भेसूर रात्र (आणि आस्वाद)

लिखाळ's picture
लिखाळ in जे न देखे रवी...
30 Sep 2008 - 2:32 am

भेसूर रात्र (आणि आस्वाद)
काल अचानक मी
बसलो उठून रात्री
लक्षात आले मजला
अमावस्या ती सर्वपित्री

कुठलेच नव्हते आवाज
कुठलाच रव नाही
थरथरत्या फांद्या अन्
झाडाला झोप नाही

पिंपळावरील मुंजा
हसतो भेसूर तेव्हा
सळसळत्या पानांचा
उच्चार अस्फुट होई

भुंकती मध्येच तेव्हा
रस्त्यावरील कुत्री
ऐकण्यासाठी त्यांना
कानांची लक्तरे उरली ...

१. वरील कविता अक्षरगणवृत्तात आहे की मात्रावृत्तात की मुक्तछंदात यावर प्रकाश टाकावा ही विनंती.
२. कवितेचा नक्की आशय काय असे कुणी विचारल्यास आम्ही पानभर लिहायला तयार आहोत.
३. या कवितेत लपलेला सामाजिक आशय सापडला का? नसेल तर ही कविता वातावरणाचे वर्णन करणारी कलाकृती आहे असे समजावे.
४. पहिल्या कडव्यामध्ये 'बसलो उठून रात्री' या पेक्षा ' उठलो बसून रात्री' अशी रचना जास्त वैचित्र्य निर्माण करेल का?
५. कवीवर कुणा कवीचा प्रभाव आहे असे वाटते का?

आस्वाद
आमच्याच कवितेचे तिर्‍हाईतपणे समिक्षण करून (म्हणजे भलावण करुन) आम्ही तिचे गांभीर्य आणि सौंदर्य आपणापर्यंत पोहोचवतो. (तसेही कोण याचे समिक्षण करणार! म्हणून ते ही आम्हीच करतो आहोत. ;) )

ही कविता आम्हाला विशेषत्वाने आवडण्याचे कारण असे की कोणतेही अवजड शब्द न वापरता सहज तर्‍हेने कवीने केलेली ही रचना आहे. केवळ चार साध्या कडव्यांमध्ये कवी फार मोठी वातावरण निर्मिती करतो.
पहिल्या कडव्यातच दिसते की एक सामान्य स्थितीतला माणूस (की ज्याला अपरात्री वीज गेल्यामुळे उकाडा सहन न होऊन जाग येऊ शकते) अचानक झोपेतून जागा होतो. आणि त्याच्या मनावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा त्याला सर्वपित्री अमावस्येची आठवण करून देतो. कवी फार खुबीने 'अंधश्रद्धा' या विषयाला येथे स्पर्श करतो. आता तो सामान्य माणूस आपल्या भावनांचे प्रक्षेपण किती सहज तर्‍हेने खिडकीबाहेरील झाडावर करतो ते पहा. त्या झाडाला झोप नाही असे त्याला वाटते. कवीने किती सूक्ष्म तर्‍हेने मानवी स्वभावाचा अभ्यास केला आहे तेच येथे दिसते. मानवी मनाच्या या खेळामध्ये कवी आता अजूनच मजा आणतो. तो आता असे काही संकेतचिन्हं वापरतो की त्याने वातावरणाचे अजूनच पोषण होते. मुंजा या संकेताचा इतका प्रभावी वापर क्वचितच काव्यामध्ये सापडेल. त्याच्या जाणिवेने आणि हसण्याने खरेतर अंगावर शहारे येतील. पण इथे मात्र 'पानांची सळसळ' हा ध्वनीवाचक शब्द योजून कवी भलतीच कमाल करतो.
आता ध्वनीवाचक शब्दांनंतर येणारे 'कुत्र्याचे भुंकणे' इतके स्वाभाविक आणि कवितेच्या प्रवाहाशी निष्ठा दाखवणारे आहे की कवीचे या बाबतीतले कसब विशेषत्वाने कौतुकास पात्र ठरते. अश्या या भेसूर रात्रीच्या विचित्र परिस्थितीत तो अचानक 'कानांची लक्तरे' या तर्‍हेचा शब्दवापर करुन एका वेगळ्याच उंचीवर कवितेला नेऊन ठेवतो.
खरेतर या नंतर उषःकाल होईल, मनावरचे भीतिचे सावट दूर होईल या तर्‍हेच्या कडव्याची वाचक मनात अपेक्षा धरत असतो. मनावरचा ताण त्याला हलका करायचा असतो. पण कविता या वळणावरती सोडून देऊन तिचा प्रवाह खंडित न करता तिला वाचकाच्या मनामध्ये तसेच प्रवाहित ठेवण्यात कवी यशस्वी झाला आहे. ;)

