साम्राज्य बुरख्यामागचे - द व्हेल्ड किंग्डम : मूळ लेखिका -- कारमेन बिन लादेन

मैत्र's picture
मैत्र in जनातलं, मनातलं
13 Feb 2009 - 2:50 pm

एकदम वेगळं मुखपृष्ठ आणि नाव वाचून कुतूहलाने एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि संपल्यावरच खाली ठेवलं.
मूळ लेखिका: कारमेन बिन लादेन. अनुवाद - अविनाश दर्प, न्यूझीलंड. मेहता पब्लिशिंग हाऊस.
परीक्षण लिहावं असं लिखाणात विशेष नाही. पण परिचय लिहावाच असं पुस्तक फार महत्त्वाचं आहे असं वाटलं. ते वाचायला मिळालं तर उत्तमच पण नाही जमलं तर गोषवारा इथे द्यावा आणि पुस्तकापेक्षा त्या संदर्भात काही चर्चा व्हावी असं वाटलं... क्रमशः चा लागण न करता एक मोठं लिखाण मांडतो आहे.

कारमेन ही बिन लादेन कुटुंबातली एक सून. ओसामा बिन लादेन च्या अनेक भावांपैकी एकाची बायको. ९/११ च्या अनेक वर्षे आधी घटस्फोट घेऊन बाहेर पडलेली. ९/११ नंतर तिच्या नावामुळे तिला आणि तिच्या मुलींना प्रसिद्धी माध्यमांनी काही प्रमाणात लक्ष्य केलं होतं आणि कारणाशिवाय त्यांनीच हे कारस्थान रचल्याचे आरोपही झाले. तिने पुढे माध्यमांसमोर हे सर्व नाकारलं व आपली भूमिका व पार्श्वभूमी स्पष्ट केली. तिचं आणि तिच्या मुलीचं आयुष्य आणि पर्यायाने सौदीचं खरं रुप जगापुढे यावं या विचारातून कारमेन ने हे लिहिलं आहे. भाषांतरकाराने प्रस्तावनेतच म्हटल्या प्रमाणे याचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय साधेपणाने, संयमितपणे, कुठला अभिनिवेश न ठेवता या पडद्याआडच्या समाजाचं एक चित्र रेखाटलं आहे. आपल्या डायरीची काही पानं एका इतिहासवजा पुस्तकात त्रयस्थ पणे मांडावी इतकी सहजता यात आहे. कदाचित हेच याचं प्रबळ स्थान आहे. कारण "स्वातंत्र्य" ही एकच भावना किंवा उद्दिष्ट सोडता बाकी सर्व विचार हा वाचकाच्या विचारसरणीवर आणि ज्ञानावर सोडला आहे. सौदी, इराण, अफगाणिस्तान, अमेरिकेचे, सोव्हिएटचे तत्कालिन धोरण, आणि ९/११ अशा संपूर्ण इतिहासावर विचार करायला अगदी भाग पाडतं.
----------------------------------------------------------------------------------------------
कारमेन - खानदानी पर्शियन आई आणि स्विस ख्रिश्चन वडील, जिनिव्हामध्ये वास्तव्य आणि जुना रईस अन सुसंस्कृत सुधारणावादी इराणी आजोळ अशा वेगळ्याच वातावरणात वाढलेली मुलगी. ६० च्या दशकात आजोळी पर्शिया मध्ये खूप मोठं घर, जुनं लाकडी काम, पुस्तकं, पोहण्याचा तलाव अशा इराणशी संदर्भ न जोडता येणार्‍या ठिकाणी या मुली मजेत राहत असत. ती नऊ वर्षाची असताना तिचे वडील त्यांना सोडून गेले व परत त्यांचा संपूर्ण आयुष्यात काही संपर्क आला नाही. आईने चार मुलींना मुस्लिम धर्म सांभाळून पण एकदम मोकळ्या वातावरणात वाढवलं. रुढी-परंपरा गरजेइतक्याच ठेवल्या. स्विसमध्ये बुरखा वगैरे न घालता पाश्चिमात्य जीवन पद्धतीने आपल्या इच्छांप्रमाणे शाळा व कॉलेज पर्यंत एका स्विस नागरिकाप्रमाणेच राहिल्या. सुमारे १९७० मध्ये उन्हाळ्यात घर भाड्याने देताना तिची येस्लाम नावाच्या एका उमद्या देखण्या तरुणाशी ओळख झाली. बीटल्स आणि एल्विस च्या त्या स्वतंत्र काळात तिला तो आवडला. तोही या धाडसी आणि सुंदर मुलीच्या प्रेमात पडला आणि लवकरच रीतसर एंगेजमेंट झाली. काही काळ अमेरिकेत शिक्षण घेऊन दोघं स्वित्झर्लंड मध्ये परतले. पारंपारिक सौदी पद्धतीने १९७४ मध्ये जेद्दा मध्ये त्यांचं लग्न झालं आणि तिच्या बुरख्याआडच्या विश्वाची सुरुवात झाली. पावला पावलाला तिला आश्चर्याच्या आणि बंधनाच्या ठेचा लागत राहिल्या ते सौदी कायमचे सोडेपर्यंत. तिचं कायदेशीर लग्न चक्क राजाच्या परवानगीने झालं आणि कचेरीत जाता येणार नाही म्हणून ते रजिस्टर येस्लामने पार्किंगमध्ये आणलं व तिथे सही करून ती विवाहित झाली!

