फोनवर पलिकडे कोणीतरी ! (भाग २) (अंतिम)
लेखनप्रकार
फोनवर पलिकडे कोणीतरी ! (भाग २)
मागील भाग
(उत्तरार्ध)
आतापावतो आपट्यांच्या मनात देशमुखांबद्दल चांगलेच कुतुहल निर्माण झाले होते.
आपट्यांनी प्रश्न केला.
-कुठून फ़ोन केलाय तुम्ही ?
आपट्यांना हसण्याचा आवाज आला.
- सगळे सांगत नाही. तुमच्या सारखेच एका बंगलीत राहतो आम्ही. तुमच्याकडे कॉलर लाईन आयडेण्टिफ़िकेशन नसणार. त्यामुळे तुम्ही मला शोधू शकत नाही.
- शोधले तर काय होईल ? जवळपास तत्क्षणीच आपट्यांनी विचारले.
देशमुख म्हणाले - मग प्लॅन भुईसपाट व्हायची शक्यता आहे. हा आमचा जुना प्लॅन आहे. आमचा म्हणजे माझा व बायकोचा.
मला दम्याचा त्रास आहे, तिला अक्युट आर्थाराईटिस
- मुल मुली ?
प्रश्न ऐकुन देशमुख नि:शब्द झाल्यासारखे वाटले. लगेच कोणतेही उत्तर दिले नाही. आपट्यांना लाईन तुटली अशी भिती वाटली.
- हॅलो?
- हो आहे मी. जरा घसा कोरडा पडला म्हणून पाणी पित होतो. मुलगा इग्लंडात असतो आणि मुलगी.. नाही, तिची गोष्ट राहु द्या.
सौ. अलका आपटे दिवाणखान्यत दूध घेऊन आल्या. आपटे फ़ोनवर बोलताहेत पाहून त्यांना नवल वाटले. करपल्लवीने त्यांनी विचारले
- कोणाचा फोन आहे?
आपट्यांना व्यत्यय नको होता.त्यांनी तॉंडावर बोट ठेऊन चुप राहण्याची खूण केली.
पलीकडून आवाज आला.
- हॅलो. ऐकताय का ?
- हो हो
- खरी गोष्ट अजून सांगितलीच नाही.
- खरी गोष्ट ?
- हो ज्याच्यासाठी फ़ोन केलाय ती. आणखी काय ?
देशमुखांनी सुस्कारा सोडला.
- मुलांविषयी म्हणताय ?
देशमुख वेगळेच हसले. एकोणनव्वद साली डॉक्टरकी करायला तो राणीच्या देशात गेला. पहिल्यांदा रोज रात्री फ़ोन वाजायचा.
वर्षभरात तो महिन्यातून एकदा झाला. पुढे कामाचा व्याप वाढला म्हणून ६ महिन्यातून एकदा. एम. डी. झाल्यावर तिथेच सेटल झाला तो. लग्न ही तिकडेच केले. तेव्हापासून तर क्वचित कधी तरी फ़ोन असे. आईच्या वाढदिवसाला पण न चुकता फ़ोन करायचा.
या वर्षी तो ही केला नाही.
- मुलगा कामात असेल, म्हणून नसेल जमले. तुम्ही करायचा ना मग ?
- ते खरे आहे पण आता अवाजावरून ही खूप समजते. तुम्ही जसे आपुलकीने ऐकताय तसे असते तर ...
पुन: फोनवर निरवता पसरली.
आपटे बाईंनी कोणाचा फ़ोन आहे, किती वेळ चालणार म्हणून दबक्या आवाजात विचारले. आपट्यांनी उत्तर दिले नाही.
बोलण्यातले रहस्य अजून उलगडले नव्हते. घड्याळात ११:२० झाले होते.
- तुमच्या फ़ोनचे बिल वाढतेय. आपटे म्हणाले.
- खरे बोलताय पण आज बिलाची चिंता नाही. लाईन तशी ही कायमची तुटणार आहे.
- म्हणजे ?
- म्हणजे संबंध. जन्मापासून आपण संबंध जोडणे सुरु करतो. रंग, वजन, उंची सर्वात आपल्या छटा आपल्याला हव्या असतात.
फ़क्त काही छटा गडद होतात काही फ़िक्या. आपटेसाहेब?
- ऐकतोय मी.
- मी चुक केली का हो काही ?
- नाही. वाटत नाही.
- कायमचे तोडायचे आहे सगळे आपटेसाहेब.
