एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १५

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
28 Jun 2009 - 2:23 pm

(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)

आधीचे भाग येथे वाचा :
भाग एक - http://misalpav.com/node/8127
भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/8149
भाग चार - http://misalpav.com/node/8172
भाग पाच - http://www.misalpav.com/node/8189
भाग सहा - http://www.misalpav.com/node/8204
भाग सात - http://www.misalpav.com/node/8219
भाग आठ - http://misalpav.com/node/8233
भाग नऊ - http://misalpav.com/node/8251
भाग दहा - http://misalpav.com/node/8282
भाग अकरा - http://www.misalpav.com/node/8295
भाग बारा - http://misalpav.com/node/8309
भाग तेरा - http://misalpav.com/node/8326
भाग चौदा - http://misalpav.com/node/8349

२५ नोव्हेंबर

च्यायला! या कॉर्पोरेशनचा कारभार पण भारीच आहे. इथे प्रत्येकजणाला मान्यवर ही उपाधी सहज मिळते. तो आमच्या पलीकडच्या गल्लीतला दत्त्या, साला पक्का गुंड. चांगल्या तीस चाळीस केसेस होत्या अंगावर. वर बाई-बाटलीचा शौकिन. सगळ्या एरीयातल्या पोरी त्याला टरकुन असायच्या, अजुनही असतात. पण नंतर अचानक राजकारणात घुसला अन गेल्या टर्मला कॉर्पोरेटर पण झाला. आता एकदम शानमधे आहे - तीन तीन कार घेतल्यात अन चांगला मोठा बंगला बांधलाय त्या विधवा कचरे आजींची जागा बळकावुन. नाक्यावर फूट्पाथ अडवून दोन मजली बिल्डींग पण बांधलीय ऑफिसची. दर्शनी भागात देउळ बांधुन जणु त्या अतिक्रमणाचा विमाच काढ्लाय. दोन शब्द नीट बोलता येत नाही साल्याला, पण जीबीत नुसती हुल्लड्बाजी करतो. अन त्याला आयुक्तांपासुन सगळे माननीय म्हणतात. पहिल्यांदा ऐकले तेव्हा ठ्ठ्या करुन हसलो होतो. सगळे टकामका बघायला लागले तेव्हा कसेतरी हसु आवरले.

बर हा माज फक्त माननीय म्हणवुन घेण्यापुरताच नाही. इथे रोज यायला लागलो तेव्हा लक्षात आले दत्त्याचा खूपच वट आहे पालिकेत. रोज अंगावर बारा-पंधरा तोळे घालून दुपारी येतो तेव्हा दागीने नुसते चमकत असतात. अगदी कावीळ झाल्यागत पिवळा दिसतो तो. कुठ्ल्याही अधिकार्‍याच्या, अगदी आयुक्तांच्यापण, केबिनमधे बिनधास्त दार लोटून आत शिरतो अन हव्या तिथे सह्या घेतो. बरेच सीनीअर कॉर्पोरेटर पण त्याच्या पुढे पुढे करतात, अधिकार्‍यांनी वेगवेगळ्या कारणांनी अडवलेली कामे करुन घ्यायला. प्रत्येक कामात म्हणे त्असतो.`वाटा' असतो. परवा तर पार राडा केला. पावसात उखडलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे टेंडर मगितले होते, तब्बल साडेचार कोटींचे. निविदा दाखल करण्याच्या मुदतीआधीच तीन कंत्राट्दारांनी फिल्डींग लावली होती, पार अधिकार्‍यांना खिशात घातले होते त्यांनी. कुजबुज सगळीकडे एकच, सगळी कामे तिघे वाटून घेणार म्हणुन. पण शेवटच्या दिवशी एकदम सीन चेंज. दत्त्या एका चौथ्याच कंत्राटदाराला गाडीत घेउन आला. मागोमाग चार्-पाच गाड्यात त्याची पन्नास्-साठ मुले पण होती. आल्या आल्या पार्किगमधेच काढ्लेना त्याने हत्यार महाराज अन ठोकल्या चार पाच गोळ्या हवेत. सगळी पळापळ नुसती. मग सगळी गँग गेली टेंडर अर्ज स्वीकारणार्‍या इंजिनिअरच्या ऑफिसात. तिथे ते तीन कंत्राट्दार बसले होते त्यांची तर चड्डी पिवळी व्हायची वेळ आली पार. दत्त्यानं त्यांच्या हातातली निविदांची पाकिटं हिसकावुन फाडून टाकली अन त्या इंजिनिअरला भरला दम, दुसर्‍या कुणाचे टेंडर घेशील तर बायकोला अन पोरांना उडवुन टाकेन म्हणुन.

काल सगळ्या पेपरात बातम्या छापुन आल्यावर पोलिसात फिर्याद केली आयुक्त घोळेसाहेबांच्या आदेशावरुन पण अजुन काही कारवाई नाही. पोलिसांना साक्षीदारच मिळत नाहीत म्हणे. कसे मिळणार? चांगले आहे. हेच चालु देत पुढेही मग मिळतील शहराला चांगले रस्ते!

***
१ डिसेंबर

निवडणुका जवळ आल्यात तसे राजकीय वातावरण तापत चाललेय. कश्यावरून राजकीय वाद होतील त्याचा भरवसा वाटत नाही.