बिन लादेन कुटुंब: शेख महंमद बिन लादेन यांचा जन्म येमेन मध्ये झाला. एक गरीब अशिक्षित कामगार म्हणून ते सौदी मध्ये आले. बांधकामाची कामे करत ते राजाच्या खास मर्जीतले झाले. हळू हळू सौदी मधली अनेक महत्त्वाची कामे बिन लादेन कंपनीला मिळाली. त्यांनी बावीस लग्ने केली आणि त्यांना चोपन्न अपत्ये होती. ते विलक्षण धाडसी, यशस्वी आणि स्वकेंद्रित होते. राजा अब्दुल अझीझ ताऐफ़ यांच्या साठी जेद्दपासून डोंगराळ भागातल्या रस्त्याचं कंत्राट कमी किंमतीत घेऊन पूर्ण केलं. वेळेला राजाच्या नोकरांचे पगारही त्यांनी दिले आणि राजाची / राज्याची लाज राखली. बिन लादेन कुटुंब आणि कंपनी ही राजघराण्याशिवाय सर्वात शक्तिशाली संस्था झाली. त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यावर बाक्र, सालेह या मोठ्या मुलांनी आणि येस्लाम ने व्यवसाय सांभाळला आणि खूप मोठा केला. पुढे मक्केचं पुनर्निमाणाचं बांधकामाचं काम मिळाल्यावर त्यांचं नाव, वजन आणि संपत्ती प्रचंड प्रमाणात वाढली.
ओसामा हा येस्लामच्या अनेक भावांपैकी एक भाऊ होता.
पितृसत्ताक पद्धतीचा इतका जबरदस्त पगडा या देशावर होता आणि आहे की स्त्रियांना कुठलेही स्थान नव्हतं. येस्लाम च्या आईचं नाव होतं उम येस्लाम. स्त्रीच्या स्वत:च्या नावाचा फ़ारसा अर्थ आणि उपयोग नव्हताच. पहिला मुलगा झाला की त्याच्याच नावाने ती ओळखली जाई. कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्यच नाही. अमेरिकेचा प्रभाव वाढेपर्यंत घरं उदास, बटबटीत, आणि अस्वच्छ होती. संपूर्ण आयुष्य स्त्रिया घरातच राहतात. वडील व पती सोडून इतर कोणीही चेहरा किंवा अगदी पाय सुद्धा पाहणं पाप / निषिद्ध आहे. विमानातून उतरल्यापासून संपूर्ण शरीर झाकणारा 'अबाया' हा पोशाख घालणं अत्यंत आवश्यक होतं. घरातील नोकर सुद्धा तुम्हाला बघू शकत नाहीत. घरात सर्व कामांना नोकर होते त्यामुळे काही विशेष काम नसलेल्या या सगळ्या बायकांना कुराण आणि अखंड नवीन मूल याच्या पलिकडे आयुष्यच माहीत नव्हते. आणि तेच योग्य आहे अशी ठाम समजूत होती. बहुतेकींना कारमेनचं मोकळं मनाप्रमाणे वागणं बिलकूल नाकबूल होतं.
नोकर ही फ़क्त ’वस्तू’ समजली जात होती. त्याला थॆंक्यू वगैरे म्हणणं किंवा नुसतं सभ्यपणे वागणं हे काही हलक्या दर्जाचं आणि चुकीचं आहे असाच ठाम विश्वास होता आणि घरातल्या स्त्रियांनाही त्याचं आश्चर्य आणि खेद वाटायचा. पण त्यातही स्त्री ही त्याहून खालच्या दर्जाची. कारपेट बदलायला आलेल्या सुदानी आणि सौदी कामगारांना काही जमेना तेव्हा येस्लामने तिला वैतागून त्यांना प्रत्यक्ष सूचना करण्याची परवानगी दिली. परक्या पुरुषांबरोबर बोलणं हे अस्तित्वातच नव्हतं. तिने त्यांना परत परत सांगूनही ते कामगार नीट करत नव्हते कारण त्यांना ते नीट माहीतही नव्हतं. पण त्यांना तिचं सांगणं मान्य नव्हतं. त्या कामगाराने "मी स्त्रियांकडून आज्ञा घेत नाही" असं सरळ सांगितलं. तो तर बाहेरचा होता. खुद्द येस्लामच्या ड्रायव्हरबरोबर एकदा वाद झाला तर त्याने हेच उत्तर तिला दिलं होतं. एखाद्या अत्यंत विश्वासू ड्रायव्हर शिवाय आणि पतिशिवाय बायकांना कुठेही जायला पूर्ण मनाई होती. हे जगणं बरं इतकं घटस्फोट झाल्यावर व्हायचं. घटस्फोट दिल्यानंतर त्या स्त्रीला आयुष्यभर आपल्या मुलांना फोनवर सुद्धा भेटता येत नसे. थोडक्यात भावांच्या आश्रयाने कसंतरी जगायचं एवढंच. मुळात काही स्वातंत्र्य आणि अस्तित्व नाही आणि घटस्फोट मिळाला तर मग काहीच नाही.

कारमेनची पहिली मुलगी नाजियाचा जन्म स्वित्झर्लंड मध्ये झाला. परत जेद्दा मध्ये आल्यावर तिला सेरेलॆक घेण्यासाठी दुकानात स्वत: जायला कारमेनला बंदी होती. नोकरांना ते समजेना तेव्हा येस्लाम आणि बिन लादेन कुटुंबाच्या दबदब्या मुळे तिला येस्लाम बरोबर रात्री तिथे जायची परवानगी मिळाली. तर तिथे सर्व लोक एका बाजूला तोंड करून उभे राहिले ती नजरेस पडू नये म्हणून. दुकानं म्हणजे फ़क्त कुठलेही लेबल नसलेलं असंख्य खोकी असलेलं गोदाम होतं आणि कळकट, धूळकट होतं. आणि एक स्त्री तीही बिन लादेन, तिच्या नवर्‍यासह येणार म्हणून तिथले सर्व कर्मचारी आणि ग्राहक यांना बाहेर घालवण्यात आलं.
एकदा मॉलमध्ये एक गरोदर बाई चक्कर येऊन पडली तर मुतावांनी सार्वजनिक जागा आहे म्हणून तिच्या नवर्‍याला सुद्धा तिला जवळ घेऊन मदत करू दिली नाही. प्रार्थनेची घंटा झाली की दुकानदार बायकांना बाहेर काढून शटर्स बंद करायचे. अर्थात हे सर्व बायकांना बाहेर जाता आलं तरच. सोन्याच्या खरेदीला तर भरलेल्या दुकानात सोडून विक्रेते प्रार्थनेला जायचे. चोरीला हात तोडण्यासारखी शिक्षा असल्याने चोरीची शक्यता फार कमी होती. आणि बायकांना सार्वजनिक ठिकाणी प्रार्थनेचीही परवानगी नव्हती. बाहुली हे मूर्तिपुजेचं प्रतीक होऊ शकतं म्हणून लहान मुलींच्या बाहुल्यांवर बंदी होती. कोणी काही धर्माविरुद्ध वागलं असं वाटलं तर 'मुतावा' म्हणजे धार्मिक पोलिसांना शिक्षा करण्याचे संपूर्ण अधिकार होते.
संपूर्ण आयुष्य हे फक्त एक गौण, वंश वाढवण्यासाठीचं अस्तित्व. अनेक गोष्टी या 'हराम' म्हणजे पाप किंवा 'आबे' म्हणजे लज्जास्पद होत्या. शिक्षण, पुस्तकं, कुठल्याही स्वरूपाचा विरोध हे सर्व निषिद्ध होतं. नंतर बरीच सुधारणा होऊन स्त्रियांचं काही शिक्षण सुरू झाल्यावर जे वर्ग होते ते व्हिडिओ रेकॉर्डींगच्या स्वरुपात असायचे. शंका, प्रश्न इत्यादी लेखी आणि अप्रत्यक्ष रीत्या सोडवले जायचे.

