ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ७

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
20 Jul 2018 - 3:10 am




सकाळी ९ च्या सुमारास भुकेच्या जाणीवेने जाग आली. बऱ्याच दिवसांनी मस्त झोप झाली होती. ब्रेकफास्ट ची वेळ सकाळी ८ ते १० पर्यंतच असल्याने आधी तो उरकून घ्यावा म्हणून ब्रश करून सव्वा नउला रुफ-टॉप रेस्टॉरंट मध्ये पोचलो. कदाचित हॉटेल मधले बाकीचे पर्यटक सकाळी लवकर नाश्ता करून साईट सीईंगला बाहेर पडले असल्याने तिथे मी, आणि तिथली व्यवस्था बघणारा जोसेफ सोडून ईतर कोणीच नव्हते.

परवा सारखाच, फक्त खुबुस ऐवजी ब्रेड असलेला नाश्ता त्याने आणून दिला आणि चहा कि कॉफी अशी विचारणा केली. रूममध्ये ठेवलेल्या मेनुकार्ड वर टी – ७ पाउंडस आणि टी विथ मिल्क – १० पाउंडस वाचल्याचे आठवले म्हणून त्याला टी विथ मिल्क मिळेल का असे विचारल्यावर, जरूर मिळेल असे म्हणून तो किचनमध्ये चहा आणण्यासाठी गेला.

काहीवेळात चहा घेऊन आल्यावर, मी भारतातून आलोय हि माहिती परवाच्या आमच्यातल्या जुजबी संभाषणातून त्याला मिळाली असल्याने, अरेबिक मध्ये डब केलेले हिंदी चित्रपट बघण्याची प्रचंड आवड असलेला व अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान चा निस्सीम चाहता असलेला हा जोसेफ तिथेच माझ्याशी बोलत उभा राहिला. त्याने पाहिलेल्या बॉलीवूडच्या सिनेमांबद्दल किती बोलू आणि किती नाही असं त्याला झालं होतं.

हिंदी चित्रपटांमध्ये गाणी फार असल्याची त्याची प्रेमळ तक्रार होती. ती मुळात गाण्यांबद्दल नसून ती डब केल्यानंतर कशी अर्थहीन होतात किंवा सब टायटल्स वाचताना किती विनोदी अर्थनिर्मिती होते त्याबद्दल असल्याचा खुलासा त्याने केल्यावर मात्र, मध्यंतरीच्या काळात फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर व्हायरल झालेला, रावण चित्रपटातील अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय वर चित्रित “ बेहेने दे मुझे बेहेने दे मुझे... बेहेने दे मुझे बेहेने दे “ असे हिंदी बोल असलेला आणि खाली “Give me sisters… Give me sisters…” अशी सब टायटल्स दिसणारा गाण्याचा व्हीडीओ आठवून मलाही हसू आवरणे अशक्य झाले.

अर्थात ईजिप्त मध्ये अमिताभ बच्चन किती लोकप्रिय आहे ह्याचा अनुभव मी कैरो आणि अस्वान मध्ये स्थानिक रहिवासी, दुकानदार, पोलीस चेक पोस्ट व पर्यटन स्थळांच्या तिकीट काउंटर्स आणि सिक्युरिटी चेक वर अनेकदा घेतला होता. ठिकठिकाणी विचारल्या जाणाऱ्या “कुठून आला आहात?” ह्या प्रश्नाला मी सराईतपणे “हिंदी” (इथे भारताची आणि भारतीयांची ओळख ‘हिंदी’ अशी आहे.) असे उत्तर दिले कि समोरची व्यक्ती बहुतेक प्रसंगी हसून, खास ईजिप्शियन स्टाईलने, दोन्ही हातांचे अंगठे वर करत स्वतःच्या छातीजवळ आणून दोन्ही हातांनी थंब्स अप ची खुण दाखवत “ओमिताबच्चन” असे म्हणायची त्यावेळी मजा वाटायची.

बराचवेळ बॉलीवूड ह्या विषयावर गप्पा मारल्यावर आणि त्याच्या आग्रहावरून अजून एक चहा प्यायल्यावर, दहा वाजता जोसेफला नाही, पण मला फिरायला जायचं असल्याचे भान आले. मी त्याला तसे सांगितल्यावर कुठे कुठे जाणार आहात अशी चौकशी करून त्याने त्यापैकी काय काय बघण्यासारखे आहे आणि कुठे वेळ वाया गेल्यासारखे वाटेल ह्याविषयी थोडक्यात, पण उपयुक्त माहिती दिली.

