हे सारे कोठून येते?

नंदन's picture
नंदन in जनातलं, मनातलं
7 Aug 2009 - 1:43 pm

अलीकडेच वाचलेल्या दोन बातम्या. एक टांझानियात अल्बिनोंवर होत असलेल्या अत्याचारांची (अल्बिनो म्हणजे मेलॅनिनच्या अभावामुळे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगावर सफेद कोड उठल्यासारखे वाटण्याची स्थिती) आणि दुसरी सातारा जिल्ह्यात सुखेड आणि बोरी गावच्या महिलांत दरवर्षी नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी भरणार्‍या शिवीगाळीच्या सामन्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या विरोधाची.

. . .

आपल्या ज्या काही म्हणून मूलभूत भावना आहेत - आनंद, दु:ख, द्वेष इ.; त्यांची बीजं उत्क्रांतीमध्येच आपल्यात रोवली गेली असावीत. उदाहरणार्थ, अलीकडेच कोणीतरी डोंगरमाथ्यावरून दूरवर पसरलेली हिरवळ ही आपल्या आदिम मनाला कुठेतरी (जड शब्दच वापरायचा झाला, तर नेणीवेच्या पातळीवर) सुरक्षिततेची, संपन्नतेची ग्वाही देते आणि तो दिलासा आपल्या मनाला सुखावतो असा विचार मांडला होता. हिरवीगार रम्य वनश्री आणि कसेतरी विखरून पडलेले दगड. पण यातलं एक दृश्य (निदान बहुसंख्यांना) आवडतं आणि दुसरं आवडत नाही, ह्या (थोडा विचार केला तर भासणार्‍या) विसंगतीमागचं हे एक संभाव्य कारण.

पुढचं उदाहरण कदाचित टोकाचं वाटू शकेल, परंतु आईवडिलांच्या आपल्या अपत्यांवरील निरपेक्ष प्रेमात वंशसातत्याच्या सनातन प्रेरणेचाही मोठा हिस्सा आहे, असं काही उत्क्रांतिशास्त्रज्ञांचं मत आहे. या विचारप्रवाहाकडे थोडंफार हे निसर्गाने तयार केलेलं 'मॅट्रिक्स' या दृष्टीतून पाहता येईल. अगदी 'श्यामची आई'मध्येही साने गुरूजींना 'माझ्या आईचं केवळ माझ्यावरच इतकं प्रेम का? सार्‍या जगातल्या लेकरांवर तिने माझ्याच एवढं प्रेम करायला हवं' या प्रश्नाने छळल्याचा उल्लेख आहे. (या विधानांचा विपर्यास सहज करता येईल किंवा मानवी भावनांना साच्यात बसवल्याचा आरोप होईल. पण तो लेखाचा मुख्य विषय नसल्याने विस्तारभयास्तव अधिक लिहित नाही)

तिसरी भावना भयाची व/वा द्वेषाची. कदाचित एकाच आदिम भावनेच्या या दोन बाजू असाव्यात. प्रेमाच्या झेंड्यापेक्षा द्वेषाच्या झेंड्याखाली माणसं लगेच गोळा होतात, हे सत्य आहे. 'आपण' आणि 'ते' अशी विभागणी सनातन आहे. (विंदांचा याच आशयाचा एक लघुनिबंध यासंदर्भात फार बोलका आहे. गर्दीने भरलेल्या डब्यात आतल्या माणसांशी झगडून लेखक आत शिरतो आणि मग पुढच्या स्थानकात आतल्या गर्दीचाच एक भाग बनून इतरांना आत चढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो.) मग ती कांदिवलीचे प्रवासी उलट बसून येतात म्हणून बोरिवलीचे लोक त्यांना शिव्या घालतात इतक्या छोट्या पातळीवरची असो की थेट दोन राष्ट्रांतील युद्धाला दोन धर्मांतील संघर्षाचे रूप यावे इतकी मोठी.

पण मुळात द्वेषभावनेला इतकी तीव्रता का येते? यात उत्क्रांतीतलं 'सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट' सारखं काही सूत्र आहे का? कोंडलेलं मांजर जसं सर्वशक्तीनिशी माणसाच्या नरड्यावर झेप घेऊ शकतं, तशी काही तग धरून रहायची (सर्व्हायवल इन्स्टिंक्ट) भावना यामागे असावी का?

कुठल्याही संस्कृतीचा एक मोठा भाग हा 'नैसर्गिक ऊर्मींवर नियंत्रण ठेवण्याचे काही समाजमान्य उपाय' असा असतो. यातून कदाचित प्रत्येकात कमीअधिक प्रमाणात खदखदलेपणाची एक भावना निर्माण होत असावी. घरात होणार्‍या संस्कारांपेक्षा हा मुळात पिंडाचा भाग असावा असं मला वाटतं. हे वैफल्य कुठेतरी व्यक्त करायला मग एक लक्ष्य लागतं. हिटलरने दुसर्‍या महायुद्धापूर्वी ज्यू समाजाला केलं, बरेचसे पाकिस्तानी राजकारणी भारताला ठरवत आलेत किंवा पहिल्या ओळीत म्हटल्याप्रमाणे टांझानियातल्या अल्बिनोंना सध्या गुप्तधनासारख्या हव्यासापोटी नरबळी पडावं लागत आहे तसं. भिंग योग्य अंतरावर धरल्यावर किरण एका बिंदूवर एकत्र यावेत, तसं एक लक्ष्य ठरवून दिलं की माणसातला पशू जागा होतो.

बहुतेक म्हणूनच प्रत्येक धर्मात, समाजात या सुप्त पण खदखदणार्‍या द्वेषभावनेचा निचरा करायला एक जागा असते, आणि नसलीच तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या कलाप्रमाणे ती शोधत असते. ज्याचा त्याचा बागुलबुवा. ज्याला कृतीने किंवा उक्तीने झोडपून काढलं की मन शांत होतं, रोजच्या आयुष्यातलं वैफल्य कमी होतं असं काहीतरी. उदाहरणं शोधली तर अनेक सापडतील. मक्केत सैतानाचं प्रतीक म्हणून उभारलेल्या खांबावर त्वेषाने दगडफेक करणारे भाविक, वाय टू केच्या चक्रात नोकरी गेल्यावर घरी बायकोला येऊन मारहाण करणारे काही पुरूषोत्तम, मुलांवर राग काढणार्‍या आया, बेणारे बाईंवर खटला चालवणारे सभ्य लोक, 'वॉर अँड पीस'मधल्या वेरेश्चागिनचा जमावाने घेतलेला बळी; एक ना अनेक.

ही द्वेषभावना असणार आणि वेळोवेळी तिचं कुठेना कुठे प्रकटन होत राहणार, हे अमान्य करणं भाबडेपणाचं होईल. जागतिकीकरणात अशा जुन्या समाजमान्य (आठवा : बेंबट्या, होळी पेटल्यावर बोंबा मारायला लाजणे यात पुरुषार्थ नाही. कोर्टात भांडण आणि तीर्थास मुंडण हे हवेच) जागा (आऊटलेट्स) जात आहेत; पण त्यांची जागा घ्यायला नवीन पर्याय मात्र फारसे उपलब्ध नाहीत. अशा वेळी अंनिसने अशा 'ब्लेसिंग इन डिस्गाईज' असणार्‍या प्रथा बंद करण्यात ऊर्जा वाया घालवणे कितपत योग्य आहे? अशी अस्वस्थ ऊर्जा मग प्रथम भडक उक्तीकडे आणि अपरिहार्यपणे विध्वंसक कृतींकडे वळत असेल का? उक्तीला कमी लेखण्याकडे जरी कल असला, तरी तिच्यामुळे पुढच्या कृतींना बळ मिळू शकते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधनसंस्थेवरील हल्ल्याचे उदाहरण या संदर्भात पुरेसे ठरावे.

'थिंकिंग अ‍ॅज अ हॉबी' हा विल्यम गोल्डिंग या नोबेल पुरस्कारप्राप्त लेखकाचा लघुनिबंध या संदर्भात चिंतनीय आहे. त्याने समाजाची विचारशक्तीच्या दृष्टीने तीन स्तरांत विभागणी केली आहे. पहिला बराच मोठा स्तर हा हेवेदावे, पूर्वग्रह, गैरसमजुती यांना कळत नकळत उराशी बाळगून जगणार्‍यांचा. लेखकाने उदाहरण दिल्याप्रमाणे घाऊक प्रमाणात सरसकट सगळ्याच जर्मनांचा द्वेष करणार्‍या ब्रिटिश म्हातारीचा. (इथे वूडहाऊसच्या 'आय डोन्ट हेट इन प्लुरल' या विधानाची अपरिहार्यपणे आठवण होते.) दुसरा स्तर हा अधिक विचारी व्यक्तींचा. तिसर्‍या स्तरातील लोकांना त्यांच्या समजुतीतील विसंगती दाखवून देणार्‍यांचा. पण त्यांचा हेतू चांगला असला तरी लेखक म्हणतो त्याप्रमाणे जुनी व्यवस्था मोडीत काढून त्याऐवजी पर्यायी व्यवस्था न देणार्‍यांचा (For grade-two thinking destroys without having the power to create. It set me watching the crowds cheering His Majesty the King and asking myself what all the fuss was about, without giving me anything positive to put in the place of that heady patriotism.). या सर्वांहूनही पहिला वर्ग शतकात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येणार्‍या कृतिशील विचारवंतांचा. जो केवळ 'सत्य काय आहे?' हे विधान वाद संपवायचे एक साधन म्हणून न वापरता ती एक आव्हानात्मक सुरूवात म्हणून वाट चोखाळतो.

अंनिसची ही कामगिरी 'दुसर्‍या स्तरातील लोकांचा तिसर्‍याशी होणारा संघर्ष' आणि 'विचारांत विसंगती असली तरीही तिला वाट देण्यासाठी नव्या पर्यायी यंत्रणेचा अभाव' या सदरात मोडतं, असं माझं मत. याबद्दल आणि वर उल्लेखलेल्या मुद्द्यांबद्दल आपल्याला काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल.

(एकाहून अधिक विषय असल्याने लेख जनातलं, मनातलं या सदरात टाकला आहे. तो हलवला/काढून टाकला तरी काही हरकत नाही.)

मुक्तकसमाजप्रकटनविचारबातमी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

7 Aug 2009 - 2:08 pm | विसोबा खेचर

हम्म!

सगळ्याचं उत्तर एकच रे - मानवी स्वभाव. ज्याला औषध नाही.

असो,

नंदनसायबा, सुंदर लेख रे..!

तात्या.

विंजिनेर's picture

7 Aug 2009 - 2:19 pm | विंजिनेर

लेख थोडा काही तुटक/अधुरा वाटला..
भय/द्वेष इ. भावना आज जश्या दिसतात तश्या आदिकालापासून दिसत होत्या म्हणजे काय?

काही तग धरून रहायची (सर्व्हायवल इन्स्टिंक्ट) भावना यामागे असावी का?

असं लेखकाला का बरे वाटले?

बाकी, मानव हा समूहात राहणारा प्राणी आहे त्यामुळे वर्चस्व गाजवायचा प्रयत्न (अल्फा मेल्/अल्फा फिमेल) ही सहज प्रवृत्ती आहे.
ती इतर प्राणी शरीर बळावर सोडवितात आपण बुद्धीच्या जोरावर!

जाता जाता: इथे, मनावरचा ताण निवळण्यासाठी वाळवलेला पोलॅक मासा (जो वाळवल्यावर अती चामट होतो) देतात. सगळा राग त्या माश्याचा तुकडा चघळण्यात/चावण्यात निघून जातो असं म्हणतात :)

बाकी, मानव हा समूहात राहणारा प्राणी आहे त्यामुळे वर्चस्व गाजवायचा प्रयत्न (अल्फा मेल्/अल्फा फिमेल) ही सहज प्रवृत्ती आहे.
ती इतर प्राणी शरीर बळावर सोडवितात आपण बुद्धीच्या जोरावर!

मूल तत्त्वज्ञान - विशेषतः निहिलिजम् - असा विचार करायला लावेल, की ही प्रवृत्ती मुळातच अस्तित्त्वात असते की (चुकीच्या अगर बरोबर पद्धतीने) अस्तित्त्वात आणली जाते? म्हणजे समजा तुम्ही व मी आदिम मानव आहोत जे हरीण खाऊन आपली भूक भागवतो. दोघेही स्वतंत्रपणे शिकार करायला गेलो असताना एक हरीण (योगायोगाने) एकाच वेळी दोघांनीही मारले. अशा वेळी आपले पर्याय काय?

१. मी आणि तुम्ही लढायचे. जो जिंकेल हरीण त्याचे; हरलेल्याने दुसरे हरीण शोधावे. मग आपल्या लढाईत कोणाचाही जीव गेला तरी पर्वा नाही. ऑब्जेक्टिव्हिजम् याला मान्यता देईल कदाचित.

