असं असतं थाई लग्न!!

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
20 Aug 2017 - 8:02 pm

असं म्हणतात की एखाद्या देशाचं अंतरंग, समाजमन, संस्कृती कशी आहे हे जाणून घ्यायची असल्यास तेथील भाषिक सिनेमे, नाटक किंवा लोककला पहा. यात मी अजून एक सुचवेन ते म्हणजे स्थानिक "लग्न सोहळा" पहाण्याची. धर्मश्रद्धा किंवा परंपरा त्यातून प्रतीत होणारे समाजमन अनुभवण्याची उत्तम संधी यानिमित्ताने मिळते असं मी म्हणेन. अर्थात अशी संधी सगळ्याच मिपाकरांना प्रत्यक्ष मिळेलच असं नाही म्हणून मग धृतराष्ट्राला संजयने जसा युद्धाचा आँखों देखा हाल सांगितला तसाच मी तुम्हाला एका थाई लग्नाचा सांगणार आहे. (बाकी लग्न आणि युद्ध तसे समानर्थीच शब्द आहेत, फार फरक नाहीये दोघांत). तर महाभारतात संजयने युद्धभूमीवर प्रत्यक्ष न जाता हस्तिनापूरच्या राजवाड्यात बसून धृतराष्ट्राला युद्धाचे जसेच्या तसे वर्णन करून सांगितले असले तरी तुमचा हा "संजय" प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जाऊन आलेला आहे. देश का सबसे भरोसेमंद(?) झी-न्यूजच्या भाषेत सांगायचं झालं तर,

रिपोर्टर मौके पर मौजूद? => हा भाई हा!!
खबर कि पुष्टी? => सोनूss तुला माझ्यावर भरोसा नाय काय?
गवाह या एक्सपर्ट? => मी स्वतःच
तकनीकी विश्वनीयता => थोडं उन्नीस-बीस होईल.

तर,
जवळपास ५०% शब्दांचं मूळ संस्कृत असलेली भाषा बोलणारे आणि एकाअर्थाने आपले मावस भाषाबंधू-भगिनी असलेल्या थाई मंडळींच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र वातावरणात वाढलेल्या दोन घराण्यांतील व्यक्ती एकत्र येऊन जन्मभर एकत्र राहण्याचा “लग्न” नावाचा विलक्षण प्रयोग कसा पार पाडतात? लग्नात शार्दूलविक्रीडित वृत्तात रचलेली मंगलाष्टके असतील का? "ओटीत घातली मुलगी विहीणबाई", "जा बाळे जा, सुखे सासरी" म्हणत पाणावलेल्या डोळ्यांची वधूमाय दिसेल का? यज्ञवेदीच्या भोवती सप्तपदी म्हणत शतजन्मींचे नाते सांगणारी थाई नववधू पारंपरिक वेशात कशी दिसत असावी? उखाणे वगैरे थाई बायका घेत असतील का? वरमंडळी तोऱ्यात तर वधूमंडळी नरमाईच्या भूमिकेत असतील का? लवकरात लवकर आहेराचं पाकिट टेकवून पहिल्या पंक्तीत नंबर लावून न विसरता आईस्कीम खाऊन ऑफिसात पोहोचणारे सुपरमॅन आमंत्रित इथे असतील का? हुंडा वगैरे गोष्टी थाई समाजात आहेत का? 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न!' अशी आपल्याकडे म्हण आहे आणि इथे तर सगळेच नकटे मग इथल्या लग्नांत अडचणींचा महापूर येत असेल का? अश्या बऱ्याच प्रश्नांची रुंजी मनात घालत हल्लीच एक थाई लग्न अटेंड केलं त्याचा हा वृतान्त.

मी मुलीकडचा त्यामुळे मुलाची फारशी माहिती नसली तरी मुलगा सालस स्वभावाचा, नाकासमोर पाहून चालणारा, सरकारी कायम नोकरीवाला आहे वगैरे वगैरे माहिती जमवता आली. मात्र आमची गृहकृत्यदक्ष, चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी कन्या "यवालाक अनुनतासील" हिची बरीच माहिती माझ्याकडे आहे त्यातील काही निवडक माहिती सर्वप्रथम सांगतो.

चि.सौ.कां. "यवालाक अनुनतासील" ही तशी चाळीशी उलटून गेलेली घोड-नवरी म्हणता येईल. आमच्या ऑफिसमधे अॅडमिनस्ट्रेशन डिपार्टमेंटला इम्पोर्ट-एक्स्पोर्ट आणि इतर कस्टम्स संबंधित कामाची जबाबदारी सांभाळणारी एक सर्वसाधारण स्टाफ. फावल्या वेळात केळ्याचे चिप्स, ड्रायफ्रुट्स स्टाफच्या इतर लोकांना विकणं असे कुटिरोद्योग तिचे चालू असतात. (आपल्याकडे कसं काहीजण घरगुती लोणची-पापड ऑफिसात विकतात अगदी तसंच). मी दिवसागणिक गट्टम करत असलेल्या चिप्सची मदत आमची दोस्ती वाढण्यास झाली हे वेगळं सांगायला नको. भूक लागली आणि कँटीन बंद असेल तर या अन्नपूर्णेकडे मी हक्काने जातो आणि तिनेही मला कधी उपाशी पोटी पाठवलेलं आठवत नाही. मिपावर तिच्या लग्नाचे फोटो टाकण्याची आणि एकूण लेख लिहिण्याबद्दल तिने हसत हसत दिलेली अनुमती यावरून आमच्या मैत्रीची खोली लक्षात येईलच.

शांत स्वभावाची, दिसायला नीटस, काटकसरी आणि मेहनतीने स्वतःच्या पायावर उभी असलेल्या यवालाकची फॅमिली बॅकग्राऊंड आपल्या भारतातल्या टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात फिट बसेल अशीच. वडील गव्हर्नमेंट सर्व्हंट, आई हाऊसवाईफ, एक भाऊ आणि एक बहीण, रीतसर शिक्षण घेऊन नोकरी धंद्याला लागलेलं एक आटोपशीर कुटुंब. ही बॅकग्राऊंड देण्याचं कारण हे की आपली नायिका कोणत्या क्लासमधील आहे याचा अंदाज यावा म्हणून. कारण आपण माहिती घेतोय ते लग्न पारंपरिक आणि काही पाश्चिमात्य विधींची सरमिसळ असणारा असा आहे. कारण गेल्या दीडदोनशे वर्षांमध्ये थाई लग्न पद्धती आपल्याकडील लग्नांसारखीच बदलत गेलेली आहे. आजकाल आपल्याकडे कसं लग्नात केक कापायचे, हार घालतांना गाफील नवरा-नवरीला पतंगीसारखं उंच उडवून अडवणूक करण्याचे, अंगावर चुळा टाकण्यापासून ते दातांनी लवंग तोडणे आणि "हम आपके है कौन" धर्तीवर जिजाजींचे जोडे लपविण्याचे प्रकार वाढू लागलेत अगदी तसंच.

थाई लग्नांत उखाणे वगैरे घेतले असल्यास मला कल्पना नाही पण मी मात्र उखाणा घेऊनच पुढे टंकायला घेणार आहे. हा असा,

सप्तपदीची सात पावलं
साताजन्मांच्या गाठी..
वाचायलाच हवं तुम्हाला
खून यवालाकसाठी.

यवालाक कन्या थायलंडची
तीन भावंडात छोटीशी...
वरही तिचा साजेसा
लग्न विधीचा घेऊ आता कानोसा.
मात्र,
उतू नका.. मातू नका घेतला वसा टाकू नका
वाचून झाल्यावर कमेंट करायला विसरू नका.

असं हे "ट" ला "ट" जोडून झाल्यानंतर आता मी लग्नाचे फोटू जोडायला घेतो. यात पहिला फोटो आपल्या नायक-नायिकेचा.