धर्माच्या अत्यंत पराकोटीच्या आग्रहात नैतिकता मात्र पुरुषांच्या सोयीनुसार वाकवता येत होती. याच ढोंगीपणाचा, धर्माच्या नावाखाली धडधडीत अन्याय आणि कृष्ण कृत्ये करण्याचा कारमेनने विरोध केला. येस्लाम ने वैयक्तिक रीत्या तिला बरीच साथ दिली. त्यांच्या दोन्ही मुली घरात बर्‍याच मोकळ्या वातावरणात तिने वाढवल्या. खेळाच्या नावाखाली तिने सुटीच्या दिवशी लोकांना घरी मेजवानीसाठी बोलवायला सुरुवात केली. जिथे स्त्रिया पूर्ण बुरख्यात नसायच्या. सौदी मध्ये असलेले अनेक अमेरिकन राजनैतिक अधिकारी, उद्योगपती, इतर उदारमतवादी अरब (लेबनीज, सिरियन इ.) असे लोक परिवारासह यायचे. यात तिला आणि मुलींना थोडी मोकळीक मिळे आणी येस्लामला यातून बराच व्यावसायिक फायदा झाला. बिन लादेन कुटुंब, व्यवसाय आणि संपत्ती यामुळे तिला हे सर्व शक्य झालं.
या सर्व वैयक्तिक अनुभवांच्या पार्श्वभूमीवर तिथलं सामान्य आयुष्य तिला तितकंसं दिसलं नाही. बिन लादेन कुटुंबाच्या ऐषारामी जीवनात तिने इतर सामान्यांचे हाल पाहिले नाहीत. पण जेवढी कुचंबणा तिच्या जावांची, येस्लामच्या बहिणीची होती ती पाहूनच ती बरीच धास्तावली. एका प्रसंगात ती दुसर्‍या घरी गेली तेव्हा तिथे ओसामाची बायको त्याच्या मुलासह होती. आणि प्रचंड उष्म्यामध्ये ते बाळ रडत होते. त्याला चमच्याने पाणी पिता येत नव्हते. कारमेनची मुलगी मजेत बाटलीने पाणी पित होती. पण धर्मात मान्य नाही आणि ओसामाला अजिबात आवडणार नाही म्हणून त्याच्या मुलाला त्या रबरी बुचाने पाजायला मनाई होती. अत्यंत असह्या झाल्यावर कारमेनने प्रयत्न करून पुरुषांमध्ये बसलेल्या येस्लाम ला बोलावून त्याला ओसामाला समजावायला लावलं. पण त्याने ऐकलं नाही. म्हणजे त्या वाळवंटात अति उष्णतेने बाळाला काही झाले तरी चालेल. पण सहजतेने उपलब्ध असलेले साधन धर्माच्या नावाखाली वापरायचे नाही अशी बिनडोक आणि कमालीची कट्टर वृत्ती होती.
एकदा ओसामा दुसर्‍या एका भावाबरोबर अचानक घरी आला. कारमेनने सहजपणे स्वतः दार उघडलं तर तिने बुरखा न घेतल्याने तो परत गेला. उघडा चेहरा फक्त वडील, भाऊ, नवरा आणि सावत्र वडील यांनाच पहायला धर्म / संस्कृती प्रमाणे परवानगी होती आणि ओसामा सर्व धार्मिक नीती नियम कटाक्षाने पाळणारा होता.
तेल आणि मोठी बांधकामं इत्यादितून आलेला प्रचंड पैसा होता. कारमेनला तिच्या परदेशी मैत्रिणींना भेटवस्तु घेण्यासाठी पन्नास हजार डॉलर्स ही योग्य रक्कम वाटे. बिन लादेन कुटुंबात इतर स्त्रियांनाही हजारो डॉलर्स / रियाल किंमतीचे पोशाख / प्रचंड सोनं नाणं असे. इतर कुठल्याही बाजारात जात येत नव्हतं.विश्वासू नोकर टोपल्यांमध्ये बराच माल भरून आणायचे. पसंत नाही पडलं तर परत दुसर्‍या टोपल्या. मग आवडलेल्या वस्तु निवडून पुन्हा किंमत विचारायला जायचे. आणि पुन्हा येऊन तेवढे पैसे न्यायचे!
