निमित्य घटोत्कचाचे...

एकलव्य's picture
एकलव्य in जनातलं, मनातलं
25 Dec 2008 - 9:56 am

एकलव्याची तिरंदाजी - ०८

"पण कशावरून?" हा किडा कशाकशाच्या बाबतीत आणि कधीकधीपासून डोक्यात वळवळायला लागला हे नेमके सांगता येणार नाही. या किड्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न तूर्तास बाजूला ठेवून एकलव्याने आज घटोत्कचाच्या भेटीला जायचे ठरविले आहे. त्यातही ऐतिहासिक, धार्मिक आणि राजकीय रंग लागू न देता शक्यतोवर निव्वळ भौतिक आणि भौमितिक अंगाने या भेटीकडे पाहावे अशी खूणगाठही त्याने आजसाठी मनाशी बांधली आहे.

नमनाला दोन पळ्या तेल

प्राचीन पळी: घटोत्कचाची आख्यायिका तशी लहानपणापासून ऐकण्यात आलेली. भीम आणि हिडिंबा राक्षसी यांचा हा सुपुत्र. दोन्ही अंगाने बाळसे ल्यायलेला घटोत्कच अगदी 'महा''काय' होता. अगदी मृत्यूप्रसंगीही याने आपले धड कौरवांवर झोकून दिले की जेणेकरून त्याच्या अंगाखाली चिरडून अनेकानेक सैनिंकांचा जीव जावा. ही सारी वर्णने भरभरून ऐकताना काय मजा यायची म्हणून सांगू.

या घटोत्कचाचे सापळे सापडल्याच्या बातम्याही अधूनमधून धूमकेतूसारख्या उपटत असतात. खरेच सांगतो पण त्या वाचताना आजही मजा येते... फक्त संदर्भ वेगळे असतात इतकेच! महाकाय घटोत्कच

हनी किडस्अर्वाचीन यूनळी: आधुनिक काळातील पहायचे झाले तर वळूया हॉलिवूडकडे. "हनि आय श्रंक द किडस्" आणि "आय ब्ल्यू अप द किडस्" यांनी नुसती धमाल उडवून दिली. तसेच ज्युरासिक पार्कचे अनेक खरेखोटे अवतार, न्यूयॉर्कमधील उत्तुंग इमारतींना विळखे घालणारे उडते साप, महाप्रचंड घारी या सगळ्यांनी तर गल्ले भरभरून धंदे केले आहेत.

चित्रपटावरून इतिहास "शिकण्या"चा आजचा जमाना आहे तसाच चित्रपटातून वैज्ञानिक दूष्टिकोन "जोपासण्या"चाही आहेच. चित्रपट पाहायला जाताना बर्‍याचदा डोके बाजूला ठेवायचे असते हे मान्य आहे. पण फसवणूक काय होते आहे हे निदान समजले उमजले तर बरे!

भव्यतेचे आणि खुजेपणाचे भलतेच आकर्षण लहानांपासून मोठ्यांना सार्‍यांनाच असते. मलाही आहे आणि म्हणूनच ही त्याच्याशी आणखी थोडी ओळख वाढविण्याची धडपड...

घटोत्कचाच्या भौतिकाची भूमिती

तसे बघायचे झाले तर कोणताही प्राणी म्हणजे हाडामांसाचा एक गोळा. हा गोळा कातडीच्या पिशवीत छानपैकी भरून ठेवला आहे. प्रत्येक घटाचा आकार कसा युगानुयुगे घडत आलेला आहे. ह्या आकाराला -- हाडे, मांस, कातडी यांच्या समष्टीला -- शरीर म्हणतात... किंवा म्हणू या! शरीराचे वजन किती, त्याचे आकारमान किती याचे गणित बसलेले आहे. हे गणित बिनसले तर हालचाल अवघड होऊन बसते. बीएमआय इन्डेक्स पाहणार्‍यांना हे बिनसणे म्हणजे काय याची ट्यूबलाईट लगेच पेटावी.