↓ आता लग्न विधींपूर्वी प्रथम स्मरण पूर्वजांचे. खाली जो फोटो दिसतोय त्याला थाई भाषेत "सान फ्रा फूम" अर्थात "स्पिरिट हाऊस". थायलंडमधे पूर्वजांची स्मृती म्हणून छोटेखानी मंदिराटाईप अशी "स्पिरिट हाऊसेस" जवळपास प्रत्येक आस्थापनांत, घरांच्या व्हरांड्यात, कॉंडोमिनिअमच्या आवारात वास्तुशास्त्रानुसार एका विशिष्ट कोपऱ्यात दिसून येतात. आपले पूर्वज येणाऱ्या संकटांना प्रवेशद्वारापाशीच रोखून धरतात यावर थाई लोकांची नितांत श्रद्धा आहे. त्यांचं स्मरण, पूजन, प्रसाद दाखवणं अगदी रोज केलं. म्हणजे आपण पित्रुपक्षात सगळ्या पितरांची आठवण काढतो किंवा वाडी दाखवतो ते थाई मंडळी रोज करतात. प्रसाद म्हणून जेवण आणि फळांपासून ते अगदी मिरिंडा देखील ठेवतात. लग्नसमारंभासारख्या धार्मिक कार्याची सुरूवात या पूर्वजांच्या पूजनानेच होते.

↓ हे वऱ्हाडी मंडळी मुलीच्या घरी येतानाच्या स्वागताचं दृश्य. थायलंडच्या ग्रामीण भागात नवऱ्या मुलाला खांद्यावर घेऊन येतात. त्याला खांद्यावर घेऊन येत असतांना काही आरोळ्या दिल्या जातात. त्या आरोळ्या देण्याची पद्धत कशी असते विचाराल तर ती आपल्या बंगाली लग्नात किंवा दुर्गा पूजेत स्त्रिया जो "उलु ध्वनी" चा नाद करतात अगदी तसाच. नवऱ्यामुलाचं स्वागत करण्याची ही पद्धत शहरी भागात दिसेलच असं नाही.

↓ खालील फोटोमधे तुम्हाला मुलीकडील काही मंडळी मुलाचा रस्ता अडवण्यासाठी सज्ज झालेली दिसतील. आपल्याकडे गृहप्रवेशाच्या वेळी नव्या सुनेचा दरवाजा मुलाची बहीण अडवते आणि मागण्या करते असाच काहीसा प्रकार इथे मुलाच्या बाबतीत होतो. यात वराला तीन प्रकारच्या प्रवेशद्वारातून जावं लागतं. कांस्य द्वार, रजत द्वार आणि स्वर्ण द्वार. हे सिम्बॉलिक दरवाजे कसे असतात हे फोटो बघितल्यास लक्षात येईल. सदर लग्नात कांस्य द्वार (ब्रॉन्झ) ची जागा प्लॅस्टिकच्या पाईपने घेतलेली दिसतेय (नवऱ्या मुलाला पोकळ बांबूचे फटके मिळणार की काय असं दोन सेकंद वाटून गेलं, पण तसं काही घडलं नाही). इथे द्वारपालांना नवऱ्या मुलाने काही बिदागी द्यायची असते तरच ते फाटक उघडतात. थोडक्यात नवऱ्यामुलाच्या खिशाला इथून पुढे भोकं पडत जातात आणि उत्तरोत्तर ती वाढतच जातात.

↓ हा "रजत द्वार". इथे नवऱ्या मुलाला होणाऱ्या मेव्हणीला भरभक्कम लाच द्यावी लागते. मनाजोगती बिदागी मिळत नाही तोपर्यंत ती "आय लव्ह यु,आय लव्ह यु" ओरडत रहाते. या मागचं लॉजिक असं की मला जर खूश नाही केलंस तर तुमच्या संसारात मी सवत बनून येईन आणि सगळ्यांनाच त्रास देईल हे. इथे वरपक्ष आपापले मुत्सद्देगिरीसाठी नाव कमावलेले कोणी काका, मामा ह्यांना Chief Negotiator म्हणून नेमतात आणि मुलाला संभाव्य बँककरप्सी पासून वाचवतात. लॉजिकली मला हे पैसे बहिणीने द्यायला पाहिजे होते असं वाटत होते पण इथे उलटा प्रकार पाहून आश्चर्य वाटून नवऱ्या मुलाची कीव आली. बिच्चारा!! असो, दहा मिनिटांच्या गुदगुदल्यांसाठी आम्ही गाढवपणा काय कमी केलाय..

↓ आणि हा "स्वर्ण द्वार". इथे नवऱ्या मुलाला लाच देताना पाहिलं नाही पण गडी तंदुरुस्त आहे की नाही हे मात्र मुलीकडच्यांनी व्यायाम कार्याला लावून चेक केलं. हे असं,

↓ आणि हे धार्मिक विधींचे फोटो. यात ब्राम्हण रूपात असलेले बौद्ध भिक्षू हे नेहमी नऊच्या पटीत असतात. उदा. ९, १८, २७ असे. या बौद्ध भिक्षूंचा बसण्याचा डावीकडून उजवीकडचा क्रम हा वयावर नसून किती वर्षा पासून भिक्षू आहेत यावर असतो. लग्नात म्हटले जाणारे "नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स" आणि ॐ चे उच्चारण मला ओळखीचे वाटले. आपल्याकडे प्रत्यक्ष लग्नाच्या धार्मिक बडबडीमध्ये जसं कोणालाच स्वारस्य नसते आणि धूर डोळ्यात जाऊन बेजार झालेले वरवधू, भटजी आणि स्वरचित मंगलाष्टके म्हणण्यासाठी उत्सुक हौशी कवयित्री इतकेच जण काय चालले आहे ते पहात असतात तसंच साधारण दृश्य मला इथे दिसलं.

↓आणि आता हे वाङनिश्चयाचे फोटो. अगदी आपली भारतीय पद्धत तंतोतंत भासावी असा एकूण विधी. मुलाकडील मंडळी दागिने आणि हुंड्याची रक्कम एका कपड्यावर गोलाकार सजवून ठेवतात. थाई भाषेत या विधीला "सिन सोध" म्हणतात. होणाऱ्या वधूची तिच्या आई-वडिलांनी घेतलेली काळजी आणि आतापर्यंत केलेला सांभाळ याची परतफेड म्हणून नवऱ्यामुलाने द्यावयाच्या बिदागीला "सिन सोध" म्हणतात. मी आर्थिक दृष्ट्या तुमच्या मुलीची काळजी घेणास समर्थ आहे हाही अर्थ यातून अभिप्रेत असतो. मध्यम वर्गीयांत साधारण १ लाख थाई बाथ (आपले २ लाख रुपये) एव्हढी रक्कम हुंडा म्हणून दिली जाते. बरेचदा मुलगा होतकरू पण परिस्थिती बेताची असलयास मुलाकडून फक्त विधी म्हणून पैसे घेतले जातात पण ते त्याला नंतर परत केले जातात. पण हा विधी करतातच हे विशेष.

↓ वाङनिश्चयाचा विधी आटोपल्यावर सगळे पैसे आणि भेटवस्तू कापडात गुंडाळून नवरा मुलगा मुलीच्या आईला देतो. आई ने ते पैसे ठेवायला जातांना खास ओझ्याने वाकली आहे अश्या पद्धतीने चालायचं असतं. माझा जावई कसा तालेवार असे काहीसे शब्दप्रयोग मला एकाने समजावले होते. हा प्रसंग आपल्याला हसण्यास उद्युक्त करतो.

