तो आणि ती..... श्रीकृष्ण! (भाग 12) (शेवटचा)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
31 Jul 2018 - 8:20 pm

तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956

तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957

तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969

तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980

तो आणि ती........ कुंती!: https://www.misalpav.com/node/42995

तो आणि ती...... द्रौपदी!: https://www.misalpav.com/node/43004

तो आणि ती..... सुभद्रा!: https://www.misalpav.com/node/43027

तो आणि ती....... सत्यभामा!: https://www.misalpav.com/node/43043

तो आणि ती... जांबवती!: https://www.misalpav.com/node/43052

तो आणि ती........ मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी!: https://www.misalpav.com/node/43065

तो आणि ती..... रुक्मिणी!: https://www.misalpav.com/node/43089

तो आणि ती................. श्रीकृष्ण!

"नारायणा............ विश्वेश्वरा............... जगद् उद्धारा .............. मोहना............... वासुदेवा.................. काय करून बसलो मी हे? तुमच्या चक्रवर्ती पावलाला मी ससा कसा समजू शकलो? या पापी हातांनी तुमच्या सुलक्षणी पावलाच्या अंगठ्याला तीर मारून जी जखम केली आहे ती मला निस्तरू दे देवेश्वरा............. नाहीतर माझा उभा जन्मच नव्हे तर माझ्या सहस्त्र पिढ्या कायम नरकात जातील. मला या शापातून मुक्त करा मोहेश्वरा!"

"धीराने घे जरा. तू व्याधी आहेस. या वनात तू शिकारीसाठी आलास आणि तुझ्या मतिला जे दिसले त्यादिशेने तू तुझ्या भात्यातील तीर सोडलास. यात तू कोणतेही पाप केलेले नाहीस. त्यामुळे असा व्याकूळ होऊ नकोस. बस इथे असा! या अतिप्रचंड वृक्षाखाली पहुडले असताना नकळत मी माझ्या जीवनाचा पट पाहात होतो; माझ्या मनातील भाव मी स्वतःलाच समजावत होतो.... आता तू आला आहेस तर बस माझ्या जवळ इथे.... आज मला माझे मन कोणाकडे तरी मोकळे करावे ही उर्मी दाटून आली होती; आणि तू समोर आलास. हादेखील एक कर्मयोग असावा... त्यामुळे पुढची चिंता करू नकोस....."

"तू तुझ्या कोणत्याही कृतीला दोष देऊ नकोस. कारण आपण आयुष्यात जे करत असतो त्यामागील कार्यकारण भाव अगोदरच ठरलेला असतो. नाहीतर माझा जन्म होताच क्षणी मातेच्या हृदयाला बिलगून तिच्या उष्ण प्रेमळ प्रेमरसाचा घोट न घेता तिच्यापासून नाळ तोडून घेत मला गोकुळात जावे लागले नसते. माझ्या अगोदरच्या सहा पुत्रांना माझ्या देवकी मातेने गमावले होते. तिच्या सातव्या पुत्राचा अंश रोहिणी मातेने स्वतःच्या उदरात धारण केल्याने तो पुत्र जरी वाचला होता; तरी देवकी मातेच्या हृदयातील पीडा मात्र तशीच होती. अशा परिस्थितीत माझा जन्म झाला. तिचे मातेचे हृदय कोणकोणत्या भावनिक आंदोलनांमधून गेले असेल याचा विचार देखील करणे पिता म्हणून माझ्या वसुदेव बाबांना शक्य झाले नव्हते. त्यावेळी त्यांनी केवळ कर्तव्य पूर्तीच्या भावेने मला गोकुळात नंद बाबांच्या घरी नेले आणि यशोदा मातेच्या कुशीत मी माझ्या जन्माचे पहिले रुदन केले. माझ्या त्या रुदनामध्ये देवकी मातेचा विरह लपला होता; मात्र तो कोणालाही लक्षात आला नाही; आणि आयुष्यभर मी तो कधी व्यक्त केला नाही.