इतक्या कट्टर वातावरणात अजून भर पडली १९७९/८० मधल्या इराणच्या इस्लामिक क्रांतीची. खोमेनींच्या आत्यंतिक शुद्ध धर्माचा आग्रह धरणारे अनेक कट्टर सौदी मध्ये वाढले. त्यांनी तर सौदी सुद्धा धर्म नीटपणे पाळत नाहीत असा प्रचार केला आणि मुतावा अधिकाधिक कडक झाले.
इराणच्या उठावानंतर काही काळाने इस्लामिक अतिरेक्यांनी हल्ला करून मक्का ताब्यात घेतलं. अखेरीस फ्रेंचांची मदत घेऊन सौदीने अतिरेक्यांना मारून परत ताबा मिळवला. त्यानंतर काही इराणी आणि वाहिबी म्हणजे मूळच्या सौदी अशा लोकांमध्ये दंगली झाल्या.
हे सर्व जरा स्थिरावत होते तोवर सोव्हिएट युनियनने अफगाणिस्तानवर हल्ला केला. आणि सौदी राजपुत्र आणि देशाने त्यांना मदत करायचं ठरवलं. हा काळ ओसामाच्या परिवर्तनाचा आणि नेता बनण्याचा होता. मशिदींमधून पैसे, जुने कपडे, वस्तु गोळा केल्या जात. स्वयंसेवकाचं काम करण्यासाठी नुकताच पदवीधर झालेला ओसामा गेला. फारसं महत्वाचं स्थान मिळालं नाही तरीही पाकिस्तान आणि सौदी मधून त्याने खूप मदत मिळवून दिली. पाकिस्तानात दवाखाने आणि प्रशिक्षण केंद्रे चालू करण्यात पुढाकार घेतला. हळूहळू तो या उठावात एक मोठा माणूस बनला. मोठी यंत्रे परदेशातून आणून बोगदे, बंकर्स खणले. शस्त्रांची तयारी केली. एकूणात तो एक महत्त्वाचा नेता बनला. त्याच्याबद्दल बिन लादेन कुटुंबात आणि सौदी मध्ये फार चांगलं मत होतं. कारण तो अश्रद्ध रशियाविरुद्ध गरीब धार्मिक आणि निरपराध मुस्लिमांना जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मदत करत होता.
या काळापर्यंत कारमेनच्या मुली मोठ्या होऊन शाळेत जात होत्या. पूर्ण धार्मिक शाळेत नसून आणि ज्या शाळेत त्या पाश्चिमात्य गणवेष व बूट घालत होत्या तिथेही धर्माचे तास होते. खेळ संगीत नाच यावर बरीच बंदी होती. एकदा न कळत्या वयाच्या छोट्या मुलीच्या वहीत इस्रायल व पॅलेस्टाइन बद्दल काही मजकूर पाहून कारमेन धास्तावली. भावांबरोबर व्यवसायतून येणारी स्पर्धा आणि वितुष्ट आणि इतर काही गोष्टींनी येस्लाम चिडचिडा झाला. यातच कारमेनला तिसरी मुलगी झाली. जे अपत्य त्याला नको होते आणि शिवाय मुलगी असल्याने तो विलक्षण नाराज झाला. त्यांच्यामधली दरी वाढत गेली. पुरुषाचे इतरांशी संबंध असणं हे पाप नव्हतं. पण तो तिला काहीही आरोप करून पापी सिद्ध करू शकत होता. त्यामुळे स्विसमध्ये गेलेल्या कारमेनने परत सौदीला जाणे टाळले. कारण राजाच्या, पतीच्या परवानगी शिवाय ती आयुष्यात परत कधीही सौदी बाहेर पडू शकली नसती. येस्लाम ने सौदी कायद्याचा बडगा दाखवून तिला परत हजर राहायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला. पण काही कारण काढून देहदंडाची शिक्षा होऊ शकते म्हणून ती परत कधीही गेली नाही. आणि सौदी शी संबंध असलेले मध्य पूर्वेतले सर्व देशही तिला बंद झाले कारण ते तिला सौदी कडे सोपवू शकत होते. अखेर तिचा सौदीचा संबंध पूर्ण संपला...

