनैव आयुष्य व्यतीत करणे हा ज्यांच्या नियम असतो. अन त्यातही विषेष करुन ट्रॅफिकचे अन सिग्नलचे नियम न पाळता गाडी चालवणार्‍या अन वरुन माज दाखवणार्‍या पोरींना पापा की परी म्हणतात ! आता ह्या प्राजक्ताने पापा च्या चितेला अग्नी दिला , देवु दे बापडे , वैयक्तिक गोष्ट आहे , आजाद देश आहे करायचे ते करु दे , अगदी क्षौर करुन पिंडदान वगैरेही करु दे कोणाचीही काहीच हरकत नाही ,
पण उद्या उजवीकडेला जायचा सिग्नल दिला अन डावीकडे गाडी वळवली तर तिला तिला जग पापा की परी असेच म्हणणार ! ब्रेक दाबुन गाडी थांबवायची सोडुन विमानाचे लँडिंग गेयर जसे बाहेर येतात तसे भस्स्सकन अ‍ॅ़टीव्हा वरुन पाय काढुन गाडी थांबवली तर जग पापा की परी म्हणुनच हिणावणार !

असो .

भृशुंडी's picture

11 Aug 2022 - 4:45 am | भृशुंडी

सवर्ण पुरुषांना बहुतेक वेळा privilege ह्या शब्दाचा अर्थ कितीही सांगितला तरीही उमजत नाही.
आपला प्रतिसाद हे ह्याचं चपखल उदाहरण आहे.

प्रसाद गोडबोले's picture

11 Aug 2022 - 2:18 pm | प्रसाद गोडबोले

privilege

चितेला अग्नी देणे हे प्रिव्हिलेज आहे का तुमच्या लेखी =)))) आणि तसे असेल तर मग क्षौर करुन पिंडदान करणे हेही प्रिव्हिलेज नाही का ?

खरंच अवघड आहे .

भृशुंडी's picture

11 Aug 2022 - 9:04 pm | भृशुंडी

आपल्या ह्या प्रतिसादाने माझा मुद्दा अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद.

प्रिविलेज काय आहे, ह्याचाच अंदाज नसणे - हे सवर्ण पुरूषांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. हा प्रतिसाद तुम्हाला एक व्यक्ती म्हणून नाही- तर आपल्यात जो एक inherent bias असतो त्याला उद्देशून आहे.
कित्येक गोष्टी सवर्ण पुरुषांना इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्यासाठी इतर कुणाला (स्त्रिया किंवा पुरूष) कष्ट करावे लागत असतील, लोकांचा रोष पत्करावा लागत असेल; अनेकदा त्यासाठी अपमान आणि प्रसंगी त्याहून अधिक स्वरूपाची शिक्षा भोगावी लागत असेल - हे लक्षातही येत नाही.

चितेला अग्नी देणे हे प्रिव्हिलेज आहे का तुमच्या लेखी

सगळ्यांसोबत जेवायला मिळणे हे प्रिविलेज आहे.
घरात शिजलेला चांगलाचुंगला पदार्थ पहिल्यांदा ताटात येणे हे प्रिविलेज आहे.
न सांगता कोणीतरी हातात चहाचा कप आयुष्यात एक्दा तरी आणून देणे हे प्रिविलेज आहे.
आपल्याला काहीच कळत नाही, असं इतरांनी न ठरवता आपल्याला बोलायला देणे हे प्रिविलेज आहे.
अशी अनेक. असो.

प्रसाद गोडबोले's picture

12 Aug 2022 - 11:31 am | प्रसाद गोडबोले

चितेला अग्नी देणे हे प्रिव्हिलेज आहे का तुमच्या लेखी

ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. तुमचे उत्तर होय असेल तर तुम्हाला जेव्हां केव्हा हे प्रिव्हिलेज लाभेल त्याचा जरुर आनंद घ्या ! आणि चितेला अग्नी देण्या आगोदर बोंबलण्याचा एक विधी असतो त्याचा मनसोक्त आनंद लुटा !!

बाकी बाष्कळ विधानांना पास.

भृशुंडी's picture

29 Aug 2022 - 9:57 am | भृशुंडी

आपण पूर्वी गिरीजा ह्या नावाने एक स्त्री म्हणून मिपा. वर वावरायचात हे मला ठाऊक नव्हतं, तेव्हा तुम्हाला benefit of doubt देतो आहे.
I take back my comments because you don't represent any males - supposedly.
Peace out \_/

सतिश गावडे's picture

11 Aug 2022 - 3:16 pm | सतिश गावडे

तुम्ही हा प्रतिसाद "मार्कस ऑरेलियस" या आयडीच्या लेखनातून, प्रतिसादातून या आयडीमागील व्यक्तीच्या सामाजिक स्तराचा जो अंदाज येतो केवळ त्यावर आधारीत दिला आहे असे वाटते.

नसेल पटत तर "मार्कस ऑरेलियस" यांचे तुमच्या या प्रतिसादानंतरचे प्रतिसाद वाचून बघा. एखाद्या विदा बिंदूवर काढलेला निष्कर्ष धाडसी असतो.

भृशुंडी's picture

11 Aug 2022 - 9:06 pm | भृशुंडी

वैयक्तिक नाही.
पण वर म्हटल्याप्रमाणे inherent bias डोकावला त्या प्रतिसादाला उत्तर आहे - अर्थात व्यक्तीशः त्यांची बाकी मतं गर्हणीय असावीत किंवा नसावीत - पण त्याचा ह्या प्रतिसादाशी संबंध नाही.

सतिश गावडे's picture

11 Aug 2022 - 10:12 pm | सतिश गावडे

मग हरकत नाही. :)

वामन देशमुख's picture

11 Aug 2022 - 10:40 pm | वामन देशमुख

सवर्ण पुरुषांना बहुतेक वेळा privilege ह्या शब्दाचा अर्थ कितीही सांगितला तरीही उमजत नाही.