जोसेफचा निरोप घेऊन सव्वादहाला रूम मध्ये आलो. काल अंघोळीला बुट्टी मारली असल्याने ती कसर आज भरून काढायचे ठरवले. बाथरूम मधला गिझर ऑन केल्यावर बाथटब मध्ये भरपूर शॉवर जेल ओतून तो भरण्यासाठी नळ सुरु केला. बाहेर येऊन टी.व्ही. लावला, एका अरबी मुझिक चॅनल वर जरा धडकती फडकती गाणी लागली होती म्हणून व्हॉल्यूम फुल करून साग्रसंगीत स्नानाची मजा लुटण्यासाठी पुन्हा बाथरूम मध्ये आलो.

बाथटब मधल्या पाण्याच्या तापमानाचा, चांगलं ‘गरम’ पासून नावाला ‘कोमट’ असा प्रवास होईपर्यंत त्यात पडून राहिल्यानंतर शॉवर खाली मस्तपैकी थंडगार पाण्याने अंघोळ केल्यावर सगळा शीण गायब होऊन एकदम ताजेतवाने वाटायला लागले.

तयार होऊन ११ वाजता आयमनच्या दुकानात पोचलो. आयमन शिशा साठी लागणारे भट्टीतले कोळशाचे निखारे आणायला चार पाच दुकाने सोडून पुढे असलेल्या बेकरीत गेला असून येईलच इतक्यात, बसा तुम्ही असे तिथे असलेल्या त्याच्या मोहम्मद नावाच्या धाकट्या भावाने सांगितले. माझे त्याच्याकडे काही काम नसून मी आता एलिफंटाईन आयलंड ला जात असल्याचे त्याला सांगून तिथून निघालो.

जवळच असलेल्या फेरी बोटिंच्या धक्क्याजवळ पोचलो तेव्हा खाली एलिफंटाईन आयलंडला जाण्यासाठी एक फेरी बोट प्रवाशांची वाट बघत उभी होती आणि तिचा पोरगेलसा नावाडी “यल्ला यल्ला” असे ओरडत पायऱ्या उतरून खाली येणाऱ्या प्रवाशांना हातवारे करून बोलावत होता.

आत्तापर्यंत गाण्यांमध्ये वगैरे ऐकलेला ‘यल्ला यल्ला’ हा शब्द म्हणजे माशाअल्ला, सुभानअल्ला, इन्शाअल्ला सारखाच काहीतरी दाद देण्यासाठी किंवा देवाचे आभार मानण्यासाठी वापरला जाणारा शब्द असावा असा माझा समज होता, परंतु चारपाच ठिकाणी हा शब्द कानावर पडल्याने मी आज परत आल्यावर लक्षात ठेऊन आयमनला त्याचा अर्थ विचारला तेव्हा समजलं कि ह्या अरबी शब्दाचा अर्थ ‘Hurry Up’, ‘Come Fast’ म्हणजेच आपल्या मातृभाषेत ‘त्वरा करा’, ‘चला चला’, किंवा ‘लवकर चला’ असा होतो.

असो, आठ दहा प्रवासी बसल्यावर बोट सुरु झाली. फेरी बोटीत स्त्रीयांसाठी आणि पुरुषांसाठी बसायला वेगवेगळे भाग होते. २ पाउंडस भाडं देऊन १० मिनिटांत समोरच दिसणाऱ्या एलिफंटाईन आयलंडवर पोचलो.

ferryboat

फॅरोह कालीन ईजिप्त मध्ये ‘येबू’ आणि कालांतराने अपभ्रंश होऊन ‘अबू’ नावाने ओळखले जाणारे, लोअर ईजिप्त आणि नुबिया प्रांताच्या सीमेवरचे सामरिक दृष्ट्या महत्वाचे असे हे बेट आज एलिफंटाईन आयलंड नावाने ओळखले जाते. येबू नावाचे ईजिप्शियन भाषेतले अर्थ ‘हत्ती’ आणि ‘हस्तिदंत’ असे आहेत. प्राचीन काळी आफ्रिका आणि युरोप मध्ये नाईल मार्गे होणाऱ्या हस्तिदंत आणि ईतर मालाच्या आयात निर्यातीचे हे मुख्य केंद्र होते.

