तो आणि ती.... राधा! (भाग 4)

Primary tabs

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
11 Jul 2018 - 8:17 pm

तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956
तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957
तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969

तो आणि ती................ राधा

"राधे...... तू आणि इथे द्वारकेत?"

"तुला देखील वाटलं नाही ना की मी इथवरचा पल्ला गाठेन? त्या स्वप्नवत नंदनवनातील सुरक्षित आयुष्यातून बाहेर पडून केवळ तुझ्या शेवटच्या.......दर्शनासाठी मी द्वारकेचा दरवाजा वाजवेन?"

"शेवटच्या? का राधे? कुठे जाते आहेस तू? असे निर्वाणीचे शब्द तुझ्यासारख्या जीवनाने ओतप्रोत भरलेल्या स्त्रीला शोभत नाहीत. तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाचे कारण हेच तर आहे की तू कायमच सळसळत्या उत्साहाने ओसंडत असायचीस. स्त्रीत्व म्हणजे काय ते तूच तर मला समजावलस. कधी अबोल डोळ्यांनी, तर कधी धावत्या शब्द लडयांनी, कधी उत्कट स्पर्शातून तर कधी व्याकुळ मिलनातून... अनेकदा मात्र ओसंडत्या भक्तीतून ते जास्त जाणवलं.......... मग ती रात्री-बेरात्री रचलेली रासक्रीडा असो किंवा यमुनेच्या पात्रातील तुझे नाहाणे असो..... तुझा तो प्रसन्न टवटवीत चेहेरा कायम मला जीवनातील निरामय आनंदाचा अर्थ सांगून गेला आहे..... आणि आज मात्र तू हे असे निर्वाणीचे बोलते आहेस?"

"कृष्णा...... तुझे हे दर्शन शेवटचे असे मी का म्हणाले हे तुला खरच कळले नाही का?की आता तू तुझ्या राधेशी देखील शब्दच्छल करतो आहेस? किंवा अस म्हणू; तू देखील तुझ्या राधेला समजू शकला नाहीस? जर तुझ्या समजण्यापलीकडे ही राधा असेल तर मग मी इतरांकडून काय अपेक्षा करावी? मोहना.... माझी सासू..... माझा पती अनय...... मला एकच प्रश्न सतत विचारायचे. संसारात असूनही तू नसतेस.... तू तुझ्या मुलांमध्ये असूनही त्यांच्यात रमत नाहीस..... तो गेल्यानंतर आपले उत्सव... आपले सण..... केवळ आयुष्याचा एक भाग  म्हणून करतेस. अस काय आहे त्याच्यात? मधुसूदना... त्यांच्या या प्रश्नांवर देखील मी काहीच बोलायचे नाही. त्यांना वाटायचं की मी उत्तर न देऊन त्यांचा अपमान करते आहे. पण माझ्याकडे याचे उत्तरच नव्हते रे."

"राधे.... काही प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात आणि काही प्रश्नांची उत्तरे असूनही ती न दिलेलीच चांगले असते."

"मोहना.......... तुझ्या या वाक्यात सर्वकाही आले रे. तुला कळला आहे 'मी शेवटचे दर्शन घेण्यासाठी आले;' या माझ्या बोलण्याचा अर्थ. पण मनमोकळेपणी ते कबुल करायला तू आता नंदनवनातील गोपाळ राहिला नाहीस. खूप बदलून गेलास रे...... वृन्दावनातला कन्हैया तोलून मापून बोलत नसे. गोपिकांना छेडताना त्यात जितका स्वच्छ भाव होता आणि नजरेत केवळ प्रेमळ चेष्टा होती; तो माझा किसन आता मला तुझ्यात दिसत नाही. वयाने माझ्याहून लहान असणाऱ्या तुझ्यावर एका नवथर प्रेयसिप्रमाणे प्रेम करताना मी समाजाची........ घरच्यांची..... आप्तजनांची कोणाचीच तमा बाळगली नाही. तू माझा प्रियकर होतास...... आणि कायमच राहाशील...... मला माहित आहे; तुझ्या मनात देखील खोल कुठेतरी एक कळ उठतेच माझ्या नावासरशी. म्हणूनच आज इथे या खाऱ्या समुद्राच्या सानिध्यात तू एकटाच बसला आहेस; तुझं गण-गोत लांब सोडून. गोपाला... येते मी. या तुझ्या द्वारकेत राधेच्या प्रेमाला जागा नाही हे मला माहित आहे. मात्र जाताना एक प्रश्न विचारते त्याचे उत्तर दे........ अहं! मला नाही..... तुझ्या मनाला.................... आजही हातात चक्र असताना देखील कंबरेची ती बासरी तू त्यागलेली नाहीस........... ती वृन्दावनाची आठवण की या राधेची?"

प्रकटन

प्रतिक्रिया

तुम्ही तुमच्या मनातलं प्रकटन लिहिताय त्याबद्दल कौतुक आहेच. काही वेगळे पैलू वाचायला मिळालेत या तिन्ही भागात. त्याबद्दल धन्यवाद.
पण श्रीकृष्ण हे पूर्णपुरुष मानले गेले आहेत. त्यामुळे ज्या सर्व स्त्रियांचं मनोगत तुम्ही व्यक्त करणार आहात, त्यांचं श्रीकृष्णांशी असलेलं नातं मानवी आणि अध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांवर नाळ जोडून लिहावं असं वाटतं.

ज्योति अळवणी's picture

12 Jul 2018 - 2:39 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद!

माझ्या मते श्रीकृष्णाशी असणारं अध्यात्मिक नातं अनेकदा व्यक्त झालं आहे. श्रीकृष्ण देव होते मात्र त्यांच्या आयुष्यातील एक द्रौपदी सोडली तर इतर स्त्रिया सर्वसामान्य होत्या. केवळ श्रीकृष्णाच्या सानिध्यात आल्याने त्यांचे आयुष्य बदलले होते. त्यामुळे कदाचित त्यांच्या सर्वसामान्य स्त्रीमनाची घुसमट देखील झाली असेल.... असं कायम मला वाटत आलं आहे. त्यामुळे ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे