जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १ : संक्षिप्त इतिहास

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
21 Feb 2014 - 1:49 am

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

व्हिएतनाम कम्युनिस्ट असला आणि आधुनिक काळातल्या भयंकर युद्ध आणि नरसंहारातून गेला असला तरी लोक रुक्ष वाटले तर नाहीच पण घरे आणि सार्वजनिक जागांमध्ये त्यांच्यातील जितीजागती कलासक्ती सतत दिसत होती. परतताना विमानतळावरच्या चेकईन काउंटरचा ही देखावाही याची खात्री देत होता...

हो ची मिन् शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मला फार काळापासून बघावे अशी इच्छा असलेल्या कंबोडिया या देशाच्या दिशेने विमानाने भरारी घेतली. हो ची मिन् शहर ते नॉम् पेन् (Phnom Penh) हा जेमतेम २०४ किलोमीटरचा प्रवास चाळीस-पंचेचाळीस मिनिटात संपवून आमचे विमान कंबोडियाच्या राजधानीवर येऊन ठेपले...


 ......
विमान उतरताना दिसलेले नॉम् पेन् चे विहंगम दृश्य

भारतीय संस्कृतीचा प्रबळ ठसा असलेल्या या देशाबद्दल मला खूपच कुतूहल आहे. हा देश केवळ तेथील संस्कृती आणि शिल्प-बांधकाम कलेच्या दर्शनानेही भारावून सोडतो. पण त्यांच्या मागील इतिहासाची पार्श्वभूमी माहीत असेल तर तो आनंद व्दिगुणित होतो. म्हणून या देशाचा इतिहास थोडक्यात तरी पाहून मगच त्याची सफर सुरू करणे योग्य होईल.

कंबोडियाचा संक्षिप्त इतिहास

कंबोडियात मानववस्ती केव्हापासून आहे याचे सबळ शास्त्रीय पुरावे तसे अभावानेच मिळाले आहेत. तेथील गुहांमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांचे वय इ स पूर्व ४,००० वर्षांचे असल्याचे आणि तेथे इ स च्या पहिल्या शतकापूर्वीपासून भातशेती होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. मानववस्ती बहुदा याच्याही फार पूर्वीपासून असावी. इ स च्या पहिल्या शतकापासून चिनी व्यापाऱ्यांच्या अहवालांत त्या भागातल्या राज्यांबद्दल आलेल्या उल्लेखांवरून आणि प्राचीन स्थानिक पुराव्यांवरून तेथील संस्कृती, भाषा, लिपी, कला, वास्तू-शिल्पकला, धर्म आणि वर्णव्यवस्था असलेली सामाजिक प्रणाली मोठ्या प्रमाणात भारतीय प्रभावाखाली होती.

कंबोडियाच्या इतिहासातील पर्वे साधारणपणे खालीलप्रमाणे आहेत

१. फुनानच्या ख्मेर राज्याचा कालखंड :

इ स च्या पहिल्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत त्या वेळेच्या कंबोडियामध्ये (आताच्या दक्षिण व्हिएतनामच्या मेकाँग खोऱ्यामध्ये असलेल्या) चेनला / फुनान आणि (आताच्या दक्षिण-मध्य व्हिएतनाममध्ये असलेल्या) चंपा राज्यांची माहिती व्हिएतनामच्या सफरीत आली आहेच. या किनारपट्टीवरच्या राज्यांबरोबर अंतर्गत भूमीवरही इतर काही विस्कळीत राज्येही होती. ह्या सर्व भागांतील लोकांना ख्मेर (Khmer) असे संबोधले जाते. त्यांच्या भाषेत अजूनही संस्कृतचा प्रभाव जाणवण्याएवढा आहे. तेथे असलेल्या बंदरांतून होत असलेल्या भारत व चीनमधला व्यापारामुळे हे देश भरभराटीला आले होते. आतापर्यंत सापडलेला ख्मेर भाषेतला सर्वात जुना शिलालेख आणि दगड-वीटेने बांधलेले पहिले हिंदू मंदिर चेनला राज्यांच्या कारकीर्दीतल्या ६ / ७ व्या शतकातले आहे. चेनला राज्य मोडकळीला आल्यानंतर लहान राजे अथवा सरदारांच्या आधिपत्याखाली असलेल्या भागांमध्ये सतत चालू असलेल्या लढाया-चढाओढींमध्ये दोनएक शतके गेली. या अंदाधुंदीच्या काळात जावा-सुमात्रा (आताचे इंडोनेशिया) मधल्या राजांनी कंबोडियाच्या बर्‍याच भूभागांवर आधिपत्य स्थापन केले होते.

या काळातल्या काही राजांची कौडिण्य, श्रीइंद्रवर्मन, जयवर्मन (पहिला), नोरोदोम (नरोत्तम), रुद्रवर्मन, सार्वभौम, भाववर्मन, महेंद्रवर्मन अशी संस्कृतप्रचुर नावे होती. एक खास गोष्ट म्हणजे इ स ६८१ ते ७१३ या कालखंडात चेनला राज्यावर जयवेदी नावाच्या राणीने राज्य केले.