आता समजा ५ फूट उंचीच्या एका व्यवस्थित अंगकाठी असणार्‍या तरुणाचे वजन आहे १०० पौंड. ५ फूटीचा हा तरुण समजा १० फूटी करायचा म्हटले तर त्याच्या वजनाचे काय होईल याचा अंदाज आहे? हा दहाफुटी घटोत्कच ८०० पौंडाचा असायला हवा. सरफेस एरिया -- म्हणजे येथे ढोबळ मानाने सारी काया -- ज्याला म्हणतात त्याच्यावरचा ताण आधी होता त्याच्या चौपट (दुपटीचा वर्ग) झालेला असणार.

साध्यासोप्या भाषेत पाहायचे झाले जेव्हा उंची दुप्पट झाली तेव्हा पायांवर येणारे वजन हे साधारणपणे चौपट झाले. माणसाची उंची नुसती इमारतीच्या दुसर्‍या तिसर्‍या मजल्यापर्यंत पोहचली तरी त्याला पाऊलही उचलणे शक्य होणार नाही. वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळ आणि त्यानंतर झेपावे उत्तरेकडे हे तर दूरच राहिले.

गणित अगदी सोपे आहे.

उंची ही १ मितीय; काया/सरफेस एरिया = उंची * लांबी म्हणजे २ मिती; वजन = आत भरलेला हाडामांसाचा गोळा हा त्रिमितीय; शस्त्रे चालविणे, पळणे वगैरे वगैरे = ५ मित्या.

आकार, आकारमान आणि वजन यांची ही सांगड मांडल्याचे श्रेय जाते ते गॅलिलिओला. १६३८ मध्ये कैदेत डांबलेले असताना प्राण्यांच्या हाडांचा आणि ताकदीचा अंदाज घेताना गॅलिलिओने हे सूत्र उलगडल्याचा उल्लेख सापडतो. गॅलिलिओ

आकाराचे गुलाम

We are prisoners of the perceptions of our size, and rarely recognize how different the world must appear to small animals. - Steven Jay Gould

उंची किंवा लांबी वाढली की एकूण आकारही भराभर वाढणार. त्याचवेळी वजन मात्र भलत्याच झपाटयाने चढणार. म्हणजे तुलनात्मक सरफेस एरिया (आकार/वजन) नेहमी घटतच राहणार. साध्यासरळ भाषेत सांगायचे तर जडत्व येत राहणार असे म्हणू या. वानगीदाखल काही उदाहरणे पाहू या.

  • गांडूळ किंवा सापाच्या जातीतले प्राण्यांमध्ये गुंतागुंतीच्या अंतर्गत अवयवांची वाढ तशी मर्यादित आहे. पण या जीवांनी आकाराचे गणित तुलनात्मक दृष्ट्या एकमितीय राखले आहे आणि वजनाचे द्विमितीच्या जवळपास. गांडू़ळ लांबलचक वाढते पण त्याचा घेर ठरलेल्या मर्यादेपलिकडे जात नाही. हवा, अन्न मिळणे मुश्किल होऊन जाईल नाहीतर! पण हॉलिवूडपटातील ड्रॅगॉन्स मात्र विमानेच्या विमाने आणि बोटीच्या बोटी गिळंकृत करण्यासाठी आ वासतात.
  • किटक एका ठराविक मर्यादेपलिकडे वाढू शकतच नाहीत तेही याच भौमितिक कारणामुळे! शरीराच्या सर्व अंगांनी त्यांचे खाणे, पिणे आणि हवेवर जगणे चालले असते. इतकेच नाही तर त्यांचे पाण्यावर चालणे, भिंतींवर चढणे, इजा न पोहचविता फुलावर झोके घेणे हे बेडकाएवढ्या किटकाला शक्य नाही. स्पायडरमॅनएव्हढ्या स्पायडरला छतावर उलटे चालणे तर सोडाच पण जमिनीवर सुलटे बसणेही शक्य होणार नाही.
  • पक्षांमध्ये हे असे हवेने भरलेले अवयव तुलनेने अधिक प्रमाणात... म्हणजे तुलनात्मक सरफेस एरिया मुबलक म्हणजेच घारीचे पाय जमिनीवर ठरायला नकोत. पण हीच घार जर राक्षसी झाली... नुसती आहे त्याच्या चारपट झाली तर उंदीर तिला कुरतडून खातील पण घारीला हलता येणार नाही.

मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी

कविकल्पना आणि प्रतिभेची भरारी म्हणून वरील पंक्तिमागील भावना समजून घ्यायला नक्कीच हरकत नाही. पण विज्ञानाच्या चष्म्यातून मात्र हे अशक्यतेच्या जवळपास आहे.

प्रगत मुंगीदेश: मुंग्याच्या साम्राज्याचे आणि त्यांच्या "प्रगत" सामाजिक रचनेचे दाखले नेहमी दिले जातात. पण "मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना" ची चाल थोडीशी बदलून "मुंग्यांचा मानव का झाला नाही" हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे."

मुक्त अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते काहीवेळा मुंग्यांच्या मानव न होण्याचे खापर त्यांच्या "सेंट्रल प्लॅनिंग" वर आणि "एकचालिकानुवर्ती" पद्धतीवर फोडतात. Karl Marx was right, socialism works, it is just that he had the wrong species - Edward O. Wilson. असल्या टिपण्णींमध्ये तथ्य किती आणि अभिनिवेष किती हा स्वतंत्र विषय आहे.

मात्र आकाराच्या संदर्भात पाहायचे झाले तर मुंग्या ह्या मानवी प्रगतीची शिखरे साधण्यासाठी "फिजिकलि चॅलेन्जड्" आहेत आणि हे जग त्यांच्यासाठी "लेव्हल प्लेयिंग" फिल्ड नाही हे लक्षात घ्यायला हवे.

मुंगीच्या आकाराच्या माणसाला ताकदवान मेंदूचे बळ आहे असे निव्वळ आणि निव्वळ सोयीसाठीच मानले तरीही त्याला शरीराच्या मर्यांदांसमोर हतबल व्हावे लागेल. पाण्याच्या थेंबाचा लहानात लहान होऊ शकणारा आकार लक्षात घेता मुंगीमानवाला तुषारस्नान शक्य नाही. कपडे घालता आले तर surface adhesion मुळे पुन्हा बदलता येणे कठीण आहे. सोन्याचा पत्रा कदाचित मुंगीमानवाला इतका पातळ बनविता येईल की ज्याचा पुस्तकासारखा उपयोग करता येईल. पण पुन्हा मुंगीमानवाच्या आकाराचा प्रश्न उभा ठाकेल... surface adhesion मुळे पाने उलटणे स्वप्नातच राहिल. मुंगीमानवाला कोणतेही द्रव्य ओतता येणे शक्य नाही मग विविध रासायनिक प्रयोग तर बाजूलाच. स्थिर ज्योत ही किमान काही मिलिमीटर रुंदीची असणे गरजेचे असल्याने नियंत्रित आगीचा शोध हा मुंगीमानवाच्या क्षमतेपलिकडील आहे.

मुंग्यांना जितकी प्रगती शक्य होती तितकी त्यांनी नक्कीच केलेली आहे असे म्हणायला मानव समाजाला हरकत नसावी.

माणसाचा आकार

मानवाच्या इतिहासात चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, शून्याचा शोध, पाठीचा ताठ कणा, अंगठ्याचे वैशिष्ट्य या आणि अशा अनेक उत्क्रांतिकारक घटनांना खूप मोलाचे स्थान दिले जाते. मनुष्यप्राण्याच्या प्रगतीत त्याच्या आकाराचे योगदान काय आहे याकडे मात्र बर्‍याचदा दुर्लक्ष होते. किंबहुना अधिक बरोबर मांडायचे म्हटले तर आपण आपल्या शरीराला इतके गृहित धरतो की त्याची नेमके मोल कधीकधी आपल्याला जाणवत नाही.

प्राणीसंग्रहालयात आणि डिस्कव्हरी चॅनेलवर मोठमोठे प्राणी पाहण्याची सवय झाल्याने असल्याने किंवा नेहमी माणसांच्याच गराड्यात असल्याने असेल पण आपल्या लक्षात येत नाही पण मानव हा जगातील महाकाय प्राण्यापैकी एक आहे. ९९% सजीव हे मानवापेक्षा खुजे आहेत. माकड इ. मानव्याच्या जातीतील १९० भावंडांमध्ये पाहायचे झाले तर गोरिलानंतर लगेच मानवाचाच नंबर लागतो. मानवाचे शरीर हे गुंतागुंतीचे आणि प्रगत रचनांपैकी एक आहे. अगदी स्टेट ऑफ द आर्ट म्हणावे असे! आकार वाढवायचा आहे पण जडत्व तर यायला नको आहे हे संतुलन साधण्यासाठी या उत्क्रांत शरीरामध्ये फुफ्फुस आणि इतरही अनेक अंतर्गत अवयव विस्तार पावले आहेत. शरीराच्या आत नुसती चरबी भरलेली नाही. :)

