असं असतं थाई लग्न!!

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
20 Aug 2017 - 8:02 pm

असं म्हणतात की एखाद्या देशाचं अंतरंग, समाजमन, संस्कृती कशी आहे हे जाणून घ्यायची असल्यास तेथील भाषिक सिनेमे, नाटक किंवा लोककला पहा. यात मी अजून एक सुचवेन ते म्हणजे स्थानिक "लग्न सोहळा" पहाण्याची. धर्मश्रद्धा किंवा परंपरा त्यातून प्रतीत होणारे समाजमन अनुभवण्याची उत्तम संधी यानिमित्ताने मिळते असं मी म्हणेन. अर्थात अशी संधी सगळ्याच मिपाकरांना प्रत्यक्ष मिळेलच असं नाही म्हणून मग धृतराष्ट्राला संजयने जसा युद्धाचा आँखों देखा हाल सांगितला तसाच मी तुम्हाला एका थाई लग्नाचा सांगणार आहे. (बाकी लग्न आणि युद्ध तसे समानर्थीच शब्द आहेत, फार फरक नाहीये दोघांत). तर महाभारतात संजयने युद्धभूमीवर प्रत्यक्ष न जाता हस्तिनापूरच्या राजवाड्यात बसून धृतराष्ट्राला युद्धाचे जसेच्या तसे वर्णन करून सांगितले असले तरी तुमचा हा "संजय" प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जाऊन आलेला आहे. देश का सबसे भरोसेमंद(?) झी-न्यूजच्या भाषेत सांगायचं झालं तर,

रिपोर्टर मौके पर मौजूद? => हा भाई हा!!
खबर कि पुष्टी? => सोनूss तुला माझ्यावर भरोसा नाय काय?
गवाह या एक्सपर्ट? => मी स्वतःच
तकनीकी विश्वनीयता => थोडं उन्नीस-बीस होईल.

तर,
जवळपास ५०% शब्दांचं मूळ संस्कृत असलेली भाषा बोलणारे आणि एकाअर्थाने आपले मावस भाषाबंधू-भगिनी असलेल्या थाई मंडळींच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र वातावरणात वाढलेल्या दोन घराण्यांतील व्यक्ती एकत्र येऊन जन्मभर एकत्र राहण्याचा “लग्न” नावाचा विलक्षण प्रयोग कसा पार पाडतात? लग्नात शार्दूलविक्रीडित वृत्तात रचलेली मंगलाष्टके असतील का? "ओटीत घातली मुलगी विहीणबाई", "जा बाळे जा, सुखे सासरी" म्हणत पाणावलेल्या डोळ्यांची वधूमाय दिसेल का? यज्ञवेदीच्या भोवती सप्तपदी म्हणत शतजन्मींचे नाते सांगणारी थाई नववधू पारंपरिक वेशात कशी दिसत असावी? उखाणे वगैरे थाई बायका घेत असतील का? वरमंडळी तोऱ्यात तर वधूमंडळी नरमाईच्या भूमिकेत असतील का? लवकरात लवकर आहेराचं पाकिट टेकवून पहिल्या पंक्तीत नंबर लावून न विसरता आईस्कीम खाऊन ऑफिसात पोहोचणारे सुपरमॅन आमंत्रित इथे असतील का? हुंडा वगैरे गोष्टी थाई समाजात आहेत का? 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न!' अशी आपल्याकडे म्हण आहे आणि इथे तर सगळेच नकटे मग इथल्या लग्नांत अडचणींचा महापूर येत असेल का? अश्या बऱ्याच प्रश्नांची रुंजी मनात घालत हल्लीच एक थाई लग्न अटेंड केलं त्याचा हा वृतान्त.

मी मुलीकडचा त्यामुळे मुलाची फारशी माहिती नसली तरी मुलगा सालस स्वभावाचा, नाकासमोर पाहून चालणारा, सरकारी कायम नोकरीवाला आहे वगैरे वगैरे माहिती जमवता आली. मात्र आमची गृहकृत्यदक्ष, चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी कन्या "यवालाक अनुनतासील" हिची बरीच माहिती माझ्याकडे आहे त्यातील काही निवडक माहिती सर्वप्रथम सांगतो.