↓ हा फोटो विशेष. या फोटोमधे दिसणाऱ्या शंकराच्या पिंडीसदृश्य वस्तू पाहून माझं कुतूहल जागं झालं. पण ते फार काळ टिकलं नाही. ते खरंतर थाई पद्धतीचं एक "जाते" होते आणि त्यावरून मुलीची घेतलेली परीक्षा पाहून आपल्या जुन्या काळात जसं "मुली, चालून दाखव पाहू", मुलीचे हस्ताक्षर पाहिले जाई, "चहापोहे मुलीनेच केले" आहेत किंवा "समोरचा बाळकृष्ण हिनेच भरला आहे" असा मुलीच्या पाककौशल्याचा आणि एकूण गृ.कृ.द. पणाच्या पुराव्याची चाचपणी केली जाई त्याची आठवण मला झाली. आमच्या यवलाकची बांधलेल्या हाताने दळण दळून देण्याची परीक्षा इथे घेण्यात आली, अर्थात ती पास झाली हे वेगळे सांगायला नको.

↓आणि हा "साय मॉन खॉन" विधी,
यात वर आणि वधूने खाली वाकून नमस्कार मुद्रेत बसायचं असतं. आणि बौद्ध भिक्षूंनी आधीच मंत्रोच्चार करून संस्कार केलेले "सुती धागे" उपस्थितांनी वधूवरांच्या मनगटावर बांधायचे असतात. कुटुंबातील वडीलधारी मंडळींचा मान पहिला असतो. धागा बांधणाऱ्या प्रत्येकाला एक रिटर्न गिफ्ट दिलं जाते.

↓ अस्मादिक

↓आणि हा थाई लग्नातला शेवटचा धार्मिक विधी. याला थाई भाषेत "रोद नाम सांग" अर्थात शंखातून पवित्र पाण्याचं अर्ध्य देणे असं म्हणतात. सुती धागा हातात बांधलेल्या आणि डोक्यावरही तसंच बंधन असलेल्या आणि नमस्कार मुद्रेत वधू आणि वराने बसायचं असतं. जमलेले उपस्थित शंखामधे पाणी घेऊन वधू-हातावर सोडतात आणि सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देतात.

↓आणि आता फोटो रिसेप्शनचे.
सगळया फोटोग्राफीतून सवड मिळाल्यावर, आणि वधू-वर वल्कले बदलावयास गेले तेव्हा मीही बाकीच्या निमंत्रित प्राणिवर्गात सामील झालो. हल्ली थाई भाषा थोडी ओळखीची झाल्याने उपस्थितांची चाललेली एकूण बडबड समजत होती. मनुष्यप्राणी इथून तिथून सारखाच. स्त्रीवर्ग एकमेकींच्या दागिन्यांचा आणि ड्रेसेसचा लेखाजोखा मांडत बसलेल्या होत्या तर पुरुष मंडळी मांडवात बसून ’नेहरूंचे काय चुकले’ या धर्तीवर "पीएम थकसिन शिनावात्राचे काय चुकले " टाइपच्या चर्चांनी, पेगावर वर पेग मारत कालक्रमणा करीत होते. दोन्ही पक्षांचे गोंडस 'राजू' आणि 'पिंकी' मांडवात धुमाकूळ घालून शिवाशिवी, लपंडावात स्वतःची करमणूक करवून घेत होते आणि एक थाई 'नारायण' कोणाला हवं नको ते पहात होता. शांत, सुमधुर संगीतात आणि सोनेरी पाण्यात रंगलेले आमंत्रित आनंदी दिसत होते.

या लग्नात मला एक पद्धत आवडली ती म्हणजे निमंत्रितांनी आपापल्या टेबलावर बसून रहायचं आणि वर-वधूने एकत्र प्रत्येक टेबलापाशी जायचं. ज्यांना गिफ्ट आणि शुभेच्छा द्यायचं आहे त्याने ते द्यावं आणि फोटो वगैरे काढून घ्यावेत. कुठेही गोंधळ नाही, रांगा नाहीत.. मला ही पद्धत खूप आवडली.

↓आणि हे काही मिस्लेनीअस फोटो.

↓या माझ्या ऑफिसभगिनी.

संस्कृतीसमाजलेख

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2017 - 8:09 pm | धर्मराजमुटके

लै भारी ! मनोरंजन आणि माहिती एक साथ साथ ! जबरदस्त ! आवडले.

बाजीप्रभू's picture

21 Aug 2017 - 8:16 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!! धर्मराजमुटके जी

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2017 - 4:19 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वण!

अम्युझिंग! तुमची वर्णन करण्याची हातोटी फार खेळकर आणि मजेशीर आहे. वाचताना मजा आली! फोटोही छान आहेत. महिला छायाचित्रकारिणी आवडल्या. म्हणजे, महिलापण फोटू काढतात हे आवडलं. एकूण थाई मंडळी आपल्यासारखीच आहेत सांस्कृतिकदृष्ट्या. दक्षिण-पूर्व आशियावर चीनचा वांशिक प्रभाव दिसून येतो, मात्र भाषिक व सांस्कृतिक प्रभाव हा भारताचा आहे. खुद्द चीनवरही भारताचा सांस्कृतिक प्रभाव बौद्ध धर्माच्या रूपाने गेली कित्येक शतके टिकून आहे.

लेख फारच आवडला हेवेसांनल.

बाजीप्रभू's picture

21 Aug 2017 - 8:27 pm | बाजीप्रभू

बरोबर!!

भारतीय संस्कृतीचा प्रभाव आणि आदर थाई जनतेला खूप मनापासून आहे... पण भारतीयांबद्दल नाही हे विचार करण्यासारखे आहे.
यावर एक लेख लिहायचा विचार आहे माझा... बघू कधी जमतेय ते.

एक गंमत सांगतो,
थायलंडमधे अशी एक म्हण आहे कि,
तुम्हाला जर साप दिसला आणि इंडियन दिसला तर सापाला सोडून दया इंडियनला मारा. अश्या अर्थाची.

अर्थात याचं मूळ फारपूर्वी व्यापारानिमित्त आलेल्या इंडियन इमिग्रंटसच्या डॉमिनेटिंग वृत्तीमधे होतं.

मराठी_माणूस's picture

22 Aug 2017 - 12:16 pm | मराठी_माणूस

आपण मात्र व्यापारी म्हणून आलेल्या आणि नंतर आपल्यावर राज्य केलेल्या ब्रीटीश माणसाला "साहेब" म्हणतो .

भारतीय संस्कृतीचा प्रभाव आणि आदर थाई जनतेला खूप मनापासून आहे... पण भारतीयांबद्दल नाही हे विचार करण्यासारखे आहे.
यावर एक लेख लिहायचा विचार आहे माझा...

अवश्य लिहा ह्याबद्दल. आपल्याला आपण बाहेरच्या लोकांना कसे दिसतो ते माहित नसते :-)

गामा पैलवान's picture

20 Aug 2017 - 9:26 pm | गामा पैलवान

बाजीप्रभू,

एकदम नेमकं आणि खुसखुशीत वर्णन केलंय तुम्ही. तुमची संजयगिरी जाम आवडली आम्हांस. सयामी साळकाया माळकाया छान आहेत दिसायला. पाश्चात्य लोकं उगीच नाही प्रेमात पडंत त्यांच्या! ;-)

जाताजाता : शंखातनं पवित्र पाणी ओतण्याच्या कार्यक्रमाचं रोद नाम सांग हे नाव रुद्रनाम शंख असं वाटलं.

आ.न.,
-गा.पै.

बाजीप्रभू's picture

21 Aug 2017 - 8:15 pm | बाजीप्रभू

तुमचा अंदाज एकदम बरोबर आहे गा.पै. सर. "रोद नाम सांग" हे आपल्या "रुद्रनाम शंख" चाच थाई अपभ्रंश आहे. आपण गमतीने म्हणतो कि तांब्यात नाणी टाकून वाजवली तर जो आवाज येईल तो साऊथ इंडियन भाषेसारखा असेल. तसंच एखाद्या बोबड्या माणसाला जर संस्कृत शब्द बोलावयास दिले तर तो जो उच्चार करेल ती थाई भाषा असेल.