मानवाची जी काही सर्वसामान्य देहयष्टी आहे ती तशी नसती तर आज मानव कोठे असता किंवा असता तरी काय? जर उंची निम्मी असती तर सुमारे ३२ जणांना मिळून एक भाला फेकावा लागला असता तेव्हा कोठे तुम्हीआम्ही एकट्याने जे करू शकतो त्याच्याशी तुलना झाली असती. लहान मुलाने गुद्दे लगावले तरी आपल्याला फारसे लागत नाही ते याचमुळे! उंची दुप्पट असती तर दगडाला पाय अडकून पडल्यावर आपल्याला जितके लागते त्याच्या ३२ पट अधिक लागले असते. लहान मूल पडल्यावर त्याला लागत नाही ते याच कारणाच्या व्यत्यासाने! या आणि अशा मुद्यांना लेखात आधी स्पर्ष झालेला आहेच. मानवाने केलेली उत्क्रांती... आदिमानवाने लावलेले विविध शोध हे त्याच्या शरीरचणीला झेपणारे असे होते. त्यातील बरेचसे शोध आणि त्यावर अवलंबून असलेले अस्तित्व हे आदिमानवाच्या शरीराशी जुळणार्‍या शरीराला शक्य होते असाही शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. (अधिक तपशीलासाठी वाचा - डॉ. एफ. डब्ल्यु. वेन्ट, अमेरिकन सायंटिस्ट/१९६८)

एक ना अनेक पण आज मानव प्राणी जो काही आहे त्यामध्ये त्याच्या देहयष्टीचे योगदान अतिप्रचंड आहे हे मात्र नक्की. शेवटी... शरिरमाद्यं खलु धर्म साधनम्.

जगाचा आकार ज्याच्यात्याच्या डोक्याएव्हढा

मानवाच्या "थोर"पणाची कोडकौतुके करायचीच तर त्याच्या मेंदूकडे दुर्लक्ष करून कसे चालेल. मी ही हे कौतुक करून घेतो... I used to have an open mind but my brains kept falling out. - Ben Helleur. ह्म्म्म... गम्मत असू द्या पण स्वत:वर हसणे ही मानवी मेंदूच्या फार मोठ्या अचिव्हमेन्टची पावती आहे. मानवी मेंदूच्या कर्तबगारीमध्ये त्याच्या आकाराचे स्थान कोठे आहे याचा नेमका अंदाज घ्यायचा थोडा प्रयत्न करूयात.

  • मिथ्यक १: माणसाचा मेंदू हा सर्वाधिक गुंतागुंतीचा आहे. ना बाबा ना! (या मुद्याचा किस पाडण्याने फार फायदा नाही म्हणून टाळतो आहे. उत्सुकांनी गुगलबाबाला विचारावे! )
  • मिथ्यक २: माणसाचा मेंदू हा आकाराने सर्वांत मोठा आहे. नाही! मुळीच नाही. माणसाचा मेंदू साधारणपणे दीड किलोपेक्षा थोडा कमी भरेल तर हत्तीचा मेंदू ५ किलोच्या जवळपास जायला हरकत नाही.
  • मिथ्यक ३: शरीराच्या आकारमानाशी तुलना करता माणसाचा मेंदू हा सर्वांत मोठा आहे. ह्म्म्म... विचार करायला हवा! माणसाचा मेंदू साधारणपणे शरीराची २% पेक्षा जास्त जागा व्यापत नाही पण उंदीराचा मेंदू मात्र त्याच्या शरीरातील १०% च्या जवळपास जागा बळकावितो. म्हणजे रूढार्थाने पाहिले तर याचेही उत्तर नाही असेच आहे.

कदाचित आपण चुकीचा प्रश्न विचारतो आहोत असे दिसते. पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने मांडून पाहू या.