--(कवी आणि आपल्याच कवितेचा समिक्षक) लिखाळ.

कवितामौजमजाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

धनंजय's picture

30 Sep 2008 - 3:12 am | धनंजय

समीक्षकाला नारळाच्या वड्या रेशनिंग करून दिल्यामुळे समीक्षकाने विशेषणे आणि साहित्यिक शब्द वापरण्यात कंजूषपणा केलेला दिसतो.

उदा :
> कारण असे की कोणतेही अवजड शब्द न वापरता सहज तर्‍हेने कवीने ...
कारण असे की कोणतेही बोजड-अवजड शब्द न वापरता सहज प्रासादिक तर्‍हेने कवीने...

> केवळ चार साध्या कडव्यांमध्ये कवी फार मोठी वातावरण निर्मिती करतो.
अवघ्या चार-चार ओळींच्या चार साध्या कडव्यांमध्ये कवी कौशल्याने फार मोठी वैश्विक वातावरण निर्मिती करतो.

वगैरे वगैरे. नारळाच्या वड्या पाठवल्यास आम्ही अशा रीतीने समीक्षण फुगवून देऊ. वड्या ओव्हरनाईट, किंवा एकदिवसीय कुरियरने पाठवाव्यात. फार दिवस लागले तर वड्या प्रवासात खंवट होतील, आणि बदल्यातला शब्दफुगवटाही.

शाल्मली's picture

30 Sep 2008 - 1:43 pm | शाल्मली

वड्या ओव्हरनाईट, किंवा एकदिवसीय कुरियरने पाठवाव्यात

दखल घेण्यात आली असून, लवकरात लवकर वड्या पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल. :)

--शाल्मली. :)

लिखाळ's picture

30 Sep 2008 - 7:26 pm | लिखाळ

हा हा हा.. प्रतिसाद मस्त !
शब्दफुगवटा हा एक शब्द सुचला .. आता नवी कविता पाडली तर उपयोग करीन.
--लिखाळ.

प्रियाली's picture

30 Sep 2008 - 3:27 am | प्रियाली

लिखाळपंत कविता कशीही असली तरी कवीने तिचा रसास्वाद करू नये. तेव्हा आपला रसास्वाद बाद! आता माझा रसास्वाद.

प्रेताचे मनोगत
(हे रसास्वादाचे शीर्षक... शीर्षकातील दुसर्‍या शब्दाने सर्व पितरे पृथ्वीतलावर अवतरली तर मी जबाबदार नाही)

कवी म्हटले की अफाट कल्पनाशक्तीचा, डोळे खोलवर गेलेला आणि नजर अंतराळात लावून दाढीचे खुंट खाजवत बसलेला माणूस नजरेसमोर उभा राहतो. मृत्यूनंतर जीवन या गोष्टीचे आकर्षण प्रत्येक मानवाला असतं, कविला तर ते सुप्त आकर्षण असणारच. कवितेच्या ओळी साध्या सहज असल्या तरी स्वत:चा चेहरा आरशात पाहिला तेव्हा कवीला या ओळी सुचल्या तर नसाव्यात अशा कोड्यात वाचक पडतो. तर हा रसास्वाद घेताना कविला काय म्हणायचे ते पाहू. कवी म्हणतो -

काल रात्री अचानक मला म्हणजे माझ्या प्रेताला जाग आली आणि (थडग्यात) मी उठून बसलो. नंतर लक्षात आले की सर्वपित्री अमावास्य होती. बघा! प्रेताला उठून बसायलाही मुहूर्त हवा.