२. अंगकोर कालखंड :

जावा-सुमात्रा राज्यांत बंदिवासात असणारा एक ख्मेर राजपुत्र नवव्या शतकाच्या सुरुवातीला कंबोडियात परतला आणि त्याने ख्मेर प्रदेश एकत्रित करून त्यावर आपले आधिपत्य स्थापन करायला सुरुवात केली. इ स ८०२ मध्ये त्याने राज्याभिषेक करवून घेऊन राजा दुसरा जयवर्मन या नावाने स्वतःला ख्मेर साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट असे जाहीर केले. त्याच्या राजधानीचे नाव अंगकोर असे होते. त्या जागेला आता "सियाम रीप" असे नाव आहे... या नावाचा अर्थ "सियाम (थायलंडचे जुने नाव) चा पाडाव" असा आहे. दुसरा जयवर्मन आणि पुढच्या २६ सम्राटांनी १५ व्या शतकापर्यंत "आताचा थायलंड, कंबोडिया, लाओस, ब्रह्मदेशाचा काही भाग, मलेशियाचा काही भाग आणि व्हिएतनामचा दक्षिण भाग" एवढ्या विस्तृत प्रदेशावर राज्य केले आणि सर्व दक्षिणपूर्व आशियावर आपला प्रभाव पाडला...


 ......
ख्मेर साम्राज्य (तांबड्या रंगात) .................................................... सम्राट दुसरा जयवर्मन
(दोन्ही चित्रे जालावरून साभार)

हा कालखंड कंबोडियाचे सुवर्णयुग होते. दुसर्‍या जयवर्मनने शैव परंपरा सुरू करून ख्मेर राजे शिवाचा अंश असल्याचे जाहीर केले आणि देवराजा ही पदवी धारण केली. कंबोडियात या शैव परंपरेचा प्रभाव दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ चालू होता. नंतरच्या काळात बौद्ध धर्माचा पगडा वाढत गेला. याच काळात कंबोडियात एक हजारापेक्षा जास्त हिंदू आणि बौद्ध मंदिरे बांधली गेली. यातील बायोन मंदिर (Bayon Temple), अंगकोर थोम (Angkor Thom) आणि अंगकोर वट (Angkor Wat) सारखी अनेक जगप्रसिद्ध आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज असलेली मंदिरे आपण पाहणार आहोतच. ह्या मंदिरांना धार्मिक महत्त्व होतेच पण ती सामाजिक सेवा पुरवणारी केंद्रे आणि राजकीय वर्चस्वाची द्योतकही होती. यातले अंगकोर वट हे मंदिर तर कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर मानाचे स्थान मिळवून आहे. कंबोडिया संबद्धिच्या महत्त्वाच्या लिखाणात त्याचे चित्र हमखास दिसते. या सर्व मंदिरांसंबद्धी अधिक माहिती आपण त्यांना भेट देऊ तेव्हा येईलच.


अंगकोर वट (जालावरून साभार)

.


कंबोडियाचा राष्ट्रध्वज (जालावरून साभार)

शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी या सम्राटांनी अनेक मानवनिर्मित तलाव व कालव्यांचे जाळे बांधले होते. याच शेतीमुळे आलेली समृद्धी सम्राटांना मोठमोठी मंदिरे बांधण्यासाठी आणि युद्धे करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ जमवायला उपयोगी पडली. वाहतूक व व्यापारासाठी या सर्व साम्राज्यभर रस्त्यांचे जाळे होते. जरी असे असले तरी शिलालेखांतील उल्लेखांतून या साम्राज्याला अनेक बाह्य आक्रमणे आणि अंतर्गत बंडाळ्यांना तोंड द्यावे लागले असेही दिसते.

या साम्राज्याचा अंत का आणि कसा झाला याबाबत अजूनही नीट माहिती झालेली नाही. मांडलिक असलेली थाई राज्ये प्रबळ झाल्याने आणि त्यांच्याबरोबर वारंवार होणार्‍या युद्धांमध्ये खूप मनुष्यबळ खर्ची पडल्याने हे साम्राज्य मोडकळीला आले असावे. १३-१४ व्या शतकात थेरवद बौद्ध धर्माचा प्रभावही या भागात सुरू झाला होता. त्याच्या प्रत्येकाला माणसाला उत्तम आचार आणि घ्यानधारणेने प्रबोधन (enlightenment) शक्य असते या शिकवणुकीमुळे तेथील सामाजिक उतरंड कोलमडली आणि राजघराणे व सरदार यांचे महत्त्व कमी झाले. सद्या कंबोडियामधले ९६% लोक बौद्ध धर्मीय आहेत.