शरीराचे वजन/आकारमान जसजसे वाढत जाते तसतसे मोठ्या मेंदूची गरज पडत राहते. पण शरीराच्या वाढीच्या वेगापेक्षा मेंदूच्या वाढीचा वेग कमी असतो. म्हणजे सोप्या भाषेत शरीर दुप्पट झाले म्हणजे त्या शरीराचे नियंत्रण करण्यासाठी मेंदूची वाढ दुप्पट होण्याची गरज नाही. तज्ञांनी जगातील प्राण्यांच्या वजन/आकार आणि त्यांच्या मेंदूच्या वजन/आकार यांतील परस्परसंबंधांचे गणित मांडले आहे. त्यानुसार ठराविक वजनाच्या/आकारमानाच्या प्राण्याला कोणत्या वजनाचा/आकाराचा मेंदू असणे अपेक्षित आहे यांचा ठोकताळा बांधलेला आहे.

त्या सूत्रानुसार मानव्याच्या वजना/आकारानुसार त्याला ज्या वजना/आकाराचा मेंदू असायला हवा त्यापेक्षा त्याचा मेंदू सुमारे ७ पटींनी मोठा आहे. इतर कोणत्याही जीवासाठी (प्रत्यक्ष असलेला मेंदू/अपेक्षित असलेला मेंदू) यांचे गुणोत्तर मानव प्राण्याइतके मोठे नाही. त्या अर्थाने माणसाच्या मेंदूचा आकार खरोखरच अगदी महामहामहाप्रचंड आहे. :)
मानवी मेंदू

नॅनोयुगाच्या गप्पांत आणि मिनिएचरने झपाट्यातही माणसाच्या शरीराचा आणि शरीरातील मेंदूच्या अबसोल्युट आकाराचा विसर पडण्यासारखा नाही. मन म्हणजे काय, शरीर म्हणजे काय? कशाने काय बनले आहे आणि कोणाची ताकद किती? हे असे अनेक विचार मनात घोळत असताना माझ्या एका मित्राच्या भौतिकशास्त्राच्या प्रबंधातील काही ओळी मला आठवत आहेत. कदाचित संदर्भहीन वाटतील पण त्याच देणे मला योग्य वाटते आहे. त्या देतो आणि माझी वटवट थांबवितो.

What is Mind? Doesn't Matter! What's the matter? Never Mind!!

- एकलव्य

डिसक्लेमर आणि श्रेय

डिसक्लेमर: सदर लेख हा बेतला आहे तो स्टीफन गाऊल्ड यांच्या http://en.wikipedia.org/wiki/Ever_Since_Darwin एव्हर सिन्स डार्विन या ग्रंथातील रिफ्लेक्षनपर निबंधांवर. अभ्यासकांनी हे निबंध मूळातून वाचावेत. जीवशास्त्र, डार्विन वगैरे माझ्याही अभ्यासाचा विषय नाही. पण तरीही मला हे निबंध आवडले आणि म्हणून ही वटवट. चुभूद्याघ्या! असो... या लेखाच्या निमित्याने कोणांस यावर अधिक लिहावेसे वाटले... वाचावेसे वाटले... संवाद साधावासा वाटला तर नक्कीच मलातरी मेजवानीच वाटेल.

श्रेयः वाचनाला विषयाचे बंधन असू नये याचा संस्कार ज्यांनी माझ्यावर केला त्यांत प्रदीप रावत यांचाही कळत नकळत मोठा हातभार आहे. "एव्हर सिन्स डार्विन" हे दादा रावतांनी मला दिलेल्या काही पुस्तकांपैकी एक. लोकसभेच्या निवडणूकीच्या धामधुमीतही Book World मधून १२ - १५ वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके घेऊन बाहेर पडणार्‍या ह्या विरळा माणसाविषयी जमलेच तर पुन्हा कधीतरी. फॉर द मोमेन्ट जस्ट बिग थॅक्स टू हिम फॉर इन्ट्रोड्युसिंग मी टू डार्विन!

तंत्रविज्ञानशिक्षणमौजमजाप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

सुनील's picture

25 Dec 2008 - 10:19 am | सुनील

एक आगळ्यावेगळ्या विषयावरील लेख. रोचक.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

25 Dec 2008 - 11:20 am | विसोबा खेचर

एकलव्या,

साला तुझ्या व्यासंगाला आपला सलाम रे.. जियो...!