दफनभूमीच ती, कुठलेही आवाज नाहीत, गडबड नाही वर्दळ नाही. झाडाच्या फांद्या मात्र थरथरत होत्या कारण झाड झोपले नव्हते. दफनभूमीतील झाड - त्यावर खवीस, हडळ, सटवी, मुंजा रात्रीचे जो काही धिंगाणा घालतात की फांद्या थरथरतील नाहीतर काय? आता हे जरा अध्याहृत लिहिल्यावर कवीला ही पार्श्वभूमी अधिक खुलवून सांगाविशी वाटते.

दफनभूमीतील हे झाड पिंपळाचं आहे. मुंजाचा निवास. मुंजाच्या सर्व अतृप्त इच्छाच जणू त्या भेसूर हास्यातून बाहेर येतात. परंतु भूतांना मुंजाच्या हास्याची भीती कसली हो! बघा कवी किती खुबीने ते सांगतो

पिंपळावरील मुंजा
हसतो भेसूर तेव्हा
सळसळत्या पानांचा
उच्चार अस्फुट होई

म्हणजे मुंजाच्या हास्याने जिवंत पानांची जी सळसळ होते ती मृतांना विचित्र वाटते आहे. आता यासारखाच आणखी विचित्र, नकोसा वाटणारा जिवंत स्वर कुत्र्याचा. तर कवी म्हणतो, दफनभूमीच्या बाजूने जाणारी कुत्री मध्येच भुंकतात तेव्हा ते ऐकण्यासाठी कानाची लक्तरे उरली आहेत. आता कधी काळी पुरलेल्या प्रेताच्या कानांची लक्तरेच झालेली असणार ना.

दफनभूमीतील चित्र डोळ्यासमोर उभी करणारी ही कविता कविने जिवंत असताना लिहिली की मृत झाल्यावर असा प्रश्न वाचकांना येथे पडल्यास अजिबात नवल नाही. कवीने कविता प्रकाशित करण्याचा मुहूर्तही बघा कसा योजला आहे. सर्वपित्री आणि हळू हळू हॅलोवीनला सुरूवात. ही कविता वाचकांच्या मनात बराच काळ रेंगाळत राहिल अशी खबरदारी कवीने घेतली आहे.

आता एकच उणीव एखाद्याला भासली तर सर्वपित्री अमावास्येचा पुरलेल्या प्रेताशी संबंध काय? तर याचे उत्तर अगदी सोपे आहे. कविंना सर्व माफ असते तेव्हा हे कवीचे पोएटिक लायसन्स आहे अशी आपल्या मनाची समजूत वाचकांनी करून घ्यावी.

मृदुला's picture

30 Sep 2008 - 4:30 am | मृदुला

रसग्रहण उत्तम झाले आहे.
गूढ वाटणारी कविता उलगडून दाखवल्याबद्दल धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

30 Sep 2008 - 7:06 am | विसोबा खेचर

आदरणीय भयालीदेवी,

आपलं परिक्षणही लै भारी... :)

प्रेताचे मनोगत
(हे रसास्वादाचे शीर्षक... शीर्षकातील दुसर्‍या शब्दाने सर्व पितरे पृथ्वीतलावर अवतरली तर मी जबाबदार नाही)

हम्म! आमच्या पहिल्या प्रेमाचं नांव घेतलंत? चला बरं झालं, आता आमच्या पिंडाला कावळा शिवेल... :)

आपला,
(मनोगतप्रेमी तृप्त आत्मा) तात्या.

लिखाळ's picture

30 Sep 2008 - 7:30 pm | लिखाळ

उत्तम.. मस्त रसग्रहण ! गूढ कवितेला (खरेतर भेसूर कवितेला) भयकविता केलीस :)
तसेही कवीने नक्की काय म्हटले आहे यापेक्षा उत्तम समिक्षक काय म्हणतो हेच जास्त महत्वाचे असते.

>>प्रेताचे मनोगत
(हे रसास्वादाचे शीर्षक... शीर्षकातील दुसर्‍या शब्दाने सर्व पितरे पृथ्वीतलावर अवतरली तर मी जबाबदार नाही)<<

हा हा हा.. हे तर फारच जोरात.

