बादलीयुद्ध ४

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
7 Aug 2016 - 3:32 pm

बादलीयुद्ध एक , दोन , तीन
-------------------------------------------------------------------------------

चपातीयुद्ध

मेसमधल्या जेवणात सुकी भाजी जास्त मिळत नाही या एकाच कारणास्तव आम्ही मेस बदलली. चांगली मेस गावात होती. म्हणूनच आम्ही काकाला दुपारी होस्टेलवर डबे घेवून यायची शिफारस केली.
डब्यात सुकी आणि पातळ अशा दोन्ही भाज्या जास्तच चविष्ट असायच्या. बहुदा मेस बदलल्याचा परिणाम.
चार चपात्या खाऊनसुद्धा मला नेहमीच एक चपाती कमी पडलीय असं वाटायचं.
त्यादिवशीही असंच झालं. दिलीपनं आणि मी सोबत जेवण केलं. खाऊन पिऊन उपाशी असं काहीतरी मला वाटायला लागलं. राहावलंच नाही. सरळ कागद घेतला. त्यावर लिहीलं, ' कृपया या डब्यात एक चपाती जास्त घालावी'. आणि तो कागद डब्यात ठेवून मी कॉलेजला गेलो.
त्यादिवशी गोरख ऊशिरा जेवला.

दुपारी लेक्चरला प्रचंड झोप आली. मास्तर नेमका शिकवतोय काय हे मला आजपर्यंत तसेही समजतच नव्हते. गणित सोडल्यास बाकी कुठल्याही लेक्चरला बसण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बाकीचे सगळे बसतात म्हणून मी ही बसत होतो.
कुणीतरी एक उठायचा. इंग्लिशमध्ये शंका विचारायचा. म्हणजे यांना शंका पडोस्तोर समजतं तरी कसं. आमच्या वर्गात खरंच काही बुद्धिमान प्राणी राहतात याची मला खात्री पटली.
शेवटच्या बाकावर बसून वेळ घालवण्यासाठी मी वहीवर डोंगर वगैरे काढण्यास आता दिवसाही सुरुवात केली.

संध्याकाळी पुन्हा एकदा मेसचे डब्बे आमच्या खोलीवर आले. डबा उघडून बघतो तो काय, फक्त दोनच चपात्या?
त्यादिवशी मी अर्धपोटीच जेवलो. साला चिठ्ठी पाठवली म्हणून काकानं मला शिक्षा दिली की काय. तसंही त्यांची पोरगी बीए करत होती कुठेतरी. भांडी तीच धुवायची. पण म्हणून मी तिला प्रेमपत्र थोडेच धाडले होते.

हा नवीन मेसवाला काय ठिक वाटत नाही. रात्री तो डबे न्यायला आला तेव्हा मी त्याला जिन्यात गाठलेच.
"काका, अहो मी एक चपाती जास्त द्यायला सांगितली होती"
"ही चिठ्ठी तुम्हीच लिहीली होती काय?" खिशातनं चिठ्ठी काढत काका म्हणाला.
मी म्हटलं, हो.
"मग बरोबराय, दोन चपात्या कमीच दिल्यात की"
च्यायला डोक्यावर पडलाय का हा. लोकं बहीरी असतात असं ऐकलं होतं. पण शुद्ध मराठीत लिहलेलं पण समजत नाही यांना.
मग मी चिठ्ठी उघडून त्याला दाखवत म्हणालो,
"हे बघा काय लिहीलंय, 'कृपया या डब्यात दोन चपात्या कमी द्याव्यात'?"
च्यायला हे काय! माझी बोलतीच बंद झाली.