एक आगळ्यावेगळ्या विषयावरील लेख. रोचक.

सुनीलरावांशी सहमत.. पुन्हा एकवार सवडीने हा लेख वाचणार आहे.

लोकसभेच्या निवडणूकीच्या धामधुमीतही Book World मधून १२ - १५ वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके घेऊन बाहेर पडणार्‍या ह्या विरळा माणसाविषयी जमलेच तर पुन्हा कधीतरी.

मिपाकरांना त्या लेखाची निश्चितच प्रतिक्षा असेल...

तात्या.

एकलव्य's picture

28 Dec 2008 - 12:42 am | एकलव्य

लोकसभेच्या निवडणूकीच्या धामधुमीतही Book World मधून १२ - १५ वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके घेऊन बाहेर पडणार्‍या ह्या विरळा माणसाविषयी जमलेच तर पुन्हा कधीतरी.

मिपाकरांना त्या लेखाची निश्चितच प्रतिक्षा असेल...

लिहिणे हा माझा स्ट्राँग पॉइन्ट नाही. जमेल तसे करेन. असो... सदर लेखांत दादा रावत यांचा केलेल्या उल्लेखासंदर्भातील एक झलक...

http://timesofindia.indiatimes.com/articleshow/671606.cms

And how did he spend the time? "I did what I normally do ... I finished couple of good books, one by Karen Armstrong titled 'God' which is based on religious fundamentalism, then I read Andrew Parker's 'In the blink of an eye' which is about the evolution of an eye and in between another book on the oil industry", Rawat said.

अवलिया's picture

25 Dec 2008 - 11:23 am | अवलिया

सुंदर लेख.
अजुन असेच लेख येवु द्या.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

विकास's picture

25 Dec 2008 - 11:27 am | विकास

लेख एकदम मस्त आहे! तात्या म्हणाले त्याप्रमाणे व्यासंगाला सलाम! विरुद्ध पक्षातील घटकाबद्दल असूनही चांगला आणि माहीतीपूर्ण (एकलव्य - घटोत्कोच)

फक्त एकच प्रश्न - यात वाद नक्की कुठे आणि कसा घालायचा?

एकलव्य's picture

28 Dec 2008 - 12:49 am | एकलव्य

फक्त एकच प्रश्न - यात वाद नक्की कुठे आणि कसा घालायचा?

-- विकासराव, वादासाठी अथवा वितंडवादासाठी वाद घालणार्‍यांची आपल्याकडे कमी नाही. भगवान घर देर है अंधेर नहीं है वगैरेवर विश्वास ठेवून काही काळ घालवू या!

सहज's picture

25 Dec 2008 - 12:15 pm | सहज

लेखही जरा घटोत्कच आकाराचा व संकल्पनेचा आहे, पचायला वेळ लागेल.

लेख आवडला. सुटी आहे तोवर अजुन लेख येउ द्या एकलव्य :-)

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2008 - 1:33 pm | परिकथेतील राजकुमार

तुमचा लेख खरच छान आहे, खुप आवडला.
एक शंका :-
१) पुराणात अनेक व्यक्ती ह्या आपला आकार हवा तसा हवा तेंव्हा बदलत असत (घटोत्कच / हनुमान इ.) हे कसे शक्य होत असेल ? आजच्या जगात आपण काही त्वचेचा रंग बदलणारे प्राणी बघु शकतो.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

एकलव्य's picture

28 Dec 2008 - 12:58 am | एकलव्य

प.रा. धन्यवाद!

उत्तराचे दोन भागः

(२) रंग बदलणे हे शक्य आहे आणि येथे मांडलेल्या विषयापेक्षा थोडेसे वेगळेही आहे.
(१) हवा तसा आकार बदलण्याची हनुमान/ घटोत्कचाची क्षमता म्हणजे पुराणांतील वांगी पुराणात आहे असे माझे मत आहे.

अवांतर - पुण्याचे पेशवे यांनी खवमध्ये याच्याशी संदर्भात आणखी एक प्रश्न दिला आहे. त्यांच्याशी चर्चा झाली की परवानगीने येथे मांडेन.

लिखाळ's picture

25 Dec 2008 - 5:18 pm | लिखाळ

उत्तम ! अनपेक्षितपणे समोर आलेला मस्त लेख.
हा विषय खरोखरंच रोचक आहे. आणि मांडाणी फारच छान.

