बादलीयुद्ध १०

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
21 Aug 2016 - 3:09 pm

काळवंडून गेलेल्या आभाळात नुसत्याच विजा चमकत असतील तर ते एक मनोहरी दृष्य असते. आता पाऊस येणार. लगेच पडणार. मात्र तसं काही होत नाही. आभाळात पाऊस दबून बसतो. भक्ष्याच्या प्रतिक्षेत. विजा कडाडतात. भर संध्याकाळी अंधारुन येतं. वारासुद्धा पिसाळलेल्या डुकरासारखा सैरभैर.
टेकडीपासून डाव्या बाजूला, उतारावर वाळलेल्या वाहत्या गवतात वसलाय एक वाडा. जीर्ण. युगे लोटली. पण वाडा चिरेबंदी. त्याला वाडा म्हणावं किल्ला हा ही एक प्रश्न आहे. उसवलेल्या छतातला एक पत्रा वाऱ्यावर डुलतो आहे. त्याचा भयानक चिरका आवाज आसमंतात घुमतो आहे. मी झपाझप पाऊले टाकत वाड्यावर जातो आहे.

गेटवरुन जाण्यापेक्षा मी कुंपणावरुनच उडी टाकली. अंधारातला वाडा अगदीच बावचळून गेलेला. याचीतर कौलंसुद्धा भुरटी झाली होती.
मधल्या पडवीत आलो. मग लाकडी जिन्यानं वर गेलो. तिसऱ्या खोलीत डोकावून बघितलं तेव्हा कुठं मनी दिसली. मला म्हणाली, लेझी पर्सन्स कॅननॉट अलाउड इनसाइड.
खोली रिकामीच होती. एक खिडकी होती तीही तिनं बंद केलेली. या जुन्या भयानक वाड्यात मी काय करतोय?
"किती डेंजर वारा सुटलाय" मी म्हणालो.
मांडी वगैरे घालून तिनं व्यवस्थित बैठक मारली होती. स्वच्छ. अतिशय स्वच्छ.
"आणि अंधारपण आत्ताच पडलाय" मी पुढे म्हटलं
"मग? तू आहेस की उजेड पाडायला" ही नेहमी अशीच बोलते.
मग मी खाली बसलो. सिगारेटचं पाकीट काढलं. एक सिगारेट पेटली.
मी म्हटलं, तुला त्रास नाही ना? मला त्याशिवाय काही सुचनार नाही.
तिनं पापण्या लववून जसं काही मुक संमती दिली.
मग मी झुरका मारत बाहेर आलो. आजूबाजुला कुणी नाही ना बघून घेतलं. उगाच भुतंबितं असली तर काय घ्या.
'इथं कोणीच कसं राहत नाही?' हा प्रश्न डोक्यात घेऊन मी आत आलो.
विचार करुन तिला म्हटलं,
"तर ती प्रिन्सेस डायना त्या घोडेवाल्याच्या घरी गेली......"
"ते कालंच झालंय, आता दुसरं. ती बाई होती की चेष्टा. एवढी अफेअर्स?"

सिगारेटची एक छान कीक बसली.

"डिप्रेशन. ते एक डिप्रेशन होतं. प्रत्येकालाच ते कधी ना कधी येतं. तुला माहिती आहे, पहिल्या महायुद्धानंतर संपुर्ण जगावरच एकप्रकारचं ग्रेट डिप्रेशन आलं होतं. आपल्या आयुष्यात असं काही नाही. एखादं युद्धसुद्धा होत नाही. फार मोठा विनाश अलिकडे कुठं झाला नाही. पुण्यात प्लेगची महामारी आली होती. आता तर ती सुद्धा नाही. आपण इतिहासाच्या अगदी शेवटच्या पानावर जगत असलेले कमनशीबी लोक आहोत. आता आपल्याला करण्यासारखं काहीच नाही. आयुष्य हेच एकप्रकारचं डिप्रेशन आहे. असंच मानतो आपण. कदाचित ते खरंही असेल."

ती म्हणाली, " हे मला जरा अवघड जातंय. इतिहास सगळ्यांनीच घडवला पाहिजे असं थोडीच आहे. त्यासाठी डिप्रेशनची गरज आहे हे कुठल्या गाढवीने सांगितलंय. आणि त्या सिल्व्हियाच्या स्टोरीचं काय झालं. मला तिच आवडेल"

भिंतीला टेकून मी जरा वेळ डोळे मिटले. म्हटलं, तंबाखू खाल्लीतर चालेल का?
खिशातून गायछाप काढून मग मी तंबाखू मळली. बार भरुन तिला म्हटलं,
"तुला नक्की कधी सांगितलं मला आठवत नाही. पण सिल्व्हियाच्या स्टोरीवर मी अजून विचार केला नाही. पण आपण प्रयत्न करु.."

"हो ना, तेच म्हणतेय, लेट्स स्टार्ट."

" कॅनडाच्या सुदूर भागात राहणारी..."

" कॅनडा? कॅनडा कशाला, आपला मराठमोळा सह्याद्री घे, आणि तिचं नाव पण बदल"

"अरे वा, थांब "
मग विचार करुन पुढे बोललो.

" घळईतून वाट काढत पुढे चालत गेल्यास एक विशाल पठार लागते. कुसळांची इथे भरमार आहे. खूप थकलो होतो. हातात एक दांडक घेऊन वाट तुडवण्याशिवाय पर्याय नव्हता.
दगडं. नुसती दगडं. उभी दगडं. आडवी दगडं. त्यावर पांढऱ्या चुन्यानं काहितरी गिरवलेलं. काहितरी होतं. पण कळत नव्हतं"

"तू तिथे कशाला गेलता कडमडायला?"

"मी नाही, नायक गेलता या स्टोरीचा. पण ऐक. जेव्हा तो नायक म्हणजे मी एका पायवाटेवरुन चालत गेलो तेव्हा त्याला म्हणजे मला लांबवर एका देवळावर पताका फडकताना दिसली. एवढा सुदूर विस्तीर्ण प्रदेश. एवढा उंचावर भयानक रखरखतं उन. तहान लागली होती. बाटलीतलं पाणी संपत आलेलं. अचानक आडवं आलं ते बाभळीचं झाड. त्याच्या सावलीत जरावेळ बसलो. मग झोप आली. भयानक झोप. या झोपेला अंधाराची सीमा नाही.

जेव्हा उठलो तेव्हा नक्कीच ती एक दुपार होती. डोळ्यातून झोप जायला अजिबात तयार नव्हती. तरीही उठून उभा राहिलो. गरगरलं.
डोळ्यासमोर दिसणारं मंदिर कितीही चाललो तरी जवळ येईना. एका खुरट्या झुडपावर दिसलं एक भगवं कापड. कितीतरी ठिकाणी उसवलेलं. कुण्या भक्तानं वाहिलेलं जीर्ण मळकट चिटोरं. अगदी माझ्या आयुष्यासारखं.

दोन काटे तोडून घेतले मी त्या झुडपाचे. डाव्या हाताच्या बोटावर टोचवले. भळभळत रक्त बाहेर आलं. ते माझ्या जिवंतपणाचं एकमेव लक्षण होतं.

मग मी पुढे गेलो. चालतच राहिलो. हातात बॅग होती. काय नव्हतं त्या बॅगेत. बरेच चिटोरे फिटोरे. बरीच तिकीटे. न जानो कोणकोणती गावं होती ती. कितीतरी मंदिरे. आणि कितीतरी आश्रमशाळा. कुठे कुठे मी अस्तित्व दाखवून आलो. दखल घेणारा कुणी भेटलाच नाही. "

"दुसरी कोणीतरी घेतली तरंच आपण आपल्या अस्तित्वाची दखल घेतो. हे किती विचित्र आहे"

"बरोबर बोललीस. अस्तित्व ही एक अशी गोष्ट आहे जी खुद्द अस्तित्वात नाही. तिची दखल घेतली तरंत ती येते. आणि तिच्याच शोधात मी निघालो होतो."

"पण का? का निघाला होतास. आणि डोंगरावरंच का गेलास, ते तर तुला शहरात लगेच मिळालं असतं"

"नाही, उलट शहरात तर ते हरवतं. लगेच हरवतं. भयानक यातना सहन कराव्या लागतात परत मिळवण्यासाठी. आणि उबग आणणाऱ्या गर्दीत जर ते मिळालं तर ते बिनकामी ठरतं."

"पण ते हरवतंच का? आणि डोंगरावरंच सापडेल कशावरुन?"

"असं काही नाही की डोंगरावरंच सापडेल. पण भटकतात. माणसं तिकडेच भटकतात. ते मूर्खही असू शकतील. कदाचित वेडेपण. चक्रम म्हटली तरीही चालेल. कसेही असले तरी ते 'असतात' असं म्हणणं चुकीचं ठरेल. मुळात ते 'नसतातच'. म्हणूनच भटकतात."

"हे ही मला अवघड चाललंय. पण तू पुढे बोल. काय झालं त्या माणसाचं?"

मी म्हटलं, मला अजून एक सिगारेट ओढायची आहे. आणि बाहेर वारं पण किती वादळी सुटलंय. तुला उशिर होईल जायला. तू जात का नाहीस?

पण ती गेली नाही.

मी बाहेर एक चक्कर टाकून आलो. आज पाऊस भयानक पडणार याची मला गॅरंटी होती. त्या वाड्याचं फर्निचर सगळं लाकडी होतं. कधीही कोसळलं असतं.
धूळ. भरपूर धूळ. एका आडव्या फळीवर प्रचंड धूळ साठली होती.

मी म्हटलं, हे बघ. किती धूळ साठलीय इथं. जमाना लोटला असेल झाडून.

ती म्हणाली, इथे बस खाली माझ्या शेजारी. मी सांगते पुढे.

" सह्याद्रीच्या विशाल डोंगररांगा, काटेरी झुडपे, आणि अतिविशाल पठार. सुदूर डोंगराचा एक राक्षसी कडा भयानक उंचावर गेलाय. तिथे पालवी आहे. झाडं झुडपं आहेत. ओली माती आणि मुख्य म्हणजे पाण्याचे झरे आहेत. तिथेच आहे एक ओबडधोबड देऊळ. आणि त्याची ती विशाल उंचावरची पताका.

मेंढरं. भरपूर मेंढरं आहेत आमच्याकडे. गवताळ प्रदेशात चरायला गेल्यास महिनोंमहिने वापस येत नाहित. धन्याची वाट बघणारी मी एक अभागी स्त्री. माझं नाव शालू. कपाळावर ठसठशीत कुंकू. हिरवा चुडा. गोंदण. चुलीत फुकारी घालून जाळ करणारी मी. कुडाच्या भिंतीत धूर साठून राहतो. दोन शेरड्या आहेत माझ्याकडे. त्यांनाच चरायला घेऊन मी रानोमाळ भटकत असते. उन्हाची काहिली झेपावत येते. मी एक मृगजळ. जितकी शोधाल तितकी दूर. विशाल उंचीवरच्या पताकेसारखी. "

मी म्हणालो, आता मी सांगतो.

" वैराण प्रदेशात त्या पताकेची फडफड कानावर येते आहे. न जाणो किती युगे लागतील तिथंवर पोहोचायला. आता या काटेरी केक्ताडातच जीव रमून जावा. सो सो करत उडणारा पक्ष्यांचा एक थवा जीवनाची प्रेरणा घेऊन येत आहे. उंच आभाळात घिरट्या घालणारं गिधाड किती उत्तुंग पोहोचलं आहे. प्रखर प्रकाशात डोळे दिपून जातात. मला भोवळ येते. सह्याद्रिचा राक्षशी कडा माझ्यापुढे ठाम उभा आहे.

वाटेत एका अडगळीला एक अतिशय जीर्ण मातीचं घर दिसलं. कुण्या एका पावसाळ्यात ढासळलेल्या त्याच्या भिंती अजूनही तग धरुन तश्याच उभ्या होत्या. तिथे तुऱ्याट्याचीच झाडं भरपूर. या वैराण प्रदेशात दुसरं उगवणार तरी काय.
सवंदडीत बसलो.म्हणालो, "गरिबाला पाणी द्या"
एका बाईनं मला तांब्यात पाणी आणून दिलं. मग एक बारकं मडकं घेऊन आली, म्हणाली, "ताक पण प्या, उनाचं चांगलं आसतं"

जरा तरतरी आली. मुख्य म्हणजे डोकं शांत झालं. घोटभर पाण्याची शांतता किती निळसर असते. मी डोळे मिटून भिताडाला टेकून शांत बसलो. त्या एका अद्भुत क्षणात माझ्या मनाची कितीतरी कवाडे उघडी पडली.

"जेवण करणार काय मामा..?" ती बाई आतून म्हणाली.
"उपकार होतील तुमचे.."

भाकर, ताक, ठेचा याचं ते एक सुग्रास भोजन.
मी म्हणालो, "हे माळवादी घर किती जुनं झालंय, तुम्ही डागडुजी का करत नाही. पलिकडची दोन भिताडं ढासळलीत"
ती बाई म्हणाली, "आपल्याला एवढंच पुरतं, आपल्याला जास जागेची गरजंच नाही. आपल्या आतल्या दोन खोल्या आपल्याला चिक्कार हाईत".

ती बाई जेवण होईस्तोर माझ्यासमोर बसून राहिली.
मी म्हणालो, आता मी निघतो. देव तुमचं भलं करो.

ती बाई म्हणाली, पुढं येक पडकं देवाळ हाये. तिथंच घटकाभर पडा. एवढ्या उन्हाचं फिरु नगासा. "

मनी म्हणाली, थांब. आता मी प्रयत्न करते.

"डोर्जेवाडीत भयानक रखरखतं ऊन. सकाळीच नणंद सांगून गेली, येताळबाबाला निवद दाव.
येताळबाबाला कोंबडं लागतं. आपल्याला ते जमणार नाय. आपण फक्त पुरणाची पोळी करणार. येताळबाबा राक्षसी देव आहे. मला तो आवडत नाही. सकाळी गेले. देवदेव करुन आले. लवणावरचा म्हसोबापण सोडला नाही.

मग दुकानावर येऊन बसले. रानोमाळ भटकते म्हणून दादल्यानं मला दुकान टाकून दिलंय. लेमनगोळ्या, चक्की, बर्फी, पुंगळ्या याचाच सगळा भरणा आहे. समोरच एक शाळा आहे. लांब लांबून वाड्यावस्तीवरची पोरं इथं शिकायला येतात. चारआठाण्याची गोळ्या बिस्कीटं घेतात. तेवढंच माझं धंदापाणी. किराणा अजून भरायचाय. पण थोडा जम बसल्यावर.
सकाळी पोरांची गर्दी हटली की दिवस नुसता रिकामा असतो. गोडेतेलाचा एक ड्रम आणला होता. आणि एक तराजूपण विकत घेतलाय. त्याचेच पैशे अजून फेडायचेत. ते फिटल्यावर मग बाकीचं साखर, शेंगदाणे, गुळ, डाळीडुळी सगळं आणायचंय मला.