इ स १४३१ मधले थाई आक्रमण हा या साम्राज्यावर शेवटचा प्रहार ठरला आणि उरलेल्या सर्व उच्चभ्रू घराण्यांनी अंगकोरच्या दक्षिणपूर्वेस आजची राजधानी नॉम् पेन् जवळील लोवेक येथे स्थलांतर केले आणि तेथूनच ख्मेर साम्राज्याच्या उरल्यासुरल्या अवषेशावर राज्य चालू ठेवले.

३. कंबोडियाचे अंधारयुग :

ख्मेर साम्राज्याची शकले होऊन निर्माण झालेल्या अनेक छोट्या राज्यांत सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत सतत लढाया होत राहिल्या. आधुनिक थायलंडच्या अयोध्या (Ayutthaya) राजघराण्याने ख्मेर साम्राज्याचा बराच मोठा भाग काबीज करून आपल्या राज्याला जोडला, व्हिएतनामचे साम्राज्य दक्षिणेस पसरून त्याने चंपा राज्ये आणि मेकाँगचे सुपीक खोरे व्यापले, तर पूर्वेला ब्रह्मदेशात स्वतंत्र सत्ता उदयाला आली.

पराजित आणि लुटले गेलेली राजधानी, अंगकोर, चार शतके अंधारात बुडून गेली. मात्र या काळातही उरलेला दक्षिणेकडील (सद्याचा कंबोडिया) प्रदेश त्याच्या व्यापारी महत्त्वामुळे बर्‍यापैकी सधन राहिला. याच काळात तेथे रामायणावर आधारीत रीमकर (Reamker) नावाचा कंबोडियाचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ लिहिला गेला.

४. फ्रेंच वसाहतीचा कालखंड :

थाई व व्हिएतनामी आक्रमकांपासून बचाव व फ्रेंच वसाहतवादाचा रेटा यामुळे १८६३ मध्ये कंबोडियाच्या राजाने फ्रेंच राजसत्तेचे संरक्षित राज्य (protectorate) होणे मान्य केले. कंबोडियाला जरी वसाहत म्हणून जाहीर केले नसले तरी पुढची ९० वर्षे तेथे सर्व बाबतीत फ्रेंचांचा शब्द शेवटचा होता. या काळात फ्रेंचांनी कंबोडियन जनतेच्या शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. मात्र रबर आणि भाताच्या शेतीत केलेल्या सुधारणांमुळे कंबोडिया ती उत्पादने निर्यात करणारा देश बनला.

फ्रेंचांनी केलेले एक उत्तम काम म्हणजे अंगकोर येथील मंदिरांचे पुनरुत्थान सुरू केले आणि तेथील शिलालेखांचे अर्थ उलगडले. त्यामुळे कंबोडियन जनतेला स्वइतिहासाचे ज्ञान होऊन त्यांचा देशाभिमान जागा झाला आणि जगाला एका प्रगल्भ प्राचीन संस्कृतीची ओळख झाली. राजघराणे, बौद्ध धर्म आणि सामाजिक बाबतीत ढवळाढवळ टाळल्याने सर्वसामान्य जनतेत फ्रेंचांविरुद्धचे लोकमत तितकेसे तीव्र नव्हते. १९५३ मध्ये राजा नोरोदोम सिंहनूक (King Norodom Sihanouk) यांनी राजनैतिक कौशल्य वापरून शांततेने देश स्वतंत्र केला आणि तो कम्युनिस्ट प्रभावापासून दूर ठेवला.

५. आधुनिक कालखंड :

इ स १९५५ मध्ये राजा नोरोदोम सिंहनूक यांनी आपले वडील नोरोदोम सुरमरीत (Norodom Suramarit) यांना राजसिंहासनावर बसवून पूर्णकाळ राजकारणात उडी घेतली. १९५५ मध्ये झालेल्या निवडणूकीत सिंहनूक यांच्या पक्षाने लोकसभेच्या सर्व जागा जिंकल्या. सिंहनूक हे त्यांच्या वडिलांचा इ स १९६० मध्ये मृत्यू होईपर्यंत कंबोडियाचे पंतप्रधान होते, त्यानंतर ते परत सिंहासनावर विराजमान झाले.

इ स १९५० पासून अमेरिकेचे साथीदार असलेल्या सिंहनूक यांनी १९६५ मध्ये अमेरिकेशी संबंध तोडून व्हिएतनाम युद्धात मदत म्हणून उत्तर व्हिएतनामला कंबोडियाच्या भूमीवर लष्करी तळ उभारू दिले. पुढे दक्षिणपूर्व आशियातील युद्धांच्या परिणामाने खिळखिळे झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे अस्थिरता वाढली, सिंहनूक-विरोध वाढीस लागला आणि त्या देशातील भूमीगत कम्युनिस्ट चळवळीने परत डोके वर काढले. आर्थिक आणि सैनिकी मदतीच्या बदल्यात सिंहनूक यांनी अमेरिकेशी परत राजकीय संबद्ध स्थापित केले. त्यांचा उपयोग अमेरिकेने १९६९ मध्ये कंबोडियातील व्हिएतनामी सैनिकी तळांवर बाँबवर्षाव करण्यास केला.

