तो आणि ती..... रुक्मिणी! (भाग ११)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
30 Jul 2018 - 4:31 am

तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956

तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957

तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969

तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980

तो आणि ती........ कुंती!: https://www.misalpav.com/node/42995

तो आणि ती...... द्रौपदी!: https://www.misalpav.com/node/43004

तो आणि ती..... सुभद्रा!: https://www.misalpav.com/node/43027

तो आणि ती....... सत्यभामा!: https://www.misalpav.com/node/43043

तो आणि ती... जांबवती!: https://www.misalpav.com/node/43052

तो आणि ती................. रुक्मिणी!

"रुक्मिणी..... प्रिये...... आज या सागरकिनारी तुझा हात हातात घेऊन उभे असताना माझ्या मनात काही प्रश्न दाटून आले आहेत."

"स्वामी.... मला असे का वाटते आहे की आपल्या भावजीवनाबद्दल माझ्या प्रिय सवतींना, विशेष करून सत्यभामेला............ कुंती आतेला किंवा देवकी मातेला जे प्रश्न पडले तेच तुम्ही माझ्यासमोर मांडणार आहात; आणि तरीही तुमच्या मनातील भाव काहीतरी वेगळेच उत्तर देऊन जाणार आहेत."

"काय सांगतेस प्रिये... असे काय प्रश्न त्यांच्या मनात होते; की जे त्यांनी तुझ्याकडे मांडले मात्र माझ्याजवळ कधी त्याचा उल्लेख देखील केला नाही."

"यादवश्रेष्ठा, त्यांच्या मनातील प्रश्न हे जरी तुमच्या संबंधातील होते तरीही त्याची उत्तरे त्यांना माझ्याकडूनच हवी होती. कदाचित् माझ्या उत्तरातून त्या स्त्रीमनाचा शोध घेत असतील. भामेच्या मनात कायम एक प्रश्न राहिला की आम्हा अष्ट पत्नींवर तुम्ही मनापासून प्रेम केलेत... तरीही तुमच्या आयुष्यातील प्रेयसीचे स्थान राधेलाच मिळाले. असे का? आर्य, एकदा कुंती आतेंशी हितगुज करताना त्यांच्या स्नुषेचा; द्रौपदीचा; विषय निघाला असता त्यांनी मला विचारले होते; 'रुक्मिणी, तू माझ्या श्रीकृष्णाची प्रथम प्रिय पत्नी... तुझ्यावर त्याने मनापासून प्रेम केले. कोणाचीही तमा न बाळगता केवळ तुझ्या एका हाकेवर तुझे हरण करून तुला मानाने द्वारकानगरीत आणले. मला खात्री आहे की तो तुझ्याजवळ त्याच्या मनातील सर्व भाव मोकळे करीत असेल. परंतु तरीही ज्या-ज्या वेळी तो द्रौपदीबद्दल बोलतो; त्याप्रत्येक वेळी तो तिचा उल्लेख सखी द्रौपदी असाच करतो......... तू प्रिय पत्नी असूनही तो द्रौपदीला सखी मानतो याचे तुला वैषम्य नाही का ग वाटत?' यादवश्रेष्ठा, प्रत्यक्ष तुमच्या देवकी मातेने देखील मला एकदा प्रश्न केला होता की माझ्यानंतर आलेल्या तुमच्या सप्त पत्नींचे स्वागत मी कसे करू शकले? त्या सर्वांनी आपणहून मला त्यांच्या थोरल्या भगिनीचे स्थान दिले.... इतके प्रेम मी त्यांना कसे देऊ शकले?........."

"रुक्मिणी.... हे अगदी खरे आहे की माझ्या मनात देखील आज हेच प्रश्न आहेत. मला खात्री आहे या सर्वाना तू योग्य ते उत्तर दिलेच असशील. आज मला देखील समजून घ्यायचे आहे तुझ्या मनातील भाव.... सांग प्रिय पत्नी.... तू काय उत्तर दिलेस या सर्वाना?"