थाई भाषेचं एक वैशिष्ट्य सांगतो,
या भाषेतील ४४ व्यंजनापैकी ११ (२५%) व्यंजनाची अक्षरचिन्हे संस्कृत-पाली भाषेतील आहे. या ११ मधील कोणतंही एक अक्षर चिन्ह जर एखाद्या थाई शब्दात दिसल्यास तो शब्द १००% संस्कृत असतो... फक्त उच्चार बोबडा असतो.

उदा.
स-त-री =स्त्री
स-थान = स्थान
बॉरिबून = परिपूर्ण
वित्थ-था-या-लय = विद्यालय
वत-स-तु = वस्तु
इथल्या पाट्या, पेपरच्या हेड लाईन्स वाचतांना हे लॉजिक खूप कामास येते.

पिशी अबोली's picture

31 Aug 2017 - 12:03 pm | पिशी अबोली

रोचक.

मला एक कुतूहल आहे. थाई लिपी तयार झाली, तेव्हा नक्कीच आतापेक्षा टोन्स काहीसे वेगळे असतील (लिपीमध्ये टोन्स हे थाई लिपीमध्येच पहिल्यांदा आले असं विकी सांगतो). त्यांच्यामुळे ती इतर लिप्यांप्रमाणेच गोठलेली लिखित थाई वाचताना(हे दुकानांचे बोर्ड इत्यादी ठिकाणी) नवीन थाई बोलणार्‍यांना काही अडचणी येतात का?

बाजीप्रभू's picture

31 Aug 2017 - 1:54 pm | बाजीप्रभू

बरोबर आहे तुमचं!!
थाई टोन्स किंवा ज्याला आपण 'हेल' म्हणतो त्याबद्दल थोडं सांगतो.
थाई भाषा हि बोलतांना थोडी हेल काढून बोलली जाते... आपली मालवणी किंवा कोंकणी भाषा कशी अगदी तशीच. या विशिष्ट हेल मुळेच या भाषा ऐकतांना गोड वाटतात. मालवणी किंवा कोकणी भाषेला स्वतःची अशी स्क्रिप्ट नाहीये त्यामुळे त्या लिहितांना देवनागरी भाषेत लिहिल्या जातात... पण कुठे "हेल" काढायचा, कोणत्या शब्दांवर जोर द्यायचा याचं ज्ञान फक्त पिढी दर पिढी पास ऑन होताना दिसते. या भाषा एकदिवस लुप्त होतील असे जाणकार म्हणतात ते यासाठीच.

थाई भाषाकारांनी टोन किंवा हेल लुप्त होण्याचा धोका लक्षात घेऊन "आघात चिन्हे" बनविली आहेत. आपल्या देवनागरीत जसे अक्षर चिन्हे आणि स्वरचिन्हे आहेत... तसेच थाई भाषेत या चिन्हांच्या जोडीला "आघात चिन्हे" निर्माण केली गेली आहेत. जो शब्द हेल काढून बोलायचा आहे तेथे आघात चिन्हे हि स्वर आणि व्यंजना सोबत दर्शवली जातात. भाषेचा लहेजा हा चिन्हात डॉक्युमेंटेड झाल्याने पूर्ण थायलंड मधे उच्चारांमधे एक समानता आढळते. (सीमेवरील भागांत काही अपवाद आहेत)

"आघात चिन्हे" हा प्रकार फक्त थाई भाषेत पाहायला मिळतो. "विकी बाबा" तेच दाखवतोय तुम्हाला... (दुसऱ्या कोणत्या भाषेत असल्यास मला माहित नाही. चू. भू. द्या. घ्या).

आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर.
आपल्या कडे जसं "ष" आणि "श" चा उच्चार सेम होतो तसंच थाई भाषेत बऱ्याच व्यंजनांचा उच्चार सेम टू सेम होतो. आपल्याला "ष" आणि "श" कुठे वापरायचा याची कल्पना असते तसं थाई लोकांना त्यांच्या समान उच्चारांचे प्रयोजन ठाऊक असते. थाई नवशिक्या (माझ्या सारख्या) विद्यार्थ्याचा खूप गोंधळ उडतो.
दुसरा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे अर्थाचा... उदा. "लिंग" हे थाई भाषेत वाचता येतो पण त्याचा अर्थ "माकड" होतो... हे माझ्यासारख्या माकडाला कसे कळावे?
असं एकुण त्रांगडं आहे.

पिशी अबोली's picture

31 Aug 2017 - 7:58 pm | पिशी अबोली

रोचक.

मात्र हेल आणि टोन एक नाहीत. कोंकणी आणि मालवणीचे हेल भाषाशास्त्रीय परिभाषेत distinctive नसतात. म्हणजे, मी एकच गोष्ट वेगवेगळ्या हेलात बोलले, तरी मूळ शब्दार्थामध्ये फरक पडत नाही.

मात्र, थाई (आणि इतर अनेक भाषा, ज्यात आपल्या पूर्वांचलातील बऱ्याच भाषा आहेत, पंजाबीसुद्धा आहे) यांच्यात 'टोन' distinctive असतात, म्हणजेच टोन(falling tone, rising tone, mid, low इत्यादी) मधील फरकाने शब्दार्थ वेगळा होतो. थाईमध्ये असे 5 किंवा 6 टोन आहेत असं मानलं जातं. माझ्या वर्गातील थाई मुलींनी ma या शब्दाचं प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं.. (खरं तर मला कळले नाहीत ते तेवढे. जपानी माणसाला र/ल कळण्यात किती कष्ट पडत असतील त्याची थोडी झलक मिळाली होती).

पण कोणत्याही भाषेतील ध्वनी झपाट्याने बदलत असतात, आणि लिपी मात्र अतिशय हळू बदलते. त्यामुळे मुळात हे टोन्स समजून घ्यायला धडपडणाऱ्या नवीन थाई भाषकाला हे गोठलेल्या लिपीमधले बोर्ड वगैरे वाचणं, आणि मग त्याची नवीन नवीन शिकलेल्या टोनल भाषेच्या उच्चारांशी सांगड घालणं किती कठीण जात असेल, असं वाटून गेलं.

बाजीप्रभू's picture

1 Sep 2017 - 8:32 am | बाजीप्रभू

ओके मान्य... मी बरेचदा टोन आणि हेल यांच्यात गोंधळतो म्हणून माझा पास.
तुम्ही जे ५-६ टोन म्हणत अहात ते खरं तर थाई भाषेतील आघात आहेत असं मला वाटतं आणि त्यांची संख्या ५ आहे. यातल्या चारांसाठी थाई भाषेत चिन्हे देखील आहेत. आणि या टोनमुळे अर्थहि बदलतो. (जो आपल्या मालवणी किंवा कोकणी मधे बदलत नाही)
उदा.
थाई "खाव" या शब्दाचे तीन अर्थ आहेत "पांढरा(रंग)", "भात" आणि "बातमी". याची स्पेलिंग एकच आहे... मात्र कोणतं आघात चिन्ह वापरलंय यावरून बदललेल्या टोन नुसार अर्थ बदलतो.
मला स्वतःला हा टोन अजूनही पकडता आलेला नाही किंवा सरमिसळ होते. थाई लोकांचं एक त्रांगडं (खरंतर ते आपलं) आहे कि आपला परफेक्ट टोन असल्याशिवाय त्यांना आपण काय म्हणतोय ते कळतंच नाही. उदा. एखाद्या ब्रिटिशाने जर "डुगना लगान देना परेगा" असं मोडतोड करून वेगळ्या टोनमधे बोलला तरी आपल्याला समजतं... तस थाई लोकांचं नसतं.
त्यामुळे मी बरेचदा टोन/हेल च्या वेगवेगळ्या चाव्या लावून बघण्यापेक्षा कागदावर लिहून त्याला वाचायला देतो. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बोर्डवर लिहिलेले वाचुन त्याची उच्चारांशी सांगड घालणं कठीण पडत.

जाता जाता,
थाई भाषेत "र" उच्चार "र" होतो जर तो शब्दाच्या सुरवातीला असल्यास.. तो जर अधेमधे असल्यास उच्चार "न" होतो.
उदा.
थाई भाषेत शिक्षकाला "आचान" म्हणतात त्याची स्पेलिंग डिट्टो "आचार्य" अशीच आहे आपण "र" मागे गेल्याने उच्चार "आचान" करतात.
आणि "ळ" चा उच्चार इथे "ल" होतो.
उदा.
वेळ => थाई भाषेत "वेला" म्हणतात.

पिशी अबोली's picture

1 Sep 2017 - 11:27 pm | पिशी अबोली

खूपच मस्त माहिती दिलीत. धन्यवाद!

मस्त लेख.. आवडला.. तुमचे लेख नेहमीच आवडतात..

बाजीप्रभू's picture

21 Aug 2017 - 8:29 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!! शलभ जी

गम्मत-जम्मत's picture

20 Aug 2017 - 10:07 pm | गम्मत-जम्मत

मी एक वर्ष मिसळपाव वाचत आहे. पण आज च सदस्य झाले. हा पहिलाच प्रतिसाद..
थाई लग्नाच्या प्राथमिक पद्धती आपल्यासारख्याच आहेत ना!! .. छायाचित्रे मस्त.

मिपावर तुमचं स्वागत... या लेखापासून बोनी केलीत यासाठीही धन्यवाद.

पैसा's picture

20 Aug 2017 - 10:24 pm | पैसा

बरेच विधी या ना त्या स्वरूपात आपल्याकडच्या विधीसारखे आहेत. आणि मुख्य म्हणजे वधू वराचे आणि करवल्यांचे कपडे! धोतर्/साडीसारखे वाटले. अर्थात शिवलेले आहेत, पण पटकन वाटले खरे!

बबन ताम्बे's picture

20 Aug 2017 - 10:26 pm | बबन ताम्बे

तुमची लेखनशैली खासच. पु. लं. च्या पूर्वरंगची आठवण झाली.
फोटोही मस्तच !!

वरुण मोहिते's picture

20 Aug 2017 - 11:21 pm | वरुण मोहिते

ओळख आणि वर्णन पण सुरेख. लिहीत राहा आपण .शैली आवडली .

वरुण मोहिते's picture

20 Aug 2017 - 11:21 pm | वरुण मोहिते

ओळख आणि वर्णन पण सुरेख. लिहीत राहा आपण .शैली आवडली .

बाजीप्रभू's picture

24 Aug 2017 - 12:58 pm | बाजीप्रभू

धन्यवाद मोहिते सर...

अरे, नवदांपत्याला वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा देणं राहिलंच! आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा.

पिलीयन रायडर's picture

21 Aug 2017 - 12:32 am | पिलीयन रायडर

तुमच्यामुळे थाई संस्कृतीची मस्त ओळख होत आहे. "गोष्ट तशी.." च्या वेळेलाही "लीके" मध्ये गणपतीचे फोटो पाहुन गम्मत वाटली होती. आताही अगदी आपल्याच लग्नाप्रमाणे दिसणारे हे लग्न पाहुन तेवढीच मजा आली. विधी, कपडे आणि एकंदरीत अ‍ॅप्रोच सारखाच आहे! पण तरीही नवर्‍या मुलाला फिटनेसची परीक्षा भर मांडवाच्या दारात द्यायला लावणं सगळ्यात जास्त आवडलेलं आहे. हे आपणही केलं पाहिजे! =))

बादवे, आपल्याकडच्या मुली जशा आजकाल काही विधींना नकार देत आहेत (कन्यादान वगैरे) तसं काही बंडखोरीचं वातावरण तिकडेही आहे का?

लेख आवडलाच! नवदांपत्याला आमच्या तर्फे शुभेच्छा सांगा!

"लग्न विधींना नकार देण्याचा बंडखोरपणा" याबद्दल विचारून सांगतो. चांगला प्रश्न आहे.
शुभेच्छा कळवल्यात "खून यवालाकला". (माहिती:- थाई भाषेत स्त्री-पुरुष या दोन्हींसाठी "खून" हे एकच शीर्षक वापरतात)

आज ती आणि फोटुतल्या इतर भगिनी मिसळपाव उघडून बसल्या होत्या. थाई भाषेत ट्रान्स्लेट करून बघत होत्या... त्यांना काय कळलं देव जाणे पण व्हेरी नाईस, व्हेरी नाईस... करत खिदळत होत्या.
भारतातल्या एका नावाजलेल्या संकेतस्थाळावर आमच्यावर लेख लिहिला गेलाय आणि हजारावर लोकांनी तो वाचलाय याचं खूप कौतुक वाटत होतं त्यांना.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2017 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

थाई भाषेत ट्रान्स्लेट करून बघत होत्या... त्यांना काय कळलं देव जाणे पण व्हेरी नाईस, व्हेरी नाईस... करत खिदळत होत्या

वाह !

मात्र, गुगल ट्रान्सलेटर वापरला असेल तर त्यांना काय वाचायला मिळाले असेल याबाबत संशय घ्यायला जागा आहे ! ;) त्यापेक्षा तुम्हीच भाषांतर करून सांगा :)

वरच्या वाक्याचे भाषांतर गुगल ट्रान्सलेटरने असे केले आहे : "Translating into Thai language ... What do they know God going but Veerie Nice, Vary Nice ..." =)) =)) =))

बाजीप्रभू's picture

1 Sep 2017 - 9:22 am | बाजीप्रभू

याबद्दल यवालाक आणी अजून एक इंग्रजीच्या जाणकारणीला विचारलं तेव्हा एकतर त्यांना लग्नविधी बाबतचा "बंडखोरपणा", "प्रोटेस्ट" वैगेरेंचा आपल्याला हवा असलेला अर्थ समजावण्यात नाकी नऊ आले.
एनीवे,
पण तिने एक सांगितले कि बरेचदा इकॉनॉमी लग्नांत, किंवा वेळ वाचवण्यासाठी काही विधी "वर-वधू" मिळून स्किप करतात. उदा. पाण्याचं अर्ध्य देण्याचा विधी काहीजण स्किप करतात.
पण या स्किप करण्यामागे कुठेही "पटत नाहीये, हि अंधश्रध्दा आहे" वैगरे असा पॉईंट ऑफ व्ह्यु नसतो. थाई लोकांत धार्मिक श्रद्धेला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच जगातील सर्वात धार्मिक देशांच्या क्रमवारीत मुस्लिम देशांच्या रांगेत "थायलंड" देशाचा नंबर खूप वरचा लागतो.

लेखनशैली आवडली. फोटू छान आहेत.
कितीतरी ठिकाणी "अय्या! आपल्याकडे असच असतं" टैप वाटलं.

पलाश's picture

21 Aug 2017 - 4:24 am | पलाश

अगदी झकास लिहिलंय हो!! माहितीपूर्ण आणि खुसखुशीत लेख फारफार आवडला. असेच लिहित रहा.
(चुकले नाही माकले नाही.
काॅमेंट टाकायला विसरले नाही.)

अनिंद्य's picture

21 Aug 2017 - 10:19 am | अनिंद्य

@ बाजीप्रभू

बहोत खूब !

वर्णन आणि तुमची प्रकाशचित्रे मस्त.
थाई लोकांचा मला फार आवडणारा गुण म्हणजे त्यांची सौंदर्यदृष्टी. साधा असला तरी सगळा लग्नसोहळा डोळ्यांना सुखावणारा आहे. फुले, पुष्पमाला, पूर्वजांना अर्पित केलेला नैवेद्य, सजवलेल्या भेटवस्तू, कुठेही पॉलिश न उडालेले फर्निचर, मुलींचे कपडे-वेशभूषा-केशभूषा.... सगळे नीटनेटके.