शेवटी निष्कर्ष लिहिताना कारमेन म्हणते की बिन लादेन खानदानतली काही वर्ष आणि सौदी विचारसरणी पाहून जग स्वतंत्र, आणि या विचारांच्या भीतीशिवाय शांततेनं राहिल याबद्दल शंका वाटते. ओसामाला सौदी आणि राजघराण्याची सर्व मदत आहे आणि ते एकत्रच होते आणि असतील. या सर्वांना संपूर्ण जगाविषयी तिरस्कार आहे. कारण ही विचारसरणी लहानपणापासून ठामपणे बिंबवली जाते आणि विसरली तरी तरूणाईचा जोश ओसरल्यावर पुन्हा ठासवली जाते. तेलाची संपत्ती हे आधीच नसते कोलीत हाती लागले आहे आणि ही माकडे नाहीत लांडगे आहेत. शेख वहाबांची मूळ कल्पना केव्हाच विसरली गेली आहे. त्यांचा कठोर धर्म फक्त ओसामाच्या रुपात उभा आहे. दुराग्रह आणि सहज मोकळ्या आयुष्याचा तिरस्कार, जगाला अस्तित्वात न धरता हा स्वतःचा चेहरा झाकणारा बुरखा त्याबरोबर सौदीला आंधळेपणाही आणतो.