मग त्याला तोंडीच सांगितलं की बाबा उद्यापासून माझ्या डब्यात पाच चपात्या देत जा.
मग तो कागद घेऊन मी रुमवर आलो. हे घडलंच कसं. कागद नीट वाचल्यावर समजलं ते अक्षर माझं नाहीच.
"साल्या गोऱ्या" म्हणत तणतणतच गोरखच्या रुमवर गेलो. अगोदरच टपून बसलेले चारपाचजण तिथे खदाखदा हसत होते.
"च्यायला ते चिठ्ठी बिठ्ठी कशाला पाठवतैस रे , सरळ सांगायचं की" म्हणून त्यानेच माझी कानउघडणी केली.
"पण तुला कसं कळलं मी चिठ्ठी लिहीलीय?"
"दुपारी जेवायला आल्यावर मी चुकून तुझाच डब्बा उघडला रे, पैल्याच डब्यात चिठ्ठी"
गोरखनं त्यावेळी हसून घेतलं खरं पण मी त्याच्याकडचा अर्धी पिशवी चिवडा फस्त केला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा डब्बे आले, तेव्हा दिलीपनं आपल्याला भूक नाही असं जाहीर केलं. एक तर तो सणासुदीचा दिवस होता. डब्यात बरंच काही गोडधोड होतं. जी एक दुर्मीळ गोष्ट होती.
मग मी दिलीपचा एक आणि माझा एक असे दोन्ही डबे फस्त केले. त्यादिवशी मी एवढा जास्त जेवलो की पुढचा आठवडाभर माझी भूकच मरुन गेली.
वर तो काका रोज डब्यात पाच चपात्या पाठवायला लागला. चूकून एखादी शिल्लक राहीली तर तो पुन्हा कमी करेल म्हणून मी सगळ्या चपात्या बळजबरीने संपवत राहीलो.

----------------------

अशाच धामधुमीत आमची दुसरी सेमीस्टर जवळ आली. दिवस वैऱ्याचे होते. परिक्षेच्या अगोदर आम्हाला महीनाभर सुट्टी असते. तिला पीएल म्हणतात.
अचानक आपण कुठल्यातरी वैरान जागेवर येऊन पडलो आहोत असे वाटायला लागले. त्यादिवसांत कॉलेजवर कुत्रंसुद्धा फिरत नाही. तुम्ही सहज म्हणन चक्कर टाकायला गेलात तर तुम्हाला तिथे कोणीच दिसणार नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हे कॉलेज बंद पडलंय असंच तुम्हाला वाटेल. पण नीट नजर मारली तर अतिशय अडगळीतले कोपरे, गच्छीवरची पाण्याची टाकी, वर्कशॉपच्या पाठीमागच्या पायऱ्या, जिने, वगैरे ठिकाणावर एकांतवासातले एकटे जीव तुम्हाला हातात पुस्तकं घेऊन अभ्यास करताना दिसतील.

प्रत्येकाला या दिवसांत आपल्यातला एक 'स्व' सापडतो. कॉलेज हे एक तुरुंग आहे. आणि आपण त्यात डांबलेले कैदी. बाहेरच्या जगातला साधा एक गाडीचा हॉर्न जरी कानावर पडला तरी कधी एकदा हा तुरुंग भेदून त्या जगात जातोय असं होऊन जायचं.
रात्री मी कँटीगच्या बाजूलाच पायऱ्यांवर अभ्यास करत बसलो होतो. कितीही ओसाड वाटलं तरी या भागात थोडा उजेड असतो. थोडं पलिकडे वाळूच्या ढिगाऱ्यावर गोरख पुस्तक घेऊन पडलाय. मी हातातल्या पेन्सिलीनं जे काय महत्वाचं वाटलं त्या ओळींखाली खुणा करत जातोय. शेजारच्या गल्लीतून कुत्र्यांचा आवाज येतोय. त्याकडे सपशेल दुर्लक्ष करुन आम्ही अभ्यासाला झोकून दिलंय.
तेवढ्यात एका कर्णमधुर गिताचा आवाज ऐकू येतोय.
"कूं कूं कूं कूं....
चोलीके पिछे क्या है,
चोली के पिछे...."
ही एक जबरदस्त विसंगती होती. एवढ्या तणावाच्या वातावरणात हे असलं गाणं! पण गोरखच्या हृदयाचं पाणी पाणी झालं.
ट्रॅक्टरचा भटार आवाज ऐकू येऊ लागला. आणि आम्ही पुस्तकं तिथेच ठेऊन रस्त्यावर आलो. भरगच्च दोन टायल्या घेऊन धावणारा तो ऊसाचा ट्रॅक्टर आमच्या पुढून "चोलीमे दिल है मेरा" म्हणून निघून गेला.
मी आणि गोरख साधारण एक किलोमीटरपर्यंत त्याच्यामागे धावत गेलो. साला ऊसंच तुटेना. शेवटी टायलीवर चढून कसेबसे चार कांडके पाडले. गोरखने मात्र एक आख्खा ऊसंच मोळीतून बाहेर ऊपसला.
त्या रात्री आम्ही भरपूर ऊस खाल्ला.
"आमच्या गावाकडे हे आस्सा ऊस खातो" म्हणून आमची गावाकडची चर्चा रात्रभर रंगली.