२. जे मिळाले आहे, ते हरीण अर्धे अर्धे वाटून खावे. मग पुढचा प्रश्न येतो. जर अर्धे खाऊन माझी भूक भागणार आहे, अशी दोघांचीही खात्री असेल, तर दोघेही याला मान्यता देतील. मग वर्चस्व गाजवण्याचा प्रश्नच नाही. पण तशी खात्री दोघांचीही नसेल तर?

३. हरीण पहिल्यांदा कोणी मारले याची शहानिशा करावी नि त्यानुसार ते कोणाचे हे ठरवावे.

४. हरीणच खाल्ले पाहिजे का? एका हरणाऐवजी पाच ससे मारून खाल्ले तर तेव्हढाच फायदा होईल/तितकीच भूक भागेल; मग तुम्ही हरीण खा, मी पाच ससे मारून खातो (किंवा वाइस वर्सा)

पर्याय ३ व ४ मध्ये 'वर्चस्व गाजवणे' ही सहजप्रवृत्ती असण्याचा काही एक संबंध नाही असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.

मुद्दा फक्त इतकाच की संघर्ष हे तत्त्वज्ञानांचे आहेत. आपल्या आयुष्याचे मूलतत्त्व कोणते यानुसार मनात उगम पावणार्‍या भावना, डोक्यात येणारे/होणारे विचार व त्या सगळ्यांची अभिव्यक्ती असणारी 'कृती' ही संघर्षाची फक्त माध्यमे आहेत.

(समंजस)बेसनलाडू

गोगोल's picture

7 Aug 2009 - 2:48 pm | गोगोल

1. मनुष्यात पशुव्रत भावना नैसर्गिक रित्याच असतात.
2. पुढारलेल्या समाजात त्या भावना सहसा दडपून टाकतात. परंतु एकदा त्यांना कारण मिळाले की त्या उफाळुन बाहेर पडतात.
3. ह्याचे परिणाम वाईट (ज्यूंचा संहार) किंवा निरुपयोगी गोष्टी (मक्केतिल खांबास दगड मारणे, जात्रेत शिव्यांच्या स्पर्धा) असे होऊ शकतात.
4. यातील पहिल्या पर्यायापेक्षा दुसरा बरा कारण त्यात कुणाला नुकसान पोहोचत नाही आणि दडपलेल्या भावनांना वाट मिळते.
5. म्हणून अनिस नि दुसर्या पर्ययातील गोष्टी बंद करण्यात वेल आणि शक्ति खर्च करू नये.

बस्स इतकच.

लेख मुद्देसूद आहे. त्यातील विचार, मांडणीमुळे पटकन पोचले. विचार करतोच आहे; पण काही तात्कालिक विचार जे मनात आले, ते मांडतो (सविस्तर विचारांसाठी व ते मांडण्यासाठी पुरेसा वेळ शोधण्यासाठीची पळवाट म्हणू हवे तर!)

व्यक्तीकडून कुटुंब, तिकडून समुदाय/समाज, मग तिकडून राष्ट्र या 'बॉटम्-अप्' पद्धतीने - १. संस्कार २. व्यक्तीची मानसिक जडणघडण (यात मूळ स्वभावही समाविष्ट करू) व वैचारीक बैठक (यात विचारप्रक्रिया समाविष्ट करू) आणि ३. भावनांची निर्मिती आणि अभिव्यक्ती - यांचा विचार केला तर या सगळ्याचे मूळ हे एखादी व्यक्ती आयुष्याचे मूलतत्त्व म्हणून ज्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार करते, त्यावर बरेचसे अवलंबून असावे, असे वाटते. (अर्थात, असा अंगिकार सब्कॉन्शस्ली होत असावा; संस्कार, मूळ स्वभाव, ज्या वातावरणात वाढतो ते - यात व्यक्ती,घरे, झाडेझुडपे सगळेच आले - या सगळ्यांवर अवलंबून असावा, असे वाटते)उदा.

१. ज्या व्यक्तीने अ‍ॅब्सर्डिजम (अशक्यवाद) चा अंगिकार केला आहे, ती व्यक्ती, मूल्ये, तत्त्वे, व्यवस्था, विचार इ. चे सामान्य तसेच विशिष्ट अर्थ लावण्याच्या किंवा शोधण्याच्या फंदात पडणार नाही (आणि इतर कोणी पडले तर त्यांना वेड्यात काढेल) कारण या तत्त्वानुसार असे अर्थशोधन मानवीय क्षमतेच्या पलीकडचे असल्याने शक्य नाही (ह्यूमन्ली इम्पॉजिबल्) मग अशी व्यक्ती 'उद्दीपित भावनांचा निचरा करण्यासाठीची प्रस्थापित(किंवा प्रस्तावित) व्यवस्था' या व्यवस्थेकडे/प्रणालीकडे शक्यतो पूर्णपणे अलिप्त भूमिकेतून पाहतील (कुंपणावरच्या बघ्यांसारखे; कारण मुळात या सगळ्यात/ला काही अर्थ आहे, हेच त्यांना मान्य नाही) या व्यक्ती नंदनने लेखाच्या शेवटी उल्लेख केलेल्या तीनपैकी कोणत्याही स्तरात बसत नसाव्यात, असा माझा अंदाज) फार फार तर तिसर्‍या स्तरात (अगदीच कुंपणावर बसणे नसेल तरी मूळ तत्त्वज्ञानच लौकिकार्थाने निराशावादाकडे झुकणारे असल्याने समाजव्यवस्थेत उतरायचे(च) झाले तर समूहात राहणे व समूहाचा हात धरून जाणे बरे, जो सबका होगा वोइच्च मेरा भी - अच्छा या बुरा, अशी काहीशी वृत्ती)

२. ज्या व्यक्तीने निहिलिजम चा अंगिकार केला आहे, त्या व्यक्तीच्या मते मूल्ये वगैरे मूलतः अस्तित्त्वात नसतेच; पण चुकीच्या पद्धतीने अस्तित्त्वात आणले जाते. अशी व्यक्ती 'उद्दीपित भावनांचा निचरा करण्यासाठीची प्रस्थापित(किंवा प्रस्तावित) व्यवस्था' याकडे अ‍ॅब्सर्डिजमचा अंगिकार केलेल्या व्यक्तीपेक्षा फार वेगळ्या प्रकारे पाहू शकेल, असे वाटत नाही (कारण जे मुळातच अस्तित्त्वात 'आणले गेले' आहे - नि तेही चुकीच्या पद्धतीने - त्यात 'बरोबर' ते काय आणि ते सुधारावे (रेक्टिफाय करावे) असे तरी काय) त्यामुळे व्यक्तिशः मी अशा व्यक्तींनाही लेखात शेवटी उल्लेखलेल्या कोणत्याही स्तरांत बसवू शकणार नाही, असे वाटते. अगदी ठासून बसवायचेच झाले तर वरीलप्रमाणे तिसर्‍या स्तरात.