  • यात सवर्ण पुरुषांचा काय विशेष संबंध आहे हे सांगाल का?
  • अवर्ण पुरुषांना काही वेगळे privileges असतात असे सुचवायचे आहे का?
  • सवर्ण / अवर्ण याचा सदर धागा विषयाशी काही संबंध आहे का?
  • अवर्ण असा शब्द आहे का याची मला कल्पना नाही. In fact, सद्य काळात, किमान मिपाच्या परिप्रेक्ष्यात तरी, सवर्ण म्हणजे देखिल नेमके काय याचीही नक्की कल्पना नाही. तेही समजावून सांगाल का?
भृशुंडी's picture

12 Aug 2022 - 12:58 am | भृशुंडी

विकीवर दिलेला अर्थ मलाही अभीप्रेत आहे, आणि तो सर्वमान्य असावा असं दिसतं.

सवर्ण ही उच्च जातीच्या हिंदू व्यक्तींसाठी वापरली गेलेली संज्ञा आहे. सवर्ण म्हणजे उच्च वर्ण. हिंदू धर्मातील ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णातील हिंदूंना सवर्ण संबोधले जाते - SC/ST सोडून सर्व

कौटुंबिक प्रतलात तरी सवर्ण पुरुष ही भारतीय समाजातील सर्वोच्च पातळी आहे. काही प्रमाणात सामाजिक प्रतलातसुध्दा - पण तिथे जातींची उतरंड आड येते.

सवर्ण पुरुषांना बरेचसे हक्क जन्मजात मिळतात जे दलित पुरुषांना एकतर कधीच मिळत नाहीत किंवा भयानक झगडून मिळवावे लागतात.
उ.दा - जातीशिवाय निव्वळ स्वकर्माने मिळालेली प्रतिष्ठा. त्यामुळे सवर्ण पुरुषांना बर्याचवेळा एखादी गोष्ट "privilege" आहे हे कळूच शकत नाही - त्यांच्या वैचारिक परिघात त्याला implicit स्थान नाही.

सवर्ण स्त्रियासुद्धा बर्याच गोष्टी झगडून मिळवतात किंवा अप्राप्य समजून त्याशिवायच रहातात (लेखात उल्लेखलेली बाब)

दलित पुरुष आणि स्त्रिया वेगळे privilege काय, काहीच privilege नसतात.

असो, लेखनसीमा.

वामन देशमुख's picture

12 Aug 2022 - 8:56 am | वामन देशमुख

जग कुठे चालले आहे आणि काही लोक अजूनही जातपात करत आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

12 Aug 2022 - 11:52 am | प्रसाद गोडबोले

जातपात

तीच तर मजा आहे.

धर्माने , समाजाने घालुन दिलेले संकेत धुडकावणे हा वोक कल्चर अर्थात स्वयंघोषित पुरोगामी लोकांचा मुख्य अजेंडा आहे . चितेला अग्नी देणे हा एक भयंकर ट्रॉमॅटिक , दुखद अनुभव असतो , बायका बहुतांश संवेदनशील मनाच्या असल्याने त्यांनी हे करु नये असा साधासा संकेत आहे. तो धुडकावण्यात मजा . चितेला अग्नी देणे प्रिव्हिलेज वाटतंय ह्यांना =))))

अन मुद्द्याचा मुद्द्याने प्रतिवाद करता आला नाही की लगेच जातीवर घसरायचे . (मार्कस ऑरेलियस ह्या नावावरुन मी सवर्ण आहे हे ह्यांना कसे कळाले देव जाणे , बहुतेक अन्य धाग्यांवरील स्कोर सेटल करायला आले असावेत .)
माझ्या जातीवर घसरल्याने मला काहीही फरक पडत नाही. माझी जात काढलीच आहे तर सांगतो , कोणत्याही सुशिक्षित ब्राह्मणाला आता तरी ह्या असल्या बाष्कळ प्रकारांनी फरक पडत नाही. उद्या सर्व ब्राह्मणेतर समाजाने एकत्र येऊन निर्णय घेतला की -

आज पास्सुन चितेला अग्नी देणे हे प्रिव्हिलेज फक्त आणि फक्त बायकांना देण्यात येईल. सावडण्याच्या विधीला हाडे अन राख गोळा करणे , ती नदीत विसर्जन करणे, पुढे क्षौर करुन अर्थात टक्कल करुन पिंडदान करणे हे सर्व विधी आवर्जुन करावेत बायकांनी.

.

तरीही माझी त्याला काहीही हरकत नसेल . मुळातच हिंदु धर्म अन त्यातील परंपरा संकेत वाच्वण्याचा मक्ता बामणांनी कधीच सोडुन दिलाय किमान सुशिक्षित बामणांनी तरी नक्कीच !

चौकस२१२'s picture

11 Aug 2022 - 7:00 am | चौकस२१२

विचित्र प्रतिसाद ... या वरील कथेत ती मुल्गी फाजील लाडावलेली असे काही वाटले नाही ... आणि ओढून ताणून हि नाही

आई वडिलांचं मृत्यूनंतर त्यांना अग्नी देणे ( चिंता किंवा विद्युत दाहिनी ) त्या वातवरणात फक्त मुलांनीच जावे हा विचार हळू हळू का होईना बदलायला पाहिजे
ती प्रथा का पडली याचह्य मागे सामाजिक कारण असू शकेल म्हणजे तेथील वातवरण मुलीचं कोमल मनाला त्रासदायक होईल वैगरे .. पण एकूणच काळ म्हण्यापेक्षा विशेष करून भवतीची परिस्थिती बदलली आहे ( स्मशाने जास्त स्वच्छ असावीत ) तेव्हा असे निर्बंध कमी झाले पाहिजेत .

रूढी परंपरांना उगाच कारण नसताना फेकून द्व्यावे असे मी म्हणत नाही पण त्यामागे जर काही शास्त्रीय कारण नसेल ( किंवा असले तरी ते कोणी समजावून देत नसेल आणि "परंपरा आहे म्हणून मान्लेच पाहिजे " असे म्हणत असेल ) तर त्या आंधळेपणाने स्वीयकारल्या पाहिजेत असेही नाही ... बदल हा केला पाहिजे

हा प्रश्न "स्त्री ने मासिक पाळीच्या वेळेस" पूजा करू नये या बद्दल पण उदभवतो

- मूळ हि प्रथा पडली त्याला कारण साधे होते कि पूजा / सण असला कि घरातील काम वाढते आणि स्त्रीला शारिरिक श्रम पडू नयेत अश्यावेळी म्हणून
पण हा तर्क आधीच्या पिढीने कधी नीट समजवला नाही .. "आम्ही सांगतो म्हणून" अशी अरेरावी
आज काळ एवढया सोयी सुविदः वाढल्या आहेत आणि काम सोपे झाले आहे मग काय हरकत आहे ?

