फोनवर पलिकडे कोणीतरी ! (भाग २) (अंतिम)

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in जनातलं, मनातलं
21 Nov 2008 - 10:49 am

फोनवर पलिकडे कोणीतरी ! (भाग २)

मागील भाग

(उत्तरार्ध)

आतापावतो आपट्यांच्या मनात देशमुखांबद्दल चांगलेच कुतुहल निर्माण झाले होते.
आपट्यांनी प्रश्न केला.
-कुठून फ़ोन केलाय तुम्ही ?
आपट्यांना हसण्याचा आवाज आला.
- सगळे सांगत नाही. तुमच्या सारखेच एका बंगलीत राहतो आम्ही. तुमच्याकडे कॉलर लाईन आयडेण्टिफ़िकेशन नसणार. त्यामुळे तुम्ही मला शोधू शकत नाही.
- शोधले तर काय होईल ? जवळपास तत्क्षणीच आपट्यांनी विचारले.
देशमुख म्हणाले - मग प्लॅन भुईसपाट व्हायची शक्यता आहे. हा आमचा जुना प्लॅन आहे. आमचा म्हणजे माझा व बायकोचा.
मला दम्याचा त्रास आहे, तिला अक्युट आर्थाराईटिस
- मुल मुली ?
प्रश्न ऐकुन देशमुख नि:शब्द झाल्यासारखे वाटले. लगेच कोणतेही उत्तर दिले नाही. आपट्यांना लाईन तुटली अशी भिती वाटली.
- हॅलो?
- हो आहे मी. जरा घसा कोरडा पडला म्हणून पाणी पित होतो. मुलगा इग्लंडात असतो आणि मुलगी.. नाही, तिची गोष्ट राहु द्या.
सौ. अलका आपटे दिवाणखान्यत दूध घेऊन आल्या. आपटे फ़ोनवर बोलताहेत पाहून त्यांना नवल वाटले. करपल्लवीने त्यांनी विचारले
- कोणाचा फोन आहे?
आपट्यांना व्यत्यय नको होता.त्यांनी तॉंडावर बोट ठेऊन चुप राहण्याची खूण केली.
पलीकडून आवाज आला.
- हॅलो. ऐकताय का ?
- हो हो
- खरी गोष्ट अजून सांगितलीच नाही.
- खरी गोष्ट ?
- हो ज्याच्यासाठी फ़ोन केलाय ती. आणखी काय ?
देशमुखांनी सुस्कारा सोडला.
- मुलांविषयी म्हणताय ?
देशमुख वेगळेच हसले. एकोणनव्वद साली डॉक्टरकी करायला तो राणीच्या देशात गेला. पहिल्यांदा रोज रात्री फ़ोन वाजायचा.
वर्षभरात तो महिन्यातून एकदा झाला. पुढे कामाचा व्याप वाढला म्हणून ६ महिन्यातून एकदा. एम. डी. झाल्यावर तिथेच सेटल झाला तो. लग्न ही तिकडेच केले. तेव्हापासून तर क्वचित कधी तरी फ़ोन असे. आईच्या वाढदिवसाला पण न चुकता फ़ोन करायचा.
या वर्षी तो ही केला नाही.
- मुलगा कामात असेल, म्हणून नसेल जमले. तुम्ही करायचा ना मग ?
- ते खरे आहे पण आता अवाजावरून ही खूप समजते. तुम्ही जसे आपुलकीने ऐकताय तसे असते तर ...
पुन: फोनवर निरवता पसरली.

आपटे बाईंनी कोणाचा फ़ोन आहे, किती वेळ चालणार म्हणून दबक्या आवाजात विचारले. आपट्यांनी उत्तर दिले नाही.

बोलण्यातले रहस्य अजून उलगडले नव्हते. घड्याळात ११:२० झाले होते.

