मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भेसूर रात्र (आणि आस्वाद)

लिखाळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
भेसूर रात्र (आणि आस्वाद) काल अचानक मी बसलो उठून रात्री लक्षात आले मजला अमावस्या ती सर्वपित्री कुठलेच नव्हते आवाज कुठलाच रव नाही थरथरत्या फांद्या अन् झाडाला झोप नाही पिंपळावरील मुंजा हसतो भेसूर तेव्हा सळसळत्या पानांचा उच्चार अस्फुट होई भुंकती मध्येच तेव्हा रस्त्यावरील कुत्री ऐकण्यासाठी त्यांना कानांची लक्तरे उरली ... १. वरील कविता अक्षरगणवृत्तात आहे की मात्रावृत्तात की मुक्तछंदात यावर प्रकाश टाकावा ही विनंती. २. कवितेचा नक्की आशय काय असे कुणी विचारल्यास आम्ही पानभर लिहायला तयार आहोत. ३. या कवितेत लपलेला सामाजिक आशय सापडला का? नसेल तर ही कविता वातावरणाचे वर्णन करणारी कलाकृती आहे असे समजावे. ४. पहिल्या कडव्यामध्ये 'बसलो उठून रात्री' या पेक्षा ' उठलो बसून रात्री' अशी रचना जास्त वैचित्र्य निर्माण करेल का? ५. कवीवर कुणा कवीचा प्रभाव आहे असे वाटते का? आस्वाद आमच्याच कवितेचे तिर्‍हाईतपणे समिक्षण करून (म्हणजे भलावण करुन) आम्ही तिचे गांभीर्य आणि सौंदर्य आपणापर्यंत पोहोचवतो. (तसेही कोण याचे समिक्षण करणार! म्हणून ते ही आम्हीच करतो आहोत. ;) ) ही कविता आम्हाला विशेषत्वाने आवडण्याचे कारण असे की कोणतेही अवजड शब्द न वापरता सहज तर्‍हेने कवीने केलेली ही रचना आहे. केवळ चार साध्या कडव्यांमध्ये कवी फार मोठी वातावरण निर्मिती करतो. पहिल्या कडव्यातच दिसते की एक सामान्य स्थितीतला माणूस (की ज्याला अपरात्री वीज गेल्यामुळे उकाडा सहन न होऊन जाग येऊ शकते) अचानक झोपेतून जागा होतो. आणि त्याच्या मनावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा त्याला सर्वपित्री अमावस्येची आठवण करून देतो. कवी फार खुबीने 'अंधश्रद्धा' या विषयाला येथे स्पर्श करतो. आता तो सामान्य माणूस आपल्या भावनांचे प्रक्षेपण किती सहज तर्‍हेने खिडकीबाहेरील झाडावर करतो ते पहा. त्या झाडाला झोप नाही असे त्याला वाटते. कवीने किती सूक्ष्म तर्‍हेने मानवी स्वभावाचा अभ्यास केला आहे तेच येथे दिसते. मानवी मनाच्या या खेळामध्ये कवी आता अजूनच मजा आणतो. तो आता असे काही संकेतचिन्हं वापरतो की त्याने वातावरणाचे अजूनच पोषण होते. मुंजा या संकेताचा इतका प्रभावी वापर क्वचितच काव्यामध्ये सापडेल. त्याच्या जाणिवेने आणि हसण्याने खरेतर अंगावर शहारे येतील. पण इथे मात्र 'पानांची सळसळ' हा ध्वनीवाचक शब्द योजून कवी भलतीच कमाल करतो. आता ध्वनीवाचक शब्दांनंतर येणारे 'कुत्र्याचे भुंकणे' इतके स्वाभाविक आणि कवितेच्या प्रवाहाशी निष्ठा दाखवणारे आहे की कवीचे या बाबतीतले कसब विशेषत्वाने कौतुकास पात्र ठरते. अश्या या भेसूर रात्रीच्या विचित्र परिस्थितीत तो अचानक 'कानांची लक्तरे' या तर्‍हेचा शब्दवापर करुन एका वेगळ्याच उंचीवर कवितेला नेऊन ठेवतो. खरेतर या नंतर उषःकाल होईल, मनावरचे भीतिचे सावट दूर होईल या तर्‍हेच्या कडव्याची वाचक मनात अपेक्षा धरत असतो. मनावरचा ताण त्याला हलका करायचा असतो. पण कविता या वळणावरती सोडून देऊन तिचा प्रवाह खंडित न करता तिला वाचकाच्या मनामध्ये तसेच प्रवाहित ठेवण्यात कवी यशस्वी झाला आहे. ;) --(कवी आणि आपल्याच कवितेचा समिक्षक) लिखाळ.

वाचन 19580 प्रतिक्रिया 0