तो आणि ती.... देवकी!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
8 Jul 2018 - 9:54 am

तो आणि ती............. देवकी!

"यादवा, आज आयुष्याच्या उत्तरार्धात मागे वळून बघते तेव्हा वाटत अनेकविध घटनांनी भरलेलं आयुष्य जगले मी. वडिलांची आणि मोठ्या भावाची लाडकी होते मी. कितीतरी कौतुकाने कंसदादाने माझं लग्न तुझ्या वडिलांशी लावून दिलं होत. त्यादिवशी आम्ही सगळेच कितीतरी आनंदात होतो. मात्र त्याचवेळी ती आकाशवाणी झाली आणि माझ्या आयुष्याचे फासेच फिरले. कारावासात असताना अनेकदा मनात येऊन गेलं; जर ती आकाशवाणी झालीच नसती तर; कदाचित् आयुष्य वेगळं असत. कंसदादाच्या वधानंतर तू स्वतःचा राज्यभिषेक न करता हट्टाने तुझ्या वडिलांना सिंहासनावर बसवलंस; त्यावेळी मला तुझी माता असण्याचा अभिमान वाटला. मात्र तुझ्याअगोदारचे माझ्या सहा पुत्रांच्या मृत्यूचे दु:ख सतत माझ्या हृदयातली जखम ओली ठेवत होते...."

"माते, तू मला तेव्हाच का नाही सांगितलेस तुझ्या मनीचे दु:ख? बलराम दादाकडे तू बोललीस आणि त्याने मला सांगितले तेव्हा मला तुझ्या मनीची व्यथा कळली. मात्र त्यानंतर बलराम दादाच्या मदतीने मी तुझे सर्व पुत्र.... माझे सर्व ज्येष्ठ बंधू यमराजाशी युद्ध करून घेऊन आलोच ना?"

"यदुकुलभूषणा, माझ्या सर्व पुत्रांना घेऊन येणे ही तुझ्या अनेक लीलांमधील एक लीला होती; हे का मला माहित नाही? कारण तू तर सर्वांचं मन वाचतोस. मग तुला प्रत्यक्ष तुझ्या जन्मदात्रीच्या मनीची व्यथा सांगायची वेळ का यावी? मोहना, तू जरी माझा पुत्र असलास तरी तुझं खरं रूप माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहित असणार रे? हे जगद्नियांत्या, माझ्या गेल्या जन्मीच्या तपस्येच फळ म्हणून मी तुला माझ्या उदरातून जन्म दिला. मात्र तुझ्या बाललीला मी बघू शकले नाही. माझा पान्हा कायमच कोरडा राहिला."

"माते, आपण भूतलावर जन्म घेतो ते आपली प्राक्तन भोगण्यासाठीच. मी अनेकदा मानवांच्या शक्तीबाहेरच्या गोष्टी केल्या असल्या तरीही मला तुमच्यातलाच एक राहू दे ग. माझ्या जन्माचं रहस्य फक्त तुझ्या माझ्यातच असू दे. त्याविषयीची चर्चा तू इतर कोणाकडे करू नकोस ह. मी कोणीही असलो तरी सध्या जन्माने तर मी मानव आहे ना? मानवीय भावना माझ्या मनातही रुजल्या आहेत. मीदेखील एका आश्वस्त स्पर्शाचा भुकेला आहे ग. कदाचित् म्हणूनच परत परत मी या भूतलावर जन्म घेत असतो."

"नंदना........... माझ्या पुत्रा..... ये असा माझ्या जवळ. ये! तो तुझा हिरेजडीत मुगुट थोडा लांब ठेऊन माझ्या मांडीत डोळे मिटून पड बघू! ये रे माझ्या बाळा....  तुझ्या काळ्याभोर केसांमधून हात फिरवून मी देखील माझ्या मनातल्या तृषार्त मातेची इच्छा पूर्ण करून घेते. तुझ्या बाललीला बघू शकले नाही; किमान तुझ्या पुत्र स्पर्शाचे सुख तरी मला या उतार वयात उपभोगू दे. आता माझ्या मनात याहून जास्त काहीही इच्छा उरलेली नाही."

लेख

प्रतिक्रिया

रातराणी's picture

8 Jul 2018 - 11:19 am | रातराणी

आवडला पहिला भाग, संक्षिप्त वाटला थोडा, अजून लिहा.. पुभाप्र.

यश राज's picture

8 Jul 2018 - 12:38 pm | यश राज

छान लिहीलय

टवाळ कार्टा's picture

8 Jul 2018 - 3:13 pm | टवाळ कार्टा

माझी शंका आणखी बळावली आहे....हा अस्साच स्टोरी प्लॉट मी मिपामैत्रीणीकडून ऐकलाय....आणि जर ही लेखमाला असेल तर माझ्यामते तरी बराच भाग सारखा असू शकेल

ज्योति अळवणी's picture

8 Jul 2018 - 3:31 pm | ज्योति अळवणी

ही लेखन मालाच आहे. गेले अनेक महिने किंबहुना वर्षभर माझ्या मनात असं काहीसं लिहायचं होतं. श्रीकृष्णाच्या आयुष्यातल्या स्त्रियांच्या मनातले भाव. पण ते कसे व्यक्त करावेत ते काही सुचत नव्हतं. म्हणून राहात होतं. पण मग अचानक सुचलं आणि मी लिहायला घेतलं. तुमच्या मिपामैत्रिणीला विचारून बघा की त्यांच्या मनात देखील असच काहीसं आहे का? असल्यास मला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल

अपेक्षेपेक्षा प्रचंड वेगळं निघालं, आणि तितकं आवडलं पण नाही..

क्षमस्व.

प्राची अश्विनी's picture

8 Jul 2018 - 4:28 pm | प्राची अश्विनी

अरे व्वा! लेख आवडला.
योगायोगाने याच concept वर मी लिहिलेलं नाटक "श्यामरंग- एक तयाचा रंग असाही (copyrighted) या ऑगस्टमध्ये स्टेजवर येतंय. बरंचसं सारखं असावं.
तुम्ही लिहिलेलं वाचायला आवडेलंच.

ज्योति अळवणी's picture

8 Jul 2018 - 4:46 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद!!

टवाळ कार्टा यांनी आपल्याबद्दलच उल्लेख केला असावा. आता मला देखील तुमच्या नाटकाबद्दल उत्सुकता वाटते आहे. नक्की बघायला आवडेल तुमचं नाटक.