- तुमच्या फ़ोनचे बिल वाढतेय. आपटे म्हणाले.
- खरे बोलताय पण आज बिलाची चिंता नाही. लाईन तशी ही कायमची तुटणार आहे.
- म्हणजे ?
- म्हणजे संबंध. जन्मापासून आपण संबंध जोडणे सुरु करतो. रंग, वजन, उंची सर्वात आपल्या छटा आपल्याला हव्या असतात.
फ़क्त काही छटा गडद होतात काही फ़िक्या. आपटेसाहेब?
- ऐकतोय मी.
- मी चुक केली का हो काही ?
- नाही. वाटत नाही.
- कायमचे तोडायचे आहे सगळे आपटेसाहेब.
आपटे चमकले. तोडणे शब्दच किती वियोगाक्त ! दबक्या आवाजात त्यांनी विचारले
- म्हणजे ?
क्षणिक विश्रांतीनंतर एक बारीक हसू ऐकु आले.
- मी बळवंतराव देशमुख. वय ७२. बायको मालती देशमुख वय अडुसष्ट. मुलगा परदेशात. आमची मुलगी. नाही तिचे सोडा.
चतु:शृंगीला छोटीशी बंगली आहे. जवळपास २२ लाखांचा बँक बॅलन्स आहे. आठ हजार पेन्शन मिळते. मालतीची तब्येत बघता ती माझ्या आधी जाणार हे स्पष्ट आहे. तसे आताही कोणासाठी जगायचे हा प्रश्न आहे.
- असे का म्हणता बळवंतराव ?
- बायको सारखी विचारते - तुम्हाला कोणापाशी सोडून जाऊ मी?
आपट्यांकडे याचे उत्तर नव्हते. टेबलावरचे दूध आता गार झाले होते. आपटेबाई फोन संपण्याची वाट पहात होत्या.
- तुमचा पता देता का ? मी भेटायला येईन तुम्हाला.
- त्यात काही लाभ नाही आपटेसाहेब. आज सारे पाश सोडून आम्ही जातोय. जायपूर्वी जगात कोणापाशी तरी आम्हाला आमच्या पापकृत्याची कबुली द्यायची होती. आपटे साहेब, आम्हाला माफ करा.
- बळवंतराव !
आपट्यांच्या तोंडून अस्फ़ुट चित्कार उमटला. हे असले काही ऐकायले मिळेल याची त्यांनी कल्पना केली नव्हती.
- हॅलो बळवंतराव. हॅलो .... हॅलो .....
लाईन आधीच तुटली होती.

सुन्न मनाने आपटे परत सोफ़्यावर येऊन बसले. डोक्यात घणाचे घाव बसताहेत असे त्यांना वाटले. 'कुणाचा फ़ोन होता?' आपटे बाईंनी विचारले.
- ऑफ़िसातल्या देशमुखांनी सहस्त्रचंद्रदर्शनाला बोलावलेय. आपट्यांना खरे सांगायची इच्छा नव्हती.
- बराच उशिर झालाय. मी झोपते आता. तुम्हीही रात्र करु नका. डोळ्यातल्या झोपेमुळे अर्धवट खुलाश्यावर आपटेबाई संतुष्ट होत्या.

आपट्यांच्या कानावर हे बोल पडले पण मेंदूपर्यंत ते पोहचले नाहीत. बहिरेन्द्रिये केव्हाच निश्चिष्ट झाली होती.
आता जे काही विलक्षण ऐकले त्या धक्क्यातून ते अजून सावरले नव्हते. देशमुखांच्यात व त्यांच्यात किती साम्य होते. म्हणायला दोघे सुखवस्तु पण आतुन कुढणारे. देशमुखांचे शेवटचे वाक्य अजूनही मनात घुमत होते. 'जायपूर्वी जगात कोणापाशी तरी आम्हाला आमच्या पापकृत्याची कबुली द्यायची होती.' आणि अशी कितीतरी वादळे त्यांच्या मनात थैमान घालत होती.