प्रसाद गोडबोले's picture

11 Aug 2022 - 2:41 pm | प्रसाद गोडबोले

विचित्र प्रतिसाद

काय विचित्र प्रतिसाद ? मी अगदी स्पष्ट शब्दात म्हणले आहे की पोरींना अंतिम संस्कार कारचे असतील , चितेला अग्नी देणे वगैरे कर्म करायची असतील तर कोणाचीही काहीही हरकत नाही. स्वतंत्र देश आहे , धर्मही लवचीक आहे , फ्लेक्झिबल आहे. तुम्हाला जे योग्य वाटते ते करा , कोणीही तुमच्या विरोधात फतवा काढणार नाहीये .

माझ्या लेखी हे सारे हास्यास्पद आहे . आम्ही हसायचं पण नाही का वोक कल्चरवाल्यांच्या चाळ्यांना ? हा अजब न्याय आहे ! तुम्हाला ५ हजार वर्षं जुन्या परंपरांमध्ये बदल करायचे , अन वाटेल ते नवीन प्रकार करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अन आम्हाला हसायचेही स्वातंत्र्य नाही ?

बाकी हे सारं खुप कन्फ्युजिंग आहे. काही जवळच्या लोकांच्या अंतिम संस्काराच्यावेळी उपस्थित राहण्याचा योग आला असल्याने सर्व विधी जवळुन पाहिली आहेत . त्यात प्रिव्हिलेज असं काही नसतं . भक्क निराशाजनक स्मशानवैराग्य आणणारा प्रकार असतो तो . ट्रॉमॅटिक अनुभव असतो तो. ज्या मुलींना हे प्रिव्हिलेज वाटत असेल त्यांनी जरुर करावे . अन मिपावर लेखही टाकावेत !

कपिलमुनी's picture

11 Aug 2022 - 8:31 pm | कपिलमुनी

तुम्हाला हे हास्यास्पद वाटते कोणला तुम्ही चू* वाटू शकता ..
कोणाला काय वाटावे याबद्दल सो मि वर स्वातंत्र्य आहे

प्रसाद गोडबोले's picture

12 Aug 2022 - 11:27 am | प्रसाद गोडबोले

तुम्हाला हे हास्यास्पद वाटते कोणला तुम्ही चू* वाटू शकता ..

माझी त्याला काहीच हरकत नाही ! तुम्हाला काय वाटावे हा संस्कार तुमच्या आईवडीलांनी , आजीआजोबांनी आणि काही प्रमाणात तुमच्या स्वतःच्या अनुभवातुन निर्माण झालेली मेंदुची प्रतिक्रिया आहे. आता तुम्हाला किंवा अन्य कोणाला "चु*" म्हणजे काय हे आईवडील संस्कार देत असतील तर देवो बापडे . मला काहीच हरकत नाही.

Bhakti's picture

12 Aug 2022 - 11:26 am | Bhakti

अंतिम संस्काराच्यावेळी उपस्थित राहण्याचा योग आला असल्याने सर्व विधी जवळुन पाहिली आहेत . त्यात प्रिव्हिलेज असं काही नसतं . भक्क निराशाजनक स्मशानवैराग्य आणणारा प्रकार असतो तो . ट्रॉमॅटिक अनुभव असतो तो.

सतिश गावडे's picture

11 Aug 2022 - 3:22 pm | सतिश गावडे

अशा बाबतीतही अगदी गाव खेड्यांकडेही सकारात्मक बाल होत आहेत ही चांगली गोष्ट आहे.
जाता जाता, समाजमाध्यमांवर "पापा की परी" हा शब्द प्रयोग घरच्यांच्या लाडाने बिघडलेली मुलगी अशा अर्थी केला जातो.

सतिश गावडे's picture

11 Aug 2022 - 3:26 pm | सतिश गावडे

*बदल

मुक्त विहारि's picture

11 Aug 2022 - 6:34 pm | मुक्त विहारि

मुलगा नसेल तर, मुलीने अशा बाबतीत पुढाकार घेतला तर काय हरकत आहे?

आमची सौ. पण एकुलती एकच आहे. बहिण-भाऊ कुणीच नाहीत. आमचे सासरे वारले तेंव्हा, मी तिला विचारले की, अग्नी देणार का? तिची तयारी होती. पण खूप वाद झाले. विशेषतः आमच्या सासू बाई , ह्या गोष्टीला तयार न्हवत्या. लोकं काय म्हणतील?

इकिकडे काही स्त्रीया कौटुंबिक आर्थिक जबाबदारी पार पाडतात तर दुसरीकडे नको त्या रूढी आणि परंपरा ....

जाऊ दे....

कपिलमुनी's picture

11 Aug 2022 - 8:34 pm | कपिलमुनी

एकुलती एक मुलगी असताना आमच्या घरात मुलीने अग्नी व इतर क्रियाकर्म केले होते..
आपले मिपाकर अतृप्त आत्मा यांनी पौरोहित्य केले .. गुरजी लई फॉरवर्ड विचारांचे आहेत

Bhakti's picture

12 Aug 2022 - 11:21 am | Bhakti

+१

Bhakti's picture

12 Aug 2022 - 11:21 am | Bhakti

+१

मुक्त विहारि's picture

12 Aug 2022 - 7:32 pm | मुक्त विहारि

गुरूजी प्रथे मागचे शास्त्र पाळतात ...

शास्त्रा मागे धावत नाहीत

वामन देशमुख's picture

11 Aug 2022 - 10:45 pm | वामन देशमुख

माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार, एखाद्या मुलीबद्धल, "पापा की परी" हा शब्दप्रयोग कौतुकाने केला जात नाही तर ती "बापाची लाडावलेली पोर" अश्या अर्थाने केला जातो. चुभूदेघे.