"यदुकुलभूषणा, मी जे काही उत्तर देणार आहे; ते तुम्हाला माहित आहे याची मला खात्री आहे. तरीदेखील तुमची इच्छाच आहे तर ऐका.......... ही समोर दूरवर पसरलेली धरती, हा जणू अंत नसणारा सागर, तुमच्या नील कायेप्रमाणेच नील रंगाने व्यापलेले हे अवकाश.... तुमच्या उत्तनियाला उडवणारा हा वायू आणि आता परतीच्या वाटेकडे लागलेले ते सूर्यकिरण...... ही पंच माहाभूते! ही पंचमाहाभूते एकमेकांशिवाय अधुरी आहेत. स्वामी...... तुमचं आणि माझं नात देखील या पंचमहाभूतांप्रमाणे अत्यंत गहिरं, खोल आणि आत्मीय आहे. मात्र या किनाऱ्याने ज्याप्रमाणे धरतीला सागरापासून वेगळे केले आहे; त्या क्षितीजरेषेने सागर आणि अवकाशाचे अस्तित्व दुभंगवले आहे; सूर्यकिरणांनी त्यांच्या उष्ण स्पर्शाने त्यांचे अस्तित्व आपल्या पर्यंत पोहोचवले आहे आणि वायुने न दिसताही आपले स्वत्व जाणवून दिला आहे; त्याचप्रमाणे मी तुमच्या-माझ्या या नात्याच्या मोहमयी रेशीम बंधनात असून देखील माझ्यात उरलेच आहे..... हे अंशत: असलेले स्वतंत्र अस्तित्व मी आयुष्यभर उराशी सांभाळले आहे; हे असे का हा प्रश्न मला कायम सतावत आला आहे. परंतु म्हणूनच कदाचित् मला राधेच्या प्रेयसी असण्याचे दु:ख झाले नाही..... द्रौपदीच्या सखी असण्याचे वैषम्य वाटले नाही; किंवा माझ्या प्रिय सवतींबद्दल कधी दुजाभाव मनात आला नाही. मनमोहना, हे एकरुपतेतले द्वैत मला आयुष्यभर जाणवले; मात्र ते कोडे कधीच उलगडले नाही; आणि मला खात्री आहे की आज इथे या सागरकिनारी तुम्ही मला काही विचारण्यासाठी आणेलेले नसून माझ्या मनातील या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आणले आहे."

"रुक्मिणी, माझ्या प्रिय पत्नी.......... अगदी नेमके ओळखले आहेस. मला आयुष्यभर तुझे हे स्वत्व जपणेच तर मोहवत आले आहे. आजवर माझ्या बाललीलांमुळे किंवा पुढील आयुष्यातील प्रासंगिक निर्णयांमुळे झालेल्या चमत्कारात्म्क कृतींमुळे माझ्या आयुष्यातील सर्व स्त्री-पुरुष सर्वस्वाने माझ्यात सामावून गेले आणि मला पुजू लागले. मात्र माझी प्रिय राधा.... सखी द्रौपदी आणि तू... केवळ तुम्ही तिघींनी माझ्या अस्तिवाचा भाग असूनही आपले स्वत्व जपलेत. प्रिये, माझ्या आयुष्यातील मी घेतलेल्या निर्णयांमधील कार्यकारणभाव समजून त्यायोगे आपल्या आयुष्यातील योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे मला कायम भावले. ही क्षमता केवळ राधेमध्ये, द्रौपदीमध्ये आणि सुलक्षणे तुझ्यामध्ये मी पाहिली. मात्र अलीकडे मला हे जाणवू लागले होते की तुझे हे स्वत्व जपणे तुला अस्वस्थ करते आहे. म्हणूनच मी तुला इथे आणले. तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. या पंचमहाभूतांप्रमाणे एकमेकात सामावून देखील स्वत्व जपणे हेच खरे आयुष्य जगणे आहे. ते तुला कळले आहे...... त्यामुळे इतरांच्या माझ्यात सामावण्याच्या भावनेचा मी आदर करीत असलो तरी तुमच्या 'स्वत्वाचा' मी हृदयापासून स्वीकार केला आहे हे जाणून घे."

"श्री......... तुम्ही माझ्या मनीचे भाव जाणलेत आणि आयुष्याच्या या उत्तरार्धात मला ऋणमुक्त केलेत... याहून जास्त मी काय मागावे?.............. चलावे....... अस्त घटिका जवळ आली आहे."

-----------------------------------------

प्रकटन

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

31 Jul 2018 - 9:01 am | रंगीला रतन

आता आधीचे भाग वाचतो.

ज्योति अळवणी's picture

31 Jul 2018 - 9:53 am | ज्योति अळवणी

नक्की वाचा. उद्या शेवटचा भाग upload करणार आहे. श्रीकृष्ण भाव व्यक्त करणारा. तो शेवटचा असेल

प्रचेतस's picture

31 Jul 2018 - 6:35 pm | प्रचेतस

उत्तम लिहिताय,
ललित म्हणून ठीकच मात्र राधेचं मूळात नसलेलं पात्र ह्या संवादात ऑड वाटतं.

ज्योति अळवणी's picture

31 Jul 2018 - 8:07 pm | ज्योति अळवणी

मान्य

मात्र श्रीकृष्ण जीवनाचा उल्लेख राधेशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. मुख्य म्हणजे राधेच्या रूपातून एक स्त्रीमन व्यक्त होऊ शकले आहे; असे मला वाटते