शेवटी त्यांनी एक निर्णय घेतला. फ़ोनपाशी गेले. रिसिव्हर क्रेडलवरुन उचलला आणि डिरेक्टरी पाहून एक नंबर फ़िरवला.
- हॅलो. गंगाधर दशपुत्रे ? मी नरहरी आपटे बोलतोय. कृपा करून फ़ोन ठेऊ नका. एक महत्वाचे बोलायचेय.
पलीकडून लौकर उत्तर आले नाही. लाईन तुटली की काय असे वाटून आपटे थरथरत्या गळ्याने म्हणाले.
- हॅलो.
ठीक तेव्हाच 'श्रमसाफल्य बंगला सहकारनगर पुणे ९' येथून सत्तरीतल्या एका स्वराने त्यांना आश्वस्त केले.
- हो ऐकतोय. बोला.

----
दुसर्‍या दिवशीच्या वृत्तपत्रातील एक बातमी --
'शहरात ५ वृद्ध दांपत्यांचा एकाच रात्रीत गूढ मृत्यु'
(संपुर्ण)

( 'गौर बैरागी' यांच्या मुळ बंगाली कथेवरुन स्वैर )

वाङ्मयभाषांतर

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Nov 2008 - 10:59 am | मदनबाण

शेवट असा होईल असे वाटले नव्हते !!! :( वाईट वाटले वाचुन....
माणसाच मन त्याला स्वस्थ बसुन देत नाही हेच खरं !!!

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

मुक्तसुनीत's picture

21 Nov 2008 - 11:10 am | मुक्तसुनीत

कथा रोचक वाटली. तिची मांड्णी उत्कंठावर्धक वाटली. पु. ले.शु.

टवाळचिखलू's picture

21 Nov 2008 - 11:12 am | टवाळचिखलू

.......

- (अस्वस्थ ) चिखलू

नंदन's picture

21 Nov 2008 - 11:29 am | नंदन

कथा आवडली. शेवट असा होईलसे वाटले नव्हते. देशमुख जाताना मरणओझे देऊन गेले म्हणावं लागेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Nov 2008 - 11:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कथा आवडली. शेवट असा होईलसे वाटले नव्हते. देशमुख जाताना मरणओझे देऊन गेले म्हणावं लागेल.
असेच म्हणते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Nov 2008 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

....

यशोधरा's picture

21 Nov 2008 - 11:41 am | यशोधरा

नंदनशी सहमत.

घाटावरचे भट's picture

21 Nov 2008 - 11:51 am | घाटावरचे भट

वरील सर्वांशी सहमत...

सर्किट's picture

21 Nov 2008 - 11:45 am | सर्किट (not verified)

सर्वसाधारणतः ह्या कथेचे विश्लेषण केल्यास,

भारतीय वृद्ध जोडप्यांची मुले सध्या अनिवासी भारतीय झाल्याने, त्यांच्या वृद्ध आईबापांच्या आत्महत्येस कारणीभूत झाली आहेत,

असे दिसून येईल.

आमच्या सोसायटीतील अनेक मुले-मुली अमेरिकेला निघून गेल्याने त्यांच्या म्हातार्‍यांची काळजी हल्ली आम्हाला घ्यावी लागते, हे आपल्याला माहितीच असेल.

-- सर्किट अभ्यंकर अथवा सर्किट चेंगट

(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

अभिरत भिरभि-या's picture

21 Nov 2008 - 12:00 pm | अभिरत भिरभि-या

डीसक्लेमर
कथा मि.पा. वरील कोणत्याही वादाशी संबधित नाही. एक स्वतंत्र कलाकृती समजावी.
तब्बल आठवडाभरापूर्वी मी ही कथा रुपांतरित करणे सुरु केले होते; कोणत्याही वादापूर्वी :)

सर्किट's picture

21 Nov 2008 - 12:05 pm | सर्किट (not verified)

भिरभिर्‍या,

असे बरेचदा होते. कुठलेही वाद निर्माण होण्यापूर्वी अनेकदा, (मिसळपावावरील जुने लेखन पाहिल्यास, सुमारे ६ महिन्यांपूर्वी ह्या विषयावरील प्रतिसाद सापडतील, वाद नंतर निर्माण झाले) असे आपल्या डोक्यात राहते. आणि नंतर लिहिताना मेंदूतील झोपलेल्या पेशी कधी जागृत होतील ते काही सांगता येत नाही.

