कविता माझी

हळव्या खुणा

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
4 Apr 2017 - 9:51 am

डोळ्यांत क्षितिजाच्या व्याकूळ होता जीव
पाऊली अश्रूंच्या होता घायाळ भाव

गात्रात दु़़खाने केला होता निवारा
थरथर प्राणांची पाहत कापत होता वारा

कातर सुराने निशब्द झाल्या होत्या संवेदना
पंखात पापण्यांच्या होत्या हळव्या खुुणा

अशा संध्येकाठी एकांत होता बुडाला
तू जाताना सायंतारा तमांत होता निजला

कविता माझीकविता

मन... जीवन...

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
22 Mar 2017 - 10:53 am

स्वप्न माझे मनीच माझ्या
जीवन वाहे खळाळ सरिता
गोडी तयांची अवीट भासे
मन.. सरितेचे अबोल नाते

मनास येता भरती माझ्या
जीवन सरिता स्थब्द असे
प्रवाही जीवनाच्या संगे
मन हे वेडे धावतसे

एक स्वप्न-एक सत्य भासे मज
शब्दात वर्णू कसे किती
दोन्ही माझे मी दोघांची
मन-जीवन असे अमूर्त जरी

कविता माझीकविता

पेटुनी आरक्त संध्या...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
22 Mar 2017 - 5:00 am

पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे...
केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे!

मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे...
वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे!

काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे...
सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे!

एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!

मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!

सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!

—सत्यजित

gajhalgazalकविता माझीमराठी गझलकवितागझल

तू नभीचा चंद्रमा हो...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
18 Mar 2017 - 1:58 pm

लांबती हे श्वास हल्ली..सोबती घेवून जा...
तू मला भेटायला ये..एकदा येवून जा!

शेवटी आयुष्यही असते प्रवासासारखे...
तू तुझ्या गावात थांबा तेवढा ठेवून जा!

तो तसा आला नि गेला..वादळाच्या सारखा...
पण मला सांगून गेला..दीप हो,तेवून जा!

वाहते आहे अनावर,तू मला प्राशून घे...
या नदीला सागराची वा दिशा देवून जा!

सूर्य विझता रातही चालून येते नेमकी...
तू नभीचा चंद्रमा हो..चांदणे लेवून जा!

—सत्यजित

gajhalgazalकविता माझीमराठी गझलकवितागझल

माझ्या कवितेची शाई

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
16 Mar 2017 - 11:39 am

माझ्या कवितेची शाई
आहे अजब मिश्रण
भस्म अधुऱ्या स्वप्नांचे
त्यात अश्रुंचे शिंपण

कधी माझ्या कवितेचा
शब्द निनादे आभाळी
कधी धरती विंधतो
कधी गुंजतो पाताळी

कवितेची ओळ माझ्या
कधी फुलांनी वाकते
कधी बोलता बोलता
गहनाशी झोंबी घेते

माझ्या कवितेत जेव्हा
फुंकीन मी प्राण नवा
तेव्हा तुम्हा रसिकांचा
पाठीवरी हात हवा

कविता माझीमुक्तक

घे भरारी..मन म्हणाले...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
12 Mar 2017 - 7:38 am

घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो...
सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो!

जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती...
वाटले की..वाट चुकले कोकरु झालो!

राजरस्त्याची तमा ना आडवाटेची...
मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो!

गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले...
धन्य झाला जन्म की मी वासरु झालो!

बासरीचा सूर होणे मज कुठे जमले?
राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो!

हुंदके दाबून सारे स्वागता गेलो...
अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो!

घेतली हाती कलम बहुधा बरे झाले...
मी मुक्या संवेदनांची आबरु झालो!

—सत्यजित

gajhalgazalकविता माझीमराठी गझलकवितागझल

चंद्र नको , तारे नको

अभिषेक पांचाळ's picture
अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी...
9 Mar 2017 - 2:46 pm

चंद्र नको , तारे नको , नको खोटी भेट
शब्द हवे , शब्दांसारखे , ओठांमधले थेट

भारी नको , साधी नको , नको पुरी गोड
भाषा हवी , प्रेमाची , त्याला प्रेमाचीच जोड

आज नको , उद्या नको , नको काही क्षणांची
साथ हवी , जन्मासाठी , उरल्या साऱ्या जन्मांची

हसू नको , रुसू नको , नको आशा सुखाच्या
बस हात हवा , हातामध्ये , तुफानी त्या दुःखाच्या

अश्रू नको , दुःख नको , नको भाव ते रोशाचे
एक हवे बस , रोज मला , दर्शन तुझ्या हास्याचे

सुख नको , ऐवज नको , नको आस कुणा गंधाची
छंद हवा बस , तुझाच जीवा , ओढ असो या छंदाची

कविता माझीकविता

आदिप्रश्न

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
9 Mar 2017 - 1:56 pm

धगधगे कोटी सूर्यांचे
स्थंडिल अहर्निश जेथे
का अनादि ब्रह्माण्डाचे
लघुरूप जन्मते तेथे ?

अणुगर्भ कोरुनी बघता
जी अवघड कोडी सुटती
त्या पल्याड पाहू जाता
का शून्य येतसे हाती ?

का अंत असे ज्ञेयाला
की ज्ञान तोकडे ठरते
की सीमा अज्ञेयाची
अज्ञात प्रदेशी वसते ?

कविता माझीमुक्तक

मी ....अब्जशीर्ष

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
3 Mar 2017 - 1:53 pm

मी ....अब्जशीर्ष मानवता

मीच फुलविते विझू पाहणारी पहिली ठिणगी
जिला क्रान्तीच्या सहस्र धगधगत्या जिभा फुटतात

मीच गुणगुणते बदलांची बीजाक्षरे
जी दुमदुमतात महामंत्र होऊन आसमंतात

ती मीच, जिच्या पायाशी चिरेबंद चिलखते
भुगा होण्याआधी लोळण घेतात

मीच मळते विश्व वेढून दशांगुळे उरणाऱ्या
अदम्य ज्ञानलालसेच्या पायवाटा

कैकदा मरून
प्रतिकूलांना पुरून
मीच उरते पुनःपुन्हा

अब्जशीर्ष.
अजिंक्य.

रंग,वंश,लिंग या पलीकडची म्हणून मला हिणवू नकोस
दिव्यत्वाच्या शोधात स्वतःला शिणवू नकोस.

कविता माझीमुक्तक

अर्धा घाव

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
1 Mar 2017 - 11:40 pm

गडद काळ्या अंधाराला फुटे वाचा
अर्धा घाव काळजात राहिला कुणाचा

रिमझिम अशी डोऴ्यांत लागली नाचू
गाभार्यात आठवणींची भेट पुन्हा वेचू

पिऊनी धरणी रात्र निजली
तरी कशी दिशांना जाग आली

थकले सारे दीप व्यथांचे
जळूनी गेले पथ कुणाचे

कविता माझीकविता