पावन

निओ's picture
निओ in जनातलं, मनातलं
29 Sep 2016 - 12:32 am

पहाट झाली होती. आभाळ सर्वदूर व्यापून होते. रप् रप् पाऊस झाडा झुडुपात, चिखलात वाजत होता. घोडखिंडीतील पाणी आता लाल होऊन वाहत होतं. वरनं पावसानं आणि खालनं मावळ्यांनी घोडखिंडीत झुंबड उडवली होती.
तलवारींच्या खण् खणाटांनी आणि आरोळ्यांनी खिंड दणाणून गेली होती. हबशी सिद्दी मसूद आणि त्याची रानटी फौज पुढे घुसायचा प्रयत्न करीत होती. बांदलसेना हर प्रकारे तो हाणून पाडत होती.

मराठयांच्या राजाचा जीव धोक्यात होता. तो वाचवण्यासाठी मावळे पराक्रमाची शर्थ करत होते तर आपल्या सरदाराची अब्रू वाचवण्यासाठी मसूदची फौज झगडत होती. हिरडस मावळातील बांदलसेना जीवावर उदार होऊन लढत होती. मावळ्यांच्या लहानश्या सेनेचे नेतृत्व पन्नाशी गाठायला आलेल्या बाजीप्रभूंकडे होते. जोडीला बाजींचे बंधू फुलाजी होते. मावळ्यांनी मसूदच्या फौजेचा पहिला धडाका सफाईने कापून काढला. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीचीही तीच गत केली.

पळणारा शत्रू दिसला की पाठलागावर असलेल्या सैन्याला अनायासे बळ चढते. असल्या अवसानातच मसूदची फौज मावळ्यांवर चालून आली. जेव्हा पहिल्या दोन तीन फळ्या कापल्या गेल्या तेव्हा जरा ताळ्यावर आली. इतकावेळ पळत असलेल्या मावळ्यांचा आताचा पवित्रा काही वेगळाच आहे हे सिद्दी मसूदच्या लक्षात येऊ लागलं.

रात्रभर पळून दमलेल्या, तीनशे मावळ्यांनी दोन हजार घोडेस्वारांची फौज खिंडीत रोखून धरली होती. घोडखिंडीच्या चिंचोळ्या जागेत रणकंदन चालले होते. मावळ्यांच्या तिखट जाळापुढे मसूदची फौज कापली जात होती. खिंडीच्या कातळावर चढून कडेने सटकू पाहणारा दुश्मन दगडाच्या टिपिरीत पाडला जात होता. समोरासमोर भिडू पाहणाऱ्याचा थोड्याच वेळात निकाल लावला जात होता.

मसूदला हे मावळे संपवून शिवाजीला धरायची घाई झाली होती. पण रात्रीपासून त्याच्या मनासारखे काहीच घडत नव्हते. अफझल खानाला मारणारा, आदिलशाही फौजेचा तीनवेळा पराभव करणारा शिवाजी त्याच्यापासून काही अंतरावर होता. तोकड्या शिबंदीनिशी पळून जाणारा शिवाजी हि सोपी शिकार होती. विजापूर दरबारात मिरवायचा नामी मौका होता. फौजेत चेव आणण्याचा तो हर एक प्रयत्न करत होता. एक प्रहर उलटून गेला तरी त्याला यश मिळण्याची चिन्हे दिसत नव्हती. मावळ्यांच्या भयंकर आवेशापुढे तो चरफडत होता. भयंकर कापाकापी चालली होती. आदिलशाही फौजेला इंचभर पुढे सरकता आले नव्हते.