आनंदाची बाब अशी, की मी स्वतः अनिवासी भारतीय असूनही माझे आई-वडील आनंदित आहेत. हे महत्त्वाचे, नाही का ?

अरे हो, भाषांतर छान झाले आहे, हे लिहायचे विसरलोच.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

अभिरत भिरभि-या's picture

21 Nov 2008 - 11:52 am | अभिरत भिरभि-या

>> शेवट असा होईलसे वाटले नव्हते.

खरे तर याचमुळे कथा निवडली.

रामपुरी's picture

21 Nov 2008 - 12:01 pm | रामपुरी

नि:शब्द.......

अनिल हटेला's picture

21 Nov 2008 - 3:27 pm | अनिल हटेला

भिर भ-या !!
सही जमलये भाषांतर....
शेवट चटका लाउन गेला......

पू ले शु......
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

लिखाळ's picture

21 Nov 2008 - 4:30 pm | लिखाळ

वेगळीच कथा आणि छान अनुवाद.
पुलेशु
-- लिखाळ.

ऋषिकेश's picture

21 Nov 2008 - 5:23 pm | ऋषिकेश

रुपांतर सुंदरच आहे.. चपखल शब्दप्रयोग! अभिनंदन

बाकी मुळ कथेतही मुलगा परदेशी जातो का मुंबईला? (नव्या देवदासात कसं मुंबईचं अमेरिका केलं आहे तसं ;))

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

अभिरत भिरभि-या's picture

21 Nov 2008 - 5:38 pm | अभिरत भिरभि-या

आपट्यांचा मुलगा ( वरिजनल नाव राधाकांत) कुठे जातो याचा मुळ कथेत उल्लेख नाही. पण देशमुखांप्रमाणेच परदेशी जातो असे अभिप्रेत दिसते.

मुळ कथेत झोपेच्या गोळ्या प्रमाणाबाहेर खाऊन आपटे कसे मरतात याचे वर्णन आहे. मी ते अध्याहृत ठेवणे पसंत केले.

"सिरियल वा चेन सुसाईड" ( आत्महत्या शृखंला) हा पैलू मुळ कथेपेक्षा येथे जास्त अधोरेखित केलाय.

ऋषिकेश's picture

21 Nov 2008 - 10:28 pm | ऋषिकेश

मुळ कथेत झोपेच्या गोळ्या प्रमाणाबाहेर खाऊन आपटे कसे मरतात याचे वर्णन आहे. मी ते अध्याहृत ठेवणे पसंत केले.

हे केलेत ते बरे केलेत.. त्यामुळे या कथेत योग्य भाव अधोरेखीत करण्यात यशस्वी झालातसे वाटते. :)

-(भावपूर्ण) ऋषिकेश

शितल's picture

21 Nov 2008 - 6:17 pm | शितल

खुपच सुंदर अनुवाद.
असेच सुंदर अनुवादित कथा आम्हा मिपाकरांना वाचायला द्या. :)

सुनील's picture

21 Nov 2008 - 6:29 pm | सुनील

सुन्न करणारी कथा. म्हातारपणातील एकलेपणा मग तो कोणत्याही कारणांमुळे येवो, भयाणच असावा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ललिता's picture

21 Nov 2008 - 7:00 pm | ललिता

कुठेही जगाच्या पाठीवर जा, म्हातारपण कठिण आहे हे त्रिकालाबाधित दाहक सत्य आहे!

रेवती's picture

21 Nov 2008 - 7:40 pm | रेवती

शेवट असा असेल वाटले नाही.