चि.सौ.कां. "यवालाक अनुनतासील" ही तशी चाळीशी उलटून गेलेली घोड-नवरी म्हणता येईल. आमच्या ऑफिसमधे अॅडमिनस्ट्रेशन डिपार्टमेंटला इम्पोर्ट-एक्स्पोर्ट आणि इतर कस्टम्स संबंधित कामाची जबाबदारी सांभाळणारी एक सर्वसाधारण स्टाफ. फावल्या वेळात केळ्याचे चिप्स, ड्रायफ्रुट्स स्टाफच्या इतर लोकांना विकणं असे कुटिरोद्योग तिचे चालू असतात. (आपल्याकडे कसं काहीजण घरगुती लोणची-पापड ऑफिसात विकतात अगदी तसंच). मी दिवसागणिक गट्टम करत असलेल्या चिप्सची मदत आमची दोस्ती वाढण्यास झाली हे वेगळं सांगायला नको. भूक लागली आणि कँटीन बंद असेल तर या अन्नपूर्णेकडे मी हक्काने जातो आणि तिनेही मला कधी उपाशी पोटी पाठवलेलं आठवत नाही. मिपावर तिच्या लग्नाचे फोटो टाकण्याची आणि एकूण लेख लिहिण्याबद्दल तिने हसत हसत दिलेली अनुमती यावरून आमच्या मैत्रीची खोली लक्षात येईलच.

शांत स्वभावाची, दिसायला नीटस, काटकसरी आणि मेहनतीने स्वतःच्या पायावर उभी असलेल्या यवालाकची फॅमिली बॅकग्राऊंड आपल्या भारतातल्या टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात फिट बसेल अशीच. वडील गव्हर्नमेंट सर्व्हंट, आई हाऊसवाईफ, एक भाऊ आणि एक बहीण, रीतसर शिक्षण घेऊन नोकरी धंद्याला लागलेलं एक आटोपशीर कुटुंब. ही बॅकग्राऊंड देण्याचं कारण हे की आपली नायिका कोणत्या क्लासमधील आहे याचा अंदाज यावा म्हणून. कारण आपण माहिती घेतोय ते लग्न पारंपरिक आणि काही पाश्चिमात्य विधींची सरमिसळ असणारा असा आहे. कारण गेल्या दीडदोनशे वर्षांमध्ये थाई लग्न पद्धती आपल्याकडील लग्नांसारखीच बदलत गेलेली आहे. आजकाल आपल्याकडे कसं लग्नात केक कापायचे, हार घालतांना गाफील नवरा-नवरीला पतंगीसारखं उंच उडवून अडवणूक करण्याचे, अंगावर चुळा टाकण्यापासून ते दातांनी लवंग तोडणे आणि "हम आपके है कौन" धर्तीवर जिजाजींचे जोडे लपविण्याचे प्रकार वाढू लागलेत अगदी तसंच.

थाई लग्नांत उखाणे वगैरे घेतले असल्यास मला कल्पना नाही पण मी मात्र उखाणा घेऊनच पुढे टंकायला घेणार आहे. हा असा,

सप्तपदीची सात पावलं
साताजन्मांच्या गाठी..
वाचायलाच हवं तुम्हाला
खून यवालाकसाठी.

यवालाक कन्या थायलंडची
तीन भावंडात छोटीशी...
वरही तिचा साजेसा
लग्न विधीचा घेऊ आता कानोसा.
मात्र,
उतू नका.. मातू नका घेतला वसा टाकू नका
वाचून झाल्यावर कमेंट करायला विसरू नका.

असं हे "ट" ला "ट" जोडून झाल्यानंतर आता मी लग्नाचे फोटू जोडायला घेतो. यात पहिला फोटो आपल्या नायक-नायिकेचा.