गामा पैलवान's picture

12 Aug 2022 - 10:54 pm | गामा पैलवान

मुक्तविहारी,

मुलगा नसेल तर, मुलीने अशा बाबतीत पुढाकार घेतला तर काय हरकत आहे?

मी ऐकलंय की स्त्रीने अंत्यसंस्कार केल्यास मृतास पुढील गती मिळण्यास अडचणी येतात. अंत्यसंस्कार करायला पुरुष अपत्य नसल्यास पुतण्या, भाचा, इत्यादि चालतात. ते ही उपलब्ध नसल्यास इतर पुरुषांनी केलेले चालतात. मात्र स्त्रियांनी करू नयेत ( अनुपयुक्त असल्याने ).

हिंदू धर्मात पूर्वी क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला मुलगा ही पद्धत होती. कोणी माणूस एखाद्या पुरुषास पैसे देऊन स्वत:च्या अंत्यसंस्कारांची सोय करू शकंत असे. सदर कथेतील नायिकेने तशी काही सोय बघायला हवी होती.

माझ्या मते तिने एखादे चांगले गुरुजी गाठून विमर्शन ( कन्सल्टेशन ) करावं. नंतर ते म्हणतील त्यानुरूप रीतसर श्राद्धकर्म करवून घ्यावं.

आ.न.,
-गा.पै.

धर्मराजमुटके's picture

12 Aug 2022 - 11:05 pm | धर्मराजमुटके

मी ऐकलंय की स्त्रीने अंत्यसंस्कार केल्यास मृतास पुढील गती मिळण्यास अडचणी येतात. अंत्यसंस्कार करायला पुरुष अपत्य नसल्यास पुतण्या, भाचा, इत्यादि चालतात. ते ही उपलब्ध नसल्यास इतर पुरुषांनी केलेले चालतात. मात्र स्त्रियांनी करू नयेत ( अनुपयुक्त असल्याने ).

असहमत!
मृतास पुढील गती देणे यमधर्माचे कामच आहे. त्याला त्यात कुचराई करुन चालत नाही. धर्म आणि त्याचे नियम यांना साक्षात यम देखील अपवाद करत नाही. शिवाय मनुष्य जिवंतपणी जी पाप-पुण्ययुक्त कामे करतो त्यांचा हिशेब थांबविता येत नाही.

हिंदू धर्मात पूर्वी क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला मुलगा ही पद्धत होती. कोणी माणूस एखाद्या पुरुषास पैसे देऊन स्वत:च्या अंत्यसंस्कारांची सोय करू शकंत असे. सदर कथेतील नायिकेने तशी काही सोय बघायला हवी होती.

विकतचा पुत्र चालतो मात्र पोटची मुलगी अंत्यसंस्कार करायला चालत नाही म्हणजे अगदी काहीच्या काही समजूती आहेत. हे म्हणजे घरातले शुद्ध सात्विक जेवण चालणार नाही पण रस्त्यावर गटारीच्या कडेला वडापाव चालेल असे झाले.

गामा पैलवान's picture

12 Aug 2022 - 11:15 pm | गामा पैलवान

धर्मराजमुटके,

जर गती द्यायचं काम यमधर्माचं आहे, तर त्याने दिलेले नियम पाळायला हवेत ना. ते पाळायचे नसतील तर अंत्यसंस्कार करायचेच कशाला? सरळ भडाग्नी द्यायचा. मृत आणि यम काय ते पाहून घेतील.

आ.न.,
-गा.पै.

तर त्याने दिलेले नियम पाळायला हवेत ना.

कुठे दिलेत हे नियम ? तुम्ही तर फक्त मी अस ऐकलयं असं वाचून प्रतिसादाची सुरुवात केलीय. फक्त ऐकीव माहितीवर कसं मान्य करायचं ?

धर्मराजमुटके's picture

12 Aug 2022 - 11:21 pm | धर्मराजमुटके

मृत आणि यम काय ते पाहून घेतील.

अगदी बरोबर ! ते दोघेच ते बघून घेत असतात. बाकी सगळे आपण मागे राहिलेले आपल्या समाधानासाठी करतो.

गामा पैलवान's picture

13 Aug 2022 - 12:41 am | गामा पैलवान

धर्मराजमुटके,

कथानायिकेने तिच्या स्वत:च्या समाधानासाठी अंत्यसंस्कार केले म्हणता? मग स्त्रीपुरुष समानता वगैरे कुठनं आली? माझं म्हणणं असं की प्रत्येकाला पाहिजे ते करायचा अधिकार आहे. पण लोकं आपला वारसा पुढे चालवतील ही अपेक्षा नको. किंबहुना लोकांना फाट्यावर मारूनच मनाजोगतं करायला हवं. लेखिका म्हणते :

.... छोट्याश्या खेड्यात हि घटना घडणं हि खूप मोठी गोष्ट आहे.

कोणी मुलगी तिच्या स्वत:च्या मर्जीने काहीबाही करीत असेल तर ती मोठी गोष्ट वगैरे कशीकाय?

आ.न.,
-गा.पै.

रात्रीचे चांदणे's picture

13 Aug 2022 - 1:28 am | रात्रीचे चांदणे

खेड्यात एका स्त्रीनं अंत्यसंस्कार करणं ही खरचं मोठी गोष्ट आहे, कदाचित शहरांतही ही मोठीच गोष्ट असेल.

धर्मराजमुटके's picture

13 Aug 2022 - 10:40 am | धर्मराजमुटके

कथानायिकेने तिच्या स्वत:च्या समाधानासाठी अंत्यसंस्कार केले म्हणता? मग स्त्रीपुरुष समानता वगैरे कुठनं आली? माझं म्हणणं असं की प्रत्येकाला पाहिजे ते करायचा अधिकार आहे. पण लोकं आपला वारसा पुढे चालवतील ही अपेक्षा नको. किंबहुना लोकांना फाट्यावर मारूनच मनाजोगतं करायला हवं.