रेवती

वेताळ's picture

21 Nov 2008 - 8:30 pm | वेताळ

निदान एकदा तरी आपला विचार जुळला.म्हातारपणी रिकामे पेन्शनी आयुष्य जगण्यापेक्षा स्वःताला काहितरी कामात गुंतवुन घेणे चांगले. पण प्रत्येक माणसाची वृध्दापकाळी मनस्थिती कशी असेल हे काही सांगता येत नाही.
पंरतु ह्या आठवड्यात दोन म्हातारयाची तुलना कराविशी वाटते. एक म्हातारा धनगर (ऋषिकेश- दोन धनगर) व एक तुमचे आपटे .धनगर थकला असुन देखिल मनाने हिरवा आहे.पैसा नसुनही मनाने श्रीमंत आहे.९०वयाचा असुनही तरुण पोरांचा उत्साह त्यात ठासुन भरला आहे.त्या उलट आपटे व देशमुख व्यवहारी जगात खुप चांगले आयुष्य जगुन देखिल त्याना आपले म्हातारपन खायला उटले आहे.
दोन्ही लेख नीट वाचले तरी आपल्याला असे का घडले ह्याचे उत्तर नक्की मिळेल. जग झपाट्याने बदलत आहे. आज जगाचे वैश्विक खेड्यात रुपातंर झाले आहे व प्रत्येक घराचे रुपातंर एका मोठ्या अपार्टमेंट मध्ये झाले आहे.घरे जवळ आली पण माणसे दुर गेली आहेत.धनगर मुक्त निसर्गात राहिल्यामुळे त्याला कसे जगायचे व कुणासाठी हे नेमके ठाऊक आहे. पण सिंमेटच्या जंगलात राहणारयाना त्याचे घर एक तुंरुग झाला आहे.व त्यातुन सुटका म्हणजे फक्त मृत्यु हेच उत्तर वाटते.शेवटी प्रत्येक जण आपआपल्या प्रश्नाचे उत्तर आपआपल्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न करतो. तेच त्याच्यासाठी सत्य असते.
कथा खुप छान आणि अंर्तमुख करायला लावणारी आहे. कथे बद्दल अभिरत तुम्हाला धन्यवाद.
वेताळ

अभिरत भिरभि-या's picture

21 Nov 2008 - 8:41 pm | अभिरत भिरभि-या

धनगर मुक्त निसर्गात राहिल्यामुळे त्याला कसे जगायचे व कुणासाठी हे नेमके ठाऊक आहे. पण सिंमेटच्या जंगलात राहणारयाना त्याचे घर एक तुंरुग झाला आहे.व त्यातुन सुटका म्हणजे फक्त मृत्यु हेच उत्तर वाटते.शेवटी प्रत्येक जण आपआपल्या प्रश्नाचे उत्तर आपआपल्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न करतो. तेच त्याच्यासाठी सत्य असते.

एकेका अक्षराशी सहमत !

इतकी भरभरुन व सुरेख प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार. अशी एखादी सुंदर प्रतिक्रिया लेखाच्या सौंदर्य दुणावते.

झटपट जगात थोडे मनाविरुद्ध झाले तर हताश निराश होण्याचे प्रमाण वाढलेय म्हणतात. सहनशीलता / सबुरी आज कधी नव्हती तितकी गरजेची आहे.

ऋषिकेश's picture

21 Nov 2008 - 10:26 pm | ऋषिकेश

धनगर मुक्त निसर्गात राहिल्यामुळे त्याला कसे जगायचे व कुणासाठी हे नेमके ठाऊक आहे. पण सिंमेटच्या जंगलात राहणारयाना त्याचे घर एक तुंरुग झाला आहे.व त्यातुन सुटका म्हणजे फक्त मृत्यु हेच उत्तर वाटते.शेवटी प्रत्येक जण आपआपल्या प्रश्नाचे उत्तर आपआपल्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न करतो. तेच त्याच्यासाठी सत्य असते.