६. ख्मेर गणराज्याचा कालखंड :

इ स १९७० मध्ये राजा सिंहनूक देशाबाहेर असताना कंबोडियाच्या लोकसभेतील व्हिएतनाम-विरोधी पाश्चिमात्य-धार्जिण्या गटाने त्यांना पायउतार केले आणि जनरल लोन नोल यांना ख्मेर गणराज्याचे पंतप्रधान नियुक्त केले. चीनमध्ये शरणागती घेतलेल्या सिंहनूकना त्यांच्या अनुपस्थितीत देहदंड सुनावला गेला. लोन नोल सरकारला अपेक्षित असलेली मदत करण्याऐवजी उलट पुढची तीन वर्षे अमेरिकेने दक्षिण व्हिएतनाम सैन्यासह कंबोडियात खोलवर घुसून तेथील उत्तर व्हिएतनामी तळांवर हल्ले केले. याचा बदला म्हणून उत्तर व्हिएतनामने आक्रमण करून लोन नोलच्या सैन्याची उरली सुरली आक्रमणक्षमताही नष्ट केली.

याच काळात चीन व उत्तर व्हिएतनामने सिंहनूक यांना "देशापार शासन" (government in exile) स्थापण्यास प्रवृत्त केले. या शासनात नंतर ख्मेर रूज (रक्त ख्मेर) या नावाने कुप्रसिद्ध झालेल्या Communist Party of Kampuchea उर्फ CPK चे प्राबल्य होते.

अमेरिकेची मदत असूनही १९७५ मध्ये सततचे यादवी युद्ध आणि त्यावर कंबोडियाच्या भूमीवरील अमेरिकन बाँबवर्षाव यामुळे ख्मेर गणराज्य खिळखिळे झाले आणि ख्मेर रूजने नॉम् पेन् काबीज केले. त्याच्या तीन आठवड्यांतच उत्तर व्हिएतनामने दक्षिण व्हिएतनामचा पराभव केला. या वेळेपर्यंत काही दशके चाललेल्या युद्धाने कंबोडियाचे नागरी व ग्रामीण भाग बेचिराख झाले होते, हजारो लोकांनी जीव गमावला होता आणि लाखोंच्या संख्येच्या विस्थापितांच्या लोंढ्यांनी उरलेसुरले शहरी भाग भरून गेले होत.

७. कंबोडियन (तथाकथित) लोकशाहीचा कालखंड :

१९७५ ला स्थापन झालेली ख्मेर रूजची (तथाकथित) लोकशाही कारकीर्द १९७९ पर्यंत चालू होती. या गनिमी सेनेचा नेता सालोथ सार (Saloth Sar) हा त्याच्या मूळ नावापेक्षा पोल पॉट (Pol Pot) या टोपण नावानेच जास्त कुप्रसिद्ध आहे. ख्मेर रूजने शहरी, शिक्षित लोकांना आपले मुख्य शत्रू समजून त्यांना ग्रामीण भागात हलवून शेतीच्या कामाला लावले. केवळ युद्धात मदत केली म्हणून अनेक अशिक्षित आणि अननुभवी लोकांना शासनात महत्त्वाच्या जागा दिल्या. विचारस्वातंत्र्य, संघटना आणि धार्मिक व्यवहारांवर कडक बंधने लादली. खास करून विचारवंत, व्यापारी, जुने शासकीय अधिकारी, धार्मिक नेते आणि विरोधाचा संशय असणार्‍या लोकांची कत्तल केली. इतर अनेक लोकांना खास छावण्यांत हलवून त्यांचे अनन्वित हाल केले, उपासमार केली आणि त्यांच्याकडून सक्तमजुरी करवून घेतली. ख्मेर रूजने बाजूच्या देशांच्या भूमीवर आपला जुना हक्क परत घोषित करून त्यांच्यावर हल्ले करणे सुरू केले. चिनी आणि व्हिएतनामी वंशांच्या आणि इतर अल्पसंख्य कंबोडियन नागरिकांवर हल्ले करून त्यांना पळवून लावले अथवा त्यांची हत्या केली. या कांडात पोल पॉट राजवटीने १७ लाख लोकांचा म्हणजे कंबोडियाच्या एक पंचमांश लोकसंख्येचा बळी घेतला. एकीकडे परराष्ट्रांपासून संपूर्ण स्वतंत्र म्हणवणार्‍या या शासनाने चीन आणि उत्तर कोरिया या मुख्य दोस्त राष्ट्रांकडून भरघोस मदत स्वीकारली.