कारमेन जिनिव्हा जवळ आपल्या तीन मुलींसोबत राहते. सौदीचे हे प्रखर वास्तव तिने ७० आणि ८० च्या दशकात शेवटी पाहिले. आज १० - २० वर्षात त्यात भरच पडली असावी. तेलाबरोबर आलेल्या पैशाने तिथे थोडे अमेरिकन संस्कृतीचा शिरकाव झाला असावा. पण मूळ वृत्ती आणि परिस्थिती ही आजही या बुरख्यामागे दडलेली आहे.

वाङ्मयसमाजराजकारणविचारमाहितीसमीक्षाभाषांतर

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

13 Feb 2009 - 3:19 pm | आनंदयात्री

छान ओळख करुन दिली आहे पुस्तकाची. धन्यवाद.
मध्यंतरी "नॉट विदाउट माय डॉटर" अश्या नावाचे एक पुस्तक वाचले होते. त्यात मात्र त्या अमेरिकन वंशाच्या स्त्रीचे प्रचंड हाल झालेले दाखवले होते. तिने करुन घेतलेल्या सुटकेची कहाणी मोठी रोचक होती.

मैत्र's picture

13 Feb 2009 - 3:21 pm | मैत्र

तसं काही घडलं नाही हे या पुस्तकात सुरुवातीलाच लिहिलं आहे. त्या दहा वीस वर्षात असलेला सौदी, थोडा सौदी हा देश म्हणून अस्तित्वात येण्याचा आणि ओसामाच्या कुटुंबाचा घडणीचा थोडासा इतिहास असं हे पुस्तक आहे.
जर कारमेन परत गेली असती तर कदाचित आज जिवंत राहिली नसती किंवा त्या अमेरिकन सारखे हाल झाले असते.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Feb 2009 - 5:14 pm | घाशीराम कोतवाल १.२

मला अस का वाटतय कि हे मी कुठल्या तरी वर्तमान पत्रात वाचलय हे परिक्षण
बहुतेक लोकसत्ता मधे हे छापुन आले होते लिन्क देइल मी मिळालि तर .............
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.

मैत्र's picture

16 Feb 2009 - 7:54 am | मैत्र

म्हणजे मला त्यांच्याकडे मानधन मागता येईल.
(असं म्हणतात की कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं :) )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Feb 2009 - 7:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

(असं म्हणतात की कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं )
=))

मैत्रा, सुंदर लिहिलं आहेस परीक्षण. बिन लादेन कुटुंबाच्या एकेकाळच्या सुनेने असं काही लिहिलंही असेल याची कल्पना नव्हती. या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

अदिती

माझी दुनिया's picture

14 Feb 2009 - 2:53 pm | माझी दुनिया

एकूणच मुस्लिम समाजात स्त्रियांना फारच मानहानीकारक वागणूक दिली जाते. अर्थात याविरुद्धचे बंड दडपलेलेच गेले आहे. पण ज्या काही स्त्रिया मुस्लिम देशांतून पळून गेल्या किंवा स्वत:ची सुटका करून घेऊ शकल्या त्यांनी बहुतेकींनी आपापल्या आत्मकथना द्वारे ह्याला वाचा फोडायचा प्रयत्न केला त्यामुळे गेल्या काही वर्षांत अश्या अनेक कहाण्या जगासमोर आल्या आहेत. ’काबूल ब्युटी स्कूल’ च्या लेखिकेसारखी एखादीच विरळा, जीचे मूळ अमेरीकन असूनही स्वत:हून तालिबान राजवट असलेल्या देशांत राहून तिथल्या स्त्रियांना स्वावलंबी करायची इच्छा असणारी. तिचे धाडस कौतुकास्पद आहेच एरवी बहुतेक वेळा या कहाण्या वाचून, मला देवाने अश्या कोणत्याही मागासलेल्या देशांत जन्माला न घालता, भारतात, मुंबईत आणि सुशिक्षित आई-वडीलांच्या घरी जन्माला घातल्याबद्दल देवाचे अनेकवेळा आभार मानल्यावाचून राहावले नाही. पॅलेस्टाईनमधल्या सौअद नावाच्या एका दुर्दैवी मुलीची कहाणी तुम्ही इथे वाचू शकता.
बाकी परीक्षण उत्तम, पुस्तक वाचायलाच हवे.

____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

सुप्रिया's picture

14 Feb 2009 - 3:26 pm | सुप्रिया

१००% सहमत!

सुनील's picture

16 Feb 2009 - 8:43 am | सुनील

तुम्ही म्हणता त्यात बराच तथ्यांश आहे हे मान्य करूनही, ह्या बातमी कडे लक्ष वेधावेसे वाटते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

यशोधरा's picture

16 Feb 2009 - 8:09 am | यशोधरा

पुस्तकाचा परिचय सुरेख करुन दिला आहे.

अवलिया's picture

16 Feb 2009 - 12:07 pm | अवलिया

छान ओळख करुन दिलीत..

--अवलिया

सहज's picture

16 Feb 2009 - 12:36 pm | सहज

हेच म्हणतो. चांगली पुस्तकओळख करुन दिलीत.