त्यादिवशी दुकानावर बसले होते तेव्हा एक वेगळाच माणूस आला. नवीनच. ओळखीचा पण वाटत नव्हता. मला म्हणाला, सिगारेट मिळेल काय?
मी म्हणाले, अजूनतरी ठेवली नाही. तुम्हाला पायजेल तर तंबाखू देऊ?
मग त्यानं एक पुडी घेतली.
म्हणाला, "थोडं पाणी मिळालं तर बरं होईल"
मग मी त्याला थोडं पाणी आणून दिलं.
त्याला म्हणाले, "ताक पण आहे, पिणार काय? पाच रुपयाला ग्लास"
मग तो ताक पण पिला. फळीवर बसून निवांत झाला. मला तो भुकेला वाटला. म्हणून त्याला विचारलं, "जेवण करणार का मामा? आज पुरणपोळी हाये, तीस रुपयाला ताट.."

मग त्यानं सावलीत बसून जेवण केलं.
पैसे देत तो म्हणाला, "उपकारंच केले तुम्ही, इथं एवढं चांगलं जेवण मिळेल वाटलं नव्हतं."

मी म्हणाले, "आता शाळा सुटायचा टायम झालाय. व्हरांड्यातच ताणून द्या. दुपारंच गार झोप लागंल.

मग तो निघून गेला.

मी म्हणालो, आता मी सांगतो. थांब. तू एक वेगळंच वळण दिलेलं आहे.

" रखरखतं उन डोक्यावर घेऊन मी शाळेत पोहोचलो. जीर्ण उजाड भिंतींचा विस्तीर्ण प्रदेश. पत्र्याच्या खिडक्या, गज, फुटक्या फरश्यांचा व्हरांडा. मुंग्यांची एक रांग खांबावर चढते आहे. या लाल मुंग्या. तासंतास त्यांना बघून हरवून जावे. त्यांनी पकडलेलं भक्ष्य किती भरभर घेऊन जातात त्या. मी बाटलीतलं पाणी थोडं त्यांच्यामध्ये टाकलं. थोडातरी अडथळा पाहिजेच. त्याशिवाय मजा नाय."

मनी शांतपणे ऐकत होती. तिला असल्या गोष्टी ऐकायला आवडतात.
मी म्हटलं, मला आता झोप येतेय. मी जातो.
ती म्हणाली, तुला तर पावसात भिजत जायचं होतं ना. आतातर उन पडलंय. संध्याकाळी जा.

मी म्हटलं, मला माझ्या कल्पनेतला पाऊस पाडता येतो. आणि हे ऊन नाही, अंधार आहे.

ती म्हणाली, छत्री देऊ का मग? हा हा हा!

मग मी मनीच्या रुममधून बाहेर आलो. नाही नाही, मी त्या जुन्या पडक्या वाड्यातून बाहेर आलो. मेडीकल कॉलेज नामक त्या राजवाड्यासमोर एकही घोडागाडी थांबायला तयार नव्हती. रस्त्यावर प्रलय आला होता. मुसळधार पाऊस पडत होता. धो धो वाहणाऱ्या पाण्यातून चालत मी टेकडीवर आलो. चिंब भिजलेला मी. एकतरी सिगारेट हवीच. पण मी सिगारेट कधीच पित नाही. चिखलातून वाट काढत मी वीरप्पनला एक उडता सलाम ठोकला. मग होस्टेलवर आलो. डोके कोरडे केले आणि झोपलो.

-------------------------------------------------------------------------------
क्रमशः

बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार , पाच , सहा , सात , आठ , नऊ
------------------------

कथा

प्रतिक्रिया

क्षमस्व's picture

21 Aug 2016 - 7:29 pm | क्षमस्व

खट्याक!!!
किक बसली राव डोक्याला।
आणि ओरिजिनल जव्हेरशेठ स्टायल।
वेलकम बॅक।
(तरीही वाटायचंच जव्हेरशेठ लव्ह स्टोरी मध्ये लैच वाहवत चाललेय, पण नाही, आमची भक्ती फळाला अली आणि ओरिजिनल जव्हेरभाऊ परत आले।।।)

ज्योति अळवणी's picture

21 Aug 2016 - 8:16 pm | ज्योति अळवणी

थोडी अवघड वाटला हा भाग. कारण आधीचे खूपच वेगळे होते. पण लिंक लागल्यावर मजा आली.