३. ज्या व्यक्तीने एग्जिस्टेन्शालिजम् (अस्तित्त्ववाद) चा अंगिकार केला आहे, ती व्यक्ती स्वतःचे अस्तित्त्व जगापासून चार हात लांब राहून जपण्यात इतकी कुशल असते, की संस्कार, मूल्ये, व्यवस्था, घटना, समाज यांचे योग्य अर्थ लावणे; त्यांत लवचिकत आणून त्यायोगे स्वानुभवविश्व समृद्ध करणे आणि त्याबाबत इतरांना जागे करणे (एन्लायटन्) या गोष्टी तिला सहजगत्या जमतात. ही व्यक्ती त्रयस्थ विचारवंताची भूमिका अधिक प्रभावीपणे वठवू शकेल; इतकेच नव्हे, तर प्रस्थापित व्यवस्थांमधील अर्थशोधन तसेच न्यूनशोधन यशस्वीपणे करून त्यावर पर्यायही सुचवू शकेल. अशा व्यक्ती लेखात शेवटी उल्लेखलेल्या पहिल्या तसेच दुसर्‍या स्तरात मोडत असाव्यात, असे मला वाटते.

४. ज्या व्यक्तीने ऑब्जेक्टिविजम् चा अंगिकार केला आहे, ती व्यक्ती ही व्यक्तीस्वातंत्र्याची पुरस्कर्ती, तात्कालिक तसेच शाश्वत सत्याला मान्यता देणारी आणि तारतम्य बाळगून स्वान्तसुखासाठी धडपडण्याला प्राधान्य देणारी असावी. आपापल्या मनिषा पूर्ण करण्याचा अबाधित हक्क प्रत्येक व्यक्तीस असतो, हा या तत्त्वज्ञानाचा मूलसिद्धांत. जसे मी लोकल ट्रेनमध्ये चढलो आणि मला चौथी सीट मिळाली, तर मी बसेन किंवा बसणार नाही; पण मला चौथी सीट मिळू नये, ही माझी मनिषा पूर्ण करण्याचा/होण्याचा हक्क मला आहे नि तो मिळवण्यासाठी मी बाकड्यावर तिसरी किंवा दुसरी जागा मिळेपर्यंत उभेच राहीन कदाचित. त्यासाठी तेथे अगोदरच बसलेल्या व्यक्तीस हुसकावून लावणे मात्र मला मान्य नाही; पण त्याच वेळी मोकळ्या झालेल्या जागेवर माझ्यासोबत आणखी कोणाचा डोळा असेल, तर मात्र मी सर्व शक्तीनिशी स्पर्धा करून माझ्यासाठी जागा मिळवेन. कांदिवलीला बसून उलटे येणार्‍या व्यक्तींना शिव्या देईनच मी; कारण ती माझ्या सीट मिळवण्याच्या हक्कावर व त्यायोगे येणार्‍या सुखावर गदा आहे; पण संधी मिळेल तेव्हा कांदिवलीला बसून मीच सीट मिळवून उलटेही येईन. (या सगळ्या स्पष्टीकरणात 'सीट मिळवणे हे सुख' हे 'ऑब्जेक्टिव्ह' घेतले आहे.) अशा व्यक्ती बहुधा लेखात उल्लेखलेल्या तिसर्‍या स्तरात मोडत असाव्यात, असा माझा अंदाज आहे. या व्यक्ती प्रस्थापित व्यवस्थेचा 'वापर' स्वान्तहिताय कसा करावा, याचे बाळकडू कोळून प्यायलेल्या असाव्यात. अर्थात, असे हितशोधन, सुखशोधन सर्वमान्य 'नैतिक' मार्गांनी करण्याकडे सामान्यतः कल दिसतो.

सबब, 'सगळ्याचे मूळ' हे व्यक्तीने कोणत्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार केला आहे, यात आहे, असे सकृतदर्शनी तरी वाटते. जेथे जेथे संघर्षाचे प्रसंग येतात तेथे तेथे तो संघर्ष या मूल्ये, भावना, संस्कार, समाज इ. चा कमी आणि या मूलभूत तत्त्वज्ञानांचा संघर्ष जास्त असतो, असे मला वाटते.

तूर्तास इतकेच. बाकीच्यांची मते वाचून, विचार करून अधिक चर्चा करायला नक्कीच आवडेल.

(तत्त्वज्ञानी)बेसनलाडू

दशानन's picture

7 Aug 2009 - 3:51 pm | दशानन

बाप रे !

:S

***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)

यशोधरा's picture

7 Aug 2009 - 3:41 pm | यशोधरा

नंदन, बरेच दिवसांनी लिहिलंस. धन्यवाद!
>>ज्याचा त्याचा बागुलबुवा>>>> अगदी, अगदी.

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2009 - 4:43 pm | स्वाती दिनेश

ज्याचा त्याचा बागुलबुवा>>>> अगदी, अगदी.
होहो
नंदन ,बरेच दिवसांनी लिहिलेस आणि उत्तमच लिहिले आहेस.
स्वाती

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2009 - 4:21 pm | प्रकाश घाटपांडे

प्रश्न- हे सारं कुठुन येतं?
उत्तर- हे सार 'आतुन' येतं
प्रश्न- आतुन म्हणजे नक्की कुठुन?
उत्तर- तेच तर आपल्याला शोधायचय.
चला आपण सारे तत्वज्ञान तत्वज्ञान खेळू! अनादी कालापासुन चालत आलेला खेळ व अनंतकाळापर्यंत पुरणारा खेळ
चालू द्यात!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

भोचक's picture

7 Aug 2009 - 4:38 pm | भोचक

विचार करतोय.

बाकी एक खरं. आतलं बाहेर काढण्यासाठीची स्पेस गमावलीय.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2009 - 4:41 pm | प्रकाश घाटपांडे

अंनिसची ही कामगिरी 'दुसर्‍या स्तरातील लोकांचा तिसर्‍याशी होणारा संघर्ष' आणि 'विचारांत विसंगती असली तरीही तिला वाट देण्यासाठी नव्या पर्यायी यंत्रणेचा अभाव' या सदरात मोडतं, असं माझं मत.