गोरख सध्या माझ्यावर चिडलाय. मी सोबत असल्यावर भरपूर टाईमपास होतो असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्या तो मला चुकवून अभ्यासाला जातो.

एके दिवशी सकाळी मी त्याच्या रुमवर गेलो तर तो एक तंगडी वर करुन पुस्तक वाचत पडला होता. हा त्याच्या प्रयोगाचा एक भाग होता. बरेच विचारमंथन केल्यावर अभ्यास कसा करावा यावर त्याने संशोधन केले होते.

मी त्याला भल्या पहाटे ऊठून अभ्यास करण्याचा सल्ला दिला. पहाटे वाचलेलं कधीच विसरुन जात नाही हे ही त्याला पटवून दिल.
त्यादिवशी गोरख पहाटे चारला उठला. सरळ कॉलेजच्या पोर्चमध्ये जाऊन अभ्यासाला बसला. पण त्याची झोप काही जाईना. मग त्याने निष्कर्ष काढला. आता आपण रनिंगला जाऊया. म्हणजे मग झोप जाईल. मग हा टेकडीवर पळायला गेला. परत आला तेव्हा तो बराच दमला होता. मग त्याने सरळ पुस्तके उचलली आणि रुमवर येऊन झोपला.
"पळून पळून पाय दुखायला लागले मर्दा" तो म्हणाला आणि पुस्तक वाचण्यात गढून गेला.

मात्र त्याचे संशोधन चालूच राहीले. रात्री माझ्या रुमवर येऊन नक्की मी कुठल्या दिशेला बसून अभ्यास करतोय हे तो पाहून जायचा. हे एक भलतंच.

या सगळ्या प्रकारात दिलीप नक्की कोठे आणि कसा अभ्यास करतोय याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. मध्यरात्री साधारण दोन वाजता जेव्हा आम्ही सहज म्हणून लायब्ररीच्या मागे चक्कर टाकायला गेलो तेव्हा दिलीप तिघा चौघांना जमवून क्रिकेट खेळत बसला होता. मग मला त्यानं फिल्डींग करायला ऊभं केलं. आणि गोरखला बॉलिंग टाकायला लावली.
अर्थात दिलीप रात्रभर आऊट झाला नाही.
तेव्हापासून आम्ही त्याच्या वाटेला फारसं जात नाही.

एकदा असाच रुमवर अभ्यास करत बसलो असताना किसन नावाचा एक सीनीयर माझ्या रुमवर आला. हातातली तंबाखू मळत मला म्हणाला, "चिमूटभरच घ्यायची, पण अभ्यासाला अशी काय कीक बसते म्हणून सांगू"
मी म्हटलं, नको बाबा.
मग त्यानं दुसऱ्या हातानं मळलेली तंबाखू थोपटली. मला जोरदार शिंक आली.
"चार लोकं खोकल्याशिवाय मला तंबाखू खाल्ल्यासारखं वाटतंच नाय" म्हणून तो बार भरुन निघून गेला.

सालं किक बसायला आमचं नायट्रीक अॅसीडच पुरेसं आहे.

-------------------------------------------------------------------------------
क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

अमितसांगली's picture

7 Aug 2016 - 3:37 pm | अमितसांगली

आमचेही दिवस असेच गेलेत...जुन्या आठवनींना पुन्हा उजाळा...