ह्या आणि शेजारच्या बेटांवर नुबियन लोकांची अत्यंत अरुंद गल्ली बोळांच्या दुतर्फा पारंपारिक पद्धतीची छोटी छोटी घरे असलेली २-३ खेडेगावे आहेत. आधी केलेल्या संशोधनात इंटरनेटवर ह्या नुबीयन खेड्यांबद्दल आणि तिथे राहणाऱ्यांच्या पारंपारिक ग्रामिण संस्कृतीबद्दलचं बरंच कौतुक वाचलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र हि खेडी अत्यंत बकाल वाटली. ४ ते ५ फुट रुंदीच्या त्या बोळांमधून गुरे ढोरे आणि एकाला दिले कि तीन ते चार च्या पटीत संख्या वाढत जात पैशांची मागणी करत मागे लागणाऱ्या लहान मुलांचा ससेमिरा चुकवत बेटाच्या दक्षिणेला असलेल्या अस्वान अँटीक्विटीज म्युझियमच्या मागच्या बाजूला येऊन पोचलो. तिथे भिंतीपलीकडे रिस्टोरेशन च्या कामावर देखरेख करणाऱ्या माणसाने तुम्ही गावातून आल्याने मागच्या बाजूला आला आहात, प्रवेशद्वार नदीच्या किनाऱ्याजवळ असून कंपाउंड च्या बाजूने चालत चालत पुढच्या बाजूला जायला सांगितले. त्याप्रमाणे कंपाउंडला पूर्ण वळसा घालून प्रवेशद्वाराजवळ आलो आणि ७० पाउंडस चे तिकीट काढून आत जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात केली.

entryticket

जर्मन आणि स्विस पुरातत्व संशोधकांनी ह्याठिकाणी केलेल्या उत्खननात सापडलेल्या वस्तू, पूर्वाश्रमीच्या विश्रामगृहाला छोटेखानी म्युझियम मध्ये रुपांतरीत करून येथे प्रदर्शित केल्या आहेत. ह्या संग्रहातील ५००० वर्षांपूर्वीची मातीची मातीची भांडी, लाकडी, हस्तिदंती सुया व ईतर काही हत्यारे, शस्त्रे, छोट्या छोट्या मुर्त्या, ख्नुम देवाचे प्रतिक मानला जाणारा ‘रॅम’ म्हणजे मेंढ्या ची एक ममी, सातेत देवीच्या मंदिर परिसरात सापडलेले देवीचे अलंकार आणि आजूबाजूचा बगीचा प्रेक्षणीय आहे.

एक जपानी पर्यटक, एक सुरक्षा रक्षक आणि मी असे तिघेच त्यावेळी संग्रहालयात होतो त्यामुळे फोटोग्राफी निषिद्ध असलेल्या ह्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन फोटो काढता नाही आले. इथला बराचसा ऐवज अस्वान मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या नुबिया म्युझियम मध्ये हलवण्यात आल्याने इथे बघण्यासारख फार काही उरलं नाहीये.
म्युझियम मधून बाहेर पडल्यावर मागच्या बाजूला असलेल्या ख्नुम आणि सातेत मंदिरांचे अवशेष बघण्यासाठी निघालो.

नाईल नदीच्या उगमाचा रक्षणकर्ता आणि तिच्या प्रवाहाचे नियंत्रण करणारा देव म्हणजे ‘ख्नुम’. मेंढ्याचे शीर आणि मनुष्याचे शरीर असलेला हा शक्तिशाली देव त्याच्या फिरत्या चाकावर माती पासून लहान बाळाचे शरीर तयार करून मातेच्या गर्भात ठेवणारा असा मनुष्यदेहाचा निर्माता कुंभार असल्याचीही समजूत होती. ख्नुम चा कोप झाल्यास तो एकतर नाईलचा प्रवाह वाढवून पूरपरिस्थिती किंवा प्रवाह थांबवून दुष्काळी परिस्थिती निर्माण करतो अशी श्रद्धा असल्याने अतिप्राचीन काळापासून इजिप्तमध्ये त्याची उपासना केली जात होती.

अशा ह्या ख्नुम देवाचे एक, युध्ददेवता आणि ईजिप्तच्या दक्षिण सीमेची रक्षणकर्ती मानली जाणारी त्याची पत्नी, ’सातेत’ हिचे एक आणि त्यांची मुलगी युध्ददेवता ‘अनुकेत’ हिचे एक अशी ३००० वर्षांपासून वापरात असलेली तीन प्राचीन मंदिरे तिसऱ्या शतकातील ग्रीको-रोमन काळापर्यंत येथे होती.

त्यानंतर ईजिप्त चे तत्कालीन राज्यकर्ते असलेल्या रोमन लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्या नंतर पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे पालन आणि सर्व प्राचीन देवी देवतांची उपासना हे अपराध ठरवल्याने चौथ्या शतकापासून ह्या मंदिरांकडे संपूर्ण दुर्लक्ष होऊन त्यांच्या ऱ्हासाला सुरुवात झाली आणि कालौघात ती नष्ट झाली.