हो. बाबांचे अंत्यसंस्कार मी केले ही जाणिव कथानायिकेला समाधान देऊन गेली. पुर्ण कथा वाचली तर नक्कीच ते ल़क्षात येते. आता स्त्री पुरुष समानता वगैरे तुम्हीच आणली आहे. कथेत याचा कोठेही उल्लेख नाहिये. लोकांनी आपला वारसा पुढे चालवावा ही अपेक्षा देखील कोठेही व्यक्त केलेली नाहिये.

कोणी मुलगी तिच्या स्वत:च्या मर्जीने काहीबाही करीत असेल तर ती मोठी गोष्ट वगैरे कशीकाय?

हो नक्कीच. ती मोठी गोष्ट नक्कीच नाही. पण कथालेखिका शब्दांचे खेळ करण्यात तुमच्या इतकी तरबेज नाहिये याचा फायदा मी लेखिकेला देईन.

अवांतर : मुलींनी पालकांचे अंतिम संस्कार करणे ही महाराष्ट्रात (अगदी खेड्यांमधे देखील) नवीन आणि दुर्मिळ गोष्ट राहिलेली नाही हे मी स्वानुभावाने सांगू शकतो.

गामा पैलवान's picture

13 Aug 2022 - 12:51 pm | गामा पैलवान

धर्मराजमुटके,

१.

बाबांचे अंत्यसंस्कार मी केले ही जाणिव कथानायिकेला समाधान देऊन गेली.

हे समाधान वैध प्रकारेही मिळवता आलं असतं. मात्र नायिकेने निषिद्ध मार्ग पत्करायचं आपणहून ठरवलंय. जे माझ्या मते चुकीचं आहे. कारण की निषिद्ध मार्गाचा मृतास गती मिळण्यासाठी उपयोग नसतो.

२.

आता स्त्री पुरुष समानता वगैरे तुम्हीच आणली आहे. कथेत याचा कोठेही उल्लेख नाहिये.

मान्य. पण हा मुद्दा वगळला तर कथेत उरतंच काय? कथावस्तूमधनं काही बोध घ्यायचा का?

३.

कुठे दिलेत हे नियम ?

माझ्याकडे थेट संदर्भ नाही, पण शोधल्यास मिळून जावा. उदा. : गरुडपुराण वगैरे.

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

13 Aug 2022 - 2:46 pm | कपिलमुनी

कैच्या काय !
कोणे एके काळी आपल्या भारतात कणगी मध्ये घालून मृतदेह पुरायचे..
परत येऊ नये म्हणून घोट्यापासून पाय तोडून पुरलेले पुरावे आहेत ..

अजूनही हिंदू धर्मात अग्नी व्यतिरिक्त अनेक प्रकारे अंतिम संस्कार केले जातात ..

फक्त ब्राह्मणी रुढाचार म्हणजे समस्त हिंदू धर्म नाही

प्रचेतस's picture

13 Aug 2022 - 3:27 pm | प्रचेतस

अगदी.
डेक्कन कॉलेजातील प्रागैतिहासिक संग्रहालयातले हे ताम्रपाषाण युगातली ही बरीयल चेंबर्स पाहा.

IMG-20140725-124052604

IMG-20140725-124111048

गामा पैलवान's picture

13 Aug 2022 - 4:29 pm | गामा पैलवान

मुनिवर,

अहो, मुडदा पेटवणे हा ब्राह्मणी रुढाचार केव्हापासनं झाला ?

आ.न.,
-गा.पै.

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2022 - 5:25 pm | प्रसाद गोडबोले

रुढाचार नाही , प्रिव्हलेज प्रिव्हलेज =))))

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2022 - 5:50 pm | प्रसाद गोडबोले

अजूनही हिंदू धर्मात अग्नी व्यतिरिक्त अनेक प्रकारे अंतिम संस्कार केले जातात ..

त्यापैकी प्रकारात स्त्रीयां अंतिमसंस्कार करतात हे जरुर सांगा !!

फक्त ब्राह्मणी रुढाचार म्हणजे समस्त हिंदू धर्म नाही

चितेला अग्नी देणे हा ब्राह्मणी रुढाचार असे आपण म्हणालात ते एक बरे वाटले ! मला कळतच नाही की अन्य अनेक जातीतील लोकं ह्या ब्राह्मणी रुढाचाराचे अनुकरण का करतात ! मुळातच मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करुन व बौद्धधम्माचा स्वीकार करण्याचा राजमार्ग उपलब्ध असताना हिंदु धर्मात राहण्याचा अट्टहास का ?
बाकी बौध्द धर्मात अंतिम संस्कार कसा करतात माहीत नाही पण तिथे तो स्त्रीयांना करायचा अधिकार असेल असे गृहीत धरु , असे असताना लोकं बुरसटधर्मनियमांच्या हिंदुधर्माला का बरें चिकटुन बसलेत . लोकांचं सोडा , तुम्ही तर सुशिक्षित आहात , तुम्ही का बरे असल्या धर्मात राहता ?

वामन देशमुख's picture

13 Aug 2022 - 11:42 pm | वामन देशमुख

फक्त ब्राह्मणी रुढाचार म्हणजे समस्त हिंदू धर्म नाही

जग कुठे चालले आहे आणि काही लोक अजूनही जातपात करत आहेत.

फक्त ब्राह्मणी रुढाचार म्हणजे समस्त हिंदू धर्म नाही

मिपावर हे लिहिणे म्हणजे जातीयतेच्या खतपाणी घालणे नाही का होत? काय संपादक ?
उद्या जर असेच विधान इतर जातीचे नाव घालून केले तर ? चालेल ?

धर्मराजमुटके's picture

13 Aug 2022 - 7:25 pm | धर्मराजमुटके

हे समाधान वैध प्रकारेही मिळवता आलं असतं. मात्र नायिकेने निषिद्ध मार्ग पत्करायचं आपणहून ठरवलंय. जे माझ्या मते चुकीचं आहे. कारण की निषिद्ध मार्गाचा मृतास गती मिळण्यासाठी उपयोग नसतो.