↓ आता लग्न विधींपूर्वी प्रथम स्मरण पूर्वजांचे. खाली जो फोटो दिसतोय त्याला थाई भाषेत "सान फ्रा फूम" अर्थात "स्पिरिट हाऊस". थायलंडमधे पूर्वजांची स्मृती म्हणून छोटेखानी मंदिराटाईप अशी "स्पिरिट हाऊसेस" जवळपास प्रत्येक आस्थापनांत, घरांच्या व्हरांड्यात, कॉंडोमिनिअमच्या आवारात वास्तुशास्त्रानुसार एका विशिष्ट कोपऱ्यात दिसून येतात. आपले पूर्वज येणाऱ्या संकटांना प्रवेशद्वारापाशीच रोखून धरतात यावर थाई लोकांची नितांत श्रद्धा आहे. त्यांचं स्मरण, पूजन, प्रसाद दाखवणं अगदी रोज केलं. म्हणजे आपण पित्रुपक्षात सगळ्या पितरांची आठवण काढतो किंवा वाडी दाखवतो ते थाई मंडळी रोज करतात. प्रसाद म्हणून जेवण आणि फळांपासून ते अगदी मिरिंडा देखील ठेवतात. लग्नसमारंभासारख्या धार्मिक कार्याची सुरूवात या पूर्वजांच्या पूजनानेच होते.

↓ हे वऱ्हाडी मंडळी मुलीच्या घरी येतानाच्या स्वागताचं दृश्य. थायलंडच्या ग्रामीण भागात नवऱ्या मुलाला खांद्यावर घेऊन येतात. त्याला खांद्यावर घेऊन येत असतांना काही आरोळ्या दिल्या जातात. त्या आरोळ्या देण्याची पद्धत कशी असते विचाराल तर ती आपल्या बंगाली लग्नात किंवा दुर्गा पूजेत स्त्रिया जो "उलु ध्वनी" चा नाद करतात अगदी तसाच. नवऱ्यामुलाचं स्वागत करण्याची ही पद्धत शहरी भागात दिसेलच असं नाही.

↓ खालील फोटोमधे तुम्हाला मुलीकडील काही मंडळी मुलाचा रस्ता अडवण्यासाठी सज्ज झालेली दिसतील. आपल्याकडे गृहप्रवेशाच्या वेळी नव्या सुनेचा दरवाजा मुलाची बहीण अडवते आणि मागण्या करते असाच काहीसा प्रकार इथे मुलाच्या बाबतीत होतो. यात वराला तीन प्रकारच्या प्रवेशद्वारातून जावं लागतं. कांस्य द्वार, रजत द्वार आणि स्वर्ण द्वार. हे सिम्बॉलिक दरवाजे कसे असतात हे फोटो बघितल्यास लक्षात येईल. सदर लग्नात कांस्य द्वार (ब्रॉन्झ) ची जागा प्लॅस्टिकच्या पाईपने घेतलेली दिसतेय (नवऱ्या मुलाला पोकळ बांबूचे फटके मिळणार की काय असं दोन सेकंद वाटून गेलं, पण तसं काही घडलं नाही). इथे द्वारपालांना नवऱ्या मुलाने काही बिदागी द्यायची असते तरच ते फाटक उघडतात. थोडक्यात नवऱ्यामुलाच्या खिशाला इथून पुढे भोकं पडत जातात आणि उत्तरोत्तर ती वाढतच जातात.

↓ हा "रजत द्वार". इथे नवऱ्या मुलाला होणाऱ्या मेव्हणीला भरभक्कम लाच द्यावी लागते. मनाजोगती बिदागी मिळत नाही तोपर्यंत ती "आय लव्ह यु,आय लव्ह यु" ओरडत रहाते. या मागचं लॉजिक असं की मला जर खूश नाही केलंस तर तुमच्या संसारात मी सवत बनून येईन आणि सगळ्यांनाच त्रास देईल हे. इथे वरपक्ष आपापले मुत्सद्देगिरीसाठी नाव कमावलेले कोणी काका, मामा ह्यांना Chief Negotiator म्हणून नेमतात आणि मुलाला संभाव्य बँककरप्सी पासून वाचवतात. लॉजिकली मला हे पैसे बहिणीने द्यायला पाहिजे होते असं वाटत होते पण इथे उलटा प्रकार पाहून आश्चर्य वाटून नवऱ्या मुलाची कीव आली. बिच्चारा!! असो, दहा मिनिटांच्या गुदगुदल्यांसाठी आम्ही गाढवपणा काय कमी केलाय..