>>कवीने कविता प्रकाशित करण्याचा मुहूर्तही बघा कसा योजला आहे. <<
मुहुर्त योजला नाही. कवी अत्यंत प्रतिभावान असल्याने त्याला मुहुर्तावर चांगली कविता झाली :)

--लिखाळ.

विसोबा खेचर's picture

30 Sep 2008 - 7:00 am | विसोबा खेचर

लिखाळगुरुजी,

आपली कविता अन् तिचे समिक्षण लै म्हण्जे लैच भारी आहे बुवा! आपल्याला लै आवडले... :)

अजूनही येऊ द्यात अश्याच कविता समिक्षणासहीत! :)

आपला,
(पिंपळावरचा मुंजा) तात्या.

लिखाळ's picture

30 Sep 2008 - 7:34 pm | लिखाळ

प्रयत्न करीन :)
--लिखाळ.

प्राजु's picture

30 Sep 2008 - 7:49 am | प्राजु

लिखाळ राव,
आपली कविता तर एकदम भारी.. पण प्रियाली चं रसग्रहण तर अदगी भयाली हे नाव सार्थ करणारं आहे. एकदम फंडू...
कवितेच्या ओळी साध्या सहज असल्या तरी स्वत:चा चेहरा आरशात पाहिला तेव्हा कवीला या ओळी सुचल्या तर नसाव्यात अशा कोड्यात वाचक पडतो.

=)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

30 Sep 2008 - 8:12 am | झकासराव

प्रेताचे मनोगत
(हे रसास्वादाचे शीर्षक... शीर्षकातील दुसर्‍या शब्दाने सर्व पितरे पृथ्वीतलावर अवतरली तर मी जबाबदार नाही)>>>>>>>>>>>>>>
=)) =)) =)) जबराच.... :)
लिखाळ तुम्ही लिहिलेल रसग्रहणदेखील आवडल. वर धनंजय यांची टिप्पण्णी भारीच आहे. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सहज's picture

30 Sep 2008 - 9:04 am | सहज

साध्या व स्पष्ट कविता आपल्याला आवडतात.

लिखाळ व प्रियाली दोघांचे समिक्षण उच्च!

अवांतर - कोणी त्या तात्कालीक प्रेमाच्या दुहेरी गोफाचे समिक्षण करणार का?

नीधप's picture

30 Sep 2008 - 9:13 am | नीधप

>>अवांतर - कोणी त्या तात्कालीक प्रेमाच्या दुहेरी गोफाचे समिक्षण करणार का?<<
आपल्याला फारच त्रास झालेला दिसतो त्या कवितेचा. इतर सगळ्या कविता सोडून फक्त त्याच कवितेचे असे समिक्षण करण्याची मागणी करताय त्यावरून दिसतंच आहे.
एक विनंती. तुम्हाला जे काय म्हणायचंय ना ते तिथेच सरळ म्हणा ना. इतर ठिकाणी कशाला?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मुक्तसुनीत's picture

30 Sep 2008 - 10:09 am | मुक्तसुनीत

थोडे हलके घ्या. तुमची कविता उत्तमच होती ; परंतु म्हणून त्याबद्दल केवळ गंभीर राहूनच बोलायचे ही तुमची अपेक्षा थोडी अवाजवी आहे. इथे लोक काव्याच्या सौंदर्याबरोबरच इतरही बाजूंचा मुक्त आस्वाद घेतात. शुद्ध मराठीत सांगायचे तर ...लाईटन अप अ लिटील , यू विल अल्सो एन्जॉय द राईड :-)

नीधप's picture

30 Sep 2008 - 5:58 pm | नीधप

>>त्याबद्दल केवळ गंभीर राहूनच बोलायचे ही तुमची अपेक्षा <<
अशी मुळीच अपेक्षा नाही हो. शिव्या घाला, थट्टा करा पण इतरत्र करण्यापेक्षा तिथल्या तिथे करा.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अहो इथे बरेच कवी आहेत व वेळोवेळी मी काही जणांशी [उदा गोडबोले, धनंजय, प्रा. डॉ, फटू इ.] कवितेच्या मला न समजलेल्या भागाबद्दल चर्चा-थट्टा देखील केली आहे. तुमच्या कवितेचे नाव उदाहरण म्हणुन होते, फक्त तुमच्याच कवितेत इंटरेस्ट आहे असे नाही. शिवाय एकावेळी जास्त कविता मी हॅंडल नाही करु शकत म्हणुन दुसर्‍या कवितांचे उल्लेख आले नाही :-)

एनीहू एक विनंती कृपया जास्त गंभीर नका होउ. तसेच मी तुम्ही म्हणालात तिथे समिक्षण करावे ही विनंती करतो.