आज देखील येथे जर्मन पुरातत्व संशोधकांच्या सहकार्याने उत्खनन सुरूच असून, रिस्टोरेशनच्या नावाखाली ह्या प्राचीन मंदिरांचे ७० ते ८० टक्के नवीन बांधण्यात आलेले खांब व भिंती आणि त्यात मधे मधे ठिगळा सारखे जोडलेले प्राचीन अवशेषांचे तुकडे अशा स्वरूपाचे अत्यंत विनोदी दिसणारे बांधकाम सुरु आहे जे पूर्ण व्हायला अजून काही वर्षे लागतील.

resto1

resto2

resto3

resto4

तिथून मग मोर्चा वळवला तो बेटावरच्या ‘नाईलोमीटर’ कडे. प्राचीन काळी ईजिप्शियन लोकांनी नाईलला त्यावर्षी पूर येईल कि दुष्काळ पडेल ह्याचा आगाऊ अंदाज येऊन त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिच्या पाण्याची पातळी मोजण्यासाठी तीन पद्धती शोधून काढल्या होत्या. पहिल्या पद्धतीत नुसताच एक ठराविक अंतरावर खुणा केलेला खांब किनाऱ्याजवळ उभा केला जात असे. दुसरी पद्धत म्हणजे किनाऱ्याजवळ एखादी विहीर खोदून तिच्यात खुणा केलेला खांब उभारून किंवा नुसतीच तिच्या पाण्याची पातळी खाली जाते कि वाढते ह्याच्या नोंदी ठेऊन अंदाज बांधला जात असे. तर तिसऱ्या प्रकारात बेटावरून खाली नदी पर्यंत उतरत जाणारा दोन्ही बाजूंनी बंदिस्त असा दगडी जिना दगडात खोदून अथवा बांधून त्याच्या एका बाजूच्या दगडी भिंतीवर अगदी प्रमाणबद्ध अंतरावर आकडे आणि मापाच्या खुणा कोरलेल्या पट्ट्या बसवल्या जात असत.

तिसऱ्या प्रकारचा ५२ दगडी पायऱ्या आणि भिंती असलेला आणि अजूनही सुस्थितीत असलेला नाईलोमीटर ह्या एलिफंटाईन आयलंडवर आहे.

nilometer1

nilometer2

ह्याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने माझे फोटो काढले आहेत, पण त्यातल्या नाईलोमीटरच्या पायऱ्या जिथून सुरु होतात त्याठीकाणा पासून जवळ काढलेले दोन फोटो मात्र चमत्कारिक आले आहेत.

shadow1

shadow2

वरील दोन्ही फोटोंमध्ये माझी अर्धीच सावली जमिनीवर पडलेली दिसते, बाकीची सावली कुठे गायब झाली? आत्तापर्यंत कित्येक लोकांना विचारलेला हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. लुक्झोर मधला सर्वात अनुभवी आणि उत्कृष्ठ ईजिप्तोलॉजीस्ट म्हणून ओळखला जाणारा ईमाद नावाचा गाईड पण काही स्पष्टीकरण देऊ नाही शकला.

आता मिपाकारांकडूनच काहीतरी समाधानकारक उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे.

ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे आणि थोडी वाळवंटात पायपीट करण्याची तयारी व ३-४ तासाचा अतिरिक्त वेळ हाताशी असल्यास मागच्या मध्यम आकाराच्या डोंगरावर आणखीन तीन चार ठिकाणे बघण्या सारखी आहेत. माझ्या दृष्टीने इथली पाहण्या सारखी स्थळे पाहून झाली होती, म्हणून दोन वाजता परतीच्या मार्गाला लागलो. धक्क्यावर थोडावेळ बोटीची वाट बघावी लागली त्यामुळे आयमनच्या दुकानात परत यायला अडीच वाजले.

सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत असे अकरा तास दुकानात थांबणारा आयमन ११-१२ वेळा शिशा पेटवतो, आणि अखंड त्याचे अग्निहोत्र चालू असते. आत्ता मी पोचलो तेव्हाही त्याची हुक्क्याच्या वरच्या चीलमीत तंबाखू भरण्याची प्रक्रिया चालू होती, त्यानंतर तो निखारे आणायला बेकरीत जाणार होता. एवढे वेळा दिवसातून ते कोळशाचे निखारे देणारा तो बेकरीवाला वैतागत कसा नाही हा मला पडलेला प्रश्न मी त्याला विचारला, त्यावर ती बेकरी त्यांच्याच कुटुंबाची असून त्याचा काका ती सांभाळत असल्याचे उत्तर त्याने दिले.

हा हुक्का पिऊन झाल्यावर आज मला त्याची अलिबाबाची गुहा म्हणजे त्याचे वरच्या मजल्यावरचे गोदाम दाखवायची त्याची इच्छा होती. पण एवढावेळ भर उन्हात पायपीट केल्याने घामाने ओले झालेले सॉक्स कधी एकदा काढतो असे मला झाले होते, त्यामुळे तुझा कार्यक्रम सुरु कर मी रूमवर जाऊन आलोच असे त्याला सांगून रूमवर आलो. बूट काढून पायात स्लीपर्स चढवल्या आणि काल सलाह एल दीन मधून बाहेर पडताना पार्सल घेतलेला स्टेला बिअर चा कॅन फ्रीज मधून काढून खिशात टाकून परत आलो. तोपर्यंत आयमनचा हुक्का पेटला होता.