सुरेशचंद्र पाध्ये यांच दै.सकाळ मधील अश्रद्ध सश्रद्ध आणि अंधश्रद्ध लेखातील मत पहा."परिणामी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा पुसल्या जातात आणि अंधश्रद्धाच श्रद्धेची जागा घेते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संघर्ष सुरू होतो तो येथे. हा बिंदू नेमका कसा पकडायचा, यावर तोडगा निघत नाही आणि मग वस्तुतः अंतर्यामी मतैक्‍य असलेले दोन श्रद्धावान गट परस्परांशी लढायला उद्युक्त होतात." हे अगदी अचुक निरिक्षण पाध्यांनी मांडले आहे. अत्यंत समर्पक, समतोल साधणारा लेख क्वचितच वाचायला मिळतो. विवेकी परंतु श्रद्धावान लोकांना जोडून घेण्यास अंनिसला अंतर्मुख करायला लावणारा हा लेख आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लिखाळ's picture

7 Aug 2009 - 4:48 pm | लिखाळ

वा ! सुंदर लेख.
शिव्या देण्याच्या प्रथेबाबत अंनिसला काय समस्या आहे ? होळीच्या वेळी बोंब मारण्याबाबत सुद्धा आता ते बोलणार काय?
या प्रथांमागे 'मनातल्या द्वेषभावनेचा, रागाचा निचरा करणे' हा हेतू/भाव आहे हे मला बरोबरच वाटते.

-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2009 - 5:02 pm | प्रकाश घाटपांडे

नणंदेचं कारटं किरकिर करतं, खरूज होई दे त्य़ाला । सत्वर पाव गं मला, भवानी आई, रोडगा वाहिन तुला हे नाथांच्या भारुडातील सासुरवाशिणीच मनोगत देखील नीचराच आहे. आता त्रास देतीय नणंद, बारक पोरग म्हणल्यावर किरकिर करणारच. त्यात त्या बिचार्याचा काय दोष? आईवरच्या रागापायी बिचार्या पोराला खरुज कशाला? हे प्रश्न निरर्थक असतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लिखाळ's picture

7 Aug 2009 - 5:10 pm | लिखाळ

आपली प्रसिद्धी अबाधित राहावी आणि ती मिळवताना कुठला मोठा वर्ग किंवा ताकदवान गट आपल्या विरोधात येऊ नये म्हणून या असल्या साध्या प्रथापरंपरांना 'खरूज होऊ दे' असे काही आहे का? प्रसिद्धीचा रोडगा आपल्याला मिळावा हा हेतू आहे का? (हे प्रश्न आरोप नाहीत तर उत्सुकतेतून विचारत आहे.)
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2009 - 5:25 pm | प्रकाश घाटपांडे

आपल म्हणण खर आहे. ज्या प्रथापरंपरा अनिष्ट आहेत,शोषण करणा-या आहेत त्यांना कालबाह्य प्रथापरंपरांपेक्षा प्राधान्य द्यावे.प्रसिद्धी ही गोष्ट विचारांच्या प्रसारासाठी वापरली जाते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

7 Aug 2009 - 7:16 pm | विकास

प्रकाशराव,

नाथांनी सासू, सासरा, जाऊ, नणंद इतकेच काय अगदी (खवीस असेल कदाचीत म्हणून) नवरा अशा सर्वांनाच काही ना काही (तळपट) होवुदे असे म्हणून शेवटी म्हणले आहे की, "एका जनार्दनी सगळेच जाऊ दे,एकलीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला". अर्थात शेवटच्या एकाच ओळीत नाथांनी घेतलेला असल्या शिव्यांचा यथोचीत परमार्श आणि परीणाम पण सांगणे महत्वाचे आहे. त्या निमित्ताने हे भारूड सगळेच खाली देतो:

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
सासरा माझा गावी गेला
तिकडेच खपवी त्याला, ||भवानी आई ||

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
सासू माझी जाच करिते
लौकर निर्दाळी तिला ||भवानी आई ||

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
जाउ माझी फडफड बोलति
बोडकी कर गं तिला ||भवानी आई ||

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
नणंदेच पोर किर्किर करिते
खरूज होऊ दे त्याला ||भवानी आई ||

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
दादला मारून आहुति देईन
मोकळी कर गं मला ||भवानी आई ||

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे
एकलीच राहू दे मला ||भवानी आई ||

एकनाथ हे समाजात राहून समाजसुधारणा करत होते. स्वतः ज्ञानी होतेच, बुद्धीवंत होतेच. त्यांनीच २००/२५० वर्षे लोपलेल्या ज्ञानेश्वरीचा "जिर्णोद्धार" (शुद्धीकरण) केला. वास्तवीक त्यांना पण स्वतःचा बुद्धीवाद दाखवत रहाता आले असते. पण तसे करून समाज सुधारत नाही हे ते जाणून होते. म्हणूनच एकीकडे गाढवाला पाणी पाज, दुसरीकडे महाराकडे जेवायला जा, तिसरीकडे श्राद्धांच्या भटजींना शब्दाने नाही तर न बोलूनच "फाट्यावर मारणे" असले सगळे प्रकार करत चौथीकडे जनसामान्यांना समजेल करमणूक होईल अशा पद्धतीने भारूड तयार करून लोकशिक्षणाचा प्रयत्न देखील केला. हे सगळे विसरता कामा नये. नाहीतर परत तथाकथीत बुद्धीवादी एखादी ओळ "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" घेऊन "असे कसे म्हणाले एकनाथ" म्हणत बसतील...

लिखाळ's picture

7 Aug 2009 - 7:27 pm | लिखाळ

छान. हे भारूड एकनाथांच्यावरती असलेल्या धर्मात्मा या चित्रपटात मी ऐकले आणि मला फार आवडले.

हे सगळे विसरता कामा नये. नाहीतर परत बुद्धीवादी एखादी ओळ "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" घेऊन "असे कसे म्हणाले एकनाथ" म्हणत बसतील...

एकनाथांनी वैयक्तिक समस्या सोदवण्यासाठी देवाला आळवायला शिकवले यावर मात्र नक्कीच उहापोह करतील काही बुद्धीवादी.
असो.

शहरी जीवनात मोकळेपणा येण्यासाठी आवश्यक असे खेळ-रुढी-गावातल्या पारांसारख्या जागा कमी होत आहेतच. पण शहरी माणसांना त्याचे महत्व सुद्धा वाटत नाहीये असे वाटायला लागले आहे. अंनिससारख्या संस्थांनी उचललेली पावले अश्याच मुळे तर नसतील ना?!