शक्य असल्यास कृपया तुमच्या कवितेचे समिक्षण करावे पण काही कारणाने शक्य नसल्यास हरकत नाही परंतु यावरुन जास्त गैरसमज व वाद नको.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2008 - 10:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळगुरूजी तुमची कविता भीषण सुंदर आहे; त्यावर तुमचे आणि भयालीदेवी यांचे समीक्षण आणि धनंजयरावांचे प्रतिसाद या कवितेला अगदी तीन पिंपळाच्या (कोण रे ते तीन-ताड उडण्याच्या गोष्टी करतंय?) उंचीला नेऊन ठेवतात.
कवीलोक, आपणही लिखाळगुरूजींकडून प्रेरणा घ्या, साध्या, सोप्या कविता लिहा आणि वर आमच्यासारख्या औरंगजेब लोकांसाठी त्याचं समीक्षणही लिहा.

अदिती

ऋषिकेश's picture

30 Sep 2008 - 10:21 am | ऋषिकेश

=)) =)) =)) =))

भयालीताई, लिखाळ आणि धनंजय तीघेही ग्रेट आहात

-( =)) ) ऋषिकेश

नंदन's picture

30 Sep 2008 - 1:07 pm | नंदन

ऋषिकेशशी सहमत आहे. लेख आणि दोघांच्या प्रतिक्रियाही मस्तच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

30 Sep 2008 - 10:22 am | ऋषिकेश

=)) =)) =)) =))

भयालीताई, लिखाळ आणि धनंजय तीघेही ग्रेट आहात

-( =)) ) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

30 Sep 2008 - 12:50 pm | स्वाती दिनेश

अरे काय रे हे? धमालच आहे की एकदम! धनंजय आणि प्रियालीचे प्रतिसादही उच्च!!
स्वाती

सुनील's picture

30 Sep 2008 - 1:01 pm | सुनील

खुद्द कवीचा आणि प्रियाली यांचा रसास्वाद तसेच धनंजय यांचा प्रतिसाद आवडला.

टीप - कवीने केलेली समीक्षा प्रत्यक्ष कवितेपेक्षाही सुंदर!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ's picture

30 Sep 2008 - 7:45 pm | लिखाळ

>>टीप - कवीने केलेली समीक्षा प्रत्यक्ष कवितेपेक्षाही सुंदर!<<
मुद्दामुनच साधी, वृत्तात फारशी न बसणारी कवीता करुन जड शब्द वापरुन समिक्षा करणे हाच डाव होता :)
नाहितर अशी कविता प्रकाशित करण्याचा मी कधीच धीर केला नसता.
--लिखाळ.

मनीषा's picture

30 Sep 2008 - 3:20 pm | मनीषा

(पण भय कविता लिहिण्याचे काम प्रियाली वर सोपवण्यात आले होते ना ? )
खूपच गूढ कविता --
पण अतिशय सुंदर परिक्षण.. त्यामुळे कळली.

विसुनाना's picture

30 Sep 2008 - 5:49 pm | विसुनाना

खूपच गूढ कविता --
पण अतिशय सुंदर (दोन-दोन) समिक्षणे.. त्यामुळे कळली.

(पण भय कविता लिहिण्याचे काम प्रियाली वर सोपवण्यात आले होते ना ? )
भयकवितेच्या समिक्षणाचे नव्हे...