बाजीप्रभू's picture

2 Sep 2017 - 9:33 pm | बाजीप्रभू

अनिंद्य सर.. तुमचं निरीक्षण अचूक आहे... थाई लोकांची सौंदर्य दृष्टी थक्क करणारी असते. वानगी दाखल हा फोटो पहा..हा रिसेप्शन एरिया खरंतर तिच्या घराच्या गॅरेजचा भाग आहे.. मात्र अतिशय कल्पतेने त्यांनी ती जागा छोटेखानी रिसेप्शन स्टेज सारखी सजवली आहे... काटकसर+सौंदर्यदुष्टी याचा उत्तम मेळ घातलेला दिसतो.

-

अनिंद्य's picture

16 Sep 2017 - 8:19 pm | अनिंद्य

सुंदर ! कल्पकता वाखाणण्यासारखी आहे.

नि३सोलपुरकर's picture

21 Aug 2017 - 12:06 pm | नि३सोलपुरकर

सुरेख ओळख आणि वर्णन .
आवडले.

सिरुसेरि's picture

21 Aug 2017 - 5:48 pm | सिरुसेरि

छान फोटो आणी माहिती .

संग्राम's picture

21 Aug 2017 - 7:15 pm | संग्राम

तुमच्यासारखे रिपोर्टर असतील तर क्या कहने ...खूप छान !

"आणि एक थाई 'अंतू बरवा' कोणाला हवं नको ते पहात होता" .... इथे नारायण लिहायचं आहे ?

बाजीप्रभू's picture

21 Aug 2017 - 8:44 pm | बाजीप्रभू

मुद्राराक्षसाची चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!!
"नारायण" असायला हवं होत. कुणी करेक्ट करून देईल का?
अजून एक-दोन टंकलेखनाच्या चुका दिसताहेत पण हा "नारायणाचा" बदल करून मिळाल्यास बरं होईल.

पगला गजोधर's picture

21 Aug 2017 - 7:44 pm | पगला गजोधर

छान लेखं !

लग्नात/ मांडवात," पृथ्वीवरील विष्णूचा अवतार", अश्या रूपातील राजाचा फोटो असतो का ?

बाजीप्रभू's picture

21 Aug 2017 - 10:05 pm | बाजीप्रभू

असा फोटो तर मी कधी पाहिला नाही. इथल्या राजांची वैयक्तिक नावे जरी भिन्न असली तरी नावात एक समानता होती ती म्हणजे नावापुढे "रामा" लिहिण्याची. वजिराक्रोन रामा-दहावे यांचा हल्लीच राजाभिषेक झालाय.

विष्णूचा सातवा अवतार राम असा लार्जन द्यान लाईफ उल्लेख काही गाण्यांत इथल्या राजाचा केला जातो.

पगला गजोधर's picture

22 Aug 2017 - 12:11 pm | पगला गजोधर

हो तेच तेच राजे

त्यांचा फोटो किंवा त्यांचा पत्नीसमवेत जोडीनं फोटो असतो का ? जेनेरली ?

बाजीप्रभू's picture

26 Aug 2017 - 9:10 pm | बाजीप्रभू

हे थायलंड चे स्वर्गवासी राजे "भूमिबोल अदुलयदेज" (खरं= अतुल्यतेज) आणि राणी "सिरिकीत"
राणी "सिरिकीत" आहे अजून.
-

-

आणि हे हल्लीच राज्याभिषेक झालेले थायलंडचे राजे "महा वजिरालोंगक्रोन"
(हे घटस्फोटित आहेत)
-

आणि हे सध्याचे राजपुत्र "दिपांगक्रोन रस्मिज्योती"
-

च्यामारी हे रस्मिज्योति "इलिझाबेथ एकादशी" मध्ये मस्त शिव्या देत होतं रं. ;)

बाजीप्रभू's picture

31 Aug 2017 - 6:17 am | बाजीप्रभू

+११११

वा वा ! मजा आ गया. असेच लिहीत रहा बाजीप्रभू!

पद्मावति's picture

21 Aug 2017 - 9:09 pm | पद्मावति

तुमचे लेख नेहमी मस्तं हटके असतात. हाही अपवाद नाहीच. खुप आवडला लेख. सुरेख फोटो आणि वर्णन.

बाजीप्रभू's picture

21 Aug 2017 - 9:45 pm | बाजीप्रभू

धन्यवाद पद्मा ताई... तुमची प्रवास वर्णनेही हटके असतात.

लेख आवडला. खुसखुशीत वर्णन.. :)

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2017 - 11:07 pm | श्रीगुरुजी

मस्त! फोटो बघून आणि वर्णन वाचून मजा आली. वधूने लुगड्यासारखे काहीतरी व वराने रेशमी सोवळ्यासारखे काहीतरी परिधान केले होते का? पूर्ण सोहळाभर वधूवरांचा एकच पोषाख दिसतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Aug 2017 - 11:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेख खूsप आवडला ! खुसखुशीत वर्णन आणि सुंदर फोटो यांच्यांत वरखाली करणे कठीण आहे.

थाई लोकजीवनाचा हा महत्वाचा पैलू प्रथमहस्ते अनुभवून तो मिपावर आणल्याबद्दल अनेक धन्यवाद !

***************

थाई राजघराण्यांचे व बर्‍याच सरदारघराण्यांचे मूळ आसाममधून स्थलांतरीत होत ब्रम्हदेश (आजचा म्यानमार) ओलांडून थायलंडमध्ये येऊन स्थाईक झालेल्या जमातीत (ट्राईब) आहे असे थायलंड सफरीत आमच्या गाईडने सांगितले होते. त्यामुळेच तिथला राजा राम हे नामाभिदान धारण करतो (सद्याचे राजे "दहावे राम ( Rama X)" आहेत). सन १३५० मध्ये स्थापन झालेल्या दुसर्‍या प्राचीन थाई राजधानीचे नाव आयुथ्थया (ayutthaya, अयोध्या) असे आहे.

एकंदरीत सुमारे २००० वर्षांपूर्वीपासून व्यापारी मार्ग वापरून हिंदू धर्म दक्षिणपूर्व आशियात व्हिएतनापर्यंत पोचला. प्राचीन अवशेष, ग्रंथ, लोककथा, धर्म आणि संस्कृतीच्या स्वरूपात त्याच्या खाणाखूणा अजूनही तेथे आस्तित्वात आहेत. बौद्ध धर्म त्याही पुढे जाऊन चीन व जपानमध्ये पोहोचला. तेथिल अनेक प्राचीन राजांची नावे, राजधानीसकट मोठ्या शहरांची नावे आणि प्राचीन ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. आजच्या भाषांतील अनेक शब्द आणि विशेषतः नावे व नामाभिदाने स्पष्ट संस्कृतमध्ये किंवा कालौघामध्ये काहीशी अप्रभंशीत झालेली आहेत. उदा. नववा राम असलेले सद्याच्या राजांच्या पित्यांचे नामाभिदाने भूमिबोल अदुल्यदेज (भूमीपाल अतुल्यतेज) असे होते. इतकेच काय तर मुस्लीमबहुल राष्ट्र असलेल्या मलेशियाच्या, धर्माने मुस्लीम असलेल्या, प्रसिद्ध भूतपूर्व पंतप्रधानाचे (१९८१ ते २००३) नाव, महाथिर (?महातीर्थ, ?महारथी) महंमद असे आहे. मुस्लीमबहुल इंडिनेशियातील एक प्रांत असलेल्या बाली बेटावरची आजची ८०% पेक्षा जास्त लोकसंख्या हिंदू आहे.

दक्षिणपूर्व आशियात राजांनी अनेकदा शैव, वैष्णव आणि बौद्ध धर्म आलटून पालटून स्वीकारले होते. आजोबा शैव, वडिल वैष्णव आणि मुलगा बौद्ध असेही तेथिल राजघराण्यांत झालेले आहे. त्यानंतर अरबांनी व्यापारी मार्गांवर कब्जा केल्यानंतर १६व्या शतकात आताच्या मलेशिया, इंडोनेशिया, दक्षिण थायलंड व दक्षिण फिलिपिन्समध्ये इस्लामचा प्रसार झाला.