वेताळभाऊ, अप्रतिम सांगड आणि मस्त प्रतिक्रिया! :)

अशी एखादी सुंदर प्रतिक्रिया लेखाच्या सौंदर्य दुणावते.

+१

-(तरूण :) ) ऋषिकेश

अभिज्ञ's picture

21 Nov 2008 - 8:45 pm | अभिज्ञ

अभिरत,
आपण इतर भाषेतील उत्तम कथांचे छानसे भाषांतर इथे देत आहात हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
त्याबद्दल आपले अभिनंदन.
कथाबीज नकाराकडे झुकणारे असले तरि अंतर्मुख करणारे आहे.
भाषांतराबद्दल धन्यवाद.

अभिज्ञ.

प्राजु's picture

21 Nov 2008 - 8:56 pm | प्राजु

मस्तच कथा.
खूप दिवसांनी इतकी सशक्त कथा वाचायला मिळाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनंत छंदी's picture

21 Nov 2008 - 9:03 pm | अनंत छंदी

मित्रा... तोडलंस!!, सुंदर अनुवाद, तुला सलाम!!

भाग्यश्री's picture

21 Nov 2008 - 10:04 pm | भाग्यश्री

एकतर अनुवाद अजिबात वाटला नाही.. आणि 'शेवट' अगदी रूतला .. :(
असा शेवट असायला नको होता.. पण कथा आहे त्यामुळे ठीके.. :)
तुम्ही भाषांतरही सुंदर केलंय.. गुंग होऊन वाचत होते मी..

http://bhagyashreee.blogspot.com/

अभिरत भिरभि-या's picture

22 Nov 2008 - 10:07 am | अभिरत भिरभि-या

सगळ्याच प्रतिक्रिया कौतुक करणार्‍या आहेत. ठ्यांकू ! :)

राव,
एखादी जळजळीत प्रतिक्रिया पण द्या की. का गाडी 'चौपाटी'ला नेल्यावरच देणार ;)

अभिरत ..

शक्तिमान's picture

23 Nov 2008 - 2:13 pm | शक्तिमान

या पाच दांपत्यांना एकमेकांशी संपर्क साधून आपले एकटेपण दूर करता आले असते.

इनोबा म्हणे's picture

23 Nov 2008 - 5:56 pm | इनोबा म्हणे

आणि प्रभात रोडची बहूतेक म्हातारी मंडळी चालवतात तसा एखादा घरगुती क्लब चालवून पत्ते कुटत टायमपास करता आला असता ना राव! :)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

चतुरंग's picture

23 Nov 2008 - 5:49 pm | चतुरंग

रुपांतरित कथा आहे हे सांगितलेस म्हणून खरे वाटले इतकी ती आपलीशी करुन टाकली आहेस! अभिनंदन!!

एकलेपणातून आलेले दु:सह जिणे ह्याला बर्‍याचप्रमाणात ती माणसेच कारणीभूत असतात असे माझे मत आहे. मुले दूरदेशी/गावी जाणे किंवा तिथेच असणे ह्याने फार मोठा फरक पडतो असे नाही.
वयापरत्वे येणारे म्हातारपण काही एकाएकी येत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी हळूहळू घटत जाणारी ताकद, रोडावत जाणारा जनसंपर्क, विरत जाणारे नातेसंबंध हे तुमच्या आर्थिक संपन्नतेवर मात करतात.
मनाचे सत्त्व संपुष्टात येणे ही मरणाकडे वाटचाल असते. मनाची शक्ती कशी टिकेल, आपण लोकांत कसे मिसळून राहू शकू, आपली मदत कशी होऊ शकेल, इतरांशी मनाने जमवून घेणे कसे साध्य होईल ह्याच विचार प्रत्येकाने प्रौढवयात का होईना करुन ठेवायला हवा. हट्टाग्रह, दुराग्रह कमी करणे. विनाकारण सल्ले देण्याचा स्वभाव कमी करणे इ. असो विषय मोठा आहे. एक लेखच होईल!

चतुरंग