८. व्हिएतनामी ताबा आणि लोकशाहीकडे पुनर्संक्रमण :

ख्मेर रूजच्या सीमाभागात होणार्‍या सतत हल्ल्यांना कंटाळून १९७८ मध्ये व्हिएतनामने कंबोडियावर हल्ला केला आणि ख्मेर रूजचा पराभव करून तिच्या विरोधी असलेल्या कंबोडियन गटांचे संयुक्त सरकार सत्तेत आणले. मात्र या सरकारवर व्हिएतनामचे पूर्ण नियंत्रण होते. या सरकारला राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या सिंहनूक यांच्या देशापार शासनाचा विरोध होता. या युद्धानंतर कंबोडियातून ताबडतोप सेना मागे घेण्यास नकार दिल्यामुळे व्हिएतनामवर अमेरिका व तिच्या दोस्त राष्ट्रांनी आर्थिक निर्बंध लादले. त्यांना न जुमानता तेथे स्थिर सरकार सत्तेवर येईपर्यंत पुढची दोन वर्षे व्हिएतनामने आपली सेना कंबोडियातून हलवली नाही. १९८१ मध्ये अनेक एकमेकविरोधी गटांचे सरकार सत्तेवर आले. पुढचा बराच काळ अस्थिर आणि यादवीयुद्धसदृश्य परिस्थिती कायम राहिली.

९. सद्यस्थिती :

१९८९ मध्ये पॅरिसमध्ये सुरू झालेल्या शांतता प्रयत्नांना यश येऊन राष्ट्रसंघाच्या मध्यस्तीने सर्व गटांमध्ये शस्त्रसंधी होऊन सर्वसमावेशक शांतता करार झाला. त्या कराराप्रमाणे United Nations Transitional Authority in Cambodia (UNTAC) आणि नोरोदम सिंहनूक यांच्या अध्यक्षतेखालील कंबोडियन गटांचे Supreme National Council (SNC) यांच्यात सत्ताविभाजन केले गेले. १९९३ मध्ये झालेल्या निवडणूकीत लोकांनी लष्करी गटांना झुगारले. सिंहनूक यांच्या राजावादी पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या परंतू त्यांना बहुमताचा कौल मिळाला नाही. तीन गटांच्या युतीचे सरकार स्थापन होऊन सिंहनूक याचा मुलगा राजपुत्र नोरोदम रणरिद्ध पहिला पंतप्रधान आणि हून सेन दुसरा पंतप्रधान झाले. १९९३ मध्येच कंबोडियात राजेशाहीची पुनर्स्थापना होऊन नोरोदम सिंहनूक यांना दुसर्‍यांदा राजा म्हणून घोषित केले गेले.

नोरोदम रणरिद्ध आणि हून सेन यांची व्दिपंतप्रधान राजवट तीन वर्षे टिकली. १९९७ मध्ये नोरोदम रणरिद्ध परदेशात असताना हून सेनने राज्यक्रांतीने पूर्ण सत्ता हस्तगत करून जगाला धक्का दिला. मात्र १९९८ मध्ये पूर्वी ठरल्याप्रमाणे परदेशी निरीक्षकांच्या देखरेखीखाली मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका झाल्या. नोरोदम रणरिद्ध आणि इतर विरोधकांनी परदेशात राहून त्या निवडणूकीला विरोध केला. शेवटी हून सेन पंतप्रधान, नोरोदम रणरिद्ध विधानसभेचे अध्यक्ष आणि महत्त्वाची खाती दोन पक्षात विभागून अशा तोडग्यावर संयुक्त सरकार स्थापन झाले. यामुळे लवकरच कंबोडियाला ASEAN चे सदस्यत्व मिळायला मदत झाली.

पोल पॉट्चा १९९८ मध्ये मृत्यू झाला. ख्मेर रूजच्या अनेक अधिकार्‍यांना जातीसंहाराच्या आणि इतर गुन्ह्याखाली शिक्षा झाल्या.

एके काळी दक्षिणपूर्व आशियाई महासत्ता असलेला आणि आता त्या काळाच्या केवळ एक चतुर्थांशापेक्षा कमी भूमी ताब्यात असलेला कंबोडिया दरवर्षी कमी होत जाणार्‍या परदेशी मदतीवर अवलंबून आहे. त्याच्या प्राचीन कालच्या स्थापत्य वैभवाचा जीर्णोद्धार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आनंदाची गोष्ट अशी की या कामाला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचा (ASI) हातभार लागतो आहे.

असो. भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेल्या ६०० वर्षे प्रदीर्घ सत्तेत असलेल्या साम्राज्याची भूमी आणि कोणत्याही धर्मातल्या जगातल्या सर्वात मोठ्या मंदिर संकुलाचा देश म्हणून कंबोडियाबद्दल मला खूप कुतूहल होते आणि आहे. ताकदवान आणि संपन्न देशाची बदलत्या कालगतीबरोबर कशी फरपट आणि दुर्दशा होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणूनही कंबोडियाच्या इतिहासात मला रस वाटला. हे सर्व आपल्या सर्वांबरोबर वाटून घ्यावेसे वाटले म्हणूनच जरा विस्ताराने त्याबद्दल लिहिले आहे. या पार्श्वभूमीचा कंबोडियाच्या भटकंतीत आपल्याला तो देश अधिक चांगला समजून घेण्यास मदत होईल.

(क्रमशः )

==================================================================

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...