लालगरूड's picture

21 Aug 2016 - 11:07 pm | लालगरूड

डोक्याला शाॅट

नावातकायआहे's picture

22 Aug 2016 - 5:07 am | नावातकायआहे

बाडिस

नाखु's picture

22 Aug 2016 - 12:02 pm | नाखु

रांगेत उभा आहे !

चाणक्य's picture

23 Aug 2016 - 2:52 am | चाणक्य

काय टोटल लागंना राव.

राजाभाउ's picture

22 Aug 2016 - 3:15 pm | राजाभाउ

एकदम जव्हेरभाउ टच. दोघांनी मिळुन गोष्ट सांगण्याची आयडीया पण भारी , आणि सांगीतलेली गोष्ट पण भारी.

रच्याकन पुर्वीच्या भागातली नेमाड्यांची आठवण करुन देणारी (तरीही स्वतंत्र) स्टाइल पण आवडली होती.

बोका-ए-आझम's picture

22 Aug 2016 - 3:28 pm | बोका-ए-आझम

पण मस्त आहे. पुभाप्र.

अजया's picture

22 Aug 2016 - 10:09 pm | अजया

अत्रंगी भारी डेडली काँबिनेशन!
पुभाप्र

जगप्रवासी's picture

22 Aug 2016 - 4:17 pm | जगप्रवासी

बऱ्याच दिवसांनी वर्जिनल जव्हेरभाऊ परत आले.

वर्तुळातून वर्तुळे, एकमेकांना छेदणारी, कधी स्पर्शून जाणारी.
कळतंय, कळत नाहीये.
जे काय ते भारीय.
शुभेच्छा जव्हेरभाव.

पक चिक पक राजा बाबू's picture

22 Aug 2016 - 6:21 pm | पक चिक पक राजा बाबू

जव्हेर भाव ,यूटोपिया मधे घेऊन जाता राव, खुप छान लेखन

संदीप डांगे's picture

22 Aug 2016 - 10:35 pm | संदीप डांगे

जव्हेरगंज हा एक अशक्य लेखक आहे.

समांतरः सचिन कुंडलकरला हे लेखन पाठवा रे कोणी तरी, अजूनही सत्तरीतल्या साहित्यावर अडकून ब(र)सलंय... आणि जरा मिपावरही चक्कर मारत जा म्हणावं. समकालिन (कन्टेम्पररी) दर्जेदार मराठी साहित्य सापडत नाहीये साहेबांना..

उडन खटोला's picture

22 Aug 2016 - 10:47 pm | उडन खटोला

कोण सचिन कुंडलकर? धन्यवाद.
काही लोक आपसुक डोक्यात जातात. त्यातलं हे एक. असो!

सुखी's picture

23 Aug 2016 - 10:24 pm | सुखी

____/\____

कसं काय सुचतं राव तुम्हाला....

खटपट्या's picture

24 Aug 2016 - 4:12 am | खटपट्या

चांगलंय, मदीच थोडं पोष्टीक झालं
आता तुमचं आनि मनीचं परत चालू करा

Jabberwocky's picture

30 Aug 2016 - 5:14 pm | Jabberwocky

लै भारी.....

वपाडाव's picture

5 Sep 2016 - 3:35 pm | वपाडाव

कधी सायकल, कधी लायब्कधी, कधी पुण्याचा फ्ल्याट तर कधी पडका वाडा...
रुळावरची श्टुरी नाहीये ही...

अभ्या..'s picture

5 Sep 2016 - 4:16 pm | अभ्या..

वप्या आला, वप्या आला.
अरे तुझी गरज त्या निओ मॉर्फीयस धाग्यावर आहे. तिकडे जा.