लालगरूड's picture

7 Aug 2016 - 3:53 pm | लालगरूड

एकदम झ्याक..नायट्रीक अॅसिडच्या चवीची अजून आठवण येते

अमितदादा's picture

7 Aug 2016 - 4:08 pm | अमितदादा

मस्तच...

बाबा योगिराज's picture

7 Aug 2016 - 4:20 pm | बाबा योगिराज

हा हि भाग आवडल्या गेला आहे.

जव्हेर भौन्चा पंखा,
बाबा योगीराज

भारीच ,परत असा अभ्यास करावासा वाटाया लागलाय, मिसिंग काॅलेज डेझ

उदाहरणार्थ थोर वगैरे वगैरे लिहिलंय. :-)

अजया's picture

7 Aug 2016 - 8:29 pm | अजया

आज नेमाडे जरा जास्त झाले का?
'जव्हेरगंज' यांच्या लिखाणाची फॅन
-अजया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2016 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुभाप्र.

-दिलीप बिरूटे

उंडगा नाद's picture

7 Aug 2016 - 9:34 pm | उंडगा नाद

जव्हेरगंज भाऊंचा नवीन (मिपावरचा) पंखा ...

लालगरूड's picture

7 Aug 2016 - 9:41 pm | लालगरूड

आपण नाखुचे मावस भाऊ का?

नाय, ते खुळे आहेत. हे वेगळेच दिसतात.

नाखु's picture

8 Aug 2016 - 8:47 am | नाखु

नुसते खुळे नाहीत तर खुळ्यांचा नादही लागलाय त्यांना !!

आपलाच ओरिगनल नाखु

उडन खटोला's picture

7 Aug 2016 - 9:41 pm | उडन खटोला

नॉन हॅपनिंग खूप च सुरु आहे.

चार वर्षात आज पहिला प्रतिसाद देतोय

भारी आणि कडक

वरुण मोहिते's picture

7 Aug 2016 - 10:15 pm | वरुण मोहिते

कोसला नेमाडे
शोधयात्रा अरुण साधू
बाकी शून्य
कमलेश वालवारकर
ह्यांची आठवण झाली कडक लिहिता सर ..

पैसा's picture

7 Aug 2016 - 10:16 pm | पैसा

मस्त!

ज्योति अळवणी's picture

8 Aug 2016 - 12:17 am | ज्योति अळवणी

मस्त....... तुमच वर्णन त्या ठिकाणी नेऊन पोहोचवत. मजा आली वाचताना

पद्मावति's picture

8 Aug 2016 - 12:56 am | पद्मावति

हाही भाग मस्तं!

कंजूस's picture

8 Aug 2016 - 6:08 am | कंजूस

बादलीची कडी नं चार.

संजय पाटिल's picture

8 Aug 2016 - 7:25 am | संजय पाटिल

मस्त .... मिसींग होस्टेल डेज

चिनार's picture

8 Aug 2016 - 11:10 am | चिनार

मस्त !!
अभ्यास करायचे फंडे लय आवडले..मीपण असंच काहीबाही शोधायचो...

मास्तर नेमका शिकवतोय काय हे मला आजपर्यंत तसेही समजतच नव्हते. गणित सोडल्यास बाकी कुठल्याही लेक्चरला बसण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बाकीचे सगळे बसतात म्हणून मी ही बसत होतो.
कुणीतरी एक उठायचा. इंग्लिशमध्ये शंका विचारायचा. म्हणजे यांना शंका पडोस्तोर समजतं तरी कसं.

हे माझ्यासाठी तंतोतंत बरोबर आहे..
जव्हेरभौ....सलाम तुमच्या लेखणीला...

निओ's picture

23 Aug 2016 - 10:50 pm | निओ

हेच लय आवडलं ...बाकी लेखमाला जोरात चालू आहेच.

चांदणे संदीप's picture

8 Aug 2016 - 10:07 pm | चांदणे संदीप

मिसिंग बादली दो!

Sandy