गेल्या दोन दिवसांत त्याने मला प्रत्येकवेळी हुक्का ऑफर केला होता पण मी नम्रपणे नकार दिला होता. असं काही नव्हतं कि मी आयुष्यात पहिल्यांदाच हुक्का ओढणार होतो, पण त्याच्या त्या जम्बो साईझ शिशामध्ये तो भरत असलेल्या बिना फ्लेवरच्या त्या उग्र वासाच्या कडक तंबाखूमुळे मी तो पिणे टाळले होते. आज पण त्याने मला ओढणार का असे विचारले आणि मी त्याला नकार न देता ठसकत का होईना पण ४-५ झुरके मारले.

hukka

ayman
(आयमन आणि मी)

त्याचा शिशा आणि माझी बिअर संपल्यावर दुकानाच्या आतूनच वरती जाण्यासाठी असलेल्या जिन्यावरून गोदामात आलो. खाली केवळ दोन-अडीचशे चौरस फुटाच्या दुकानाच्या वरचे त्याच्या वीसपट मोठ्या आकाराचे आयमनचे गोदाम म्हणजे खरोखरच अलिबाबाची गुहा होती. अगदी टर्की व विविध आफ्रिकन देशांतली कापडे, टोप्या, तयार कपडे, गालिचे, चामड्याच्या वस्तू, भारतातल्या काश्मिरी शाली आणि उत्तर प्रदेशातून आयात केलेले ब्लँकेटस वगैरे वस्तूंचे ढीगच्या ढीग तसेच ईजिप्त मधील प्राचीन मुर्ती, मुखवटे व पुतळ्यांच्या अस्सल वाटणाऱ्या दगडी, धातू आणि फायबरच्या प्रतिकृती अशा नानाविध वस्तूंचा खजिनाच तिथे होता. खालचे दुकान हे किरकोळ विक्री साठी असून अप्पर इजिप्तच्या दुकानदारांना पाठवण्यात येणाऱ्या घाऊक मालाचा हा साठा असल्याची माहिती त्याने दिली. अस्वान मधले हे नवीन प्रेक्षणीय स्थळ बघून आम्ही परत खाली येऊन थोडावेळ बसलो.

मला अजून फेलुका राईड आणि चालत फिरण्याच्या अंतरावर असलेले कॅथेड्रल आणि नुबिया म्युझियम बघायचे होते, पण नउ वाजेपर्यंत उघडे असणारे म्युझियम बघायला वेळ पुरेल कि नाही अशी शंका आल्याने ते उद्या संध्याकाळी बघण्याचे ठरवले आणि आयमनने माझ्या फेलुका राईड साठी ज्याच्याशी बोलणी केली होती तो, फक्त अरबी आणि नुबीयन भाषा बोलू शकणारा बेनाख नावाचा नुबीयन नावाडी मला न्यायला आल्यावर पावणे पाचला त्याच्या बरोबर तिथून निघताना आयमनने त्याला, मला कुठे सोडायचे वगैरे सूचना दिल्या आणि मला फेलुका राईड झाल्यावर कॅथेड्रलला जाताना आधी लागणाऱ्या चौकात ईजिप्त एअर च्या ऑफिस जवळ, रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या ‘फ्री शॉप’ नावाच्या सुपर मार्केट टाईप दुकानात पहिल्या मजल्यावर अस्वान मधले एकमेव वाईन शॉप असून बिअर वगैरे पार्सल घ्यायची असल्यास तिथून घे, बार पेक्षा अर्ध्या किमतीत मिळेल अशी महत्वपूर्ण माहिती दिली.
सलाह एल दीन च्या आधी असलेल्या एका हॉटेल मधून पायऱ्या उतरून बेनाखच्या फेलुका मध्ये बसलो. मला पाण्यात डुंबायला कितीही आवडत असले तरी बोट, राफ्ट, किंवा क्रुझ अशा कुठल्याही प्रकारच्या जलप्रवासाचा तिटकारा असल्याने फक्त एक अनुभव घ्यायचा म्हणून १०० पाउंडस खर्चून (त्यावेळेला सिझन असल्याने कमीतकमी २५० पाउंडस दर होता) केवळ अर्ध्या तासाची हि फेलुका राईड घेतली होती. भाषिक समस्येमुळे बेनाखशी बोलण्याचा काही प्रश्नच नव्ह्ता, म्हणून आजूबाजूचा परिसर बघत मधेच फोटो काढत २५-३० फुट उंचीच्या शिडात भरणाऱ्या वाऱ्याच्या जोरावर अवलंबून असलेला संथ प्रवास सुरु होता.

feluka1

feluka2

वाऱ्याचा वेग फार नसल्याने ३० च्या जागी ४० मिनिटांनी आयमनने त्याला सांगितलेल्या ठिकाणी म्हणजे सकाळी मी जिथे एलिफंटाईन आयलंडवर जाण्यासाठी फेरी बोटीत बसलो होतो त्याच धक्क्यावर मला आणून सोडले.