नात्यातले पुरुष नसतील तर अगदी विकतचा पुत्र घेऊन अंत्येष्टी करायचे म्हणजे वैध मार्ग ? माणूस गेल्यावर त्याचा विधी कोणत्या मार्गाने गेला यावर त्याची गती ठरत नाही तर त्याने आयुष्यभर काय केले याने ठरत असते हे समजून घ्या. केवळ उत्तम प्रकारे विधी केल्यामुळे मृतास गती मिळाली असती तर आयुष्यभर पापकर्म करणार्‍यांनी उत्तम प्रकारे विधी करुन आपला मार्ग सुकर केला असता.

माझ्याकडे थेट संदर्भ नाही, पण शोधल्यास मिळून जावा. उदा. : गरुडपुराण वगैरे.
गरुड पुराणात मृत्युनंतर आत्माच्या प्रवास कसा होतो वगैरेवर भरपूर लिखाण आहे. पुत्राचे महत्व सांगीतले आहे. मात्र कोठेही स्त्रियांनी अंत्यसंस्कार करु नये असे स्पष्ट शब्दात लिहिलेले मला आढळले नाही.

प्रचेतस's picture

13 Aug 2022 - 8:03 pm | प्रचेतस

हल्लीचे अंत्यसंस्कार गरुड पुराणातील पद्धतीनुसार होतात मात्र शतपथ ब्राह्मण, आश्वलायन गुह्यसूत्रांत देखील अत्यंसंस्कारांचे स्वरूप वर्णिले आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यात पुत्र, पौत्र, जवळचा नातेवाईक इत्यादी पुरुषांनीच अंत्येष्टी करावी असे म्हणलेले आहे तरी स्त्रियांनी ही कर्मे करू नयेत असे कोठेही नि:संदिग्धपणे लिहिलेले नाहीये.
जाता जाता ऋग्वेदातील १० व्या मंडळातील १४ ते १८ क्रमांकाची सूत्रे ही अंत्येष्टीसूक्ते किंवा स्मशानसूक्ते म्हणून गणली जातात. जिज्ञासूंनी ती वाचून बघण्यास हरकत नाही.

असे कोठेही नि:संदिग्धपणे लिहिलेले नाहीये.

तसे तर "जेंट्स टॉयलेट मध्ये बाईमाणसांनी जाऊ नये" असेही कोठे नि:संदिग्धपणे लिहिलेले नसते . खास रुढाचार मोडायचा म्हणुन कोणा पापा की परीला जेंट्स टॉयलेट मध्ये जाता आम्ही तरी पाहिले नाहीये . ;)

सोत्रि's picture

14 Aug 2022 - 3:20 pm | सोत्रि

माणूस गेल्यावर त्याचा विधी कोणत्या मार्गाने गेला यावर त्याची गती ठरत नाही तर त्याने आयुष्यभर काय केले याने ठरत असते हे समजून घ्या. केवळ उत्तम प्रकारे विधी केल्यामुळे मृतास गती मिळाली असती तर आयुष्यभर पापकर्म करणार्‍यांनी उत्तम प्रकारे विधी करुन आपला मार्ग सुकर केला असता.

अगदी! सहमत!

- ('गती'शील) सोकाजी

सतिश गावडे's picture

14 Aug 2022 - 12:24 am | सतिश गावडे

reinc

धर्मराजमुटके's picture

14 Aug 2022 - 8:55 am | धर्मराजमुटके

रोचक आहे पण जल्ला या विषयात कसा बसवायचा ते कल्ला नाय !

गामा पैलवान's picture

14 Aug 2022 - 2:51 am | गामा पैलवान

धर्मराजमुटके,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

नात्यातले पुरुष नसतील तर अगदी विकतचा पुत्र घेऊन अंत्येष्टी करायचे म्हणजे वैध मार्ग ?

का नसावा? पूर्वीचे लोक विधिनिषेध पाळायचे. त्यामुळे क्रीत्पुत्र हा वैध मार्ग असू शकतो. प्रस्तुत कथेत इतर नातेवाईक मिळू शकले असते. ते ही वैध धरायला हवेत.

२.

माणूस गेल्यावर त्याचा विधी कोणत्या मार्गाने गेला यावर त्याची गती ठरत नाही तर त्याने आयुष्यभर काय केले याने ठरत असते हे समजून घ्या.

प्रस्तुत कथेच्या संदर्भात हे विषयांतर आहे.

३.

केवळ उत्तम प्रकारे विधी केल्यामुळे मृतास गती मिळाली असती तर आयुष्यभर पापकर्म करणार्‍यांनी उत्तम प्रकारे विधी करुन आपला मार्ग सुकर केला असता.

प्रस्तुत कथेच्या संदर्भात हे विषयांतर आहे.

असो.

हिमालयात कुठेशी तरी एक स्थान आहे. नाव आठवंत नाही. तिथे बायकांनी श्राद्ध केलेलं चालतं. माझी आई यात्रेसाठी गेली होती. तेव्हा वाटेत लागलं. तिने तिथे माझ्या वडिलांचं श्राद्ध केलं. मुलीने अंत्यसंस्कार केलेले चालतात असं कुठलं ठिकाण वा एखादा शास्त्राधार असेल तर मी तो मान्य करेन.

आ.न.,
-गा.पै.

धर्मराजमुटके's picture

14 Aug 2022 - 8:54 am | धर्मराजमुटके

पूर्वीचे लोक विधिनिषेध पाळायचे. त्यामुळे क्रीत्पुत्र हा वैध मार्ग असू शकतो. प्रस्तुत कथेत इतर नातेवाईक मिळू शकले असते. ते ही वैध धरायला हवेत.

