हाफ चड्डी गँग (पार्ट -१)

Primary tabs

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
8 Sep 2017 - 7:49 pm

पोर्तुगीज भाषेत एक म्हण आहे "ए ओकासीआओ फाज ओ लाडराओ" आपल्या मराठीत त्याचा अर्थ होतो कि,
"चोर संधी निर्माण करतो आणि संधी सापडली तर सगळेच चोर होतात"
याच भाषेत अजून एक म्हण आहे, ती अशी कि "क्यूएम कॉन्टा उम कॉण्टो, आऊमेन्टा उम पोण्टो" अर्थात, गोष्ट सांगणारा आपली भर घालतोच, आपल्या पदरचं, आपल्या बाजूनेच सांगतो. चार लहान मूलांना साप दिसला, तर प्रत्येकाला वेगवेगळे विचारून बघा, केवढा मोठा साप होता, असे!.
तर, आज मी जी एक गोष्ट सांगणार आहे ती अगदी खरीखुरी पण "उम कॉण्टो, आऊमेन्टा उम पोण्टो" करून सांगणार आहे, आयमीन थोडीशी फोडणी देऊन सांगणार आहे.

महाभारत हे जसं एक "लँड डिस्प्यूट"चं प्रकरण आणि "रामायण" हि एक "किडनॅपिंग"ची केस होती तशी हि सदर केस "सेक्शन-३७८" अर्थात चोरीची केस आहे. या कथेत चाळीस चोर जरी नसले तरी ते 'दोन' मुख्य चोर आता चाळीशित पोहोचले आहेत.
हा सेक्शन-३७८ असं म्हणतो कि,
"Whoever, intending to take dishonestly any moveable property out of the possession of any person without that per­son’s consent, moves that property in order to such taking, is said to commit theft." अजून बरंच काही बोलतो हा सेक्शन पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

या केसच्या खोलात जाण्याआधी आपण पटकन पात्र परिचय करून घेऊयात.
आरोपी नं -१ :- बाजी प्रभू
आरोपी नं -२ :- संजय पाटील
जजसाहेब :- शेख सर (प्रिन्सिपल, विकास रात्रशाळा)
सीबीआय :- शिपाई (विकास रात्रशाळा)
आय विटनेस :- राजेश कांबळे.
सरप्राईज एन्ट्री :- चारुशीलाचा दणकट भाऊ.

साल १९८९, प्रीलीमिनरी परिक्षा नुकतीच आटोपून बोर्डाच्या परीक्षेचे वेध लागले होते. "निकालाची काळजी करू नका, अभ्यासाचं योग्य नियोजन करा" सदरातील सगळे अशक्य लेख वाचून झाले होते. दहावी पासआऊट विद्यार्थींचे इंटरव्यू ऐकले होते. "एक होता कार्व्हर" वाचून विलक्षण अनुभुतीतून ती मुलं ढवळुन निघालि होती. आता फक्त मी आणि संजय ढवळायचे बाकी राहिलो होतो म्हणूनच त्या दुपारी पोटात ढवळत असतांना देखील आम्ही दोघं शाळेच्या लायब्ररित जायला निघालो. त्या दिवशी सकाळपासूनच माझी डावी पापणी खूपच फडफडत होती, एक पालहि अंगावर पडली होती त्यात भरीस भर म्हणून विकास शाळेच्या गेटवर एक काळी मांजर आडवी गेली. मी अशुभ संकेतांचे माझे कन्सर्न संजयला सांगितले. त्यावर तो म्हणाला,

"एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरीकृपे त्याचा नाश आहे"

मी:- आँ!! संजय! व्वा, लय भारी, कार्व्हर वाचायच्या आधीच त्याचे डायलॉग्स पाठ. त्याचा अर्थ तरी माहितेय का साल्या?
संजय:- अरे एकनाथ महाराजांचे वाक्य आहे ते. "तुमच्या प्रारब्धात जे आहे ते व्हायचे असल्यास मांजर आडवे न जाताही काही वाईट होउ शकते" असं म्हणालेत ते. कार्व्हर काय कार्व्हर. च्युxx साला!!

हा प्रेमळ संवाद होईपर्यंत आम्ही लायब्ररित पोहोचलो.