आकारमान आणि हालचालीची क्षमता यातला संबंध मला अजूनही तितकासा स्पष्ट झाला नाही. लेख पुन्हा वाचेन.

जितके समजले त्यावरून,
अगदी एका मिलिमिटरपेक्षा आकाराने लहान मुंग्यांपासून चांगला दीड इंच मोठ्या लाल डोंगळ्यांपर्यंतचे मुंगीवर्गातले प्राणी आपण आसपास पाहतो. त्यांच्या आकारमानातला बदल त्यांच्या हालचालींवर वाईट परिणाम करताना दिसत नाही.
महाकाय सापा बद्दलचे मत विचार करण्यासारखे आहे. पण निसर्गात एक फुटाचा साप अणि पंधरा फुटाच्या ऍनाकोंड्यात जाडी आणि लांबीचे गुणोत्तर काय हे पाहायला पाहिजे. वरवर पाहता त्यांच्या लांबीपेक्षा जाडी जास्त वाढलेली दिसते असे मला वाटते. म्हणजे आकाराने मोठे भक्ष खायची क्षमता वाढलेली दिसते. पण यावर विचार केला पाहिजे.

We are prisoners of the perceptions of our size

फार छान ..
स्टिफज जे गाउल्डचे वंडरफुल लाईफ हे पुस्तक वाचायला आणले होते पण वाचून झालेच नाही.

मानवाच्या इतिहासात चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, शून्याचा शोध, पाठीचा ताठ कणा

पाठीला पोक काढून संगणकासमोर दिवसभर बसणारा माणूस ही वेगळी प्रजाती असावी ;)

लेख मस्तच.. यावर चर्चा वाचायला मजा येईल.

-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

प्राण्यांच्या महाकाय शरीराबद्दल विचार करताना, अजूनही आफ्रिकन जंगलात अनाकोंडा असल्याचे कुठेतरी वाचले आहे.
वरवर पाहता त्यांच्या लांबीपेक्षा जाडी जास्त वाढलेली दिसते असे मला वाटते. म्हणजे आकाराने मोठे भक्ष खायची क्षमता वाढलेली दिसते.
अजगर एका लहान मुलला गिळंकृत करू शकतो असा त्याचा आकार असतो पण त्याची लांबीही इतर पूर्ण वाढलेल्या सापांपेक्षा जास्ती लांब असल्याचे कुठे वाचलेले अथवा (सर्पोद्यानात) पाहिलेले आठवत नाही. त्यामुळे खरंच ते गुणोत्तर नक्की काय असते हा विचार करावा लागेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एकलव्य's picture

28 Dec 2008 - 1:01 am | एकलव्य

धन्यवाद!

दोघांनीही अनाकोंडाचा उल्लेख केला आहे. सदर लेखात त्याला थोडेफार चुचकारले आहेच. पण लिखाळ म्हणतात त्याप्रमाणे जाणकारजाणकार-वाचायला आवडेल. मला स्वतःला आणखी काही तपशील मिळाले तर नक्की पुरवेन.

आजानुकर्ण's picture

26 Dec 2008 - 7:59 am | आजानुकर्ण

लेख छान आहे. मात्र निमित्य म्हणजे काय? मला निमित्त माहीत आहे. निमित्त पासून निमित्य हे रुप तयार होते का?

आपला
(शंकित) आजानुकर्ण

एकलव्य's picture

28 Dec 2008 - 12:52 am | एकलव्य

कर्णसाहेब - आपली शंका बरोबर आहे. मलाही त्याने ग्रासले होतेच. शेवटी निमित्य हाच शब्द योग्य असावा अशी धारणा झाल्याने तो वापरला. अर्थात फार तळापर्यंत जाऊन मी त्यावर अभ्यास केला असे नाही. जाणकारांनी जरूर कळवावे... शक्य झाल्यास मिपामार्फत दुरुस्ती करवून घेईन.

(विद्यार्थी) एकलव्य

धनंजय's picture

27 Dec 2008 - 2:41 am | धनंजय

स्टिफन जे गूल्ड यांचे लेखन मोठे चविष्ट आणि पौष्टिक असते.