विजुभाऊ's picture

30 Sep 2008 - 5:50 pm | विजुभाऊ

उठलो बसून रात्री'
घाम अंगात
आणि थंडी गात्री...
पुढचे जुळवालच
अगोदर चार शब्द एका ओळीत चिरुन परतावेत , अत्री ..मैत्री ..पित्री ..संत्री ..जंत्री ..वाजंत्री...यात्री ...मग हे शब्द त्यावर पिळुन घालावेत शेवटात घालावे आणि धाग्यात वाढावेत
(कलंत्री पण बसतय यमकात)

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

लिखाळ's picture

30 Sep 2008 - 7:47 pm | लिखाळ

वाढणी नंतर जड आणि न पचणार्‍या शब्दाम्चे काजू-बदाम समिक्षेतून पेरुन सजवावे. वाचक गार ! ;)
--लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2008 - 7:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता तुम्ही पण सर्किटराव आणि शाल्मलीताईंकडून प्रेरणा घेऊन एक भीषन सुंदर कविता आणि समीक्षणाची पाककृती लिहाच! ;-)

अदिती

लिखाळ's picture

30 Sep 2008 - 7:55 pm | लिखाळ

थोडी प्रतिभा उसनी मिळते का ते पाहायला पाहिजे. वृत्तात कविता करणे अवघडच. पूर्वी एक्दाच बहुधा जमले होते असे वाटते.
अवांतर : पिंपळावरची कोटी आणि इतरत्र असलेली 'अर्थात' आडाणी ही कोटी आवडली :)
--लिखाळ.

लिखाळ's picture

30 Sep 2008 - 7:52 pm | लिखाळ

सर्वांचे प्रतिसादाबद्दल आणि कविता आणि समिक्षेचा खराच आस्वाद घेतल्याबद्दल आभार.

अनेकदा कवीला काय म्हणायचे आहे हे वाचकाला कळतच नसते. कवी अनेकदा अगदी साधी वर्णनात्मक कवीता करतो आणि वाचक मात्र त्यात सामाजिक आशय, परिस्थिवरचे भाष्य, मानसशास्त्रीय टिप्पणी वगैरे शोधायचा प्रयत्न करतो. यावर छोटा विनोद करावा म्हणून हा प्रपंच. तसेच समिक्षा जशी जड शब्दात असते तसे जड न पचणारे शब्द वापरुन जरा मजा करावी म्हणुन वृत्त वगैरेचा विचार न करता (तसेही मला ते जमतच नाही) एक कविता पाडली आणि तिचा 'आस्वाद' घेतला :)

--लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2008 - 8:08 pm | बिपिन कार्यकर्ते

लिखाळ मास्तर, कविता वाचून घाम फुटला. प्रियालीने केलेले रसग्रहण तर अतीव भयानक. :) बंगालीमधे 'भीषण सुंदर' कशाला म्हणत असावेत ते कळले. एकाच वेळी भीषण आणि सुंदर दोन्हीही वाटते.

धनंजयनी केलेलं ब्लॅकमेल पण जबरा... वडी खवट तर शब्दही खवट....

बिपिन.

लिखाळ's picture

30 Sep 2008 - 8:19 pm | लिखाळ

'भीषण सुंदर'
हा हा हा .. हे फारच मस्त :)

--लिखाळ.
नारळाचा चव जेव्हडा घ्याल त्याच्या दुप्पट साखर घालावी तरच समिक्षक चांगले शब्द वापरतात. :)

चतुरंग's picture

30 Sep 2008 - 8:30 pm | चतुरंग

एवढावेळ थिजून गेल्याने तुमच्या 'भीषॉन शुंदर' कवितेबद्दल कळफलकातून शब्द उमटत नव्हते!
शेवटी ते विडंबनाच्या रुपात अवतरले.

भयालीताई आणि धनंजय यांचे प्रोतीषॉद (हे अगदी प्रतिशोध म्हटल्यासारखं वाटतं ना? ;) ) लाजवाब आहेत!

(खुद के साथ बातां : रंग्या, प्रतिसादाबद्दल नारळाच्या वड्या मिळत असल्या तर विडंबनाबद्दल निदान वड्यांचं विडंबन तरी मिळायला हवं! ;) आता करवंट्या येतात बघ तुला पार्सलमधून! :T )

चतुरंग

लिखाळ's picture

30 Sep 2008 - 8:34 pm | लिखाळ

विडंबन वाचतोच..
खरेतर कवितेला साहित्यामध्ये समिक्षेमुळे जो मान (प्रसिद्धी :) ) मिळतो तोच जालावर विडंबनामुळे. तुम्ही विडंबन करणार माहित असते तर साखर जास्त घातलेल्या वड्या तुम्हाला आधिच पाठवल्या असत्या. :)
--लिखाळ.