जगातले सर्वात मोठे हिंदू मंदीर (मंदीरच नव्हे तर जगातले सर्वात मोठे धार्मीक संकुल) भारतात नाही तर आताच्या "कंबोडिया"तील अंगकोर या ख्मेर साम्राज्याच्या राजधानीतील "अंगकोर वट" हे आहे आणि जगातला सर्वात मोठा स्तूप भारतात नाही तर आताच्या इंडोनेशियातील जावा बेटावरील बोरोबुदूर येथे आहे.

लिहायला गेलो तर त्यावर लेखमाला होईल. पण, स्वानुभवाचे इतकेच सार लिहून थांबतो...

दक्षिणपूर्व आशियात पूर्वी वर्षांपूर्वी हिंदू संस्कृती होती हे स्थानिक जाणतात, ते ती वस्तूस्थिती लपवून ठेवत तर नाहीतच, उलट तो इतिहास स्थानिक मोकळेपणे सांगतात. त्या काळचे अवशेष, आपला प्राचीन ठेवा म्हणून जतन करण्यात व त्यांची माहिती पर्यटकांना देण्यात त्यांना गैरसोईचे वाटत नाही. त्याउलट, भारतीय संस्कृतीचे गोडवे गाताना अतिशयोक्त विधाने करणार्‍यांना हिंदू धर्माच्या बहुसंख्य लोकांना या अभिमानस्पद इतिहासाची कल्पनाच नसते असेच दिसते.

नंदन's picture

25 Aug 2017 - 1:14 am | नंदन

>>> लिहायला गेलो तर त्यावर लेखमाला होईल. पण, स्वानुभवाचे इतकेच सार लिहून थांबतो...
--- लेखमालेच्या प्रतीक्षेत आहे :)

इशा१२३'s picture

22 Aug 2017 - 8:20 am | इशा१२३

मस्त वर्णन! लेख आवडलाच. नेमक्या फोटोंमुळे मजा आली वाचायला.

अभिजीत अवलिया's picture

22 Aug 2017 - 9:12 am | अभिजीत अवलिया

मजा आली वाचताना.

पाटीलभाऊ's picture

22 Aug 2017 - 11:37 am | पाटीलभाऊ

मस्त वर्णन आणि फोटो.

भारीच लग्न की, कलवर्‍यांनी ड्रेस कोड छान निवडलाय.
व्हिडिओ, करिझ्मा अल्बमग्राफर, बॅक्ड्रॉप, राजाराणी खुर्च्या वगैरे मिशिंग वाटले.

मालोजीराव's picture

22 Aug 2017 - 2:28 pm | मालोजीराव

सयामी कल्चर एकदम रिच आहे , त्याचे रिलेशनशिप बद्दलचे आचार विचार पाश्चात्य असले तरी एकूण सण समारंभ जीवनशैली वगैरे भारतीय परंपरेशी मेळ खाणारी आहे .

तिथे चौकाचौकात लहानशी मंदिरे असतात,छोटासा लाकडी देव्हारा आणि त्यात प्रतिमा मूर्ती आणि भरपूर अगरबत्त्या . काही बुद्धाशी संबंधित वाटतात तर काही मंदिरात बुद्ध आणि गणपती दोन्ही विराजमान असतात, समोर ठेवलेले नैवैद्य सुद्धा चित्रविचित्र असतात. इथे भारतात पोर्क, बीफ बद्दल गदारोळ उठलेला असताना मात्र तिथे एका अश्याच चौकातल्या गणपती बाप्पा समोर बियर, फिशकेक, पोर्क वगैरे नैवेद्य म्हणून ठेवलेले बघितली . बाप्पाला काय त्याचं सोयरसुतक नव्हतं , त्याने भक्ताने निर्मळ मनाने दिला म्हणून नैवेद्य स्वीकारला असेल ...पण आमच्या भावना मात्र जाम दुखावल्या गेल्या

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2017 - 1:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुस्लिमबहुल इंडोनेशियातील बाली प्रांताची जवळ जवळ ९०% लोकसंख्या हिंदू आहे. तेथे मंदिरातील पुजारी सोडून इतर सर्व गोमांस खातात. भारतीय प्राचीन ग्रंथांतही गोमांस खाण्याचे उल्लेख आहेत. भारतातिल गोमांस निषिद्ध असण्याची कल्पना मध्यकालात कधीतरी आस्तित्वात आली आहे.

माहितीबद्दल धन्यवाद एक्काकाका , थायलंड मध्येही काहीसं असंच आहे

मुस्लिमबहुल इंडोनेशियातील बाली प्रांताची जवळ जवळ ९०% लोकसंख्या हिंदू आहे.

ओह!! हे ,माहित नव्हतं.. धन्यवाद..

गामा पैलवान's picture

22 Aug 2017 - 5:50 pm | गामा पैलवान

बाजीप्रभू,

माहितीबद्दल धन्यवाद! :-)

खरंतर भारतीयांनी आपल्या आग्नेय आशियाई व पौर्वात्य सांस्कृतिक भावंडांकडे गांभीर्याने बघायची गरज आहे. पण (माझ्यासकट) बहुसंख्य लोकांचं लक्ष युरोप आणि अमेरिकेकडे असतं. तुम्ही दिलेल्या माहितीमुळे जुने बंध घट्ट झाल्यासारखं वाटतं. म्हणून परत एकदा धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

गारबिट's picture

24 Aug 2017 - 7:39 pm | गारबिट

अतिशय सुंदर लेख आपण लिहिला परंतु थाई लोक लग्ना नंतर मंदिरात किव्वा त्यानंतर
पाच परतवाने वैगरे
असते का?

बाजीप्रभू's picture

1 Sep 2017 - 3:02 pm | बाजीप्रभू

थाई लोकांत लग्नाच्या तीन दिवसानंतर मुलीच्या घरी वरमुलगा वधूबसोबत १-२ दिवसांसाठी रहावयास येतो. भेटीमागे एक उद्देश असतो कि आई-वडिलांना आपल्या मुलीचं मुख-दर्शन आणि तुमची मुलगी आम्ही हिरावून घेतलेली नाही हे सांगायचा प्रयत्न असतो. यादम्यान "पाच पाचपरतावणं" नाही पण "चहा परतावणं" नावाचा कार्यक्रम होतो.
वर-वधू घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना चहा देतात त्याबदल्यात ते त्यांना भेटवस्तू देतात.
पण हा चहा देण्याचा कार्यक्रम थायलंडच्या दक्षिण भागांत आढळतो. (जिथे चायनीज डॉमिनन्स जास्त आहे). हि मूळ चिनीपद्धत आहे.

 -

-

सुबोध खरे's picture

24 Aug 2017 - 7:45 pm | सुबोध खरे

उत्तम लेख आणि फोटो
आपली लेखन शैली वाखाणण्यासारखी आहे.

बाजीप्रभू's picture

26 Aug 2017 - 9:56 pm | बाजीप्रभू

अभिप्रायाबद्दल धन्यवाद डॉक्टर!!

टिवटिव's picture

25 Aug 2017 - 12:42 am | टिवटिव

मजा आली वाचताना.

नंदन's picture

25 Aug 2017 - 1:15 am | नंदन

वेगळ्या विषयावरचा सुरेख लेख. अतिशय आवडला.

रुपी's picture

29 Aug 2017 - 2:25 am | रुपी

खूप छान आणि वेगळ्याच विषयावरचा लेख!

लेख खूप आवडला. वर्णन आणि फोटो मस्तच!

तुमच्यामुळे थाई लोकजीवनाबद्दल नेहमीच काहीतरी वेगळं वाचायला मिळतं.