आर्कएंजल मायकल कॉप्टिक ऑर्थोडॉक्स कॅथेड्रल (Archangel Michael Coptic Orthodox Cathedral) असं लांबलचक नाव असलेल्या त्या चर्चच्या आतमधे जाण्यात मला काहीच रस नव्ह्ता, पण दिवसा अत्यंत सामान्य दिसणारी हि चर्चची इमारत अंधार पडल्यावर आतले दिवे लागले कि अगदी वेगळी आणि सुंदर दिसते असे वाचले होते, ते दृश्य पाहण्यासाठी तिथे जायचे होते.

सहापण वाजले नव्हते त्यामुळे अंधार पडायला अजून कमीत कमी तासभर तरी बाकी होता, म्हणून थोडावेळ जवळच असलेल्या फ्रायल गार्डनच्या परिसरात भटकंती करून किनाऱ्यावरच्या एका ज्यूस सेंटर मध्ये फ्रेश स्ट्रॉबेरी ज्यूस प्यायले आणि दुसऱ्या स्टॉल वरून रात्रीचे जेवण म्हणून २ फलाफेल सँडविच पार्सल घेऊन आयमनने सांगितलेल्या ‘फ्री शॉप’ मध्ये शिरलो.

तळमजल्यावर (कदाचित दुकानाच्या रिनोव्हेशनचे काम चालू होते, त्यामुळे जागा अपुरी पडत असल्याने) ताज्या भाज्या आणि फळांपासून खुर्च्या, सोफे, व्यायामाचे साहित्य अशा संपूर्ण विसंगत वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. पहिल्या मजल्यावर पण अर्ध्या भागात रंगकाम सुरु असल्याने बहुतांश खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे पॅक्स उर्वरित भागात दाटीवाटीने रॅक्स मध्ये रचून ठेवलेले होते.

अगदी एका कोपऱ्यात असलेल्या लिकर सेक्शन मध्ये पोचलो. सलाह एल दीन मध्ये ५० पाउंडसला एक मिळणारा स्टेलाचा कॅन इथे खरोखरच अर्ध्या किमतीला म्हणजे २५ पाउंडसला होता. मग उद्यासाठी म्हणून २ कॅन्स खरेदी करून बाहेर पडलो. पावणे सात वाजले होते, काळोख पडायला सुरुवात झाली होती. लांबूनच कॅथेड्रलच्या मनोऱ्यांवरचे दिवे लागलेले दिसत होते, म्हणून त्या दिशेने चालायला लागलो.

प्रवेशद्वाराजवळ आत जाणाऱ्या पर्यटकांची बरीच मोठी रांग लागलेली दिसत होती म्हणून जवळ जाऊन बघितले तर ती रांग सुरक्षा तपासणी साठी होती आणि मेटल डिटेक्टर च्या चौकटीच्या आधी एक टेबल खुर्ची टाकून बसलेला पोलीस अधिकारी पर्यटकांचे पासपोर्ट घेऊन त्या वरची माहिती सामोरच्या रजिस्टर मध्ये लिहून घेत असल्याने रांग पुढे सरकायला वेळ लागत होता. मला आत जायचे नव्हते म्हणून शेजारच्या रस्त्याने थोडा पुढे गेलो आणि पूर्ण काळोख पडल्यावर परत मागे आलो. अंधारात ती इमारत आतल्या दिव्यांच्या प्रकाशाने फारच सुंदर दिसत होती. रस्त्यावरूनच वेगवेगळ्या कोनातून काही फोटो काढून हॉटेलचा रस्ता धरला.

cathedral1

cathedral2

cathedral3

cathedral4

अर्धा रस्ता पार केला असताना मुस्तफाचा फोन आला. कुठे आहात अशी विचारणा करून त्याने तो आयमनच्या दुकानात माझी वाट बघत थांबल्याचे सांगितले. त्याला तू तिथेच थांब, मी पाच मिनिटांत पोचत असल्याचे सांगून कॉल कट केला.