चतुरंग's picture

30 Sep 2008 - 8:40 pm | चतुरंग

नारळाच्या वड्यांसाठी आम्ही वाट बघायला तयार आहोत! :)

(खुद के साथ बातां : रंग्या, पत्ता विचारणारा व्यनि येईल बघ. नीट लक्ष ठेव, नाहीतर करशील वेंधळ्यासारखा डिलीट! :B )

चतुरंग

लिखाळ's picture

30 Sep 2008 - 8:47 pm | लिखाळ

वड्या न पाठवताच काम झाले असल्याने आता 'पत्ता विचारायला व्यनी केला होता .. तुम्हाला मिळाला नाही का? अश्चर्य आहे !' वगैरे प्रत्यक्ष भेटीत म्हटले म्हणजे झाले :)
--लिखाळ.

शाल्मली's picture

30 Sep 2008 - 8:50 pm | शाल्मली

चतुरंग,

पत्ता विचारणारा व्य. नि. पाठवला आहे. वड्या पाठवण्यात येतील. :)

विशेष सूचना :- आमचे येथे ऑर्डर प्रमाणे नारळाच्या वड्या करून मिळतील.
वड्या घरपोच पाठवण्यासाठी वेगळा चार्ज आकारण्यात येईल
. ;)

-- (ऑर्डरसाठी नोंदवही घेऊन बसलेली) शाल्मली.

लिखाळ's picture

30 Sep 2008 - 8:52 pm | लिखाळ

वड्या घरपोच पाठवण्यासाठी वेगळा चार्ज आकारण्यात येईल.
अरे हे मला कसे नाही सुचले ! मराठी माणूस व्यवसायात मागे का ? अशी नवी चर्चा चालू करावी म्हणतो..किंवा एखादा कौल तरी :)
--लिखाळ.

मुक्तसुनीत's picture

30 Sep 2008 - 8:40 pm | मुक्तसुनीत

भीषण टाईमपास ! ;-) मूळ लिखाण व प्रतिसाद वाचून मजा आली. लगे रहो !

भडकमकर मास्तर's picture

30 Sep 2008 - 11:24 pm | भडकमकर मास्तर

मस्त मजा आली...
झकास समीक्षण...
अंधश्रद्धेचा पगडा ,भावनांचे प्रक्षेपण ,वातावरणाचे पोषण,प्रवाहाशी निष्ठा,.मुंजा हा संकेत...
अगायायायाया.... =)) =)) ______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सर्किट's picture

1 Oct 2008 - 12:02 pm | सर्किट (not verified)

स्वतःच्या कवितेच्या कवीनेच केलेल्या समीक्षेशी अम्ही असहमत आहोत.

आमच्यामते, ही कविता म्हणजे ७०० बिलियन डॉलरच्या बेलाऊट विषयीची भीषण सामाजिक रतिक्रिया आहे. (अर्र.. प्रतिक्रिया आहे.)

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मेघना भुस्कुटे's picture

1 Oct 2008 - 12:44 pm | मेघना भुस्कुटे

सामाजिक रतिक्रिया आहे. (अर्र.. प्रतिक्रिया आहे.)

=))
=))
=))
लोकांची प्रतिभा मोकाट सुटलीय..

विशाल कुलकर्णी's picture

18 Jun 2009 - 9:57 am | विशाल कुलकर्णी

लिखाळरावांची कविता आणि भयालीताईंचे रसग्रहण जणु वारूणी चखणा (दुग्ध शर्करा च्या धर्तीवर)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223

पैसा's picture

6 Oct 2010 - 10:50 pm | पैसा

सर्वपित्रीनिमित्त कावळ्याचं चित्र पाहताच या भीषण सुंदर कवितेची आठवण झाली.
आता कावळा हा आपला राष्ट्रीय पक्षी करावा काय?