आपटे चमकले. तोडणे शब्दच किती वियोगाक्त ! दबक्या आवाजात त्यांनी विचारले
- म्हणजे ?
क्षणिक विश्रांतीनंतर एक बारीक हसू ऐकु आले.
- मी बळवंतराव देशमुख. वय ७२. बायको मालती देशमुख वय अडुसष्ट. मुलगा परदेशात. आमची मुलगी. नाही तिचे सोडा.
चतु:शृंगीला छोटीशी बंगली आहे. जवळपास २२ लाखांचा बँक बॅलन्स आहे. आठ हजार पेन्शन मिळते. मालतीची तब्येत बघता ती माझ्या आधी जाणार हे स्पष्ट आहे. तसे आताही कोणासाठी जगायचे हा प्रश्न आहे.
- असे का म्हणता बळवंतराव ?
- बायको सारखी विचारते - तुम्हाला कोणापाशी सोडून जाऊ मी?
आपट्यांकडे याचे उत्तर नव्हते. टेबलावरचे दूध आता गार झाले होते. आपटेबाई फोन संपण्याची वाट पहात होत्या.
- तुमचा पता देता का ? मी भेटायला येईन तुम्हाला.
- त्यात काही लाभ नाही आपटेसाहेब. आज सारे पाश सोडून आम्ही जातोय. जायपूर्वी जगात कोणापाशी तरी आम्हाला आमच्या पापकृत्याची कबुली द्यायची होती. आपटे साहेब, आम्हाला माफ करा.
- बळवंतराव !
आपट्यांच्या तोंडून अस्फ़ुट चित्कार उमटला. हे असले काही ऐकायले मिळेल याची त्यांनी कल्पना केली नव्हती.
- हॅलो बळवंतराव. हॅलो .... हॅलो .....
लाईन आधीच तुटली होती.
सुन्न मनाने आपटे परत सोफ़्यावर येऊन बसले. डोक्यात घणाचे घाव बसताहेत असे त्यांना वाटले. 'कुणाचा फ़ोन होता?' आपटे बाईंनी विचारले.
- ऑफ़िसातल्या देशमुखांनी सहस्त्रचंद्रदर्शनाला बोलावलेय. आपट्यांना खरे सांगायची इच्छा नव्हती.
- बराच उशिर झालाय. मी झोपते आता. तुम्हीही रात्र करु नका. डोळ्यातल्या झोपेमुळे अर्धवट खुलाश्यावर आपटेबाई संतुष्ट होत्या.
आपट्यांच्या कानावर हे बोल पडले पण मेंदूपर्यंत ते पोहचले नाहीत. बहिरेन्द्रिये केव्हाच निश्चिष्ट झाली होती.
आता जे काही विलक्षण ऐकले त्या धक्क्यातून ते अजून सावरले नव्हते. देशमुखांच्यात व त्यांच्यात किती साम्य होते. म्हणायला दोघे सुखवस्तु पण आतुन कुढणारे. देशमुखांचे शेवटचे वाक्य अजूनही मनात घुमत होते. 'जायपूर्वी जगात कोणापाशी तरी आम्हाला आमच्या पापकृत्याची कबुली द्यायची होती.' आणि अशी कितीतरी वादळे त्यांच्या मनात थैमान घालत होती.
शेवटी त्यांनी एक निर्णय घेतला. फ़ोनपाशी गेले. रिसिव्हर क्रेडलवरुन उचलला आणि डिरेक्टरी पाहून एक नंबर फ़िरवला.
- हॅलो. गंगाधर दशपुत्रे ? मी नरहरी आपटे बोलतोय. कृपा करून फ़ोन ठेऊ नका. एक महत्वाचे बोलायचेय.
पलीकडून लौकर उत्तर आले नाही. लाईन तुटली की काय असे वाटून आपटे थरथरत्या गळ्याने म्हणाले.
- हॅलो.
ठीक तेव्हाच 'श्रमसाफल्य बंगला सहकारनगर पुणे ९' येथून सत्तरीतल्या एका स्वराने त्यांना आश्वस्त केले.
- हो ऐकतोय. बोला.
----
दुसर्या दिवशीच्या वृत्तपत्रातील एक बातमी --
'शहरात ५ वृद्ध दांपत्यांचा एकाच रात्रीत गूढ मृत्यु'
(संपुर्ण)
( 'गौर बैरागी' यांच्या मुळ बंगाली कथेवरुन स्वैर )
वाचन
10763
प्रतिक्रिया
0