प्रेमळ यशोदा मातेच्या प्रेमसायीने माखल्या पदराच्या आधाराने मोठे होत असताना अनेक असुरांना, राक्षसांना मी वधले.... त्यावेळच्या माझ्या त्या लीलांमुळे यशोदा मातेच्या कोमल स्त्रीमनाला भीतीच्या किती यातना मी दिल्या असतील या जाणीवेने माझे मन अनेकदा पोखरले गेले. मात्र त्यावेळी देखील प्रेमयोगापेक्षा कर्मयोग जास्त मोठा आहे; याची जाणीव खोल हृदयात सतत तेवत होती.

माझ्याहून वयाने मोठ्या असणाऱ्या राधेने माझ्यावर जीव ओवाळून टाकला. मी देखील तिच्यावर मनापासून प्रेम केले. किंबहुना राधेवरील माझ्या प्रेमभावनांचा पुनरानुभव मला आयुष्यात कधी झाला नाही. तिने माझ्या प्रेमाखातर तिचे भावजीवन त्यागले आणि तरीदेखील लोकार्थाने तिने तिचे जीवन एका सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे कंठले. मी गोकुळ सोडताना ती माझ्या रथासमोर येऊन उभी राहिली; त्यावेळी मी तिला केवळ शब्दांनी समजावले. तिने दिलेली वैजयंतीमाला स्वीकारताना ती आसुसून माझ्या नेत्रांकडे पाहात होती. तिला शेवटचे एकदा माझ्या नेत्रातील प्रेमभाव तिच्या हृदयात साठवायचे होते. मी मात्र तिच्याकडे नजर उचलून बघितले नाही. माझ्या नजरेतील घायाळ प्रेम पाहून तिने गोकुळ त्यजले असते; याची मला पूर्ण जाणीव होती; आणि त्याचवेळी गोकुळ सोडतानाच मला माझ्या पुढील आयुष्याच्या वाटचालीची जाणीव झाली होती. त्या आयुष्यात राधेसारख्या सात्विक प्रेमभाव जपणाऱ्या स्त्रीला स्थान नव्हते. त्यामुळे माझ्या मनातील भावना दूर सारत मी कठोरपणे तिच्याकडे पाहाणे टाळले. मात्र माझे ते वागणे आयुष्यभर माझ्याच मनात घर करून बसले.

आयुष्याच्या विविध वळणांवर अनेक स्त्रिया माझे जीवन स्पर्शून गेल्या. या स्त्रियांपैकी मन:निर्धाराचा मेरुमणी असणाऱ्या माझ्या कुंती अतेला कधी विसरू शकणार नाही. वयाच्या पौगंडावस्थेत केवळ उत्सुकतेपाई तिने एक खूप मोठा निर्णय घेतला. त्या निर्णयाचा बोजा तिने आयुष्यभर सहन केला. कर्ण तिचा प्रथम पुत्र असुनही ती कधीच त्याचा स्वीकार करू शकली नाही. शेवटी तिच्या पाच पुत्रांच्या आयुष्यासाठी तिला तिच्या या लोकोत्तर प्रथम पुत्राची आहुती त्या माहाभारतीय होमकुंडात द्यावी लागली. सर्व माहित असूनही त्या मातेला स्वमुखाने आपल्या पुत्राकडे त्याच्याच मृत्यूची मागणी करावी लागली..... काय म्हणावे आयुष्याच्या या खेळीला? तिला तिच्या त्या प्रथम पुत्राकडे जाण्याचा निर्णय घेण्यास मीच मदत केली होती.... कुंती आते हे मनात घोळवत असेल का?