==================================================================

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

21 Feb 2014 - 2:17 am | मुक्त विहारि

चला, परत एका अप्रतिम लेखमालेने मिपा सजणार.....

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2014 - 5:12 am | अत्रुप्त आत्मा

++++++११११११

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Feb 2014 - 11:43 am | लॉरी टांगटूंगकर

+११११११११११११११

हेच म्हणतो.

अनिरुद्ध प's picture

21 Feb 2014 - 12:58 pm | अनिरुद्ध प

+११११११११

राघवेंद्र's picture

21 Feb 2014 - 2:22 am | राघवेंद्र

आज सकाळी कंबोडिया बद्दल 'गुगल' करायचे ठरविले होते आणि तुमची लेखमालिका सुरु झाली. दुधात साखर पडणे म्हणतात ते हेच.
लेखमालिकेसाठी शुभेच्छा.

राघवेंद्र

मधुरा देशपांडे's picture

21 Feb 2014 - 3:07 am | मधुरा देशपांडे

माहितीपूर्ण लेख. पु. भा. प्र.

खटपट्या's picture

21 Feb 2014 - 3:46 am | खटपट्या

लेख व फोटो दोन्ही जबरी

पुढच्या भागात मंदिरांच्या छान चान फोटोंची अपेक्षा

आत्मशून्य's picture

21 Feb 2014 - 4:32 am | आत्मशून्य

लिहलय... पण वाईट वाटते ते तेथील जनतेचे....

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Feb 2014 - 11:23 am | llपुण्याचे पेशवेll

वाचतोय वाचतोय.

सुहास झेले's picture

21 Feb 2014 - 11:28 am | सुहास झेले

सहीच.... चला अजून एका अद्वितीय सफरीचा आनंद लुटायला :) :)

शिद's picture

21 Feb 2014 - 4:15 pm | शिद

मस्तचं... पु.भा.प्र.

सव्यसाची's picture

21 Feb 2014 - 11:32 am | सव्यसाची

जबरदस्त.. अजून एका सफरीला सुरुवात झाली.. :)
पु.भा.प्र.

भाते's picture

21 Feb 2014 - 11:38 am | भाते

अरे वा, एक्का काकांच्या आणखी एका सफरीला सुरुवात झाली तर!

सुरुवात छान झाली आहे. आवडले.

मराठीच's picture

21 Feb 2014 - 11:53 am | मराठीच

आपल्याला मिपाचे पुनाओक ही पदवी मी बहाल करतो

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 12:04 pm | बॅटमॅन

बळंच??????

एका देशाच्या इतिहासाची सफरीद्वारे ओळख होतेय आणि त्याची तुलना पु ना ओकांशी????

त्यांचे आधीचे लेखही वाचावेत अशी शिफारस करतो.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2014 - 12:42 pm | अत्रुप्त आत्मा

@आणि त्याची तुलना पु ना ओकांशी???? >>> हेच्च म्हणतोय. तूलनाच होऊ शकत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2014 - 2:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ मराठीच

कंबोडियाचा इतिहास आणि संस्कृती जागतीक पुरातत्व संशोधनात एक महत्वाचा अध्याय समजला जातो. अंगकोर (आजचे सियाम रीप) च्या १०० किलोमीटर व्यासाच्या वर्तुळाकार परिसरात सुमारे हजार मंदिरे आहेत. त्यातली सुमारे ८० आकारमान, स्थापत्यकला, कलाकुसर इ साठी पुरातत्व संशोधनदृष्ट्या महत्वाची आहेत आणि त्यांच्यातल्या युनेस्को वर्ड हेरिटेज म्हणून मान्यता मिळालेल्यां स्थानांची यादी वाचताना धाप लागेल. आजही तेथील उत्खनन संपलेले नाही आणि पुरातत्व संशोधनाच्या दृष्टीने महत्वाची नवीन स्थाने अजूनही सापडत आहेत. (सर्वसाधारणपणे कोणत्याही दोन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्थानांमध्ये शंभर किलोमीटरपेक्षा कमी अंतर फारच अभावाने दिसते.)

युनेस्कोच्या, कंबोडिया सरकारच्या आणि इतर अनेक स्वतंत्र संस्थळावर नुसती चक्कर मारलीत तरी बरीच माहिती घरबसल्या मिळू शकेल (आणि ते ज्ञान पाश्चिमात्य स्त्रोतांतून आल्याने त्यावर तुमचा पटकन विश्वास बसेलही :) ).

त्यामुळे, तुम्ही मला दिलेल्या अनाहूत आणि चुकीच्या पदवीबद्दल मी तुम्हाला अनाहूत आणि योग्य सल्ला देत आहे, तो असा:

"वाचन वाढवा आणि आपल्या आयडीची अब्रू वाचवा !"

त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !

प्रचेतस's picture

21 Feb 2014 - 12:34 pm | प्रचेतस

कंबोडियाच्या राजकीय इतिहासाबद्दलची माहिती आवडली.
आपल्याबरोबर झालेल्या प्रत्यक्ष भेटीत कंबोडीया सहलीबद्दल चर्चा झालीच होती. तेव्हापासून ह्या सहलीची अगदी आतुरतेने वाट पाहातच होतो.

या साम्राज्याचा अंत का आणि कसा झाला याबाबत अजूनही नीट माहिती झालेली नाही.

थाई राज्यांबरोबर युद्धे, थेरवादाचा उदय यांजबरोबर प्रचंड मंदिरे बांधत गेल्याने होणारा प्रचंड खर्च हे पण एक कारण असावे. इतक्या मोठ्या खर्चामुळे साहजिकच ही राजवट आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आलेली असणार.

प्रचंड मंदिरे बांधत गेल्याने होणारा प्रचंड खर्च

भारतात "चालतात" तशी तिथे "चालली" नाहीत म्हणजे मंदिरे, नाहीतर केवढी आवक झाली असती गल्ल्यात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2014 - 3:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या काळात मंदिरे ही पैसा जमवण्याचे साधन नव्हते. किंबहुना बहुतेक मंदिरे युद्धात मिळालेला विजय अथवा राज्यारोहण याप्रसंगांची आठवण व राजाच्या मोठेपणाची जनमनावर आणि शत्रूंवर छाप पाडण्यासाठी बांधलेली आहेत. ती बांधताना पराजीत राजाकडच्या खंडणीबरोबरच स्वतः राजाचा खजीनाही रिकामा केला जात असे.

देवळे बांधून देवाच्या नावाने संपत्ती जमवायच्या रोगाची लागण त्या काळी नव्हती असे दिसते... हा रोग अलिकडच्या काळाचा आहे ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2014 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

या सर्वांबरोबर महापूर / दुष्काळ या नैसर्गीक आपत्तीने नष्ट झालेले मुख्य उत्पन्न (भाताचे पीक) आणि प्लेग ही कारणेही दिली जातात. मात्र त्यापैकी नेमके कोणते एक अथवा अनेक कारणे अंगकोरची सर्व लोकसंख्या स्थलांतरीत होण्यास कारण ठरली आणि ते शहर पुढची चार शतके लोकांच्या स्मृतीतून कसे निघून गेले हे नक्की नाही. फ्रेंचांनी ही मंदिरे परत शोधून काढेपर्यंत कंबोडियातील लोक अंगकोरचे आणि तेथील शिलालेखांवरील लिपीसुद्धा विसरून गेले होते.

जयंत कुलकर्णी's picture

21 Feb 2014 - 12:53 pm | जयंत कुलकर्णी

मस्तच.....

मोठ्या आशेने लेख उघडला, आणि निराशा झाली नाही :)

सुधीर कांदळकर's picture

21 Feb 2014 - 1:06 pm | सुधीर कांदळकर

सुरुवात. नेटकी, रंजक, योग्य लांबीची प्रस्तावना. छान.

पुभाप्र

पिलीयन रायडर's picture

21 Feb 2014 - 1:58 pm | पिलीयन रायडर

वा वा वा... नेहमी प्रमाणे मस्त लेख..!! अजुन येऊ द्यात!!!

प्रमोद देर्देकर's picture

21 Feb 2014 - 3:02 pm | प्रमोद देर्देकर

खुप छान माहिती.

विटेकर's picture

21 Feb 2014 - 3:40 pm | विटेकर

अंगकोर वाट .. अप्रतिम !

लेखमाला सुंदर होईल अशी आस आहे.

( सध्या हिंदुत्वाला बरे दिवस येत आहेत काय?)

यशोधरा's picture

21 Feb 2014 - 4:10 pm | यशोधरा

वाचतेय.

प्रसाद प्रसाद's picture

21 Feb 2014 - 4:53 pm | प्रसाद प्रसाद

वा वा वा एक्काजी. अंगकोर वट आणि ख्मेर शासन याविषयी आता नक्कीच चांगले वाचायला मिळणार, लेखमालेचे जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया हे नाव आवडले. डिस्कव्हरीवर वगैरे यावरच्या सेरीज पाहिल्या आहेत पण हिंदू लोकांनी बांधलेली मंदिरे असे उल्लेख नाही म्हटलं तरी कमीच असतात.... अंगकोर वट एकदा तरी पाहायची इच्छा आहे, बघू कधी संधी येतीये ते.
लेखमालेला मनापासून शुभेच्छा.

मस्त सुरुवात . नविन सहल सुरु झाली चला लवकर .

( कालपासुन नेट गंडलय त्यामुळे मुवि नीं पहिली सिट बळकावली )

केदार-मिसळपाव's picture

21 Feb 2014 - 6:33 pm | केदार-मिसळपाव

सविस्तर आणि मस्त केली आहे, पु. भा. प्र.

वाचतीये. किती तो नरसंहार!

कुसुमावती's picture

21 Feb 2014 - 7:09 pm | कुसुमावती

Dimond Rush गेममूळे अंगकोर वट बद्दल कुतुहूल होते, आता त्याच्याबद्दल माहिती पण मिळेल.