बोका-ए-आझम's picture

29 Aug 2017 - 4:45 pm | बोका-ए-आझम

पण लग्नातलं जेवण काय असतं? काही लग्नाचे असे विशेष पदार्थ असतात का? आपल्याकडे जसं (आता नाही म्हणा) जिलबीचं जेवण वगैरे प्रकार आहेत तसेच तिथेही असतात का?

बाजीप्रभू's picture

30 Aug 2017 - 2:23 pm | बाजीप्रभू

खरंतर जेवणाच्या पदार्थांचे फोटो मुख्य पोस्टमधे टाकणार होतो पण अगोदरच्याच फोटोंच्या लिंका लावता-लावता हाताला लकवा मारायची पाळी आली होती म्हणून पोस्ट आवरती घेतली होती.
एनीवे,
त्यातल्यात्यात मेनू काय आहे म्हणून थोडंफार विंग्रजी बोलण्याऱ्या एकाला विचारलं तेव्हा त्याने घेतलेले मेनूचं पाहिलं नाव "हॉर्स डी Oeuvre" ऐकून कान टवकारले. च्यायला घोडा!!....
आईशप्पथ सांगतो मेनकोर्स पूर्वीच्या स्टार्टरला "Hors-D'oeuvre" म्हणतात माहीत नव्हतं म्हणून घोड्याच्या शोधात भटार खान्यात जाऊन आलो. तिकडे घोडा नाही पण डुक्कर सापडला हा असा,

-

-

भटार खान्याचा एकूण नजारा.

-

-

-

"हॉर्स डी Oeuvre" ची तयारी

-

-

हाच तो "हॉर्स डी Oeuvre"
-

-

थाई स्पायसी सी फूड सलाड, चायनीज रोस्टेड डक, डीप फ्राईड रबी फिश विथ थाई हॉट सॉस.

-

-

-

या सगळ्यांच्या जोडीला व्हिसक्या, सोडे, इतर थंड पेये बाय डिफॉल्ट होते..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2017 - 4:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला. फोटो, वर्णन, एकदम झकास. धन्स.

-दिलीप बिरुटे

शर्मिला किशोर वाघ's picture

31 Aug 2017 - 9:12 am | शर्मिला किशोर वाघ

छान लेख !!!!!!!

झकास लेख.. अगदी खुसखूशीतपणे वर्णन केलंत तुम्ही.. अगदी प्रत्यक्ष हजर असल्याचा फील आला..
नवरा- नवरी थोडे वयाने जास्त वाटताहेत का?

फोटो तर सुरेख आहेतच. पण वर्णन ही खुप छान केलं आहे.
आवडला लेख. इतर प्रथा जाणुन घ्यायला आवडेल.

टर्मीनेटर's picture

31 Aug 2017 - 10:13 am | टर्मीनेटर

लेख, फोटो आणि वर्णन, एकदम झकास...
एकंदरीत बाजीप्रभूंनी लग्न खिंड छान लढवली आहे....
पुढील लेखनास शुभेच्छा...

पिशी अबोली's picture

31 Aug 2017 - 12:10 pm | पिशी अबोली

लेख झकास (तुमचे असतातच म्हणा).

थाई लोकांचा एस्थेटिक सेन्स फार सुरेख असतो असं नेहमीच वाटतं. म्हणजे सोनेरी वगैरे रंगपण किती सुरेख, नाजुक वाटतायत या फोटोंमध्ये

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Aug 2017 - 2:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेख आणि फोटो प्रचंड आवडल्या गेले आहेत
पैजारबुवा,

रायनची आई's picture

31 Aug 2017 - 5:44 pm | रायनची आई

मस्त लिहिलय बाजीप्रभू, मला करवल्यांचा ग्रीन कलरचा sarong खूप आवडला थाई सिल्कचा..

बाजीप्रभू's picture

31 Aug 2017 - 6:59 pm | बाजीप्रभू

धर्मराजमुटके,अत्रुप्त आत्मा,मराठी_माणूस,गामा पैलवान, पिशी अबोली, शलभ, गम्मत-जम्मत, पैसा, बबन ताम्बे,वरुण मोहिते, एस, पिलीयन रायडर, डॉ सुहास म्हात्रे, रेवती, पलाश, अनिंद्य, नि३सोलपुरकर, सिरुसेरि, संग्राम, पगला गजोधर, अभ्या.., आदूबाळ, पद्मावति, मोदक, श्रीगुरुजी, नंदन, इशा१२३, अभिजीत अवलिया, पाटीलभाऊ, मालोजीराव, सौरा, गारबिट, सुबोध खरे, टिवटिव, नंदन, रुपी, निशाचर, बोका-ए-आझम, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, शर्मिला किशोर वाघ, सौरा, उत्तरा, टर्मीनेटर, ज्ञानोबाचे पैजार,रायनची आई.

वेळ काढून प्रतिसाद दिल्या बद्दल विशेष आभार..

गामा पैलवान's picture

1 Sep 2017 - 1:16 pm | गामा पैलवान

पिशी अबोली,

लिपीमध्ये टोन्स हे थाई लिपीमध्येच पहिल्यांदा आले असं विकी सांगतो

याचा मूळ स्रोत वाचायची इच्छा आहे (कळेल की नाही तो भाग वेगळा!). विकिवर इथे बरीच माहिती आहे, पण उपरोक्त विधान सापडलं नाही.

टोन्स म्हणजे लिपीस्वर म्हणता येतील काय? संस्कृतमध्ये उदात्त, अनुदात्त वगैरे स्वर असतात. मग सयामी भाषेच्या अगोदरपासून संस्कृतात स्वर आहेत असं म्हणता येईल काय? वेदपठणाची संस्कृत आजच्या सामान्य संभाषणीय संस्कृतपेक्षा बरीच वेगळी असते (असं ऐकून आहे).

आ.न.,
-गा.पै.

जुइ's picture

1 Sep 2017 - 7:30 pm | जुइ

थाई लग्नाचे खुसखुशीत शैलितील वर्णन आवडले!!

बाजीप्रभू ने खिण्ड छान लढवली आहे , तुमची शैली आवडली

सप्तरंगी's picture

1 Sep 2017 - 7:36 pm | सप्तरंगी

बाजीप्रभूने खिण्ड छान लढवली आहे , तुमची शैली आवडली

मज्जेदार लेखन करता. फोटो नसते तर लेखाची मजा गेली नसती॥ बाकी हॅार्सडीओ आणि इतर मेन्यु इकडच्या माडिकेरीचा प्रकार असावा.

कंजूस's picture

1 Sep 2017 - 9:34 pm | कंजूस

*मजा गेली असती*

क्या बात है ! .......काय ती लेखनशैली आणि काय ते फोटो. मज्जा आली. वाटलं आम्हीसुद्धा लग्नाला आलोय. नवदाम्पत्याला शुभेच्छा ! आणि तुम्हाला मानाचा मुजरा... अशीच नवीन जीवनशैली दाखवत रहा.

संत घोडेकर's picture

2 Sep 2017 - 9:20 pm | संत घोडेकर

क्या बात है! नवीन संस्कृतीची ओळख झाली. सुंदर वर्णन आणि फोटो.

ज्योति अळवणी's picture

2 Sep 2017 - 10:58 pm | ज्योति अळवणी

प्रामाणिकपणे सांगायचं तर लग्नाबद्दल काय वाचायचं म्हणून टाळत होते. पण एकूण प्रतिसदांचा आकडा बघितला आणि वाटलं वाचीन बघितलंच पाहिजे. प्रत्येक शब्दाने खिळवून ठेवलं.

खूप छान वर्णन केलं आहे एकूणच समारंभाच. फोटो तर मस्तच. होम हवन नसल्याने सुटसुटीत वाटलं एकूणच. खूप छान माहिती.

यशोधरा's picture

3 Sep 2017 - 7:22 am | यशोधरा

मस्त लिहिलंय! आवडलं.

उगा काहितरीच's picture

10 Sep 2017 - 10:30 am | उगा काहितरीच

फोटो आणि लेख दोन्हीही आवडले.