↓ आणि हा "स्वर्ण द्वार". इथे नवऱ्या मुलाला लाच देताना पाहिलं नाही पण गडी तंदुरुस्त आहे की नाही हे मात्र मुलीकडच्यांनी व्यायाम कार्याला लावून चेक केलं. हे असं,

↓ आणि हे धार्मिक विधींचे फोटो. यात ब्राम्हण रूपात असलेले बौद्ध भिक्षू हे नेहमी नऊच्या पटीत असतात. उदा. ९, १८, २७ असे. या बौद्ध भिक्षूंचा बसण्याचा डावीकडून उजवीकडचा क्रम हा वयावर नसून किती वर्षा पासून भिक्षू आहेत यावर असतो. लग्नात म्हटले जाणारे "नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स" आणि ॐ चे उच्चारण मला ओळखीचे वाटले. आपल्याकडे प्रत्यक्ष लग्नाच्या धार्मिक बडबडीमध्ये जसं कोणालाच स्वारस्य नसते आणि धूर डोळ्यात जाऊन बेजार झालेले वरवधू, भटजी आणि स्वरचित मंगलाष्टके म्हणण्यासाठी उत्सुक हौशी कवयित्री इतकेच जण काय चालले आहे ते पहात असतात तसंच साधारण दृश्य मला इथे दिसलं.

↓आणि आता हे वाङनिश्चयाचे फोटो. अगदी आपली भारतीय पद्धत तंतोतंत भासावी असा एकूण विधी. मुलाकडील मंडळी दागिने आणि हुंड्याची रक्कम एका कपड्यावर गोलाकार सजवून ठेवतात. थाई भाषेत या विधीला "सिन सोध" म्हणतात. होणाऱ्या वधूची तिच्या आई-वडिलांनी घेतलेली काळजी आणि आतापर्यंत केलेला सांभाळ याची परतफेड म्हणून नवऱ्यामुलाने द्यावयाच्या बिदागीला "सिन सोध" म्हणतात. मी आर्थिक दृष्ट्या तुमच्या मुलीची काळजी घेणास समर्थ आहे हाही अर्थ यातून अभिप्रेत असतो. मध्यम वर्गीयांत साधारण १ लाख थाई बाथ (आपले २ लाख रुपये) एव्हढी रक्कम हुंडा म्हणून दिली जाते. बरेचदा मुलगा होतकरू पण परिस्थिती बेताची असलयास मुलाकडून फक्त विधी म्हणून पैसे घेतले जातात पण ते त्याला नंतर परत केले जातात. पण हा विधी करतातच हे विशेष.

↓ वाङनिश्चयाचा विधी आटोपल्यावर सगळे पैसे आणि भेटवस्तू कापडात गुंडाळून नवरा मुलगा मुलीच्या आईला देतो. आई ने ते पैसे ठेवायला जातांना खास ओझ्याने वाकली आहे अश्या पद्धतीने चालायचं असतं. माझा जावई कसा तालेवार असे काहीसे शब्दप्रयोग मला एकाने समजावले होते. हा प्रसंग आपल्याला हसण्यास उद्युक्त करतो.

↓ हा फोटो विशेष. या फोटोमधे दिसणाऱ्या शंकराच्या पिंडीसदृश्य वस्तू पाहून माझं कुतूहल जागं झालं. पण ते फार काळ टिकलं नाही. ते खरंतर थाई पद्धतीचं एक "जाते" होते आणि त्यावरून मुलीची घेतलेली परीक्षा पाहून आपल्या जुन्या काळात जसं "मुली, चालून दाखव पाहू", मुलीचे हस्ताक्षर पाहिले जाई, "चहापोहे मुलीनेच केले" आहेत किंवा "समोरचा बाळकृष्ण हिनेच भरला आहे" असा मुलीच्या पाककौशल्याचा आणि एकूण गृ.कृ.द. पणाच्या पुराव्याची चाचपणी केली जाई त्याची आठवण मला झाली. आमच्या यवलाकची बांधलेल्या हाताने दळण दळून देण्याची परीक्षा इथे घेण्यात आली, अर्थात ती पास झाली हे वेगळे सांगायला नको.