जी परिस्थिती कुंती आतेची होती काहीशा फरकाने तीच परिस्थिती द्रौपदीची होती. कुंतीआतेने चार लोकोत्तर शक्तींपासून तशाच चार शक्ति पुत्रांना जन्म दिला.... तिच्या स्नुशेने; द्रौपदीने पंचपतींना वरून त्यासार्वांशी एकरूपतेने आयुष्यभर संसार केला. द्रौपदीला स्वयंवरामध्ये अर्जुनाने जिंकले होते.... त्यामुळे खरेतर तिने केवळ अर्जुनाची पत्नी होणे योग्य होते. मात्र कुंती मातेच्या मुखातून नकळत का होईना परंतु दिला गेलेला आदेश आणि द्रौपदीने तिच्या मागील जन्मात शिवाकडे मागितलेल्या वराची सांगता यामुळे तिला पाच पुरुषांसोबत लग्न करावे लागले. पांचाली असूनही ती पतिव्रता स्त्री कायम स्थिर बुद्धीने वावरली. तिचे क्षत्राणी तेज कायम तिच्या सोबत राहिले आणि तिची निर्णयक्षमता पांडवांचे बलस्थान. द्रौपदीच्या या सर्व गुणांमुळेच ती माझी प्रिय सखी राहिली आयुष्यभर....

माझ्या एकुलत्या एक भगिनीबद्दल काय सांगू? रूपवती, गुणवती अशी माझी सुभद्रा.. माझी प्रिय भद्रा.... तिच्या मनात अर्जुनाविषयीचे प्रेमभाव मीच जागवले. कारण तिच्या उदरी जन्म घेणारा तिचा आणि अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याच्या हातून त्यानंतरच्या भविष्यात एक मोठे कार्य होणे आवश्यक होते. यासर्वाची य:किंचित कल्पना नसलेली माझी भद्रा........ माझ्यावरच्या निस्सीम विश्वासावर तिने तिच्या आयुष्याची दोर माझ्या हाती सुपूर्द केली होती. भावबंधांचा विचार करायचे म्हंटले तर मी माझ्या या लहान भगिनीचा अपराधी आहे; असे मला वाटते. अभिमन्यूच्या वीर मरणाची वार्ता ज्यावेळी शिबिरात येऊन थडकली त्यावेळचा सुभद्रेने फोडलेला टाहो त्यानंतर कायमच माझ्या हृदयात गुंजत राहिला आहे. तिचे सांत्वन करताना माझे थरथरणारे हात आपल्या ओंजळीत घेऊन तिने त्यात स्वतःचा चेहेरा लपवला होता... जणू ती सांगत होती... दादा, सर्व जाणून देखील जर तू तुझ्या भद्रेला या दुःखात लोटले आहेस तर ते देखील मी तुझा आशीर्वाद म्हणून स्वीकारते.

हे आणि असे अनेक निर्णय मी आयुष्यात घेतले. ती काळाची गरज होती.... पुढील अनके आयुष्यांच्या सन्मार्गासाठी काही आयुष्यांचे बलिदान देण्याचा निर्णय घेण्यासाठीच तर माझा जन्म झाला.... हजारो वर्षानंतर देखील या महाभारतीय युद्धाचे दाखले देऊन अनेक महत्वाचे निर्णय वेळोवेळी घेतले जातील. त्यासाठी धर्म मार्ग आखून देणे आवश्यक होतेच. याच निर्णयांच्या शृंखलेतील काही निर्णय हे माझ्या स्वतःच्या जीवनात देखील महत्वाचे टप्पे ठरले..... सत्यभामेच्या वडिलांकडील स्यमंतक मणीरत्नाने माझ्या आयुष्यात जांबवती, सत्यभामा यांना आणले... तर मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा आणि भद्रा यांच्याशी विवाह ही युद्ध कालातील शक्तीकेंद्रांची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन केलेली संधी होती. कालिंदीचे माझ्या आयुष्यातील आगमन ही तिच्या तपश्चर्येची सांगता होती. अर्थात मी पतीधर्म कधीच सोडला नाही.... याचे कारण देखील माझी प्रथम पत्नी.... आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करत असूनही स्वत्व जपलेली माझी रुक्मिणी हे आहे..... तिच्या नेत्रातील माझ्या निर्णय क्षमतेवरील विश्वास आणि मी नात्यातील भावनिक गुंता सोडवत असताना तिचे माझ्या बरोबर खंबीरपणे असणे.... यामुळे मला कायम एक वेगळीच उर्जा प्राप्त होत राहिली.