दुकानाबाहेर तो आणि मोहम्मद बसले होते. उद्या सकाळी किती वाजता निघायचे आणि कोणत्या क्रमाने स्थलदर्शन कारायचे या विषयावर आमची चर्चा झाली. त्याच्या अनुभवी सल्ल्याप्रमाणे, अनफिनिश्ड ओबेलीस्क हा ग्रॅनाईटच्या खाणीत असल्याने जसे उन वाढत जाईल तसे दगड तापायला सुरुवात होऊन हा परिसर बघण्यास त्रासदायक होत जातो त्यामुळे सकाळी माझा ब्रेकफास्ट झाला कि साडेआठ वाजता निघून उन वाढायच्या आत पहिले हे ठिकाण करायचे. त्यानंतर मग अस्वान हाय डॅम आणि फ्रेन्डशिप सिम्बॉल बघून झाल्यावर बोटीने प्रवास करून बेटावर असलेल्या मंदिरात पोचायला, मंदिर बघायला आणि बेटावरून परत यायला भरपूर वेळ लागत असल्याने सगळ्यात शेवटी फिलाई टेम्पलला जायचे असा कार्यक्रम ठरला.

त्या दोघांचा निरोप घेऊन मी सव्वा आठला रूमवर पोचलो. बिअरचे कॅन्स फ्रीज मध्ये ठेवले. मग फ्रेश होऊन टी.व्ही. चालू केला, पायरेट्स ऑफ द कॅरेबियन - कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल लागला होता. तो बघता बघता सँडविचेस खाऊन झाल्यावर सकाळी सात चा अलार्म लावून फोन चार्जिंगला लावला. दहा वाजता पिक्चर संपल्यावर झोपून गेलो.

क्रमश:

संजय भावे
(उर्फ ‘टर्मीनेटर’)

प्रतिक्रिया

अश्फाक's picture

20 Jul 2018 - 6:32 am | अश्फाक

जिथे सावली कट झाली आहे तिथे दगडांमधे पायरी सारखा खोल भाग असेल
सूर्याचा angle वर आणि फोटो घेणाऱ्याचा तुमच्या समांतर असल्याने असा दृष्टी भ्रम झाला असावा

टर्मीनेटर's picture

21 Jul 2018 - 11:58 am | टर्मीनेटर

अश्फाकजी मागे तेवढी खोल पायरी वगैरे नव्हती की सावलीचा अर्धा भाग संपुर्ण अदृष्य होईल, निदान तो वक्री होउन थोडा तरी दिसायला पाहीजे होता.
दुसरी गोष्ट म्हणजे पुढची रेलींगची सावली पुर्ण दिसत आहे, त्यामुळे सुर्याच्या अॅंगलचा काही परीणाम नसावा. आणि फोटो काढणारा पोलीस मी उभा असलेल्या असलेल्या जागेपेक्षा थोडा उंचावरच होता.

सावलीचा प्रकार थोडा चमत्कारिकच आहे, ते प्रकाशाचे वक्रीभवन की काय म्हणतात त्यामुळे झाले असेल का हे?
बाकी छान चालू आहे प्रवास. पुढचे भाग पण वाचतो सवडीने.

असूही शकेल :) अजून समाधानकारक कारण नाही सापडलंय त्याचं.
धन्यवाद.

कंजूस's picture

20 Jul 2018 - 7:08 am | कंजूस

खूपच मजेदार आहे.
हे पौंड इंग्लिशच किंवा दुसरा काय रेट आहे?
५० पौंडाला कॅन वगैरे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2018 - 1:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो इजिप्शियन पाऊंड (EGP) आहे.

१ EGP = रू ३.८५ (आजचा दर)

टर्मीनेटर's picture

21 Jul 2018 - 12:07 pm | टर्मीनेटर

एक्सचेंज करताना १ ईजीप्शीयन पाऊंड जवळपास ५ रूपयाला पडतो.

प्रचेतस's picture

20 Jul 2018 - 9:04 am | प्रचेतस

हा भागही आवडला.
आयमनच्या दुकानातील वस्तू एकदम भारी आहेत.

टर्मीनेटर's picture

21 Jul 2018 - 12:09 pm | टर्मीनेटर

धन्यवाद प्रचेतसजी.

अनिंद्य's picture

20 Jul 2018 - 11:20 am | अनिंद्य

मस्त
पुढील भागांसाठी येल्ला येल्ला :-)

टर्मीनेटर's picture

21 Jul 2018 - 12:13 pm | टर्मीनेटर

धन्यवाद अनींद्यजी. प्रतीसादातला यल्ला यल्ला शब्दाचा वापर आवडला :)

दुर्गविहारी's picture

20 Jul 2018 - 12:00 pm | दुर्गविहारी

मजा येते आहे वाचायला. सावलीचा प्रकार थोडा गुढ आहे खरा. पण ममीच्या देशात गेल्यानंतर असा एखादा अनुभव यायलाच पाहिजे , नाही का? ;-)
पु.भा.प्र.