↓आणि हा "साय मॉन खॉन" विधी,
यात वर आणि वधूने खाली वाकून नमस्कार मुद्रेत बसायचं असतं. आणि बौद्ध भिक्षूंनी आधीच मंत्रोच्चार करून संस्कार केलेले "सुती धागे" उपस्थितांनी वधूवरांच्या मनगटावर बांधायचे असतात. कुटुंबातील वडीलधारी मंडळींचा मान पहिला असतो. धागा बांधणाऱ्या प्रत्येकाला एक रिटर्न गिफ्ट दिलं जाते.

↓ अस्मादिक

↓आणि हा थाई लग्नातला शेवटचा धार्मिक विधी. याला थाई भाषेत "रोद नाम सांग" अर्थात शंखातून पवित्र पाण्याचं अर्ध्य देणे असं म्हणतात. सुती धागा हातात बांधलेल्या आणि डोक्यावरही तसंच बंधन असलेल्या आणि नमस्कार मुद्रेत वधू आणि वराने बसायचं असतं. जमलेले उपस्थित शंखामधे पाणी घेऊन वधू-हातावर सोडतात आणि सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देतात.

↓आणि आता फोटो रिसेप्शनचे.
सगळया फोटोग्राफीतून सवड मिळाल्यावर, आणि वधू-वर वल्कले बदलावयास गेले तेव्हा मीही बाकीच्या निमंत्रित प्राणिवर्गात सामील झालो. हल्ली थाई भाषा थोडी ओळखीची झाल्याने उपस्थितांची चाललेली एकूण बडबड समजत होती. मनुष्यप्राणी इथून तिथून सारखाच. स्त्रीवर्ग एकमेकींच्या दागिन्यांचा आणि ड्रेसेसचा लेखाजोखा मांडत बसलेल्या होत्या तर पुरुष मंडळी मांडवात बसून ’नेहरूंचे काय चुकले’ या धर्तीवर "पीएम थकसिन शिनावात्राचे काय चुकले " टाइपच्या चर्चांनी, पेगावर वर पेग मारत कालक्रमणा करीत होते. दोन्ही पक्षांचे गोंडस 'राजू' आणि 'पिंकी' मांडवात धुमाकूळ घालून शिवाशिवी, लपंडावात स्वतःची करमणूक करवून घेत होते आणि एक थाई 'नारायण' कोणाला हवं नको ते पहात होता. शांत, सुमधुर संगीतात आणि सोनेरी पाण्यात रंगलेले आमंत्रित आनंदी दिसत होते.

या लग्नात मला एक पद्धत आवडली ती म्हणजे निमंत्रितांनी आपापल्या टेबलावर बसून रहायचं आणि वर-वधूने एकत्र प्रत्येक टेबलापाशी जायचं. ज्यांना गिफ्ट आणि शुभेच्छा द्यायचं आहे त्याने ते द्यावं आणि फोटो वगैरे काढून घ्यावेत. कुठेही गोंधळ नाही, रांगा नाहीत.. मला ही पद्धत खूप आवडली.

↓आणि हे काही मिस्लेनीअस फोटो.

↓या माझ्या ऑफिसभगिनी.

संस्कृतीसमाजलेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

10 Sep 2017 - 10:30 am | उगा काहितरीच

फोटो आणि लेख दोन्हीही आवडले.

स्वाती दिनेश's picture

23 Sep 2017 - 1:25 pm | स्वाती दिनेश

हे आमचं वरातीमागून घोडं.. :)
थाई लग्नाचा खुसखुशीत वृत्तांत आवडला.
एका गोर्‍या लग्नाची गोष्ट आठवली.
स्वाती