माझ्या आयुष्यात अनेकविध स्त्री-पुरुष येऊन गेले. काही माझ्या हृदयातील भावबंधाने जोडले गेले; तर काही काळाची गरज म्हणून............. आज आयुष्याच्या या वळणावर हा कृष्णरूपी देह त्यागताना पुढील भविष्यासाठी एक योग्य आणि धर्मसंमत भविष्यकाळ निर्माण केला आहे हे समाधान माझ्या मनी वसते आहे. जरा व्याधा, तू अजिबात दु:ख करू नकोस. तुझे इथे असणे हेच सिद्ध करते आहे की माझे अवतार कार्य इथे संपते आहे........... कालात् तस्मैsनम:!!!"

प्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Aug 2018 - 2:21 pm | प्रचेतस

खूपच सुरेख झाली ही मालिका.

यशोधरा's picture

1 Aug 2018 - 2:46 pm | यशोधरा

 तू व्याधी आहेस.

एक शंका.
व्याध = पारधी आणि व्याधी = आजार ना?
पारधी म्हणून शब्द वापरला आहे की अजून काही वेगळा अर्थ अपेक्षित आहे?

ज्योति अळवणी's picture

1 Aug 2018 - 4:27 pm | ज्योति अळवणी

तुमची शंका बरोबर आहे. व्याध म्हणायचे होते. चुकलंच!

टर्मीनेटर's picture

1 Aug 2018 - 3:01 pm | टर्मीनेटर

छान झाली मालिका. श्रीकृष्णाच्या बहुआयामी चरित्राचे वेगळे दर्शन घडले. _/\_

ज्योति अळवणी's picture

1 Aug 2018 - 4:27 pm | ज्योति अळवणी

मनापासून आभार

श्री कृष्णाची नवीन ओळख घडवलीत आपण , प्रत्येक भाग छान होता . /\
/ \

मनिम्याऊ's picture

1 Aug 2018 - 9:56 pm | मनिम्याऊ

सुंदर मालिका. मला या भागात आणखीन एका म्हणजे श्रीकृष्ण आणि मीरेच्या संवादाची अपेक्षा होती.
एकंदरीतच छान लेखन

प्राची अश्विनी's picture

2 Aug 2018 - 6:59 am | प्राची अश्विनी

खूपच सुंदर मालिका. आवडली मला.

सोमनाथ खांदवे's picture

2 Aug 2018 - 11:46 am | सोमनाथ खांदवे

आपल्या लेखणी मधून भावार्थ ओसंडून वाहतोय , प्रत्येक भाग मी भक्ती ने तल्लीन होऊन वाचला , अवघची मिपासंसार तुम्ही कृष्णमय करून टाकला .
येऊ द्या अजून /\

यश राज's picture

2 Aug 2018 - 11:54 am | यश राज

आवडली

ज्योति अळवणी's picture

2 Aug 2018 - 4:19 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद

अनिंद्य's picture

6 Aug 2018 - 12:04 pm | अनिंद्य

@ ज्योति अलवनि,
कृष्णसखींचे मनोगत हा फॉरमॅट फार आवडला.
तुम्ही लिहिलेय देखील मोजके, तरल - तरीही त्यांच्या मनातले भाव स्पष्ट सांगणारे.
आवडले.
अनिंद्य

ज्योति अळवणी's picture

6 Aug 2018 - 1:59 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद अनिद्य