-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

विकास's picture

7 Aug 2009 - 7:44 pm | विकास

एकनाथांनी वैयक्तिक समस्या सोदवण्यासाठी देवाला आळवायला शिकवले यावर मात्र नक्कीच उहापोह करतील काही बुद्धीवादी. (फॉर द रेकॉर्ड आपल्याला "तथाकथीत बुद्धीवादी" असे म्हणायचे असेल असे मी समजतो. नाहीतर मेरीलँडहून कान पकडण्यात येतील ;) )

ज्या अशा (तथाकथीत) बुद्धीवाद्यांना असे एका रात्रीत अंधश्रद्धेचा प्रश्न सोडवायचा आहे, त्यांना सांगा, पर्यावरणाचा धोका हा संपुर्ण मानवजातीला आहे. सगळ्यांनी कार्बनौत्सर्जन करणार्‍या विविध गोष्टी (त्यात उर्जा, इंधन आणि सगळेच अधुनिक रहाणीमान आले) तात्काळ कमी कराव्या लागणार आहेत. होतील का कमी तात्काळ? त्या हळूहळूच होऊ शकतील. नुसते बोलायला गेलात तर सामान्य जनता, सरकार आणि उद्योगधंदे सगळेच सरसावतील...तिथे हळू हळू होणे महत्वाचे मग इथे कशाला ओव्हरनाईट? बरं समाजातील अंधश्रद्धा (रुढी या अर्थाने) कमी झाली नाही आहे का? नक्कीच झाली आहे असे मला वाटते. अजूनही होणे महत्वाचे आहे. पण त्या सुधारणेला वेळ देणे महत्वाचे आहे आणि नंदनने सांगितलेला प्रमुख मुद्दा - आल्टरनेटीव्ह देणे..

नाहीतर देवळातले भारूड बंद आणि गुत्त्यातील देशीदारू तेजीत...

मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, तैसे जनांसी सिकवावे, हळू हळू||
- समर्थ रामदास

Nile's picture

8 Aug 2009 - 4:39 am | Nile

पण शहरी माणसांना त्याचे महत्व सुद्धा वाटत नाहीये असे वाटायला लागले आहे. अंनिससारख्या संस्थांनी उचललेली पावले अश्याच मुळे तर नसतील ना?!

बर्‍याचदा काही त्या त्या काळातील महत्त्वाच्या रुढी, परंपरा किंवा चालीरीती लोप पावत चालल्या आहेत अशी ओरड होते व त्यावर अनेक जण हळहळतातही. पण जर त्या कालबाह्य किंवा ज्या करीता सुरु झाल्या/केल्या होतील ते कारण नाहीसे झाल्याने बंद पडत असतील तर त्यात नवल ते काय.

येथे, त्यांचं जतन करु नका असे प्रतिपादन नाही आहे तर त्या चालीतरी पाळा हा अट्टाहास का हा प्रश्न आहे.

एक उदाहरण म्हणुन: लोकमान्यांनी सुरु केलेला गणेशोत्सव व त्याची कारणं तर आपल्याला सगळ्यांनाच माहीती आहेत. पण आजचा गणेशोत्सव हा त्याच उद्देशाने होतो का? व्हायला हवा का? तर त्या उद्देशाची गरज आज आहे असे मला तरी वाटत नाही. पण 'जर' इतर कोणताही उद्देश त्याने साध्य होत नसेल 'तर' हा उत्सव थांबला तर त्यात मला तरी हळहळण्यासारखं काही आहे असं वाटत नाही.

पण, याच गणेशोत्सवामुळे भारतापासुन सुमारे ८-९ हजार मैलांवरती अजुनही सामाजीक बांधीलकी जोपासली जात आहे हे मी स्वत: अनुभवलं आहे.

लिखाळ's picture

8 Aug 2009 - 4:51 am | लिखाळ

मी असे लिहिले होते...

शहरी जीवनात मोकळेपणा येण्यासाठी आवश्यक असे खेळ-रुढी-गावातल्या पारांसारख्या जागा कमी होत आहेतच. पण शहरी माणसांना त्याचे महत्व सुद्धा वाटत नाहीये असे वाटायला लागले आहे. अंनिससारख्या संस्थांनी उचललेली पावले अश्याच मुळे तर नसतील ना?!

अधोरेखीत वाक्यावर अवलंबून असे पुढले वाक्य आहे. आणि त्यामुळे मी प्रथा बंद पडण्याबाबत चिंतीत नसून अधोरेखीत वाक्यातील तत्त्वाकडे शहरी माणसे दुर्लक्ष करीत आहेत असे वाटून सचिंत आहे. नंदनने ज्या कडे निर्देश केला आहे ती भावनेचा निचरा करुन देणारी एक वाट अंधश्रद्धा या नावाखाली बंद होणार असे वाटल्याने सर्व काही लिहिले.

-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

Nile's picture

8 Aug 2009 - 4:57 am | Nile

तुमचा प्रतिसादाला उत्तर म्हणुन(आणि जरी तुमचं वाक्य quote करुन) मी प्रतिसाद दिला असला तरी तो तुम्ही असे म्हणता या अर्थी नव्हता. म्हणुनच मी सुरुवात "बर्‍याचदा ...अशी ओरड होते" अशी केली आहे. :)

प्रकाश घाटपांडे's picture

9 Aug 2009 - 9:47 am | प्रकाश घाटपांडे

नाहीतर परत तथाकथीत बुद्धीवादी एखादी ओळ "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" घेऊन "असे कसे म्हणाले एकनाथ" म्हणत बसतील...

अगदी खर आहे. कधी कधी हेच लोक सोयीचा"कॉन्टेक्स्ट" मात्र घेतात
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

7 Aug 2009 - 6:58 pm | विकास

शिव्या देण्याच्या प्रथेबाबत अंनिसला काय समस्या आहे ?

या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. मात्र अनिसचा पुढचा हल्ला (याच कारणास्तव) मिपावर होणार अशी माझी "भविष्यवाणी" आहे. ;)

दत्ता काळे's picture

7 Aug 2009 - 5:56 pm | दत्ता काळे

अशा वेळी अंनिसने अशा 'ब्लेसिंग इन डिस्गाईज' असणार्‍या प्रथा बंद करण्यात ऊर्जा वाया घालवणे कितपत योग्य आहे? अशी अस्वस्थ ऊर्जा मग प्रथम भडक उक्तीकडे आणि अपरिहार्यपणे विध्वंसक कृतींकडे वळत असेल का?

- वरचे वाक्य वाचून माझा काहीतरी गोंधळ होतोय ( कदाचित माझ्या समजण्यातही असेल)
वाया जाणारी आणि नंतर ती अस्वस्थ होऊ शकणारी ऊर्जा कुणाची ? अनिस असेलतर ती भडक उक्तीकडे आणि विध्वंसक वृत्तीकडे कशी वळेल ? कारण, तुम्ही म्हटल्याप्रमाणे दुसरा स्तर हा अधिक विचारी व्यक्तींचा. अंनिस त्यातच मोडत असावे. तरमग विचारी व्यक्ती, कि ज्या अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम समाजाला बरोबर घेऊन करतात, त्या विध्वंसक कश्या होऊ शकतील ?