हर हर महादेव करत, मावळे गनिमाचा हल्ला परतवत होते. बाजींच्या बांदल सेनेतला एक एक मावळा लाख मोलाचा होता. पन्हाळगडावर निवडलेले खासे मर्द गडी होते. त्यांना, तोफेचा आवाज येईपर्यंत प्राण सोडण्याची बाजींची मनाई होती. मावळ्यांच्या अंगात सैतान शिरला होता. पाय रोवून उभे राहायचे आणि समोरचा माणूस कापायचा एवढंच त्यांना त्या क्षणी कळत होते. बाजींची धिप्पाड मूर्ती तांडव करत होती. तलवारी ठिणग्या उडवीत होत्या. त्यांच्या तडाख्यात सापडेल त्याच्या चिंधड्या उडत होत्या. कोणाचे हात उडवले जात होते तर कोणाची गर्दन मारली जात होती. कोणाच्या पोटातून तलवार आरपार होत होती. पूर्ण ताकदीने फिरणाऱ्या बाजींच्या तलवारींपुढे शत्रू दोन पावले मागे सरकत होता.

मसूदच्या तुकडीला मावळ्यांनी मराठ्यांचे अस्सल पाणी पाजले होते. घोडखिंडीच्या चिंचोळ्या जागेने त्यांना अमूल्य अशी मदत केली होती. खिंडीतून एकावेळी मोजकीच माणसे जाऊ शकत होती. शत्रूला सर्व मावळ्यांना घेरता येत नव्हते. काळ वेळ पाहून बाजींनी मुद्दामच घोडखिंड निवडली होती. मावळे आळीपाळीने पुढच्या तोंडावर लढत होते. आजूबाजूला वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यावर हुश्शार होत होते.

मसूद अपमान, राग, हतबलता असं एकाच वेळी अनुभवत होता. मावळ्यांच्या भुताटकीसमोर चक्रावून गेला होता. दीड प्रहर टळला तरी त्याला अजून पुढे सरकता आले नव्हते. ओरडून ओरडून त्याचा घसा कोरडा पडला होता. पडणारा एक एक मावळा त्याच्या आशा पल्लवित करत होता. मावळ्यांची हि चिमूटभर फौज त्याच्या तोंडचा घास काढून घेत असल्यासारखे वाटू लागले. अजून इथे वेळ दवडला तर शिवाजी हाती लागणार नाही, हे आता त्याला जाणवू लागले.

दिवस रात्र, साडेचार महिन्यांच्या कडक पहाऱ्यातून शिवाजी उंदरासारखा निसटला होता. शिवाजीला धरायला त्याचे हात शिवशिवत होते. शिवा न्हाव्याने केलेल्या फजितीची व सासर्याने केलेल्या पाणउताऱ्याची आठवण जखमेवर मीठ चोळत होती. एवढ्याशा पळपुट्या मावळ्यांचा क्षणात फडशा पाडून, शिवाजीच्या मुसक्या आवळून, घेऊन जायची त्याला घाई झाली होती. रात्रभर पडत्या पावसात रपेट मारून इथवर पोचला होता. शेवटच्या टप्प्यात समोर उभा ठाकलेला गंजा बम्मन त्याला झीट आणत होता. त्याच्या पुढे सर्व उपाय कुचकामी ठरत होते.
.
.
.
दोन प्रहर झाले. आदिलशाही फौज टप्या टप्याने चढाई करत होती. मावळे आता थकले होते. पन्हाळगडापासून पंधरा कोस रात्रीच्या अंधारामध्ये, थंडी, वारा, पाऊस सोसत, काट्या- कुट्यातून, चिखलातून पळत आले होते. पहाटे पासून लढून लढून दमले होते. अंगावरच्या असंख्य जखमांनी शरीरातले त्राण संपत चालले होते. लढाईच्या सुरुवातीपासूनच त्यांना शेवट माहित होता. महाराज गडावर पोहचेपर्यंत खिंडीच्या पुढे शत्रूला सोडायचे नाही एवढंच त्यांचे ध्येय होते. महाराजांनी कसलं खतपाणी घातलं होतं कि बाभळीच्या झाडासारखी ही चिवट, राकट माणसे हटायला तयार नव्हती. मरण समोर दिसत असून वाकायला तयार नव्हती.