मला वाटतं की तुम्हाला फक्त शुष्क वेदांती (किंवा इतरही चर्चा) करायला आवडतात. आजकाल नातेसंबंधात अनेक त्रांगडी असतात. भावाभावांचे वैर किंवा इतर अनेक कारणे असतात ज्यामुळे इतरांची मदत घ्यायला नको वाटते किंवा मदत मागीतली तरी मिळेल याची खात्री नसते. आयुष्यभर ज्यांचाशी भांडलो किंवा ज्यांच्याशी कोणताही संबंध ठेवला नाही त्यांच्या पाया पडून अंतिम संस्कार करुन घ्यावेत काय ? ज्याने अंतिम संस्कार करायचे त्याचे त्या व्यक्तीशी काहीतरी प्रमाणात तरी मन जुळलेले असावेत की नाही ? धर्ममार्तंडांनी माणसांच्या व्यावहारिक अडचणी समजून घ्यायच्या की 'क्रीत्पुत्रासारखे पैसा फेको तमाशा देखो' असे मनाला पटत नाही ते सल्ले रेटायचे यामुळेच माणसे धर्मापासून दुरावत चालली आहेत का याचाही विचार व्हावा. आपल्या लोकसंख्येतील एक मोठा टक्का हा स्त्रीवर्ग आहे. त्यांना धर्माच्या म्हणा किंवा इतर अनेक कारणास्तव बर्‍याचश्या गोष्टींपासून वंचित ठेवायचे मात्र प्रत्येक कार्यात त्यांचे श्रम घ्यायचे, त्यांना राबवून घ्यायचे हा शुद्ध दुटप्पीपणा झाला. काहीही मार्ग काढा पण स्त्रिला अंतेष्टी कार्य करता येणार नाही यावर ठाम रहा असे तुमचे मत असेल तर ते कसे बदलणार ? शिवाय आंतरजालावर चर्चा करुन कोणी आपली मते बदलली आहेत असे मला तरी वाटत नाही. (तुम्हाला एकट्यालाच कशाला दोष देऊ ? बरेचदा माझीदेखील मते बदलत नाही)
असो कितीही चर्चा झाली तरी तुमचे मत बदलेल असे वाटत नाही (नव्हे तर तशी खात्रीच झाली आहे). त्यामुळे इथेच थांबतो.


हिमालयात कुठेशी तरी एक स्थान आहे. नाव आठवंत नाही. तिथे बायकांनी श्राद्ध केलेलं चालतं. माझी आई यात्रेसाठी गेली होती. तेव्हा वाटेत लागलं. तिने तिथे माझ्या वडिलांचं श्राद्ध केलं. मुलीने अंत्यसंस्कार केलेले चालतात असं कुठलं ठिकाण वा एखादा शास्त्राधार असेल तर मी तो मान्य करेन.


तुम्हीच गरुड पुराणाचा संदर्भ दिला होता त्यावर वर चर्चेत मी व प्रचेतस यांनी उत्तर दिले आहे. मला वाटते ते पुरेसे असावे. याउपर अजून शास्त्राधार शोधायची माझी पात्रता नाही. धन्यवाद !

जेम्स वांड's picture

14 Aug 2022 - 9:22 am | जेम्स वांड

शिवाय आंतरजालावर चर्चा करुन कोणी आपली मते बदलली आहेत असे मला तरी वाटत नाही. (तुम्हाला एकट्यालाच कशाला दोष देऊ ? बरेचदा माझीदेखील मते बदलत नाही)

ज्ञानवृक्षाखली आपले स्वागत आहे ! LoL.

धर्मराजमुटके,

तुमचा वरील प्रतिसाद वाचला.

१.

मला वाटतं की तुम्हाला फक्त शुष्क वेदांती (किंवा इतरही चर्चा) करायला आवडतात

खरंय. भावना असाव्यात, मात्र बौद्धिक चर्चेत त्यांचा अडथला असू नये. असो. वेदांती चर्चा शुष्क असतात हे विधान वाचून गंमत वाटली.

२.

आजकाल नातेसंबंधात अनेक त्रांगडी असतात. भावाभावांचे वैर किंवा इतर अनेक कारणे असतात ज्यामुळे इतरांची मदत घ्यायला नको वाटते किंवा मदत मागीतली तरी मिळेल याची खात्री नसते. आयुष्यभर ज्यांचाशी भांडलो किंवा ज्यांच्याशी कोणताही संबंध ठेवला नाही त्यांच्या पाया पडून अंतिम संस्कार करुन घ्यावेत काय ? ज्याने अंतिम संस्कार करायचे त्याचे त्या व्यक्तीशी काहीतरी प्रमाणात तरी मन जुळलेले असावेत की नाही ?

तारतम्य वापरलं की ही समस्या सुटेल. नाहीतर क्रीतपुत्र आहेच.

बाकी, मरणान्ति वैराणि असं कोणीतरी कुठेतरी म्हंटलंय.

३.

धर्ममार्तंडांनी माणसांच्या व्यावहारिक अडचणी समजून घ्यायच्या की 'क्रीत्पुत्रासारखे पैसा फेको तमाशा देखो' असे मनाला पटत नाही ते सल्ले रेटायचे यामुळेच माणसे धर्मापासून दुरावत चालली आहेत का याचाही विचार व्हावा.

क्रीतपुत्र हा पैसे फेकून तमाशा बघण्याचा प्रकार नाही.

४.

आपल्या लोकसंख्येतील एक मोठा टक्का हा स्त्रीवर्ग आहे. त्यांना धर्माच्या म्हणा किंवा इतर अनेक कारणास्तव बर्‍याचश्या गोष्टींपासून वंचित ठेवायचे मात्र प्रत्येक कार्यात त्यांचे श्रम घ्यायचे, त्यांना राबवून घ्यायचे हा शुद्ध दुटप्पीपणा झाला.

आपल्या लोकसंख्येतील एक मोठा टक्का हा पुरुषवर्ग आहे. त्यांना धर्माच्या म्हणा किंवा इतर अनेक कारणास्तव प्रसूतीपासून वंचित ठेवायचे मात्र प्रसूतीच्या प्रत्येक कार्यात त्यांचे श्रम घ्यायचे, त्यांना राबवून घ्यायचे हा शुद्ध दुटप्पीपणा झाला.

५.

काहीही मार्ग काढा पण स्त्रिला अंतेष्टी कार्य करता येणार नाही यावर ठाम रहा असे तुमचे मत असेल तर ते कसे बदलणार ?

काहीही मार्ग काढा पण स्त्रिला अंतेष्टी कार्य करायला बसवाच यावर ठाम रहायचं असेल तर ते मत बदलण्यात मला बिलकूल रस नाही.

बाकी, शास्त्राधार वा जनरीत काढलीत तर मी माझं मत बदलेन.

६.

त्यामुळे इथेच थांबतो.