आणि त्याच्या मनावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा त्याला सर्वपित्री अमावस्येची आठवण करून देतो. कवी फार खुबीने 'अंधश्रद्धा' या विषयाला येथे स्पर्श करतो.

लिखाळसाहेबांचे मत वाचायला आवडेल!

प्रियाली's picture

6 Oct 2010 - 10:57 pm | प्रियाली

हा जुना धागा पुन्हा वाचायला मज्जा आली. ;)

पैसा's picture

6 Oct 2010 - 11:00 pm | पैसा

त्यावरचं तुमचं परीक्षण पण लै डेंजर आहे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2010 - 11:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणूनच वर काढण्याची सुपारी दिली!

(क्रेडीटप्रेमी) अदिती

पैसा's picture

6 Oct 2010 - 11:08 pm | पैसा

पण कावळा हा सगळीकडे असतो, तेव्हा त्याला राष्ट्रीय पक्षी करावा काय?

(आपल्या सुपारीची नोंद घेतेलेली आहे) भविष्यकाळातील धाग्यांसाठी

(डेबिट आणि क्रेडिट प्रेमी)

चतुरंग's picture

6 Oct 2010 - 11:08 pm | चतुरंग

लै दिसांनी पुन्हा वाचून मज्जाच मज्जा वाटली! ;)

(आम्ही ह्या कवितेचेही पॉलिशिंग केलेले आहे हे आठवले! ;) )

(भेसूर विडंबक)रंगा

पैसा's picture

6 Oct 2010 - 11:12 pm | पैसा

"भीषण" कवितेचे "भेसूर" विडंबण! ;)

प्रियाली's picture

6 Oct 2010 - 11:14 pm | प्रियाली

एकंदरीतच ऑक्टोबरचा महिना आमचा लाडका आहे. भेसूर कविता आणि विडंबन काय, सर्वपित्री काय, हॅलोवीन काय..चंगळ आहे. ;)

अजून भुते खेते येऊ द्या.

बेसनलाडू's picture

6 Oct 2010 - 11:17 pm | बेसनलाडू

अजून भुते खेते येऊ द्या.
आयला हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे का? हा ड्वायलाक तुम्ही मारायचा का आम्ही तुम्हांला सुनवायचा? ;)
(कोतवाल)बेसनलाडू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2010 - 11:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भुतांचं विडंबन कसं करता येईल?

प्रियाली's picture

6 Oct 2010 - 11:21 pm | प्रियाली

सध्या आमची अवस्था "हेडलेस" (डोके गहाण ठेवलेली, कामात गुंतलेली) असल्याने दुसर्‍यांना आवाहन (आव्हान नाही) करत आहे. :(

(धडधडीत) प्रियाली ;)

राजेश घासकडवी's picture

7 Oct 2010 - 12:23 am | राजेश घासकडवी

स्वतःच कविता करून स्वतःच रसग्रहण टाकण्याच्या हीन प्रवृत्तीचा निषेध. खुलासा - यात स्वतःची लाल करण्याच्या हेतूचा अजिबात निषेध नाही. जरूर करावी. माझा विरोध आहे तो समीक्षा करून आपलं पांडित्य मिरवू देण्याच्या (म्हणजे आपली लाल करण्याच्या) समीक्षकांच्या हक्कावर गदा आणण्याच्या नीच प्रयत्नाला आहे.

समीक्षणाचा प्रयत्न कसा फोल गेलेला आहे ते धनंजय यांनी दाखवलंच. प्रियालींनी एक वेगळाच पैलू दाखवून दिला. लिखाळराव, तुमचं गृहितकच चुकलं आहे. कवीचा अर्थ लोकांना समजत नाही म्हणे! व तो लोकांना कवीने दाखवून द्यायचा. हा! अहो, कवीला काय कळतं?

(ते नारळाच्या वड्यांचं जमलं तर आम्ही 'समीक्षणाचा प्रयत्न फोल असला तरी उडी केवढी मोठी होती' असं लिहून काळ्या-निळ्यातली निळी शेड काढून ती अधिक लालचुटुक करण्याचा प्रयत्न करू)