अजून काही काळ गेला. फुलाजी पडले. खिंडीत प्रेतांचा खच पडला. पायाखाली येणारी प्रेतं चिखलात रुतत होती. बरेच मावळे कामी आले. मावळ्यांनी अजूनही या विषम लढाईत हार मानली नव्हती. उरलेले अजूनही जागा सोडावयास तयार नव्हते. बाजी लढतच होते. मसूदच्या संख्याबळापुढे मराठ्यांचे अतिरेकी शौर्य कमी पडत चालले होते.

त्या हातघाईत, बंदुकीची गोळी बाजींच्या वर्मी बसली. बाजी कोसळले. दोघांनी उचलून बाजींना मागे आणले. गोळी लागली तरी आपल्या वज्रमुठीतून सहज प्राण सोडतील ते बाजी कसले! जणू यमदूतालाच त्यांनी इच्छापूर्ती होईपर्यंत ताटकळत बसवले. राजांचा इशारा येण्याआधी आपण पडलो याचे बाजींना वाईट वाटले. राजांना सुखरूप पोहचवण्याची त्यांनी शपथ घेतली होती. तिचे स्मरण होताच ते आवेशाने ओरडले.
खबरदार कुनाला फुडं सोडाल तर! तुमचा-आमचा बाप अजून गडावर पोचायचा हाय.
मराठ्यांच्या दौलतीचा सवाल हाय…. मारा, तोडा, कापा!

त्या अवस्थेतील त्यांच्या शब्दांनी मावळे उरल्या सुरल्या शक्तीने तुटून पडले. बाजींचे उर अजूनही धपापत होते. मावळ्यांनी त्यांना पाणी पाजले. शरीरावर जखमांची जाळी झाली होती. एक पाठ सोडली तर शरीरावर नव्या जखमेसाठी जागा नव्हती. रात्रभर चालून चिखलाने राड झालेले कपडे आता रक्ताने लाल झाले होते. अंगावरची बाराबंदी ठिकठिकाणी फाटली होती. इतर मावळ्यांचीही तीच अवस्था झाली होती. शत्रूवर विजेसारख्या कोसळणाऱ्या, रक्ताने निथळणाऱ्या बाजींच्या तलवारी आता बापुडवाण्या होऊन जमिनीवर पडल्या होत्या. शेवटची एकच इच्छा बाकी होती त्यासाठी सारे पंचप्राण कानात गोळा झाले होते.

दिवस आता कलायला लागला होता. बाजी पडल्याचे पाहताच मसूदला पुन्हा हुरूप आला. एवढं करूनही आता शिवाजी सापडेलच ही शंका डसत होती. पण इतक्या वेळ झालेल्या कोंडीतून वाट मिळायची शक्यता निर्माण झाली होती. त्याच्या फौजेने आता निकराचा हल्ला चढविला.

इतक्यात ……….शस्त्रांच्या खणखणाटाला, तोफेचा धाड धुडूम आवाज व्यापून उरला. दुसरा, तिसरा बार उडाला. अविश्रांत लढणारी बांदल सेना भानावर आली. बाजींनी समाधानाने प्राण सोडले. तोफेचा आवाज ऐकताच, जमेल त्या बाजूने, मिळेल त्या सांदी कोपऱ्यातून, मूठभर, उरले-सुरले मावळे मागच्या मागे पसार झाले. जखमी, जायबंदी, बेशुद्ध जे खिंडीत उरले ते मारले गेले.

मसूदच्या मार्गातला मोठा अडसर दूर झाला. लाक्षणिक विजय मिळूनही मसूदला त्यातला फोलपणा कळत होता. शिवाजीचं त्याला अजून नखही दिसले नव्हते. राहिलेली फौज एकत्र करून तो विशाळगडाच्या दिशेने दौडत सुटला. खिंडीत, मागे राहिली ती मावळ्यांची आणि त्याच्या तिपटी चौपटीने मारले गेलेल्या आदिलशाही फौजेची कलेवरं नी रक्ताचे वाहणारे पाट. घोडखिंड पुन्हा मुकी झाली होती.