टर्मीनेटर's picture

21 Jul 2018 - 12:18 pm | टर्मीनेटर

धन्यवाद दुर्गविहारीजी. खरं आहे :)

टर्मीनेटर's picture

21 Jul 2018 - 12:19 pm | टर्मीनेटर

धन्यवाद दुर्गविहारीजी. खरं आहे :)

भुमन्यु's picture

20 Jul 2018 - 3:09 pm | भुमन्यु

मस्त सफर चालू आहे. तुमच्या लिखाणाची पद्धत आवडली, सहजता आणि वेग दोन्ही गोष्टी आहेत. तुमच्या सहलीने आता पासुनच पुढच्या वर्षाच्या सहलीचे मनात मांडे रचणे आणि सोलो ट्रीप साठी बायकोला पटवणे चालू केले आहे.
आणि वर सांगितल्याप्रमाणे पुढचा भाग यल्ला यल्ला

टर्मीनेटर's picture

21 Jul 2018 - 12:26 pm | टर्मीनेटर

धन्यवाद भुमन्युजी. नक्की जाउन या, मस्तच आहे. तुमच्या सोलोट्रीप साठी मनापासुन शुभेच्छा.

जेम्स वांड's picture

21 Jul 2018 - 12:44 pm | जेम्स वांड

टाईम अँड अगेन तुमच्या शैलीचे कौतुक करावे तितके कमीच. मागच्या भागात दृश्य नसलेली स्टेला ह्या भागात बघितली अन आमचा बीयरप्रेमी जीव शांत झाला, नुसत्या जर्मन बियरच (सगळ्या) ट्राय करायच्या म्हणाल्या तर वर्ष सहज लागेल. असो! तो विषय नाही, तुमच्या खुमासदार शैलीत, इजिप्शियन गर्मीत फलाफल सँडविच खात स्टेला पित साईट सीइंग करायची मजा घेतोय भरपूर!!

धन्यवाद जेम्स वांडजी.
अवांतर : स्टेला आणि सक्कारा ह्या दोन ईजीप्शीयन बीयर्स टेस्टी आहेत.
:)

सिरुसेरि's picture

21 Jul 2018 - 1:55 pm | सिरुसेरि

सगळे लेख आणी फोटो छान . " जीवाचं इजिप्त करणे " याचा मस्त अनुभव आला .

टर्मीनेटर's picture

21 Jul 2018 - 2:13 pm | टर्मीनेटर

धन्यवाद सिरूसेरीजी. :)

रंगीला रतन's picture

22 Jul 2018 - 9:41 am | रंगीला रतन

मस्त सफर! हुक्का + बीयर मज्जाच मजा.
अरब देशात तुम्हाला ओपनली बीयर पीताना बघुन आश्चर्य वाटले!
त्यावर काही बंधने नाही आहेत का तीकडे?

टर्मीनेटर's picture

23 Jul 2018 - 12:57 pm | टर्मीनेटर

धन्यवाद रंगीला रतनजी. स्थानिकांवर खुल्यावर अल्कोहोल सेवन करण्यावर बंधने आहेत, पर्यटकांवर नाहीत.

हा भागही आवडला. मस्त लिहिताय. इथे स्त्री पर्यटक दिसतात का?

टर्मीनेटर's picture

25 Jul 2018 - 8:30 am | टर्मीनेटर

धन्यवाद यशोधराजी. हो भरपूर महिला पर्यटक दिसतात, कितीतरी जणी एकट्या देखील येतात. इथल्या स्थानिक महिला, पुरुषांच्या बरोबरीने नोकऱ्याही करतात, तसेच त्यांना बुरखा किंवा ईतर पारंपारिक पोशाखाची कोणतीही सक्ती नाही, तरी बहुसंख्य स्त्रिया डोक्याला स्कार्फ बांधण्याची पूर्वापार परंपरा स्वेच्छेने (सक्ती नसूनही) पाळताना दिसतात.

ज्योति अळवणी's picture

25 Jul 2018 - 12:50 am | ज्योति अळवणी

तुमच्या सावलीने एक कथा सुचवली आहे.... लिहिली की नक्की सांगीन तुम्हाला.... बाकी मस्तच लिहिता आहात. माझं स्वप्न तुम्ही जगला आहात.... बघू मला कधी जमतंय इजिप्त बघणं... अर्थात तुमच्या अनुभवांचा खूपच उपयोग होईल जेव्हा जाईन तेव्हा

टर्मीनेटर's picture

25 Jul 2018 - 8:33 am | टर्मीनेटर

धन्यवाद् ज्योतीजी. लवकर कथा लिहा, वाचायची उत्सुकता आहे. तुमच्या ईजिप्त भेटीचं स्वप्न लवकरच पूर्ण व्हावं हि सदिच्छा.