कालपासून एका नव्याच वादाला तोंड फुटलेय. त्या भवानीनगरमधे काही वर्षांपुर्वी कोणितरी एक वेडा आला अन त्याने ठोकला मुक्काम रस्त्याच्या कडेला. उन्हा-पावसात भिजत तसाच पडून राही बिचारा. पण मग भुमका उठली काही जुगार्‍यात की तो खुणेने मटक्याचे लक्की आकडे रोज बरोब्बर सांगतो. मग काय! लाईन लागायला लागली रोज लोकांची त्याच्याकडे, भेटी काय, नमस्कार काय.... सगळे सुरु झाले. बरेचजण स्वतःला त्याचे भक्त पण म्हणवून घ्यायला लागले. अन एक दिवस त्याच्या डोक्यावर एक पत्र्याचे छ्प्पर आले अन नंतर तर तिथे एक पक्के बांधकाम पण झाले.

पालिकेला तिथे रस्तारुंदी करायची होती पण त्या बांधकामाचा अडथळा होत होता. दोन दिवसांपुर्वी पालिकेने ते अतिक्रमण काढ्ले अन वातावरण तापत गेले.

तिकडे बांधकाम काढ्ण्याची कारवाई सुरु असतानाच एका पक्षाने पालिकेवर मोठ्टा मोर्चा काढ्ला, साधूपुरुषाचा मठ पाडला अन धार्मिक भावना दुखावल्या म्हणुन. थोडया वेळाने दुसर्‍याच एका पक्षाने मोर्चा काढ्ला पीरसाहेबांचा अपमान झाला म्हणुन. त्यातुन बराच वेळ दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जातीय राज़कारणाचे आरोप केले अन नवीनच जातीय वाद सुरु झाला.

आता त्या जागेवरची कारवाई थांबवली आहे अन तिथे कडेकोट बंदोबस्त आहे. काल पालिकेच्या जीबीत तर तिथे एक मठ नव्याने बांधण्याचा निर्णय पण घेतला.

आज संपादक आगलावे म्हणाले, तिथे जाउन त्या माणसालाच विचार त्याचा धर्म कोणता ते. आज सकाळी गेलो होतो. विचारले त्याला तसे तर शिष्यातच भांडणे सुरु झाली. तो माणुस मात्र तसाच नागडा उघडा झोपुन राहीला, काहीच उत्तर न देता. परत निघालो तर एक भक्त म्हणाला, "बघा किती थोर विभूती आहेत महाराज. तुम्ही असा प्रश्न विचारून जातीय तेढ वाढवताय ते लगेच लक्षात आले त्यांच्या अन सगळ्या समाजाचे हित लक्षात घेउन उत्तरच नाही दिले प्रश्नाला."

***
५ डिसेंबर

त्या लोचे कॉर्पोरेटरने केलेला आरक्षणाचा घोटाळा तर आता बाजुलाच पडलाय. पोलिसांकडे सिटी इंजिनिअर धरसोडेंनी फिर्याद दिली होती त्यावर अजुन काहीच कारवाई झालेली नाही. लोचे, त्याचा पार्टनर अन त्या प्रकरणात ज्यांची नावे आली त्या सगळ्या अधिकार्‍यांनी अटकपुर्व जामीन मिळवलाय. विरोधी पक्षाने हायकोर्टात दाखल केलेली याचिका तर अजुन सुनावणीलाच आलेली नाही. अँटी करप्शनवाल्यांच्या तपासाचे पुढे काय झाले ते पण कळत नाही. त्यांना विचारले तर फक्त तपास अजुन सुरु आहे एव्हडेच उत्तर येते. पालिकेने स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल उद्या सादर होणार आहे तेव्हा बघू पुढे काय होते ते.

***

६ डिसेंबर

पालिकेने सगळ्यांचा पार कात्रजचा घाट केलाय! त्या आरक्षण घोटाळ्याबाबतच्या चौकशी समितीने आज अहवाल सादर केला पण आयुक्त घोळेसाहेबांनी त्यात काय आहे याबाबतची काहीच माहीती दिली नाही. आधी आम्ही अभ्यास करु, मग अहवाल पक्षनेत्यांपुढे मांडू त्यानंतर तो जीबीपुढे ठेवू एव्हडेच म्हणाले. अहवालात काय आहे त्यावर तर्कटे लढवतायत सगळे. त्या दिवसभर न्यूज चॅनेलवर तर तेव्हडीच चर्चा सुरु आहे सकाळपासुन. कुठले कुठले तज्ञ बोलावलेत स्टुडिओमधे ते एकच दळण सुरु आहे. गम्मत म्हणजे त्या तज्ञांनापण अहवालात काय म्हणले आहे ते माहीती नाही पण तरी ते आपापली मते ठामपणे मांडत आहेत. संपादक आगलावेंनी पण आज बाराथे साहेबांना सांगुन एक अग्रलेख लिहुन घेतलाय. तसे संपादक आगलावे पण हुशार आहेत, स्वतः नाही लिहिला अग्रलेख! उद्या काही अंदाज-आडाखे चुकलेच तर त्यांच्यावर जबाबदारी नको!

कथाविनोदविडंबनसमाजनोकरीमौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

28 Jun 2009 - 3:41 pm | श्रावण मोडक

संपादक आगलावेंनी पण आज बाराथे साहेबांना सांगुन एक अग्रलेख लिहुन घेतलाय. तसे संपादक आगलावे पण हुशार आहेत, स्वतः नाही लिहिला अग्रलेख! उद्या काही अंदाज-आडाखे चुकलेच तर त्यांच्यावर जबाबदारी नको!
खासच.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jun 2009 - 4:39 pm | प्रकाश घाटपांडे

गम्मत म्हणजे त्या तज्ञांनापण अहवालात काय म्हणले आहे ते माहीती नाही पण तरी ते आपापली मते ठामपणे मांडत आहेत.

यालाच तर तज्ञ म्हणतात.यांना पुरोगामी पण म्हणतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ह्या वाक्यासाठी तर खास दाद ...