मसूदचे खिंडीतले यश, यश नव्हतेच मुळी. मराठ्यांच्या युक्तीचा, धन्याशी असलेल्या इमानाचा, धैर्याचा, शौर्याचा विजय होता तो. मरणाला कवटाळुनही मावळे जिंकले होते. आपल्या पराक्रमाने इतिहासात अमर झाले होते.
लाख माणसांचा जीव त्यांनी पार पोचवला होता.
.
.
.
राजांनी बाजींच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. मुलाला स्वराज्याच्या सेवेत घेतले. लढाईतील शौर्याबद्दल दरबाराचे मानाचे पहिले पान बांदलांना दिले. घोडखिंडीचे पावनखिंड असे सार्थ नामकरण केले.
बाजीप्रभू व मावळ्यांचा पराक्रम अजरामर झाला.
**********************************************************************************************************************
शिवाजीराजांच्या अतुलनीय चरित्रात, आपल्या बलिदानाने सोन्याचे पान लिहीणार्या मावळ्यांना हि छोटीशी श्रद्धांजली.

इतिहासकथासमाजविचारसद्भावनालेख

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

29 Sep 2016 - 1:52 am | नेत्रेश

इतिहास डो़ळ्यासमोर उभा केलात.

स्रुजा's picture

29 Sep 2016 - 2:07 am | स्रुजा

वाह ! अगदी समोर उभं केलंत.

सचु कुळकर्णी's picture

29 Sep 2016 - 2:17 am | सचु कुळकर्णी

"लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे"

नाखु's picture

29 Sep 2016 - 11:44 am | नाखु

थरारक आणि प्र्त्ययदर्शी लिखाण

रेवती's picture

29 Sep 2016 - 2:31 am | रेवती

छान लिहिलय.

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 11:51 am | टवाळ कार्टा

खत्रा लिहिलयं, चायला असे लिहिणार असाल तर मी माझे धागे उडवायला सांगून मिपाची सर्व्हर स्पेस मोकळी करून देईन
कुठे ते मराठे आणि कुठे आजचे मराठे...नाव खराब करतात मावळ्यांचे

भीमराव's picture

29 Sep 2016 - 11:53 am | भीमराव

खुपच छान.
बानगुडे सरांच्या शैलीमधे वाचले, खरोखर थरार जाणवला.

पैसा's picture

29 Sep 2016 - 2:33 pm | पैसा

बाजीप्रभूंचे नाव घशात आवंढा दाटल्याशिवाय येतच नाही. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या पुस्तकातले ते चित्र "स्वातंत्र्याच्या सूर्या, आता तरी प्रसन्न हो" आठवले.

अगदी आम्हाला पार पावनखिंडीत नेउन पोचवलेत राव. मस्त. अजुन येउ द्या.

यशोधरा's picture

29 Sep 2016 - 3:02 pm | यशोधरा

सुरेख!

जव्हेरगंज's picture

29 Sep 2016 - 6:29 pm | जव्हेरगंज

थरारक लिहीलंय.
अगदी खणखणीत !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2016 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रत्ययदर्शी लेखन ! अजून लिहा. वाचायला आवडेल.

पद्मावति's picture

29 Sep 2016 - 6:44 pm | पद्मावति

सुरेख लेखन!

भम्पक's picture

29 Sep 2016 - 6:45 pm | भम्पक

अर्रर्रर्रर्रर्र निओभाऊ लिहिता कि मराठी वेवस्तीत .....मंग का म्हणून छळ केला गरीबाचा मागं....हां

अभ्या..'s picture

29 Sep 2016 - 6:46 pm | अभ्या..

हाण तेच्या मारी.
बावनकशी हो. अस्सलच.
ते राजे, ते बाजी आन ते मावळे. चोख सोन्याचे.

रातराणी's picture

29 Sep 2016 - 10:25 pm | रातराणी

काटा आला वाचताना!