त्यातून स्फूर्ती जरी घेतली असेल, तरी एकलव्य यांच्या लेखणीला माझा मराठी मुजरा.

एकलव्य's picture

28 Dec 2008 - 1:06 am | एकलव्य

(१) या लेखाचे नाव तसे पाहायला झाले तर सुमारे दीड वर्षांपूर्वी मनात बसले होते असे म्हणायला हरकत नाही.... http://mr.upakram.org/node/474#comment-6664
(२) प्रियालीताईंनी टेबल्समध्ये लिखाण कसे करावे यांसाठी केलेल्या मदतीचा या लेखांस बराच हातभार लागला.

धन्यवाद - एकलव्य

प्रियाली's picture

28 Dec 2008 - 2:05 am | प्रियाली

मी लेख अद्याप अर्धवट वाचल्याने प्रतिक्रिया दिली नव्हती. नंतर देईनच पण १-२ परिच्छेद वाचल्यावर मलाही त्या उपक्रमावरील महाकाय घटोत्कचाची आठवण झाली होती. :) तुमचा खुलासा वाचून पुष्टीही मिळाली.

विजुभाऊ's picture

28 Dec 2008 - 9:15 am | विजुभाऊ

वेगळ्याच विष्वाची सफर घडवुन आनलीस.
मस्त रे भौ
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

श्रीयुत संतोष जोशी's picture

28 Dec 2008 - 12:40 pm | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,
लेख खूप आवडला, एकदम मस्त.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

चतुरंग's picture

28 Dec 2008 - 8:14 pm | चतुरंग

आकारमान आणि हालचाली ह्यातला संबंध स्पष्ट करणारी बरीच रंजक माहिती मिळाली.
'ह्यूमन कायनेटिक्स' अशी एक अभ्यासशाखा मानवी हालचालींशी संबंधित आहे. वेगवेगळ्या शरीररचनांचा हालचालींवर आणि त्यामुळे खेळांवर होणारा विशिष्ठ परिणाम त्यात अभ्यासला जातो.
आणि विविक्षित खेळात कुठला खेळाडू प्राविण्य मिळवू शकेल ह्यासाठी त्याचा वापर करतात.

चतुरंग

प्रियाली's picture

30 Dec 2008 - 5:04 am | प्रियाली

लेख पूर्ण वाचून काढला. अतिशय उत्तम मांडणी.

प्रचंड उंचीचे राक्षस जगातील सर्व इतिहास आणि पुराणांतून दिसतात आणि बरेचदा अशी एखादी प्रजाती अस्तित्वात होती का यावर चर्चा पाहिलेल्या आणि ऐकलेल्या आहेत. प्रचंड उंचीचे सांगाडे आणि विश्वासार्ह पुरावेही सापडलेले आहेत परंतु प्रचंड उंची म्हणजे किती तर ती ही नक्कीच नाही - (क्रेनचा आकार आणि सांगाड्याचा आकार - सोडवा गणित)

परंतु, सुमारे साडेसात फूट ते साडेनऊ फूट उंचीच्या माणसांचे विश्वासार्ह मानता यावेत असे सांगाडे मिळालेले आहेत. इतकेच कशाला तर अशी माणसे अस्तित्त्वातही आहेत परंतु त्यांच्या उंचीला मर्यादा आहेत. याओ मिंग या अमेरिकन बास्केटबॉलपटूचा हा एक फोटोच बघा :)

डेविड आणि गोलिएथ या प्रसिद्ध कथेतील गोलिएथ हा राक्षसही असाच प्रचंड उंचीचा असतो. परंतु, गोफणीचे दगड त्याचा तोल ढळून त्याला लोटांगण घालण्यास भाग पाडतात. प्रचंड उंचीमुळे शारिरीक क्रियांवर मर्यादा आल्याचाच हा पुरावा मानला जावा का काय. :) या गोलिएथची उंचीही बिब्लिकल अकाउंट्सनुसार सुमारे साडे नऊ फूट असावी असे मानले जाते.

हॉलीवूड चित्रपटांत जो महाकाय आकार दाखवला जातो आणि घटोत्कचाच्या नावाखाली जो सांगाडा मध्ये खोदला होता आणि त्या प्रकारच्या सर्व मिथकांचा पर्दाफाश करणारा हा लेख फारच आवडला.