आम्ही:- ओ सर ते "एक होता कार्व्हर" पुस्तक पाहिजे.
सर:- का? काय शेती करायचीय का दहावी नंतर?
आम्ही:- आँ! ते शेतीचं पुस्तक आहे? मग नको सर.
सर:- अरे मस्करी केली रे, छान आहे पुस्तक, वाचा-वाचा नक्की वाचा पण आता नाहीये. एकजण संध्याकाळी रिटर्न देणार आहे ६-७ वाजता या.
आम्ही:- ओके सर, थॅंक्यू सर.
संजय:- बाजी! ६ वाजायला फक्त दोनच तास उरलेत. आपण वरच्या वर्गात जाऊन अभ्यास करू आणि जातांना पुस्तक घेऊन जाऊ चालेल?
मी:- ओके बॉस.

लायब्ररित गर्दी होती म्हणून मग आम्ही पहिल्या माळ्यावर अगदी शेवटच्या वर्गात म्हणजे त्यावेळच्या आंबेडकर इंग्लिश हायस्कूलच्या वरच्या वर्गात जायला निघालो. संध्याकाळी तिथे रात्रशाळेचे वर्ग भरत असत. माझी डावी पापणी परत फडफडायला लागली होती. "जब गीधडकी मौत आती है, तब वह शहरकी और भागता है" असा डायलॉगहि कुठूनसा कानावर पडला. एनीवे, वर्गात गेलो तर तिथे चार-पाच धटिंगण आधीच कुंथत होते. आयमिन घोकत होते. आम्हीही मग घोकायला सुरवात केली. सगळं छान चाललं होतं आणि मोजून १० मिनिटाने तो क्षण आला.

एका कोपऱ्यात जी गोष्ट आम्ही पहिली ती पाहून संजय आणि मला साधारण ५ किलो हर्ष झाला. एका काच फुटलेल्या कपाटात होते "चॉक (खडू)" चे बॉक्स. "ए ओकासीआओ फाज ओ लाडराओ" सारखी परिस्थिती होती. क्षणभर संजय आणि माझी प्रश्नार्थक नजरानजर झाली. "जे मनात तुझिया, तेच माझिया मनात असुनी, बोलल्याविना ह्रदयामधुनी गेले निघुनी" हे गाणं कुठेतरी वाजत असल्याचा भास झाला आणि क्षणाचाही विलंब न करता एक रंगीत खडूंचा बॉक्स मी उचलला तर सफेद खडूचा एक बॉक्स संजय ने उचलला.
कोणताही प्रश्न न पडता "सेक्शन-३७८" आमच्या हातून घडला होता. शामच्या आईने डोळे मिटले होते. आपल्याला कोणीच बघितलेले नाही या कॉन्फिडन्सवर संजयला म्हणालो चल कल्टी मारुयात. तशीची आपल्याला शेती करायची नाहीये. ते कार्व्हर पुस्तक नंतर वाचूयात आणि विद्युत वेगाने घरी पोहोचलो. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत काही घडलंच नाही या थाटात आम्ही आपापल्या घरी वावरत होतो, तिन्ही सांजेच्या दिवा बत्तीची तयारी करत होतो. तीकडे रात्र शाळा भरली आणि इकडे आमचा घडा एका क्राईम मधेच भरला.

पुढे काय झालं?, काय शिक्षा झाली?, अशी कोणती भानगड होती कि चारूचा भाऊ दंड धोपटून आमची वाट बघत होता? क्रमा-क्रमाने आम्ही आगीतून फुफाट्यात कसे गेलो? शिर्षकातील हाफ चड्डी गॅंगचा काय संबंध होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं "हाफ चड्डी गँग १९८९ (पार्ट -२)" मधे.

लेखविरंगुळाबालकथामुक्तकविनोद

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

8 Sep 2017 - 7:57 pm | पगला गजोधर

eu primeiro

पु.ले.शु.
(दिवाळी अंकाची थीम व्यक्तीचित्रे आहे तेव्हा तुम्ही लिहाचं)

बाप रे! आता पुढे काय होणार (झाले असावे) याची उत्सुकता लागून राहिली आहे. रच्याकने ट्रेलर आवडला. अब पूरी पिक्चर दिखाओ. ;-)

पैसा's picture

8 Sep 2017 - 10:31 pm | पैसा

रोमहर्षक!

शलभ's picture

9 Sep 2017 - 12:20 am | शलभ

मस्तच सुरुवात..

प्रीत-मोहर's picture

9 Sep 2017 - 7:33 am | प्रीत-मोहर

पुभालटा!!

दुर्गविहारी's picture

9 Sep 2017 - 10:15 am | दुर्गविहारी

मस्तच लिहीलयं, लवकर टाका पुढचा भाग.

अमोल काम्बले's picture

9 Sep 2017 - 1:12 pm | अमोल काम्बले

मस्तच.... पुभालटा!!