नीलमोहर's picture

29 Sep 2016 - 10:50 pm | नीलमोहर

संपूर्ण प्रसंग डोळ्यांसमोर घडतांना दिसला, जीवावर उदार होऊन लढणारे बाजी, वीर मावळे, पावन झालेली खिंडही,

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 11:36 pm | संदीप डांगे

कडक!!! _/\_

अमितदादा's picture

30 Sep 2016 - 12:25 am | अमितदादा

अहा सुंदर...लिहीत रहा. लेख वाचून शाळेतील इतिहासाच्या एका शिक्षकाची आठवण झाली. तेही असेच त्वेषाने इतिहास सांगत, घोषणा देऊन वर्ग दणाणून सोडत. मुलांच्या अंगावर रोमांच उभा राही, हातातील पेन सुद्धा तलवार वाटे. तुमचा लेख वाचून तसेच रोमांच उभे राहिले, शेवटी एवढच म्हणेन काय तो काळ, काय ती माणसे, आणि काय तो राजा.....

मनिमौ's picture

30 Sep 2016 - 6:43 am | मनिमौ

छान. बाजी दांडपट्टा हातात घेऊन बेभान लढतात हे दृश्य समोर ऊभ राहिल.

अभिजीत अवलिया's picture

30 Sep 2016 - 7:01 am | अभिजीत अवलिया

खणखणीत !!!

संजय पाटिल's picture

30 Sep 2016 - 1:24 pm | संजय पाटिल

भारी लिहिलय राव..
लिहा अजुन असेच..

सिरुसेरि's picture

30 Sep 2016 - 2:30 pm | सिरुसेरि

शौर्याला सलाम .

निओ's picture

11 Oct 2016 - 12:48 am | निओ

प्रतिसादाबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. 300 च्या धर्तीवर पावनखिंडीतील लढाई वरही कोणीतरी चित्रपट काढावा.

अभ्या..'s picture

11 Oct 2016 - 12:47 pm | अभ्या..

८० टक्के झालेला. थ्रीडी अ‍ॅनिमेटेड होता. अल्टीमेट काम झालेले. मी स्वतः ड्रॉइंग्ज आणि कॅरेक्टर्स पाह्यलेत थ्रीडीचे. प्रोमोही आलेला. माझ्या बर्‍याच मित्रांनी ह्यावर काम केलेले आहे.
अपुर्‍या फायनान्समुळे बंद पडला प्रोजेक्ट. :(

निओ's picture

14 Oct 2016 - 3:07 pm | निओ

व्हायला हवा होता पूर्ण. एक चांगली कलाकृती लोकांसमोर आली असती.

रुपी's picture

13 Oct 2016 - 12:25 am | रुपी

वा! भारी लिहिलं आहे.

वरुण मोहिते's picture

13 Oct 2016 - 1:15 am | वरुण मोहिते

डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं

सही रे सई's picture

13 Oct 2016 - 2:16 am | सही रे सई

फार सुंदर लिहिल आहे. हा प्रसंगच साक्ष आहे की महाराजांची एक एक माणसं म्हणजे हजारोंची सेना होती.

त्यानिमित्ताने हे गाणं आणि आफळेबुवांच हे किर्तन आठवलं.

सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतरज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजे तो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशिल का आता घरी

निओ's picture

14 Oct 2016 - 3:05 pm | निओ

कीर्तन आवडले. संगीताची सोबत व रंगवून सांगण्याची हातोटी त्यामुळे ऐकताना भरून येते.

फेरफटका's picture

13 Oct 2016 - 3:19 am | फेरफटका

अविश्वसनीय माणसं, अतुल्य शौर्य, शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन आणी त्यातून निपजलेली पराकोटीची निष्ठा ह्याचा कळस आहे.

मुक्तछन्द's picture

13 Oct 2016 - 4:57 am | मुक्तछन्द

अप्रतिम ले़़खन !
मराठी ३०० !

लाल गेंडा's picture

3 Oct 2017 - 8:57 am | लाल गेंडा

वाह छान !
__/\__