विवेकपटाईत's picture

21 Feb 2014 - 8:23 pm | विवेकपटाईत

हिस्टरी चेनल वर कम्बोडियाचा इतिहास बघितला होता. आता पुन्हा हिस्टरी चेनल वर जगाच्या इतिहासाची मालिका सुरु होणार आहे. कदाचित पुन्हा बघायला मिळेल. अंगकोरवाट मध्य युगातील जगातील सर्वात मोठ शहर अर्थात १० लाख पेक्षा जास्त जनसंख्या होती. मानव निर्मित कालव्यांमुळे सभ्यता भरभराटीत आली आणि काही शतकानंतर तेच कालवे अंत: करता ही कारणीभूत ठरले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2014 - 2:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा, मन्द्या, अनिरुद्ध प, राघव८२, मधुरा देशपांडे, खटपट्या, आत्मशून्य, llपुण्याचे पेशवेll, सुहास झेले, शिद, सव्यसाची, भाते, बॅटमॅन, अत्रुप्त आत्मा, जयंत कुलकर्णी, आनन्दा, सुधीर कांदळकर, पिलीयन रायडर, प्रमोद देर्देकर, विटेकर, यशोधरा, प्रसाद प्रसाद, जेपी, केदार-मिसळपाव, रेवती, कुसुमावती आणि विवेकपटाईत :

आपल्या सर्वांचे सहलीत स्वागत आहे. ही सहल माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त रंजक, माहितीपूर्ण आणि आश्चर्यकारक झाली होती. त्यामुळे ती परत जगण्यात मलाच खूप आनंद मिळेल.

सुहास..'s picture

22 Feb 2014 - 7:38 pm | सुहास..

आवडले व्वा छान मस्त !!

पैसा's picture

23 Feb 2014 - 3:30 pm | पैसा

अतिशय माहितीपूर्ण लेख. पुढच्या लेखाची वाट बघत आहे!

सानिकास्वप्निल's picture

23 Feb 2014 - 4:00 pm | सानिकास्वप्निल

वाचायला मजा येणार आहे.
उत्तम माहिती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2014 - 8:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुहास.., पैसा आणि सानिकास्वप्निल : सहलीत स्वागत आहे !

कल्पक's picture

24 Feb 2014 - 1:54 am | कल्पक

खूपच माहितीपूर्ण लेख.

अर्धवटराव's picture

24 Feb 2014 - 11:24 am | अर्धवटराव

बरीच प्रतिक्षा झाली राव यंदा... पण झकास झाला हा भाग.

अवांतरः इतकं काय काय होत होतं कंबोडीया मधे.. आणि तिथल्या महत्वाच्या राजकारणात भारताचा साधा उल्लेख नाहि :( साला आपले पब्लीक तेच ते तामिलनाडु, महाराष्ट्र, गुजराथ, युपी आणि काश्मीरच्या पलिकडे जातच नाहि.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2014 - 1:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

कल्पक आणि अर्धवटराव : धन्यवाद !

@ अर्धवटराव : केवळ ख्मेर साम्राज्यच नव्हे तर, १२९३ ते १५०० या काळात जावाच्या महापहीत हिंदू-बौद्ध साम्राज्याने "आताचा मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, पूर्व टिमोर, ब्रुनेई, दक्षिण थायलंड आणि दक्षिण फिलिपाईन्स" इतका प्रदेश व्यापलेला होता.

या साम्राज्यात बांधल्या गेलेल्या जगप्रसिद्ध बोरोबुदूर स्तुपाचे नाव आपण इतिहासाच्या पुस्तकातून वाचले असेलच. त्या ११८ मीटर X ११८ मीटर आकाराच्या स्थापत्यशास्त्रातल्या आश्चर्याबद्दल अघिक माहिती इथे सापडेल.

 (जालावरून साभार)

वरचा फोटो पाहुन क्रिस्टलच्या श्री यंत्राची तुलना करावीशी वाटली.{म्हणजे मंडलाकॄती रचना पाहुन}
एकंदर तंत्र आणि यंत्र या प्रकारात मंडलाकॄती रचनेला विशेष महत्व आहे हे समजुन येत आहे.
अधिक इकडे :-
MANDALA
Sacred Geometry Mandala Art
Yantra
Mandalas & Sri Yantras

फिरंगी लोक या विषयात विशेष रस ठेवुन आहेत याच मला कौतुक वाटतं !

वेळ मिळताच संपूर्ण लेख शांतपणे वाचीन...

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2014 - 2:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा योगायोग नाही !

बोरोबुदूरच्या स्तूपाची रचना हेतूपुर्स्सर "तांत्रीक मंडल यंत्रा"वरच बेतलेली आहे !

.

(दोन्ही चित्रे जालावरून साभार)

अनन्न्या's picture

25 Feb 2014 - 5:34 pm | अनन्न्या

दुसरा भाग आधी पाहिला.