तुमच्या निर्णयाचा आदर आहे. मीही इथे थांबतो.

७.

याउपर अजून शास्त्राधार शोधायची माझी पात्रता नाही. धन्यवाद !

पण जाणकार लोकं शोधून काढू शकतात. अंत्यसंस्कार हे मृताच्या फायद्यासाठी केले जातात. त्यात इहलोकीच्या भावना आणणं चुकीचं आहे.

असो.

धाग्यावरच्या एकंदरीत चर्चेवरनं वाटतंय की बाईला पुरुषांसारखं बनवायचा चंग काहीजणांनी बांधलेला आहे.

आ.न.,
-गा.पै.

प्रमोद देर्देकर's picture

14 Aug 2022 - 3:00 pm | प्रमोद देर्देकर

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात अगदी तसेच यमही दिसत नाही.

तुमी लोक उगा कायले भांडून राहिले.
संत गाडगे महाराजांचे विचार लक्षात घ्याना मग सगळं कळेल.

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात अगदी तसेच यमही दिसत नाही.

मेल्यावर यम दिसेलच असे नसावे कदाचित. इथे एक मागच्या जन्माच्या गोष्टी आठवतात असा दावा करणार्‍या मुलाची मुलाखत आहे. (या मुलाने सांगितलेल्या पूर्वजन्माच्या आठवणींनूसार त्याच्या पूर्वजन्माच्या गावी आणि घरी जाऊन पडताळल्या आहेत असे त्याच्या घरच्यांचे म्हणणे आहे)

या मुलाखतीत मुलाखत घेणारी मुलगी मुलाला ४.१५ मिनिटाला विचारते की तू वर गेल्यानंतर तुला मिशीवाले यमराज दिसले का? मुलगा अ‍ॅहॅ म्हणून नकारार्थी मान हलवतो.

तुम्हाला ५ हजार वर्षं जुन्या परंपरांमध्ये बदल करायचे , अन वाटेल ते नवीन प्रकार करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य
वाटेल ते असे कुठे म्हणलय मी
माझे वाक्य वाचा ".....रूढी परंपरांना उगाच कारण नसताना फेकून द्व्यावे असे मी म्हणत नाही ..."

कोविडच्या तिसर्या लाटेत दुर्दैवाने वडीलांचे निधन झाले. निधनाच्या वेळी हॉस्पिटलमधे मी, पती, भाऊ व आई उपस्थित होतो. वडीलांना आमच्या ताब्यात दिले व तिथून आम्ही अंत्यविधीसाठी रवाना झालो. विद्युतदाहिनीचा वापर केल्यामुळे इतर विधी झाले नाहीत. दशक्रियाविधी इ. भावाने पार पाडले. मी व आई उपस्थित होतो.

गरज पडल्यास मी ही कार्ये नक्की पार पाडली असती. मला हा प्रिव्हीलेज वाटत नाही तर अत्यावश्यक गोष्ट वाटते.

स्मशानातले वातावरण नॉर्मल असणे शक्यच नाही. पण वडीलांचे इस्पितळातील शेवटचे तास माझ्यासाठी जास्त त्रासदायक होते.

पुरूषांनाही पहिल्यांदा स्मशानात गेल्यावर त्रास होत असेल. पण सामाजिक जबाबदारी म्हणून वारंवार जावे लागत असल्याने बोच कमी होत असेल.

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबे असताना नॅचरल ॲटॅचमेंट, वेळेवर उपलब्धता वगैरे गोष्टींमुळे भावाने किंवा पुतण्याने अंत्यसंस्कार करण्याचा रिवाज असावा. कुठल्याही परीस्थितीत मृत व्यक्तीवर प्रेम असणार्या व्यक्तीने श्रद्धापूर्वक अंत्यसंस्कार करणे जास्त योग्य ठरावे.

कोविडच्या तिसर्या लाटेत दुर्दैवाने वडीलांचे निधन झाले. निधनाच्या वेळी हॉस्पिटलमधे मी, पती, भाऊ व आई उपस्थित होतो. वडीलांना आमच्या ताब्यात दिले व तिथून आम्ही अंत्यविधीसाठी रवाना झालो. विद्युतदाहिनीचा वापर केल्यामुळे इतर विधी झाले नाहीत. दशक्रियाविधी इ. भावाने पार पाडले. मी व आई उपस्थित होतो.

गरज पडल्यास मी ही कार्ये नक्की पार पाडली असती. मला हा प्रिव्हीलेज वाटत नाही तर अत्यावश्यक गोष्ट वाटते.

स्मशानातले वातावरण नॉर्मल असणे शक्यच नाही. पण वडीलांचे इस्पितळातील शेवटचे तास माझ्यासाठी जास्त त्रासदायक होते.

पुरूषांनाही पहिल्यांदा स्मशानात गेल्यावर त्रास होत असेल. पण सामाजिक जबाबदारी म्हणून वारंवार जावे लागत असल्याने बोच कमी होत असेल.

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबे असताना नॅचरल ॲटॅचमेंट, वेळेवर उपलब्धता वगैरे गोष्टींमुळे भावाने किंवा पुतण्याने अंत्यसंस्कार करण्याचा रिवाज असावा. कुठल्याही परीस्थितीत मृत व्यक्तीवर प्रेम असणार्या व्यक्तीने श्रद्धापूर्वक अंत्यसंस्कार करणे जास्त योग्य ठरावे.

Nitin Palkar's picture

22 Aug 2022 - 6:58 pm | Nitin Palkar

१९८१ साली गुहागर सारख्या खेडेगावात एका मुलीने आपल्या वडलांना अग्नी देणे ही तशी विशेष बाब म्हणावी लागेल. लेखिकेला केवळ एवढच सांगायचे असावं. कोणताही अभिनिवेश न आणता, अतिशय तटस्थतेने लेखिकेने सर्व वर्णन केले आहे, पार्श्वभूमी लक्षात यावी म्हणून पापा की परी हा उल्लेख आहे असं मला वाटतं.
अनेक प्रतिसाद दात्यांनी आपापल्या मगदुरानुसार मते मांडली आहेत, फाटे फोडले आहेत. असो.
लेख खूप छान झाला आहे. आवडला.