मनिष's picture

8 Aug 2009 - 1:33 am | मनिष

विल्यम गोल्डिंगची ३ स्तरातली विभागणी थोडी बाळबोध आणि ढोबळ वाटत असली तरी त्यात तथ्य आहे. मला वाटते की दुसर्‍या स्तरातील वर्गाला पर्याय न देण्यातली अपरीहार्यता आणि अनुषंगाने येणारी विफलता जाणवली की येते ती एक उदासीन निष्क्रियता, बहुतेक शहरी, मध्यमवर्गीय समाज हा असा असतो, असे मला वाटते.

बेसनलाडू ह्यांनी म्हटल्याप्रमाणे 'तत्त्वज्ञानाचा अंगिकार' ही एक बाजू आहेच, पण सर्व वेळेस आपण *एकाच* तत्वज्ञानाने नाही वागत; प्रत्येकात ह्या विविध (सगलेच नाही) तत्त्वज्ञानांची सर्मिसळ असते असे वाटते - अर्थात काही तत्त्वज्ञानांचा जास्त पगडा/प्रभाव असू शकतो.

एक उत्तम वैचारीक लेख! :)

(खुद के साथ बातां : ह्या नंदनचे वाचन बघितले की थक्क व्हायला होते, मी पुस्तकातला किडा आहे बदलून मी चाळतो पुस्तके अधुन-मधून असे म्हणावसे वाटते! ;) काय कय आणि किती वाचतोस रे? बेला आणि नंदन हे चलतेबोलते एन्सायल्कोपीडीया आहेत खरच!)

बेसनलाडू's picture

8 Aug 2009 - 3:22 am | बेसनलाडू

पण सर्व वेळेस आपण *एकाच* तत्वज्ञानाने नाही वागत; प्रत्येकात ह्या विविध (सगलेच नाही) तत्त्वज्ञानांची सर्मिसळ असते असे वाटते - अर्थात काही तत्त्वज्ञानांचा जास्त पगडा/प्रभाव असू शकतो.
याच्याशी बराचसा सहमत. परिस्थितीजन्य विचार व वर्तणूक हे या सरमिसळीचे फलित असावे, असे वाटते. मात्र सर्वसाधारण मानवी आयुर्मर्यादेत एक 'ढोबळ', जास्त पगडा असलेले तत्त्वज्ञान हे जीवनाचे मूलतत्त्वज्ञान म्हणून रुजते आणि लेखातील मुद्दा संघर्षभावनेबद्दल असल्याने अशा संघर्षाच्या ठिकाणी या तत्त्वज्ञानाशी फारकत घेणारे दुसरे तत्त्वज्ञान दुसर्‍या बाजूने समोर आले की त्यांचा संघर्ष होतो, असे वाटते.
(चिंतनशील)बेसनलाडू

मुक्तसुनीत's picture

8 Aug 2009 - 9:56 am | मुक्तसुनीत

लिखाण बहुपदरी आहे. मनात अनेक विषय, अनेक संदर्भ जागे असल्याचे जाणवले. मात्र प्रस्तुत बहुस्तरीय लिखाणामधे विस्कळितपणा जाणवला ; जो खुद्द लेखकाने लेखाअंती मान्य केला आहे. एकमेकांचे अवकाश व्यापून असणारे , प्रसंगी छेद देणारे मुद्दे आहेत ; परंतु त्यांमधून काही एक बोधस्वर coherence असा मला जाणवला नाही. मात्र लेखाचा आस्वाद जरूर घेतला.

अनेक मुद्द्यांचा परामर्श घेता येईल. सर्वप्रथम प्रमुख गोष्ट : अंनिस ने या प्रथेला दाखवलेला विरोध आणि त्यातून या , प्रथमदर्शनी बिननुकसानीच्या विरेचक (cathartic) - आणि विरेचक म्हणून एका अर्थाने उपकारक - प्रथेला थांबण्याचा धोका.

- शिवीगाळीचा कार्यक्रम केवळ शाब्दिक देवघेवीपुरता मर्यादित आहे असे आपण इथे धरून चालतोय. थोडक्यात शिव्यांचे रुपांतर हाथापाईवर येणारच नाही असे एक गृहितक आहे. या गृहितकाच्या ग्राह्यतेचा थोडा विचार हवा.

- शिव्यांची तीव्रता हा मुद्दा पूर्णपणे विसरला जावा असे मला वाटत नाही. शिव्या विरेचक म्हणून - थोडक्यात ज्याला "भडास" काढणे असे म्हणतात तशा आहेत (असे लेखक स्वतःच म्हणतो.) तसे असल्यास शिव्यांची तीव्रता, त्यातील लैंगिकता , हिंसक भाव non-trivial असणे धरून चालायला हरकत नाही. आई-बहीण आणि इतर नातेवाईकांचा लैगिक उद्धार , धमकीवजा हिंसक शिव्या हे सगळे विरेचक आहे की भावना भडकाविणारे याचा विचार केला जाऊ शकतो.
- या गालिप्रदानात एक कायदेशीर मुद्दा येऊ शकतो : जातीवाचक शिव्या. माझ्या अल्प माहितीप्रमाणे , जातीवाचक शिव्या हा दखलपात्र गुन्हा आहे. ग्रामीण भागातल्या शिव्या जातीवाचक सोडून नक्की कशा असतील याची मला कल्पना थोडी अवघड वाटते.

- १८ वर्षांखालच्या मुलांना हे गाली-आदान-प्रदान ऐकायला येऊ नये म्हणून काही विशेष खबरदारी घेतली असेल - पर्यायाने एका बंदिस्त (secluded) वातावरणात हा कार्यक्रम चालत असेल काय ? नसावा असे मला वाटले. ( याबाबत माझ्याकडे पुरावा किंवा स्पष्टीकरण नाही.)

एकूण या बाबतीत आंनिस ला झोडपणे म्हणजे typical liberal hogwash वाटायला लागलेला आहे. अंनिस ची एक बैठक मी स्वतः पाहिलेली आहे. माझ्या मते , ते लोक जे काम करतात त्याची तुलना फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावणे अशी मी माझ्यापुरती करतो. आता , या संदर्भात , "या लोकांवर हे ठिगळ लावल्यामुळे तुम्ही त्यांचे social fabric खराब करता आहात " असे कुणी म्हण्टले तर अंनिस किंवा त्यांच्या समर्थकांनी कितपत गांभीर्याने घ्यावे याचा मला प्रश्न पडला आहे.

लेखातल्या इतर, चिंतनस्वरूपी बाबी मला (येथील इतर वाचकांप्रमाणे) आवडल्या. गोल्डींग या नोबेलविजेत्या लेखकाचा परिच्छेद मननीय वाटला. लॉर्ड ऑफ द फ्लाईज , प्रस्तुत परिच्छेद वगैरे गोष्टींमधून माणसाच्या स्वभावधर्माबद्दल अखंड चिंतन करणारा माणूस अशी त्याची प्रतिमा दृढ होते. मात्र अंनिसची तुलना इतक्या एका घटनेवरून "नवे पर्याय न देता जुने पर्याय काढून घेणारा घटक" असे करणे मला काय पटले नाही. याबाबत थोडा दिलगीर आहे.

नितिन थत्ते's picture

9 Aug 2009 - 8:31 pm | नितिन थत्ते

शिव्या देण्याच्या प्रथेविरोधातील अंनिसच्या प्रस्तावित आंदोलनाच्या निमित्ताने अनेक धागे निघाले आहेत. त्यावरचे माझे मत

१. या किरकोळ गोष्टीवर अंनिस वेळ फुकट दवडत आहे याच्याशी सहमत.
शिव्या देण्याच्या उत्सवात काय प्रकारच्या शिव्या दिल्या जातात हे माहिती नाही. मी होळीच्या उत्सवात ऐकलेल्या शिव्या अर्थहीन असत. म्हणजे बैलाला ... वगैरे (यात काही ही आणि हि अर्थ असला तर तो मला माहित नाही). पण रस्त्यावरील सामान्य भांडणात ज्या शिव्या स्त्री-पुरुष देतात त्या साधारणपणे स्त्रियांविषयी वाईट साईट लैंगिक उल्लेख करणार्‍याच असतात. (साल्या आणि लेका हेही असेच शब्द आहेत) तर तसल्या शिव्या दिल्याजात असतील तर तो समारंभ बंद झाला तर बरे असे मी म्हणीन पण पुन्हा त्यासाठी आंदोलन करावे इतका तो महत्त्वाचा नाही असे वाटते.

२. नवा पर्याय द्यायलाच हवा हे पटत नाही

३. असे उत्सव निचरा करणारे म्हणून आवश्यक असे म्हटले आहे. परंतु होळीच्या वेळी आग न पेटवता नुसत्या शिव्या द्या असे म्हटले तर कुणाला मान्य होणार आहे का?

४. एखादी रूढी काही उद्देशाने सुरू होतही असेल. परंतु नंतर गरज संपल्यावरही त्याची फोलकटे उडून जात नाहीत. मंगळागौरीच्या किंवा भोंडल्याच्या खेळांतले बहुतेक खेळ ९-१० वर्षे वयाच्या मुलींचे आहेत. त्या मुलीच्या मानसिक वाढीला योग्य असे आहेत. परंतु आज २५+ वयाची नववधू आणि तिची ५०+ वयाची सासू हे खेळ (स्वतः) खेळण्याच्या बाबत उत्साही दिसल्या तर त्यात केवळ रूढीप्रियता म्हणावी लागेल. एखादी १८-१९ वर्षांची मुलगी भातुकली खेळताना दिसली तर तिला मानसिक आजार असावा असे आपण म्हणतो. परंतु मंगळागौरीत मात्र त्या सासू/सुनेचे कौतुक होते.
सामाजिक प्रगती हळूहळू व्हावी हे मान्य केले तरी रूढींमधला फोलपणा हा दाखवायलाच हवा. आणि तो दाखवला तर अंनिसला (किंवा तसल्या कुणालाही) धोपटू नये हे ही महत्त्वाचे.

अंनिस वेळ/शक्ती फुकट घालवत आहे यावर पुन्हा सहमत.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

१० ऑगस्टच्या "टाईम" साप्ताहीकात Why swearing is good for you म्हणून लेख आला आहे. जालावर त्याचे शिर्षक थोडे वेगळे आहे: Bleep! My Finger! Why Swearing Helps Ease Pain

आत्यंतिक त्रासाच्या वेळेस शिव्या दिल्या तर त्याचा उपयोग वेदना कमी होण्यासाठी होतो हा शास्त्रीय प्रयोग ब्रिटन मधील Keele University करून पाहीला आहे.

असे देखील लक्षात आले आहे की त्याचा उपयोग (वेदना नाशक म्हणून) हा स्त्रीयांना जास्त होतो. पुरूषांना न होण्याचे कारण, पुरूष उठसुठ शिव्या देत बसतात, परीणामी कुठल्याही औषधाप्रमाणे त्याचा उपयोग कमी होवू लागतो :-(

तात्पर्य: अनिस आणि तत्सम संघटनांना हा वैज्ञानिक दाखला देऊन, अधुनिक विज्ञानास योग्य म्हणून "शिव्या देण्याचे" कार्यक्रम चालू करायला हरकत नाही. सोपी पद्धत ज्या अनिष्ठ प्रथांना सोडायचे असेल त्यांना शिव्या देण्यास सुरवात करायची. ही "अनिस्ट" प्रथा ताबडतोब लोकप्रियता मिळवेल आणि पाठींब्यामधे प्रचंड प्रमाणात वाढ दिसेल! ;)

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2009 - 9:39 am | प्रकाश घाटपांडे

'अनिस्ट' प्रथा चालु करण्याची आयडिया आवडली
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आवडला. गोल्डिंगच्या लेखाचा दुवाही चांगला. (मला असे वाटले की - उच्च कोटीचा विचारवंत होणे फार थोड्यांना जमते, तेव्हा दुसर्‍या वर्गाचा विचारवंत तरी व्हावे, असा काही मथितार्थ लेखाचा आहे. उच्च कोटीचा होणे जमत नाही म्हणून तिसर्‍या दर्जाचे व्हावे, किंवा विचार करणे व्यर्थ आहे असा काहीच अर्थ मी त्यातून काढू शकलो नाही.

नागपंचमीच्या शिवीगाळाबद्दल अंनिसची स्वतःहून भूमिका वाचायला आवडेल. त्यांच्या संकेतस्थळावर काही सापडत नाही. त्यांच्या संकेतस्थळावर नागपंचमीच्या वेळेला नागाची पूजा करण्याच्या नादात अनेक नाग मारण्यात येतात, त्याबद्दल लिहिले आहे.

मन's picture

10 Aug 2009 - 9:42 pm | मन

तितकीच उत्तम, यथासांग चर्चा.

आपलाच,
निव्वळ वाचक
मनोबा